मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३ रा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३ रा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३ रा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ आस्तिकाचें जन्मकथन ॥ द्वितीयाध्यायीं कथियेलें पर्ण ॥ जनमेजयें ऋषि मेळवून ॥ सर्पसस्त्र आरंभिलें ॥१॥सुवर्णवर्ण नृपति नामा ॥ त्याची कन्या वपुष्टमा ॥ ते जनमेजयाची रामा ॥ पतिव्रता परम ती ॥२॥भार्येसहित दीक्षाग्रहण ॥ जनमेजय व्रतस्थ पूर्ण ॥ कुंडीं प्रतिष्ठिला कृशान ॥ मूर्तिमंत प्रकाशला ॥३॥चत्वारिश्रृंग त्रिचरण ॥ सप्तहस्त द्विमूर्धान ॥ हस्तिशुंडेसमान ॥ वसुधारा प्राशीत ॥४॥विशाल कुंड भयंकर गहन ॥ जैसें काळें पसरिलें वदन ॥ ऋषि समिधा मंत्रून ॥ कुंडामाजी ओपिती ॥५॥नागलोकीं हलकल्लोळ ॥ दंदशूक कांपती सकळ ॥ भ्रमित होऊनि तत्काळ ॥ आकाशमार्गें उसळती ॥६॥सर्पांचीं जुंबाडें असंख्यात ॥ कुंडीं येऊनि रिचवत ॥ एक वृक्षासी वेढें घालीत ॥ तरु उसळती आकाशीं ॥७॥फणी एकमेकां बाहती ॥ एकाच्या गळां एक पडती ॥ शतांचीं शतें वेंटाळती ॥ मग पडती कुंडांत ॥८॥ नाना सर्पांच्या मुखध्वनीं ॥ नाद उमटती गगनीं ॥ एक मुखें पसरुनी ॥ भय भीत पडताती ॥९॥एकीं शिळेस घातलें वेढे ॥ ती शिळा येऊनि कुंडीं पडे ॥ असंख्य पडती जुंबाडें ॥ लेखा न करवे कोणासी ॥१०॥एक काळे काजळवर्ण ॥ खदिरांगार तैसे नयन ॥ एक पीत एक नीलवर्ण ॥ दूर्वारंग एक पैं ॥११॥तप्त लोहार्गळे ऐसे सबळ ॥ लंबायमान स्थूल विशाळ ॥ मुखीं निघती महाज्वाळ ॥ कंकणाकार एक पडती ॥१२॥श्रृंखलाकार शंखवर्ण ॥ चित्रविचित्र विक्राळवदन ॥ आरक्तमाणिकासारिखे पूर्ण ॥ केशाळ आस्वलासारिखे ॥१३॥अत्यंत जुनाट सुवासी ॥ मणि झळकती एकाचे शीर्षीं ॥ ब्राह्मण आपले मंत्रपाशीं ॥ बांधोनि आणिती बळेंचि ॥१४॥आर दुतोंडे अजगर ॥ महांडूल फोडसे कवडे थोर ॥ डोंब धामिणी एरंडाकार ॥ शंखपाळ किरडूं पैं ॥१५॥पंचमुखी दशमुखी ॥ शतमुखी सहस्त्रमुखी ॥ एकेकाचे मुकुट मस्तकीं ॥ पडती जळती तडतडां ॥१६॥पर्वताकार विशाल ॥ लांब जैसे मंदराचल ॥ ज्यांच्या दर्शनें तत्काल ॥ मृत्यु होय प्राणियां ॥१७॥व्याघ्रवदन जंबुकानन ॥ वृकमुख गजवदन ॥ मातृशापेंकरून ॥ कुंडाग्नींत रिचवती ॥१८॥धडधडां जळती विखार ॥ दुर्गंधीनें भरलें अंबर ॥ धन्य धन्य जनमेजय राजेंद्र ॥ प्रताप न मावे त्रिभुवनीं ॥१९॥सहस्त्रवदना नव्हे लेखा ॥ ऐसे सर्प जाळिले देखा ॥ राजा म्हणे आणा तक्षका ॥ जेणें माझ्या जनका ग्रासिलें ॥२०॥ऐसें ऐकतां द्विजगण ॥ तक्षकनामरूप स्मरून ॥ आकर्षिला मंत्रेंकरून ॥ घेत अवदान टाकावया ॥२१॥तों मरणकालींचें अवचिन्ह ॥ तक्षकें तें जाणून ॥ धनुष्यापासून सुटे बाण ॥ तैसा गेला शक्रपदा ॥२२॥तक्षक रडे ते कालीं ॥ म्हणे देवेंद्रा पाठिसीं घालीं ॥ शरणागता रक्षीं ये वेळीं ॥ बद्धांजली विनवीतसे ॥२३॥ऋषि अवदानें टाकिती ॥ त्यासरिसे सर्प पडती ॥ निर्वंश केले निश्चिती ॥ उरले क्षितीं किंचित ॥२४॥इंद्र म्हणे रे दुर्जना ॥ परम चांडाला खला मलिना ॥ अन्याय करितां करुणा ॥ किमपि नाहीं कां आली ॥२५॥तक्षक म्हणे देवपाळा ॥ मी उत्तरीय होईन तुझ्या गळां ॥ शक्रें तेव्हां पाठीं घातला ॥ कश्यपसुत म्हणोनी ॥२६॥पातालीं वासुकिशेषभुवनीं ॥ आकांत होत सर्पांलागुनी ॥ एका दुष्टानें केली करणी ॥ निर्वंश जाहला सर्पांचा ॥२७॥कद्रूमातेचा महाशाप ॥ उत्तंक ऋषीचा विशेष कोप ॥ रुरूची भार्या सुखरूप ॥ डंखूनि पूर्वीं मारिली ॥२८॥देवदूतीं बळेंकरूनी ॥ उठविली मागुती त्यांनीं ॥ मग लोहार्गला हातीं घेऊनी ॥ सर्प मारीत वनीं हिंडे ॥२९॥कोटींच्या कोटी मारी विखार ॥ तरी न सरती दुराचार ॥ मग जन मेजयाचें सर्पसत्र ॥ तेथें तो साह्य जाहला ॥३०॥असो वासुकी म्हणे जरत्कारी ॥ कंप सुटला आमुच्या शरीरीं ॥ कलेवर जाय चांचरी ॥ ज्वाला द्दष्टीं दिसताती ॥३१॥अनुष्ठानीं बैसला आस्तिक मुनी ॥ माती बोले सद्नद होऊनी ॥ म्हणे बंधू वांचवीं ये क्षणीं ॥ मातुल तुझे सुपुत्रा ॥३२॥तों सर्प सवघे मिळोन ॥ आस्तिकासी आले शरण ॥ भक्तांसी धांवे रमारमण ॥ तैसा धांवें ये काळीं ॥३३॥मग तो आस्तिक ऋषिराणा ॥ धांवत वेगें सर्परक्षणा ॥ मनोवेगें सत्वर जाणा ॥ सर्प सत्रीं पावला ॥३४॥तपस्तेज अंगीं प्रचंड ॥ जैसा उदेला प्रलयमार्तंड ॥ द्वारपाला आडदंड ॥ घालूं न शकती महाभयें ॥३५॥आंत आला आस्तिक मुनी ॥ तों देखिली ऋषींची आस्थानी ॥ जैसे उगवले वासरमणी ॥ तपोधन तेजस्वी ॥३६॥बलीचिये द्वारीं येऊन ॥ उभा ठाकला जैसा वामन ॥ तैसा आस्तिक देदीप्यमान ॥ तेज न माय मंडपीं ॥३७॥बोलका जैसा अंगिरासुत ॥ उचलोनियां पद्महस्त ॥ स्तुति आशीर्वाद वदत ॥ ऋषी तटस्थ पाहती ॥३८॥ यज्ञनारायणा तुज नमन ॥ सकलब्रह्मवृंदा माझें अर्चन ॥ तुमचें मंत्रसामर्थ्य दारुण ॥ ब्रह्यांड नूतन कराल ॥३९॥कुरुपांडवकुलवर्या ॥ आशीर्वाद तुज जनमेजया ॥ धन्य सामर्थ्य प्रतापसूर्या ॥ शत्रुनक्षत्रें विध्वंसिलीं ॥४०॥तुष्टि पुष्टि ऐश्वर्य पुर्ण ॥ आयुष्यवृद्धि धर्माचरण ॥ शांति क्षमा श्रीविष्णुपूजज ॥ वर्धमान हो कां सदा ॥४१॥यश कीर्ति औदार्य भजन ॥ आनंद सद्विवेक समाधान ॥ क्षेत्र दया उपरतिस्थान ॥ वर्धमान हो कां सदा ॥४२॥निर्दोष यशाचे कोश ॥ भरोत अक्षयी कीर्तिविशेष ॥ माझें वांछित निःशेष ॥ होय संपूर्ण तुझियेनि ॥४३॥तथास्तु ऐसें त्रिवार ॥ बोलती समस्त ऋषीश्वर ॥ आस्तिक म्हणे धन्य राजेंद्र ॥ सार्थक केलें जन्माचें ॥४४॥पूर्वीं जाहले बहुत याग ॥ परी तृप्त येथें चत्वारिश्रृंग ॥ पडिलें नाहीं कांहीं व्यंग ॥ आश्चर्य मोठें जाहालें ॥४५॥बुद्धीस उपमिजे बृहस्पती ॥ वैखरीं वसे सरस्वती ॥ तेजस्वीपणें गभस्ती ॥ पवित्रपणें वैश्वानर ॥४६॥ दंडाविषयीं तमारिसुत ॥ लोकरक्षणीं इंदिराकांत ॥ राज्यरचना धन बहुत ॥ यक्षपति दुसरा पैं ॥४७॥तपियांत जैसा व्योमकेश ॥ लोकरचनेंत सत्यलोकेश ॥ सभे बैसतां अमरेश ॥ जनमेजया दिससी तूं ॥४८॥भार्गव दाशरथी भीष्म द्रोण ॥ धनुर्धर किरीटी अभिमन्य ॥ तैसा धनुर्वेदप्रवीण ॥ जनमेजया तूं एक ॥४९॥वाल्मीकि विश्वामित्र वसिष्ठ ॥ दधीचि अगस्ती अत्रि वरिष्ठ ॥ तयांतुल्य यथेष्ट ॥ धैर्य तप तुझें असे ॥५०॥उपमन्यु भगीरथ भरत ॥ प्रयत्नाविषयीं तैसा तूं सत्य ॥ देवकीनंदन भीम हनुमंत ॥ तूं एक बलें तैसा पैं ॥५१॥वयें दिससी बालक ॥ परी प्रतापें भरला सर्व लोक ॥ धाकटे दिसती चंद्रार्क ॥ परी प्रताप अद्भुत पैं ॥५२॥जनमेजय म्हणे भाग्य अद्बुत ॥ ऐसा महाराज आला मंडपांत ॥ परी तक्षक जाळूनि याचें वांछित ॥ पूर्ण करीन शेवटीं ॥५३॥म्हणोनि घातलें कनकासन ॥ म्हणे बैसें एक क्षण ॥ आस्तिक म्हणे मनीं कारण ॥ धरूनि एक आलों आहें ॥५४॥तें पूर्ण करीन ऐसें वचन ॥ बोल मग मी बैसेन ॥ तों बोलती सदय ब्राह्मण ॥ राया बैसवीं ऋषीतें ॥५५॥राव म्हणे मज्जनकभक्षक ॥ आधीं भस्म करीन तक्षक ॥ कीं कोणी जाहला त्यासी रक्षक ॥ त्यासहित रक्षा करीन मी ॥५६॥मग मी रत्नराशी आणून ॥ आस्तिकासी अभिषेक करीन ॥ जें मागेल तें देईन ॥ तनु मन धन राज्यही ॥५७॥विप्र म्हणती पळाला तक्षक ॥ त्यास सहस्त्राक्ष जाहला रक्षक ॥ ऐकतां कोपला नरनायक ॥ काय बोले तेधवां ॥५८॥इंद्रासहित तक्षकासी ॥ भस्म करा दोघां दुष्टांसी ॥ जो परीक्षितिनृपासी भक्षी ॥ त्यासी कां रक्षी शचीवर ॥५९॥इंद्रासहित तक्षकाय ॥ स्वाहा म्हणती ऋषिवर्य ॥ सिंहासनासहित अमरराय ॥ ब्राह्मणीं खालीं आणिला ॥६०॥तपःसामर्थ्य अद्भुत ॥ आस्तिक दिनेश मूर्तिमंत ॥ वरीच रक्षी निर्जरनाथ ॥ महिमा अद्बुत ऋषीचा ॥६१॥ऋषी म्हणती जनमेजयास ॥ तरीच हें कर्म पावेल सिद्धीस ॥ समाधान करून आस्तिकास ॥ कनकासनीं पूजिजे ॥६२॥मग भूभुज बोलत ॥ ब्राह्मणा मागें अपेक्षित ॥ तंव ऋत्विग्जन नवल सांगत ॥ इंद्रें तक्षक दवडिला ॥६३॥तुझा याग लक्षून ॥ भयभीत दशशतनयन ॥ तक्षक उत्तरीयवस्त्रें गुंडाळून ॥ भिरकाविला अंतरिक्षीं ॥६४॥अलातचक्रवत विखार ॥ गगनीं फिरे तो दुराचार ॥ दक्षिणेपासून उत्तर ॥ इतका थोर पसरला ॥६५॥सुसाटें गर्जे गगनीं ॥ जाहला ऊर्ध्वपुच्छ अधोवदनी ॥ तों आस्तिकें उचलोनि पाणी ॥ तिष्ठ तिष्ठ वचन बोले ॥६६॥ब्राह्मण म्हणती जनमेजयासी ॥ आम्ही भस्म करूं तक्षकासी ॥ तूं सन्मानूनि आस्तिकासी ॥ अपेक्षित देईं कां ॥६७॥आस्तिकासी राव म्हणत ॥ प्रसन्न जाहलों माग इच्छित ॥ येरू म्हणे याग समाप्त ॥ करावा आतां एथूनि ॥६८॥जाहली एथूनि आतां सीमा ॥ उरग न जाळीं राजोत्तमा ॥ जाहला पुरुषार्थ कीं क्षमा ॥ इतुकें आम्हां देइजे ॥६९॥जनमेजय खोंचला अंतरीं ॥ म्हणे माझा तक्षक मुख्य वैरी ॥ तो वेगळा करून समस्त धरित्री ॥ राज्य तुज समर्पीन ॥७०॥न करीं माझ्या यागाचें खंडन ॥ घालितों सहस्त्र लोटांगण ॥ आस्तिक म्हणे तूं पुण्यपरायण ॥ दुसरें वचन न बोलें ॥७१॥सर्पास जिव्हा दोनी ॥ एक जिव्हा तुझे वदनीं ॥ सत्त्वशीला पुण्यखाणी ॥ विटाळवाणी होईल तुझी ॥७२॥असे मागणें एवढें एक ॥ आणीक मागेन तरी तो नरक ॥ जैसे कुंजरद्विज देख ॥ माघारे आंत न जाती ॥७३॥डोंबाघरीं आपणास विकिलें ॥ हरिश्चंद्र सत्त्व रक्षिलें ॥ सत्त्वरक्षणा वना गेले ॥ पांडव आणि रघुनाथ ॥७४॥कांति नगरींचा श्रियाळ ॥ भोजनास दिधलें पोटींचें बाळ ॥ शिबिराजें मांस सकळ ॥ कपोताशीं तुकियेलें ॥७५॥इतुकें बोलिला जरत्कारीनंदन ॥ परी रायाचें असंतुष्ट मन ॥ मग भ्रूसंकेतेंकरून ॥ संकेत दावी मांत्रिकां ॥७६॥मंत्रबळें ओढिती तक्षक ॥ आस्तिकें रोंविला लोहकंटक ॥ ऋषीचें सामर्थ्य अधिक ॥ कोणातेंही उपडेना ॥७७॥विप्र म्हणती राजनंदना ॥ मान देईं आस्तिकवचना ॥ आमुची पाळीं हेचि आज्ञा ॥ आग्रह सोडीं तत्त्वतां ॥७८॥असंख्यात जाळिले सर्प ॥ लोकीं वाढविला प्रताप ॥ यशाच्या मोटा अमूप ॥ किती बांधिसी राजेंद्रा ॥७९॥अपूर्ण होमाचा विषाद ॥ मनांत न धरीं कांहीं खेद ॥ ब्राह्मणांस जेणें आनंद ॥ यज्ञ संपूर्ण तोचि पैं ॥८०॥ऐसें बोलतां ऋत्विज ॥ अवश्य म्हणे भूभुज ॥ आस्तिकासी वदे महाराज ॥ यज्ञ संपविला तव आज्ञें ॥८१॥जयजयकार करी ॥ आस्तिक ॥ आनंदले जन सकळिक ॥ धन मान देऊनि देख ॥ विप्र तोषवी राजेंद्र ॥८२॥वस्त्र अलंकार अपार धन ॥ देऊनि पूजिला जरत्कारीनंदन ॥ आस्तिक आणि सकल ब्राह्मण ॥ देऊनि मान बोळविले ॥८३॥तक्षक मुक्त जाहला ॥ तोही स्वस्थळासी पावला ॥ आनंदसमुद्र उचंबळला ॥ नागलोकीं तेधवां ॥८४॥आस्तिक आला सर्पभुवनीं ॥ विखार येती लोटांगणीं ॥ म्हणती तूं धन्य या त्रिभुवनीं ॥ तुझें स्मरणें दोष नुरे ॥८५॥जे करिती आस्तिकस्मरण ॥ त्यांतें न बाधी सर्प पूर्ण ॥ जो सर्प स्मरणासी नेदी मान ॥ मस्तक शतचूर्ण होय त्याचें ॥८६॥हें आस्तिकाख्यान संपूर्ण ॥ जे करिती श्रवण पठण ॥ त्यांलागीं सर्प देखून ॥ पळती जाण भय भीत ॥८७॥तुझ्या चरित्रकथा कीर्तिती ॥ जे गृहीं संग्रहिती वाचिती ॥ सर्प तत्काळ उठोनि पळती ॥ पुन्हां न येती त्या ठाया ॥८८॥तुझे नाममंत्रेंकरून ॥ उतरे सर्पविष दारुण ॥ तुझें करिती जेथें स्मरण ॥ त्या स्थला त्यागून जांऊ आम्ही ॥८९॥वाटेनें जातां वनांतरीं ॥ जो तुझें क्षणक्षणां स्मरण करी ॥ तो मार्ग सोडूनियां दूरी ॥ जाऊं आम्ही तत्काळ ॥९०॥आमुचें मैथुन देखती ॥ तुझें स्मरण जरी करिती ॥ त्यांस आम्ही रक्षूं निश्चितीं ॥ पाठी न लागूं सर्वथा ॥९१॥सकलसर्पमुख्य शेष वासुकी ॥ भाष देती आस्तिकालागीं ॥ तुझें स्मरण करिती जे प्रसंगीं ॥ त्यांसी आम्ही नातळूं ॥९२॥ते मर्यादा अद्यापि जाण ॥ सर्प चालविती संपूर्ण ॥ व्यसें लिहिलें हें प्रमाण ॥ असत्य कोण म्हणेल ॥९३॥सर्पसत्र संपलें तत्त्वतां ॥ पुढें वर्तली ती कथा ॥ शौनकादि ऋषी समस्तां ॥ सूत सांगे आल्हादें ॥९४॥जनमेजय राव मनांत ॥ ऐकूं इच्छी पूर्वजांचें चरित ॥ तों व्यास देव अकस्मात ॥ येता जाहला पूर्वभाग्यें ॥९५॥देखतां साष्टांग नमन ॥ करिता जाहला परीक्षितिनंदन ॥ कनकासनीं बैसवून ॥ षोडशोपचारें पूजिला ॥९६॥चरणीं पुढतीं पुढती ठेवूनि शिर ॥ म्हणे ऐकेन पूर्वजांचें चरित्र ॥ साठ लक्ष पवित्र ॥ तुवां प्रबंध रचियेला ॥९७॥त्यांत सवालक्ष दिधलें मानवां ॥ तें मज जगद्नुरो श्रवण करवा ॥ मग वैशंपायनास तेधवां ॥ आज्ञा करी वेदव्यास ॥९८॥रायासी श्रवण करवीं भारत ॥ ऐसें बोलोन सत्यवती सुत ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥ सूर्य अस्त पावे जैसा ॥९९॥यावरी जनमेजय श्रोता निपुण ॥ वक्ता व्यासशिष्य वैशंपायन ॥ सभा घनवटली संपूर्ण ॥ ऋषि राजर्षि वैसले ॥१००॥गृहस्थ ब्रह्माचारी वानप्रस्थ ॥ सभेसी बैसले आवडीं समस्त ॥ चरी वर्ण आर्तभूत ॥ श्रवणपंक्तीं बैसले ॥१०१॥नावडे भारतश्रवण ॥ तो मनुष्य पशूसमान ॥ असो यावरी वैशंपायन ॥ काय बोलता जाहला ॥१०२॥चेदिदेशीं वसुनृपनाथ ॥ इंद्राचा मित्र अत्यंत ॥ तेणें येऊनि तपोवनांत ॥ आराधन केलें इंद्राचें ॥१०३॥त्यागूनि राज्य धनुष्यबाण ॥ वेष्टूनियां वल्कलवसन ॥ अन्न फल तोय वर्जून ॥ नियमन केलें मनेंद्रियां ॥१०४॥खडतर तप देखोन ॥ प्रसन्न जाहला शचीरमण ॥ म्हणे सखया शरीत दंडून ॥ तपकष्ट करूं नको ॥१०५॥पृथ्वीवरी तूंचि इंद्र ॥ मजसमान राजेंद्र ॥ समुद्रवलयांकित पृथ्वी समग्र ॥ राज्य करीं तूंचि पैं ॥१०६॥वेणुदंड उंच प्रचंड ॥ इंद्रध्वज उभवीं अखंड ॥ संवत्सरप्रतिपदेस सुघड ॥ अत्यादरें पूजीं कां ॥१०७॥संवत्सराचे आदि ॥ इंद्रध्वज पूजितां यथाविधि ॥ तेणें शत्रुनाश त्रिशुद्धि ॥ ऐश्वर्यसिद्धि विशेष ॥१०८॥तेच दिवसापासून ॥ संवत्सरप्रतिपदेस जन ॥ करिती इंद्रध्वजपूजन ॥ कीर्ति कल्याण तेणें सदा ॥१०९॥जो इंद्रध्वजपूजा अव्हेरी ॥ तो दरिद्री दुःखी जन्मवरी ॥ पूजिती भावें त्यांचे मंदिरीं ॥ पुरवी वृत्रारि संपदा ॥११०॥पृथ्वीचें राज्य संपूर्ण ॥ चैद्यवसूस समर्पून ॥ स्वपदा गेला पाकशासन ॥ मित्रमन तोषवूनी ॥१११॥प्रजापालनीं परम चतुर ॥ त्याकरितां नाम उपरिचर ॥ त्यास जाहले पांच पुत्र ॥ नामें पवित्र ऐका पां ॥११२॥बृहद्रथ प्रत्यग्र कुशांब सगुण ॥ महाव्रत चौथा पांचवा मणिवाहन ॥ पांचही पुत्र इंद्रासमान ॥ प्रताप गहन न वर्णवे ॥११३॥वसुमती नगरापुढून ॥ शक्तिमती नदी वाहे पूर्ण ॥ तीस कामाचारें पर्वतें कोंडून ॥ दुराग्रहें तो भोगीत ॥११४॥कालाहनामा पर्वत ॥ शक्तिमती नदीस भोगीस ॥ प्रवाह खुंटला समस्त ॥ उदक किंचित मिळेना ॥११५॥मृगयामिषें शोध करीत ॥ तेथें पावला नृपनाथ ॥ हाणूनियां सबळ लाथ ॥ कालाह पर्वत फोडिला ॥११६॥जलप्रवाह जाहला मुक्त ॥ तंव ते सरिता होऊनि मूर्तिमंत ॥ उपरिचर रायास स्तवीत ॥ म्हणे पुरुषार्थ केला त्वां ॥११७॥पर्वतवीय कुमार कुमारी ॥ जन्मलीं हीं माझे उदरीं ॥ हीं तूं राया आंगिकारीं ॥ परम सुंदर दोघेंही ॥११८॥शक्तिमती अपत्यें देऊनि दोघें ॥ प्रवाहरूपें चालली वेगें ॥ कन्येचें स्वरूप देखूनि अनंगें ॥ मोहिला तो नृपवर ॥११९॥गिरिका नामें ती वेल्हाळ ॥ रायें पत्नी केली तत्काळ ॥ बंधु तिचा सबळ ॥ सेनापति केला तो ॥१२०॥सुरतानंदें नृपनाथ ॥ तिसीं बहुकाल रमत ॥ एकदां ती असतां ऋतुस्त्रात ॥ राव गेला मृगयेसी ॥१२१॥परम सुंदर उद्यान ॥ छाये बैसला राव सुखघन ॥ तों गिरिका आठवतां मन ॥ मनसिजें पूर्ण व्यापिलें ॥१२२॥आठवी सुरतानंदसुख ॥ वीर्य उसळलें अधोमुख ॥ क्षितीं न पडतां तात्काळिक ॥ पर्णद्रोणीं धरियेलें ॥१२३॥म्हणे स्त्री घरीं ऋतुस्त्रात ॥ तीस हें पाठवावें त्वरित ॥ श्येनपक्षियाजवळी देत ॥ आज्ञा करी राव त्यातें ॥१२४॥गिरिकेसी देईं हें रेत ॥ मग चंचूंत धरूनि पक्षी जात ॥ तों अनेक विहंगम उन्मत्त ॥ पाठीं धांवती तयाचे ॥१२५॥हा एकला पक्षी बहुत ॥ युद्ध करितां सांडलें रेत ॥ यमुनाजळीं तें पडत ॥ मग भक्षीत मत्स्यिणी ॥१२६॥मस्स्यिण्युदरीं गर्भ वाढत ॥ तों मत्स्यघ्नें धरिली अकस्मात ॥ मांसाळ देखोनि बहुत ॥ विदारीत तियेतें ॥१२७॥तों कुमार कुमारी दोघें जण ॥ जावळीं निघालीं सुगुण ॥ उपरिचर राजास नेऊन ॥ भेटविलीं किरातें ॥१२८॥संतोषला नृपनाथ ॥ बाललेणीं लेववीत ॥ मत्स्यनामा पुत्र आपण घेत ॥ कन्या देत कैवर्तका ॥१२९॥जिचे पोटीम दोघें जन्मलीं ॥ ती अद्रिकानामें देवांगना वहिली ॥ ब्रह्मशापें मत्स्यी जाहली ॥ यमुनाजळीं बहुकाळ ॥१३०॥कुमार कुमारी उपजतां जाण ॥ ती स्वर्गा गेली उद्धरोन ॥ असो रायें मत्स्यपुत्र नेऊन ॥ मत्स्यदेशीं राव केला ॥१३१॥कन्या दिधली जे कैवर्तकाप्रती ॥ तिचें नांव ठेविलें सत्यवती ॥ सौंदर्यास उणा रोहिणीपती ॥ रती दमयंती दासी तिच्या ॥१३२॥पितृआज्ञेनें सुंदरी ॥ नौका रक्षी यमुनातीरीं ॥ परी जन्मली ते मत्स्योदरीं ॥ दुर्गंधि आंगीं बहुतचि ॥१३३॥तों तीर्थयात्रा करीत ॥ पराशर ऋषि पातला तेथ ॥ सत्यवती बसून नौकेंत ॥ नेती जाहली पैलपारा ॥१३४॥मध्यभागीं नौका जात ॥ देखून परम एकान्त ॥ मन्मथें व्यापिला शक्तिसुत ॥ विलोकीत तियेतें ॥१३५॥म्हणे पद्मनेत्रे सुंदरी ॥ मजशीं सुरतानंदें क्रीडा करीं ॥ मग बोले दाशकुमारी ॥ विपरीत कर्म केवीं करूं ॥१३६॥अंगनादेह विक्रीत यथार्थ ॥ पुढें वरग्राहक न ये कीं सत्य ॥ भंगितां माझें कुमारीत्व ॥ पुढें अनर्थ जन्मवरी ॥१३७॥दिवसप्रथमप्रहर देख ॥ उभयतटीं पाहती लोक ॥ रहस्य प्रकटेल तात्कालिक ॥ उपहास जन्मवरी ॥१३८॥माझा पिता कैवर्तक पाहीं ॥ त्यासी प्रार्थून तूं मज घेईं ॥ ऋषि म्हणे इतुक्याचें कार्य नाहीं ॥ भोग देईं आतांचि ॥१३९॥पाहती जरी नारी नर ॥ पाहें माझा चमत्कार ॥ अभ्रें आच्छादूनि दिनकर ॥ धूम्राकार नभ झालें ॥१४०॥दुर्गंधि दवडूनि समग्र ॥ सुवासिक केलें तिचें शरीर ॥ भोंवता एक योजनमात्र ॥ सुगंध सुंदर धांवतसे ॥१४१॥मजशीं करितां सुरत ॥ तुझें न मोडे कुमारीत्व ॥ पुढें राव वरील यथार्थ ॥ वचन सत्य जाण पां ॥१४२॥मनांत म्हणे सुंदरी ॥ हा केवळ ईश्वर निर्धारीं ॥ सुरतयुद्धा ते अवसरीं ॥ प्रवर्तलीं दोघें जणें ॥१४३॥क्रीडाकौतुकेंकरून ॥ इच्छा जाहली परिपुर्ण ॥ पराशर म्हणे तुज निधान ॥ पुत्ररत्न होईल ॥१४४॥मनोरथ करुनि पूर्ण ॥ निघाला शक्तिनंदन ॥ तपा आंचवला पूर्ण ॥ पुन्हां साधूं चालिला ॥१४५॥तों नवमास भरतां पूर्ण ॥ पळोपळीं प्रकाशे जैसा अरुण ॥ कीं उदयाचलीं उगवे सहस्त्रकिरण ॥ तैसा पुत्र जन्मला ॥१४६॥षङ्गुणश्वर्यक्त ॥ जन्मला व्यास प्रतापवंत ॥ त्याचे ज्ञानास नाहीं अंत ॥ जो विख्यात त्रिभुवनीं ॥१४७॥एकमुखाचा ब्रह्मदेव ॥ केवल द्विबाहु रमाधव ॥ कीं भाललोचन शिव ॥ स्वयमेव अवतरला ॥१४८॥जो वसिष्ठाचा पणतू होय ॥ शक्तीचा पौत्र निश्चय ॥ त्या पराशरसुताचें महत्त्व ॥ पाहें कोणा न वर्णवे ॥१४९॥ऐसा तो शुकतात पूर्ण ॥ सत्यवतीउदररत्न ॥ जगद्नुरु कृष्णद्वैपायन ॥ यमुनाद्वीपीं जन्मला ॥१५०॥वेद शास्त्रें पुराणें बहुत ॥ चतुदेश विद्या कला समस्त ॥ सर्वविद्यापारंगत ॥ उपजतांच महाज्ञानी ॥१५१॥जननीस नमस्कारून पाहीं ॥ म्हणे तपा जावया आज्ञा देईं ॥ सत्यवती म्हणे ते समयीं ॥ तृप्ति नाहीं तुज पाहतां ॥१५२॥तुझा पाहतां वदनचंद्र ॥ नृत्य करी मम मानसचकोर ॥ व्यास म्हणे स्मरतांच सत्वर ॥ येईन मी तुजपाशीं ॥१५३॥ऐसा दावूनि संकेत ॥ योगमार्गें गेला गुप्त ॥ नाहीं मोडलें कुमारीत्व ॥ सुखी जाहली सत्यवती ॥१५४॥ज्याचे मुखकमलापासून ॥ चिद्रस द्रवला परिपूर्ण ॥ वाङ्नयामृतेंकरून ॥ त्रिजगत पूर्ण धालें हो ॥१५५॥वेदार्थ केला सुगम ॥ म्हणोन वेदव्यास नाम ॥ कीं वेदाब्जविकासक परम ॥ व्यासभास्कर जन्मला ॥१५६॥पंचम वेद भारत ॥ शिष्यपुत्रांलागीं देत ॥ पुलस्ति जैमिनि सुमंत ॥ गालव आणि संजय ॥१५७॥सहावा शुक निजसुत ॥ ज्ञानी केला अत्यद्भुत ॥ जेणें श्रवण करवून भागवत ॥ परीक्षिति उद्भरिला ॥१५८॥इतुका जाहलिया गतकथार्थ ॥ जनमेजय राव पुसत ॥ आमच्या पूर्वजांसी भारत ॥ किमर्थ म्हणती सांग पां ॥१५९॥यावरी बोले वैशंपायन ॥ कुरुवंशीं विख्यात पूर्ण ॥ दुष्यंत राजा गुणनिधान ॥ चक्रवर्ती जन्मला ॥१६०॥प्राची प्रतीची उत्तर दक्षिण ॥ चार्ही दिशा आक्रमून ॥ पृथ्वीचें राज्य संपूर्ण ॥ आज्ञेंत चालवी राव तो ॥१६१॥नऊ खंडें छप्पन्न देश ॥ सप्तद्वीपींचे लोक निशेःष ॥ दुष्यंतराजा निर्दोष ॥ धनें वसनें तोषवी ॥१६२॥ज्याचे भाग्याची गणना ॥ नव्हेचि कदा सहस्त्रवदना ॥ सौंदर्यासी मदन उणा ॥ देवराणा दुसरा तो ॥१६३॥अधर्माची कांहीं वार्ता ॥ राज्यांत नाहीं तत्त्वतां ॥ दुःख दरिद्र रोग पाहतां ॥ कोणालागीं नसेचि ॥१६४॥यथाकालीं वर्षे घन ॥ सुखरूप नांदती चार्ही वर्ण ॥ वेदघोषें गर्जती ब्राह्मण ॥ चर्चा करिती शास्त्रांची ॥१६५॥वर्णूं काय आतां बहुत ॥ विष्णूसमान तो राव दुष्यंत ॥ षङ्गुणैश्वर्य़मंडित ॥ प्रतापसूर्य तेजस्वी ॥१६६॥बळें परम तो सबल ॥ उपडूं शके मंदराचल ॥ दुष्टदंडनीं प्रत्यक्ष काल ॥ उदार मेघासारिखा ॥१६७॥वेदशास्त्रीं निपुण बहुत ॥ धनुर्वेदपारंगत ॥ नाना वहनीं बैसोन फिरत ॥ नसे अंत विद्येसी ॥१६८॥दुष्यंत राव मृगयेसी ॥ निघाला एकदां दलभारेंसीं ॥ कीं समुद्र फुटे तैसी ॥ सेना चाले सांगातें ॥१६९॥चतुरंगदल अद्भुत ॥ मिरवत जातसे दुष्यंत ॥ नारी नर गोपुरींहूनि पाहात ॥ म्हणती मन्मथ दुसरा हा ॥१७०॥तंतवितंतघनसुस्वर ॥ वाद्यें वाजती अपार ॥ चंड पर्वत नद्या थोर ॥ उल्लंघून जातसे ॥१७१॥नानावृक्षमंडित ॥ वनें उपवनें देखे अद्भुत ॥ ऋष्याश्रम विलोकीत ॥ दर्शनें घेत जातसे ॥१७२॥दुष्ट श्वापदें अपार वधीत ॥ येता जाहला कश्यपारण्यांत ॥ कण्वऋषीचे आश्रमांत ॥ प्रवेशला राजेंद्र तो ॥१७३॥तों कोणी न दिसे समोर ॥ मग गंभीर गर्जे नृपवर ॥ म्हणे आश्रमीं आहे काय ऋषीश्वर ॥ प्रत्युत्तर कोणी नेदी ॥१७४॥तों लावण्यामृतसरिता ॥ बाहेर आली ऋषिदुहिता ॥ कीं शात कुंभदिव्यलता ॥ सुगंधखाणी पद्माक्षी ॥१७५॥विकुंठवनिता रमा ॥ तिची दुसरी हे अपर प्रतिमा ॥ कीं सरस्वती आणि उमा ॥ द्यावी उपमा तयांची ॥१७६॥रुपयौवनचातुर्यखाणी ॥ मंडित दिव्यकनकाभरणीं ॥ राजेंद्रासी सन्मानूनी ॥ आसन देत बैसावया ॥१७७॥स्वागत पुसोन समस्त ॥ अर्ध्यपाद्यविधीं पूजित ॥ राव तोषला मनांत ॥ म्हणे मंडित सर्वगुणीं ॥१७८॥मग बोले ते कामिनी ॥ राजचक्रचूडामणी ॥ तुमचें नाम ऐकावें श्रवणीं ॥ ऐसें मनीं वाटतें ॥१७९॥स्त्रेह दिसतो बहुत ॥ अंतर शब्दें जाणवा समस्त ॥ मग बोले दुष्यंत ॥ वचनें तृप्त जाहलों ॥१८०॥सुलक्षण चातुर्यखाणी ॥ मैथिलनरेंद्र विख्यात त्रिभुवनीं ॥ त्याचा पुत्र मी सुलक्षणी ॥ दुष्यंतराव नाम माझें ॥१८१॥कण्वऋषीचें दर्शन घ्यावें ॥ म्हणून आलों सद्भावें ॥ केव्हां येतील बोलावें ॥ सुवदने पिकस्वरे ॥१८२॥शकुंतला म्हणे नृपनाथा ॥ फळें आणावया गेला पिता ॥ तो येईल त्वरित आतां ॥ विलंब कांहीं न लागेचि ॥१८३॥यालागीं नृपचक्रमुकुटावतंसा ॥ क्षणभरी तुम्ही स्वस्थ वैसा ॥ इच्छा असेल जे मानसा ॥ ते परिपूर्ण होईल ॥१८४॥देखोनि परम एकान्त ॥ राजास जाची मन्मथ ॥ पुन्हां तीस बोलावीत ॥ राव दुष्यंत चतुर तो ॥१८५॥ राव म्हणे सद्नुणखाणी ॥ ऊर्ध्वरेता कण्वमुनी ॥ त्यासी तूं जाहलीस नंदिनी ॥ प्रकट वचन करीं तें ॥१८६॥मग चातुर्यसरोवरमराळी ॥ बोलत सुरस ते वेळीं ॥ म्हणे एका तपस्वियाजवळी ॥ कण्वें कथा सांगितली ॥१८७॥ते म्यां मनीं धरिली पूर्ण ॥ तेच तुजपाशीं सांगेन ॥ पूर्वीं विश्वामित्र गाधिनंदन ॥ तप दारूण तेणें केलें ॥१८८॥तपःपुण्याचल वाढे अद्भुत ॥ त्यापुढें मेरु ढेंकूळ दिसत ॥ पुरंदर चित्तीं चिंताक्रांत ॥ मग प्रेरीत मेनिकेतें ॥१८९॥म्हणे जाऊन तूं सुंदरी ॥ कौशिकतपासीक्षय करीं ॥ मी पुरवीन सामग्री ॥ जें जें इच्छिसी मानसीं ॥१९०॥येरी म्हणे विश्वामित्र ॥ तपस्वियांमाजी अति पवित्र ॥ भूमंडळीं अपरिमित ॥ उदयास्तरहित तो ॥१९१॥हा प्रतिसृष्टीचा धाता पूर्ण ॥ शापें भस्म करील त्रिभुवन ॥ मग बोले सहस्त्रनयन ॥ साधीं कारण एवढें ॥१९२॥वस्त्रें अलंकारमंडित ॥ मेनिका आली कौशिकारण्यांत ॥ ऋषीस नमूनि त्वरित ॥ नृत्यकौतुककला दावी ॥१९३॥मग वस्त्रें ठेवूनि तीरीं ॥ स्त्रान करी कासारीं ॥ सवेंचि आली बाहेरी ॥ वस्त्रें घ्यावयाकारणें ॥१९४॥तों मलयाचलींचा सुगंध वात ॥ वस्त्र तिचें उडवून नेत ॥ येरी नग्नचि चमकत ॥ धांवे वस्त्र धरावया ॥१९५॥वामहस्त कामसदनीं ॥ झांकूनि धांवे लावण्यखाणी ॥ मृगेंद्रकटी कुरंगनयनी ॥ विलोकिली कौशिकें ॥१९६॥विसरला वैराग्यज्ञान ॥ धांवोन देत आलिंगन ॥ सुरतानंदें दोघें पूर्ण ॥ क्रीडत एकांतीं यथेच्छ ॥१९७॥बहुकाल तीस भोगीत ॥ तेव्हां जाहला वीर्यपात ॥ मग ऋषि सावध होत ॥ म्हणे तपासी आंचवलों ॥१९८॥कौशिक तपासी चालिला पुढती ॥ मेनिका जाय स्वर्गाप्रती ॥ वाटेस हिमालय पर्वतीं ॥ गर्भ टाकिला तत्काल ॥९९॥कन्यारूप बाळ सत्वर ॥ टाकूनि गेली ते निष्ठुर ॥ पक्षी मिळोनि समग्र ॥ पक्षच्छाया वरी करिती ॥२००॥मधुरस आणून स्त्रेहमेळीं ॥ मुखीं घालिती क्षुधाकाळीं ॥ कोणी दुष्ट येतां जवळी ॥ झडपूनि दवडिती आवेशें ॥२०१॥तों कण्व ऋषि आला तेथ ॥ देखे बाळ रक्षिती शकुंत ॥ उचलोनि ओसंगा घेत ॥ गृहा आणूनि प्रतिपाळी ॥२०२॥शकुंतीं रक्षिली यथार्थ ॥ शकुंतला नामें पिता बाहत ॥ पालन केलें आजपर्यंत ॥ इतुका वृत्तान्त असे हा ॥२०३॥मनीं म्हणे दुष्यंत ॥ हे स्वर्गींची अप्राप्त वस्त ॥ मज होईल जरी प्राप्त ॥ नाहीं अंत भाग्यासी ॥२०४॥दुष्यंत म्हणे नितंबिनी ॥ तूं लावण्यरत्न खाणी ॥ तुज वास या काननीं ॥ योग्य नव्हे तत्त्वतां ॥२०५॥तरी लाज सांडून सकळी ॥ जरी मज वरिसी ये काळीं ॥ कीर्ति वाढेल या भूमंडळीं ॥ पट्टराणी तूं साच ॥२०६॥देवां दुर्लभ पदार्थ ॥ ते ते मत्सदनीं आहेत यथार्थ ॥ पृथ्वीची स्वामिनी सत्य ॥ होशील आजपासूनी ॥२०७॥अष्टविवाहांमाजी जाण ॥ उत्तम असे गांधर्वलग्न ॥ जरी घेईल तुझें मन ॥ तरी माळ घालीं कां ॥२०८॥मग म्हणे शकुंतला ॥ यथार्थ बोलसी चतुर भुपाला ॥ परी पितयास न सांगतां ये वेळां ॥ व्यभिचारकर्म दिसे हें ॥२०९॥तरी क्षणभरी राहें तत्त्वतां ॥ आतां आश्रमा येईल माझा पिता ॥ त्यापाशीं मागोन करीं कांता ॥ नृपनाथा गुणालया ॥२१०॥येरू म्हणे आपुलें मन ॥ आपणा वडील आहे पूर्ण ॥ आदि मध्यें अंतीं जाण ॥ आपुले आपण सांगाती ॥२११॥शकुंतला विचारी मनीं ॥ हा गेलियावरी एथुनी ॥ द्दष्टीं न पडे पुन्हां नयनीं ॥ बहुत तपें साधितां ॥२१२॥मग हास्यवदनें बोलत ॥ मज भाष द्यावी यथार्थ ॥ माझे पोटीं होईल जो सुत ॥ राज्यछत्र द्यावें तया ॥२१३॥दुष्यंत उचलोन हस्त ॥ त्रिवार तियेसी भाष देत ॥ तूं पटटराणी यथार्थ ॥ तुझा पुत्र छत्रपति ॥२१४॥हें माझें सत्यवचन ॥ उल्लंघूं न शके विधि ईशान ॥ मग शकुंतला माळ घालून ॥ अनुसरली तयासी ॥२१५॥संपूर्ण जाहलें सुरत ॥ गर्भ राहिला उदरांत ॥ ऋषिभयें राव निघत ॥ मग बोले तियेसी ॥२१६॥देऊनि आलिंगन चुंबन ॥ म्हणे तुज न्यावया पाठवीन ॥ छत्रें चामरें शिबिका यान ॥ तुज धाडीन आणावया ॥२१७॥राव निघे वेगेंकरून ॥ तिजविषयीं गुंडाळत मन ॥ परी कण्वभय वाटे दारुण ॥ शापील येऊनि महाऋषि ॥२१८॥मार्गस्थ पाहून नृपाला ॥ सद्नद होय शकुंतला ॥ तों कण्वऋषि आश्रमा आला ॥ घरांत अबला लपतपे ॥२१९॥ऋषीनें जाणिलें ज्ञानद्दष्टीं ॥ दुष्यंताशीं पडली गांठी ॥ संतोषोनि परम पोटीं ॥ आश्वासीत कन्येतें ॥२२०॥मनीं कांहीं न धरावें आन ॥ उत्तम जाहलें गांधर्वलग्न ॥ येरीनें धांवोनि धरिले चरण ॥ वर्तमान सकल सांगत ॥२२१॥कण्व परम आनंदत ॥ म्हणे पुरले माझे मनोरथ ॥ तुझा भ्रतार आयुष्मंत ॥ तुजसहित सुखी असो ॥२२२॥ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ पुढें कथा रसाळ फार ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ शकुंतलाख्य़ान हें ॥२२३॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ तृतीयाध्यायीं कथियेला ॥२२४॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्रीधरकृत ॥ व्यासजन्म शकुंतलादुष्यंत ॥ यांचें चरित्र कथियेलें ॥२२५॥इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे तृतीयाध्यायः ॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP