मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ९ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ९ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । परिसे करूनी एकमना ।
ह्या तिसर्‍या उदाहरणा । समाधाना पावसी ॥१॥
वेदशर्मा विप्र एक । गोदावासी सुविवेक ।
तया पुत्र झाला एक । नामे अन्वर्थक सुशील ॥२॥
तो स्वाचारसंपन्न । गायत्री जपे करी श्रवण मनन ।
दैवयोगेंकरून । सात भूतांनीं गांठिला ॥३॥
सातही ब्रम्हराक्षस । पीडिती त्या पुत्रास ।
नानापरी देती त्रास । न देती ग्रास भक्षावया ॥४॥
सातांच्या चेष्टा सात । एकाकाळीं एक येत ।
एवं विप्र सतत । भूतग्रस्त झाला असे ॥५॥
एक रडे एक उडे । एक हंसे गाढें ।
एक नाचे पुढें पुढें । खायी गायी पडे एक ॥६॥
द्विजाअंगीं घुसती । अशा चेष्टा दाविती ।
कांहीं उपाय न चालती । झाली भीती ब्राह्मणा ॥७॥
म्हणे माझा पुत्र एक । त्याला भूतें देती दु:ख ।
पाहूनियां झाला शोक । उभय लोक अंतरले ॥८॥
श्रीदत्ताचा उपासक । मी असोनी हें दु:ख ।
केवीं झाले विवेक । तोही चोख न राहे ॥९॥
असा करी विप्र शोक । तंव आला भिक्षुक ।
दुर्गंधांगी मलिन मूर्ख । दिसे लोकदृष्ट्या तो ॥१०॥
भिक्षा देतां त्याची कांती । पाहतां विप्रा झाली भ्रांती ।
म्हणे हा कीं दिनपती । माझी मती भ्रमतसे ॥११॥
करूं याचें परीक्षण । असें म्हणतां तत्क्षण ।
भिक्षुक धांवे त्वरा करून । पाठी लागोन धांवे विप्र ॥१२॥
भिक्षुक वनीं चालिला । द्विज पाठीसी लागला ।
पाषाण मारी तयाला । जा जा मागें फिर म्हणे ॥१३॥
मार सोसोनि ब्राह्मण । जाऊनी दृढ धरी चरण ।
म्हणे आलों शरण । करी रक्षण सत्पुरुषा ॥१४॥
भिक्षु म्हणे मी व्रात्य भ्रष्ट । तूं ब्राह्मण पूज्य श्रेष्ठ ।
विप्र म्हणे आपण वरिष्ठ । स्पष्ट देव भूलोकीं ॥१५॥
हंसूनी भिक्षु दावी रूप । तों दिसे त्रिमूर्तिस्वरूप ।
विप्र म्हणे गेलें पाप दर्शन ताप नष्ट झाले ॥१६॥
भूतें त्रासिला माझा सुत । तुम्ही त्याला करा मुक्त ।
हांसोनि वदे भिक्षुक दत्त । मंत्र सात हे घे तूं ॥१७॥
एका एका भूता । एक एक मंत्र योजितां ।
तत्काल ये बद्धता । होईल मुक्तता पुत्राची ॥१८॥
जसे मनाचे मळ । एका एका शास्त्रें केवळ ।
जाऊनी आत्मयाची आळ । दुरावे तत्काळ तया परी ॥१९॥
एका एका मंत्रें एक एक । भूत जाईल नि:शंक ।
परस्परविरुद्ध ते ऐक । न जाती एक मंत्रानें ॥२०॥
असें बोलोनी सविधान । सात मंत्र सांगून ।
गुप्त झाला भगवान । विप्र वंदून मागें फिरे ॥२१॥
विप्र घरीं येऊन । सुस्नात होऊन ।
यथाविधी न्यास ध्यान । करून प्रयोग करितसे ॥२२॥
एक भूताचें झालें बंधन । ती एक चेष्टा जाऊन ।
पुत्र पावला समाधान । मंत्रविधानबळानें ॥२३॥
विप्रें असा सात दिवस । उपाय केला तयास ।
बांधोनी सात भूतांस । टाकिलें खास मंत्रबळें ॥२४॥
ज्या ज्या भूताची जी जी चेष्टा । तो तो बद्ध होतां ती अदृष्टा ।
झाली अशा सातही चेष्टा । जाऊनी पुत्र मुक्त झाला ॥२५॥
मग तो अभ्यास करून । मुक्त झाला द्विजनंदन ।
असा क्षुद्र शास्त्रापासून । उपयोग जन करितात ॥२६॥
मंत्रशास्त्रही उपकारक । ही तिसरी गाथा सुरेख ।
आतां चौथी गाथा ऐक । मन नि:शंक होईल ॥२७॥
सह्याद्रिनिकट मातापुर । तेथें वसे द्विजवर ।
विष्णुदत्तशर्मा पवित्र । कर्मशूर गृहस्थ ॥२८॥
पत्नी तयाची सुशीला । सदा वागे अनुकूला ।
सदा आदरी पतिसेवेला । न हो प्रतिकूला कधींही ॥२९॥
तो विप्र श्रीदत्तोपासक । असे कर्मठ मीमांसक ।
यथाकालीं आन्हिक । करी विवेकपूर्वक तो ॥३०॥
अश्वत्थ असे त्याचे दारीं । ब्रह्मराक्षस वसे त्यावरी ।
भूतबळी भक्षण करीं । वैश्वदेवांतरी टाकितां ॥३१॥
न देती जे बलिदान । करी तयांचें पीडन ।
भूतांचा हा स्वभाव म्हणून । वैश्वदेव करूनि बलि द्यावा ॥३२॥
विष्णुदत्तें बळि देतां । नित्य येऊनी तो खातां ।
राक्षसा ये शांतता । शुद्धान्न सेवितां काय नोहे ॥३३॥
एके दिनीं घेऊनी बळी । विष्णुदत्त आला वृक्षातळीं ।
ब्रह्मराक्षस तत्काळीं । अश्वत्थमूळीं उतरला ॥३४॥
भयंकर तो दिसत । विप्र झाला चकित ।
थरथरां कांपे भयभीत । म्हणे हें दुरित काय आलें ॥३५॥
रूप दिसे विशाळ । मुखही अति विक्राळ ।
जेवीं भेटतां शार्दूळ । गाय व्याकुळ होतसे ॥३६॥
व्याकुळ हो तसा द्विज । म्हणे हें काय विघ्न आज ।
रुसला कीं योगिराज । माझी लाज न ठेवी कीं ॥३७॥
भ्याला ब्राह्मण जाणून । राक्षस शांत होऊन ।
बोले मंजुळ वचन । देतों वरदान राक्षस मी ॥३८॥
तूं देशी बलिदान । तें नित्य भक्षून ।
शांत झालों म्हणून । उपकार फेडीन तुझे आतां ॥३९॥
ऐसें राक्षसवचन । ब्राह्मणानें ऐकून ।
आपुलें कर्म म्हणून । करी स्तवन दत्ताचें ॥४०॥
( पद ) अहहा कौतुक हें लोकीं । दत्ता दाविसी कीं ॥ध्रु०॥
करितां नित्य तुझी सेवा । धरुनी मनीं ह्या सद्भावा ।
धर्महि आचरितां देवा । भूता प्रसन्न करविसि कीं ॥४२॥
जीं असती भूतें क्रूर । त्वत्स्मरणें तीं जाती दूर ।
तुज स्मरतां आजि कां समोर । राक्षस घोर दाविसि कीं ॥४३॥( ओवी ) ॥
राक्षस म्हणे ब्राह्मणा । काय ही तुझी विचारणा ।
जरी तूं अससी शाहणा । दैववाणा होऊं नको ॥४४॥
मनीचें भय सोडून । आतां घेई वरदान ।
नको करूं अनुमान । मी सुप्रसन्न देतसें ॥४५॥
विप्र ऐकूनी वचन । मनीं करी चिंतन ।
जरी मागावें पुत्रसंतान । तरी निर्धन मी असें ॥४६॥
जरी मागावें धन । तरी राहाया नाहीं स्थान ।
काय मागावें हें मन । एक निर्धार न करी ॥४७॥
जरी नश्वर ऐहिक । तरी मागावा कीं परलोक ।
तोही नश्वर म्हणती लोक । निर्वाणसुख मागों कीं ॥४८॥
असा विप्र गडबडूनी । मग गृहांत जाऊनी ।
संशयास्पद होऊनी । सांगे पत्नीप्रती सर्व ॥४९॥
पत्नी म्हणे प्राणेश्वरा । मागूं नका नश्वरा ।
श्रीदत्ताची भेटी करा । ऐशा वरा मागावें ॥५०॥
होतां श्रीदत्ताची भेटी । सर्व संपदा पडती गांठी ।
याहूनि प्राप्ति नाहीं मोठी । योगी ज्यासाठीं तळतळती ॥५१॥
पडतां दत्ताची गांठ । सर्व देव देतील भेट ।
संपदा न सोडतील पाठ । मग आटाआट कासया ॥५२॥
असें प्रियेचें भाषण । ऐकतां तो ब्राह्मण ।
म्हणे हेंचि शहाणपण । श्रीचरण पहावे ॥५३॥
तो तथास्तु म्हणून । पुन: बाहेर येऊन ।
म्हणे दत्ताचें दर्शन । व्हावें हें दान दे भूता ॥५४॥
भूत म्हणे नाम त्याचें । ऐकतां मन आमुचें ।
भितें तथापि वाचे । वदलों तें साचें करीन ॥५५॥
त्वां केला उपकार । जरी हा प्रत्युपकार ।
न घडे तरी धिक्कार । असो निर्धारपणें मला ॥५६॥
आतां यत्नें दर्शन । तुला निश्चयें करवीन ।
तूं धीर धरून । धरीं चरण दृढ त्याचे ॥५७॥
तो नानारूपधर । देवादिकां दुर्धर ।
भक्तिगम्य योगिवर । जया निर्धार मिळे तया ॥५८॥
जरी होईल दर्शन । तरी कृतकृत्य जीवन ।
निजकुला उद्धरोन । घेईल निर्वाण मानव ॥५९॥
राक्षस असें बोलुनी । गुप्त होई तत्क्षणीं ।
ब्राह्मण आश्चर्य पाहुनी । घरीं येवूनी राहिला ॥६०॥
मद्याचे दुकानांत । एकदां पातला दत्त ।
राक्षस तें जाणत । विप्राप्रत सांगतसे ॥६१॥
म्हणे विप्रा त्वरें जावें । श्रीच्या पदीं लागावें ।
मागें पुढें न पाहावें । तरीच गावेल पद त्याचें ॥६२॥
उन्मत्तसा मद्यापणीं । जो फिरे त्याचे चरणीं ।
लागें निश्चय करूनी । न करीं मनीं अनुमान ॥६३॥
ऐकूनी विप्र धांवत । तसाचि देखिला उन्मत्त ।
दुर्गंधांग मक्षिकावृत्त । म्हणे हा अवधूत होय कीं ॥६४॥
आधीं जातीचा भूत । तया काय ठावा दत्त ।
लोक हांसतील निश्चित । पाय धरितां मद्यप्याचे ॥६५॥
मनीं विकल्प येतां असा । दत्त गुप्त झाला सहसा ।
विप्र तळतळे जसा मासा । म्हणे कसा मी दुर्दैव ॥६६॥
जरी असता हा उन्मत्त । तरी न होता गुप्त ।
राक्षसें हाचि दत्त । म्हणोनि निश्चित दाविला ॥६७॥
कशी माझी दुष्टवासना । कसा दावूं भूतां वदना ।
पत्नी म्हणेल भक्तिहीना । कां निधाना दवडिलें ॥६८॥
असा अनुतप्त होउनी । विप्र आला परतूनी ।
भूत म्हणे धिक्कारूनी । तुझा मद्वचनीं न विश्वास ॥६९॥
असो पुन: अजुनी । दत्ता दावीन दुरोनी ।
सावधान होवोनी । लागे चरणीं धीरानें ॥७०॥
मग कांहीं काल गेल्यावर । स्मशानीं खेळे योगेश्वर ।
हाक मारूनी असुर । विप्राप्रती सांगतसे ॥७१॥
तुझा देव स्मशानीं बसून । अंगीं धूळ माखून ।
बरोबर कुत्रे घेऊन । करी क्रीडन कौतुकें ॥७२॥
तो जाणे आत्माराम । आत्मक्रीड उत्तम ।
ज्या भजती मुनिसत्तम । मुक्तिधाम तेंचि जाण ॥७३॥
जाणावया तयाची गती । भूतांची काय शक्ती ।
मीं पूर्वीं केली भक्ती । म्हणोनी युक्ती सांगतों ॥७४॥
मी भक्त असोन । विप्रांचा केला अवमान ।
त्या पापें असा होऊन । राहिलों तरी स्मृती असे ॥७५॥
मग विप्र जाय स्मशानीं । दत्त मारी अस्थी घेऊनी ।
मरणभयें पळे सदनीं । भूत निर्भर्त्सूनी वदे तया ॥७६॥
मिथ्याभूत देहा भुलून । पाप्या देवा देशी सोदून ।
तथापि दावितों अजून । यापुढें जाण दैव तुझें ॥७७॥
मग पुन: एके दिनीं स्मशानीं । मृतखरमांस तोडुनी ।
कुत्र्या कावळ्या दे वांटूनी । त्या पाहूनी विप्रांते जाणवी ॥७८॥
पत्नी म्हणे व्हा सादर । विप्र म्हणे मी न सोडी धीर ।
भूत म्हणे जरी योगेश्वर । देईल वर तये वेळीं ॥७९॥
दर्शश्राद्धीं द्यावया क्षण । आलों तुम्हीं घ्यावें आमंत्रण ।
असें मागावें वरदान । विप्र तथास्तु म्हणोन निघाला ॥८०॥
स्मशानीं विप्र येऊन । तशीच मूर्ती पाहून ।
जाऊनी दृढ धरी चरण । न सोडी ताडन करितांही ॥८१॥
म्हणे दत्त कां पाद धरिसी । विप्र म्हणे आलों क्षण द्यावयासी ।
येरू म्हणे भ्रष्टासी । कां देशी श्राद्धीं क्षण ॥८२॥
मी धर्माधर्मवर्जित । विप्र म्हणे हें यथार्थ ।
परमात्मा तूं समर्थ । तुला किमर्थ धर्मधर्म ॥८३॥
हांसोनि ॐ तथा म्हणे दत्त । निजस्वरूप दाखवित ।
कुत्रे होती श्रुती मूर्तिमंत । वायस होत शास्त्रें तीं ॥८४॥
योगभूमी दिसे स्मशान । पाहतां चकित झाला ब्राह्मण ।
दत्त म्हणे होतां मध्यान्ह । स्नान करूनी येतों मी ॥८५॥
पंक्तियोग्य असेल ब्राह्मण । तरीच मी करीन भोजन ।
विप्र तथास्तु म्हणोन । वंदन करूनी घरीं आला ॥८६॥
राक्षसाप्रती येऊन । सर्व सांगे वर्तमान ।
पंक्तियोग ब्राह्मण । आणू कोठून शोधूनी ॥८७॥
भूत बोले अग्नि आदित्य । पंक्तियोग्य असती तथ्य ।
तुझें कार्य झालें सत्य । माझें अगत्य स्मरण करी ॥८८॥
विप्र सदनीं येऊन । भार्येप्रती सांगे सर्व विस्तारून ।
तीही अत्यंत हृष्ट होऊन । पाक करून राहिली ॥८९॥
तंव मध्यान्हीं पातले दत्त । म्हणती अजूनी विप्र न दिसत ।
विप्र रेखूनी स्वरूप अद्भुत । पाहे विस्मित होऊनी ॥९०॥
तंव पत्नी आसन देऊन । म्हणे करावें उपवेशन ।
सत्वर येतील ब्राह्मण । तथास्तु म्हणून दत्त बसे ॥९१॥
पत्नी बाहेर येऊन । सूर्या प्रार्थी हात जोडून ।
भो सर्वात्मन् कश्यपनंदन । जीवां चेतन करिसी तूं ॥९२॥
ब्राह्मणांचें तूं दैवत । रूपांतरें येऊनी त्वरित ।
श्राद्धीं क्षण घ्यावा निश्चित । अत्रिसुत वाट पाहे ॥९३॥
असी प्रार्थना ऐकून । विप्ररूप घेऊन ।
सत्वर उतरला अरुण । तया आसन देई सती ॥९४॥
दत्त म्हणे षड्दैवत । दर्शश्राद्ध हें निश्चित ।
तीन विप्र पाहिजेत । तिसरा येतो म्हणे सती ॥९५॥
अग्निशाळेंत जाऊन । प्रार्थी सती हात जोडून ।
अग्ने तूं गृहस्पती म्हणून । प्रख्यात होसी कर्माध्यक्ष ॥९६॥
तुला असो गृहाची लाज ।तूं होवोनी द्विज ।
श्राद्धीं क्षण घेईं आज । योगिराज वाट पाहे ॥९७॥
असें प्रार्थितां अग्नी विप्र होऊन । देवस्थानीं बैसला येऊन ।
विप्रें संकल्पादि करून । केलें श्राद्ध यथाविधी ॥९८॥
तीन देव तृप्त झाले । पितर सद्गतीतें पावले ।
द्विजें अष्टोत्तरशतनामें स्तविलें । दत्ता वंदिलें प्रेमानें ॥९९॥
विप्र म्हणे माझी मती अल्प । जरी माझे मनीं विकल्प ।
देवा तूं सत्यसंकल्प । माझें निर्विकल्प मन केलें ॥१००॥
धन्य हे माझे नेत्र । हें रूप पाहोनी झाले पवित्र ।
हें धन्य माझें गात्र । कुळगोत्र पवित्र करी ॥१०१॥
मी तो क:पदार्थ । तुम्ही भगवान् समर्थ ।
पूर्ण केले मनोरथ । झालों कृतार्थ कुळासह ॥१०२॥
राक्षसाच्या वचनें करून । देखिले म्यां हे चरण ।
दत्त म्हणे रे ब्राम्हणा । तो राक्षस जाण भक्त माझा ॥१०३॥
दुर्दैवें दुर्गत झाला । हें उच्छिष्ट देईं त्याला ।
तोही जाईल सद्गतीला । घे मुक्तीला स्त्रियेसह तूं ॥१०४॥
माझी भक्ती दुर्लभ जाण । ती तुला मिळाली दैवेंकरून ।
तूं इहपर भोग भोगून । सायुज्य निर्वाण घेशील ॥१०५॥
असें म्हणोनी श्रीदत्त । विद्या परोपकारार्थ देत ।
कामगती विमान दे सविता । भाव्यसंपदा दे अग्नी ॥१०६॥
आज्ञा घेऊनी तिघे जाती । विप्र दत्ता चिंती चिंतीं ।
उच्छिष्टाशनें राक्षसा ये गती । ये जीवनमुक्ती सस्त्रीक विप्रा ॥१०७॥
करितां मीमांसोक्त कर्म । विप्रा मिळालें अलभ्य शर्म ।
शास्त्राचें जो जाणील वर्म । सर्व धर्मफळ घे तो ॥१०८॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीविरचिते श्रीदत्तमहात्म्ये नवमोsध्याय: ॥९॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP