मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय २८ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २८ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे शिष्यासी । असी मदालसेसी ।
मिळवूनि नागपुत्रांसी । ह्मणे रायासी घेऊनिया ॥१॥
युक्तीनें या स्थानीं । यावें भूपा घेवूनी ।
येथील वर्तमान तयालागूनी । पूर्वीं न सांगोनी द्यावें हें ॥२॥
त्याचे दर्शनाची लालसा । असे आणि मदालसा ।
तया द्यावी निरालसा । झाला काल सानुकूल ॥३॥
मग ते नागसुत । तापसवेषें भूपाप्रत ।
जाऊनियां सांगत । तुम्हां तात बोलावीतसे ॥४॥
आमच्या आश्रमा जाऊन । ताता द्यावें दर्शन ।
सवें येऊं परतोन । आतां अनुमान न करावा ॥५॥
असें मित्रांचें वचन । ऐकोनी नृपनंदन ।
तया तथास्तु म्हणून । प्रेमें उठोनी चालिला ॥६॥
नृप म्हणे मित्रांसी । न तोडवे प्रीतीसी ।
म्हणूनी तुमच्या आश्रमासी । निश्चयेंसी जाऊं या ॥७॥
ददाति प्रतिगृह्णाति । गुह्यमाख्याति पृच्छति ।
भुंक्ते भोजयते चैव । षड्विधं प्रीतिलक्षणं ॥८॥
हें प्रीतिलक्षण । मी मनीं आणून ।
आतां आलों उठोन । असें म्हणोन चालती ॥९॥
येऊनी गोमतीतीरीं । नृपा धरती ते करीं ।
नेऊं इच्छिती जलांतरीं । नृप अंतरीं चमकला ॥१०॥
हे वानप्रस्थाचे सुत । नृप तोंवरी मानीत ।
साशंक होऊनी राजसुत । ह्मणे इत्थंभूत सांगा आधीं ॥११॥
ते हसोनी बोलती मग । पाताळीं जो कंबलनाग ।
ईश्वरीं ज्याचा अनुराग । सर्वयोग जाणे जो ॥१२॥
त्याचे आम्ही सुत । तुला नेऊं पाताळांत ।
भीति न आणी मनांत । घडेल तातदर्शन ॥१३॥
असें तया सांगोन । योगप्रभावें करून ।
तया पाताळीं नेऊन । पितृदर्शन करविती ॥१४॥
पाहून पाताळरचना । पाहूनी दिव्यभवना ।
घेऊनी नागाच्या दर्शना । ह्मणे स्वर्गभुवना आलों कीं ॥१५॥
सुत ह्मणती नागासी । आणिलें ह्या मित्रासी ।
अश्वतर म्हणे रायासी । माझ्या इच्छेसी पूर्ण केलें ॥१६॥
म्हणोनी दे आलिंगन । त्याचें मस्तक हुंगोन ।
देई आशीर्वचन । सुखें जीवन होवो तुझें ॥१७॥
राजा म्हणे तयासी । हें अपूर्व दर्शन आम्हांसी ।
माझ्या धन्यपणासी । बोलतां वाचेसी शक्ती नसे ॥१८॥
मित्रयोगें करून । ह्या पाताळीं येऊन ।
घेतलें आपुलें दर्शन । झालों पावन आज मी ॥१९॥
मातीकरितां खाणितां । जेवी निधान ये हातां ।
तेवी झालें हे आतां । कृतार्थता काय बोलूं ॥२०॥
नाग म्हणे तुझें दर्शन । व्हावें म्हणूनी माझें मन ।
उत्सुक होतें बहुदिन । आजी समाधान वाटलें ॥२१॥
पुत्रांनीं जे जे तुझे गुण । केले होते निरूपण ।
तें ते दिसती पूर्ण । सर्वगुणसंपन्न तूं ॥२२॥
जो मागसी वर । तो देईन सत्वर ।
तया म्हणे नृपकुमार । असो मजवर कृपादृष्टी ॥२३॥
तुमच्या प्रसादे करून । नगरें सर्व असे पूर्ण ।
धर्मीं राहो माझें मन । पितृसेवन घडावें ॥२४॥
नाग ह्मणे तूं धार्मिक । अससीं पितृसेवक ।
तुला मानिती लोक । उभयलोक घेसील तूं ॥२५॥
जें इष्ट असे मानसीं । तें माग मजपासीं ।
मग राजा लाजोनी मानसीं । मित्रमुखासी विलोकी ॥२६॥
मग ते ह्मणती नागासी । मदालसेवांचून मानसीं ।
इष्टपदार्थ दिवानिशी । प्रिय यासी न वाटे ॥२७॥
नाग म्हणे ती जळाली । जरी तीची इच्छा झाली ।
मायेची करूनी बाहुली । दावितों आतां सत्वर ॥२८॥
असें तया सांगून । मदालसेसी आणून ।
नाग दावी दूरोन । राजा पाहून भुलला ॥२९॥
अहा प्रिये ह्मणून । राजा जाई धावून ।
नाग तया सांवरून । म्हणे भुलोन जाऊं नको ॥३०॥
हे म्यां केली मायेची नारी । माया पाहणें तरी ।
पहावी राहून दूरी । न दिसे करीं धरितां ती ॥३१॥
तूं असूनी विचारशील । कां मायेशी घेसी भूल ।
माया असे चंचल । होई तत्काल अदृश्य ॥३२॥
असें नाग सांगे तरी । तो व्याकुळ झाला अंतरीं ।
ह्मणे प्रियेला धरीन करीं । न करि विघ्न तूं आतां ॥३३॥
मग वल्लभे म्हणून । पडला तो राजनंदन ।
नाग तया उठवून । ह्मणे मन सांवरी ॥३४॥
ही तुझी मदालसा । शिवाचा हा प्रसाद असा ।
ह्मणोनी दाविली मदालसा । ह्मणे सुखी असावें तुह्मीं ॥३५॥
मग नाग संतोषून । विघीनें देई कन्यादान ।
अमूल्य रत्नाभरण । देऊनी नृपनंदन गौरविला ॥३६॥
अनुग्रह सरस्वतीचा । प्रसाद श्रीशंकराचा ।
सांगोनी नाग म्हणे आमुचा । हेतू पूर्ण जाहला ॥३७॥
असें नाग बोलूनी । कांहीं काल राहवोनी ।
तयांची करी बोळवणी । पुण्यावाणी अश्वतर ॥३८॥
राजा म्हणे हा उपकार । यासी नसे प्रत्युपकार ।
याचा पडतां विसर । कृतघ्नत्व येईल ॥३९॥
स्वल्पमप्युपकारं यो न वेत्ति मनुजाधाम: । कृत्घ: स तु विज्ञेयो ब्रह्मघ्नादतिरिच्यते ॥४०॥
असें राजा बोलून । पत्नीसह अमृतपान ।
तेथें राजा करून । नागां वंदून चालिला ॥४१॥
सवें घेऊनी मित्र दोन । पत्नीसह नृपनंदन ।
पुरासमीप येऊन । कळवी वर्तमान पितयासीं ॥४२॥
ऐकतां राजा हर्षला । पौरांसह चालिला ।
त्वरें येऊन भेटला । म्हणे आला पुत्र सत्य ॥४३॥
पाहुनी मदालसेसी । आश्चर्य वाटलें सर्वांसी ।
म्हणती पुन: ही आली कसी । जशीच्या तसी मागुती ॥४४॥
रूप तेंची वय तेंची । आकार तोची शब्द तोची ।
भासतो स्वभाव तोची । आश्चर्य हेंचि वाटतें ॥४५॥
राजा म्हणे जी जळाली । ती मागुती कैसी आली ।
हे कोठें मिळाली । किंवा बाहुली मायेची ॥४६॥
असें राजा म्हणोन । पुत्रा देई आलिंगन ।
प्रेमाश्रु टाकून । कंठ भरून रडतसे ॥४७॥
म्हणे पुत्रा तूं धन्य । तुझें अपार पुण्य ।
तूंची होसी लोकमान्य । नसे अन्य तुजसमान ॥४८॥
देवाची कन्या वरिली । ती दैवें नष्ट झाली ।
पुन: तीच मिळविली । कीर्ती ही भली पसरेल ॥४९॥
सर्व पौरलोक येती । मदालसेसी पाहती ।
त्यांच्या हर्षा नाहीं मिती । ह्मणती ईश्वर पावला ॥५०॥
सर्व नगर शोभविलें । ध्वज उंच उभारिले ।
मार्गीं चंदनाचे सडे दिधले । समोर आले सर्वजण ॥५१॥
मेरी दुंदुमी वाजती । कन्या लाह्या टाकिती ।
पुष्पांचे वर्षाव करिती । प्रेमें नृपती सुतावरी ॥५२॥
असा उत्सवें नगरीं । राजपुत्र प्रवेश करी ।
सर्वांचे सत्कार करी । हर्ष अंतरीं पावूनी ॥५३॥
करी पित्यासी नमस्कार । प्रेमें तो राजकुमार ।
सांगे मित्राचा उपकार । म्हणे उदार हे नाग ॥५४॥
दु:खें वास करितां वनीं । नागपुत्रांनीं मैत्री करूनी ।
माझें दु:ख्ह जाणूनी । पितया जाऊन कळविलें ॥५५॥
तत्पिता अश्वतर । तप करी हिमाचळीं घोर ।
सरस्वती आणि शंकर । ह्यांपासून वर संपादिला ॥५६॥
ज्या वरें करून । मदालसा झाली उत्पन्न ।
ती मला दिली दान । नागानें मानपुर:सर ॥५७॥
असें तें पुत्राचें वचन । साद्यंत ऐकोन ।
म्हणे हें नवल पूर्ण । माझें मन हृष्ट झालें ॥५८॥
पूर्वीं दक्षकन्या होऊन । सती शिवाला वरून ।
दक्षयागीं जळून । पर्वतापासून पुन: झाली ॥५९॥
पुनरपि ती पार्वती । शिवाला करी पती ।
तेवी हे मदालसा सती । पुन: पती तोच करी ॥६०॥
धन्य ईचें तपोबल । उद्धरिलें आमुचें कुळ ।
इचें पाहतां शीळ । गंगाजळसम वाटे ॥६१॥
असें राजा बोलूनी । मनीं आनंद पावूनी ।
म्हणे मी वृद्ध होऊनी । नृपासनीं अयोग्य झालों ॥६२॥
कुवलयाश्वा तूं विनीत । अससी औरस सुत ।
आतां राज्य करी निश्चित । मी वनांत जाईन ॥६३॥
क्षत्रियांचा हा धर्म । येणें सफळ होय कर्म ।
मिळवावें मोक्ष शर्म । आतां नर्म कासया ॥६४॥
असें पुत्रा सांगोन । सामग्री मिळवून ।
रायीं पुत्रा अभिषेकून । नृप समाधान पावला ॥६५॥
राजा वनीं जाऊन । संपादूनी साधन ।
मिळवूनीयां ज्ञान । घे निर्वाण शाश्वत ॥६६॥
कुलवयाश्व राज्य करी । अधर्माते न करी ।
प्रजा पाळी पुत्रापरी । राजी सर्व प्रजा ज्याला ॥६७॥
शिववरें करूनी । मदालसा ब्रह्मवादिनी ।
आत्मनिष्ठ होऊनी । राहे सदनीं अनासक्त ॥६८॥
जीचें न लोपलें पूर्व स्मरण । शिवप्रसादें झालें ज्ञान ।
तथापि पतीच्या चित्ता धरून । करी आचरण लोकसंग्रहार्थ ॥६९॥
( अंजनीगीत ) । ऋतुध्वज राज्य करी ।
तया मदालसा नारी । संभोग दे स्वयें जरी । ब्रह्मनिष्ठा ॥७०॥
दैवें तिला पुत्र झाला । उपजतां सांगे त्याला ।
कां रडसी तूं कोणाला । आतां व्यर्थ ॥७१॥
जातां मार्गें भूल घेसी । म्हणूनी या चौर्‍याऐंशी ।
योनी कष्टें धुंडिल्यासी । निजकर्में ॥७२॥
करितासी देवध्यान । तप्तलोहस्त्र्यालिंगन ।
न येतें रे पोरा मन । सांवरीं हें ॥७३॥
वैराग्यानें खातां भीक । तोंडीं येतां न नरक ।
रूपा न भुलतां आंख । न फुटतें ॥७४॥
नानायोनी त्वां धुंडितां । तेथें मार्ग न ये हातां ।
मार्गावरी तूं रे आतां । पातलासी ॥७५॥
नको रडूं उगी राहे । बुडसील मिथ्या मोहें ।
तुझा मार्ग तूंच पाहे । विचारानें ॥७६॥
जन्ममरणा रडसी । तरी त्याच्या संबंधासी ।
कदापी तूंन शिवसी । निर्विकार ॥७७॥
जो मातेच्या विटाळांत । भेटतां रक्तरेत ।
विष्ठामूत्रीं झाला मूर्त । तो तूं कसा ॥७८॥
हाडामांसाच्या देहासी । मूर्खपणें भूललासी ।
त्याच्या योगें संबंधासी । घेसी व्यर्थ ॥७९॥
कोण माता कोण पिता । कोण तुझी कांता सुता ।
अविचारें ही ममता । कां धरीसी ॥८०॥
हाडामांसावरी कात । विष्ठा मूत्र त्याचे आंत ।
त्याला मी मी ऐसी भ्रांत । येऊं न दे ॥८१॥
जड प्राण रजोगुणी । कर्मेंद्रियां कवळूनी ।
खातो पितो हे त्याहूनी । तूं वेगळा ॥८२॥
ज्ञानेंद्रियांची मेळणी । मन पळे क्षणोक्षणीं ।
त्याचा साक्षी तूं त्याहूनी । निश्चळ रे ॥८३॥
ज्ञानेंद्रिया आंत धरी । मी कर्ता हा गर्व करे ।
निज उठे ती रे दूरी । बुद्धी तुला ॥८४॥
प्रियमोदप्रमोदानें । जो भासे त्या आनंदानें ।
न घे भोक्तृत्वाला ध्यानें । पाहे स्वात्मा ॥८५॥
असें जरी हें करसी । तरी बारे न फससी ।
नाहीं तरी फेरी घेसी । ऐसी पुन: ॥८६॥
तीनी देहांचा मी साक्षी । तीनी अवस्था निरीक्षी ।
निरंतर असें लक्षी । व्यापकत्वें ॥८७॥
असा रोज वारंवार । माय करी बोध फार ।
द्वैतवार्ता करी दूर । कळवळे कळकळीनें ॥८८॥
( ओवी ) । पुत्रा देई दुग्धपान । प्राण वांचावा म्हणून ।
गाण्याचें मिष करून । वेदांतनिरूपण करीतसे ॥८९॥
माता म्हणे सुतासी । प्रमाद मृत्यु सहवासी ।
असें म्हणूनी कीं जरी रडसी । तरी तुजशी न शिवेल तो ॥९०॥
तूं उताणा राहूनी । कां रडशी आक्रोशोनी ।
काय उपयोग रडूनी । आतां हें मनी विचारी तूं ॥९१॥
तूं शुद्ध अससी । तुला दु:खवार्ता कसी ।
जरी रडसी देहासी । कासया अशुद्धासी रडावें ॥९२॥
देह असे जायाचा । तो खचीत जायाचा ।
स्नेह सोडून जायाचा । इजा याच्या अभिमानें ये ॥९३॥
तूं असोनी असंग । तुला ये कीं देहाचा संग ।
देहनाशें तुझा न भंग । रडावें कां मग देहासी ॥९४॥
विश्वाचा जनक । तुझे पोटीं सर्व लोक ।
तूं कोणाचा कसा लेंक । मानिसी दु:ख अविचारें हें ॥९५॥
पंचभूतांचा समूह । अन्नमय हा देह ।
हा दु:खशोकावह । महामोहगेह हें कीं ॥९६॥
हा प्रत्यक्ष दिसतसे । हा तों अत्यंत जड असे ।
त्याला चैतन्य म्हणावें कसें । नश्वर असे हा खास ॥९७॥
तूं म्हणसी हा वाढतो । सुखदु:खा जाणतो ।
शीतोष्णादि ओळखतो । मग तो कसा जड ॥९८॥
तरी ऐक विशद । जें ब्रह्म सच्चिदानंद ।
तें न घटे न वाढे निर्विवाद । तें आनंदकंद सदा असे ॥९९॥
इटा डाळता भिंत । असे जशी वाढत ।
तसा अन्नानें हा वाढत । असे सच्चिदनुग्रहें ॥१००॥
जो सुखदु:खसाक्षात्कार । तो मनाचा व्यापार ।
मन व्यापी शरीर । सुखदु:खाचा विचार तयासी ॥१०१॥
तेंही जड असून । चैतन्याभासयुक्त होऊन ।
सुखी दु:खी भासे हेंही अज्ञान । ज्ञानशक्ति ब्रह्माची ॥१०२॥
मनोद्वारा त्वगिंद्रिया । व्यापितां त्या आत्मया ।
शीतोष्णादि निश्चया । करवे अन्या नोहे हें ॥१०३॥
माझा देह म्हणसी । मग तूं देह कसा होसी ।
तूं असंग अससी । तुझी या देहासी व्याप्ति । कशी बोल बरें ॥१०४॥
अध्यासानें हा भ्रम घेसी । अहंता ममता वागविशी ।
यामुळें व्यर्थ फससी । तरी भ्रमासी दूर करी ॥१०५॥
तूं अससी अत्यंत शुद्ध । चैतन्यरूपीं प्रबुद्ध ।
रक्तमांसात्मक देह अशुद्ध । जाण तूं ॥१०६॥
असा बोध वारंवार । माता करी निरंतर ।
द्वैतवार्ता कानावर । येवूं नेदी सर्वथा ॥१०७॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये अष्टाविंशोsध्याय: ॥२८॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP