मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३१ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३१ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३१ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः॥ जनमेजय बोले सुखसंपन्ना ॥ वैशंपायना परम सज्ञाना ॥ भारतकथारस श्रवणा ॥ सुरस लागे तुझे मुखें ॥१॥करुनि तीर्थयात्रा समग्र ॥ द्वैतवना आले पंडुकुमार ॥ यावरी खल धार्तराष्ट्र ॥ काय करिते जाहले ॥२॥मग बोले वैशंपायन ॥ एकत्र होऊनि दुर्जन ॥ दुर्योधन दुःशासन शकुनि कर्ण ॥ विचा करिती एकांतीं ॥३॥आलीं द्वादश वर्षे भरत ॥ तेराव्यांत पांडव होती गुप्त ॥ पुढें युद्ध होईल प्राप्त ॥ अति अनर्थ दिसतो पैं ॥४॥स्वर्गीहूनि विद्या अद्भुत ॥ शिकोनि आला अभिमन्युतात ॥ समरांगणी कृतान्त ॥ युद्ध करुं न शकेचि ॥५॥प्रसन्न करुनि व्योमकेश ॥ अस्त्रविद्या शिकला निःशेष ॥ तैसीज वासवें निर्दोष ॥ विद्या तयासी समर्पिली ॥६॥लोकपाल प्रसन्न सर्व ॥ विद्या दिधली अपूर्व ॥ निःशेष पुशिला ठाव ॥ निवातकवच दैत्यांचा ॥७॥शकुनि म्हणे वनांत ॥ ते जों निजसुरे आहेत ॥ रात्रीं जाऊनि अकस्मात ॥ करावा घात पांचांचा ॥८॥दंदशूक जों निद्रित जाण ॥ मुख ठेंचावें घालूनि पाषाण ॥ विषवल्ली जों आहे लहान ॥ तों उपटून टाकावी ॥९॥गोधनें पाहावया नयनीं ॥ घोषयात्रेचें मिष करुनी ॥ गोष्टी न फुटतां द्वैतवनीं ॥ रजनीमाजी वधावी ॥१०॥आणि आपुली वैभवसंपत्ती ॥ चतुरंग दळ न माये जगतीं ॥ हें दाखवावें पांडवांप्रती ॥ पाहोनि होती अधोवदन ॥११॥दरिद्री वनांत पांडव ॥ वैभव त्यांसी दावूं सर्व ॥ आमुची श्री देखोनि गर्व ॥ हरेल त्यांचा निश्चयें ॥१२॥उदय पावतां वासरमणी ॥ उडुगणें लपती गगनीं ॥ दृष्टीं देखतां महामणी ॥ मग गारांसी कोण पुसे ॥१३॥मृगेंद्र आला ऐकोन ॥ वारण सोडिती तत्काल प्राण ॥ तैसे पांडव आम्हां देखोन ॥ निस्तेज होती तत्त्वतां ॥१४॥फावलें तरी टाकावे वधून ॥ नाहीं तरी वैभवबळ दाखवून ॥ यावें सवेंचि परतोन ॥ राष्ट्र आपुलें विलोकीत ॥१५॥ऐसें बोलतां शकुनी ॥ दुर्योधन आनंदला मनीं ॥ श्वान जैसें वांति देखोनी ॥ परम आवेशें धांवत ॥१६॥शिंदीवन देखतां बहुत ॥ मद्यपी जैसा आनंदत ॥ कीं जारासी अवचित प्राप्त ॥ मल्याळदेश जाहला ॥१७॥मनांत ऐसी उपजे हौस ॥ कीं शंख करावा बहुवस ॥ तों आला फाल्गुनमास ॥ गगनीं हर्ष न समाये ॥१८॥तैसें शकुनीचें वचन ॥ ऐकोनि तोषे दुर्योधन ॥ मग अंधाप्रति येऊन ॥ पुसता जाहला तेधवां ॥१९॥म्हणे घोषयात्रा करुन ॥ आपुलें राष्ट्र पाहोन ॥ मृगया करीत द्वैतवन ॥ येऊं पाहोन तैसेचि ॥२०॥वृद्ध म्हणे पांच पांडव ॥ द्वैतकाननींचे कंठीरव ॥ तुम्ही इभ तेथें सर्व ॥ आपुलें वैभव दावूं जातां ॥२१॥जागे न करावे निद्रित व्याघ्र ॥ चेतवूं नये महाविखार ॥ तरी तुम्ही जाऊनि सत्वर ॥ घोषयात्रा करुनि येइजे ॥२२॥देवव्रत भारद्वाज शारद्वत ॥ विदुर आणि शारद्वतीसुत ॥ यांसी कळों नेदितां मात ॥ सेनेसहित निघाले ॥२३॥विदुरासी समजलें ते क्षणीं ॥ दुर्जन चालिले सेना घेऊनी ॥ परी तो गजबजला नाहीं मनीं ॥ म्हणे यांचेनें काय होतें ॥२४॥रुक्मिणीनयनाज्बविकासमित्र ॥ पाठीसी असतां पांडवमित्र ॥ काय करिती दुर्जन अमित्र ॥ दुःखासी पात्र होती ॥२५॥जो निजजनहृदयारविंदमिलिंद ॥ जगदंकुरमूलकंद ॥ तो पाठीसी असतां ब्रह्मानंद ॥ पांडवांअधीन सर्वदा ॥२६॥असो इकडे कौरवभार ॥ घोषप्रदेशीं होऊनि स्थिर ॥ घारोष्ण पय पवित्र ॥ प्राशन करिती यथेच्छ ॥२७॥एक तृप्त होती दधि सेवून ॥ एक करिती मद्यपान ॥ एकमेकांसी आग्रह करुन ॥ पाजून मत्त जाहले ॥२८॥तुच्छ म्हणती सुधारस ॥ त्याहूनि मद्यपान विशेष ॥ नाना फळें भाजूनि सुरस ॥ बहु विलास दाविती ॥२९॥यावरी ते दुष्ट सकळी ॥ आले द्वैतारण्याजवळी ॥ ज्या वनीं केळी नारळी ॥ कर्पूरकदली डोलती ॥३०॥कृष्णागर मलयागर चंदन ॥ सुवासें भरलेंसे गगन ॥ जैसे सज्जनांचे गुण ॥ न सांगतां प्रकटती ॥३१॥खर्जुर कदंब रातांजन ॥ अंजीर औदुंबर सीताफळ जाण ॥ आम्रवृक्ष भेदिती गगन ॥ सूर्यकिरण माजी न पडे ॥३२॥जेथें वसे सदा धर्म ॥ धर्म तेथें सुख परम ॥ सुख तेथें आराम ॥ सहज होय सकलांतें ॥३३॥आराम तेथें वसती संत ॥ संत तेथें आनंद बहुत ॥ आनंद तेथें भगवंत ॥ सदा रक्षीत उभा असे ॥३४॥घाला घालूं चालले रजनींत ॥ हें जाणोनि निर्जरनाथ ॥ गंधर्वपतीस प्रेरीत ॥ कुंतीसुत रक्षावया ॥३५॥मदें धांवत कौरवभार ॥ तों वाटे रमणीक सरोवर ॥ गंधर्वराज सहपरिवार ॥ चित्रसेन क्रीडे तेथें ॥३६॥दूत धांवती उन्मत्त ॥ गंधर्वांसी तंव बोलत ॥ कोण तस्कर तुम्ही येथ ॥ सोडा पंथ सत्वर ॥३७॥दुर्योधन गजबज ऐकोन ॥ दूतांसी देई पुढें पाठवून ॥ म्हणे मार्गावरी आहेत कोण ॥ त्यांसी ताडन करुनि काढा ॥३८॥दूत धांविन्नले उन्मत्त ॥ गंधर्वांसी तवकें बोलत ॥ कोण रे तस्कर तुम्ही जेथ ॥ सोडा पंथ रायातें ॥३९॥गंधर्व पुसती राव कोण ॥ ते म्हणती पृथ्वीपति दुर्योधन ॥ लवकर उठावें इथून ॥ घेऊनि प्राण पळा वेगें ॥४०॥गंधर्वीं ऐसें ऐकोन ॥ दूतांसी केलें बहु ताडन ॥ जैसीं बिडालकें धरुन ॥ महाकुंजरें मर्दिली ॥४१॥दूत म्हणोनि सोडिले जीवंत ॥ माघारे आले धांवत ॥ अहीचे कवेंतूनि अकस्मात ॥ मूषक जैसे पळाले ॥४२॥दोहीं हस्तीं शंख करीत ॥ सुयोधना सांगती वृत्तान्त ॥ पर्वततुल्य अद्भुत ॥ गंधर्व पुढे बैसले ॥४३॥आम्हीं प्रताप वर्णितां तुझा ॥ त्यांहीं केली आमुची पूजा ॥ ऐसें ऐकतां अंधतनुजा ॥ क्रोध अद्भुत नाटोपे ॥४४॥निजभारेंशीं ते अवसरीं ॥ दुर्योधन धांवे गंधर्वांवरी ॥ जैसे वृषभ सिंहाचे दरी ॥ माजी जाऊनि चवतालले ॥४५॥गंधर्वांसहित चित्रसेन ॥ सरसावला युद्धालागून ॥ बाणवृष्टि करुन ॥ कौरवसैन्य खिळियेलें ॥४६॥चित्रसेनपंचाननापुढें ॥ कर्ण सुयोधन जंबुक बापुडे ॥ मोहनास्त्र घालूनि वेडे ॥ केले सर्व एकदांचि ॥४७॥रथ तुरंग चाप तूणीर ॥ क्षणांत कर्णाचे केले चूर ॥ सुयोधनाचा ॥ स्यंदन सत्वर ॥ तिलप्राय केला हो ॥४८॥एकएका कौरवाप्रती ॥ दश दश गंधर्व धरिती ॥ सुयोधना धरुनि बहुतीं ॥ हस्त माघारे बांधिले ॥४९॥कर्ण पळे सत्वर ॥ घेतलें घोर कांतार ॥ मागें पुढें पाहे भयातुर ॥ चरणीं धांवों लागला ॥५०॥यजमान परम संकटीं पडे ॥ देखोनि आश्रित पळती चहूंकडे ॥ तैसे दुर्योधनाचे वीर गाढे ॥ पळूनि गेले अष्टदिशां ॥५१॥कित्येकीं शस्त्रें सांडून ॥ आडमार्गे घेतलें रान ॥ नाना सोंगें घेऊन ॥ पळते जाहले तेधवां ॥५२॥द्वैतारण्यांत धांवोन ॥ गेले कित्येक सेवक प्रधान ॥ धर्मराजासी वर्तमान ॥ सांगती रडोन ते वेळां ॥५३॥म्हणती भीमार्जुना शस्त्रें घ्यावीं ॥ तुमचे बंधू नेले गंधर्वीं ॥ ऐकोनि हास्य केलें सर्वीं ॥ द्रौपदीधौम्यांसमवेत ॥५४॥वृकोदर बोले स्पष्ट ॥ जेथें वसेकौटिल्य कपट ॥ तेथें ईश्वर करील तळपट ॥ अन्यायवाट देखतां ॥५५॥आमुचा करावय वध ॥ येत होते होऊनि सिद्ध ॥ सिंधुजाहृदयारविंदामिलिंद ॥ तेणें विपरींत केलें हें ॥५६॥वैशंपायन गर्जोनि बोलत ॥ कृष्ण भक्तांचे जे विरुद्ध करीत ॥ त्यांसी गति हेचि प्राप्त ॥ होय निश्चयें जाणिजे ॥५७॥साधुसंत गोब्राह्मण ॥ यांचा घात चिंतितां दुर्जन ॥ विघ्नसमुदाय दारुण ॥ तयांवरी रिचवती ॥५८॥श्रोतयांसी म्हणे श्रीधर ॥ सर्वांसी विनवितों जोडूनि कर ॥ भगवद्भक्तांशीं अणुमात्र ॥ द्वेष सहसा करुं नका ॥५९॥अजातशत्रु युधिष्ठिर ॥ सकळ जीवांचें माहेर ॥ शत्रूंचाही हितकर ॥ जो उदार सर्वस्वें ॥६०॥शांतिवैरागरींचा हिरा प्रत्यक्ष ॥ वैराग्यवनींचा कल्पवृक्ष ॥ सर्वदा कमलपत्राक्ष ॥ अंतर्बाह्म रक्षी तया ॥६१॥जो विवेकरत्नांचा किरीट ॥ ज्ञानमंदाकिनीचा लोट ॥ जो स्वप्नींही नेणे कपट ॥ तो धर्मराज धर्मात्मा ॥६२॥क्षमावनींचे निधान ॥ कीं सदयतेंचें उद्यान ॥ लक्षूनियां भीमार्जुन ॥ आज्ञा जाण करीतसे ॥६३॥आम्ही पांच ते एकशत ॥ मिळोनि बंधू समस्त॥ त्यांसी गंधर्व धरुनि नेत ॥ पहावें विपरीत कैसें हें ॥६४॥त्यांसी आम्हां राज्यसंबंध ॥ म्हणोनि पडलें विरुद्ध ॥ आणिकें करितां त्यांसी बंध ॥ आम्ही अवश्य धांवावें ॥६५॥तरी तुम्ही लवकर धांवा ॥ शत्रु उपकार करोनि रक्षावा ॥ यशध्वज उभारावा ॥ कौरवांसी सोडवूनि ॥६६॥मग बोले फाल्गुन ॥ आम्हांसी तों आज्ञा प्रमाण ॥ सिद्ध करोनि चार्ही स्यंदन ॥ चौघे जण निघाले ॥६७॥भीमार्जुन नकुल सहदेव ॥ समीरापरी घेती धांव ॥ तों गंधर्वी कौरव ॥ बांधोनि नेले अंतरिक्षीं ॥६८॥वृषभ बांधिले दावणीं ॥ कीं ते तस्कर धरिले वनीं ॥ तैसा दीनमुख दुर्योधन नयनीं ॥ मागें पुढें विलोकी ॥६९॥कृतांताचे मनीं बैसे दचक ॥ तैसी भीमें फोडिली हांक ॥ तो नाद ऐकतां देख ॥ गंधर्वचक्र कंपित जाहलें ॥७०॥म्हणती काय आले काळ ॥ कीं उतरले लोकपाळ ॥ तों अमर्याद शरजाळ ॥ भीमार्जुन सोडिती ॥७१॥पांडव आले देखोन ॥ खालतें पाहती अंधनंदन ॥ परम निर्दय दुर्जन ॥ म्लानवदन जाहले ॥७२॥गंधर्व बोलती परतोन ॥ कां करितां युद्धकंदन ॥ पार्थ म्हणे बंधू धरुन ॥ काय कारण न्यावया ॥७३॥तुम्ही गंधर्व तस्कर ॥ शरजाळें करुं पसरुन ॥ काननामाजी विचरती ॥७५॥शर वर्ष चित्रसेन ॥ परी ते न गणिती पंडुनंदन ॥ जैसे अबलांचे बोल रसहीन ॥ विद्वज्जन न मानिती ॥७६॥गारा पडती एकसरें ॥ तैसीं पडती गंधर्वशिरें ॥ मग पृथेचे तृतीयपुत्रें ॥ संहारास्त्र सोडिलें ॥७७॥मग चित्रसेन पुढें होऊन ॥ म्हणे पार्था तूं माझा मित्र प्राण ॥ तरी हें अस्त्र आवरुन ॥ घेईं मागुती तुझें तूं ॥७८॥ऐसें वचन ऐकूनि मागुतें ॥ अस्त्र आवरिलें वीर पार्थे ॥ मग भेटले चित्रसेनातें ॥ चौघे बंधू तेधवां ॥७९॥चित्रसेन म्हणे अंधकुमार ॥ महाकपटी दुराचार ॥ यांचा कां घेसी कैवार ॥ शिक्षा साचार योग्य यांसी ॥८०॥त्रिदशेश्वरें आज्ञा करुन ॥ आणविलें यांसी धरुन ॥ हे तुम्हांसी वधावयालागून ॥ येत होते रजनींत ॥८१॥हे घातकी तस्कर दुर्जन ॥ यांची खंडावीं नासिकें कर चरण ॥ अथवा शिरें छेदून ॥ आतांचि टाकीन तवाज्ञें ॥८२॥पार्थ म्हणे धर्माज्ञा ॥ अलोट आम्हांसी सर्वज्ञा ॥ मग पांडव आणि गंधर्वसेना ॥ धर्मापाशीं पातलीं ॥८३॥कौरव बांधिले आकर्षून ॥ उभे केले पुढें नेऊन ॥ श्रीकृष्णभगिनी येऊन ॥ पाहती जाहली कौतुकें ॥८४॥हांसोनि पांचाली बोले ॥ बरेच गंधर्वीं कौरव पूजिले ॥ दुर्योधन दुःशासन ते वेळे ॥ अधोवदन पाहती ॥८५॥धर्म म्हणे सोडा सत्वर ॥ बंधू कष्टी जाहले समग्र ॥ तें कौतुक ऋषीश्वर ॥ भोंवताले विलोकिती ॥८६॥गंधर्वीं दिधले सोडून ॥ धर्मरायाची आज्ञा घेऊन ॥ स्वर्गीं गेला चित्रसेन ॥ निजविमानीं बैसोनियां ॥८७॥पांडवकरें गंधर्व ॥ पडले होते ते सर्व ॥ उठविता जाहला वासव ॥ सुधावृष्टि करोनियां ॥८८॥इकडे दुर्योधनासी म्हणे धर्म ॥ हें कां तुज आठवलें कर्म ॥ तस्करविद्येनें श्रम ॥ पावलासी फार तूं ॥८९॥तूं जन्मोनि कुरुवंशीं ॥ निंद्य कर्म आचारलासी ॥ नकुलसहदेवां द्रौपदीसी ॥ हास्य नावरे तेधवां ॥९०॥पार्थ म्हणे समरीं येऊन ॥ युद्ध करावें होतें निर्वाण ॥ नीच कर्म आचरोन ॥ डाग लाविला कुलासी ॥९१॥भीम दुःशासनासी म्हणत ॥ जय पावलां तुम्ही समस्त ॥ आतां वाद्यें वाजवीत ॥ गजपुरांत मिरवावें ॥९२॥दुर्योधन म्हणे धर्मराया ॥ आज्ञा देई गुणालया ॥ युधिष्ठिर आलिंगूनियां ॥ समाधान करी तेधवां ॥९३॥बंधूंसह दुर्योंधन ॥ चालिला धर्मासी पुसोन ॥ अपमानें अधोवदन ॥ चरणचालीं जातसें ॥९५॥मनांत भावी दुरोधन ॥ शत्रूंनी सोडविलें धांवोन ॥ आतां काय व्यर्थ वांचून ॥ द्यावा प्राण विष घेऊनि ॥९६॥जरी गंधर्व नेते बांधोन ॥ आमुचीं शिरें टाकिते छेदून ॥ तरी बरें होतें जाण ॥ त्याहूनि अपमान हा वाटे ॥९७॥मी तप करीन दारुण ॥ पांडवांचा घ्यावया प्राण ॥ अथवा देशांतर सेवीन ॥ काय वदन दावूं लोकां ॥९८॥दुर्जनासी करितां उपकार ॥ तो तत्काल मानी अपकार ॥ पयःपानें विखार ॥ आपुला गुण टाकीना ॥९९॥षोडशोपचारें पूजिला कृशान ॥ तरी पोळाया न करी अनमान ॥ दुर्जनाचें हित करितां पूर्ण ॥ पडे परतोन दुरात्मा ॥१००॥असो मागीं मिळाला परिवार ॥ भेटे येऊनि सूर्यपुत्र ॥ समाधान करिती सर्वत्र ॥ दुर्योधनाचें तेधवां ॥१०१॥लाभ मृत्यु आणि भय ॥ काळेंकरुनि होय जाय ॥ त्याचा खेद मानूनि काय ॥ धैर्य पुढती धरावें ॥१०२॥काया आहे जंव जीवंत ॥ तंव न सोडावा पुरुषार्थ ॥ उद्यां जिकूं पंडुसुत ॥ एकछत्री राज्य करुं ॥१०३॥मग बोले दुर्योधन ॥ विदुर भीष्म द्रौणी द्रोण ॥ यांसी काय दावूं वदन ॥ सेवीन कानन यावरी ॥१०४॥परम कांतार घोरांदर ॥ लक्षोनि एक सरोवर ॥ ते दिवशीं राहिले धार्तराष्ट्र ॥ भोजन शयन नाठवे ॥१०५॥दुर्योधन चिंताग्रस्त ॥ भूमीवरी शयन करीत ॥ दुःखनिद्रा अति लोटत ॥ तंव अद्भुत वर्तलें ॥१०६॥पाताळीं जे दैत्य समस्त । दुर्योधनाचा जाणोनि वृत्तान्त ॥ कृत्या एक अकस्मात ॥ त्यांणीं तेथें पाठविली ॥१०७॥तिणें येऊनि ते वेळां ॥ दुर्योधन नेला पाताळ ॥ भेटला दैत्यां सकळां ॥ सांगे वर्तला वृत्तान्त ॥१०८॥दुर्योधनाचें समाधान ॥ करिती सर्व दैत्य मिळोन ॥ अंधपुत्र करी रोदन ॥ म्हणे मी न जाईं गजपुरा ॥१०९॥भीष्म द्रोण शारद्वत ॥ यांचें पांडवांकडे चित्त ॥ आम्हां गंधर्वीं नेलें हे मात ॥ तयांलागीं समजेल ॥११०॥पांडवीं सोडविलें पाहें ॥ हें दुःख त्रिभुवनीं न माये ॥ पृथ्वीचे सर्व नृपवर्य ॥ हांसतील मज देखतां ॥१११॥दैत्य म्हणती ऐकें वचन ॥ शारद्वत भीष्म द्रोण ॥ यांचे अंगीं संचरोन ॥ पांडवसेना संहारुं ॥११२॥ऐसें करुनि समाधान ॥ पूर्वस्थला घालविला नेऊन ॥ दुर्योधन जागा होऊन ॥ सांगे स्वप्न कर्णातें ॥११३॥मग कर्ण म्हणे युद्धांत ॥ तुज जय होईल अत्यंत ॥ मग वाहनीं बैसोनि समस्त ॥ गजपुराप्रति पावले ॥११४॥सकल वाद्यें राहवून ॥ ग्रामांत प्रवेशे अधोवदन ॥ भीष्म विदुर आणि द्रोण ॥ वर्तमान कळलें त्यांस हें ॥११५॥पांडवां रक्षक वैकुंठनाथ ॥ त्यांसी कोण करील विपरीत ॥ ब्रह्मानंदें पंडुसुत ॥ द्वैतारण्यीं विचरती ॥११६॥इकडे कर्णे दिग्विजय करुन ॥ द्रव्य आणिलें मेळवून ॥ सकल राजे बोलावून ॥ महायज्ञ आरंभिला ॥११७॥मनीं योजिली कुटिल युक्ती ॥ बोलावूं पाठविलें पांडवांप्रती ॥ द्यूत खेळूनि मागुती ॥ वनवासा पाठवावें ॥११८॥कीं त्रयोदश वर्ष भरल्याविण ॥ केवीं ग्रामांत बैसलां येऊन ॥ ह्या गोष्टीचें दूषण लावून ॥ पुन्हां वनवासा योजावा ॥११९॥पांडवाप्रति गेले दूत ॥ म्हणती यागासी चला समस्त ॥ धर्मराज हांसोनि बोलत ॥ आम्ही तेथें न येऊं कदा ॥१२०॥त्रयोदश वर्षे होतां पूर्ण ॥ येऊं बोलाविल्याविण ॥ असो समाप्त जाहला यज्ञ ॥ दुर्जनांचा गजपुरीं ॥१२१॥इकडे द्वैतारण्यांत ॥ मृगयेसी गेले पंडुसुत ॥ दौपदी एकली आश्रमांत ॥ तों कौतुक एक वर्तलें ॥१२२॥सेनेसह जयद्रथ ॥ शाल्वदेशीं लग्ना जात ॥ वाटे चालतां अकस्मात ॥ पांचाळी दृष्टीं देखिली ॥१२३॥जी स्वरुपाची पूर्णसीमा ॥ जी अपर्णेची अपरप्रतिमा ॥ वृत्रारि शर्व अंबुजजन्मा ॥ ऐसी निर्मूं न शकती ॥१२४॥कमलमृगमीनखंजन ॥ कुरवंडी करावी नेत्रांवरुन ॥ अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण ॥ चरणांगुष्ठीं न तुळेचि ॥१२५॥आकर्ण नेत्र निर्मल मुखाब्ज ॥ देखोनि लज्जित द्विजराज ॥ मृगेंद्र देखोनि जिचा माज ॥ मुख न दावी मनुष्यां ॥१२६॥परम सुकुमार घनश्यामवर्णी ॥ ओतिली इंद्रनीळ गाळुनी ॥ दंततेजें जिंकिल्या हिरेखाणी ॥ बोलतां मेदिनी प्रकाश पडे ॥१२७॥सर्वलक्षणसंयुक्त ॥ म्हणोनि पृथ्वीचा नृपनाथ ॥ मुखें कीर्तिनगारा वाजवीत ॥ सौंदर्यशालिनी म्हणोनि ॥१२८॥जिचे अंगींचा सुवास ॥ जाय अर्धयोजन विशेष ॥ जयद्रथ देखोनि तीस ॥ मदनज्वरें व्यापला ॥१२९॥म्हणे ऐसी नवरी टाकून ॥ कासया करुं जावें लग्न ॥ हातीं आलिया दिव्य रत्न ॥ काय कारण गारेचें ॥१३०॥हे सकल प्रमदांची ईश्वरी ॥ इची प्रतिमा नसे उर्वीवरी ॥ ऐसी सोडूनियां नवरी ॥ शाल्वदेशा कां जावें ॥१३१॥तक्र मनीं जों इच्छीत ॥ तों हातासी आलें अमृत ॥ तेवीं आम्हां जाहलें येथ ॥ पूर्वदत्तेंकरुनी ॥१३२॥पांडव एकले वनांत ॥ त्यांसी वधीन एके क्षणांत ॥ मग कोटिकनामें दूत ॥ पांचालीजवळी धाडिला ॥१३३॥पांचालकन्या सुरेख ॥ पांच सिंहांची ललना देख ॥ त्या सतीस जयद्रथ जंबुक ॥ सिद्ध जाहला न्यावया ॥१३४॥कोटिक तेथें येऊन ॥ पांचालीस पुसे तूं कोण ॥ तुझें रुप देखोन ॥ देवही प्राण ओंवाळिती ॥१३५॥वदनचंद्र निष्कलंक ॥ नरनरेंद्र चकोर होती देख ॥ पाहतां तव मुख सुरेख ॥ दंग पार्थिव जाहला ॥१३६॥विद्युल्लता झळके ज्यापरी ॥ उभी द्वारीं पांडवनारी ॥ अंचल रुळे उर्वीवरी ॥ प्रकाश दूरी झळकतसे ॥१३७॥द्रौपदी म्हणे मार्गस्थ दूता ॥ मी पंडुस्त्रुषा पांडववनिता ॥ पांचालरायाची दुहिता ॥ भगिनी मन्मथजनकाची ॥१३८॥कोण आला आहे राव ॥ सांग वनांत गेले पांडव ॥ ते आतांचि येतील सर्व ॥ आतिथ्य तुमचें करितील ॥१३९॥कोटिकानें येऊन ॥ सांगितलें वर्तमान ॥ मग जयद्रथ खालीं उतरोन ॥ आश्रमद्वारीं पातला ॥१४०॥म्हणे हे लावण्यरत्नराशी ॥ चातुर्यसरोवरराजहंसी ॥ जरी तूं मज माळ घालिसी ॥ तरी पावसी सर्व सुखें ॥१४१॥तुज योग्य भ्रतार ॥ कदा नव्हेत पंडुकुमार ॥ वनवास हा परम घोर ॥ येथें फार श्रमलीस तूं ॥१४२॥मी सिंधुरायाचा सुत ॥ माझें नाम जयद्रथ ॥ तुजकारणें आणिला रथ ॥ आरुढें सत्वर यावरी ॥१४३॥ऐसें ऐकतां ते गोरटी ॥ भ्रूमंडला घालीत आंठी ॥ म्हणे प्रलयचपला घालूनि पोतीं ॥ शलभ कैसा वांचेल ॥१४४॥मशक भावी मानसीं ॥ कीं पर्वत दाबीन दाढेशीं ॥ वृश्चिक खदिरांगारासी ॥ ताडूनि कैसा वांचेल ॥१४५॥पांच पांडव प्रलयाग्न ॥ त्यांची ज्वाला मी अति दारुण ॥ तूं पतंग तीत्तें कवळून ॥ सांग कैसा वांचसी ॥१४६॥व्याघ्र निजला वनांत ॥ त्याची जिव्हा पुढें लोंबत ॥ ते जंबुक तोडूनि स्वस्थ ॥ केवीं पावेल गृहातें ॥१४७॥महाभुजंगाचें दर्शन देख ॥ पाहूनि केवीं वांचेल मंडूक ॥ तृणालिका विनायक ॥ धरोनि कैसा नेईल ॥१४८॥इभ मदें गर्जना करी ॥ जंव दृष्टीं न देखे केसरी ॥ प्राण घेऊनि पळें लवकरी ॥ पांडव आतांचि येतील ॥१४९॥रणपंडितांमाजी सतेज ॥ दृष्टीस पडतां तो कपिध्वज ॥ आणि भीमगदा पाहतां निस्तेज ॥ होऊनि पडसी मशका ॥१५०॥असो पल्लवीं धरुनि जयद्रथ ॥ पांचालीस बळेंचि ओढीत ॥ तंव ती अंचल अंग झाडीत ॥ लोटिला पतित सतीनें ॥१५१॥जयद्रथ उलथोनि पडला ॥ मागुती उठोनि धांवला ॥ बळेंचि उचलोनि राजबाळा ॥ रथावरी घातली ॥१५२॥पृतनेसह जयद्रथ ॥ पळत आपुले नगर जात ॥ जयवाद्यें वाजवीत ॥ मनीं भावीत आनंदातें ॥१५३॥हिंसकस्कंधीं बस्त विशेष ॥ मानसीं मानी परम हर्ष ॥ कीं द्विजां पीडितां नहुष ॥ आनंद मानी मानसीं ॥१५४॥पांडवनामें घेऊनी ॥ हांक मारी श्रीकृष्ण भगिनी ॥ कंपित जाहली कुंभिनी ॥ महासती आक्रंदतां ॥१५५॥पक्षी धांवती गगनीं ॥ हांक देती आक्रोशेंकरुनी ॥ पंडुपुत्र हो धांवा ये क्षणीं ॥ द्रुपदनंदिनी नेली दुष्टेम ॥१५६॥मृगया करुनि पंडुसुत ॥ आश्रमाकडे त्वरें येत ॥ तों धांवतां देखत पुरोहित ॥ धौम्यनामक त्वरेनें ॥१५७॥आणीकही ऋषी धांवती ॥ पांडवांसी वेगें पालविती ॥ मृगेंद्र हो तुमची सत्कीर्ती ॥ जयद्रथजंबुक नेतसे ॥१५८॥आश्रमीं ठेवूनि धौम्याप्रती ॥ पवनवेगें पांचही धांवती ॥ जेवीं उरगाचा मार्ग खगपती ॥ काढीत धांवे त्वरेनें ॥१५९॥कीं इभकलभें वनांतरीं ॥ पाहों धांवती जेवीं केसरी ॥ तों सेनेसह पळतां झडकरी ॥ पृथाकुमरीं देखिला ॥१६०॥गर्जना करीत भीमार्जुन ॥ उभा रे तस्करा दावीं वदन ॥ तुझें नासिक आणि कान ॥ करचरण छेदितों ॥१६१॥जयद्रथ सेनेसमवेत ॥ उभा राहे तेव्हां त्वरित ॥ भीम गदा घेऊनि धांवत ॥ जैसा कृतान्त महाप्रलयीं ॥१६२॥गजरथांचा संहार ॥ करी तेव्हां वृकोदर ॥ धर्मार्जुन सोडिती शर ॥ प्रलयचपलेसारिखे ॥१६३॥सहदेव आणि नकुळ ॥ संहारिती पायदळ ॥ बाण भेदती जैसी व्याळ ॥ वल्मीकांतरीं प्रवेशती ॥१६४॥जयद्रथ सोडीत बाण ॥ वृष्टि करी जेवीं पर्जन्य ॥ परी ते न मानिती पंडुनंदन ॥ शिरें तोडून पाडिती ॥१६५॥धर्मे अर्धचंद्रबाण ॥ लवलाहीं ॥ भेदिला जयद्रथाचे हृदयीं ॥ रथातळीं ते समयीं ॥ नकुल उतरोनि धांवला ॥१६६॥वारणचक्रांत भृगनायक ॥ एकला चवताळे निःशंक ॥ तैसी असिलता खेटक ॥ नकुल धांवे घेऊनि ॥१६७॥शस्त्रें पाडिजे कदलीस्तंभ ॥ तैसे नकुळें पाडिले इभ ॥ तुरंगस्यंदनांचे कदंब ॥ संहारिले प्रतापें ॥१६८॥चपळा तळपे अंबरीं ॥ तेवीं फिरत सैन्यसागरीं ॥ नकुलघटोद्भवें ते अवसरीं ॥ सेनासिंधु प्राशिला ॥१६९॥संकट जाणोनि जयद्रथ ॥ द्रौपदीस सांडूनियां पळत ॥ पांचाली म्हणे धरा त्वरित ॥ तस्कर दुष्ट सोडूं नका ॥१७०॥मग पवनवेगेंकरुन ॥ धांवले तेव्हां भीमार्जुन ॥ महाशार्दूल धरी हरिण ॥ तेवीं आसडून पाडिला ॥१७१॥यथेच्छ मारुनि लत्ताप्रहार ॥ बांधोनि आकर्षिले मागें कर ॥ क्षुरमुख काढूनि शर ॥ पांच पाट काढिले ॥१७३॥धर्मे दौपदीपुढें त्वरित ॥ उभा केला जयद्रथ ॥ मग बोले सुभद्राकांत ॥ यासी वधावें जरी आतां ॥१७४॥तरी दुखवेल गांधारी ॥ मग त्यासी पुसती ते अवसरीं ॥ घेऊनि द्रुपदराजकुमारी ॥ कां तूं पळत होतासी ॥१७५॥मग म्हणती तयास ॥ म्हणें तूं पांडवांचा दास ॥ धर्म आणि द्रौपदीस ॥ नमूनि जाईं दुर्जना ॥१७६॥जयद्रथासी म्हणे धर्म ॥ ऐसें न करीं कदा कर्म ॥ तो दीनवदन परम ॥ धर्मरायासी विनवीत ॥१७७॥सत्य सांगतों राया धर्मा ॥ अन्याय माझा करीं क्षमा ॥ सोडिला तो पापात्मा ॥ अधोवदन जातसे ॥१७८॥म्हणे जनां केवीं दाखवूं वदन ॥ मग गंगाद्वाराप्रति जाऊन ॥ करोनि तपानुष्ठान ॥ प्रसन्न केला व्योमकेश ॥१७९॥त्याप्रति बोले त्रिनेत्र ॥ माग तूं इच्छित वर ॥ तो म्हणे पांडवांशीं विजय निर्धार ॥ मजलागीं देईं पां ॥१८०॥मग बोले अपर्णानाथ ॥ समीप नसतां सुभद्राकांत ॥ जय तुजला तेव्हां प्राप्त ॥ क्षणैक होईल जाण पां ॥१८१॥ऐसा घेऊनि वरार्थ ॥ नगरासी गेला जयद्रथ ॥ बहु मनीं संतोषत ॥ पंडुसुत जिंकीन मी ॥१८२॥असो ऐसा करितां वनवास ॥ द्वादश वर्षे भरलीं पांडवांस ॥ द्रौपदीसहित आश्रमास ॥ विचार करिती जाऊनी ॥१८३॥इकडे स्वप्नीं येऊनि कर्णास ॥ सांगता जाहला चंडांश ॥ कुंडलें मागेल अमरेश ॥ त्यासी सर्वथा देऊं नको ॥१८४॥देतांचि कर्णभूषण ॥ आयुष्य तुझें होईल क्षीण ॥ मग बोले उदार कर्ण ॥ नेदीं माझेनें न म्हणवे ॥१८५॥मग बोले गभस्ती ॥ त्याकडे एक मागें शक्ती ॥ असो कर्ण महामती ॥ अनुष्ठाना बैसला ॥१८६॥जपतां सूर्योपस्थान ॥ शक्र आला विप्रवेष धरुन ॥ म्हणे महाराज तूं उदार कर्ण ॥ देईं कुंडलें श्रवणींचीं ॥१८७॥कर्ण म्हणे तूं शचीरमण ॥ पूर्वीं गेलासी कवच घेऊन ॥ आतां देतों कर्णभूषण ॥ परी तूं प्रसन्न मज होई ॥१८८॥अवश्य म्हणे विबुधपती ॥ कर्ण म्हणे मज देईं महाशक्ती ॥ कुंडलें काढूनि निश्चितीं ॥ निर्जरेश्वर पूजिला ॥१८९॥महाप्रलयींची मुख्य चपला ॥ तैसी शक्रें शक्ति दिधली ते वेळां ॥ न्यासमंत्र प्रेरणकला ॥ कृपेनें सर्व सांगत ॥१९०॥म्हणे हे निर्वाण्सांगातिणी ॥ महाशत्रूवरी प्रेरीं समरांगणीं ॥ ऐसें सांगोनि ते क्षणीं ॥ शचीरमण गुप्त जाहला ॥१९१॥कवचकुंडलें देऊन ॥ तोषविला पाकशासन ॥ कर्णाचें उदारत्व देखून ॥ सुर सुमनें वर्षती ॥१९२॥हें जाणोनि वर्तमान ॥ हर्षे निर्भर पंडुनंदन ॥ कौरव परम दीनवदन ॥ म्हणती कर्णे काय केलें ॥१९३॥इकडे पांडवाश्रमासी ॥ धांवत आला एक ऋषी ॥ म्हणे अरणीपात्रें ठेविलीं वृक्षीं ॥ तों मृग एक पातला ॥१९४॥अरणीपात्रें श्रृंगी गोंवून ॥ घेऊनि गेला जैसा पवन ॥ ऐकतां पांच पंडुनंदन ॥ चापें घेऊन धांवले ॥१९५॥आटोपिती जंव मृग ॥ तंव तो जातसे सवेग ॥ बहुत करितां लाग ॥ नाकळे समीप देखतां ॥१९६॥सवेंचि मृग जाहला गुप्त ॥ वटवृक्षाखालीं पांडव बैसत ॥ होऊनियां चिंताक्रांत ॥ म्हणती काय करावें ॥१९७॥नकुलासी म्हणे युधिष्ठिर ॥ न्यग्रोधावरी चढें सत्वर ॥ तृषाक्रांत जाहलों नीर ॥ पाहें चहूंकडे विलोकूनी ॥१९८॥कोणे पंथें गेला मृग ॥ हेही पाहें सवेग ॥ मग तो माद्रीहृदयारविंदभृंग ॥ वरी चढोनि सांगत ॥१९९॥म्हणे या दिशेसी उद्यान ॥ सरोवरीं उदक गहन ॥ तेथेंचि गुप्त असे हरिण ॥ तो शोधून आणावा ॥२००॥खालीं उतरुनि तत्काल ॥ त्वरेनें जाय वीर नकुल ॥ पात्र नसे भरावया जल ॥ तूणीर घेऊनि धांवला ॥२०१॥तेथें बैसला होता एक पुरुष ॥ तो गुप्तरुपें म्हणे नकुलास ॥ माझे प्रश्न सांगसी निर्दोष ॥ तरीच सलिल पिशी हें ॥२०२॥न सांगतां प्राशिल्या जीवन ॥ तत्काल पावसी तूं मरण ॥ नकुल म्हणे माझे प्राण ॥ उअदकाविण जाताती ॥२०३॥धर्मराज तृषाक्रांत ॥ उदकालागीं वाट पाहत ॥ तुझे प्रश्न सांगावया येथ ॥ मी रिकामा नसें कीं ॥२०४॥जीवन प्राशितां माद्रीसुत ॥ तत्काल पडला प्रेतवत ॥ उशीर लागला म्हणोनि त्वरित ॥ सहदेव तेथें पातला ॥२०५॥नकुलाऐसेंचि होऊन ॥ तोही पावला तैं मरण ॥ मग गेला अर्जुन ॥ त्याचीही जाहली तेचि गति ॥२०६॥मग पातला भीमसेन ॥ त्यासही तेणें पुशिले प्रश्न ॥ बळें सेवितां जीवन ॥ तोही जाहला प्रेतवत ॥२०७॥मग धर्मराज आला तेथ ॥ तों चौघे बंधू झाले मृत ॥ यक्ष धर्मासी म्हणत ॥ सांग त्वरित प्रश्न माझे ॥२०८॥सांगसी जरी माझे प्रश्न ॥ तरी बंधू उठतील चौघेजण ॥ अरणीपात्रें गेलों घेऊन ॥ तो मीच ल्जाण मृगवेषें ॥२०९॥धर्म म्हणे महापुरुषा ॥ बोल ल्तुझा प्रश्न कैसा ॥ येरु म्हणे सूर्य आकाशा ॥ चढे कैसा सांग पां ॥२१०॥कैसा पावतो अस्त ॥ कोठें राहतो आदित्य ॥ यावरी प्रत्युत्तर देत ॥ धर्मपुत्र धर्मात्मा ॥२११॥म्हणे ब्राह्मण देती अर्घ्यदान ॥ सोडिती ब्रह्मास्त्र मंत्रोन ॥ त्या पुण्यें दैत्य वधून ॥ रवि चढे ऊर्ध्वपंथ ॥२१२॥धर्मकर्म करितां बहुत ॥ सूर्य सुखें पावे अस्त ॥ सत्यामाजी तो राहत ॥ न माने असत्य आदित्या ॥२१३॥श्रोत्रिय तो सांग कवण ॥ धर्म देत प्रतिवचन ॥ वेदाध्ययन अग्निसेवन ॥ सुशील परम श्रोत्रिय तो ॥२१४॥बुद्धिमंत सांग कोण ॥ जो करील विप्रसेवन ॥ देवत्व ब्राह्मणासी जाण ॥ कोण्या अर्थे सांग पां ॥२१५॥तप आणि सत्य ॥ ब्राह्मणासी येणें देवत्व ॥ संत ते कोण त्वरित ॥ मज सांगें सर्वज्ञा ॥२१६॥तत्त्व जाणते निश्चित ॥ ते जाण ज्ञाते महंत ॥ पाप तें कोण अद्भुत ॥ परपीडा परनिंदा ॥२१७॥पुण्य तें काय साचार ॥ तरी करावा परोपकार ॥ सांग कोणता अनाचार ॥ सत्कर्मत्याग जाणिजे ॥२१८॥कोण पावतो सांग मोद ॥ अनृणी अप्रवासी पावे आनंद ॥ आश्चर्य कोण सांग विशद ॥ मजलागीं धर्मात्म्या ॥२१९॥एक मृत्यु पावतां देख ॥ उरले ते मानिती सुख ॥ आश्चर्य हें निःशंक ॥ मज वाटतें जाण पां ॥२२०॥आतां सांगें पंथ कोण ॥ ज्या वाटेनें जाती संतजन ॥ वार्ता काय ती संपूर्ण ॥ सांग मजला युधिष्ठिरा ॥२२१॥सकल भूतांसी काळ पचवीत ॥ हेचि वार्ता मुख्य येथ ॥ गुरु कोण सांग निश्चित ॥ सर्वज्ञ दयाळ उदार जो ॥२२२॥शिष्य कोण सांग साचार ॥ भाविक प्रज्ञावंत उदार ॥ विष तें कोण सांग सत्वर ॥ गुरुची अवज्ञा करणे जी ॥२२३॥काय करावें सत्वर ॥ छेदावा संसारार्णव दुस्तर ॥ मोक्षतरुचें बीज काय साचार ॥ शुद्धज्ञान क्रियेसह ॥२२४॥कोण शुचिष्मंत बोल विशद ॥ अंतर्बाह्य मानसीं शुद्ध ॥ पंडित कोण निर्द्वंद्व ॥ सद्विवेक ज्यापाशीं ॥२२५॥कोण जन्मला निश्चित ॥ परोपकारीं जो सदा रत ॥ तस्कर कोण बोल त्वरित ॥ पंच विषय निर्धारें ॥२२६॥मद्याहूनि काय मोहक ॥ धर्म म्हणे स्त्रेह देख ॥ अंध कोण निःशेष ॥ विषयास्था सुटेना ज्या ॥२२७॥शूर कोण सांग येथ ॥ स्त्रीलोचनबाणें नव्हे व्यथित ॥ गहन काय बोल सत्य ॥ स्त्रीचरित्र जाण पां ॥२२८॥दरिद्री तो सांग केवळ ॥ ज्याची न जाय हळहळ ॥ लघुत्वाचें काय मूळ ॥ पराशा ज्यासी सुटेना ॥२२९॥निद्रित कोण सांग दृढ ॥ मतिमंद मूढ ॥ नरक तो कोण गूढ ॥ कुटुंबकाबाड न सुटे जया ॥२३०॥सुख तें कोण सांग ॥ तरी सर्वसंगपरीत्याग ॥ बधिर कोण नाहीं ज्या विराग ॥ हित नायके जो शिकवितां ॥२३१॥नलिनीपत्रावरी उदक ॥ तैसें सांग काय क्षणिक ॥ आयुष्य धन यौवन देख ॥ नसे भरंवसा सर्वथा ॥१३२॥कोणा वश सर्व प्राणी ॥ जो नम्र सत्यभाषणी ॥ भूषण काय ल्यावें कर्णीं ॥ हरिकथाश्रवणनिरुपण ॥१३३॥करावा कोठें सांग वास ॥ संतनिकट कीं काशीस ॥ चार गोष्टी असती सुरस ॥ कोणत्या सांग शेवटीं ॥१३४॥मधुर बोलूनि करिजे दान ॥ गर्वरहित निःसीम ज्ञान ॥ क्षमायुक्त शूरत्व पूर्ण ॥ भाग्य आइ उदारत्व ॥१३५॥या चार गोष्टी दुर्लभ तत्त्वतां ॥ यक्ष म्हणे पंडुसुता ॥ कोणता बंधु तत्त्वतां ॥ उठवूं सांग प्रथम मी ॥१३६॥धर्म म्हणे तूं दयाळ ॥ आधीं उठवीं माझा नकुल ॥ यक्ष म्हणे तूं पुण्यशील ॥ सत्य होसी धर्मात्मा ॥१३७॥मग एकदांचि चौघे जण ॥ बंधू बैसविले उठवून ॥ मग धर्म बोले कर जोडून ॥ तूं कोण दर्शन मज देईं ॥१३८॥मग म्हणे मी तुझा पिता ॥ यमधर्म आहें तत्त्वतां ॥ तुझें सत्त्व पहावया आतां ॥ मृगवेषें मी आलों ॥१३९॥मग यम देत दर्शन ॥ पांचही जण वंदिती चरण ॥ अरणीपात्रें आणून ॥ प्रीतीकरोन दीधलीं ॥२४०॥तुम्ही करितां अज्ञातवास ॥ कोनी नोळखतील तुम्हांस ॥ क्रमावें विराटनगरीं वर्ष ॥ पुढें राज्यास पावाल ॥२४१॥ऐसें सांगोनि सूर्यनंदन ॥ तत्काळ पावला अंतर्धान ॥ पांडव आश्रमासी येऊन ॥ देतील द्विजां अरणीपात्रें ॥२४२॥याउपरी पंडुसुत ॥ ऋषींप्रति आज्ञा पुसत ॥ अज्ञातवास त्वरित ॥ यावरी प्राप्त जाहला ॥२४३॥येथूनि एक वर्षपर्यंत ॥ व्हावें लागेल आम्हां गुप्त ॥ कंठ धर्माचा दाटत ॥ वियोग न साहवे विप्रांचा ॥२४४॥ऋषी सप्रेम होऊन ॥ धर्मासी देती आशीर्वचन ॥ लवकरी प्राप्त हो राज्यासन ॥ शत्रु समस्त निवटोनियां ॥२४५॥समस्तांची आज्ञा घेऊन ॥ ते भूमिका सांडून ॥ एक कोश पुढें जाऊन ॥ पांडव जाण उतरले ॥२४६॥तेथें बैसोनि विचार ॥ करितील आतां पंडुकुमार ॥ तें ब्रह्मानंदें श्रीरुक्मिणीवर ॥ श्रीधरमुखें वदवील ॥२४७॥अरण्यपर्व संपलें येथ ॥ पुढें विराटपर्व गोड बहुत ॥ तें श्रवण करितां समस्त ॥ पापतापदहन होय ॥२४८॥ज्यांचा ऐकतां वनवास ॥ आपणा सुख होय विशेष ॥ संकट निरसे निःशेष ॥ त्यांची करुणा ऐकतां ॥२४९॥या पर्वाचे अध्याय संस्कृत ॥ संख्या बोलिला सत्यवतीसुत ॥ दोनशें अध्याय सुरस बहुत ॥ एकोणसत्तर वरी बरवे ॥२५०॥एकादश सहस्त्र चौसष्टी ॥ इतुके श्लोकांची मूळगांठी ॥ सारांश कथा गोष्टी ॥ पांडुरंगें वदविली ॥२५१॥नव अध्यायां संपूर्ण ॥ वनपर्व जाहलें निरुपण ॥ तेविसाव्या अध्यायापासून ॥ एकतीसपर्यंत जाणिजे ॥२५२॥येथूनि चार अध्याय अपूर्व ॥ पुढें परिसा विराटपर्व ॥ महासंकट हरेल सर्व ॥ श्रवण पठन करितांचि ॥२५३॥ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥ श्रीधरहृदयकल्हारभ्रमरा ॥ तव वरदें जगदुद्धार ॥ ग्रंथ पुढें चालो कां ॥२५४॥स्वस्ति श्रीपांडवप्रताम ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकतिसाव्यांत कथियेला ॥२५५॥इति श्रीपांडवप्रतापे श्रीधरकृतटीकायां घोषयात्रा - जयद्रथविटंबन - कुंडलाभिहरण - यक्षप्रश्नकथनं नाम एकत्रिंशत्तमाध्यायः ॥३१॥॥ श्रीकृष्णार्पणामस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ इति श्रीपांडवप्रताप अरण्यपर्व समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP