मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ३२ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३२ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
दीपक म्हणे गुरुस । कृतार्थ केलें अलर्कास ।
मग पुढें तयास । काय विशेष निरोपिलें ॥१॥
गुरु म्हणे दीपका । श्रीदत्तानें एका ।
प्रश्नें बोधिलें अलर्का । ज्ञानार्का उदित केलें ॥२॥
अलर्क म्हणे भगवंता । पूर्ण प्रसाद केला आतां ।
झाली खास कृतार्थता । उद्वेग चित्ता न येची ॥३॥
स्वात्मरूपाहून । अहंकाराचें पृथक्करण ।
करावया मुनिगण । तप आचरण करितात ॥४॥
कल्पकोटी जातां । जो नये मूर्खाच्या हातां ।
तया आत्मया आतां । अभिन्नपणें दाविलें ॥५॥
जयजया जगन्नाथा । तुझ्या पायीं ठेवूं माथा ।
प्रार्थना असे एक आतां । ती समर्थां ऐकावी ॥६॥
जें हें जाहलें ज्ञान । तें राहावें स्थिर होऊन ।
येथें पसरलें वासनावन । चित्तपवन आंत चाले ॥७॥
याच्या जोरानें तत्वज्ञान । न जाणों जाईल कीं उडोन ।
तरी उपाय सांगोन । स्थिर करून द्यावें हें ॥८॥
घडल्याही दुर्जनाचा संग । याचा न व्हावा वियोग ।
म्यां व्हावें नि:संग । असा योग सांगावा ॥९॥
जन्म मिळतां मनुष्याचें । हेंच कर्तव्य तयाचें ।
अन्यथा साफल्य न तयाचें । विषयांच्या सेवनानें ॥१०॥
नाना योनी फिरोन । दैवयोगें करून ।
मनुष्यजन्मा पावून । न करी पावन आपणा जो ॥११॥
नरकीं जे भोगिले भोग । तेच येथें भोगितो भोग ।
जो तयांचा करी वियोग । जो विराग न धरी ॥१२॥
जो न होई नि:संग । त्याचें सर्व व्यंग ।
त्याचा तो भवरोग । सदा अभंग जाणावा ॥१३॥
हें सर्व समजून । बरवेपणीं उमजून ।
म्यां केला हा प्रश्न । कृपावलोकन करा आतां ॥१४॥
असा अलर्काचा प्रश्न । ऐकूनियां अत्रिनंदन ।
म्हणे उत्तम केला प्रश्न । समाधान पावलों ॥१५॥
( श्लोक ) श्रृणुष्वावहितोलर्क मुक्तये कारणत्रयं ।
तत्वज्ञानं मनोभंगो वासनाक्षय एव च ॥१६॥
अलर्का मुक्तीचें कारण । पहिलें तत्वज्ञान ।
दुसरें मनाचें शमन । तिसरें जाण वासनाक्षय ॥१७॥
स्ववर्णाश्रमोचित । फलाभिमानरहित ।
कर्में करितां सतत । शुद्धचित्त होय नर ॥१८॥
उपयोग काय कर्मांचा । असा कुतर्क मनाचा ।
न करावा तयांचा । उपयोग साचा सांगतों ॥१९॥
( श्लोक ) महापापवतां नृपां ज्ञानयज्ञो न रोचते ।
प्रत्युत ज्ञानयज्ञस्तु प्रद्वेष्यो भासते स्वत: ॥२०॥
( अर्थ ) पदरीं पुंज पापांचे । तया नरा ज्ञानयज्ञ न रुचे ।
एवढेंच नोहे त्यांचें । ज्ञानयज्ञासी द्वेषी मन ॥२१॥
स्ववर्णाश्रमोचित । करितां कर्में ईश्वरार्पित ।
तेणें होय शुद्ध चित्त । मग हो सतत श्रवणरुची ॥२२॥
( श्लोक ) रुचिद्वारोपकुर्वंति कर्माण्यत्मविमुक्तये ।
अज्ञानस्याविरोधित्वान्न साक्षादात्मबोधवत् ॥२३॥
अविद्याया न चोच्छित्तौ ज्ञानदन्यदपेक्षते ।
ज्ञानोत्पत्तौ तु नैवान्यच्छमादिभ्यो ह्यपेक्षते ॥२४॥
शमाद्युत्पत्तये नान्यच्चित्तशुद्धेरपेक्षते ।
चित्तशुद्धौ च नित्यादिकमभ्यो नान्यदिष्यते ॥२५॥
पारंपर्येण कर्मैवं ज्ञानायैवोपयुज्यते ।
चित्ताशुद्धेरन्य्दयाच्छमादेर्न विमुच्यते ॥२६॥
( ओवी ) रुचिद्वारें कर्में तीं । ज्ञानाला उपयुक्त होती ।
अज्ञानासी विरुद्ध नसती । म्हणूनी साक्षाज्ज्ञानवत मुक्ती न देती ॥२७॥
होतां अविद्येचा नाश । मुक्ती मिळे खास ।
ज्ञानानें अविद्यानाश । होतो खास जाणावा ॥२८॥
मिळतां शमादिक । ज्ञान मिळे सम्यक ।
तेही शमादिक । चित्तशुद्धीनें मिळती ॥२९॥
चित्तशुद्धी कर्में होते । असें परंपरेनें कर्म तें ।
ज्ञानाला उपयुक्त होतें । म्हणूनी तें आदरावें ॥३०॥
चित्तशुद्धी होतां । संन्यास करावा तत्वतां ।
करूनी दृढ चित्ता । सद्गुरूला शरण जावें ॥३१॥
गुरुशुश्रूषा करून । करावें वेदांतश्रवण ।
अन्वय व्यतिरेक जाणून । करावें मनन श्रवणाचें ॥३२॥
जें होय वाक्यज्ञान । तें हा अभ्यास करून ।
स्थिर करितां भंगे मन । वासनानाश होईल ॥३३॥
प्राकृतगुणासी वियोग । परब्रह्मासी योग ।
इचें नांव मोक्ष चांग । होतां नि:संग मिळेल ॥३४॥
वैराग्यानें संग तुटे । ज्ञानें वैराग्य भेटे ।
विवेकें ज्ञान उमटे । सदसद्विचारें विवेक हे ॥३५॥
देहेंद्रिय मन:प्राण । अहंकार अंत:करण ।
हे भौतिक सगुण । हे सविकार निश्चित ॥३६॥
पराक् असती असत । जरी होतां संयुक्त ।
तरी ते संहत असत । ते परार्थ जाणावें ॥३७॥
ते स्वत: जड असुनी । अन्योन्याध्यासें करूनी ।
येती चेतनसे दिसूनी । अग्निसंयोगेम लोह जसें ॥३८॥
देहादिक जड असूनी । आत्मसान्निध्येंकरूनी ।
येती चेतनसे दिसूनी । हें अज्ञानी नेणती ॥३९॥
प्रत्यगात्मा तयांहूनी । वेगळा साक्षी असूनी ।
अध्यासे विपरीत भासूनी । ये अज्ञानी जनाला ॥४०॥
मग उठे अहंकार । मग कर्में करिती सादर ।
कर्मे बंध पडे घोर । तेणें वारंवार भ्रमण होय ॥४१॥
अज्ञानें अविवेक गहन । अविवेकें अभिमान ।
अभिमानें रागादिक उठोन । त्रिविध कर्म घडून ये ॥४२॥
कर्में उपजे शरीर । कर्मे सुख दु:ख घोर ।
एवं ही वारंवार । परंपरा चालेल ॥४३॥
होतां अपरोक्षज्ञान । नष्ट होई अज्ञान ।
नष्ट होतां अज्ञान । नष्ट होई अविवेक ॥४४॥
होतां अभिमानाचा नाश । होतो अभिमानाचा नाश ।
होतां अभिमानाचा नाश । रोगादिनाश होतसे ॥४५॥
कर्मनाशें शरीर न होई । मग सुख दु:ख जाई ।
असा बोध जेव्हां होई । मग येई मोक्षसुख ॥४६॥
तेव्हां ज्ञानावांचून । नोहे कधीं समाधान ।
मनोनाश होतां जाण । ज्ञान पूर्ण बाणें तें ॥४७॥
मनोनाशाकरितां । योगाभ्यास करावा तत्वता ।
मग वासनाभंग होतां । विदेहकैवल्य मिळेल ॥४८॥
म्हणोनी सांगतों योगाभ्यास । सांगोपांग तूं परिस ।
एकाग्र करोनी चित्तास । मग खास निवशील ॥४९॥
होता मनाची समता । योग ये आपुल्या हाता ।
मग ती मुक्तता । ये हाता अनायासें ॥५०॥
अलर्क पुसे गुरूसी । चंचळत्व असे मनासी ।
मग समता तयासी । येईल कसें सांगावें ॥५१॥
( श्लोक ) ॥ युज्यते वेष्टनं वायोराज्काशस्य च खंडनं ।
ग्रंथनं च तरंगाणां नास्था मनसि युज्यते ॥५२॥
( ओवी ) ॥ असें अलर्काचें वचन । ऐकोनि बोले अत्रिनंदन ।
म्हणे तुझें सत्यवचन । चपळ मन दुर्जय ॥५३॥
वैराग्य किंवा अभ्यास । हे जयोपाय तयास ।
वैराग्य होतां खास । ये मनास निश्चळता ॥५४॥
दोषदृष्टी विषयांवरी । मग जिहासा तयावरी ।
पुन्हा आठवतां वीट भारी । येतां बरी विरक्ती हो ॥५५॥
किंवा अभ्यासावा योग । तो असे अष्टांग ।
हा करी दु:खवियोग । दु:संग तोडुनी ॥५६॥
यमनियमीं देह शोधून । आसनीं स्थैर्य पावून ।
प्राणायामीं दोष शोषून । पिंडशोधन होतसे ॥५७॥
प्रत्याहारें इंद्रियजय । धारणेनें पापक्षय ।
ध्यानानें मन:स्थैर्य । एकत्व होय समाधीनें ॥५८॥
जसें सुवर्ण मलीन होतां । अग्नीचा ताव देतां ।
तया ये पूर्वरूपता । मळ मळतां निश्चयें ॥५९॥
तैसें योगाभ्यासें । मनोमळ जळतसे ।
पूर्वरूप येतसे । बोलतसे असें वेद ॥६०॥
प्राणापाणनिरोधन । तोचि प्राणायाम जाण ।
त्याचे त्रिविध लक्षण । लघुमध्योत्तमभेदें ॥६१॥
घर्म ये लघुप्राणायामें । कंप उठे मध्यमप्राणायामें ।
ब्रह्मरंध्रीं उत्तमप्राणायामें । प्राण जाई निश्चित ॥६२॥
वामहातीं टाळीं देऊन । तया करावी प्रदक्षिण।
हें मात्रेचें प्रमाण । किंवा श्वासोच्छवास निद्रिताचा ॥६३॥
किंवा तर्जनी फिरवून । जानूसी करावी प्रदक्षिण ।
एक चुटकी वाजवून । मात्रामान मानावें ॥६४॥
बारा मात्रांसी सम । कनिष्ठ प्राणायाम ।
चोविसांनीं मध्यम । उत्तम अठ्ठेचाळिसांनीं ॥६५॥
श्वास घेणें तो पूरक । धरणें तो कुंभक ।
सोडणें तो रेचक । मिळोनी एक प्राणायाम ॥६६॥
तया पुरकाहून । कुंभक तो चतुर्गुण ।
रेचक साधावा द्विगुण । उत्तरोत्तर जाण वाढवावा ॥६७॥
जोरानें रेचक करितां । शीघ्र येई दुर्बळता ।
सोईसोईनें सोडितां । ये अरोगता निश्चित ॥६८॥
हळुहळू करितां अभ्यास । जिंकवेल प्राणास ।
जसा सोईनें सिंहास । वश्य खास करवेल ॥६९॥
बळें वश्य करितां । कधीं न ये हातां ।
हळूहळू अभ्यासितां । होय वश्य निश्चयें ॥७०॥
वश्य करितां जसा हरी । छू करितां मृगा धरी ।
वश्य करितां तयापरी । प्राण मळातें ॥७१॥
वश्य होतां सिंह । न तोडी धन्याचा देह ।
वश्य प्राणेम देह । नोहे पीडित ॥७२॥
चालतां अभ्यसक्रम । नासे शुभाशुभ कर्म ।
ईचें ध्वस्ती नाम । योगी विश्वास पावती ॥७३॥
जे लोभमोहात्मक । सर्वकाम ऐहिक ।
तसेच पारलौकिक । हे सकळिक नष्ट होती ॥७४॥
शांत होय चित्तवृत्ती । होई सुखाची प्राप्ती ।
इला प्राप्ती म्हणती । योगी डुल्लती जियेनें ॥७५॥
वाढे ज्ञानसंपत्ती । त्रैकालिक अर्थ कळती ।
ही प्राणजयाची स्थिति । इचा म्हणती संवित्त ॥७६॥
इंद्रियें होती प्रसन्न । मन पावे समाधान ।
ही प्रसाद म्हणून । अवस्था जाण चवथी ॥७७॥
ह्या अवस्था चार । साधी तो योगीश्वर ।
त्याला ईश्वर नाहीं दूर । त्याच्या बरोबर प्रत्यक्ष वसे ॥७८॥
असएं व्हावया साधन । अभ्यासक्रम सांगेन ।
ऐक तूं मन देऊन । समाधान पावशी ॥७९॥
पद्मासनीं बैसोन । शरीर करोनी समान ।
दांतां दांत न लावून । दृष्टी ठेवून नासाग्रीं ॥८०॥
हालवितां अंग । शीघ्र न साधे योग ।
म्हणूनी ताठूनी अंग । धरितां योग साधेल ॥८१॥
आळस निद्रा भ्रांती । ह्या तमोगुणाच्या वृत्ती ।
त्या जिंकूनी पुढती । योगाभ्यास करावा ॥८२॥
काम क्रोध लोभ यत्न । या रजोगुणवृत्ती जाण ।
या विक्षेपें न घडे ध्यान । म्हणूनी ह्या सोडाव्या ॥८३॥
वैराग्य शमदमादिक । या सत्ववृत्ती सम्यक ।
ह्या धरितां साधक । पावे सुख अभ्यासीं ॥८४॥
जो केवळ कुंभक । न साधे सम्यक ।
तोंवरी पूरक रेचक । धरूनी कुंभक साधावा ॥८५॥
न घेतां न सोडितां । उगी स्तब्ध राहतां ।
प्राण न हो खालता । अथवा वरता योग्यां ॥८६॥
योगी न हो घाबरा । वायू कोंडे बरा ।
केवळ कुंभक तो खरा । तो साधावा यत्नानें ॥८७॥
असा प्राण जिंकावा । मग प्रत्याहार करावा ।
तेणें मग जीवा । समाधान वाटेल ॥८८॥
जसा कूर्म अंगें आवरी । तसा जेव्हां इंद्रियां सांवरी ।
तेव्हां प्रत्याहार होय तोंवरी । ना वारिजेल बाह्य भान ॥८९॥
होता प्रत्याहार । शब्द नये कानावर ।
स्पर्श नेणें शरीर । घडतें बाहेर काय तें ॥९०॥
विषय ठावे न होती । इंद्रियें स्थिर राहती ।
ही प्रत्याहाराची स्थिती । योगी जाणती आत्मनिष्ठ ॥९१॥
प्रत्याहार झाल्यावरी । धारणा करावी बरी ।
नाभ्यादि देशावरी । चित्तस्थिरीकरण व्हावें ॥९२॥
ही धारणा साधतां । दोष जाती सर्वथा ।
योगिया ये स्वस्थता । उद्विग्नता न येईल ॥९३॥
मग करावें ध्यान । चित्तैकाग्र्य होऊन ।
होई परम समाधान । हें साधन उत्तम ॥९४॥
हें ध्यान विसरतां । जेव्हां ध्येयाकारता ।
आपोआप ये चित्ता । हे समाधी जाणावी ॥९५॥
न हाले न चाले मन । ध्येयाकार होऊन ।
निश्चल राहे अनुदिन । हे जाण समाधी ॥९६॥
आपण आपणा पाहून । राहे संतोषून ।
हालावया तेथून । न होय भान सर्वथा ॥९७॥
हेचि निरुपाधिक । जाणावें नित्य सुख ।
याहूनी नसे अधिक । त्रिभुवनीं सुख सर्वथा ॥९८॥
ह्या सुखाचें लक्षण । वर्णून सांगेल कोण ।
हें आपुलें आपण । जाणावें पूर्णपणानें ॥९९॥
हा सर्व रसांचा रस । याहून जे रस ।
ते यापुढें विरस । तयां रस कोण म्हणेल ॥१००॥
इतर जे रस । ते ठावें इंद्रियांस ।
हा अतींद्रिय रस । बुद्धिवृत्तीस घेववेल ॥१०१॥
विषयरस नश्वर । असती क्षणभंगुर ।
तेणें विरहताप थोर । ते निरंतर न मिळती ॥१०२॥
विषयरस सोपाधिक । हा रस निरुपाधिक ।
हेंचि स्वरूपसुख । नसे अधिक याहून ॥१०३॥
हें सुख स्वाधीन । इतर तें पराधीन ।
येथें होता लीन । सर्व शीण उतरे ॥१०४॥
अलर्का याहून । मोक्षाचें साधन ।
सुगम नसे आन । म्हणूनी योग करी तूं ॥१०५॥
अभ्यासाचे गुणदोष । जाणावे ते नि:शेष ।
तरीच होय तोष । ना तरी त्रास होई ॥१०६॥
गुण दोष न जाणून । करितां योगध्यान ।
योगी पावे समाधान । नातरी विघ्न येईल ॥१०७॥
इति श्रीदत्तमाहात्म्ये द्वात्रिंशतितमोsध्याय: ॥३२॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP