मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ४० वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ४० वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ४० वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ सभेसी दिव्यरूप दावून ॥ शत्रूचा तेजोभंग करून ॥ धर्मासी भेटा वया मनमोहन ॥ रथीं बैसोन चालिला ॥१॥बोळबूं आले जे समस्त ॥ त्यांसी निरोप देत पद्मजतात ॥ त्यांमाजील अर्कसुत ॥ अपुले रथीं बैसविला ॥२॥कर्णासी म्हणे जगदीश्वर ॥ तूं उदार धीर परम सुंदर ॥ ब्रह्माण भक्त प्रतापशूर ॥ तुझी प्रतिमा नसे दुजी ॥३॥तुझें सौंदर्य देखोन ॥ खालीं विलोकी मीनकेतन ॥ तुझें औदार्य पाहोन ॥ पृथ्वीचे नृप लज्जित ॥४॥तुझें शूरत्व देखोनि अभिनव ॥ उज्जित होती देवदानव ॥ कवचकुंडलें देऊनि वासव ॥ तुवां प्रसन्न केला कीं ॥५॥दिव्य रत्न निश्चितीं ॥ सांपडलें कीं कुलालप्रती ॥ कीं चितामणि अंधाचिये हातीं ॥ लाधला परी महिमा तो नेणे ॥६॥तैसें किरातें केलें तव पालन ॥ तूं सूर्य पुत्र प्रति सूर्य जाण ॥ कुंत्युदरीं पावलासी जनन ॥ कुमारी दशे वर्ततां ॥७॥तरी तूं कुंतीचा पुत्र ॥ चल तुजवरी धरवितों छत्र ॥ धर्मभीमादि सर्वत्र ॥ तुझिये सेवे लावीन मी ॥८॥प्रीतीनें बोले कमल दलाक्ष ॥ मी आहें तुझा मातुलपक्ष ॥ वसुदेवासी भगिनी प्रत्यक्ष ॥ पृथा माता तुझी पैं ॥९॥पृथ्वीचे राजे मेळवून ॥ तुज राज्या भिषेक करवीन ॥ तुम्ही सहा पांडव द्रौपदी रत्न ॥ स्त्री तुझी सहजचि ॥१०॥धर्म युवराजा होईल पवित्र ॥ भीम तुजवरी धरील छत्र ॥ सारथी तुझा सुभद्रावर ॥ पाठी रक्षील सर्वस्वें ॥११॥नकुल सहदेव देख ॥ हे तुझे होतील चक्ररक्षक ॥ प्रतिविंध्यादि सौभद्र सकळिक ॥ साही पुत्र तुझोचि ॥१२॥यादवदळाशीं मी जगजेठी ॥ तुझी सर्वदा राखीन पाठी ॥ यावरी तो कर्ण कर्णपुटीं ॥ श्रीरंगाच्या सांगत ॥१३॥कुंतीनेंचि घात केला मुळीं ॥ मज सोडिलें जान्हवीजळीं ॥ किरात नेऊनियां मज पाळी ॥ क्षत्रिय संस्कार मज कैंच ॥१४॥स्तनपान दे राधा निःशेष ॥ माझें सोशिलें मूत्रपुरीष ॥ आतां कैसें त्यागूं तियेस ॥ प्राण देईल हें ऐकतां ॥१५॥ते राधा माता निश्चित ॥ पिता अधिरथनामें किरात ॥ त्रिभवनीं जाहला विख्यात ॥ आतां विपरीतार्थ केवीं करूं ॥१६॥तेणें माझें नांव ठेविलें वसुषेण ॥ त्यावरी मित्र जाहला सुयोधन ॥ भाक दिधली जों हें शरीर जाण ॥ तोंवरी अंतर न द्यावें ॥१७॥माझिया आश्रयें करून ॥ दुर्योधनें मांडिलें युद्धकंदन ॥ आतां त्याचा संग सोडून ॥ जातां त्रिभुवन निंदील पैं ॥१८॥ज्याचा अंगीकार केला जाण ॥ त्याचें आद्यंत करावें पालन ॥ परी श्रीरंगा ऐकें एक वचन ॥ धर्मासी जाण सांगूं नको ॥१९॥हे गोष्टी ठेवीं निजमनीं ॥ पडों नेदीं पांडवांचे कर्णीं ॥ कुंती पुत्र कर्ण ऐसें स्ववदनीं ॥ सहसा कोठें न बोलावें ॥२०॥आतां होऊ तयांचें कल्याण ॥ तूं सारथी त्यांचा नारायण ॥ मज नलगेचि राज्यासन ॥ माझें प्राक्तन ऐसेंनि ॥२१॥तूं पूर्ण ब्रह्म सनातन ॥ ठाउकें पुढील वर्तमान ॥ तुवांचि माझें प्राक्तन ॥ क्षत्रिय ना किरात केलें कीं ॥२२॥आतां आरंभेल रणयज्ञ श्रीपती ॥ महावीरांच्या पडतील आहुती ॥ सुयोधनाची निश्चितीं ॥ पूर्णाहुती शेवटीं होय ॥२३॥ऐसें बोलतां सूर्य कुमार ॥ नयनीं टाकी दुःखनीर ॥ श्रीकृष्णा आतां होईल संहार ॥ हें मी सर्व जाणतों ॥२४॥कमल दलाक्षा कमला पती ॥ तूं जिकडे तिकडे जय प्राप्ती ॥ पांडवांचे निमित्तें क्षिति ॥ भार उतरिशी गोविंदा ॥२५॥सभेसी आणिली ते कृष्णा ॥ हें दुःख मोठें श्रीकृष्णा ॥ आतां बोलोनि मधुसूदना ॥ मज तूं सर्वथा मोहूं नको ॥२६॥दुर्योधना अपशकुन झाले ॥ तेव्हांचि मज भविष्य समजलें ॥ तेणें गुरु द्रोह बहुत केले ॥ मान खंडिले वृद्धांचे ॥२७॥देव बाह्मण आणि भक्त ॥ यांचा सर्वदा द्वेष करीत ॥ हरि तूं बोललासी सभेंत ॥ कदा असत्य नव्हे तें ॥२८॥मीं श्रीहरे देखिलें स्वन्प ॥ बंधूं सहित सुयोधन ॥ नूतन वस्त्रें लेवून माडीवरी बैसलासे ॥२९॥देखिला अस्थींचा ढीग दारुण ॥ वरी उभा ठाकला सुयोधन ॥ सुवर्णपात्रीं घृत भोजन ॥ धर्म करितां देखिला म्यां ॥३०॥गदा हातीं घेऊन ॥ पर्वतीं उभा ठाकला भीम सेन ॥ युद्ध संपलें म्हणूनि अर्जुन ॥ गांडीवा घाली गवसणी ॥३१॥भीष्म द्रोण कर्णादिकरूनी ॥ समस्त राजे उष्ट्रावरी ओळंघूनी ॥ अगस्त्या दिशा लक्षोनी ॥ जात असती त्वरेनें ॥३२॥तेव्हां सर्व मज समजलें जगजेठी ॥ यवरी तुमची आमुची हेचि भेटी स्वर्गीं होईल बोलणें शेवटीं ॥ पायीं मिठी घाली हरीच्या ॥३३॥कंठ जाहला सद्नदित ॥ हरिपायीं मस्तक ठेवीत ॥ म्हणे हे जगन्निवास विकुंठनाथ ॥ अंतीं प्राप्त पद तुझें हो ॥३४॥पांडवांशीं दुष्टपण ॥ करावया मज काय कारण ॥ हरि म्हणे संगदोष आणि अन्न ॥ भक्षिलें जाण कौरवांचें ॥३५॥त्याचा गुण हा निःशेष ॥ एर्हवीं तुज ऐसा नाहीं पुण्य पुरुष ॥ वसुधामर आणि सुरेश ॥ औदार्यें तुवां तोषविले ॥३६॥ऐसें बोलो नियां कर्ण ॥ श्रीरंगाची आज्ञा घेऊन ॥ हरीच्या रथाखालीं उतरून ॥ आपुले स्यंदनीं बैसला ॥३७॥तेव्हां संजय होता सांगातें ॥ तोही परतला गजपुरातें ॥ कर्ण म्हणे कमला वरातें ॥ गोष्टी हे फुटों न द्यावी ॥३८॥पुनः पुनः हेंचि मागणें ॥ हें वर्तमान ॥ कोणासी न सांगणें ॥ इंदिरावर ॥ अवश्य म्हणे ॥ जाईं सखया माघारां ॥३९॥मागुती रथ मुरडेनि सुरेख ॥ कर्णाकडे पाहे मदन जनक ॥ पीतांबरें पालवी देख ॥ जाईं जाईं म्हणोनियां ॥४०॥मग सात्यकी आणि ह्रषीकेशी ॥ जाते जाहले उपलव्यासी ॥ इकडे भीष्म सभेसी ॥ दुर्योधना प्रति बोलत ॥४१॥पहा केवढा पराक्रम ॥ करूनियां गेला पुरुषोत्तम ॥ पांडवकामकल्पद्नुम ॥ मनोभिराम सर्वांचा ॥४२॥अमृता चिया सम्रदांत ॥ श्रीकृष्ण कृपें पांडव खेळत ॥ त्यांणीं मागितलें तें देत ॥ श्रीकृष्ण कामधेनु माउली ॥४३॥त्यांसी खेळावया चिंतामणी ॥ देईल आणोनि चक्रपाणी ॥ कल्प वृक्ष लावितां अंगणीं ॥ चिंतिलें मनीं पुरवी तो ॥४४॥कामधेनूंचीं खिल्लारें मुरारी ॥ दुभवील न मागतां त्यांचे घरीं ॥ अरे दुर्योधना मैत्री करीं ॥ नीलपयोधरतनूची ॥४५॥तूं धर्मासी करीं नमन ॥ मग चौघेही धरितील तुझें चरण ॥ गजपुरीं दुश्चिन्हें दारुण ॥ उठताती जाण सुयोधना ॥४६॥दुर्योधन उगाचि स्तब्ध ॥ उत्तर न बोले मतिमंद ॥ द्रोण म्हणे कर्म सुबद्ध ॥ भोगिल्यावांचूनि सुटेना ॥४७॥पुत्राहूनि शत गुण ॥ मज अवडतो श्वेतवाहन ॥ समरांगणीं त्याचा प्राण ॥ माझेनें न घेववे सर्वथा ॥४८॥माझिया स्नेससागरांत ॥ बुडाला असे सुभद्राकांत ॥ तो गुरु भक्त रणपंडित ॥ माझा वध न इच्छी मनीं ॥४९॥ज्याचा सारथी पीतवसन ॥ ध्वजीं जनकजा संताप हरण ॥ भ्रात सबळ भीमसेन ॥ तयासी जया काय उणें ॥५०॥यालागीं ऐकें सुयोधना ॥ धर्मासी नमूनि भेटें भीमसेना ॥ उभय कृष्ण आणि कृष्णा ॥ समजावोनि आणीं एथें ॥५१॥तें न मानेचि दुर्योधना ॥ म्हणे उगे बैसा कीं जा सदना ॥ इकडे विदुरे जे पंडु अंगना ॥ तिजप्रति सांगे एकांतीं ॥५२॥म्हणे अनर्थ थोर ओढवला ॥ दोहीं पक्षीं क्षय मांडला ॥ दुर्योधन दुरात्मा जन्मला ॥ सर्वांचा क्षय करावया ॥५३॥कुंती म्हणे तो वीर कर्ण ॥ दुर्योधनाची पाठी राखोन ॥ पांडवांशीं द्वेष निशिदिन ॥ करितो काय करावें ॥५४॥मग तो भागीरथीतीरीं भास्करी ॥ एकांतीं भास्करो पासना करी ॥ तेव्हां वसुदेव भगिनी झडकरी ॥ पाठीशीं उभी ठाकली ॥५५॥जप जाहलिया मागें पाहात ॥ कुंतीस देखोनि नमस्करीत ॥ मी तुझा दास अधिरथसुत ॥ तूं कां येथें आलीस ॥५६॥कुंती म्हणे तूं माझा नंदन ॥ सांगितलें पूर्ववर्तमान ॥ कवचकुंडलां सहित जाण ॥ जन्मलासी ममोदरीं ॥५७॥तरी तूं सोडीं दुष्टसंग ॥ जाईं बंधूंकडे सवेग ॥ कर्ण म्हणे मज श्रीरंग ॥ सर्व सांगोनि गेला हो ॥५८॥तंव भास्कर बोले वरूनी ॥ कर्णा कुंतीचें वचन मानीं ॥ तूं मम पुत्र अधिरथें नेऊनी ॥ पाळिलासी आजिवरी ॥५९॥कर्ण म्हणे कुंती पाहीं ॥ तुवां मज टाकिलें प्रवाहीं ॥ मज क्षत्रिय संस्कार नाहीं ॥ आतां काय बोलो नियां ॥६०॥माझा प्राण सखा दुर्योधन ॥ मजवरी तेणें ठेविला प्राण ॥ त्यासी मी सोडितां अधःपतन ॥ पावेन सत्य त्रिवाचा ॥६१॥तुझ्या पुत्रांसी मारून ॥ राज्यीं स्थापीन दुर्योधन ॥ मग कुंती मागे भाषदान ॥ म्हणे चौघे रक्षीं अवश्य तूं ॥६२॥अर्जुनाशीं तुझें वैर ॥ परी चौघांसी रक्षीं साचार ॥ अवश्य म्हणोनियां उदार ॥ भाष देत कुंतीतें ॥६३॥म्हणे मारिला म्यां अर्जुन ॥ तरी मज सहित पुत्र तुझें पांच जण ॥ अथवा मी मेलिया कल्याण ॥ पांच तुझें तुजपाशीं ॥६४॥कुंती रोदन करी ते क्षणीं ॥ विदेही होसी तूं समरांगणीं ॥ आठव असों दे अंतःकरणीं चौघांचीही तुज बा रे ॥६५॥कर्ण म्हणे हे जननी ॥ ही गोष्टी न घालीं धर्माचे कानीं ॥ अवश्य म्हणोनि वसुदेव भगिनी ॥ स्वस्थळा गेली गुप्तरूपें ॥६६॥इकडे उपलव्यासी जगज्जीवन ॥ गेला त्वरें स्यंदनीं बैसोन ॥ सकलरायां सहित पंडुनंदन ॥ सामोरे येऊन हरीसी नेती ॥६७॥धर्म बैसला सभा करुन ॥ मग जें जें जाहलें वर्तमान ॥ श्रीकृष्णें सांगितलें संपूर्ण ॥ दुर्योधन वळत नाहीं ॥६८॥ दुधाचे आधणीं पाषाण ॥ घातला तो न शिजे जाण ॥ तैसा बहुत शकविला अंधनंदन ॥ परी तो नायके सर्वथा ॥६९॥काम क्रोधमद मत्सर ॥ त्रैलोक्यींचे करूनियां एकत्र ॥ दुर्योधन दुराचार ॥ घडिला असे विधीनें ॥७०॥भीष्म द्रोण शारद्वत ॥ अश्वत्थामा आणि ऋषी समस्त ॥ धृतराष्ट्र गांधारी विदुर भक्त ॥ समस्तीं बहुत शिकविला ॥७१॥इतुक्यांचें नायके पापात्मा ॥ जाहली त्याच्या आयुष्याची सीमा ॥ ऐसें बोलतां सर्वात्मा ॥ भीमें हांक फोडिली ॥७२॥पिटिले प्रचंड बाहू थोर ॥ म्हणे संहारीन अवघे अंधपुत्र ॥ करीन सर्व नृपांचा संहार ॥ तों सुभद्रावर ॥ आवेशला ॥७३॥गांडीवासी चढवूनि शित ॥ ओढिलें आकर्ण पर्यंत ॥ त्याचे नादें डळमळत ॥ भूमंडळ तेधवां ॥७४॥सहदेव आणि नकुळ ॥ यांहीं हांके भरिलें नभोमंडळ ॥ धर्मरायाचें नेत्रकमळ ॥ आरक्तवर्ण जाहलें ॥७५॥म्हणे अभाग्या दुर्योधना ॥ कुलक्षय मांडिला दुर्जना ॥ अवघे जातील यमसदना ॥ संशय कांहीं असेना ॥७६॥मग म्हणे श्रीपती ॥ तिंहीं भीष्म केला सेनापती ॥ धर्म म्हणे निश्चितीं ॥ आम्हांसी दळपती योजावा ॥७७॥मग बोले इंदिरावर ॥ समरधीर भयंकर ॥ धृष्टद्युम्न महावीर ॥ अग्निगर्भीं जन्मला जो ॥७८॥रथ घोडे सहस्त्र समघेत ॥ वस्त्राभरणीं निघाला मंडित ॥ तरी हा द्रुपदाचा महाप्रिय सुत ॥ रणपंडित सेनापती ॥७९॥द्रोणाचा नाश करावया कारण ॥ द्रुपदें निर्मिला हा नंदन ॥ भीष्माचा घ्यावया प्राण ॥ शिखंडी जाण जन्मला ॥८०॥धर्में वस्त्राभरणें आणोन ॥ अभिषेकिला धृष्टद्युन्म ॥ सेनापतित्व देतां जाण ॥ वाद्यें वाजों लागलीं ॥८१॥रणतुरें परम वाजती ॥ सप्त अक्षौहिणी दळगणती ॥ हांकें निराळ गाजविती ॥ गडवडती सप्तसागर ॥८२॥रथ जुंपूनियां केले सिद्ध ॥ गज पांख्ररिले ॥ सुबद्ध ॥ अश्वभार पायदळ विविध ॥ सर्वत्र सिद्ध जाहलें ॥८३॥सर्व रायां सहित उत्तम ॥ पांडव संपादिती होम ॥ विजयदानें देऊनियां परम ॥ वसुधामर पूजिले ॥८४॥आराध्यदैवतांचा जप करून ॥ केलें शस्त्रांचें पूजन ॥ दिव्य वज्रकवचें चढवून ॥ सिद्ध जाहले सर्वही ॥८५॥द्रौपदीसुभद्रादि ललना ॥ उपलव्यीं ठेवूनि जाणा ॥ कांहीं सेवक आणि सेना ॥ रक्षणार्थ ठेविती ॥८६॥अत्यंत वृद्ध रोगिष्ट पाहीं ॥ तेहीं राहिले ठायीं ठायीं ॥ केवळ बाळक जे सर्वही ॥ ते राहिले आज्ञेनें ॥८७॥गमनसंकेतभेरी ॥ धर्में ठोकिल्या ते अवसरीं ॥ पांडव द्रुपद विराट झडकरी ॥ रथारूढ जाहले ॥८८॥प्रतिविंध्य श्रुतकर्मा श्रुतसोम ॥ शतानीक श्रुतसेन वीरोत्तम ॥ सुभद्रानंदन ॥ शोभे परम ॥ जिसा सूर्य उदयाचळीं ॥८९॥सेनापति धृष्टधुम्न ॥ शिखंडी दुजा द्रुपदनंदन ॥ विराटपुत्र उत्तर जाण ॥ शिशुपालनंदन केतु हा ॥९०॥द्रुपदाचे आणीकही सुत ॥ तैसे विराटाचेही बहुत ॥ त्यांचीं नामें समयोचित ॥ युद्धसमयीं कथिजेती ॥९१॥काशिराज कुंतिभोज ॥ कैकयराज पंचबंधु सतेज ॥ यादववीर सात्यकी तेजःपुंज ॥ सेना अपार तयांची ॥९२॥वैकुंठनाथ सुजाण ॥ तेणें वाजविला पांचजन्य ॥ अर्जुनें देवदत्त जाण ॥ त्राहाटिला अतिबळें ॥९३॥पृथ्वीपति महाराज धर्म ॥ तो अनंतविजय वाजवी सप्रेम ॥ वृकोदरें भीमकर्में परम ॥ पौंड्रक बळें त्राहाटिला ॥९४॥नकुळें वाजविला सुघोष देख ॥ सहदेवें वाजविला मणिपुष्पक ॥ असो सेनेसहित नृपनायक ॥ कुरुक्षेत्रीं पातले ॥९५॥विशाल भूमिका पाहोन ॥ चतुष्कोण आणि समान ॥ देवऋषिस्थानें टाकून ॥ स्मशान सोडोनि सर्वही ॥९६॥जेथें बहुत तृणजीवन ॥ ते स्थळीं भूमि मोजून ॥ तेथें निशिदिन जाण ॥ उभविलीम शिबिरें अपार ॥९७॥तगटी शिबिरे बहुत ॥ जडितस्तंभ गगनचुंबित ॥ कळस झळकती असंख्यात ॥ हिणाविती स्वर्गातें ॥९८॥जैसा कुलाचलांत मेरु थोर ॥ तेवीं धर्माचें मुख्य शिबिर ॥ भोंवता खंदक माजी नीर ॥ मत्स्य कच्छप तळपती ॥९९॥पाकशिबिरें अनुष्ठानशिबिरें ॥ निद्रास्थळें कोशागारें ॥ गजाश्वशाळांचीं मंदिरें ॥ ठायीं ठायीं उभविती ॥१००॥अपार राबती सूत्रधार ॥ चिकित्सक गणक लोहचर्मकार ॥ धनुष्य बाण शस्त्रें करणार ॥ एवं सर्व अठराही ॥१०१॥अपार वसिन्नले बाजार ॥ सर्व वस्तूंचे विकणार ॥ एवं सर्व नृपवर ॥ यथावकाशें उतरले ॥१०२॥त्याचि प्रकारें तिकडून ॥ अकरा अक्षौहिणी दळ घेऊन ॥ राहता जाहला दुर्योधन ॥ समस्त नृपांसमवेत पैं ॥१०३॥गजपुरापासूनि तेथ ॥ लक्षांचे लक्ष येती रथ ॥ युद्धसामुग्री भरूनियां अमित ॥ असंख्य़ सेवक धांवती ॥१०४॥वस्त्रें भूषणें संपूर्ण ॥ भीष्मासी रणपट्ट देऊन ॥ अभिषेकीत दुर्योधन ॥ जयवाद्यें वाजविलीं ॥१०५॥भीष्माचार्याचें स्तवन ॥ करीत असे तो दुर्योधन ॥ म्हणे तूं प्रतापसूर्य एथून ॥ रक्षी सेना सर्वही ॥१०६॥तुजविण रक्षिता दुजा ॥ कोण आम्हांसी महाराजा ॥ पाहतां तुझ्या प्रतापतेजा ॥ पांडव खद्योत कायसे ॥१०७॥भीष्म म्हणे सर्व संहारीन ॥ त्यांत एक वीर आहे अर्जुन ॥ नित्य दहा सहस्त्र वीर मारीन ॥ पांडव वेगळे करोनियां ॥१०८॥कर्ण मजशीं स्पर्धा करितो जाण ॥ तरी तेणेंचि करावें युद्धकंदन ॥ किंवा मीच सर्व आटीन ॥ शुष्ककानन अग्नि जैसा ॥१०९॥यावरी बोले वीर कर्ण ॥ जों जीवंत आहे गंगा नंदन ॥ तों मी न करीं युद्धकंदन ॥ प्रतिज्ञा सत्य हे माझी ॥११०॥कौरवदळीं वाद्यें वाजविती ॥ अपशकुन बहुत जाणवती ॥ सेनेसन्मुख शिवा शब्द करिती ॥ वीर चित्तीं भयभीत ॥१११॥क्षमेहूनि आगळी विशेषें ॥ भीष्माचे अंगीं क्षमा असे ॥ समुद्राहूनि गांभीर्य वसे ॥ सूर्यासम प्रभा ज्याची ॥११२॥बोलका जैसा अंगिरा सुत ॥ शत्रु दंडावया वैवस्वत ॥ महायोगी इंद्रियजित ॥ शुक हनुमंत ज्यापरी ॥११३॥ऐसा तो महाराज देवव्रत ॥ जो हरिचरणोद्भ्वेचा सुत ॥ सेनापती प्रतापवंत ॥ कौरवदळीं सिद्ध जाहला ॥११४॥इकडे युद्धिष्ठिर रायांसहित ॥ बैसला घवघवीत सभेंत ॥ तों द्वारकेहूनि समस्त ॥ यादववीर पातले ॥११५॥आनकदुंदुभी उग्रसेन ॥ उद्भ्व अक्रूर रेवतीरमण ॥ अनिरुद्ध भानुमंत प्रद्यम्न ॥ धर्मदर्शनालागीं पातले ॥११६॥समस्तांसी सामोरे जाऊन ॥ पांडव आणिती सन्मानें करून ॥ सभेसी समस्त बैसवून ॥ धर्मरायें पूजिले ॥११७॥बलराम म्हणे मुरारी ॥ कौरवपांडवां निर्धारीं ॥ समान साह्यता दोघांसी करीं ॥ न होईं कैवारी एकाचा ॥११८॥तूं पार्थाची पाठी रक्षोन ॥ कौरवांचे इच्छिसी अकल्याण ॥ दुर्योधन आणि भीमसेन ॥ शिष्य माझे दोघेही ॥११९॥तूं जिकडे ह्रषीकेशी ॥ तिकडे जयलाभ निश्चियेंशीं ॥ कौरवांचीं प्रेतें द्दष्टीशीं ॥ मी पहावया समर्थ नव्हें ॥१२०॥मी करूं जातों तीर्थाटन ॥ अवश्य म्हणे जगज्जीवन ॥ मग समस्तांसी पुसोन ॥ रेवतीरमण जाय तीथी ॥१२१॥तों भोजराज दळासहित ॥ धर्मापाशीं बोले पुरुषार्थ ॥ तुझी पाठी रक्षीन सत्य ॥ सर्वथाही भिऊं नको ॥१२२॥ऐकतां क्रोधावला पार्थ ॥ आम्ही काळासी नाहीं भीत ॥ तूं जाईं अथवा रहा एथ ॥ आम्हांसी साह्य समर्थ श्रीकृष्ण ॥१२३॥मग तो रुक्मयाचा पुत्र ॥ गेला कौरवांकडे त्वरित ॥ तेथेंही बोलिला पुरुषार्थ ॥ म्हणे कदा भिऊं नका ॥१२४॥तेथेंही बोले वीर कर्ण ॥ मशका आम्ही काळासी करूं बंधन ॥ तूं आमुची साह्यता करून ॥ काय पाठीं राखिसी ॥१२५॥तेथेंही अपमान पावोन ॥ गेला भोज कटनगरा निघोन ॥ दोन्ही दलींचे वीर हांसोन ॥ शतमूर्ख म्हणती तया ॥१२६॥यावरी शकुनिपुत्र उलूक जाण ॥ त्यासी सांगता जाहला दुर्योधन ॥ तूं पांडवांसी जाऊन ॥ भेटोन सांग शब्द माझे ॥१२७॥मग नानाप्रकारें तो दुर्जन ॥ उलूकासी सांगे न्य़ून पूर्ण ॥ म्हणे ऐसाचि बोलें जाऊन ॥ एक वचन ॥ चुकों नको ॥१२८॥मग तो उलूक निघाला तेथून ॥ भेटला पांडवां प्रति जाऊन ॥ सभा दाटली संपूर्ण ॥ जगज्जीवन मुख्य तेथें ॥१२९॥परी सभेमाजी साचार ॥ कोणतें बोलावें उत्तर ॥ ऐसें असतां न करी विचार ॥ तोचि नर शतमूर्ख ॥१३०॥उलूक म्हणे दुर्योधन ॥ बोलिला जें तीक्ष्णवचन ॥ तें मी बोलतों तुम्हां लागून ॥ क्रोध उत्पन्न होईल कीं ॥१३१॥मज अभय द्याल पूर्ण ॥ तरी मी तेंचि वचन बोलेन ॥ मग बोलती भीमार्जुन ॥ अवश्य बोल अभय असे ॥१३२॥मग बोलिला तो वचन दुयोंधनें सांगितलें तुम्हां लागून ॥ तुम्ही मागील प्रतिज्ञा संपूर्ण ॥ खर्या करून दाखवा आतां ॥१३३॥धर्मा तूं अधर्म आचरसी ॥ लोकांसी धर्मनीति सांगसी ॥ गंगातीरीं मार्जार तापसी ॥ होऊनियां जेवीं बैसला ॥१३४॥भोंवते पक्षी मूषक मिळती ॥ साधु म्हणोनियां पाय वंदिती ॥ मार्जार म्हणे तयांप्रती ॥ मी तप करितां कृश जाहलों ॥१३५॥मग ते त्या स्थानासी धरून ॥ नेती पक्षी मूषक मिळोन ॥ मूषकबाळें येऊन ॥ जवळी खेळों लागलीं ॥१३६॥तीं बळेंचि उचलूनियां अकस्मात ॥ मार्जार भक्षीत न कळत ॥ शरीर पुष्ट जाहलें बहुत ॥ ध्यान करीत लटिकेंचि ॥१३७॥त्यातें दंडिनामा मूषक म्हणे ॥ हा मोठा जाहला काय कारणें ॥ पहिल्याहूनि शतगुणें ॥ मूत्रपुरीष त्यागितो ॥१३८॥आमुचें संहारिलें येणें कुल ॥ उरले ते उठूनि पळाले सकल ॥ तूंही धर्मा तैसाचि खल ॥ स्वगोत्र आपुलें भक्षिसी ॥१३९॥तरी कपट सोडोनि युद्ध करीं समरीं ॥ तूं मार्जारा ऐसें न करीं ॥ तुझी स्त्री गांजिली सभेभीतरीं ॥ लाज सर्वही धरा ते ॥१४०॥कृष्णा तूं सभेसी येऊन ॥ गेलासी इंद्रजाल घालून ॥ जैसा बहुरूपी औडंबर दाखवून ॥ लटकीच माया भासवीतसे ॥१४१॥तरी त्यांची पाठी राखोनी ॥ युद्धु करीं समरांगणीं ॥ तूं शिष्टाईस आलासी म्हणोनी ॥ तुज एथोनियं सोडिलें ॥१४२॥तुवां कपटें मारिले कंस चाणूर ॥ गोवळ्यांचें उच्छिष्ट खाणार ॥ तूं कपटी चांडाळ चोर ॥ समरधीर हो आतां ॥१४३॥भीम बोका बहु खाणार ॥ तुम्ही विराटाचे सेवक समग्र ॥ बल्लव तूं कणिक कुटणार ॥ वचन साच करूनि दावीं ॥१४४॥दुःशासनाचें रक्तपान ॥ माझे मांडीवरी गदा घालीन ॥ तें खरें दाखवीं करून ॥ आतांचि सत्वर पाहूं दे ॥१४५॥अर्जुना तूं बृहन्नटा साचार ॥ अंतःपुरामाजी राहणार ॥ कर्णाहातीं तुझें शिर ॥ छेदवीन क्षणार्धें ॥१४६॥अश्वरक्षक गोरक्षक जाण ॥ नकुल सहदेव दोघे जण ॥ युद्ध करा धरा अवसान ॥ कीं उठोनियां पळा वेगें ॥१४७॥तुम्हांसी षंढतिळ नाम सत्य ॥ ठेविलें आम्हीं यथार्थ ॥ तुमचे ठायीं असता पुरुषार्थ ॥ तरी आजिवरी उगे न राहतां ॥१४८॥अजूनि तरी धरा धीर ॥ पळूं नका म्हणवितां शूर ॥ स्त्री गांजिली तें तुम्ही समग्र ॥ उगेचि कैसे पहात होतां ॥१४९॥तुम्ही विराटाचे सेवक ॥ अधीर बळहीन नपुंसक ॥ कृष्णा सारिखे आले लक्ष एक ॥ तरी मी एथें भीत नाहीं ॥१५०॥भीमार्जुन आले कोटीवरी ॥ तरी मी कदा भीत नाहीं समरीं ॥ तुमची फजीती केली नानापरी ॥ सभेभीतरीं आठवा ते ॥१५१॥तुमचीं वस्तें हिरूनियां घेतलीं ॥ सभेंत वल्कलें नेसविलीं ॥ आणीक असते तरी तेचि वेळीं ॥ प्राण देते आपुले ॥१५२॥अरे अर्जुना तुझा सारथी कृष्ण ॥ अक्षय्य भाते गांडीव बाणासन ॥ मी तिकडे न पाहें सुयोधन ॥ करीन चूर्ण समरांगणीं ॥१५३॥तुम्ही रानोरान हिंडतां पांडव ॥ बळेंचि मी भोगितों वैभव ॥ तुम्हांसी मारूनियां सर्व ॥ राज्य भोगीन पृथ्वीचें ॥१५४॥सभेसी गांजिली वनिता ॥ तेव्हां पुरुषार्थ कोठें गेला होता ॥ आतां आणिला असेल तत्त्वतां ॥ तरी युद्ध करा आतांचि ॥१५५॥धर्मा तूं कंकब्राह्मण ॥ युद्धीं न तगसी कदा जाण ॥ तुझें कपाळ अक्ष हाणोन ॥ विराटरायें फोडिलें ॥१५६॥भीमा तूं कणिक कुटणार ॥ युद्धीं कैसा धरिसी धीर ॥ पार्था तूं कन्या नाचविणार ॥ तुज हें युद्ध कायसें ॥१५७॥उलूकाचीं वचनें ऐकून ॥ पांचही भुजंग क्षोभले दारुण ॥ कीं पंचमातंगांच्या येऊन ॥ शुंडा बळें पिळियेल्या ॥१५८॥कीं पंचव्याघ्र निद्रित ॥ त्यांच्या नासिकीं दिधला मुष्टिघात ॥ कीं पांचही तपखी अद्भुत ॥ छळोनियां क्षोभविले ॥१५९॥भीमें कडकडां खाऊनि दांत ॥ हात चोळूनि गदा उचलीत ॥ क्रोधें थरथरां कांपत ॥ नेत्र आरक्त जाहले ॥१६०॥होमसमयीं याज्ञिक ॥ चेतवीत जैसा कुंडाग्नि देख ॥ गांडीव गवसणी पार्थ सुरेख ॥ काढूनियां चढवी तेव्हां ॥१६१॥श्रीकृष्ण म्हणे उलूका ॥ सांगें त्या दुर्योधना मशका ॥ प्रतिज्ञा खर्या कीं लटक्या ॥ पाहें कीटका यावरी ॥१६२॥तूं अविवेकी परम खळ ॥ कपटी महादुष्ट चांडाळ ॥ पांडव आहेत तुझे काळ ॥ जाण केवळ प्रलयाग्नी ॥१६३॥तूं शब्दशस्त्रें बोलसी व्यंग ॥ आम्ही लोहशस्त्रें छेदूं तुझें अंग ॥ आपुले कर्माचा भोग ॥ यावरी आतां भोगिसी ॥१६४॥पांडवी प्रतिज्ञा केली स्पष्ट ॥ ते हरिहरांसी अलोट ॥ तुज साह्य आल्या काळ धीट ॥ तरी आतां न वाचसी ॥१६५॥त्या दुःशासनासी भीमसेन ॥ रगडील जैसा मत्कुण ॥ कीं मृद्धट शतचूर्ण ॥ पाषाण प्रहारें होय जैसा ॥१६६॥कां माजला जो प्रचंड कुंजर ॥ तो अवलीळें धरूनि आपटी मार्जार ॥ तैसा गदाघायें वृकोदर ॥ चूर्ण करील दुर्योधना ॥१६७॥रणमंडळ घाणा सबळ ॥ कौरव हे तीळ सकळ ॥ भीमगदा लाट उचंबळ ॥ रक्ततैल काढील पैं ॥१६८॥भीम म्हणे सांगें जाऊन ॥ अंध पुत्रा जवळी आलें तुझें मरण ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ भुवन ॥ लपतां तुज सोडीना ॥१६९॥पार्थ म्हणे त्या कौलिक पुत्रा ॥ सांग जाऊ नियां अपवित्रा ॥ ऊर्ध्वपंथें तुझिया शिरा ॥ उडवीन आतां निर्धारें ॥१७०॥सहदेव बोले ते क्षणीं ॥ जाऊनि सांगें कपटिया शकुनी ॥ तुझ्या प्राणासी ग्राहक रणीं ॥ मी आहें सुटेना ॥१७१॥बोले वीर नकुळ ॥ उलूका तूं दिवाभीत केवळ ॥ तुज मी आतां आवंतिला काळ ॥ सदना निर्धारें धाडीन ॥१७२॥घुंघुरडीं कोपलीं बहुत ॥ गिळूं म्हणती अवघा पर्वत ॥ तैसे दुरात्मे तुम्ही समस्त ॥ बोलतां शक्ती आगळे ॥१७३॥तृणांचे पुतळे सकळ ॥ विझवावया चालिले वडवानळ ॥ कीं सागर मंथूनि अवघा वेळ ॥ स्वर्ग हातीं घेऊं म्हणती ॥१७४॥नवनीताचें ओढण ॥ लक्षा कवचें अंगीं लेऊन ॥ सणकाडि यांचा स्यंदन ॥ सारथी पुढें कर्पूराचा ॥१७५॥तूलराशीचे करूनि सांग ॥ तेचि जुंपिले तुरंग ॥ परी इतुकेही भस्म होतील सवेग ॥ द्विमूर्धान स्पर्शतां ॥१७६॥श्रीकृष्ण निंदा करितो दुर्योधन ॥ तरी मुखाचीं शतखंडें करीन ॥ बस्त माजला अंधनंदन ॥ पंचाननाशीं झगडों पाहात ॥१७७॥अर्जुन म्हणे रे षंढा ॥ तुजसी काय बोलों निवाडा ॥ उद्यां गांडीवाहातीं सुघडा ॥ शब्द बाणें बोलवीन ॥१७८॥दुर्योधन बोलिला तीक्ष्ण ॥ उद्यां समरीं उत्तर देतील बाण ॥ श्रीरंग म्हणे सांगें जाऊन ॥ उदयीक भोगीं फळ याचें ॥१७९॥मी शस्त्र न धरितां साचार ॥ करीन तुमचा संहार ॥ मग उलूक तेथूनि सत्वर ॥ आज्ञा घेऊनि निघाला ॥१८०॥इकडे जाहलें तें वर्त मान ॥ सांगितलें सुयो धनासी संपूर्ण ॥ शकुनि दुःशासन कर्ण ॥ संतप्त जाहले ऐकतां ॥१८१॥ सिद्ध करविलें दळ संपूर्ण ॥ स्वामि कार्तिके याचें आराधन ॥ यथा सांग करू नियां गंगा नंदन ॥ मग शस्त्रें कवचें घेतसे ॥१८२॥भीष्म म्हणे दुर्यो धना प्रती ॥ निवडीं अवघे महारथी ॥ अकरा अक्षौहिणी निश्चितीं ॥ दळ तेव्हां उभें केलें ॥१८३॥सेनापती सर्व पाहोन ॥ म्हणे अर्धरथी हा वीर कर्ण ॥ तें ऐकतां सूर्य नंदन ॥ क्रोधें बोले भीष्मासी ॥१८४॥तूं पांडवांचा पाठिराखा होसी ॥ आमुचा तेजोभंग करिसी ॥ तूं जों जीवंत आहेसी ॥ तों मी युद्ध न करीं कदा ॥१८५॥मग भीष्मकर्णांचें समाधान ॥ दुर्यो धन करी तेव्हां आपण ॥ दोघेही मजवरी कृपा करून ॥ युद्ध समय रक्षावा ॥१८६॥ मग बोले गंगा कुमार ॥ आतां येथूनि कुळाचा संहार ॥ रण माजेल अनिवार ॥ दुर्यो धना जाण पां ॥१८७॥अजूनि तरी करीं मैत्री ॥ संहारूं नको राजे क्षत्री ॥ पार्थासी पुरे ऐसा धरित्रीं ॥ वीर नाहीं जन्मला ॥१८८॥मी अथवा एक द्रोण ॥ त्याशीं माजवूं समरांगण ॥ परी मी सर्वांशीं युद्ध करीन ॥ शिखंडी वेगळा करू नियां ॥१८९॥मी आजिवरी ब्रह्मचारी ॥ हा पूर्वीं स्त्रीच होता निर्धारीं ॥ द्वैषें करू नियां द्रुपद उदरीं ॥ कामिनी होऊनि जन्मला ॥१९०॥मग शिववरदानें करून ॥ पुढें पावला पुरुष पण ॥ हे कथा आहे संपूर्ण ॥ आदिपर्वीं कथियेली ॥१९१॥म्हणोनि हा स्त्रीरूप जाण ॥ यावरी मी न टाकीं बाण ॥ पांच पांडवांसी समरीं मरण ॥ कोणाचेही करें नाहीं ॥१९२॥स्त्रीनाम स्त्रीत्वपूर्वक ॥ स्त्रीरूप वेषधारक ॥ तो हा शिखंडी देख ॥ याकडे कदा मी न पाहीं ॥१९३॥भीष्म करीतसे प्रतिज्ञा ॥ एक मासांत आटीन सेना ॥ दहा सहस्त्र गणना ॥ नित्य रथी मारीन ॥१९४॥ऐसेंचि बोले गुरु द्रोण ॥ मासांत हे चमू आटीन ॥ मग बोले वीर कर्ण ॥ मी आटीन दिवस पांचा ॥१९५॥कर्णाचे बोल ऐकून ॥ हांसती देवव्रत द्रोण ॥ जों द्दष्टीं न देखे अर्जुन ॥ तोंवरीच जाण गोष्टी या ॥१९६॥इकडे धर्म म्हणे अर्जुना ॥ किती दिवसां हे शत्रु सेना ॥ आटिसील सांगें सुजाणा ॥ आवडसी मज प्राणांहूनी ॥१९७॥ऐसें ऐकतांचि वचन ॥ पार्थें केलें हास्य वदन ॥ श्रीरंगाकडे पाहोन ॥ बोलता जाहला कौतुकें ॥१९८॥तूं वैकुंठींचा सुकुमार ॥ पाठीशीं असतां क्षीराब्धिजावर ॥ क्षणमात्रें शत्रू संहार ॥ करीन सत्य सर्वज्ञा ॥१९९॥ऐसा रात्रीं जाहला विचार ॥ तों उदय पावलें मित्र चक्र ॥ स्नानें करू नियां सकळ वीर ॥ दानें अपार देती तेव्हां ॥२००॥होम जप कवचें पढोन ॥ आराध्यदैवत करू नियां प्रसन्न ॥ सिद्ध जाहलें चतुरंग सैन्य ॥ वाद्यें वाजों लागलें ॥२०१॥पंच योजनें निर्मळ ॥ पांडवपृतनेचा पडिला तळ ॥ आठ योजनें सबळ ॥ कौरव सेना उतरली ॥२०२॥दोहीं दळीं अठाराही याती ॥ आपुलाले उद्यमें राबती ॥ पांडवदळीं ध्वज उभे तळपती ॥ वीस सहस्त्र विजुप्राय ॥२०३॥तीस सहस्त्र कौरव वदळीं ॥ ध्वज तळपती नभोमंडळीं ॥ सर्वांत श्रेष्ठ देखिजे सकळीं ॥ कपिध्वज आगळा ॥२०४॥दशयो जनें पर्यंत ॥ हरिध्वज सर्वांसी दिसत ॥ भुभुःकारें ब्रह्मांड गाजवीत ॥ सीता संतापहरण पैं ॥२०५॥चतुरंग दळाची हांक थोर ॥ वाजत वाद्यांचें घनचक्र ॥ उद्योगपर्व समग्र ॥ येथूनि संपलें राजेंद्रा ॥२०६॥उद्योगपर्व रसिक सार ॥ भारता माजी सुरस फार ॥ बहुत नीति बहुत विचार ॥ ज्ञान अगाध निरूपिलें ॥२०७॥उद्योगपर्व करितां श्रवण ॥ सर्व उद्योग होतील संपूर्ण ॥ स्वस्थ होय सदा मन ॥ सकल विघ्नें निरसूनियां ॥२०८॥उद्योगपर्व करितां श्रवण ॥ केले तेणें सह्स्त्र यज्ञ ॥ शत्रुपराजय संपूर्ण ॥ कीर्तिवर्धन सर्वदा ॥२०९॥संतति संपत्ति आयुष्यवर्धन ॥ भक्ति मुक्ति समाधान ॥ उद्योगपर्व करितां श्रवण ॥ इतुकें फल प्राप्त होय ॥२१०॥जाऊनियां सकळ रोग ॥ प्राणी होताती अरोग ॥ ऐसें हें पर्व उद्योग ॥ संपूर्ण येथें जाहलें ॥२११॥पुढें भीष्मपर्व सुरस फार ॥ वीरश्री माजेल अपार ॥ जेथें भीमार्जुनादि महावीर ॥ कडोविडी भीडती ॥२१२॥प्रज्ञाचक्षु अंबिकानंदन ॥ त्यासी संजय सांगे सत्कारून ॥ पुढें भीष्मपर्व करीं श्रवण ॥ एकचित्तें राजेंद्रा ॥२१३॥जन मेज यासी आनंद भरित ॥ वैशंपायन सप्रेमें सांगत ॥ पंचम पर्व संपलें येथ ॥ सत्यवती सुत प्रसादें ॥२१४॥शौनकादिकांसी सांगे सूत ॥ सहावें भीष्मपर्व अद्भुत ॥ श्रीधर विनवी जोडोनियां हस्त ॥ संतविरक्तपंडितां ॥२१५॥आदिपुरुषा दिगंबरा ॥ भीमातीर विहारा उदारा ॥ ब्रह्मानंदा श्रीधरवरा ॥ अभंग कदा विटेना जो ॥२१६॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ चाळिसाव्यांत कथियेला ॥२१७॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि चत्वारिंशत्तमाध्यायः ॥४०॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥॥ श्रीपांडवप्रताप उद्योगपर्व समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP