मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य|
अध्याय ८ वा

श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ८ वा

श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य


श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
गुरु ह्मणे दीपकाप्रती । ऐसी अर्जुनें करितां विनंती ।
आश्वासूनि तयाप्रती । म्हणती तया योगिराज ॥१॥
आर्जुना तूं सात्विक । दैवी संपत्तीचा नायक ।
प्रारब्धवशें सकळिक । भोग भोगिले मद्वरें ॥२॥
माझ्या सेवेच्या योगानें हें । वैराग्य जाहलें आहे ।
आतां सत्वर पाहें । याच डोला मुक्तिसुख ॥३॥
आत्मस्वरूप जाणणें । तरी शास्त्रप्रमाण घेणें ।
शास्त्रांचें एक तत्व जाणणें । द्वैत न पाहणें सुविचारें ॥४॥
शस्त्रांचें तात्पर्य एक । असे सांगतों तें ऐक ।
एकदां देवनायक । गुरुदर्शंना पातला ॥५॥
दूरीं देखतां गुरुवर । पायीं चालोनि ये इंद्र ।
करी भावें नमस्कार । परमादर करूनि ॥६॥
गुरु बसवी तयसी । तो बैसोनि देखे शिष्यासी ।
झटले जे शास्त्राभ्यासीं । अन्य मानसीं न आणिती ॥७॥
कोणी लौकायत शास्त्र । कोणी पढती कामशास्त्र ।
कोणी शिल्प सौगतशास्त्र । न्यायशास्त्र कोणी पढती ॥८॥
तें ऐकोनि इंद्र पुसे । म्हणे गुरो काय हें असे ।
आपण पढवितां कसें । बंध येतसे ज्यायोगें ॥९॥
उपजतांची पूर्वाभ्यासें । विषयवासना होतसे ।
ती कामादिशास्त्राभ्यासें । बुडवितसे ठार नरकीं ॥१०॥
आधींच उल्हास । त्यांत पातला फाल्गुनमास ।
तसें क्षुद्रशास्त्रें ह्यांस । विषयाध्यास होईल ॥११॥
हे होत विषयाक्रांत । दु:शास्त्रीं करितां आसक्त ।
जेवी अंध कूपांत । लोटावे तसें हें वाटे ॥१२॥
मुळीं हे कामुक । हीं शास्त्रें अर्थात्मक ।
गुरु ह्मणे इंद्रा ऐक । मनीं कौतुक न मानी ॥१३॥
शास्त्रें न होती बाधक । सर्वांचें तात्पर्य एक ।
सात गथा सांगतों ऐक । मन नि:शंक होईल ॥१४॥
कापिल्यनगरीं शिल्पज्ञ । होता नामें विधिज्ञ ।
वास्तुशास्त्रीं अभिज्ञ । ज्याला प्राज्ञ मानिती ॥१५॥
क्षेत्रशुद्धि आय व्यय । जाणे शल्यज्ञानोपाय ।
विधिनें बांधी आलय । सुखालय केवळ तें ॥१६॥
तेणें बांधितां घर । त्यांत घडती निरंतर ।
धर्म उत्सव अध्वर । लोका ज्वर न येती ॥१७॥
त्याकरवीं लोक । घरें बांधविती सुरेख ।
त्या घरीं नित्य होय सुख । होती मख मंगलें ॥१८॥
तो विधिज्ञ प्रसिद्ध झाला । द्रव्य लाभे त्या कुशला ।
कधीं नेणे मिथ्या बोला । सर्वां भला वाटे तो ॥१९॥
जीं लोकांचीं घरें बांधी । तेथें नोहे आधिव्याधी ।
अपमृत्यु न ये कधीं । शास्त्राधारें घरें बांधितां ॥२०॥
तो मरोनी स्वर्गा गेला । सुख भोगोनी पुन: आला ।
भूमीवरी राजा झाला । पूर्वपुण्यबलानें तो ॥२१॥
प्रासाद देवालयें । बांधवी धर्मशाळा स्वयें ।
पूर्तेष्ट दत्त करितां ये । तया मृत्यु सुखानें ॥२२॥
पुन: स्वर्गीं जाऊन । दिव्य भोग भोगून ।
पुन: भूतळीं येऊन । विप्रकुळीं जन्मला ॥२३॥
कर्माची गती गहन । दुर्लभ हें नरजनन ।
सर्वेंद्रियानिधान । पुण्यवंता मिळे क्वचित् ॥२४॥
त्यांमध्यें विप्रजाती । मिळतां सायास होती ।
होनें विद्वान् सुमती । हें तो अतिपुण्यफळ ॥२५॥
जन्मा येतां ब्राह्मण । सूर्य करी गोदान ।
म्हणोनि थोर ब्राह्मण । करी उद्धरण लोकांचें ॥२६॥
तो शिल्पज्ञ पूर्वींचा । पुढें तया राजाचा ।
जन्म लाभला मग साचा । झाला विप्राचा पुत्र तो ॥२७॥
गर्भीं येतां गर्भाधानादि । क्रिया घडल्या यथाविधि ।
मातेला दु:ख न दे कधीं । सुवेळी सुधी जन्मला ॥२८॥
पिता त्याचें जातकर्म । करी प्रेमें दानधर्म ।
करोनियां नामकर्म । देवशर्मा म्हणती तया ॥२९॥
स्वरूपें सौम्य दिसत । प्रकृतीनें असे शांत ।
लोकांचीं मनें तो कांत । रमवी अश्रांत सुखी तो ॥३०॥
यथाकालीं चौल करून । केलें मौंजीबंधन ।
तो करी वेदाध्ययन । घालवीना मन खेळाकडे ॥३१॥
संध्यावंदन अग्निकार्या । करी गुरूची सपर्या ।
धर्में पाळी ब्रह्मचर्या । धरी औदार्या स्वभावें ॥३२॥
संहिता - पद - क्रम । अंगें शास्त्रें यथाक्रम ।
पढला ज्याला न हो भ्रम । सफळ श्रम तयाचे ॥३३॥
सार्थ विद्या मिळवून । व्रताचरण करून ।
गुरूला दक्षिणा देऊन । समावर्तन करी तो ॥३४॥
बुद्धिरूपशीलसंपन्न । पाहूनि कन्या कुलीन ।
तिशीं विवाह करून । गृह्याचरण करी तो ॥३५॥
वेदशास्त्रार्थतत्वज्ञ । करी नित्य पंचयज्ञ ।
विशेषत: जपयज्ञ । करी प्राज्ञ दैवयोगें ॥३६॥
स्मयीं स्नानसंध्यावंदन । होम जपयज्ञ पठन ।
करी गुरूशुश्रुषण । भगवद्भजन प्रेमभरें ॥३७॥
कर्मीं अभिमान न करी । फळाची इच्छा नच धरी ।
निर्ममत्वें वागे घरीं । उदासीनापरी सर्वथा ॥३८॥
आगंतुक साधन । करी यज्ञदानाध्ययन ।
प्रतिग्रह याजनाध्यापन । यांहीं जीवन करीतसे ॥३९॥
ईश्वरोद्देशें कर्म करितां । चित्ता ये शुद्धता ।
प्रतिग्रहा तो सोडी ज्ञाता । तपत्तेजहर्ता जो ॥४०॥
होतां ईश्वरीं आवडी । याजनाध्यापना सोडी ।
भिक्षेची धरी आवडी । सोडी गोडी विषयांची ॥४१॥
शम दम तप शौच । क्षांति आर्जव ज्ञान साच ।
आस्तिक्य विज्ञान हेंच । स्वाभाविक ब्रह्मकर्म ॥४२॥
हें प्रक्रुतिवशें मिळालें । कामादिक पळाले ।
मीपणही गळालें । उत्तरोत्तर विप्राचें ॥४३॥
कर्में झालें मन शुचि । श्रवणाची लागली रुचि ।
समाप्ति गृहस्थाश्रमाची । करूनि वनीं रहिला ॥४४॥
शीतोष्ण सहन करी । ध्याननिष्ठ अंतरीं ।
श्रीहरीचें चिंतन करीं । न धरी योगक्षेमवांच्छा ॥४५॥
असा महाव्रत होवोनी । सर्वसंन्यास करूनि ।
गुरूपदिष्टचिंतनीं । निशिदिनीं निमग्न हो ॥४६॥
असा महाव्रत होवोनी । सर्वसंन्यास करूनि ।
श्रवणें विपरीत भावना । निमाल्या मनापासून ॥४७॥
करूनियां योग । केला प्रतिबंधभंग ।
वासनाक्षय मनोभंग । ज्ञानयोग मिळवी जो ॥४८॥
बोध वैराग्य उपरती । पूर्णपणें जेथें वसती ।
त्यालागीं किंकरी मुक्ती । हे उक्ति सत्य असे ॥४९॥
असा जीवन्मुक्त । विप्र झाला ईशभक्त ।
प्रारब्ध भोगूनि असक्त । विदेहमुक्त झाला तो ॥५०॥
शास्त्र तें शासन करी । ईशवाक्य तें हो कां क्षुद्र जरी ।
विश्वास ठेविता त्यावरी । ये गति बरी अनुक्रमें ॥५१॥
शिल्पशास्त्रविधीनें । वागतां विधिज्ञानें ।
गति अनुक्रमानें । घेतली योगानें दुर्लभ जी ॥५२॥
ही एक गाथा अशी । दुसरीही असे तशी ।
गुरु सांगे इंद्राशी । दत्त ह्मणे अर्जुना ऐक ॥५३॥
नर्मदेच्या तीरीं । माहिष्मती नगरी ।
द्विज एक अवधारी । गीत वादित्रीं रत असे ॥५४॥
तो स्वरूपें सुंदर । असे कवी उदार ।
पूर्ण जाणे कामशास्त्र । धुंडे सुंदर नारीतें ॥५५॥
मिळावी सुलक्षणा पद्मिनी । हें चित्तीं ठेवूनि ।
पातला राजसदनीं । रायें वंदूनि पूजिला ॥५६॥
राजा ह्मणे विप्रासी । काय इच्छा मानसीं ।
विप्र ह्मणे रायासी । शास्त्रोक्त नारी धुंडितों ॥५७॥
जाणें मी कामशास्त्र । तसेंच सामुद्रिक शास्त्र ।
नारी मिळावी पवित्र । शास्त्रयुक्त लक्षणांची ॥५८॥
ऐकून त्याचें वचन । रायें तया स्वकन्यारत्न ।
दाविलें तें पाहून । मोहित होवोनि तो पडला ॥५९॥
शास्त्रोक्त सर्व लक्षणें । पाहतां पीडिला कामबाणें ।
सावध होवोनि क्षणें । यथेष्ट वीक्षणें पाहिली ॥६०॥
मुख पाहतां विप्राचें । भुललें मन कन्येचें ।
हार्द जाणोनि दोघांचें । राजाचें मन सुखावलें ॥६१॥
राजा म्हणे हा सुपात्र । विप्र असे पवित्र ।
मीही असें अपुत्र । हा घरजांवई करावा ॥६२॥
विप्र कन्येसी पाहून । राहिला मोहित होऊन ।
कन्येंचेंही अंत:करण । रंगलें याहून काय पाहूं ॥६३॥
जरी हा असे निर्धन । याला द्यावेम राज्यार्धदान ।
असा विचार करून । मुहूर्त पाहूनि लग्न करी ॥६४॥
ब्राह्मविधीनें कन्यादान । दिलें राज्यार्ध आंदण ।
केला उत्सव सोळा दिन । जांवई ठेवून घेतला ॥६५॥
चक्रवाकासमान । परस्पर प्रेमबंधन ।
झालें तयांचें अनुदिन । आनंदनिमग्न होती ते ॥६६॥
वाचे मना अगोचर । तें सुख आत्यंतिक पर ।
आत्मस्वरूप तें वर । नित्य निरतिशय जें ॥६७॥
मनुष्यानंदाहूनि । उत्तरोत्तर शतगुणी ।
ब्रह्मसुखांत जीं तयाहूनि । शतगुणीं आत्मसुख ॥६८॥
रत्यारूढ तेंची पूर्ण । कामशास्त्रीं जो विचक्षण ।
जाणे ब्रह्मसुखाचें लक्षण । तो घे पूर्णपणें तें ॥६९॥
पामरें भोगितां नारी । सोपाधिक सुख घेतो अंतरीं ।
नित्य निरतिशय सुखाची सरी । मैथुनांतरी त्या द्यावीकीं ॥७०॥
शास्त्र नेणे तया स्पष्ट । स्पर्धासूयादि दुष्ट ।
रतिसुख जाणे स्पष्ट । मानी प्रेष्ठ तत्वज्ञ ॥७१॥
मैथुनांतीं शयनांतीं । जी बाणे पूर्णस्थिति ।
ती सदैव जे पाळिती । जीवन्मुक्ति तयां हातीं ॥७२॥
हें नेणे तो पामर । धरीं संसार अनिवार ।
विषयासक्ति निरंतर । करी पराड्मुखपणें ॥७३॥
असा तो ब्राम्हण । कामशास्त्रप्रवीण ।
रत्युपाधीनें जाणून । ब्रह्मांनंदीं निमाला ॥७४॥
राजकन्या हृष्ट झाली । विप्रचरणीं रमली ।
कधींही दृष्टि आपुली । अन्यत्र न घाली क्षणमपि ॥७५॥
धरोनि पतीची चित्तवृत्ती । रमे राजकन्या सती ।
मानी परब्रह्म पती । ती सुमती धन्य हो ॥७६॥
दोघांनीं न केलें पातक । स्वप्नींही न देखिलें दु:ख्ह ।
परस्पर भोगूनि सुख । राहती एकमनेंसी ॥७७॥
यथायोग्य पाळिती धर्म । जो असे गृहाश्रम ।
तदनुगुणें करिती कर्म । परब्रह्मनर्म ज्याचें ॥७८॥
जें सुख देव नेणती । तें सुख ते अनुभवी ।
सुखें मरोनी ते अंतीं । दोघेंही जाती गंधर्वलोकीं ॥७९॥
तेथेंही दंपती होऊन । होती नादब्रह्मलीन ।
गीतवाद्यताननिपुण । गंधर्वगण मान्य झाले ॥८०॥
एके दिनीं हिमाचळीं । ते स्वच्छंद गाती त्या वेळीं ।
गाणें ऐकूनि चंद्रमौळी । तयांजवळी पातला ॥८१॥
गाणें मंजुळस्वर । तालासह सप्तस्वर ।
बावीस श्रुति धरिता उर । तान बरोबर एकुणपन्नास ॥८२॥
रागांसह रागिणी । विरामारह दावितां त्यांनीं ।
हर्षा न पुरे धरणी । शिवाचे श्रवणीं भरे तें ॥८३॥
गीतरागे हराचें मन । त्यांणीं हरितां सोडून ध्यान ।
हर बोले होऊनि प्रसन्न । कर उचलून प्रेमानें ॥८४॥
तुह्मी सुशिक्ष्य उत्तम । तुमचें गाणें मनोरम ।
यापुढें काय साम । आनंदधाम हें गाणें ॥८५॥
जैसें तुह्मीं गाइलें । ऐसें अद्यापि न ऐकिलें ।
माझें मन पूर्ण धालें । ऐकतां भलें गाणें हें ॥८६॥
तुम्हां न होईल त्रास । तुम्हां देतों स्वर्गवास ।
तेथें रमवूनि देवांस । करा निवास आनंदें ॥८७॥
असें म्हणोनि शंकरें । विमानीं बैसवोनि त्वरें ।
तयां मानपुर:सरें । स्वर्गावरी पाठविलें ॥८८॥
त्यांचीं गाणीं ऐकूनि । किन्नर किन्नरी जाती भुलोनि ।
गंधर्वहि ऐकोनि । चकित होऊनि राहती ॥८९॥
ऐसा तो ब्राह्मण । स्वर्गीं देवगंधर्वाहून ।
मान्य झाला अनुदिन । आनंदलीनमानस ॥९०॥
कालांतरीं एके दिनीं । उत्सव झाला ब्रह्मभुवनीं ।
तेथें गंधर्वं बोलावूनि । आणिले असती अनेक ॥९१॥
जो हा पूर्वींचा ब्राह्मण । गंधर्व झाला जाण ।
त्यालाही देवगण । घेऊनि आले ब्रह्मलोकीं ॥९२॥
मृदंगादि आनन्द वाद्यें । वीणादिक तंतुवाद्यें ।
मुरलीप्रमुख सुषिर वाद्यें । वाजती घनवाद्यें तालादिक ॥९३॥
अप्सरा कौशल्यें नाचती । हाव भाव कळा दाविती ।
गंधर्व प्रेमभरें गाती । आनंदविती देवांसी ॥९४॥
सर्वांमध्यें विस्पष्ट । ब्राह्मणाचा स्वर उत्कृष्ट ।
सर्वांचें चित्त करी हृष्ट । झाला संतुष्ट ब्रह्मदेव ॥९५॥
सर्व गंधर्वां वारूसि । त्या दोघां पुढें बैसवूनि ।
ब्रह्मा ऐके चित्त देऊनि । त्यांचीं गाणीं मनोरम ॥९६॥
ऐकतां ज्यांचें गाणें । साक्षात् ब्रह्मानंद होणें ।
संतोषूनि ब्रह्मा म्हणे । धन्य जिणें तुमचें हें ॥९७॥
नादब्रह्मात्म तत्व जें । ज्यासमान नाहीं दुजें ।
म्हणूनि सर्वोत्तम जें । तें उमजे हा एक ॥९८॥
विलक्षण ह्याचा आनंद । दुसर्‍या देई परमानंद ।
केवळ ब्रह्मरसास्वाद । सर्व खेद वारी जो ॥९९॥
याचा नित्य निवास । ब्रह्मलोकीं व्हावा खास ।
आतां स्त्रियेसह ह्यास । माझे जवळी ठेवितों ॥१००॥
ऐसें ब्रह्मा बोलून । सुप्रसन्न होऊन ।
तया दे स्वसन्निधान । प्रेमें मानपुर:सर ॥१०१॥
ऐसा तो ब्राह्मण । कामशास्त्रप्रवीण ।
पुढें गंधर्व होऊन । ब्रह्मलोकीं राहिला ॥१०२॥
कृतोपासकां जी गति । ती आली तया पुढती ।
तेणें घेतली क्रममुक्ति । पुनरावृत्ति न हो तया ॥१०३॥
ज्यांचें अपक्क ज्ञान । ते ब्रह्मलोकीं येऊन ।
तेथें श्रवणादि करून । क्रमें निर्वाण पावती ॥१०४॥
जे केवळ पुण्येंकरून । ब्रह्मलोकीं येऊन ।
राहती तयां ये पतन । पुण्य भोगून सरतांचीं ॥१०५॥
गुरु म्हणे इंद्रा ऐक । कामशास्त्रनिश्चायक ।
तो ब्राह्मण सस्त्रीक । ब्रह्मलोकवासी झाला ॥१०६॥
तो क्रममुक्तीचा अधिकारी । जाहला असे जो यापरी ।
शास्त्रतत्व निर्धारी । क्रमें चारी मुक्ति घेतो ॥१०७॥
श्रीदत्त म्हणे अर्जुना । द्वितीय गाथा ऐकून देवराणा ।
पावोनियां समाधाना । तृतीयोदाहरन पुसतसे ॥१०८॥
इति श्रीमत्परमहंसवासुदेवसरस्वतीविरचिते श्रीदत्तमाहात्म्ये अष्टमोsध्याय: श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP