मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ४८ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४८ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ४८ वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥जो आद्यन्तरहित । तो भगवान् श्रीदत्त ।म्हणे राया सतत । स्वच्छ असावें उदकापरी ॥१॥नित्य या जगीं सर्वांशीं । स्नेह ठेवावा दिवानिशीं ।कडू न व्हावें कोणासी । रहाटी अशी असावी ॥२॥जे अमृतासम भाषण । तें परिमित बोलून ।सर्वांशी गोडी ठेवून । अनुदिन वागावें ॥३॥अमृतप्राय गोड बोलतां । सर्व वळती तत्त्वतां ।उदकाला गुरु करितां । ये हाता हा गुण ॥४॥जसें मधुर स्वच्छ जळ । स्वभावें असे निर्मळ ।म्हणोनी लोक सकळ । पाहतां जळ धांवती ॥५॥या अश्नुवंति ता आप: । म्हणोनी उदका म्हणती आप ।पाहिजे तिकडे होतां व्याप । आप समान ॥६॥नरें तेवीं गोड भाषण । सर्वांशीं स्नेह ठेवून ।सर्वांत जावें खपून । उदकासमान निरंतर ॥७॥जळ अंगी प्रोक्षितां । पितां आचमन करितां ।किंवा दृष्टीनें पाहतां । स्नान करितां पवित्र करी ॥८॥सर्व धंदे जळावर । लोक करिती वारंवार ।परी तें न विटे साचार । तसा आचार नरें ठेवावा ॥९॥सतत स्वच्छ राहे नर । त्याचें होतां दर्शनमात्र ।पाणी होई पवित्र । असें चरित्र स्वच्छतेचें ॥१०॥जो नमस्कार करी । किंवा सेवा करी ।तयातें स्वच्छ नर तारी । तीर्थजळापरी निरंतर ॥११॥नरें प्रशस्तपणा धरून । जलाप्रमाणें राहून । स्वयें पवित्र असून । इतरां पवित्र करावें ॥१२॥हाच विशेष गुण । जळ पोटीं मळ ठेवून ।बाहेर स्वच्छ असून । करी मळक्षालन इतरांचें ॥१३॥जो नि:शंकपणें हा देह । मळमूत्रकफांचें गेह ।पंच भूतांचा समूह । तयाचा मोह कासया ॥१४॥सुमति जो मानव । मोह न धरितां सदैव ।ह्याच देहें ज्ञानवैभव । मिळवी भवनाशक ॥१५॥ज्ञान येतां हातासी । कृतार्थता ये तयासी ।तरी न टाकी देहासी । राखी लोकांसी तारावया ॥१६॥कर्म संचित जाळून । क्रियमाण टाळून ।प्रारब्धमात्रा घेवून । राहे पावन कराया लोकां ॥१७॥स्वेंच्छें भूमीवरी फिरून । दर्शन स्पर्शन देवून ।करी लोकांतें पावन । उदकासमान होवूनी ॥१८॥स्वगति करितां जळ । सोडूनी दे उच्चस्थळ ।उन्नत वृक्षा पाडी समूळ । तारी नम्र लव्हाळ्या ॥१९॥तसा मुक्त नर जाण । गर्वें ताठरती त्यां टाकून ।वळती लीना देखून । घालवून त्याचें पाप ॥२०॥जे कां पाखंड दुर्मती । शापूनी तयांप्रती ।समूळनाशा पावविती । तारिती सदा लीनांतें ॥२१॥जळास गुरु करून । घेतलें म्यां हें शिक्षण ।हा चवथा गुरु जाण । पांचव्याचा गुण सांगतों ॥२२॥तपें तेजस्वी असावें । लोकां प्रदीप्त दिसावें ।पाहिजे तिकडे खावें । परी न शिवावें दोषासी ॥२३॥जनांत वागतां आपण । राहावें गुप्तपणा धरून ।केव्हां केव्हां प्रगटपण । धरून राहटी करावी ॥२४॥भजतो जो आपणासी । पुरवावें त्याच्या कामासी ।भचकांच्या पापासी । नाश करावें समूळ ॥२५॥जरी भूमीवरी फिरतां । कांहीं मिळे खाण्याकरितां ।त्याचा न करावा सांठा । अग्नि गुरु करितां कळे हें ॥२६॥जो स्वयमेव तेजस्वी । लोकां आपुली दीप्ती दावी ।तापें शीत पळवी । प्रकाशें घालवी अंधकारा ॥२७॥अग्नी इकडे तिकडे फिरून । पाहिजे तें खावून ।पुन: सोंवळा राहून । सर्वां समान वागतसे ॥२८॥अग्नी वरिष्ठ होवून । पाहिजे तें खावून ।दोषाचा लेशही न घेवून । शुद्धपणा न विटवी ॥२९॥ज्याचा तेजस्वीपणा अचाट । कोठेंही जया नये वीट ।हें शिक्षण नीट । साधकें धीटपणें घ्यावें ॥३०॥कुंडांत अग्नीस ठेवून । काष्ठानें प्रदीप्त करून ।अग्निहोत्री करिती हवन । तया पावन करी तो ॥३१॥कोणी मोकळा ठेविती । तो अजस्त्र पक्ष म्हणती ।कोणी गोळा देवून झांकिती । उद्धरण करिती होमकाळीं ॥३२॥तया यजमानाचे स्वाधीन । अग्नी सदा राहून ।नित्य सेवा घेवून । करी पावन तयासी सदा ॥३३॥जशी उपासना जयाची । तशी इच्छा पुरवी तयासी ।आहुती ज्या देवांची । देती तयां ती पोंचवी ॥३४॥अग्नी संग्रहही न करी । त्याला काष्ठादि मिळे तरी ।जाळुनी त्याची राख करी । यापरी नरें वागावें ॥३५॥जो विभू परमात्मा जाण । तया आकार नसून ।आकार ये दिसून । तो मिथ्या जाण अग्नीपरी ॥३६॥मिळे त्यांत प्रवेशून । त्या त्या काष्ठा जाळून ।स्वयें निराकार असून । तसा दिसून ये अग्नी ॥३७॥जें थोर काष्ठ असे । तया झळकूनी थोर दिसे ।लहानाच्या योगें लहान दिसे । लांब चवडा वाटोळा ॥३८॥विमता: सकला जीव ध्रौव्यादाकारवर्जिता: ।यत्तारतम्यं तेषां तु तत्काष्ठाश्रितवन्हिवत् ॥३९॥अग्नी असे निराकार । काष्ठ मिळतां तदाकार ।दिसे तसा हा साकार । नाना शरीरयोगें आत्मा ॥४०॥अनन्यशरण जो नर । तो ज्ञानबळें सत्वर ।टाकी उपाधी नश्वर । होई निराकार परब्रह्म ॥४१॥कर्म देहाचें मूळ । तें ज्ञानें जाळी समूळ ।मग निरुपाधिक केवळ । होयी विमळ परब्रह्म ॥४२॥अग्नी वाढूनी काष्ठाबरोबर । दावी काष्ठासारिखा आकार ।राख करूनी सत्वर । आकार टाकी तसा आत्मा ॥४३॥जो बहुधा बहुरूप । रूपं रूपं प्रतिरूप ।हा वेदाचा आलाप । तेव्हां रूपरहित आत्मा ॥४४॥हें निस्संदेह कळावें म्हणून । अग्नीस गुरु करून ।देहाभिमान सोडून । राहे पडून ये स्थळीं ॥४५॥क्षणभग्नत्व देहाचें । जाणतां वैराग्य बाणे साचें ।हेंही जाणाया अग्नीचे । ज्वाळेचें शिष्यत्व कीजे ॥४६॥बरवा विचार करून । पाहतां क्षणोक्षण ।देहसंबंधीं भूतें उपजोन । जाती मरोन प्रत्यहीं ॥४७॥ज्वाळा दरवेळीं जशा । उपजूनी पावती नाशा ।देहसंबंधीं भूतांची ती दशा । सूक्ष्मदशा कळे ही ॥४८॥हें मान्य करी जो नर । तो देहा क्षणभंकुर ।मानूनी वैराग्य सादर । भवसागर उलंडी ॥४९॥हें उदारत्व थोर । सोडावें देहाचें ममत्व सत्वर ।हा बोध घेतला सादर । पांचव्या गुरूपासून ॥५०॥जे बहु विकार । भासती तें शरीरावर ।न घडे न वाढे आत्मा पर । हे निशाकर गुरू सांगे ॥५१॥पहा रवी हा तेजोमंडळ । ग्रह नक्षत्रें उदकमंडळ ।तेव्हां चंद्र जळमंडळ । हे निखळ जाणावें ॥५२॥जेव्हां संयोग सूर्यचंद्रांचा । एक नक्षत्रयोगें साचा ।तेव्हां चंद्रकलांचा । नाश होय ती अमावास्या ॥५३॥चंद्र भचक्रीं साठ कलांनीं । जाय नक्षत्र भोगूनी ।सव्वादों दिवसांनीं । तेरा दिनांनीं रवी जाता ॥५४॥ग्लौर्जवात् पुरतो याति रवे: स्वस्थान्वहं गति: ।मध्या गोक्षा: कला इंदोरभ्रगोश्वमिता: कला: ॥५५॥त्यांची इतुकी गती म्हणून । प्रतिपदेपासून ।विषम सूर्यमंडळ होऊन । प्रतिबिंबून दिसतसे ॥५६॥जो प्रतिदिनीं पंध्रावा भाग । चंद्रमंडळीं भासे चांग ।ती कला होय मग । अशा पंध्रा बिंबती ॥५७॥कला शुक्लपक्षीं चढती । कृष्णपक्षीं कमी होती ।तेरा नक्षत्रें अंतरती । समोर होती तेव्हां दोघे ॥५८॥ती विश्रुत पूर्णिमा जाण । संपूर्ण मंडळ बिंबून ।चंद्र दिसे वाटोळा होऊन । भूछाया चिन्हसहित ॥५९॥प्रथम अमावसेची । सूक्ष्म कला चंद्राची ।शुक्लपक्षीं बेरीज पंध्रांची । मिळोनी सोळांची संख्या ॥६०॥हा सुधीचा उपचार । सोळा कळा चंद्रावर ।अशा दिसती तदनंतर । प्रतिपदेपासून वैषम्य ॥६१॥उफराटे मंडळा । येतां कमी होती कळा ।अशा चंद्रमंडळा । कळा घटती वाढती ॥६२॥कारणांतें न जाणून । केवळ कार्या पाहून ।जे जन जाती भुलून । ते कुतर्क करून फसती ॥६३॥जेवीं येतां जातां कळा । विकार नसे चंद्रमंडळा ।जरी दिसला डोळा । तरी तो व्यर्थ भास होय ॥६४॥आत्मा न होयी न वाढे न मरे । हे विकार सारे ।भूपा जाण देहावर रे । चंद्रमंडळीं कला जशा ॥६५॥समस्त देह असे जरी । तरीका वागती व्यवहारी ।असें म्हणसील तरी । अवधारीं सांगतों ॥६६॥चंद्र द्वितीय मंडळापरी । भासतां आकाशांतरीं ।सूर्यसत्तेनें त्याचे परी । निवारी अंधकारातें ॥६७॥स्वयें चंद्रमंडळ जळ । म्हणोनी भासे शीतळ ।यापरी आत्मसत्तेनें केवळ । देह सकळ चेतनसे ॥६८॥जळ चंद्रमंडळीं जसें । देहीं अंत:करण तसें ।त्यांत आत्मा बिंबितसे । तेणें भासे विषयजात ॥६९॥हा साक्षिभूत आत्मा न नासे । हें चंद्रापासून असें ।ज्ञान घेतलें असे । सातवा परिसें गुरू आतां ॥७०॥हा फिरे देह जसा । आत्माही फिरतो तसा ।मग अचल आत्मा कसा । प्रश्न असा तरी ऐक ॥७१॥आत्मा संपूर्ण देहगत । असा झाला प्रतीत ।तरी तो भेदशून्य स्वत: । आकाशापरी कथिला ॥७२॥व्यक्तीभूत देहाद्युपाधी । तद्गत आम्ही ही बुद्धी ।जाणावी कुबुद्धी । सूर्यप्रतिबिंबन्यायानें ॥७३॥हें मतंत भरावें म्हणून । सांगतों उदाहरण ।घटीं जळ भरून । सूर्यमंडळाखालून फिरवावें ॥७४॥पात्रच फिरतां प्रतिबिंब फिरे । पात्र हालतां हाले बरें ।असें पाहती सारे । परी तें खरें काय असे ॥७५॥जे जे विकार जळावर । ते ते प्रतिबिंबावर ।भासती ते सूर्यावर । नसती हें सादर आण मनीं ॥७६॥जे जे नाना विकार । ते ते उपाधीवर ।ते नसती आत्म्यावर । ते ( तो ) साक्षी पर उपाधीहूनी ॥७७॥हें नि:शंक जाणून । भ्रम द्यावा सोडून ।आणिक एक सूर्यापासून । शिक्षण घेतलें तें ऐक ॥७८॥चराचर जगांत । जें दिसेल उपयुक्त ।तें ठेवावें सुरक्षित । आपण आसक्त न होतां ॥७९॥पुढें यथा योग्य काळ । पाहूनी मग तें सकळ ।पात्रीं सोडावें केवळ । परोपकारमतीनें ॥८०॥समस्त संपलें तरी । खेद न धरावा अंतरीं ।पुढें तसें काळांतरीं । मिळतां अंतरीं न हर्षावें ॥८१॥राग द्वेष सोडून । अनायासें अर्थ जोडून ।यथाकाळीं पात्रीं सोडून । अलिप्त होऊन रहावें ॥८२॥गुणदोषवुद्धी नसून । हा व्यवहार करून ।आतां नये बंधन । हें सूर्यापासून शिकलों ॥८३॥सूर्य भविष्य जाणून । जळ ठेवी करीं सांठवून ।तें यथाकाळीं दे सोडून । परी अभिमान न करी ॥८४॥अभयंकर हें ज्ञान । घेतलें सूर्यापासून ।आतां आठव्या गुरूपासून । घेतलें ज्ञान तें ऐक ॥८५॥जरी सतत स्त्रीपुत्रांशीं । ठेवीं अति स्नेहासी ।किंवा करी अतिप्रसंगासी । त्यासी कपोतापरी बंध ये ॥८६॥जे मोहयुक्त होती । तयां कपोतापरी ये गती ।एका वनीं कपोत कपोती । करिती निवास ॥८७॥कधीं विरहित न होती । अन्योन्य स्नेहें बद्ध होती ।असे ते दंपती । बांधती मती परस्पर ॥८८॥त्या वनामध्यें बरोबर । करिती दोघे संचार ।जातां येतां अंतर । परस्पर ठेविती ॥८९॥ते विशेषेंकरून । घरट्यामध्यें बसून ।परस्परांचें वदन । परस्पर विलोकिती ॥९०॥हर्षून ते चुंबन । घेती मोहित होऊन ।मंजुळ शब्द करून । पक्ष उभारून आलिंगिती ॥९१॥पुधें मृत्यु येईल । अकस्मात देह पडेल ।असें नेणतां हे ख्याल । करिती निष्फल विषयार्थ ॥९२॥जो मृत्युंजय ईशान । त्याचें न करिती स्मरण ।असें भोग भोगून । हर्ष मानून रमती ॥९३॥दंपती असें खेळतां । काळ कितीक गेला आतां ।हें नेणती सर्वथा । वाटे आतांक्षण गेला ॥९४॥मासर्त्वादि काळ । घिरट्या घालून केवळ ।आयुष्याला घाली पीळ । हें नेणती मूढ मत्त ॥९५॥असे संसारी कवड्याचें । मन रमलें स्त्रियेचें ।संहास वीक्षणालाप त्यांचे । चित्ता रमविती ॥९६॥मग भूक तहान नाठवून । तो तिचें राखी मन ।तीही संभोगालिंगन देवून । ठेवी बांधून चित्त त्याचें ॥९७॥मग त्याच्या संगेंकरून । कपोती गर्भिणी होवून ।अंडें प्रसवे तें पाहून । तिची जतन करी तो ॥९८॥तो अमृतप्राय ग्रास । कष्टें आणूनी दे तीस ।ती उबेनें त्या अंडांस । रात्रंदिवस रक्षितसे ॥९९॥अंडांत जळ असून । स्वभावकर्मादि शक्तीकरून ।तीं अंडीं फुटून । पोरें व्यक्त दिसूं आलीं ॥१००॥त्यांचें मन हृष्ट होवून । पोरांचें करिती पालन ।त्यांला आच्छादून । मुखीं कवल आणून सोडिती ॥१०१॥यो नाश्नुते निजानंद स्वाधीनं सुलभं परं ।स्त्रीपुत्रादिभवं सौख्यं भुक्त्वापि स न तुष्यति ॥१०२॥मग ते पोरां आलिंगन । घेती देती आलिंगन ।आपणा घडल्याही उपोषण । त्यांला कण देती ते ॥१०३॥पोरहि थोर जाहले । त्यांचे आहार वाढले ।म्हणूनी दोघेही वनीं चालले । पोर आले घराबाहेर ॥१०४॥त्यावर जाळीं घालून । भोयी घेई धरून ।तंव माता येऊन त्यां पाहून । ती मोहे बंधनगत झाली ॥१०५॥हिरण्मय स्वगृह शून्य पाहून । विरहें विधुर होवून राहे कोण ।असेंतो कवडा मानून । स्वयें बंधनगत झाला ॥१०६॥विषयें जे शांत न होऊन । घरीं राहती परिवारीं रमून ।कवड्यापरी सहसा काळ येवून । परिवारासह मारून ने तयां ॥१०७॥असे नसे मोकळें मुक्तिद्वार । तें हें दुर्लभ नरशरीर ।सुटतां ये पुन: दु:ख घोर । हें कवडा गुरू करूनी जाणिलें ॥१०८॥इति श्रीदत्तमाहात्म्ये अष्टचत्वारिंशोsध्याय: ॥४८॥॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP