मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ५५ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ५५ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ५५ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः वैशंपायन म्हणे राया ऐक ॥ मागें पर्व संपलें विशोक ॥ पुढें स्त्रीपर्व सूरेख ॥ आतां परिसा यावरी ॥१॥संजय म्हणे कुरु वर्या ॥ करीं सर्वांची उत्तरक्रिया ॥ अंधासी मूर्च्छा येऊ नियां ॥ उर्वीवरी पडिला हो ॥२॥मग बोले विदुर सुमती ॥ ऊठ सर्वांची हेचि गती ॥ व्यर्थ कां करिसी आतां खंती ॥ पडली भ्रांति तुजलागीं ॥३॥सायंकाळीं पक्षी देख ॥ एका वृक्षीं बैसले अनेक ॥ सवेंचि उगवतां अर्क ॥ गेले सर्व उडोनियां ॥४॥तरी त्या पक्ष्यांलागीं देख ॥ कां वृक्षानेंचि करावा शोक ॥ तूं ह्रदयीं धरू नियां विवेक ॥ नाठवीं पुत्र वेदना ॥५॥गंगेंत वाहात आलीं नेटें ॥ संगमीं मिळालीं दोन्ही काष्ठें ॥ बहुत दिवस होतीं एकवटें ॥ ऋणानुबधें करू नियां ॥६॥त्यांत एक नेलें धरून धारेंत गेलें वाहून ॥ तैसे दारा बंधु आप्त स्वजन ॥ ऋणानुबंधें घडामोड ॥७॥कुलालें पात्रें केलीं एकसरीं ॥ तीं लोकीं नेलीं घरोघरीं ॥ तीं वर्तती कोणे व्या पारीं ॥ कासया कुलालें विचारावें ॥८॥छायेसी बैसले बहुत नर ॥ सवेंचि उठूनि गेले सत्वर ॥ तरी शोक करा वया तरुवर ॥ सिद्ध कदा नव्हेचि ॥९॥मातेनें तान्ह्या दिधलें विष ॥ पित्यानें विकिलें पुत्रास ॥ रायानें नगर केलें ओस ॥ तरी कोणास सांगावें ॥१०॥तैसें ईश्वरा धीन सर्व सूत्र ॥ नाचवी पुत्रळे चित्र विचित्र ॥ पहा अभिमन्यू सारिखा वीर ॥ रणांगणीं पडियेला ॥११॥ज्याचा मातुल श्रीधर ॥ क्षणें सृष्टि क्षणें संहार ॥ जीवें मारूनि वांच विणार ॥ तोही जवळी होता कीं ॥१२॥अर्जुना सारिखा पिता असोन ॥ जेणें समरीं जिंकिला पाकशासन ॥ परी उठवा वया अभिमन्य ॥ न जाहली शक्ति कोणासी ॥१३॥ऐसें विदुरें बोधून ॥ सकल सामुग्री सिद्ध करून ॥ शत कौरव कामिनी शोकीं निमग्न ॥ शिबिकरूढ चालिल्या ॥१४॥ गांधारी कुंती आदिकरूनी ॥ दुर्यो धनाची पट्टराणी ॥ निघाल्या वहनीं पुढें दंडपाणी ॥ सहस्त्रावधि धांवती ॥१५॥संजय ध्रुतराष्ट्र विदुर ॥ रथीं बैसोनि जाती सत्वर ॥ कर्णस्त्रिया सुकुमार ॥ लावण्यहरिणी निघाल्या ॥१६॥द्रोणस्त्री कृपी पाहीं ॥ तेही गेली लवलाहीं ॥ एकचि हांक गाजली ते समयीं ॥ अंत नाहीं महा शब्दा ॥१७॥एकवस्त्रा अनाथा ॥ भूषणें तोडिती जातां जातां ॥ पिता पुत्र बंधु सुता ॥ नाम घेऊनि आरडती ॥१८॥लज्जा सोडूनि सकळ ॥ धरणी वरी फोडिती कपाळ ॥ केश तोडूनि विकळ ॥ एक पडती भूमीवरी ॥१९॥हस्तिना पुर भणभणित ॥ मंदिरें भरलीं ओस दिसत ॥ पौरलोक त्यांस मवेत ॥ रणांगणीं पातले ॥२०॥कृत वर्मा शारद्वत ॥ तेही पातले शोक करीत ॥ स्त्रियांचें दुःख पाहोनि समस्त ॥ म्हणती येथूनि जातां बरें ॥२१॥कृत वर्मा गेला स्वराष्ट्र ॥ कृपाचार्य जात गज पुरा ॥ द्रौणी गेला वनांतरा ॥ कृष्ण शापेंकरो नियां ॥२२॥तों बंधूंसह युधिष्ठिर ॥ युयुत्सु सात्यकी यादवेंद्र ॥ द्रौपदी स्त्रियां सह समग्र ॥ येतीं जाहलीं भेटा वया ॥२३॥गंगा तीरीं कौरव युवती ॥ भ्रतार दुःखें प्रलय करिती ॥ तें दुःख कवीनें ग्रंथीं ॥ काय म्हणोनि लिहावें ॥२४॥स्त्रिया म्हणती धर्माचें मन ॥ नवनीताहूनि मृदु पूर्ण ॥ ये वेळीं वज्राहून ॥ केलें कठिन ह्रदय कैसें ॥२५॥तुझें अजात शत्रु नाम जाण ॥ कां दया दिधली दवडून ॥ सर्व गोत्रज मारून ॥ राज्य न करीं धर्म राया ॥२६॥धर्म अंधासी करी नमस्कार ॥ प्रीतीं ह्र्दयीं धरी धृत राष्ट्र ॥ म्हणे धर्मा तुझें ह्रदय पवित्र ॥ सकलां माजी मी जाणें ॥२७॥मज कारणें धर्मा निश्चितीं ॥ त्वां शोक सागरीं केली वस्ती ॥ बा रे तूं सहसा न करीं खंती ॥ मम प्रीति तुजवरी आहे ॥२८॥मग धृत राष्ट्र म्हणे तेव्हां ॥ मजला वृकोदर भेटवावा ॥ क्षेम द्यावयासी भीम बरवा ॥ सरसावला पुढेंचि ॥२९॥तंव तो भक्त पालक भगवंत ॥ भीमासी दावी भ्रूसंकेत ॥ म्हणे होईल आतां अनर्थ ॥ त्यासी सर्वथा भेटूं नको ॥३०॥जो भक्त कम कल्प द्रुम ॥ जाणोनि भविष्य तो आत्मा राम ॥ केला होता लोहाचा सबळ भीम ॥ वस्त्रा भरतीं संयुक्त ॥३१॥तो भीम पुढें उभा केला ॥ त्यासी धृत राष्ट्रें द्दढ धरिला ॥ रगडितांचि चूर्ण जाहला ॥ यवपिष्टवत ते समयीं ॥३२॥नव सहस्त्र नागांचें बळ ॥ तो भीमाहूनि असे सबळ ॥ एक नेत्रां विण विकळ ॥ नाहीं तरी काळ प्रत्यक्ष ॥३३॥भीमें मारिले सकल सुत ॥ तो डाव राखी मनांत ॥ असो लोह भीम तेथ ॥ चूर्ण करोनि टाकिला ॥३४॥अंधाचें भावीत मन ॥ कीं मीं मारिला भीम सेन ॥ बळें रगडिला तेणें करून ॥ वाहे अशुद्ध मुखा वाटे ॥३५॥भूमी वरी पडे मूर्च्छा येऊन ॥ आश्चर्य करिती पंडुनंदन ॥ म्हणती लीलाविग्रही श्रीकृष्ण ॥ भक्त जन पालक जो ॥३६॥मग म्हणे युधिष्टिर ॥ पूर्ण ब्रह्मानंद याद वेंद्र ॥ आजि नवा जन्मला वृकोदर ॥ मोठें चरित्र दाख विलें ॥३७॥असो यावरी अंबिका सुत ॥ अट्टहासें तेव्हां रडत ॥ म्हणे जळो हा क्रोधें केला घात ॥ भीम सेन मारिला ॥३८॥हाहाकार करी वृद्ध ॥ मग बोलिला सच्चिदानंद ॥ म्हणे ह्रदयीं न धरावा खेद ॥ केला वध लोह भीमाचा ॥३९॥तुझा क्रोध जाणोन ॥ म्यां लोहाचा केला भीम सेन ॥ तो तूं रगडूनि केला चूर्ण ॥ ऐकोन अंध संतोषला ॥४०॥श्रीरंगाकडे पहोन ॥ गदगदां हांसती पंडुनंदन ॥ भ्रूसंकेत केवळ दाखवून ॥ एकमे कांसी खुणा विती ॥४१॥रक्तें भरलें अंधाचें वदन ॥ धर्में धुतलें उदक आणून ॥ अंध म्हणे भीम सेन ॥ आतां मज भेटवा ॥४२॥म्हणे विश्वव्यापका चक्रपाणी ॥ माझा क्रोध केवळ प्रलयाग्नी ॥ त्यासी तुंवा लोहभीम आणोनी ॥ आहुती दिधली उत्तम हे ॥४३॥श्रीकृष्ण म्हणे अंधा प्रती ॥ पूर्वीं म्यां सांगितली नीती ॥ ते तुवां धरिली नाहीं चित्तीं ॥ अहंमतें भुलो नियां ॥४४॥स्वदोष जाहले संपूर्ण ॥ राया पाहें विचारून ॥ कोणते अन्याय तुम्हां पासोन ॥ घडले नाहींत सांग पां ॥४५॥ आपुले गुण दोष लपवी सदा ॥ करी दुसर्याची दीर्घ निंदा ॥ अहा रे धृत राष्ट्रा वृद्धा ॥ किती क्रोधा वश्य होसी ॥४६॥तुमचे अन्याय अद्भुत ॥ बहुत मीं घातले पोटांत ॥ द्रौपदी आणिली ओढीत ॥ तेव्हां संतोष वाटला तूतें ॥४७॥पारधी वृधा आड स्वस्थ ॥ करा वया बैसला मृग घात ॥ तों सर्पें येऊनि अकस्मात ॥ पाय फोडिला कडकडोनी ॥४८॥लहरी आस मास येती ॥ म्हणे कोणी वांचवा मज प्रती ॥ परी फांसे जवळी असती ॥ पापमति जाण वीतसे ॥४९॥हिंसक गाई वधीत ॥ तों त्याचीच अंगुली तुटली अकस्मात ॥ त्या घायें परम आरं बळत ॥ परी गोघात आठवी ॥५०॥तस्करीं भरिलें घरीं धन ॥ तेथें दरवडा पडला येऊन ॥ लोक नागविले म्हणून ॥ नाठवी कर्म आपुलें ॥५१॥तैसें तुझ्या पुत्राचें कर्म दारुण ॥ आठवीना कां तुझें मन ॥ लोहभीम मारिला रगडून ॥ मत्सरें करून तुवां कीं ॥५२॥वृंदावन जों जों पक्व होत ॥ तों तों कडूपणा चढे बहुत ॥ कोरफड जों जों माजत ॥ दुर्धंधि बहुत उठे तया ॥५३॥मैंदाचीं पोरें मेलीं समस्त ॥ म्हणूनि चडफडोनि तो रडत ॥ परी आपण हिंसा केली बहुत ॥ तें मनांत आठवीना ॥५४॥तैसें जळो तुझें वृद्धपण ॥ अजुनि ह्रदयीं नांदे अज्ञान ॥ अंधें ऐकतां ऐसें वचन ॥ उगाचि मग राहिला ॥५५॥मग म्हणे श्रीहरी ॥ आतां मज चौघांची भेट करीं ॥ मग स्पर्शमान ते अवसरीं ॥ करिता जाहला स्वहस्तें ॥५६॥चौघांनीं वंदिले चरण ॥ परी न देती आलिंगन ॥ विश्वास गेला उडोन ॥ मग तें बोलणें फोलचि ॥५७॥असो गांधारीचें समाधान ॥ करिती पांचही पंडुनंदन ॥ पूर्वींच व्यास सदेवें येऊन ॥ बोधिलें होतें तियेतें ॥५८॥कीं पांडवांवरी याउपरी ॥ क्रोध तूं सहसा न करीं ॥ मग धर्म राजें ते अवसरीं ॥ समाधान केलें तियेचें ॥५९॥तों भीम बोले गर्जोन ॥ परम शठ दुर्यो धन ॥ त्यासी मी पूर्वींच टाकितों मारून ॥ परी धर्म वचनें उगाचि होतों ॥६०॥जे वेळीं मांडी उघडून ॥ दाविली द्रौपदी लागून ॥ तेव्हांचि गदाघायें करून ॥ करितों चूर्ण अंक त्याचा ॥६१॥असो गांधारीचे चरण ॥ धर्म रायें द्दढ धरोन ॥ म्हणे माते मज भस्म करीं शापून ॥ मी अन्यायी सर्वस्वें ॥६२॥मीं पृथ्वी पाडिली ओस ॥ कुलक्षय केला निःशेष ॥ धर्म बोलतां गांधारीचें मानस ॥ स्नेहभरें उचंबळलें ॥६३॥वस्त्रपट डोळ्यांवरी ॥ गांधारीच्या असे दिवस रात्रीं ॥ भ्रतार चक्षुहीन अवधारीं ॥ म्हणेनि पट बांधिला ॥६४॥वस्त्रा आड उभी राहून ॥ सौबली पाहे न्याहालून ॥ तों धर्म राज देखिला दीन ॥ अत्यंत कृश जाहला असे ॥६५॥मग बोले गांधारी ॥ धर्मा तूं पूत्र माझा निर्धारीं ॥ तूं सर्वथा चिंता न करीं ॥ सुखरूप नांदें सर्वदा ॥६६॥कुंतीस साष्टांग नमस्कार ॥ करिते जाहले पांचही कुमार ॥ पृथेसी दाटला गहिंवर ॥ गेले ते सर्व आठवूनी ॥६७॥वनींहूनि आलिया राम लक्ष्मण ॥ कौसल्या देत प्रेमें आलिंगन ॥ तैसी कुंती पांचां लागून ॥ ब्रह्मानंद्रें आलिंगी ॥६८॥म्हणे बाळ हो वनांतरीं ॥ बहु श्रमलेति आजिवरी ॥ पुत्र म्हणती माते निर्धारीं ॥ तुझे पाय देखिले ॥६९॥तेणें श्रम गेला समस्त ॥ तुज खेद न व्हावा यथार्था ॥ द्रौपदी गांधारीस वंदीत ॥ मग नमीत कुंतीतें ॥७०॥पृथ्वी वरी पडली पांचाळी ॥ पुत्र दुःखें आरंबळली ॥ सुभद्रा शोक समुद्रीं बुडाली ॥ आठवूनि अभिमन्या ॥७१॥मग कुंती समाधान करीत ॥ दोघी स्नुषा ह्र्दयीं धरीत ॥ म्हणे अष्टादशाक्षौहिणी सेना अद्भुत ॥ जाहला निःपात सर्वांचा ॥७२॥विदुरें जें जें भविष्य केलें ॥ तें तें सर्व डोळां देखिलें ॥ असो कौरव स्त्रिया त्या वेळे ॥ रण भूमीसी धांवल्या ॥७३॥पुत्र भ्राते आणि पती ॥ त्यांचीं प्रेतें ह्रदयीं धरिती ॥ दीर्घ स्वरें सकल रडती ॥ ऐकतां धरित्री कांपतसे ॥७४॥दुर्यो धनादि शंभर बंधू जाण ॥ द्रोण कर्णादि वीर संपूर्ण ॥ वस्त्रा भरणें करून ॥ मंडित रणीं पडियेले ॥७५॥मुकुट कुंडलें आणि शिरें ॥ अपार भूषणें लेवविलीं करें ॥ भूतें भक्षिती सत्वरें ॥ प्रेतमांसें काढू नियां ॥७६॥मृगमदचंदनें शोभती ॥ ज्यांचीं शरीरें विराजती ॥ एकाचे डोळे पक्षी फोडिती ॥ चरण तोडिती एकाचे ॥७७॥त्यांत भीष्म द्रोण कर्ण ॥ यांचीं कलेवरें देदीप्य मान ॥ त्यांसी भूतें प्रेतें द्विजगण ॥ स्पर्श करूं न शकती ॥७८॥असो स्त्रियांचा कल्लोळ ॥ रण भूमीस माजला तुंबळ ॥ एकी ओळखूनि शिरकमळ ॥ धडासी नेऊन मेळविती ॥७९॥एकांचीं प्रेतें न सांपडती ॥ सैरावैरा रणीं हिंडती ॥ बहुतांचीं शरीरें फुगलीं देखती ॥ ओळखूं न येती कदाही ॥८०॥दुर्यो धनाचें प्रेत धरून ॥ गांधारी करीतसे रुदन ॥ असो आकांत वर्तला दारुण ॥ तो कवणासी न वर्णवे ॥८१॥गांधीरी म्हणे दुर्यो धना लागून ॥ युद्धाचे आधीं तूं येऊन ॥ मज करो नियां नमन ॥ निघा लासी ते वेळे ॥८२॥मी बोलिलें तुज वचन ॥ जेथें तेथें धर्म तेथें जय जाण ॥ अंतीं जाहलें तेंचि प्रमाण ॥ गेले मरोन पुत्र सर्व ॥८३॥गांधारीच्या बहुत सुना ॥ कित्येक रडती हंसगमना ॥ गजग मना मृग नयना ॥ चंद्रवदना असती पैं ॥८४॥एक मीनाक्षी मृगशावाक्षी ॥ एक कामाक्षी एक पद्माक्षी ॥ एक हरिमध्या नेत्रकटाक्षीं ॥ वेधूनि पाडिती पतींतें ॥८५॥आपुल्या पतींचीं प्रेतें धरूनी ॥ शोक करिती नितंबिनी ॥ सुभद्रा उत्तरा शोधूनी ॥ अभिमन्यूसी आलिंगिती ॥८६॥अभिमन्य़ूचें स्वरूप जाण ॥ प्रत्यक्ष केवळ दुजा श्रीकृष्ण ॥ असो देशो देशींच्या स्त्रिया येऊन ॥ आपुले पती शोधिती ॥८७॥अभिमन्यूलागीं गांधारी ॥ बहुत शोक करी ते अवसरीं ॥ हे बाळा नरवीरकेसरी ॥ कोमलांगा कमल नेत्रा ॥८८॥हे महाराज गुरु द्रोण ॥ हे धीर उदार वीर कर्ण ॥ कर्ण स्त्रिया सर्व मिळोन ॥ रणांगणीं आरडती ॥८९॥हा शकुनि वीर पडिला येथ ॥ हा दूःशीलापति जय द्रथ ॥ बहुतीं रक्षिला परी मृत्य ॥ न सोडीच तयातें ॥९०॥हा पडिला माद्रीचा बंधु शल्य ॥ हा भग दत्त पडिला विशाळ ॥ हा भीष्म सूर्य केवळ ॥ शरपंजरीं पहुडला ॥९१॥नारायण हरि गोविंद ॥ ऐशा नामांचे दिव्य प्रबंध ॥ सहस्त्र नामावळी प्रसिद्ध ॥ भीष्मदेव स्मरण करी ॥९२॥कोणा शींही न बोले वचन ॥ निजरूपी सावधान ॥ सकल स्त्रिया करूनि नमन ॥ प्रदक्षिणा करून जाती ॥९३॥देहावरी नाहीं भीष्म ॥ स्वरूपीं पावला विश्राम ॥ नारी नर आप्त परम ॥ कोणा सही नेणे तो ॥९४॥तो पिंडब्रह्मांडा वेगळा ॥ जैसें कमल पत्र नातळे जला ॥ तैसा तो ज्ञानी जाहला ॥ त्याची लीला कोण जाणे ॥९५॥असो गांधारी म्हणे ते वेळां ॥ श्रीकृष्णा पाहें रे डोळां ॥ स्नुषा तळमळती सकळा ॥ जीवना विण मीनापरी ॥९६॥सात्यकीनें मारिला ॥ हा भूरिश्रवा येथें पडला ॥ हा सोमदत्त रणीं मृत्यु पावला ॥ बाल्हीक बृद्ध तैसाचि ॥९७॥छप्पन्न देशींचे नृपती ॥ धांवोनि आल्या त्यांच्या युवती ॥ दीर्घ स्वरें हांका देती ॥ नाहीं मिती शोकातें ॥९८॥द्रुपद विराट द्रोणें मारिले ॥ ते येथें दोघे पडिले ॥ असो शाण्णव कुळींचे पहुडले ॥ राजे सर्व समरांगणीं ॥९९॥गांधारी म्हणे कृष्णा श्याम सुंदरा ॥ तूं उपलव्यासी गेलास माघारा ॥ दळा सह माझ्या कुमरां ॥ पाणी तेव्हांचि सोडिलें ॥१००॥अरे कृष्णा तूं चालक थोर ॥ तुवांचि हा केला संहार ॥ तरी मी गांधारी पतिव्रता साचार ॥ शाप माझा घेईं तूं ॥१०१॥तुझा कुलकक्षय जाण ॥ शेवटीं होईल संपूर्ण ॥ हरि म्हणे कर्ता कारण ॥ मज विण कोण असे पैं ॥१०२॥पिंड ब्रह्मांडघडामोडी ॥ एका रक्षीं एका रगडीं ॥ भूभार उतरा वया तांतडी ॥ म्यांचि सर्व मारिले ॥१०३॥युगानुयुगीं धरोनि अवतार ॥ मीच करितों दुष्ट संहार ॥ पुढेंही सर्व करणार ॥ मीच असें आदि अंतीं ॥१०४॥यादव संहार शेवटीं ॥ मज करणें आहे उठाउठी ॥ तुवां शाप दिधला हे गोष्टी ॥ मजही अगत्य आहे पैं ॥१०५॥असो रणरंगीं जे पडले ॥ त्यांचें वैशंपायनें गणित केलें ॥ सासष्ट कोटी वीर पडिले ॥ लहानथोर मिळोनियां ॥१०६॥मग यथानुक्रमें करून ॥ करिती तेव्हां सर्वांचें दहन ॥ करोनियां धर्मदान ॥ त्रयोदश दिन पर्यंत ॥१०७॥धूम्र आणि अग्निज्वाळ ॥ येणें ब्रह्मांड भरलें तुंबळ ॥ त्यामाजी जे अनाथ केवळ ॥ ज्यांस दहनासी कोणी नाहीं ॥१०८॥मग यांच्या राशी करून ॥ लाविला असंभाव्य अग्न ॥ विदुर युयुत्सु जाण ॥ तेंचि कृत्य करिते जाहले ॥१०९॥सर्वांचें उत्तर क्रिया संपादन ॥ करिते जाहले त्रयो दश दिन ॥ शतही कौरवांचें दहन ॥ यथा न्यायें तैसेंचि ॥११०॥धर्म म्हणे ते वेळीं ॥ हा कर्ण पडला महाबळी ॥ यासी कोणीं द्यावी तिलां जली ॥ कोणे कुळीं जन्मला ॥१११॥तों कुंतीनें फोडिली हांक ॥ अट्टहासें करी शोक ॥ म्हणे माझा पुत्र कर्ण वरिष्ठ ॥ सूर्य वीर्यें जन्मला ॥११२॥तुम्हां पांचांहूनि ज्येष्ठ ॥ जो धीर वीर उदार वरिष्ठ ॥ रणपंडित अति सुभट ॥ सूर्य भक्त निःसीम जो ॥११३॥त्या चिया औदार्या पुढें ॥ सुरतरु कायसें बापुढें ॥ त्याचें सौंदर्य देखोनि रडे ॥ एकीकडे शफरी ध्वज ॥११४॥तो जाहला कुमार पणीं ॥ सोडिला मी स्वर्धुनी जीवनीं ॥ अधिरथ ॥ किरातें नेऊनी ॥ राधे जवळी दिधला पैं ॥११५॥राधा ते अधिरथनितंबिनी ॥ तिनें कर्ण लाविला निजस्तनीं ॥ राधेय कर्णासी जनी ॥ नाम तेंचि प्रकटलें ॥११६॥मी आणि कृष्णें जाऊन ॥ बहुतांपरी बोधिला कर्ण ॥ परी कौरवांसी भाकवचन ॥ तेणें पूर्वींच दिधलें पैं ॥११७॥श्रीधर विनवी श्रोत्यां लागून ॥ कर्णाचें हें जन्म कथन ॥ आदिपर्वीं निरू पिलें संपूर्ण ॥ पुनःपुन्हां वर्णूं कासया ॥११८॥असो कृंती म्हणे ते क्षणीं ॥ अहा कर्णा वीरशिरोमणी ॥ मीं तुज सांडिलें बालपणीं ॥ तरीच रुसोनि गेलासी ॥११९॥अहा कर्णा परम सुंदरा ॥ अहा कर्णा धीरोदारा ॥ अहा कर्णा परमशूरा ॥ पूर्वीं केला दिग्वि जय ॥१२०॥जेणें कवचकुंडलें देऊन ॥ तोष विला पाकशा सन ॥ ऐसें कुंती दुःख आठवून ॥ कर्णा कर्णा म्हणोनि बाहे ॥१२१॥धर्माचे नेत्रीं अवधारा ॥ चालिल्या तेव्हां अश्रुधारा ॥ म्हणे अहा कर्णा महाशूरा ॥ कां रे आम्हांसी टाकिलें ॥१२२॥कुंतीस म्हणे युधिष्ठिर ॥ कर्ण वडील सहोदर ॥ तुवां हा कैसा विचार ॥ गुप्त करूनि ठेविला ॥१२३॥मज कळूं न दिलें वर्त मान ॥ मी धरितों कर्णाचे द्दढ चरण ॥ राज्य छत्र देऊन ॥ सेवा करितों अहोरात्र ॥१२४॥अहा कर्णा राजीव नेत्रा ॥ अहा कर्ना चारु गात्रा ॥ कोमलांगा परम पवित्रा ॥ सहोदरा माझिया ॥१२५॥अभिमन्यूचे शोकाहून ॥ कर्ण शोकें धर्म क्षीण ॥ भूमीस पडे मूर्च्छा येऊन ॥ कृष्णार्जुन सांवरिती ॥१२६॥धर्म म्हणे हो कृतीं ॥ परम कपटी स्त्रियांची जाती ॥ कदा अंत कळों न देती ॥ असत्य चित्तीं सदा वसे ॥१२७॥सकल स्त्रिया ज्या सृष्टीं ॥ धर्म शापी उठाउठी ॥ आजि पासूनि गुह्य गोष्टी ॥ न राहोत पोटीं स्त्रियांच्या ॥१२८॥असो धर्में ते काळीं ॥ कर्णवीराची क्रिया केली ॥ सर्वांसी समजलें ते वेळीं ॥ कीं पुत्र कुंतीचा ॥१२९॥ एवं सर्वांची उत्तर क्रिया करून ॥ गांधारी अंबिकानंदन ॥ विदुरादि सर्व जन ॥ हस्तिनापुरा प्रति गेले ॥१३०॥स्वस्थळासी गेले पंडुनंदन ॥ स्त्रीपर्व संपलें येथून ॥ पुढें शांतिपर्व परम गहन ॥ वैशंपायन बोलिला ॥१३१॥त्यांती सारांश यथार्थ ॥ बोलवीत पुढें पंढरीनाथ ॥ तें श्रवण ॥ करोत पंडित ॥ ब्रह्मानंदें करू नियां ॥१३२॥श्रीधरवरदा रुक्मिणीपती ॥ तूं पांडुगंग पांडवसारथी ॥ ब्रह्मानंद तूंचि आदिअंतीं ॥ अभंग अक्षय सर्वदा ॥१३३॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ स्त्रीपर्व व्यास भारत ॥ त्यांतीत सारांश यथार्थ ॥ पंचावन्नाव्यांत कथियेला ॥१३४॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे स्त्रीपर्वणि पंचपंचाशत्तमाध्यायः ॥५५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥॥ श्रीपांडवप्रताप स्त्रीपर्व समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP