मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ४४ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४४ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
निरभिमानी दीपक । गुरूचें वंदूनी पदक ।
म्हणे आयुराजाचा लेंक । काय कौतुक करिता झाला ॥१॥
जो सूर्यसंकाश । उपजला दिक्पालांश ।
ज्याला रक्षी योगीश । तो दैत्यास कसा मारी ॥२॥
हें मज विस्तारूनी । सांगा म्हणतां तो मुनी ।
म्हणे एकाग्र होऊनी । पी कानीं कथामृत ॥३॥
सगोत्रा: पितरौ चास्य वियुक्ता बाल्य एव स: ।
निमित्तीकृत्य नहुषो मुनिन्दत्तेन रक्षित: ॥४॥
मुनी स्थितप्रज्ञ असून । श्रीदत्तानें वळवितां मन ।
दे सोडूनी ध्यान । करी पालन नहुषाचें ॥५॥
असुरैश्वर्यहारक । देवैश्वर्यवर्धक ।
वसिष्ठशिक्षणें सम्यक । कुमार समर्थ झाला ॥६॥
जो वारंवार धनुर्वेद । अभ्यासी न मानितां खेद ।
शस्त्रशास्त्रविशारद । झाला वादप्रवीण ॥७॥
ज्याची गैर चाल नसे । नित्य गुरुसमीप वसे ।
कधीं उद्धत नसे । विनीत असे संतत ॥८॥
निंदा स्तुती दे सोडून । आपल्या अभ्यासा झटून ।
सर्वविद्यानिपुण । नहुष झाला तो ॥९॥
ते सुष्ठु आचरण । वसिष्ठ त्याचें पाहून ।
म्हणे नहुषा वनीं जाऊन । करी हनन हिंस्रांचें ॥१०॥
तेधवां तो राजनंदन । आज्ञा शिरसा मानून ।
धनुष्यबान घेऊन । चाले वन लक्षूनियां ॥११॥
गायींस जे मारिती । मनुष्यास जे पीडिती ।
त्या व्याघ्रादि हिंस्र जाती । तेणें वनांतीं मारिल्या ॥१२॥
तें हस्तलाघव त्याचें । अचूक पाहतां देवांचें ।
मन हृष्ट झालें साचें । असें वाचेनें बोलती देव ॥१३॥
तूं तनूज इंदूमतीचा । सोमवंशीय आयुराजाचा ।
पुत्र अससी साचा । नससी ऋषीचा सुत ॥१४॥
हा अभिमान दे सोडून । मायबापां दे दर्शन ।
तुझ्या पदीं लावी मन । अशोकसुंदरी वरीं तिला ॥१५॥
जो चर्व्य मानितो नरा । त्वां तयां हुंडासुरा ।
मारूनी जा निजपुरा । मातापितरां भेटावया ॥१६॥
तूं नि:शेष दैत्यासी । निजबळें मारिसी ।
दत्तवरें समर्थ आसी । न करीं मानसीं तूं चिंता ॥१७॥
तो व्योमध्वनी ऐकून । नहुष करी चिंतन ।
मी तरी वसिष्ठनंदन । हें आकाशवचन कां चवळी ॥१८॥
नभीं देव हें वदती । किंवा कपटी हे उक्ती ।
गुप्तपणें येथें वदती । कराया मतिभ्रंश कीं ॥१९॥
असें वचन ऐकून । अनेक तर्क करून ।
नहुष आश्रमीं येऊन । सांगे वंदून मुनीला ॥२०॥
मुनीहि तें ऐकून । म्हणे नहुषा तूं जाण ।
इंदुमतीगर्भरत्न । आयुनंदन सोमवंश्य ॥२१॥
जो स्वतंत्र दत्तदेव । तत्प्रसादें तुझा उद्भव ।
तो तुला रक्षी सदैव । अरिष्ट सर्व वारूनी ॥२२॥
तो होय तुझा कैवारी । जेव्हां इंदुमतीचे उदरीं ।
तूं आलासी ते अवसरीं । असुरें तें जाणिलें ॥२३॥
हुंड दानव गर्भाला । माराया सिद्ध झाला ।
सुदर्शन ठेवूनी रक्षिला । तुला गर्भीं दत्तानें ॥२४॥
हा आयु:सुत पुढें मज । मारील म्हणूनी दभुज ।
उपजतांची तुज । माया पसरूनी नेता झाला ॥२५॥
तुला स्वनगरीं नेऊन । माराया दे स्त्रियेलागून ।
मग तिचे हातांतून । दासीकरीं गेलास तूं ॥२६॥
तूं नास्तिकाच्या हातांत । पडतांही तेथें दत्त ।
राखी तुझें जीवित । ही मात न वर्णवे रे ॥२७॥
ऐक नहुषा नवल तें । दासी उचलोनी स्वहस्तें ।
तुला देऊनी बल्लधातें । म्हणे यातें शीघ्र तोड ॥२८॥
मग इंद्र वज्र जसें । पर्वतावरी टाकी तसें ।
बल्लव शस्त्र मारीतसे । तुझेवरी तीन वेळ ॥२९॥
नरद्रोही असुर हिंस्र । जेव्हां तुझ्यावर शस्त्र ।
टाकी तेव्हां दत्त चक्र । तुझ्यावरी धरीतसे ॥३०॥
तो प्रवृद्धक्रोध दानव । खपतां बळवैभव ।
मनीं आणी दयाद्रव । तुझा जीव राखावया ॥३१॥
तूं विद्ध न होसी तें पाहून । शस्त्र मोडितां विस्मित होऊन ।
म्हणे याला नेऊन । कोठें तरी ठेवावा ॥३२॥
ह्या आश्रमीं तो मग । तुला आणुनी ठेवी सवेग ।
असा तुझा दैवयोग । तुझें अंग दत्त राखी ॥३३॥
दानवानें तुला टाकलें । तेव्हां म्यां न पाहिलें ।
मग ध्यानें सर्व जाणलें । पालन केलें तुझें म्यां ॥३४॥
तुझें स्वस्ति व्हावें म्हणून । येथेंच केलें पालन ।
जरी देतों पाठवून । पितयालागून तुजला ॥३५॥
तैं नास्तिक पुन: जाऊन । तुला पीडितील म्हणून ।
येथेंच केलें पालन । आतां दैत्यहनन करीं तूं ॥३६॥
तूं पुन: येथें येऊन । माझा प्रसाद घेऊन ।
स्वपुरासी जाऊन । राज्य करूनी सुखी राहें ॥३७॥
शापी पूर्वीं अशोकसुंदरी । दैत्या तूं मरशील नहुषाचे करीं ।
मग दैत्यें कारागारीं । अशोकसुंदरी ठेविली ॥३८॥
नहुषा ती तप करून । तुला वरावें म्हणून ।
तव चरणीं मन । लावूनी ती राहिली असे ॥३९॥
आतां विलंब न करी । सर्व दैत्यांसी मारी ।
जाऊनीयां स्वपुरीं । दर्शन करी मायबापाचें ॥४०॥
जो विश्वपालक दत्तात्रेय । तो तुझा वारील अपाय ।
त्याचे चिंतूनियां पाय । युद्धीं दैतेय मारिसी ॥४१॥
आतां वेळ न लावी वीरा । आयुष्मान्भव शूरा ।
महाबाहो धरीं धीरा । सर्व असुरां हाण तूं ॥४२॥
वरदा: संतु पितरो बलदा: संतु ते सुरा: ।
यशोदा: संतु ते मंत्रा आयुर्दा:संतु ते द्विजा: ॥४३॥
असो स्वस्ति क्षेम तुझें । हें आशिर्वचन घे माझें ।
सुयश पसरो तुझें । दिगंतरीं रे नहुषा ॥४४॥
तो आस्तिकपणें नहुष । शिरसा मानी आशिष ।
पावूनीयां संतोष । म्हणे विशेष काय बोलूं ॥४५॥
असें नहुष बोलून । धरी वसिष्ठाचे चरण ।
म्हणे माझें हेंचि तारण । सर्वज्ञ आपण जाणतां ॥४६॥
मनस्ताप देती अधिक । ते वैरी कामक्रोधादिक ।
हे चरण सेवितां घेती धाक । होती सेवक ते मग ॥४७॥
जैं तार्क्ष्योड्डाण पाहून । सर्प जाती भिऊन ।
तेवीं सेवितां तुमचे चरण । अरिगण निर्बल होती ॥४८॥
असा असे चरणप्रसाद । मग ह्या वैर्‍याची काय बिशाद ।
करूनी चरणाची याद । दैत्याचा शिरच्छेद करीन ॥४९॥
यापरि बोलतां नहुष । उठवी मुनी त्यास ।
हुंगून त्याच्या मस्तकास । म्हणे जयश्रीस वरीं तूं ॥५०॥
अरिष्ट सर्व वारून । रक्षोत पितृदेवब्राह्मण ।
द्यावाभूमी करो पालन । अघशमन करो पूषा ॥५१॥
ऋषीनें असें बोलतां । नहुष झाला चालता ।
म्हणे श्रीदत्त प्रसन्नता । करो आतां मजवरी ॥५२॥
न नमितां जो गर्भापासून । आजपावत करी रक्षण ।
लोभ ठेवी पूर्ण । वंदूं चरण त्या दत्ताचे ॥५३॥
करो स्वस्ति क्षेम तोची । रणीं जय देऊनी आमुची ।
वासना पुरवूनी पदाची । सेवा साची घेवो ॥५४॥
जो नास्तिकशिक्षक । जो अस्तिकरक्षक ।
तोची श्रीदत्तदेव एक । माझा रक्षक सर्वथा ॥५५॥
जो मनोविनोदास्पद । त्या दत्ताचें चिंतितां पद ।
न होतां अणुमात्र खेद । जया विशद मिळो मला ॥५६॥
कुंठे बृहस्पतीची मती । गातां ठके अहिपती ।
परी त्याच्या गुणाची समाप्ती । न करिती कोणी ॥५७॥
दोनी हस्त जोडून । तया करूं भावें वंदन ।
तो दत्त क्रुपा करून । करो रक्षण सर्वथा माझें ॥५८॥
परस्पर युद्ध होतां । किंवा कपटें कोणी मारितां ।
किंवा रणीं संकट येतां । तोचि रक्षो सर्वथा ॥५९॥
मद्गति सुगम व्हावी । देवांनीं सर्वत्र रक्षा करावी ।
वेळीं सुजलान्नें मिळावीं । आगती व्हावी संतोषें ॥६०॥
संमर्दन रणीं करितां । ज्याला बोलाविती तो आतां ।
इंद्र करो सहायता । भवभीतांतो रक्षी ॥६१॥
सावधानपणीं असें । नहुष स्तवन करीतसे ।
देवां हर्ष होतसे । त्याचें तैसें धैंर्य पाहुनी ॥६२॥
माथा तुकविती सुर । वर्षती पुष्पांचे भार ।
नहुष चाले सत्वर । तंव मार्गावर शकुन झाले ॥६३॥
ये गाई कन्या समोर । दही फळें फुलांचें हार ।
पूर्णकुंभ दोघे विप्र । मृगवर करीती प्रदक्षिणा ॥६४॥
तो तशा शकुनांप्रती । पाहूनी हर्षें चित्तीं ।
पायीं चालतां पुढती । इंद्र तयाप्रती पाहतसे ॥६५॥
मघवा देवाप्रती बोले । हा आमुच्या काजा चाले ।
दुखती तयाचीं पाऊलें । सहाय केलें पाहिजे याला ॥६६॥
माझा स्पंदन मी आतां । पाठवितों भूमीवरता ।
तुम्ही करा सहायता । युद्ध करितां दैत्यासी ॥६७॥
मग मिळेल जय तुम्हांसी । असें म्हणूनी मातलीसी ।
घेऊनी साश्वरथासी । नहुषासी भेट जा ॥६८॥
छत्र दंशन तूणीर । किरीट कुंटलें केयूर ।
चाप विविध शस्त्रास्त्र । जा सत्वर घेऊनी तूं ॥६९॥
तें वासवाचें वचन । मातली मान्य करून ।
आज्ञेप्रमाणें सर्व घेऊन । येऊन नहुषा भेटला ॥७०॥
जो गुर्वघ्रि स्मरून । चाले दत्ता चिंतून ।
त्या नहुषापुढें येऊन । इंद्राचें वचन सांगे मातली ॥७१॥
हा हययुक्त रथ । सर्व सामर्गीसहित ।
इंद्रे पाठविला येथ । हा स्वीकारीं युद्धांत सुख व्हाया ॥७२॥
अन्यक्तिंचिन्न्यून नसे । यावरी सर्व भरलें असे ।
मातली बोलतां असें । स्वीकारितसे नहुष तो ॥७३॥
चकचकित रत्नजडित । शिरीं धरी तो मुकुट ।
कानीं कुंडलें लखलखित । घालितसे तो ॥७४॥
सुतेज दृढ कवच तें । अंगीं बांधी तयातें ।
मंत्रपूर्वक सर्वांतें । धारण करी अनुक्रमें ॥७५॥
तो मग रथा वंदून । प्रदक्षिणा करून ।
यथोक्त मंत्र म्हणून । दत्ता आठवूनी चढे रथीं ॥७६॥
तो मोत्यांचे हार कंठीं । घालून बैसला रथीं ।
म्हणे मातलीप्रती । चालवीं रथ सत्वर ॥७७॥
तें राजपुत्राचें वचन । मातली अंगिकारून ।
हातीं चाबुक घेऊन । लगाम धरून रथ चालवी ॥७८॥
जो जगत्पालक दत्त । तो होतां सहायीभूत ।
न्यून काय मग तेथें । होय समस्त परिपूर्ण ॥७९॥
मग तेतीस कोटी देव । तेथें घेती धांव ।
म्हणती नहुषा आम्ही देव । आलों तव साह्यर्थ ॥८०॥
बोएल नहुष देवांला । दत्त राखी सदा मला ।
तोचि करवी तुम्हाला । मला सहाय ये वेळीं ॥८१॥
मी नित्य गुर्वाज्ञा प्रमाण । मानी त्याचें हेंच कारण ।
करी कष्टें निवारण । सदा प्राणरक्षिता तो ॥८२॥
जो भक्तेच्छापूरक । तो दत्त योगीनायक ।
साह्य होतां कांहीं एक । न्यून नसे साख माझी घ्या ॥८३॥
असें नहुष बोलून । तो देवांस घेऊन ।
पुढें करितां गमन । ये कळून अशोकसुंदरीसी ॥८४॥
या विभुं प्रार्थयंतीशं नहुषो मां वृणोत्विति ।
सा तदागमनं ज्ञात्वा रंभां तस्मै समीरयत् ॥८५॥
रंभा जी पाठविली । ती नहुषासमोर आली ।
म्हणे ऐक माझी बोली । मी आल्यें ज्यासाठीं ॥८६॥
तूं रथारूढ होऊन । येसी हें ध्यानें जाणून ।
मजला दे पाठवून । अशोकसुंदरी ये वेळीं ॥८७॥
सखीं माझी अशोकसुंदरी । ती पडे हुंडाचे कारागारीं ।
नित्य तुला अंतरीं । चिंती चिंतातुरा ती ॥८८॥
तुझी गृहिणी ती जाण । तिचें करीं मोचन ।
जरी भोगितसे बंधन । निर्दोष जाण ती साध्वी ॥८९॥
बा अध:पात होवो आह्मांसी । जर बोलूं मिथ्या वचनासी ।
नहुष म्हणे तीसी । येथूनी तूं जा आतां ॥९०॥
मज कळलें यथार्थ । तूं धरीं आपुला पंथ ।
होतां हुंडासुराचा अंत । दर्शन तेथें होईल ॥९१॥
सुहास्य होऊनी रंभा मग । भूपाज्ञेनें ये सवेग ।
सखीसी सांगे सोड उद्वेग । येतो सुयोग लवकर ॥९२॥
तपस्विनी अशोकसुंदरी । ऐकतांचि आनंद करी ।
इकडे तों सुरवरीं । केला भारी कोलाहल ॥९३॥
ते सिद्ध साध्य विद्याधर । गंधर्व यक्ष किन्नर ।
नाग गुह्यक यांहीं घोर । कलकलाट थोर केला ॥९४॥
जो आनंदें होतां सुप्त । तो हुंडासुर झाला जागृत ।
म्हणे कोण येतो अहित । कलकलाट करीत हा ॥९५॥
दूता कुठोनि हा कोण । शत्रू आला दारुण ।
हा कोणाचा कोण । किती सैन्य घेऊन आला हा ॥९६॥
जा सर्व हें जाणून । तूं सत्वर ये परतून ।
असें दूताला सांगोन । पाठवून दे हुंडासुर ॥९७॥
आसन्नेसी येऊन । दूत सर्व घे जाणून ।
पुन: हुंडापासीं तो जाऊन । म्हणे सावधान ऐक तूं ॥९८॥
येतो वेगें आयुराजसुत । तेतीस कोटी देवांसहित ।
तुझा करावया घात । असें दूत बोलिला ॥९९॥
तें सहन न झालें त्यासी । बोलावूनी भार्येसी ।
म्हणे पूर्वीं दिल्हा त्या बाळासी । त्वां समक्ष मारविला कीं ॥१००॥
त्याला कसा कोणी हातीं । मारिला हें सांग निगुती ।
ती म्हणे मारिला दासीहातीं । मी होत्यें तेथेंच ॥१०१॥
तच्चर्मास्थि सुद्धां जाण । न दिधल्या टाकून ।
असें तिचें वचन ऐकून । पुसे बोलावून दासीस ॥१०२॥
तो कोणी मारिला बाळ । ती म्हणे राणी होती जवळ ।
म्यां मारिला तो बाळ । सत्य सत्य बोलत्यें ॥१०३॥
दैत्य जिव्हा चावून । म्हणे तरी आला हा कोठून ।
आधीं शत्रू मारून । तुम्हां शिक्षा करीन मग ॥१०४॥
हा आजी शत्रू आला । आतां मारावया याला ।
आज्ञा देतों सर्व दैत्यांला । चला सत्वर युद्धासी ॥१०५॥
जे जीविताशेनें न जाती । त्यांला आधीं या हातीं ।
मारूनियां उपरांती । शत्रुप्रती जाईन ॥१०६॥
अभिषेक करून । सेनापती पांच योजून ।
सर्वां देई पाठवून । उग्रशासन दैत्य तो ॥१०७॥
ते तच्छब्द कठोर । मानुनी युद्धा निघती असुर ।
म्हणती रणीं मारतां होऊं सुर । करूं उपकार धन्यावरी ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये चतुश्चत्वारिंशोsध्याय: ॥४४॥
॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP