मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ५१ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ५१ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
जें निर्विकल्प परब्रह्म । तेंच परंधाम ।
तें कळावया सगुणब्रह्म । कथिलें दीपकवेदधर्मसंवादें ॥१॥
हा पांच हजार चारशें ग्रंथ । पन्नास अध्याय केले येथ ।
भक्ति ज्ञान वैराग्य येथ । स्पष्ट यथार्थ वर्णिले ॥२॥
अनुक्रमें करून । ज्या अध्यायांत जें कथन ।
तें संक्षेपेंकरून । आतां निरुपण करुं येथें ॥३॥
स्वयमेव केलें मंगलाचरण । नवविध भक्तीचें वर्णन ।
सांगितलें क्रमेंकरून । स्रुष्टिक्रमण संक्षिप्त ॥४॥
दत्तात्रेयाचे मायबाप । यांचे गुणस्वरुप ।
गुरुशिष्यकथेचा संक्षेप । प्रथमाध्यायीं जाणावें ॥५॥
बहुधा केले दिपकें प्रश्न । वेदधर्मा हर्षून ।
पितृपुत्रसंवाद सांगून । कौशिकाख्यान कथन करी ॥६॥
शापूनि सूर्या ठेवी सती । अनसूयेसी देव स्तवि ती ।
अनसूया ये सतीप्रती । द्वितीयाध्यायीं ही कथा ॥७॥
सूर्योदय करविता । कौशिका मृत्यू येताम ।
अनसूया करी जिता । स्तविती देवता अनसूयेसी ॥८॥
वसुधेश्वरें मांडव्या सोडिला । त्रिमूर्ति दत्त अवतरला ।
नानापरी करी लीला । तृतीयाध्यायीं हे कथा ॥९॥
व्हावा परमोत्कृष्ट सुत । म्हणून भनुसप्तमीव्रत ।
कथिलें अनंतव्रत । कार्तवीर्यार्जुन जन्मला ॥१०॥
गंर्गें दंडनीती ऐकवून । दत्तमाहात्म्य सांगून ।
वळविलें अर्जुनाचें मन । हे कथा चवथ्यांत ॥११॥
भूपास सांगे गर्गमुनी । देव जिंकिले दैत्यांनीं ।
ते दत्तापाशीं येवूनी । सेवा करुनी राहिले ॥१२॥
दैत्यां मूढ करुन । देवांहातीं मारवून ।
स्वर्गीं पाठविले देवगण । पंचमाध्यायीं हे कथा ॥१३॥
समूळह होवूनी भक्तीरसे । दत्ता अर्जुन भेटतसे ।
दत्त बीभत्सरुप दावीतसे । न विटतसे अर्जुन ॥१४॥
दत्तें मनोरथ पुरवितां । अर्जुन बसे गादीवरता ।
त्याच्या राज्याची व्यवस्था । षष्ठाध्यायीं वर्णिली ॥१५॥
स्वारस्य विषयांचें जावून । अर्जुन विरक्त होवून ।
दत्तापाशीं येवून । करी स्तवन नानापरी ॥१६॥
त्या नृपांत:करणा पारखून । दत्त दे आश्वासन ।
मग नृप करी प्रश्न । हें कथन सप्तमाध्यायीं ॥१७॥
गुरुसुरेंद्रसंवाद । सा गाथेचा अनुवाद ।
शिल्पज्ञकथा विशद । जन्मांतर तयाचें ॥१८॥
एक रेवातटस्थ ब्राह्मण । कामशास्त्रप्रवीण ।
तो अनुक्रमें घे निर्वाण । अष्टमाध्यायीं हे कथा ॥१९॥
गायत्रीजापकसुशीलास । पीडिती सात राक्षस ।
श्रीदत्त भेटोनी त्यांस । मंत्र देवूनी घालवी ॥२०॥
प्रामाणिक विष्णुदत्त । भूतें तया दाविली दत्त ।
दत्त तया मुक्त करीत । नवमाध्यायीं हे कथा ॥२१॥
जो उपजल्यापासून । रोगें ग्रासिला ब्राह्मण ।
कर्मविपाक सांगून । त्या दे जीवन विष्णुदत्त ॥२२॥
फल दावूनी औषध पाजिलें । झोटिंगाचें बंधन केलें ।
शास्त्रतत्त्व कथिलें । दहाव्या अध्यायांत ॥२३॥
जीवा विविध भ्रमण । कर्मयोगेंकरून ।
गर्भवासनिरूपण । अवस्था लक्षणयथार्थ ॥२४॥
पुत्र चतुर ज्ञानी असून । जड होयी भिवून ।
विष्णुदत्त त्या दे आश्वासन । अक्रावे अध्यायीं हे कथा ॥२५॥
सृष्टिक्रमकथन । व्यष्टिसमष्टिलक्षण ।
विक्षेप आवरण । सदाचरण गुरुसेवा ॥२६॥
त्या क्रमें श्रवण मनन । परोक्षापरोक्षज्ञान ।
जीवरूपकथन । हें वर्णन बाराव्या अध्यायांत ॥२७॥
वाक्यविवरण पूर्ण । षड्लिंगांचें कथन ।
प्रत्येकाचें लक्षण । तत्त्वंपदार्थलक्षणही ॥२८॥
तो विष्णु आत्मा तत्पदार्थ । जीव हा त्वं पदार्थ ।
लक्षलें यांचें ऐक्य यथार्थ । तेराव्यांत असें हें ॥२९॥
जें स्वर्गोपविष्ट देवांही । सुख ठावें होत नाहीं ।
अष्टांगयोगें तेंही । मिळे निश्चित अभ्यासें ॥३०॥
हें नृपा सांगे दत्त । यमनियमासन यथार्थ ।
प्राणायामादिक समर्थ । चौदाव्यांत बोलिला ॥३१॥
सांगे अवधोत ज्ञान । सजातीय प्रत्ययलक्षण ।
विजातीयनिरसन । निदिध्यासन यथार्थ ॥३२॥
दत्त दावी अभ्यासमार्ग । तसा राजा करी सांग ।
समाधिस्थ हो मग । पंध्राव्यांत हे कथा ॥३३॥
जो अभ्यस्तयोग । त्याचें दार्ढ्य करवी मग ।
दत्त म्हणे असंग । प्रारब्ध भोग अर्जुना ॥३४॥
आला अर्जुन स्वनगरीं । समुद्राचा गर्व हरी ।
यज्ञदानादिक करी । षोडशांतरीं हे कथा ॥३५॥
नृप तो यज्ञ करी । तेणें देव भीती अंतरीं ।
अतिथि होवून रवि ये द्वारीं । राख करी वृक्षांची ॥३६॥
राजा धर्मिष्ठ असून । दैवें वसिष्ठ कोपून ।
शाप दे हें कथन । सत्राव्या अध्यायांत ॥३७॥
स्वधर्मानें मरण । दत्तापाशीं मागे अर्जुन ।
ऋचीकाचें आख्यान । विधिनें लग्न सत्यवतीचें ॥३८॥
वाखाणी भविष्य भृगुमुनी । शिव झाला जमदग्नी ।
विश्वामित्र राजा झाला मुनी । अठराव्यांत हे कथा ॥३९॥
राम धाकुटा पुत्र जमदग्नीचा । अवतार विष्णूचा ।
निरोप मानून पित्याचा । तोडी मातेचा गळा तो ॥४०॥
त्या परशुरामें ख्याती केली । रेणुकेला वांचविली ।
पित्याची सेवा केली । एकुणिसाव्या अध्यायीं हें ॥४१॥
देव यन्महत्व ठेविती । त्या देवांची केली स्तुती ।
मुनिगृहीं ये भूपती । आतिथ्य करी मुनि त्यांचें ॥४२॥
राजा विधिवशें भुलून । चले धेनूस घेवून ।
त्यावरी धांवे भृगुनंदन । हें कथन विसाव्यांत ॥४३॥
श्रीविष्णो: कलेयं असें मानून । युद्ध करी अर्जुन ।
रामें परशु धरून । भुज तोडून टाकिले त्याचे ॥४४॥
राम करी अर्जुनाचा नाश । पिता म्हणे दोषी त्यास ।
राम जाई तीर्थाटणास । एकविसाव्या अध्यायीं हें ॥४५॥
अधर्मातें स्वीकारून । जमदग्नीची मान ।
तोडिती अर्जुनाचे नंदन । करी आक्रंदन रेणुका ॥४६॥
ते क्षणिं राम वनांतून । येई दु:खी होवून ।
करी शत्रूंचें हनन । हें निरूपण बाविसाव्यांत ॥४७॥
मग परशुराम मायबापांसी । घेवून भेटे दत्तासी ।
रेणुका स्तवी दत्तासी । रेणुकेसी स्तवी दत्त ॥४८॥
आवश्यक करून । रेणुका सिद्ध होवून ।
करी सहगमन । हें निरूपण तेविसाव्यांत ॥४९॥
तत्सुत राम करी क्रिया । पूजी दत्ताचार्या ।
दत्त पुन: दावी तया । मायाबापांसी ते क्षणीं ॥५०॥
क्षत्रियहनन करून । राम कश्यपा दे भूदान ।
राहे समुद्रतीरीं जाऊन । हें कथन चौविसाव्यांत ॥५१॥
पुत्र तोचि सांगे पित्यासी । गालवें अश्व देवूनी ऋतध्वजासी ।
नेला यज्ञरक्षणासी । पातलाकेतूसी तों वेधी ॥५२॥
तो तीव्रबाणासह गेला पाताळीं । राजा मागें चाले त्या वेळीं ।
तया मदालसा भेटली । पंचविसाव्यांत हे कथा ॥५३॥
ती सुता गंधर्वाची । सखीकरवीं गुरूची ।
भेटी करवूनि भूपाची । भार्या साची जाहली ॥५४॥
दैत्या निर्दाळूनि भूप ये पुरासी । कपटी फसवी मदालसेसी ।
तिणें देह दिला अग्नीसी । सव्वीसाव्यांत हे कथा ॥५५॥
तो नृप स्त्रीच्या विरहें । भोग सोडूनि वनीं राहे ।
अश्वतर नाग सुतस्नेहें । नाग तत्स्नेहें दु:खी होती ॥५६॥
दु:खास्पद सुत पाहूनि नाग । सरस्वतीवरें मग ।
शिवतोषें मदालसेला अव्यंग । मिळवी हें सत्ताविसाव्यांत ॥५७॥
नृपा शेषानें पाताळीं आणून । स्ववृत्त सर्व सांगून ।
दे मदालसादान । पूर्ववत तिला पाहून नृप हर्षे ॥५८॥
दिसे इंदिरेपरी तिला । नृप घेऊनि पुरा आला ।
एक पुत्र तिला झाला । बोधी त्याला अठ्ठाविसाव्यांत ॥५९॥
नरेंद्र मूर्ख पुत्र जाणून । करी शोक अनुदिन ।
मग तया सांगे नंदन । माता हें ज्ञान दे आह्मा ॥६०॥
वैरस्य तें मानून । मदालसेवरी नृप कोपून ।
प्रवृत्तिमार्गाचें स्तवन । करी एकुणतिसाव्यांत ॥६१॥
ते अयुक्त जरी तरी । मदालसा स्वीकारी ।
अलर्काला व्यवहारीं । हुशार करी नृपाज्ञेनें ॥६२॥
साम्राज्य अलर्काचें पाहून । त्याला विरक्त करावा म्हणून ।
सुबाहु करी रण । हें कथन तिसाव्यांत ॥६३॥
तें दुस्सह दु:ख पाहून । करी अलर्क पलायन ।
मातृवचन स्मरून । भेटे येऊन श्रीदत्ता ॥६४॥
त्या दु:खातें वारून । अलर्का प्रबुद्ध करून ।
दत्त उपदेशी ज्ञान । हें कथन एकतिसाव्यांत ॥६५॥
सांगे तत्वज्ञान आत्रेय । मनोभंग वासनाक्षय ।
यांचे सुगमोपाय । योगिराय अलर्कातें ॥६६॥
त्या अद्वितीयात्मक दर्शन । व्हाया अष्टांगयोगसाधन ।
सांगे सयुक्तिक अत्रिनंदन । बत्तिसाव्या अध्यायीं ॥६७॥
तद्विष्णो: परमं पदं । असें सांगे जें वेद ।
तें कळावें विशद । म्हणूनि धारणाभेद सांगे दत्त ॥६८॥
योग पदरीं पडावा म्हणून । अभ्यासाचे दोष गुण ।
दत्त करी निरूपण । तेतिसाव्या अध्यायीं ॥६९॥
सुविरक्त व्हावें म्हणून । अणिमादिसिद्धींचें वर्जन ।
सांगे दत्त नृपा ध्यान । सगुणागुण भेदानें ॥७०॥
योग मंद न व्हावा म्हणून । दत्त सांगे योगचर्यालक्षण ।
भिक्षेचेंही वर्तन । चौतिसाव्या अध्यायीं ॥७१॥
सांगे परम योगसाधन । अनाहताचेम अनुसंधान ।
करावया स्थिर मन । प्रणवध्यान सांगे दत्त ॥७२॥
नृपोदंत सांगे विशद । साडेतीन मात्रांचा भेद ।
क्रममुक्तिपद । पस्तिसाव्या अध्यायीं ॥७३॥
भूपास सांगे दत्त । मृत्युज्ञान वर्षाचे आंत ।
योगी लावावया चित्त । शीघ्र विरत व्हावया ॥७४॥
सर्वदा योग करितां । मध्येंच मृत्यु येतां ।
म्हणे ये क्रममुक्तता । छत्तिसाव्यांत श्रीदत्त ॥७५॥
नृप परमानंद पावून । करी दत्तगुरूचें स्तवन ।
बंधूचे उपकार मानून । भक्तिरस प्रगटवी ॥७६॥
अदृश्य रूपाहून । सगुण अधिक मानून ।
अलर्क करी स्तवन । हें कथन सदतिसाव्यांत ॥७७॥
तो भ्रान्ति वारून । नृप दत्ताज्ञेनें येऊन ।
स्वबंधूस भेटून । आत्मज्ञान निवेदितसे ॥७८॥
अनसूयू सुबाहु काशिराजसी । बोधून जाई वनासी ।
पुत्रा राज्य देवूनि वनासी । अलर्क ये अडतिसाव्यांत ॥७९॥
पुरूरव्याचा लेंक । आयुनाम पुण्यश्लोक ।
पुत्र नाहीं म्हणून करी शोक । होई सेवक दत्ताचा ॥८०॥
तो वय:प्रमाण बरेंच । दत्त सेवेंत करी खर्च ।
मिळवी प्रसाद साच । कथन हेंच एकुणचाळिसाव्यांत ॥८१॥
राजा दिव्य फळ दे राणीला । तिला गर्भ राहिला ।
तिणें स्वप्नीं देव पाहिला । शौनकें कथिला तदभिप्राय ॥८२॥
महावीर्य हुंडासुर । गर्भा माराया हो सादर ।
दत्तप्रसादें जन्मला कुमार । हा प्रकार चाळिसाव्यांत ॥८३॥
दानव मोहन घालून । नगरीं पोरा नेवून ।
माराया दे त्याचें रक्षण । अत्रिनंदन करिता झाला ॥८४॥
दत्तेंच रक्षिला म्हणून । वसिष्ठाचे हातीं मिळून ।
नहुषाचें झालें रक्षण । हें एकेचाळिसाव्यांत ॥८५॥
तें चक्षुर्बंधन मोहन । नासतां राणी उठोन ।
पुत्रातें न पाहोन । दु:खी होवून प्रलापी ॥८६॥
आयुराजा तेथें येऊन । सर्वां धि:कारून ।
शोक करी दारुण । बेचाळिसाव्यांत हे कथा ॥८७॥
दु:खित राजा जाणून । दत्त नारदा दे पाठवून ।
नारद तेथें येऊन । सांगे ज्ञान रायासी ॥८८॥
अस्वतंत्र आपणा जाणून । राजा राणी करिती स्तवन ।
श्रीदत्ताचें हें कथन । त्रेचाळिसाव्यांत ॥८९॥
वनांत नहुष जावून । आकाशवाणी ऐकून ।
वसिष्ठापाशीं येऊन । घे जाणून सर्व तें ॥९०॥
देवद्विजपीडकासुर । त्या माराया चाले कुमार ।
त्याचें साह्य करिती सुर । हें चौवेचाळिसाव्यांत ॥९१॥
सोडी प्राणहारक बाण । दैत्यसैन्य मारून ।
नहुष तो निर्भर्त्सून । मारी झुंजून हुंडासुरा ॥९२॥
ख्याती सोमवंशाची करून । अशोकसुंदरीस वरून ।
मायबापां भेटे तो येऊन । हें पंचेचाळिसाव्यांत ॥९३॥
विनंवितां गुरूंसी । गुरु सांगे दीपकासी ।
ययाती वरी देवयानीसी । केली दासी शर्मिष्ठा ॥९४॥
पुरुपकार जाणून । त्या दे ययाती सिंहासन ।
दु:खें यदु वनीं जाऊन । दत्त भेटे शेचाळिसाव्यांत ॥९५॥
त्या शून्य वनीं असून । निर्भय व्हावयाचें कारण ।
पुसतां करी कथन । तत्त्वज्ञान अवधूत ॥९६॥
स्वभावोदित गुण । घेतले म्हणे गुरूपासून ।
पृथ्वीवाताकाशशिक्षण । सांगे सत्तेचाळिसाव्यांत ॥९७॥
त्या राजासी सांगे अवधूत । जलशिक्षणें झालों पूत ।
अग्निशिक्षणें वीट । घालवून नीट राहिलों ॥९८॥
ह्या जागृदादि अवस्था सोडाया । चंद्रार्क गुरु केलें म्हणे म्यां ।
कवडा गुरु स्नेह सोडाया । अठ्ठेचाळिसाव्यांत दत्त वदे ॥९९॥
म्हणे वांछा सोडाया आर गुरु । गांभीर्यार्थ समुद्र गुरु ।
रूप सोडाया पतंग गुरु । सार घ्यावया गुरु मधुकर ॥१००॥
स्त्रियेस सोडाया गज गुरु । भिक्षार्थ मधुकर गुरु ।
गीत रस सोडाया मृग मत्स्य गुरु । हें एकुणपन्नासाव्यांत ॥१०१॥
मनस्समाधानार्थ । गुरु केले यथार्थ ।
पिंगला वेश्या बाळ ख्यात । कुरर म्हणजे टिटावू ॥१०२॥
गुरु मी केले म्हणे दत्त । स्त्रीकंकण सर्प शरकार ख्यात ।
पेशस्कार कोळी देह विश्रुत । पन्नासाव्यांत बुद्धीबळें ॥१०३॥
विविध धर्मान्वित । ज्ञान भक्तिरसभरित ।
असें हें श्रीदत्तचरित । मूर्तिमंत ब्रह्म कीं ॥१०४॥
ब्रह्म ते अरूप असून । कोणा नये दिसून ।
करितां उपनिषदांचें श्रवण । मनन ध्यानें मग कळे ॥१०५॥
मंदां विशेषेंकरून । नुमजे औपनिषदज्ञान ।
त्यांकरितां हें लेखन । करवी अत्रिनंदन दयाळू ॥१०६॥
श्रीविष्णो जगत्पालका । जय विधे जगत्कारका ।
जय शंभो जगत्तारका । चित्तहारका तुज नमो ॥१०७॥
तूं आर्यसंरक्षक । तूंची अनार्यशिक्षक ।
तूंची हें ग्रंथकौतुक । करविसी लोक तारावया ॥१०८॥
परात्पर परंज्योती । तूंची परब्रह्ममूर्ती ।
कोण जाणे तुझी गती । स्वयंज्योती तूं श्रीदत्त ॥१०९॥
विहार तुझा स्वभक्तहृदयांत । तूं भक्ताधीन सतत ।
मी मागतों पसरून हात । ह्या ग्रंथीं सतत सान्निध्य ठेवीं ॥११०॥
तूंच मंदानुग्राहक । तूंचि वक्ता श्रोता पृच्छक ।
तूंचि चालक भासक । होसी ग्रंथग्राहक निर्मत्सर ॥१११॥
कधीं पद्मिनी बोलावी भ्रमरा । कधीं चंपक फिरवी माघारा ।
धरूनि ह्या विचारा । एवढा पुरा केला लेख ॥११२॥
त्र्यश्विदंतिक्षिति ( १८२३ ) मिते शालिवाहशके कलौ ।
अम्राभ्राक्ष ( ५०० ) मिते क्षिप्रातटे ग्रंथोयमुद्गत: ॥११३॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीवासुदेवानंदसरस्वतीकृतं श्रीदत्तमाहात्म्यं संपूर्णम् ॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP