मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय १७ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १७ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय १७ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥गुरु म्हणे शिष्य ऐक । राजा परम धार्मिक ।असा वागे धरूनी विवेक । अनेक कार्यें करूनियां ॥१॥स्वरूपीं ठेवूनी अनुसंधान । करी यज्ञतपोदान ।ब्राह्मणाचें नित्य पूजन । करी पालन प्रजेचें ॥२॥जो औरस पुत्रापरी । प्रजेचें पालन करी ।विशेषें यज्ञयागावरी । प्रीती धरी अर्जुन ॥३॥श्रीगुरुदत्तप्रीत्यर्थ । अश्वमेध आरंभी यथार्थ ।तो असतां कृतार्थ । स्वर्गार्थ यज्ञ करील कीं ॥४॥तो समर्थ जाणूनी । त्याचा अश्व न धरी कोणी ।अश्वमेध सांग होवूनी । जाती म्हणूनी भीती देव ॥५॥त्याचें अंत:करण न जाणती । म्हणोनी देव भय पावती ।एकत्र होवूनी सर्व म्हणती । आतां गती काय आमुची ॥६॥आम्हां वाटतो उद्वेग । रायाचे निर्विघ्न होती याग ।आतां तो घेईल स्वर्ग । होतां सांग सयज्ञ ॥७॥तरी यासी करावा उपाय । जेणें पडेल अंतराय ।राजाला विप्र असती प्रिय । हा निश्चय ठावा असे ॥८॥यास्तव कोणीतरी । विप्रवेष घेऊनी भूमीवरी ।जावूनियां त्याचे द्वारीं । सत्व हरावें तयाचें ॥९॥आम्हांमध्यें सूर्य समर्थ । पुरवील सर्वांचे मनोरथ ।त्यावांचूनियां हा अर्थ । साधाया समर्थ दुजा नसे ॥१०॥असा विचार करूनी सुर । सूर्या धाडिती भूमीवर ।सूर्य होउनी द्विजावर । माहिष्मतीसी पातला ॥११॥वैश्वदेवसमयीं । अर्जुन बळी टाकूं येई ।सूर्यही त्या समयीं । येई समोर रायाच्या ॥१२॥पोट पाठीस लागलें । डोळेही खोल गेले ।अडखळती पाउलें । शब्द न खुले बाहेर ॥१३॥राजा देखूनी विस्मय करी । म्हणे राहे कोण्या देशांतरीं ।असा दीन भूमीवरी । अद्यापवरी न पाहिला ॥१४॥राजा समोर जाऊन । नमस्कार करून ।म्हणे कुठूनी झालें आगमन । काय आज्ञापन भृत्यासी ॥१५॥विप्र म्हणे रायाप्रती । ऐकूनी आलों तुझी कीर्ति ।तुला आतिथेय म्हणती । तुझी ख्याती तीन लोकीं ॥१६॥तू ब्रह्मण्य अससी । परम दयाळू दिससी ।याचकां अभीष्ट देशी । म्हणूनी घरासी आलों तुझ्या ॥१७॥जे असती उदार । ते राज्यधनपुत्रदार ।किंवा नश्वर शरीर । यावर लोभ न धरती ॥१८॥उदार होसी तूं तरी । माझी आतां तृप्ती करी ।तुजवीण या भूमीवरी । न दिसे अंतरीं निश्चय हा ॥१९॥राजा म्हणे पुरें बोल । तुझी तृप्ती केंवी होईल ।ब्राह्मण माझें दैवत केवळ । देईन सर्वस्व माझ्यासकट ॥२०॥विप्र म्हणे रायाप्रती । ही तुझी सप्तद्वीपा क्षिती ।ईचेवरी उद्भिज असती । ते सर्व देतां तृप्ती होईल ॥२१॥ त्यांहीं मी तृप्त होईन । आणीक न इच्छा याहून ।असें वचन ऐकून । हर्षें अर्जुन मनांत ॥२२॥निश्चयें नव्हे हा नर । देवही फिरती भूमीवर ।विष्णु गेला बळीच्या द्वारावर । तद्वत् हा अमर कोणी तरी ॥२३॥हा दिसतो तेजस्वी । तेव्हां असावा हा रवी ।ऐसा तेजस्वी येर्हवी । कोण दुसरा असेल ॥२४॥असें मनीं चिंतून । म्हणे मागितलें देतों दान ।परी सांगा तुम्ही कोण । मग ब्राह्मण बोलतसे ॥२५॥मी दिवाकर भट । आलों भरावया पोट ।लोकालोकावरुनी वाट । धरिली नीट येथवरी ॥२६॥ऐकूनी अर्जुन हास्य करी । ह्मणे मी धन्य धरणीवरी ।साक्षात् सूर्य माझें द्वारीं । याचक होऊनी पातला ॥२७॥त्याचा धन्य गृहस्थाश्रम । त्याचा सफळ आचारश्रम ।त्याचाची चुकला भ्रम । महात्मा अतिथी घरीं येतां ॥२८॥मी दत्तात्रयकृपापात्र । जाणें योग विचित्र ।योगबळें सर्वत्र । पुन: उद्भिज उपजवीन ॥२९॥असा निश्चय करून । वृक्ष द्यावया अर्जुन ।सिद्ध झाला तंव तपन । दावी प्रगटून निजरूप ॥३०॥तें स्वरूप पाहून । हृष्ट झाला अर्जुन ।म्हणे दिल्हें वृक्षदान । प्रतिग्रहण करावें ॥३१॥सूर्य म्हणे रायासी । तूं खास उदार अससी ।तरी शुष्क करूनी वृक्षांसी । देतां भक्षीन अग्निरूपें ॥३२॥राजा म्हणे जें दान । मागितलें तें देईन ।न करी मी वृक्षशोषण । तूं भक्षण करी सुखें ॥३३॥सूर्य म्हणे देतों बाण । त्यांचें करी तूं संधान ।त्यांही वृक्ष जाती वाळून । मग मी भक्षण करीन ॥३४॥असें म्हणून भाते । देई सूर्य रायातें ।राजाही पांचशें धनुष्यांतें । सज्ज करूनी बाण योजी ॥३५॥एका एका बाणापासून । उपजती सहस्त्र सहस्त्र बाण ।एकेक हजारों उद्भिज्ज शोषून । शुष्क करती क्षणार्घें ॥३६॥ग्रामी नगरी पर्वतावरी । दुर्गवनीं नदीतीरीं ।वृक्ष होते जे भूमीवरी । ते क्षणांतरीं जळाले ॥३७॥ज्या ज्या वृक्षा बाण लागती । ते ते तात्काळ वाळती ।अग्निरूपें तयाप्रती । सूर्य जाळी क्षणार्धें ॥३८॥तृण गुल्म वृक्ष लता । सर्व हीं भस्म होतां ।तो वसिष्थ ध्यानस्थ होता । तो उठिला त्या वेळीं ॥३९॥वृक्ष जळती आश्रमस्थ । तें पाहूनी शिष्यां पुसत ।शिष्य सांगति बाणघात । केला अपरिमित अर्जुनें ॥४०॥ हें ऐकतां वचन । ध्यानें विचार करून ।होऊनी कोपायमान । निष्ठुर वचन बोले मुनी ॥४१॥दुर्बुद्धी हा अर्जुन । राज्यभरें मत्त होऊन ।माझा आश्रम टाकिला जाळोन । त्याला शिक्षण देईंन मी ॥४२॥बळाचा दर्प असे याला । हा अतिशय मत्त झाला ।प्रतियोद्धा नाहीं याला । म्हणोनि झाला हा उन्मत्त ॥४३॥अर्जुना गर्व पुरे आतां । जमदग्नीला सुत होतां ।तो तोडूनी तुझ्या हातां । शिरच्छेद करील ॥४४॥असें क्रोधावेशेंकरून । बोले वसिष्ठ शापवचन ।तपस्व्याचें तें वचन । अन्यथा कोण करील ॥४५॥अर्जुन हा ब्राह्मणभक्त । वसिष्ठही अत्यंत शांत ।तो हा असा शाप देत । येथें कारण भाविदैव ॥४६॥होणारी ईश्वरी करणी । निमित्तमात्र होती प्राणी ।स्वतंत्र नसती कोणी । वेदवाणी असी असे ॥४७॥सर्व स्थावर जाळून । सूर्य गेला निघोन ।अर्जुनें योगबळें करून । केलें वृक्षजीवन पूर्ववत ॥४८॥अति दारुन ब्राह्मणाचा रोष । तच्छाप हें अनिवार्य विष ।करी प्राणाचा शोष । हा दोश्व्ह न समवे ॥४९॥शाप होतां अर्जुन । तत्काळ उद्धत होऊन ।स्वर्गावरी जाऊन । देवा जिंकूं म्हणतसे ॥५०॥त्याचे पुत्र बहुत । तयां नगरीं ठेवित ।आपण विमानीं बैसत । स्वर्गाप्रत जावया ॥५१॥ज्याच्या ऐश्वर्या तुळणा नाहीं । किंकरी सिद्धि त्याही ।ज्याची गती कुंठित नाहीं । कोणी आज्ञाही न उल्लंघी ॥५२॥स्मृतिगामी उग्रशासन । अनेक देह धरून ।त्रिभुवनीं करी गमन । सर्वांचें मन ओळखी जो ॥५३॥दिव्य विमानीं बैसून । स्वर्गी चाले अर्जुन ।चैत्ररथी येऊन । क्रीडा करून राहिला ॥५४॥पाहुनी त्या अवसरीं । यक्ष धांवले तयावरी ।शस्त्रें सोडिती नानापरी । अर्जुन निवारी सर्वांतें ॥५५॥नराचें मुख अश्वाचे देह । अश्वाचें मुख नराचे देह ।असे किन्नरांचे समूह । यक्षांसह लोटले ॥५६॥महाबल अर्जुन । पांचशें धनुष्य सज्ज करून ।सोडी बाणावरी बाण । यक्षगण मग भ्याले ॥५७॥छिन्न भिन्न होता देह । प्राणावरी येतां संदेह ।यक्षकिन्नर समूह । पावले मोह त्या युद्धीं ॥५८॥ते करिती पलायन । तयां सोडूनी दे अर्जुन ।शस्त्रांतें सांवरून । स्वर्गभुवना चालिला ॥५९॥त्याला पाहूनी देवदूत । जाऊनी इंद्राप्रती सांगत ।तों अर्जुन पातला अकस्मात । दिसे कृतांतसा देवां ॥६०॥सहस्त्रबाहू महाशूर । अर्जुन येतां समोर ।घेवोनियां सर्व निर्जर । शचीवर सरसरला ॥६१॥तेथें झालें तुमुल युद्ध । सर्व देव झाले विद्ध ।आश्चर्य करिती सिद्ध । पाहुनी अर्जुनाच्या पराक्रमा ॥६२॥अर्जुनाचे लागतां बाण । देवां अंगींचें गेलें त्राण ।मग व्याकुळ होती प्राण । पलायन करूं इच्छिती देव ॥६३॥मोहनास्त्र टाकूनी । देवां मोहित करूनी ।अर्जुन येऊनी नंदनवनीं । क्रीडा करूनी राहिला ॥६४॥शचीसह एके दिनीं । इंद्र विमानीं बैसूनी ।पुढें ऐरावता चालवूनी । नंदनवनीं पातला ॥६५॥तों देखिला अर्जुन । त्यावरी कोपायमान होऊन ।वज्र वरतें उचलून । सहस्रनयन पुढें झाला ॥६६॥तें देखून अर्जुन । हातीं विमान उचलून ।शचीसहित इंद्रा घेऊन । गर्जना करूनी चालविला ॥६७॥इंद्र करी आकांत । धावां धांवा देवां ह्मणत ।देवही आले धांवत । अर्जुनाप्रत झुंजाया ॥६८॥तेथें युद्ध झाले तुमुल । देवांचें खचलें बल ।अर्जुनाचा प्रताप विशाल । न टिके काल जयापुढें ॥६९॥जो योगाभ्यासधुरंधर । त्याचा देह वज्रसार ।त्याला कोण देईल मार । खचले निर्जर मनांत ॥७०॥कोणी होती विवस्त्र । कोणी टाकून देती शस्त्र ।कोणी झांकिती नेत्र । कोणी वक्त्र मुरडाती ॥७१॥कोणी हात जोडिती । त्राहि त्राहि ह्मणती ।देव असे दीन होती । मग नृपती सोडी तयां ॥७२॥सुटतांचि इंद्र तेथून । सर्व देवां घेऊन ।मेरूवरी येऊन । खिन्न होऊनी वदतसे ॥७३॥देवां दिधला स्वर्गलोक । मनुष्यां दिधला मर्त्यलोक ।ब्रह्मदेवें तया हें दु:ख । चला निवेदन करूंया ॥७४॥मनुष्य असूनी हा अर्जुन । बळें स्वर्गीं येऊन ।व्यर्थ आम्हांसीं लढून । स्वर्गभुवन घेतसे ॥७५॥हा तों बळी अनिवार । श्रीदत्तवरें झाला अमर ।हा आमुचा करील चूर । चला सत्वर ब्रह्मया सांगों ॥७६॥असें हें इंद्रवचन । मान्य करूनी देवगण ।इंद्रा पुढें करून । ब्रह्मभुवना पातली ॥७७॥जेथें वेद मूर्तिमंत । ब्रह्मदेवा वेष्टुनी राहत । सनत्कुमारादि ब्रह्मभूत । स्तविती ज्याला सदैव ॥७८॥पाहूनियां चतुर्मुखा । देव विसरूनि दु:खा ।पावले परमसुखा । ज्यांच्या हरिखा पार नाहीं ॥७९॥साष्टांग नमन करूनी । देव उभे राहूनी ।करसंपुट जोडूनी । स्तवन करिती तयाचें ॥८०॥जयजया कमलासना । जगदुत्पादका चतुरानना ।जगत्पालका जगज्जीवना । कमलजनना तुज नमो ॥८१॥आह्मी तुझे आज्ञाधारक । आज्ञेनें वागतों जसे सेवक ।आजपावेतों पावलों सुख । आतां दु:ख वोढावलें ॥८२॥श्रीदत्ताच्या वरानें । उन्मत्त होऊनी अर्जुनानें ।स्वर्गीं येऊनी बळानें । आह्मां केलें जर्जर ॥८३॥तो नावरे सर्वथा । शस्त्रास्त्रें जाती वृथा ।खुंटला आमुचा पंथा । आह्मीं आतां काय करावें ॥८४॥ब्रह्मा ह्मणे देवांसी । चला जाऊं वैकुंठासी ।भक्तकैवारी लक्ष्मीविलासी । वैकुंठवासी तारील ॥८५॥ह्मणोनी सर्व निघती । वैकुंठाप्रती येती ।मनीं नारायणा स्मरती । प्रेमें गर्जती नामघोषें ॥८६॥जें वैकुंठभुवन । आनंदाचें मुख्य स्थान ।स्वप्नींही ज्याचें स्मरण । न होई जाण दुर्भगां ॥८७॥नलगे सूर्यादिकांचा प्रकाश । जें असे स्वयंप्रकाश ।जेथें रोगचिंताक्लेश । लेशमात्रही न राहती ॥८८॥सर्व काल सुखावह । जेथें नसे शोकमोह ।पूर्णानंदाचें गृह । गरुडवाहधाम तें ॥८९॥जें शांत दांत निर्मत्सर । निष्कपटी निरहंकार ।जे अहैतुकीभक्तितत्पर । ते तें पुर पाहती ॥९०॥जेथें वनें कल्पद्रुमांचीं । वृंदें फिरती कामधेनूचीं ।सरोवरें अमृताचीं । चिंतामण्यांचीं सोपानें ॥९१॥जेथें सुवर्णाच्या भिंती । रत्नजडित विराजती ।जिवंत चित्रें भासती । कुंठित मती होय जेथें ॥९२॥त्या वैकुंठाप्रती । देवांसह शचीपती ।येवूनीयां द्वाराप्रती । द्वारपाळा जाणविलें ॥९३॥विष्णुसारिखे द्वारपाळ । चतुर्भुज घननीळ ।जयविजयानामें विमळ । ते कळविती विष्णूते ॥९४॥विष्णूचे आज्ञेंकरून । देवांसह चतुरानन ।अंतरीं येवूनी जाण । कमळलोचन पाहती ॥९५॥वामांकीं लक्ष्मी घेवून । पीतांबर पांघरून ।शंकचक्रगदा घेऊन । बैसला मधुसूदन आनंदें ॥९६॥त्याला घालिती लोटांगण । देव स्तविती कर जोडून । जयजय जगज्जीवन । नारायणा तुज नमो ॥९७॥तूं भक्तपाळक कृपाघन । निजभक्तांचें जीवन ।पाहोनियां सुदीन । करिसी मन कनवाळू ॥९८॥त्वां अवधूतरूपानें । अर्जुना दिल्हीं वरदानें ।आजि बलात्कारें त्याणें । देवस्थानें घेतलीं ॥९९॥आह्मी देव तुझे किंकर । आमुचा तूंची आधार ।करा आतां प्रतिकार । राखावें अधिकार आमुचे ॥१००॥असें स्तवितां देवांनीं । विष्णू विचार करी मनीं ।अर्जुना शाप दे मुनी । म्हणोनी तो क्षोभला ॥१०१॥तो असे जीवन्मुक्त । प्रारब्ध ह्या चेष्टा होत ।त्याला स्वर्गाचा नसे स्वार्थ । व्यर्थ चेष्टा करीतसे ॥१०२॥तसें अर्जुनाचें आचरण । काय जाणती अमरगण ।त्याचें प्रारब्धही झालें पूर्ण । घेईल तूर्ण विदेहमुक्ती ॥१०३॥ख्यात्याधिकाचे करीं । वध नेमिला मीं जरी ।तया अर्जुना मारी । ब्रह्मांडोदरीं असा नाहीं ॥१०४॥तरी म्यांच अवतारून । धारातीर्थीं देह ठेववून ।द्यावें तया विदेहमुक्तिदान । झाला पावन पूर्वींच तो ॥१०५॥असा विचार करून । देवां म्हणे जनार्दन ।मी जमदग्नीपासून । रेणुकानंदन होऊन ॥१०६॥अर्जुनासी युद्ध करीन । संग्रामीं तयासी जिंकीन ।तुम्ही चिंता सोडून । चला स्वस्थान लक्षूनी ॥१०७॥ऐकोनी विष्णूचें वचन । देव आनंद पावून ।विष्णूची आज्ञा घेवून । हर्षें स्वस्थाना परतले ॥१०८॥इति श्रीदत्तमाहात्म्ये । सप्तदशोsध्याय: ॥१७॥श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP