मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय २० वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २० वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय २० वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥दीपक म्हणे गुरुप्रती । ज्यापाशीं सिद्धी रांगती ।जो करी विप्रांची भक्ती । मिती नाहीं ज्याच्या दाना ॥१॥त्या नृपा विप्राची गाय । नेण्याचें कारण काय ।हा माझा संशय । दूर करावा ॥२॥गुरु म्हणे दीपकासी । शाप होतां रायासी ।फेर पडला मतीसी । म्हणूनी धेनूसी नेली ॥३॥प्रत्यहीं याग करी । पूर्ण भक्ती विप्रांवरी ।धर्मी निष्ठा ठेवी बरी । तरी दैव पुढें आलें ॥४॥स्वयें ज्ञानी असून । धर्मात्मा नीतिनिपुण ।निरिच्छही असून । बळें दैवें वश केला ॥५॥अदैव हें बळिवंत । हें सर्व विख्यात ।ब्रह्मादिकां वागवीत । स्वहस्तगत करूनी ॥६॥सूर्या नित्य फिरवी । ब्रह्म्याकरीं सृष्टी करवी । विष्णूला अवतारें नटवी । जगा मारवी रुद्रकरें ॥७॥कोणा न सोडी दैव । हें सुख दु:ख दे सदैव ।दैवें न सोडिले देव । न सोडी जीवन्मुक्ताही ॥८॥ईश्वरें दैव निर्मिलें । त्याला कोणीं न त्यजिलें ।कुमारशापें पाडिलें । वैकुंठाहूनी जयविजयां ॥९॥चंद्रा योजी गुरुभार्येसी । इंद्रा योजी अहल्येशीं ।ब्रह्मया योजी कन्येशीं । पळवी सीतेसी रावणाकरवीं ॥१०॥पूषाचे दांत पाडवी । भगाचे नेत्र फोडवी ।भृगूच्या मिशा तोडवी । छेदवी जें दक्षशिरा ॥११॥नारदादिक दैवातें । न उल्लंघिती तयातें ।उल्लंघील अशातें । न ऐकिता त्रिभुवनीं ॥१२॥हें बलिष्ठ असतांही । ज्ञान्याची हानी नाहीं ।त्याला योजितो देहीं । स्वयें पाही विनोद ॥१३॥शरीर कां फिरेना । प्रारब्धें कां कष्टेना ।ज्ञानी तरी ती वेदना । निजमना न आणी ॥१४॥दैवें झाला हा शाप । म्हणोनी गायी नेई नृप ।त्याचा मानुनी कोप । तोडी भूपशिरा राम ॥१५॥एके दिवशीं रथावरी । बैसोनी राजा वनांतरीं ।फिरोनी येतां माघारीं । जमदग्न्याश्रमा पाहे ॥१६॥स्वयें चतुरंग दळभार । होती वाद्यांचें गजर ।बंदी वाखाणिती वारंवार । नृपवरयशातें ॥१७॥ तया आश्रमा पाहूनी । राजा म्हणे आश्रमीं जावुनी ।मुनीचें दर्शन करूनी । मग जावें नगरासी ॥१८॥असा विचार करूनी । सैन्य तेथें ठेवूनी ।दोघे मित्र घेवूनी । मुनीच्या आश्रमीं राजा आला ॥१९॥तो राजा पादचारी । मुनीच्या आश्रमीं प्रवेश करी ।जेथें कोणी न होती वैरी । त्या आश्रमा पाहे तो ॥२०॥रायें पाहतां आश्रम । निघोनी गेला श्रम ।म्हणे क्षणभरी करूं विश्राम । साक्षात् धर्म येथें वसे ॥२१॥असें म्हणूनी आश्रमांत । जातां देखला मूर्तिमंत ।अग्नीच कीं प्रकाशत । भार्गवसुत जमदग्नी ॥२२॥गौरीहरासमान । रेणुकेसह विराजमान ।जमदग्नी तपोधन । तया अर्जुन नमन करी ॥२३॥साष्टांग नमस्कार । नृप करी वारंवार ।स्तोत्रें करी अपार । हर्षनिर्भर होवूनी ॥२४॥मस्तकीं अंजली बांधून । उभा राहे अर्जुन ।जमदग्नी तया पाहून । आशीर्वचन दे प्रेमें ॥२५॥देवूनियां आसन । नृपा सन्निध बसवून ।पुसे क्षेम समाधान । मुनी प्रसन्न होवूनी ॥२६॥राजा आसनी बसून । जमदग्नीला वंदून ।सांगे क्षेम समाधान । कुशळ वर्तमान सर्वही ॥२७॥राजा म्हणे ऐका मुनी । आपलें प्रसादें करूनी ।सर्वांचें क्षेम असे पत्तनीं । सर्व समृद्धी पूर्ण असती ॥२८॥आपुलें होतां दर्शन । प्रसन्न झालें मन ।रेणुकामातेचे चरण । पाहतां पावन मी झालों ॥२९॥यज्ञशाला देखिली । तीन्हीं अग्नीची भेटी झाली ।आजी दैवरेषा उदेली । म्हणूनी झाली तुमची भेटी ॥३०॥आम्ही क्षत्रिय दायाद । आम्हां हे तुमचे पाद ।दर्शन देती परमानंद । श्रीदत्तपाद ज्यापरी ॥३१॥आतां कांहींतरी आज्ञा व्हावी । या हस्तें सेवा घ्यावी ।कृतार्थता आमुची व्हावी । म्हणून विनवी राजेंद्र ॥३२॥मुनी म्हणे हंसोन । आम्हां असे काय न्यून ।आजी तुम्हां द्यावें भोजन । माझें मन असें इच्छी ॥३३॥मग बोले अर्जुन । सवें सैन्य घेवून ।आलों घ्यावया दर्शन । दर्शनपावन जाहलों ॥३४॥आज्ञा द्यावी मुनीश्वरा । आतां जावूं नगरा ।मुनी म्हणे नृपवरा । सैन्यासह प्रसाद घ्यावा ॥३५॥मुनीचें तें वचन । राजा मान्य करून ।सैन्यासह राहून । ध्यान करित बैसला ॥३६॥मुनीनें धेनूस प्रार्थून । यथायोग्य सर्वां अन्न ।दिधलें प्रीतिकरून । बहुमानपुर:सर ॥३७॥रंगविल्लिका रचूनी । यथार्ह पात्रें मांडूनी ।पात्राजवळी दीप ठेवुनी । सुगंधी धूप जाळिले ॥३८॥रायतीं कर्मटी कोशिंबिरी । शिक्रणी लोणचीं नानापरी ।सांडगे पापड पक्वान्नें भारी । वामभागीं वाढली ॥३९॥दशविध शाका पायसान्न । दक्षिणभागीं शोभमान ।मध्यें साखरभात चित्रान्न । ठेविले द्रोण उपसेचनाचे ॥४०॥वेळाकेशरादियुक्त । श्रीखंडादि गव्यघृत ।आलें मिरें हिंग हळदीसहित । षड्रसयुक्त पदार्थ वाढिले ॥४१॥पदार्थ असती प्रतप्त । वास येतसे घवघवीत ।पाहतां नेत्र होती तृप्त । असे पदार्थ वाढिले ॥४२॥दाणा चंदी उत्तम घांस । दिधला गजाश्वादिकांस ।प्रार्थूनियां मुनी सर्वांस । सावकाश जेवा म्हणे ॥४३॥सर्वही जेवूं बैसती । यथेच्छ पक्वान्नें खाती ।घृत पायस यथेच्छ पीती । मनीं मानिती परमानंद ॥४४॥जेवितां चतुर्विधान्न । सर्वांचें तृप्त झालें मन ।पात्र राहिलें भरून । सर्व अन्न संपवेना ॥४५॥सर्वही पदार्थांची । घेती अलौकिक रुची ।गोडी तया पक्वान्नांची । न वर्णवे सर्वथास ॥४६॥सर्वही यथेच्छ जेवून । उठोनी करिती हस्तक्षाळण ।कस्तूरी चंदन देवुन । करशोधन करविलें ॥४७॥नाना परींची फळें । अमृतोपम सुगंधी जाळें ।सुवासार्थ दिलीं कमळें । विडे वेळेसहित ॥४८॥वारा येतसे शीतळ । पसरला सुगंधपरिमळ ।वाटे तो थाट सकळ । केवळ देवलोकींचा ॥४९॥असें तें पवित्र अन्न । भक्षितां ते सर्वजण ।पावोनियां समाधान । आपणा पावन मानिती ॥५०॥जरी रायापाशीं सर्व सिद्धी । मागें फिरती नवनिधी ।जो असतां सुधी । त्याची बुद्धी पालटली ॥५१॥राजाचें प्रारब्ध संपलें । म्हणोनी मनीं भलतें आलें । धरोनी मुनीचीं पाउलें । राजा बोले त्या वेळीं ॥५२॥म्हणे जी तूं दरिद्री । संपत्ती नसतां तुझे घरीं ।आजी कसें येणेंपरी । सर्वां भोजन त्वां दिधलें ॥५३॥मी सार्वभौम जरी । असें अन्न आमुचें घरीं ।न मिळे यथार्थ कुसरीं । सर्व समृद्धी असतांही ॥५४॥तूं त अरी कौपीनधारी । वनांतरीं निर्धारी ।जरी संपत्ती नसतां घरीं । तरी हे बरी आयती केली ॥५५॥याचें सांग कारण । राजाचें असें भाषण ।ऐकोनी मुनी तत्क्षण । म्हणे कारण धेनू हे ॥५६॥ही म आझी होमधेनू । ही असे कामधेनू ।इची शक्ती काय वाणूं । जाण हे चिंतामणी ॥५७॥चिंतावें जें जें मनीं । तें तें पुरवी तत्क्षणीं ।इच्या प्रसादेंकरूनी । वनीं इच्छाभोजन देतों ॥५८॥राजा म्हणे नवनिधी । माझेपाशीं अष्ट सिद्धी ।असती समृद्धी । परी असी कामधेनू नाहीं ॥५९॥तरी आतां करी प्रसाद । पुरवी हा माझा छंद ।लागला मनीं वेध । कामधेनूपद घरीं असावें ॥६०॥देवूं हजारों गोधन । किंवा सुवर्णरत्नधन ।जें इच्छी तुझें मन । तें मी जाण देईन ॥६१॥अथवा देवूं राष्ट्र एक । किंवा सुवर्णरत्नधन ।हें ऐकोनी मुनी म्हणे ऐक । तूं विवेक आण मनीं ॥६२॥तुझा गुरु दत्तात्रेय । त्याचे चित्तीं चिंतीसी पाय ।त्यापुढें कायसी ही गाय । हा अन्याय करूं नको ॥६३॥जरी मी आप्तकाम । तरी नित्य देतों होम ।होमधेनू इचें नाम । करी होम इच्या दुग्धें ॥६४॥जा तूं आतां स्वनगरीं । विवेक धरी अंतरीं ।वेदविद्या असतां पदरीं । कोकशास्त्री कां रमावें ॥६५॥घरीं असतां सती स्वनारी । स्वाधीन वागे सुंदरी ।तिला सोडून रंडेवरी । दृष्टी करी तोची मूर्ख ॥६६॥काय करावें धन । कासया पाहिजे दासीजन ।कासया रत्न गोधन । कामधेनू दवडून हे ॥६७॥असा नानापरी । मुनी जरी बोध करी ।तो न घे अंतरीं । न निवारी दुर्वासना ॥६८॥हा शांत असे सुशील । धेनू नेतां काय करील ।येथें धन ठेवूनी विपुल । धेनू खुशाल न्यावी हे ॥६९॥ असा निर्धार करूनी । सेवकां बोलावूनी ।म्हणे हे धेनू सोडूनी । घेवूनी चला नगरांत ॥७०॥असें राजाचें वचन । ऐकतां ते सेवक जन ।त्या धेनूतें सोडून । नगरीं घेवून चालती ॥७१॥बहु धन गोधन । मुनिसन्निध ठेवून ।मुनीप्रती वंदून । नगरा अर्जुन चालिला ॥७२॥वत्स करी आक्रंदन । तिकडे न देई मन ।असा तो राजा अर्जुन । कठोर मन करी दैवें ॥७३॥ठेविलें जें धन गोधन । त्याचा अंगीकार न करून ।अथवा शापवचन । न बोले मन शमवूनी ॥७४॥न करी त्यावरी कोप । मनीं न मानी ताप ।म्हणे देतां शाप । तपोलोप होईल ॥७५॥हा असे धार्मिक । नेईना कां धेनू एक ।चित्तीं आणूनी विवेक । पुन: आणून देईल ॥७६॥असा विचार करूनी । शाप न देतां जमदग्नी ।शांती आणूनी मनीं । ध्यान लावूनी बैसला ॥७७॥तों इतुक्या अवसरीं । राम गेला होतां वनांतरीं ।तो फिरूनी आला घरीं । समिधा डोईवरी घेऊनिया ॥७८॥वत्स आक्रंदतसे । राम तिकडे पाहतसे ।म्हणे आज कां असें । ओरडतासे हा वत्स ॥७९॥बंधू म्हणती रामासी । राजा आला आश्रमासी ।राहविलें तयांसी । जेवावयासी प्रार्थिलें ॥८०॥मग सैन्यासहित राजासी । जेवविलें संतोषीं ।राजा पुसे मुनीसी । समृधी कसी ही झाली ॥८१॥मग मुनीनें सर्व सांगतां । राजा म्हणे हे धेनू द्या आतां ।मुनीनें नाहीं म्हणतां । बलात्कारें नेता झाला ॥८२॥असें ऐकतां भ्रातृवचन । राम कोपला तत्क्षण ।दिसे जसा ज्वलन । त्रैलोक्य दहन करितो कीं ॥८३॥पितयातें न पुसोन । राजावरी कोपोन ।म्हणे दुष्ट हा अर्जुन । याचें कंदन करीन मी ॥८४॥मला कोप आलिया । मी जाळीन त्रैलोक्या ।पराक्रमा माझीया । हा भूप नेणतो कीं ॥८५॥माझा को अनिवार । करीन ब्रह्मांडाचा संहार ।माझ्यापुढें काय सुरावर । समरीं धीर धरतील ॥८६॥आतां शम न घेईन मी । हा राजा असे कामी ।हा असे उन्मार्गगामी । याला कां मी न दंडावा ॥८७॥पहा हो माझें बळ । मी केवळ प्रळयानळ ।जाळीन क्षत्रियांचें कुळ । खळशिक्षक मी असें ॥८८॥ब्रह्मद्वेषी हा नृप । यावरी कां न करावा कोप ।याचें उदेलें पाप । म्हणोनी ताप दे हा द्विजा ॥८९॥दैव याचें कांहीं होतें । म्हणूनी शाप न दिधला तातें ।आतां तरी मीच यातें । यमसादनातें धाडितों ॥९०॥छेदीन त्याचे बाहु सकळ । संहारीन सर्व बळ ।जो असे महाखळ । त्याचें कुळ न ठेवावें ॥९१॥राम असें बोलूनी । तातालाही न पुसोनी ।हातीं परशु घेवून । त्वरा करूनी चालिला ॥९२॥गजांची श्रेणी पाहून । जसा धांवे पंचानन ।तसा राम गर्जून । त्वरा करूनी चालिला ॥९३॥जसा कां प्रळयकालीन । उठे सांवर्तक घन ।सहाय होतां पवन । करी गर्जना तयांपरी ॥९४॥आधींच रामाचा महाप्रताप । त्यांत उपजला कोप ।म्हणे केव्हां भेटेल भूप । मारीन कधीं तयासी ॥९५॥धांवे वायुप्रमाणें । पायीं भूमी द्णाणे ।भूपाचा प्राण घेणें । केला त्याणें हा निश्चय ॥९६॥ रामाचे त्वरित गती । मार्गी लोक चमकती ।म्हणती लोक कल्पांतीं । रुद्र मूर्ती असी धरी कीं ॥९७॥रामाला पाहून । तर्क करिती सर्व जन ।आज हा रुद्र अवतारून । जगाचें हनन करितो कीं ॥९८॥असा तो राम चाले । तों पुढें सैन्य देखिलें ।राम गर्जोनियां बोले । रे रे चोरा मागें फिर ॥९९॥तूं ठायींचा चोरटा । कुळा लाविला बट्टा ।आतां तुझ्या कंठा । छेदीन थट्टा हे नव्हे ॥१००॥असा गर्जना करून । येतां राम धांवून ।मागे वळोनी अर्जुन । पाहोनी भृगुनंदन आला म्हणे ॥१०१॥राजा म्हणे हा तेजस्वी । प्रतापी दिसतो जेवी रवी ।ही विष्णुमूर्ती असावी । मजवरी एर्हवीं कोण येईल ॥१०२॥मज असे वरदान । ख्यात्याधिक करील हनन ।हा असे ब्राह्मणनंदन । मजहून ख्यात्याधिक ॥१०३॥सरला प्रारब्धाचा खेळ । आला देहाचा अंतकाल ।म्हणूनी ब्रह्मस्वाची इच्छा केवळ । आज उपजली निश्चयें ॥१०४॥मी ब्रह्मण्य असून । घडलें हें धेनुहरण ।याला प्रारब्ध कारण । याला शरण रिघावें कीं ॥१०५॥जरी जावें याला शरण । तरी हा राखील प्राण ।मग कोणासी करूं रण । मग कोण मारील मज ॥१०६॥आज हा सुदिन । योग हा आला घडोन ।हा देह पडोन । जावो आतां निश्चयें ॥१०७॥असा विचार करून । जीवन्मुक्त तो अर्जुन ।सैन्य मागें फिरवून । रामा पाहून राहिला ॥१०८॥इति श्रीदत्तमाहात्म्ये विंशोsध्याय: ॥२०॥श्रीगुरुदेवदत्त ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP