मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ४१ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४१ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
म्हणे वाराणसीवासी । वेदधर्मा दीपकासी ।
पाहतां त्या राजपुत्रासी । हुंडासुरासी भय झालें ॥१॥
वैरूप्य वैरर्ण्य होऊन । म्हणे माझें सरे जीवन ।
तेजस्वी हे नृपनंदन । करील कदन पुढें माझें ॥२॥
हाचि यौवना येतां । मग नये माझ्या हाता ।
जरी धरावा आतां । तरी चित्ता भीति वाटे ॥३॥
कोणीहि समर्थ देव । ह्याचा रक्षी जीव ।
म्हणोनी माझें बुद्धिवैभव । सर्वथैव खचलें हें ॥४॥
स्वर्ग भूमी पाताळ । ह्यां धुंडितां असा प्रबळ ।
कोणी नसे तेव्हां घननीळ । हा सबळ खास असे ॥५॥
असता इतर जरी । तरी खास तयावरी ।
माझी माया पडती निर्धारी । तेव्हां दैत्यारी हा असावा ॥६॥
होईना कां घननीळ । महामाया असे सबळ ।
तिचें धरितां चरणकमळ । ती बळ देईल मला ॥७॥
हें मनांत आणून । हुंडदैत्य कर जोडून ।
म्हणे महामाये ये धांवून । दे आश्वासन ह्या दासा ॥८॥
हें अंत:करण माझें । इच्छी चरण तुझे ।
तूं सर्व दु:खांचें ओझें । आज माझें उतरीं हें ॥९॥
तुझा प्रसाद झाल्यावरी । मग कोण मशीं वैर करी ।
मीच सर्वांच्या उरावरी । बसेन मातोश्री निश्चयें ॥१०॥
मी अज्ञ तुझा बाळ । तूं करी माझा प्रतिपाळ ।
माझ्या हातीं दे हा बाळ । करी सफळ उद्योग माझा ॥११॥
मी अन्नपान सोडून । टपून राहिलों अनुदिन ।
आतां तूं कृपाकरून । अवलोकन करीं माते ॥१२॥
जरी बळी असेल अरी । किंवा साह्य अक्री हरी जरी ।
तूंकृपा करिसी तरी । पर्वा न धरी कोणाची ॥१३॥
मी बहि:स्थ असोन । आहिलों दीनवदन ।
आंत जावया मन । अनुमान करीतसे ॥१४॥
तूं क्षिप्र प्रसाद करिसी । तरी अशक्य काय आम्हासी ।
मग मी कोणासी । न आटोपेन ॥१५॥
सर्वज्ञ जो वैकुंठवासी । प्रळयीं तूं तयासी ।
निद्रारूपें व्यापिसी । मग इतरासी कोण गणी ॥१६॥
मी अन्नोदकाविण । येथें पावतों शीण ।
तूं न करितां कृपेक्षण । मजला मरण येईल ॥१७॥
आतां भक्तवत्सले हो प्रसन्न । तुला मद्यमांस बळी देईन ।
महामाये तुला नमन । दे वरदान मोहिनी ॥१८॥
दैतेय असा मोहिनीसी । भक्ति धरूनी राजसी ।
प्रार्थी मग तियेसी । ये करुणा तयाची ॥१९॥
तों अंत:पुरांतून । दासी बाहेर येऊन ।
बैसली तिला पाहून । दैत्याचें मन हृष्ट झालें ॥२०॥
म्हणे प्रवेशून इच्या शरीरीं । सुखें जावें अंत:पुरीं ।
असें आणूनि अंतरीं । तिच्या शरीरीं प्रवेशिला ॥२१॥
जी विज्ञसी तियेची । तिला तो सर्वथा खेंची ।
जी शक्ती स्वत:ची । तिची व्याप्ती करी अंगीं ॥२२॥
प्रच्छन्नपणें तो असा । सूतिकागृहीं सहसा ।
आला तिच्यासह तसा । कोण कसा ओळखी तया ॥२३॥
म्हणे प्रसन्न झाली मोहिनी । म्हणूनी आलों या सदनीं ।
आतां जपून प्रस्वापिनी । सर्वां मोडूनी ठेवितों ॥२४॥
जी तूं ज्ञान्याच्याही बुद्धीसी । प्रस्वापिनी मोह घालिसी ।
ती तूं आतां या समयासी । निजवीं सर्वांसी सत्वर ॥२५॥
कोणी न पाहावें मज । अशी सर्वां येवो नीज ।
प्रात:काळीं सहज । सर्वांची नीज खुलावी ॥२६॥
झोंप घनदाट सर्वां यावी । असा मंत्र मायावी ।
योजी मग ती देवी । गाढ निजवी सर्वांतें ॥२७॥
तो आनंद पावूनी । त्या बाळा उचलूनी ।
घे त्वरेंकरूनी । चाले निजपुरा ॥२८॥
तया न वारी दत्त । मंत्रशक्तीनें मान देत ।
सर्व होती मोहित । दैत्यचेष्टा नेणती ॥२९॥
सर्व प्रसुप्त पडले । कोणी त्याला न पाहिलें ।
त्याणें आकाशगमन केलें । बाळा नेलें नगरांत ॥३०॥
सर्वज्ञ भगवान् दत्त । ज्याचें अगाध चरित्र ।
भक्तांचें करावें हित । हेंचि संतत चिंती जो ॥३१॥
सकृन्नाम उच्चारितां । तो तारी निजभक्तां ।
मग सतत सेवितां । तो नित्ययुक्तां टाकील कीं ॥३२॥
बाळाप्रति नेऊनी । दैत्य स्वभार्येला बोलावूनी ।
तिचे करीं बाळा देऊनी । म्हणे छेदूनी शिजवीं यातें ॥३३॥
जो यज्ञ तप आदिक । करूनी राजा उपजवी लेंक ।
तो हा माझा अंतक । याचा पाक करीं वेगें ॥३४॥
म्यां हा महा यत्न । करूनी मिळविला जाण ।
याला आतांच हाण । प्रातरशन करावया ॥३५॥
हें अदृष्ट माझें सबळ । म्हणूनी मिळाला हा बाळ ।
हयगय करितां हा काळ । निर्मूळ करील ॥३६॥
अरिष्ट माझें टाळावया । याला आणिलें भक्षावया ।
त्याचें हें वाक्य ऐकूनियां । त्याची भार्या भ्याली ॥३७॥
बोले मग ती पतीसी । कां मारितां बाळासी ।
हा काळ तुम्हासी । केवीं शत्रु होईल ॥३८॥
तुम्ही व्यर्थ घात । करितां शास्त्रनिंदित ।
कुळाचा करील घात । बाळहत्यापाप हें ॥३९॥
हें केवळ साहस । लोकीं होय परिहास ।
दैत्य म्हणे तियेस । काय उपदेश तुझा हा ॥४०॥
दैवेंहा शत्रु उपजविला । हा घेईल माझ्या प्राणाला ।
कष्टें म्यां मिळविला । हा दयेला पात्र नाहीं ॥४१॥
आचार्य आमुचा विरोचन । त्याचें असें वचन ।
अकार्यही करून । आत्मरक्षण करावें ॥४२॥
हेंचि मत मान्य असे । देह हाची आत्मा असे ।
हा प्रत्यक्ष दिसतसे । न तसें तें असद्ब्रह्म ॥४३॥
हेंचि ग्राह्य होय मत । होतां आत्मयाचा घात ।
मग कोण भोगील अर्थ । हा पुन: दुर्लभ ॥४४॥
हें गुह्य शास्त्रमत । स्त्री पुत्र गृह वित्त ।
ज्याकरितां प्रिय होत । तो प्रेष्ठ देह आत्मा ॥४५॥
देहमत्र सदा रक्षेद्दारैरपि धनैरपि ।
पुनर्दारा: पुनर्वित्त न देहात्मा पुन: पुन: ॥४६॥
हेंचि लक्ष्यांत आणून । गुरुमातासी मानून ।
ह्या बाळा मारून । पाक करूनी दे सत्वर ॥४७॥
सक्षम करवीं पाक । असें सांगूनी तो बालक ।
तिच्या करीं दिधला ती धाक । मानूनी तोक घेतसे ॥४८॥
चरण धरूनी बाळाचे । ती हातीं दे सैरंध्रीचे ।
तिला सांगे याचें । हनन करीं सत्वर ॥४९॥
हा मम पतीचा वैरी । ह्याचा पाक शीघ्र करीं ।
आतां ह्याचीच न्हेरी । करील राक्षसेंद्र ॥५०॥
मृत्युचिंता मग जाईल । पती अमर होईल ।
असें सांगोन देई बाळ । स्वयें गुंते कार्यांतरीं ॥५१॥
अपत्य तें घेऊन । पाकस्थानीं नेऊन ।
बल्लवाचे हातीं देऊन । सैरंध्री वचन बोलतसे ॥५२॥
तुवां महाशस्त्र घेऊन । याचें करीं हनन ।
मग मी पाक करून । देईन नेऊन हुंडासी ॥५३॥
तो सव्य करें धरी बाळ । वामहस्तें करवाल ।
धरूनियां दोन वेळ । प्रहार करी जोरानें ॥५४॥
शत्र पडतां तयावरी । धार मोडोनी पडे दूरी ।
मग तो बाळा भूमीवरी । ठेवूनी मारी जोरानें ॥५५॥
दत्त देवानें सुदर्शन । तयावरी ठेविलें रक्षण ।
म्हणूनी शस्त्र गेलें मोडून । हें कोणी नेणती ॥५६॥
अदृश्य असे सुदर्शन । त्यावरी शस्त्र खणखण ।
बाजूनी जाय मोडून । बाळ हंसूनी राहिला ॥५७॥
बाळा मेषापरी माराया । यत्न केला तो वायां ।
गेला हें पाहूनियां । आश्चर्य तया वाटलें ॥५८॥
बाळका धरी सैरंध्री । म्हणे बल्लवा बाळापरी ।
आतां शस्त्र न मारीं । याचा कैवारी थोर असे ॥५९॥
हा आत्मज कोणाचा । कोण कैवारी याचा ।
हा निश्चय आमुचा । होत नाहीं यथार्थ ॥६०॥
दैव प्रबळ याचें । म्हणोनी मन आमुचें ।
द्रवलें आतां याचें । आम्ही रक्षण करावें ॥६१॥
कां दैत्य मारवी त्यासी । हें न कळे आम्हासी ।
राजचिन्हें दिसती यासी । हा दैवाचा पुतळा ॥६२॥
हा होय रत्नोपम । याला मारील कोण अधम ।
याचीं लक्षणें उत्तम । हा परमभाग्यशाली ॥६३॥
मग साहस सोडूनी । बल्लव द्रवला मनीं ।
बाळाचे दैवेंकरूनी । शांत होऊनी बोले तो ॥६४॥
हे सैरंध्री याला आतां । मी न मारीन सर्वथा ।
तेजस्वी हा ह्या पाहतां । पशुघ्रचित्ताही द्रव ये ॥६५॥
पहा प्रबल दैव याचें । शस्त्र मोडलें आमुचें ।
परी एक रोम न तुटे याचें । वज्राचें कवच यावरी ॥६६॥
शस्त्त्रें पंचत्व न पावे । याला दुष्ट दानवें ।
व्यर्थ कां मारवावें । परि हा दैवें रक्षिला कीं ॥६७॥
हा वांचोनी हंसतसे । ज्याचें दैव पप्रदक्षिण असे ।
त्याला कर्म रक्षितसे । तया कसें कोण मारील ॥६८॥
जे आपत्तीमध्यें पडती । घोरवनीं हिंडती ।
नदीप्रवाहें वाहती । किंवा पडती अडचणींत ॥६९॥
तया शरन होतां देव । कोण घेई त्याचा जीव ।
शस्त्राग्नी विष वैभव । तेथें अभाव पावेल ॥७०॥
हा अमंदभाग्य जाणून । म्यां शस्त्र दिलें ठेवून ।
असें बल्लवाचें वचन । ऐकून बोले सैरंध्री ॥७१॥
तुझें शांत मन झालें तर । दुसरें ठायीं सत्वर ।
नेऊन ठेवी हा कुमार । हें कृत्य असुर न जाणो ॥७२॥
असो तंतू हा कोणाचा । तूं प्राण वांचवीं याचा ।
मग असा तो बोल तिचा । बल्लवाच्या मना आला ॥७३॥
ही अशि मती तयांची । वळे ही कृपा दत्ताची ।
अंतर्यामी तो सर्वांचीं । अंत:करणें कां न वळवी ॥७४॥
बाळा वसिष्ठाचे दारांत । ते नेऊनी ठेविती त्वरित ।
मारूनी मृगाचा पोत । विश्वासें मांस ते देती ॥७५॥
दैत्य मनीं हर्षूनी । तें बाळमांस मानूनी ।
विश्वासें खाऊनी । धन्य मानी आपणा ॥७६॥
हें मद्वैर्‍याचें मांस । मी भक्षिलें आतां खास ।
म्यां जिकलें मृत्यूस । चिरंजीवी झालों म्हणे मी ॥७७॥
अस्वतंत्र असूनी । मूर्खही घमंडी मानी ।
ज्यावेळीं ज्याची मृत्युहानी । तीतें कोण फिरवील ॥७८॥
तो पांच घटी शेष रात्र । राहतां इकडे मुनीश्वर ।
उठोनी ये बाहेर । तंव दारीं पोर रडतसे ॥७९॥
तें कौतुक मानूनी । मुनिगणासह येऊनी ।
त्या बाळकातें पाहूनी । आश्चर्य मनीं करीतसे ॥८०॥
किमर्थ ह्याला कोणी रात्रीं येथें । ठेविलें हें न कळे मातें ।
आतां लावूनी ध्यानातें । ज्ञानें यातें जाणावें ॥८१॥
जो सम्मत देवांस । तो वसिष्ठ  ध्यानें जाणें त्यास ।
मग म्हणे मुनिगणास । याचा इतिहास सांगतों ॥८२॥
वदान्य जो श्रीदत्त । तो आयुराजातें वर देत ।
इंदुमतीच्या उदरांत । हा सुत जन्मा आल ॥८३॥
शुक्रान्तेवासी हुंडासुर । त्यानें रिपु मानूनी हा पोर ।
माराया आणिला सत्वर । तो हा दैवें येथें आला ॥८४॥
हा दिसतो दिव्यलक्षण । पूर्णचंद्रसम वदन ।
रत्नोपम राजलक्षण । विशाळ लोचन सुंदर ॥८५॥
वाटे आतांच जन्मला । देवगर्भसा दिसे मला ।
दत्त रक्षितसे याला । यावर घाला कोण घालील ॥८६॥
परात्मा दत्तात्रेय । जगव्द्यापक  श्रुतिगेय ।
त्याचा प्रसाद मिथ्या न होय । हा बाळ अजेय होईल ॥८७॥
दैत्यास मारूनी सत्वर । सर्वापत्ती करील दूर ।
हा चक्रवर्ती होईल शूर । सोमवंशाधार हा ॥८८॥
हें भविष्य खास म्हणूनी । जंव बोले वसिष्ठमुनी ।
तंव आकाशांतूनी । देवांनीं केली पुष्पवृष्टी ॥८९॥
मुन्याज्ञेनें ते ऋषी । आशिर्वाद देती बाळासी ।
जो व्यापी जगासी । तो दत्त बाळासी प्रतिपाळो ॥९०॥
जो पय:फेनधवल । तो दत्त रक्षो हें बाळ ।
आपत्ती वारूनी त्रिकाळ । रक्षो भूतखलग्रहहंता ॥९१॥
तो वसो हृदयांत । अरिष्टांचा करो घात ।
असें म्हणूनी विभूत । लाविती ते बाळासी ॥९२॥
हृदय वसिष्ठाचें मोहिलें । तया बाळा उचलिलें ।
अरुंधतीचे करीं दिलें । मन झालें तिचें हृष्ट ॥९३॥
जसा मातेच्या स्तना । बाळ पाहतां सुटे पान्हा ।
तसा सुटला पान्हा । तिच्या स्तनांतुनी तेव्हां ॥९४॥
सर्वात्मा अत्रिपुत्र । त्याचें कौतुक विचित्र ।
आपण राहूनी स्वतंत्र । जगद्यंत्र चालवी ॥९५॥
मुन्यध्यक्ष वसिष्ठऋषी । म्हणे हा बांधील शत्रूसी ।
म्हणूनी नहुष नाम यासी । ठेविलें म्यां ॥९६॥
सत्पक्ष हा धरूनी । दुष्टां ठेवील बांधूनी ।
नह बंधन असें स्मरूनी । नहुष नाम ठेविलें ॥९७॥
हाचि रक्षिल देवांस । म्हणूनी नाम ठेविलें नहुष ।
असें म्हणूनी बाळास । आशिर्वाद देई ॥९८॥
जो नमोंतप्रणवादी । दत्तात्रेय चतुर्थ्यंत मधीं ।
तो मंत्र लिहूनी कंठी बांधी । आधिव्याधि हरावया ॥९९॥
बाळकावरी प्रीती । ठेविती दंपती ।
सर्व प्रकारें रक्षिती । न विसंबिती क्षणभरी ॥१००॥
त्याणें रोदन करितां । अरुंधती गाऊनी गीता ।
थारवी तया पोता । दैवनाथा क्षणोक्षणीं ॥१०१॥
समाधिसुख अंतरून । मुनी करी बाळासी जतन ।
त्याचा स्नेह वाढवून । राजनंदन वाढे तो ॥१०२॥
मानी माता अरुंधतीसी । ताता म्हणे वसिष्ठासी ।
असा तो पुत्र तयांसी । मोहाविष्ट करी ॥१०३॥
तो मात्रंतर नेणें बाळ । दैवें वाढला विशाळ ।
येतां मुंजीबंधनकाळ । उपनयन करी मुनी ॥१०४॥
जो नृपाचा अधिकार । तदनुसार संस्कार ।
करूनी सांगे वेद चार । सहाशास्त्रांसहित ॥१०५॥
तो चौदा विद्या निपुण । झाला चौसष्टकळाप्रवीन ।
धनुर्वेदनिपुण । न्यायसंपन्न झाला तो ॥१०६॥
परमादरें करून । मुनीचें करी सेवन ।
वसिष्ठ प्रसन्न होऊन । दे सांगोन अस्त्ररहस्य ॥१०७॥
त्या पुत्रा सोमवंशी । जन्म असूनी वसिष्ठापाशीं ।
विद्या मिळाली दैववशीं । हें आयूसी न ठावें ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये एकचत्वारिशोsध्याय: ॥४१॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP