TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय १९ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १९ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


अध्याय १९ वा
श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु म्हणे शिष्य ऐक आतां । शंकरें अवतार धरितां ।
स्वयें अवतारे पर्वतसुता । जाहली सुता रेणुराजाची ॥१॥
रेणुका नामें पुण्यखाणी । शिवध्यानाहूनी मनीं न आणी ।
तोचि जमदग्नी जाणूनी । अनुदिनीं चिंती तच्चरण ॥२॥
तिचा निर्धार जाणून । रेणु राजा संतोषून ।
जमदग्नीला बोलावून । कन्यादान देता झाला ॥३॥
रेणुका साक्षात् पार्वती । धरितां जमदग्नीनें हातीं ।
हृष्ट होऊनी अति प्रीति । सेवा करी तयाची ॥४॥
मग आश्रम करूनी । जमदग्नी राहिला वनीं ।
अग्निहोत्र घेऊनी । तप आचरोनी राहिला ॥५॥
रेणुका ती पतिव्रता । धरूनियां पतीच्या चित्ता ।
अनुकूल वागे सर्वथा । माथा तुकाविती जिला देवी ॥६॥
तिला झाले चार पुत्र । सर्वही परम पवित्र ।
झाले पूज्य सर्वत्र । पितृसेवातत्पर ते ॥७॥
पहिला वसुमंत दुसरा वसु । तिसरा सुषेण चवथा विश्वावसू ।
चौघेही धर्मविश्वासु । वेदशास्त्रपारंगत ॥८॥
जो देवीं प्रार्थिला हरी । तो ये रेणुकेचे उदरीं ।
स्वयें अवतार धरी । भक्तकैवारी स्वयंभू जो ॥९॥
वैशाख शुक्ल तृतीयेसी । सिंहलग्नी मध्यान्हसमयासीं ।
अवतार धरी ऋषीकेशी । भार्गवराम नामें सहावा जो ॥१०॥
भृगुच्या वचनानुसार । क्षत्रियसा झाला परशुधर ।
पढूनियां वेदशास्त्र । ब्रह्मचर्यें वागतसे ॥११॥
तपश्चर्या करून । शिवाचें मन तोषवुन ।
धनुर्वेद पढून । शस्त्रास्त्रीं निपुण झाला ॥१२॥
शिवाची आज्ञा घेऊन । पितृगृहीं येऊन ।
मातापितरां सेवुन । विनीत होऊन राहिला ॥१३॥
राम हा परम धार्मिक । जो मातापितृसेवक ।
ज्याला मानिती ऋषीलोक । जो विवेकसंपन्न ॥१४॥
जो स्वयें नारायण । पुत्रपणा पावुन ।
सेवा करी अनुदिन । गौरीहररूप मातापितरांची ॥१५॥
नित्य वनीं जाऊन । समित्पुष्पफळादि आणून ।
देई सन्निध राहून । आज्ञावचन न उल्लंघी ॥१६॥
जमदग्नी पवित्र । अनुकूल ज्याला कलत्र ।
स्वाधीन वागती चारी पुत्र । अग्निहोत्र नित्य चालवी ॥१७॥
रेणुका ती एके दिवशीं । करावया स्नानासी ।
आली एकली नदीतीरासी । चिंती मानसीं पतीतें ॥१८॥
गंधर्वराजा त्या गंगेंत । सर्व स्त्रिया घेउनी बहुत ।
आला क्रीडा करीत । मदोन्मत्त गज जेवी ॥१९॥
सर्व स्त्रिया सुकुमारी । भूषणें लेऊनी नानापरी ।
नि:शंकपणें जलांतरीं । क्रीडा करिती मदभरें ॥२०॥
सुगंधी पुष्पें घवघवीती । सुगंधी बहुदूर पसरती ।
भ्रमर तेथें धांग घेती । गुंजारव करिती मदभरें ॥२१॥
गजरे तुरे हार । शोभती ज्यांच्या अंगावर ।
रत्नजडित अलंकार । यांहीं शरीर विराजे ज्यांचें ॥२२॥
चंदन कस्तूरी लिंपून । उत्तम टिळे चर्चून ।
दिव्य वस्त्रें पांघरून । स्तियांशीं रममाण होतसे ॥२३॥
तसें तें कीडाकौतुक । पाहतां रेणुकेला हरिख ।
वाटोनी लावी तिकडे आंख । म्हणे सुख उत्तम ह्यांचें ॥२४॥
दैवाची विचित्र गती । मोठेमोठेही भुलती ।
पहा हे परम सती । जगतीमाजी विख्यात ॥२५॥
जिणें आपुलें वस्त्रांतून । पाणी आणितां बांधून ।
न पाझरे त्यांतून । जीवनबिंदू एकही ॥२६॥
पातिव्रत्य जिचें असें । स्वप्नींही परमुखा न पाहतसे ।
ती भुलोनी अवलोकीतसे । तसे ते खेळ परपुरुषाचे ॥२७॥
तेणें पातिव्रत्य न्यून झालें । तत्क्षणीं तिचें मन भ्यालें ।
म्हणे म्यां हें काय पाहिलें । केंवीं झाले वरते नेत्र ॥२८॥
आतां खचित माझा पती । मला सोडील हें निश्चिती ।
आतां माझी काय गती । अंतरती उभय लोक कीं ॥२९॥
कटकटा माझ्या दुर्दैवा । का धरविसी दुर्भावा ।
हरहरा परमेश्वरा देवा । माझ्या धवा कोप न येवो ॥३०॥
असी भयभीत होऊनी । मस्तकीं जल घेऊनी ।
परतली रेणुनंदिनी । निजसदनीं पातली ॥३१॥
तंव द्वारीं जमदग्नी । साक्षात् दिसे जमदग्नी ।
रेणुकेसी पाहुनी मनीं । मनीं सर्व समजे तो ॥३२॥
म्हणे ही धैर्यापासून । भ्रष्ट झाली म्हणून ।
ब्राह्मी लक्ष्मी जाऊन । अशी दीनमुखी झाली ॥३३॥
मुनी कोपायमान होऊन । नानापरी धिक्कारून ।
म्हणे सुटलें हें सदन । न दावी वदन मला तूं ॥३४॥
मी तरी दरिद्री ऋषी । राख फांसोनी अंगासी ।
सदा असे वनवासी । वल्कलासी सेवूनी ॥३५॥
येथें कंदमुळें फळें । आमुचा आहार तुला कळे ।
तो तरी वेळोवेळे । आम्हां न मिळे भक्षावया ॥३६॥
चंपक पुष्पें मालती । सेवंती बकूळ जाती ।
तेथें स्वप्नींही न दिसती । वाटेल खंत तुज येथें ॥३७॥
येथें पलंग बिछाने । शिळेचे करून निजणें  ।
अंगराज धुळीविणें । कोण जाणे या आश्रमीं ॥३८॥
येथें वास केल्यावरी । तुज कष्ट होतील भारी ।
होमधूम घेतां नेत्रीं । ढळढळां वारी वाहेल ॥३९॥
कोण हे कष्ट सोसील । तुला जेथें सुख होईल ।
तेथें त्वां जावें खुशाल । नाना ख्याल करावया ॥४०॥
राजाची धरितां पाठ । तुझें नीट भरेल पोट ।
हातीं मिळतील पाटल्या गोठ । डोईवरी मोट न येईल ॥४१॥
जरी राजासवें नांदसी । सर्वं सुख पावसी ।
सुखानें क्रीडा करिसी । कासया येसी आतां येथें ॥४२॥
त्वां जावें माघारां । उलंडूं न देई ह्या द्वारा ।
आतां मला नको तुझा वारा । जाईं जारा लक्षूनी ॥४३॥
जायेकरितां जाया । न होतसे प्रिया ।
आपुल्या कामा जाया प्रिया वदे श्रुती या वचनातें ॥४४॥
नातें आज तें तुटलें । तुझें हें मन विटलें ।
माझ्यापासूनी सुटलें । नटलें जें पररंगीं ॥४५॥
पररंगीं रंगे जी नारी । तिला तत्काळ टाकावी दूरी ।
असा विचार चतुरीं । निर्धारिला सत्य तो ॥४६॥
तेव्हां आतां त्वां जावें । वाटेल त्या पंथा धरावें ।
आवडे त्या पुरुषा भजावें । हें समजावें सत्य वचन ॥४७॥
असे अवाच्य बोल ऐकूनी । थरथरां कांपे रेणुनंदिनी ।
खिन्न झाली भ्याली मनीं । कांहीं न सुचोनी गडबडली ॥४८॥
नेत्रीं ढळढळां वाहे पाणी । मुख गेलें वाळोनी ।
अंगीं घर्म सुटोनी । भिजोनी गेलें वस्त्र तिचें ॥४९॥
बोलूं जातां शब्द न उमटे । बुद्धी सर्वथा खुंटे ।
गहिंवरे गळा दाटे । सुटे वस्त्र अंगावरूनी ॥५०॥
पुढें पाउल न उचले । संतापें अंग जळालें ।
सर्वही धैर्य वळलें । सौंदर्य वाळलें तत्काळ ॥५१॥
लांकुडाची पुतळी जसी । निश्चल राहे तसे ।
रेणुका उभी दारासी । जमदग्नी तिसी पुन: वदे ॥५२॥
टवळे न जासी येथोन । तरी तुझा घेईन प्राण ।
माझा कोप दारुण । नेणसी कठिण मन माझें ॥५३॥
जा जा येथूनी सत्वर । माझा कोप अनिवार ।
असें बोलतां मुनीश्वर । मनीं विचार करी नारी ॥५४॥
एकदां चुकोन घडला अन्याय । मी पतीचे न सोडीन पाय ।
होवो अपाय किंवा उपाय । येथूनी न जाय माघारां ॥५५॥
जरी पती मारील । तरी पाप जाईल ।
दुर्गती पुढें न होईल । असें निश्चळ करी मन ॥५६॥
पुन: पुन: सांगतां । ती माघारां न फिरतां ।
हाक मारी श्रेष्ठ सुता । वसुमंता जमदग्नी ॥५७॥
पितृवचना ऐकत । आला तेथें वसुमंत ।
जमदग्नी तया म्हणत । कोपयुक्त होउनी ॥५८॥
पुत्रा इणें केलें पाप । त्यामुळें झाला मला ताप ।
इची मान शीघ्र काप । कांप आणूं नको अंगीं ॥५९॥
ऐकूनी तातवचन । ताताचे पाय धरून ।
म्हणे कोपाचें करा शमन । एवढा कोप न करावा ॥६०॥
न मातु: परदैवतं । एवं चेच्छास्त्रसम्मतं ।
तर्ह्यस्या हननाच्छाश्वतं । हंत दुर्गतं ह्यनुभवेयं ॥६१॥
असें वदतां तनय । बापा वाटला अनय ।
म्हणे याला झाला स्मय । मला न्याय शिकवितो हा ॥६२॥
पितुर्जीवतो वाक्यकरणात् । पुत्रस्य पुत्रत्वमिति वचनात् ।
अद्य तदुल्लंघनात् । कुर्यां भस्मसात् त्वामहं ॥६३॥
असें कोपें बोलून । तया म्हणे तूं जा जळून ।
असें बोलून शापवचन । क्रूरलोचन पाहे तया ॥६४॥
तत्काळ तो गेला जळून । मग वसुला बोलावून ।
म्हणे इचें शिर छेदून । टाकून देई सत्वर ॥६५॥
वसु म्हणे ऐक ताता । पितु: शतगुणं माता ।
असी असे शास्त्रवार्ता । ती अन्यथा केवी करूं ॥६६॥
असें त्याचें वचन । ऐकतां त्यावरी कोपोन ।
म्हणे तूं जा जळून । त्वरें लक्षून अग्रजमार्गासी ॥६७॥
असें म्हणतां तो जळाला । तेणें परी विश्वावसूला ।
सुषेणालाही जाळिला । तया वेळा मुनीनें ॥६८॥
चौघे गेले जळून । परी दु:खित न झालें मन ।
म्हणे परशुराम अजून । वनांतून कां न ये ॥६९॥
तंव समिघा दर्भ घेऊन । हातीं परशू धरून ।
द्वारीं पातला नंदन । हृदयनंदन केवळ जो ॥७०॥
म्हणे रामा ही तुझी माता । करी महा दुष्कृता ।
इचें शिर तोड म्हणतां । तुझी बंधुता नायके ॥७१॥
म्यां शाप देऊन । तुझे बंधू टाकिले जाळून ।
तूं पितृभक्त जाणून । तुला सांगतों ऐक आतां ॥७२॥
हा परशु उचलून । इचें शिर छेदून ।
टाकितां माझें मन । समाधान होईल ॥७३॥
ऐकतांचि पितृवचन । तत्काळ परशु मारून ।
मातेचें शिर छेदून । टाकी कठोर मन ज्याचें ॥७४॥
काय छाती ही तयाची । दगडानें मढविली कीं लोहाची ।
मान तोड म्हणतां द्रव न येची । म्हणोनि होय तोइ महाक्रूर ॥७५॥
पुढें क्षत्रियांचा निरन्वय । करील हें नोहे आश्चर्य ।
मातृशिरच्छेदीं त्याचें धैर्य । कधींतरी अस्तमय होय कीं ॥७६॥
झटदिशी परशु मारूनी । चटदिशी मान तोडूनी ।
पटदिशी टाकिली पाडूनी । खटदिशीं मेदिनीवरी पडे ॥७७॥
शिर तुटतां चळचळा । रक्त वाहे भळभळा ।
जरी राम पाहे डोळां । ज्याचा गळा न दाटे ॥७८॥
पाहूनी त्याचें शौर्य । ओळखूनी औदार्य ।
ऋषी म्हणे हा न हो अनार्य । परम आर्य पितृभक्त ॥७९॥
मग शांत होऊनी मुनी । रामातें आलिंगूनी ।
म्हणे शाबास तूं पितृवचनीं । पूर्ण विश्वास ठेविशी ॥८०॥
मातेविषयीं स्नेह न धरिला । पापपुण्याचा विचार न केला ।
तेणें मला आनंद झाला । हो तूं भला त्रिलोकीं ॥८१॥
मी झालों प्रसन्न । तुला देतों वरदान ।
असें ऐकोनी मुनिवचन । राम वंदून वर मागे ॥८२॥
ताता माता हे उठावी । भ्रातृचतुष्टयी वांचवावी ।
मला चिरंजीवीता असावी । नसावी स्मृती मातृवधाची ॥८३॥
मिळावा सर्वत्र विजय । कधीं न यावा अपाय ।
म्यां व्हावें सदा अजेय । दीर्घ आयुष्य असावें ॥८४॥
असें मागतां रामानें । मग तथास्तु मुनी म्हणे ।
तुला कळिकाळाचें न भेणें । चिरंजीवपणें सुखें रहा ॥८५॥
तेव्हां आपोआप शिर । जोडतां रेणुका उठे सत्वर ।
पुन: उठले ते बंधु चार । रामा हर्ष जाहला ॥८६॥
मग राम उठोन । धरी मातेचे चरण ॥
पुत्रस्नेहें आलिंगून । आशीर्वाचन दे माता ॥८७॥
म्हणे माता ते अवसरीं । रामा त्वां मजवरी ।
ही कृपा केली बरी । खंती अंतरीं न धरी हे ॥८८॥
ज्या पातिव्रत्या सांभाळिती । त्यांनीं ही गोष्ट ठेवावी चित्तीं ।
जातां अन्यत्र चित्तवृत्ती । ऐसी गती वोढवेल ॥८९॥
उ:रे चित्ता कामसक्ता । कां आम्हा बुडविशी संता ।
तुला धिक्कार असो आतां । घेई शांतता अझून तरी ॥९०॥
काम ठाईंचा चावटा । भल्याभल्याचा करी तोटा ।
सज्जना बुडवी हा करंटा । मोठा खोटा तीन लोकीं ॥९१॥
लुटारु ह्या ऐशा चोरा । केवी देशी चित्ता थारा ।
आतां तरी सारासारा । विचारा करी निश्चयें ॥९२॥
तुझें ठाईं न उठतां काम । दूर होईल कीं परंधाम ।
तेव्हां तूं होई निष्काम । परंधाम दूर नसे ॥९३॥
सर्वथा कामा न सोडवे । तरी येवढें करी बरवें ।
पतिचरणा आदरी ब्रह्मभावें । एवढा काम राखी तूं ॥९४॥
मग आपोआप निष्काम । होसील तूं आत्माराम ।
यापरता उपशम । नको धाम हेंच तुझें ॥९५॥
असें चित्ता वळवूनी । आपुले स्वाधीन करूनी ।
रेणुका लावी पतिभजनीं । अनुदिनीं समरसें ॥९६॥
पतीचे चरण धरून । म्हणे मी केवल पापीण ।
दुष्टवासना उठऊन । दुष्ट दर्शन पैं केलें ॥९७॥
हा घडला महोत्पात । त्यातें तुम्हीं केलें शांत ।
बरवें दिधलें प्रायश्चित्त । हें दोहांत पापशोधक ॥९८॥
हा तुमचा नव्हे कोप । माझा वाढऊनी अनुताप ।
नि:शेष घालविलें पाप । आतां निष्पाप झालें मी ॥९९॥
कोण एवढा दयाळू । कोण येवढा कनवाळू ।
केला माझा सांभाळू । असा प्रतिपाळू कोण जगीं ॥१००॥
सद्धर्माचा उपदेश । मुर्खा ऐकतां येई रोष ।
प्रथम वाटे जें विषा अंतीं । विशेष अमृत तें ॥१०१॥
आजी केला उपकार । मला ठरविलें धर्मावर ।
जन्मोजन्मीं हाची वर । सेवावे सादर हे चरण ॥१०२॥
आम्ही पतिव्रता नारी । पतिविणें आम्हां कोण तारी ।
हा निर्धार आमुचे अंतरीं । उभयलोक हाच एक पती ॥१०३॥
असी विनंती करून । प्रसन्न केलें पतीचें मन ।
ऋषी बोले सुप्रसन्न । तुझें मन शुद्ध असे ॥१०४॥
मग ती रेणुका आनंदे । पतीशीं प्रेमें नांदे ।
पति ब्रह्म मानी अभेदें । एकमन जयांचें ॥१०५॥
साक्षाद्विष्णु राम । स्वयें वैकुंठधाम ।
असूनियां अकाम । शिवसेवातत्पर राहे ॥१०६॥
अर्जुनाचा वर । सिद्ध करावया लक्ष्मीवर ।
घरी द्विजावतार । नामें परशुधर प्रसिद्ध ॥१०७॥
गाय नेली हें मिष करूनी । अर्जुनासी युद्ध करूनी ।
समरीं त्यासी मारूनी । मोक्षसदनीं पाठवी ॥१०८॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये एकोनविंशोध्याय: ॥१९॥
श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-05-02T01:30:33.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तेजाब काढणें

 • सोने गाळणें. 
 • हिणकस सोन्यामध्ये दुप्पट चांदी घालून अल्‍युमिनमच्या भांड्यांत नायट्रिक असिडच्या साहाय्याने आचं देऊन शुद्ध सोने काढणें. 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.