मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ३९ वा

पांडवप्रताप - अध्याय ३९ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ जो इंदिरावर पद्मनेत्र ॥ जो सौंदर्यनभींचा अक्षय्य चंद्र ॥ भक्तकामकल्पद्रुम यादवेंद्र ॥ कौरवसभेसी विराजे ॥१॥
शिष्टाई करूं आला श्रीकरधर ॥ हें ऐकोनि नारदादि ऋषीश्वर ॥ सभेसी पातले समग्र ॥ ते पूजिले धृतराष्ट्रें ॥२॥
नवग्रहांत वासरमणी ॥ तेवीं सभेंत शोभे चक्रपाणी ॥ कर्ण दुर्योधन एकासनीं ॥ बैसती परम प्रीतीनें ॥३॥
श्रीकृष्णा जावळी बैसला विदुर ॥ जेवीं शक्रासमीप अंगिरापुत्र ॥ भीष्म द्रोण गौतम कुमार ॥ गुरु तनुज बैसला ॥४॥
मेघ गंभीरगिरा गर्जोन ॥ धृत राष्ट्रासी म्हणे जगज्जीवन ॥ सकळ राजे शल्या दिकरून ॥ तटस्थ होऊन ऐकती ॥५॥
पांडव कौरव बंधु प्रसिद्ध ॥ त्यांमध्यें पडला जो विरोध ॥ तो दूर करूनि विषाद ॥ त्वां कुरुकुळ रक्षावें ॥६॥
तूं वडील सर्वांसी निर्धारीं ॥ न ऐकती त्यांसी दंड करीं ॥ तुझे पुत्र तूं शिकवूनि आवरीं ॥ पांडव आणितों मी आतां ॥७॥
टाकोनि कुटिलता कपट सकळ ॥ स्नेह वाढवावा एथूनि सबळ ॥ स्तुतिवाद बोलतां निर्मळ ॥ निंदा मागील सहज विरे ॥८॥
पांडव बळकट स्वशक्तीं ॥ धर्मनीति न सांडिती ॥ ऐकें वृद्ध कुरुकुलनृपती ॥ कुळ रक्षीं आपुलें ॥९॥
निर्दो यश पदरीं घेईं ॥ पांचही पार्थ समजावीं लवलाहीं ॥ तुझे आज्ञेनें वनवास तिंहीं ॥ त्रयोदश वर्षें पैं केला ॥१०॥
धर्में सांगितलें तुजला गून ॥ तूं मायबाप गुरु आम्हां पूर्ण ॥ निजपुत्रांसी शिकवून ॥ आपणा जवळी ने आम्हां ॥११॥
श्रीरंग म्हणे अंबिका नंदना ॥ चित्त देईं माझिया वचना ॥ तव पुत्रांचे अन्याय नाना ॥ मागील सर्व क्षमा केले ॥१२॥
राज सूययज्ञीं तिंहीं सहज ॥ जिंकिले पृथ्वीचे भूभुज ॥ पंडुनृपें पूर्वीं राज्य ॥ गजपुरींचें केलें असे ॥१३॥
परदारा आणि परधन ॥ येथें कदा न ठेविजे मन ॥ वेदमर्यादा नुल्लंघावी पूर्ण ॥ प्राणान्तही जाहलिया ॥१४॥
सदा सेवावे संत सज्जन ॥ गुरु भजनीं सावधान ॥ दूरी त्यागावे दुर्जन ॥ त्यांचें अवलोकन न करावें ॥१५॥
साधु संत गोब्रह्नण ॥ ह्यांचें करावें प्रति पालन ॥ सकल दुष्टांसी दवडुन ॥ स्वधर्म पूर्ण रक्षावा ॥१६॥
जरी क्लेशकाळ पातला बहुत ॥ तरी धैर्य न सांडावें यथार्थ ॥ गुरु भजनीं पुण्य पंथ ॥ न सोडावा सर्वथा ॥१७॥
साधूंच न करावा मान भंग ॥ भगवद्भ जनीं झिजवावें अंग ॥ टाकूनि सकळ कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥१८॥
कथा कीर्तन पुराण श्रवण ॥ काळ क्रमावा येणें करून ॥ आपुला वर्णा श्रम धर्म पूर्ण ॥ सहसाही न सांडावा ॥१९॥
ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावें ॥ विश्व हें अवघें पहावें ॥ आत्मरूप केवळ ॥२०॥
सत्यंग धरावा आधीं ॥ नायकावी दुर्जनाची बुद्धी ॥ कामक्रोधा दिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥२१॥
मी जाहलों सर्वज्ञ ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही पराचें छळण ॥ न करावें कदाही ॥२२॥
शमद मादिक साधनें ॥ दूर न करावीं साधकानें ॥ जन जाती जे आडवाटेनें ॥ त्यांसी सुमार्ग दाविजे ॥२३॥
क्षणिक जाणोनि संसार ॥ सोडावा विषयां वरील आदर ॥ सद्नुरु वचनीं सादर ॥ चित्त सदा रक्षावें ॥२४॥
शोक मोहांचे चपेटे पूर्ण ॥ अंगीं आदळती येऊन ॥ विवेकाचें ओढण करून ॥ ज्ञान शस्त्रें परजावें ॥२५॥
काम क्रोध मद मत्सर ॥ हे गृहांत य़ेऊं न द्यावे तस्कर ॥ आयुष्य क्षणिक जाणोनि साचार ॥ सारासार विचार करावा ॥२६॥
दैवें भाग्य आलें थोर ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ अथवा एक दांचि गेलें समग्र ॥ तरी धीर न सांडावा ॥२७॥
ज्या गोष्टीनें अनर्थ होय ॥ आपुलें कुळ पावे क्षय ॥ ते गोष्टी चतुरवर्य ॥ मान्य कदा न करिती ॥२८॥
हातींचें टाकूनि सुवर्ण ॥ कां बळेंचि घ्यावें शेण ॥ गोड शर्करा ओसंडून ॥ राख कां मुखीं घालावी ॥२९॥
मुक्ता टाकोनि सुंदर ॥ कां पदरीं बांधावे कंकर ॥ ओसंडूनि केळें सुंदर ॥ अर्कफळें कां भक्षावीं ॥३०॥
टाकोनियां शुद्ध पंथ ॥ आडमार्गें जो गमन करीत ॥ त्यासी अपाय येतील यथार्थ ॥ यासी संदेह नसेचि ॥३१॥
सर्वांसी विरोध करून ॥ आपुलें व्हावें म्हणे कल्याण ॥ तो अनर्थीं पडेल पूर्ण ॥ यासी संदेह नसेचि ॥३२॥
वेदशास्त्रीं जें अनुचित ॥ तेथें बळेंचि घाली चित्त ॥ तेणें आप आपणा केला घात ॥ यासी संदेह नसेचि ॥३३॥
परस्त्रियांचा अभिलाष ॥ महा पुरुषासी ठेवणें दोष ॥ बलवंताशीं बांधणें कांस ॥ मग अनर्थास काय उणें ॥३४॥
महासर्प उसां घेऊनी ॥ केवीं निजावें सुखशयनीं ॥ बळेंचि गृहासी लावितां अग्नी ॥ मग अनर्थासी काय उणें ॥३५॥
विवेकसद्वुद्धींचा बळें ॥ अनर्थ तितुका टाळावा कुशळें ॥ संतवचनें प्रांजळें ॥ ह्रदयीं द्दढ धरावीं ॥३६॥
परद्रव्याचा अभिलाष ॥ जाणूनि प्राशन करणें विष ॥ परनिंदा परद्वेष ॥ करितां अनर्थास काय उणें ॥३७॥
पाषाण बांधोनि ह्रदयीं ॥ उडी घातली महाडोहीं ॥ अहिमुखीं हस्त घालितां पाहीं ॥ मग अनर्थासी काय उणें ॥३८॥
नर तोचि पुरुषार्थी जाण ॥ परसती आणि परधन ॥ एथें जो कदा न घाली मन ॥ तोचि धन्य शास्त्र म्हणे ॥३९॥
मानससरोवरींचा राजहंस पाडीं ॥ कदा न राहे उलूक गृहीं ॥ कल्पद्रुमींचा विहंगम सहसाही ॥ बाभुळेवरी न बैसे ॥४०॥
सुधारस त्यजूनि निर्मळ ॥ कोणासी आवडे हालाहल ॥ सांडूनि उत्तम तंडुल ॥ सिकता कां हो शिजवावी ॥४१॥
क्षीराब्धी माजी जो राहणार ॥ त्यासी नावडे दग्धकांतार ॥ सदाचार वृत्ति नर ॥ हिंसकसदनीं न राहे ॥४२॥
अंतरीं जाणोनि यथार्थ ॥ अन्यथा बळेंचि प्रतिपादीत ॥ न करावें तें हटें करीत ॥ तरी अनर्थ जवळी आला ॥४३॥
ऐकें नीति कौरवेश्वरा ॥ बळेंचि कां आणितां अनर्थ घरा ॥ हिरे सांडूनि गारा ॥ संग्रहितां काय सार्थक ॥४४॥
कल्पद्रुम उपटून ॥ कां वाढवितां कंटकवन ॥ राज हंस दवडून ॥ दिवा भीतें कां पाळितां ॥४५॥
सुधारस ओसंडूनि देख ॥ कांजी पितां काय सार्थक ॥ सुरभि दवडूनि सुरेख ॥ अजा कासया पाळावी ॥४६॥
वृंदावन वरी चांगलें ॥ परी आंत कालकूट भरलें ॥ तें न सेवावें कदाकाळें ॥ विवेकियानें सहसाही ॥४७॥
फणसफळाचे फळासमान ॥ कनकफळही दिसे पूर्ण ॥ परी तें भुलीस कारण ॥ विवेकियानें त्यजावें ॥४८॥
श्रीरंगाचीं सारवचनें ॥ जीं विवेकनभींचीं उडुगणें ॥ सद्बुद्धि सागरींचीं तीं रत्नें ॥ दुर्योधनें उपक्षिलीं ॥४९॥
कमल पत्राक्ष कृपाघन ॥ वर्षला स्वातीचा पर्जन्य ॥ परी पालथा घट दुर्योधन ॥ बिंदुमात्र आंत न सांचे ॥५०॥
शब्दा मृत वर्षला कृष्ण चंद्र ॥ जेणें निवती भक्तचकोर ॥ दुर्योधन काक दुराचार ॥ त्यासी ते गोष्टी कळेन ॥५१॥
कमल सुवास सुंदर ॥ परी काय घेऊं जाणे दर्दुर ॥ मुक्तफलाचा आहार ॥ बक काय घेऊं जाणे ॥५२॥
कस्तूरीचा सुवास ॥ परी काय घेऊं जाणे वायस ॥ तत्त्वविचार मद्यपियास ॥ काय व्यर्थ सांगोनी ॥५३॥
आणोनियां केशर ॥ खर लेपिला अत्यादर ॥ परी त्यासी न साजे अणुमात्र ॥ तैसा प्रकार हा जाणावा ॥५४॥
जन्मांधापुढें नेऊन ॥ व्यर्थ काय रत्नें ठेवून ॥ कीं उत्तम सुस्वर गायन ॥ बधिरा पुढें व्यर्थ केलें ॥५५॥
पतिव्रतेचे धर्म सकळ ॥ जारिणीस काय सांगोनि फळ ॥ धर्मशास्त्र श्रवण रसाळ ॥ वाटपाडयासी कायसें ॥५६॥
गिरिमस्तकीं वर्षें जलधर ॥ परी तेथें अणुमात्र न राहे नीर ॥ तैसा बोधिला अंधकुमार ॥ नव्हेचि स्थिर बोध तेथें ॥५७॥
नित्य दुग्धें न्हणिला वायस ॥ परी कदा नव्हे राजहंस ॥ कीं दह्यांमाजी कोळसा बहु दिवस ॥ ठेवितां उजळ नव्हेचि ॥५८॥
हरळ शिजविलें बहुकाळ ॥ परी कदा नव्हे मवाळ ॥ परीस नेऊनि अमोल ॥ खापरासी घांसिला ॥५९॥
षोडशोपचारें पूजिलें प्रेत ॥ तें जैसें सर्व गेलें व्यर्थ ॥ तैसा बोधिला कौरवनाथ ॥ परी तो नायके सर्वथा ॥६०॥
निर्बळाहातीं दिधलें शस्त्र ॥ बोरीवर घातलें दिव्यवस्त्र ॥ कीं अत्यंत दिव्य मंत्र ॥ अपवित्रासी सांगितला ॥६१॥
दुग्ध उकरडां ओतिलें ॥ कीं मसणीं मंडप दिधलें ॥ कीं मृगमदें लेपिलें ॥ टोणग्याचें अंग जैसें ॥६२॥
सभेसी बैसले ऋषीश्वर ॥ त्यांत बोलता जाहला रेणुकापुत्र ॥ जेणें धरणी हे सर्वत्र ॥ केली निःक्षत्रिय जाण पां ॥६३॥
तो कल्याण राम होय बोलता पूर्वीं दंभोद्भव राजा होता ॥ तेणें गर्व केला तत्त्वतां ॥ मीच योद्धा रणपंडित ॥६४॥
मृगयेसी गेला तो नृपवर ॥ तों द्दष्टीं देखिला ताप सभार ॥ नमन न करितां तो पामर ॥ गर्वेंकरूनि पुसतसे ॥६५॥
मज योद्धा दाखवा कोणी ॥ तों ऋषी बोलिले तये क्षणीं ॥ नरनारायण बररीवनीं ॥ तप करिती तेथें जाईं ॥६६॥
मग दळभाराशीं तो दुरात्मा ॥ आला नरनारायणा श्रमा ॥ म्हणे मागणें एक तुम्हां ॥ तेंचि सत्वर देइंजे ॥६७॥
अवश्य म्हणती नरनारायण ॥ तरी उठा युद्ध करा दोघे जण ॥ ते म्हणती सिद्ध करीं सकळ सैन्य ॥ शस्त्र धरून उभा ठाकें ॥६८॥
सैन्यासह तो शतमूर्ख पूर्ण ॥ वर्षता जाहला असंख्य बाण ॥ नरें मुष्टिभर दर्भ घेऊन ॥ झुगारिले तयावरी ॥६९॥
त्रुटि न वाजतां साचार ॥ जाहला सर्व सैन्याचा संहार ॥ एकला उरला तो नृपवर ॥ शरण आला तयांसी ॥७०॥
मग प्राणदान देऊन ॥ सोडिला तिंहीं कृपा करून ॥ तेचि हे नरनारायण कृष्णार्जुन ॥ अवतार पुरुष देघेही ॥७१॥
आपुलें कल्याण इच्छीतसां जर ॥ तरी त्यांसीं मैत्री करा सत्वर ॥ जों रथीं चढला नाहीं वीर ॥ कपिवर ध्वज प्रतापी ॥७२॥
सच्चिदानंद नीलगात्र ॥ अर्जुना पुढें शतपत्रनेत्र ॥ सारथ्य न करी तंव सत्वर ॥ करा मैत्री त्वरेनें ॥७३॥
ऐसें बोलतां जामदग्न्य ॥ संतोषले सकळ संत सज्जन ॥ यावरी कण्वऋषि सज्ञान ॥ सुरस वचन बोलत ॥७४॥
गांडीव धनुष्य अक्षय्य भाते ॥ पूर्वीं रचिले विष्णु सुतें ॥ ते प्राप्त जाहले पार्थातें ॥ पूर्व दत्तेंकरूनियां ॥७५॥
पंच देवांचे अवतार ॥ हे पांचही पंहुपुत्र ॥ एक यमधर्म साचार ॥ लोक प्राणेश दूसरा ॥७६॥
तिसरा साक्षात पुरंदर ॥ दोघे जाण अश्चिनी कुमार ॥ तेचि हे पांच दिवाकर ॥ पंडुपुत्र जाण पां ॥७७॥
तरी दुर्योधना ऐकें लवलाहीं ॥ उपलव्या प्रति तूंचि जाईं ॥ पांचही पार्थ घेऊनि येईं ॥ निर्मत्सर होऊ नियां ॥७८॥
आणि कही बहु संतीं ॥ दुर्योधनासी सांगितली नीती ॥ मग तो भृकुटीस घालोनि आंठी ॥ क्रोधें संतप्त बोलत ॥७९॥
मांडी थापटूनि सुयोधन ॥ बोले कर्णाकडे पाहोन ॥ कैचा तूं आम्हां सांगसी ज्ञान ॥ तुवां अनुष्ठान करावें ॥८०॥
नारद म्हणे दुर्योधना ॥ शरण रिघें श्री कृष्ण चरणा ॥ आग्रह करितां विघ्ना ॥ वरपडा तूं होसील ॥८१॥
अंध म्हणत जगज्जीवना ॥ हा पुत्र माझें ऐकेना ॥ मदोन्मत्त नावरे कवणा ॥ दुष्टवचना बोलतो ॥८२॥
दुर्योधन म्हणे कृष्णासी ॥ तूं शिष्टाई करूं आलासी ॥ आमुचे घरीं न राहसी ॥ न जेविसी काय म्हणोनी ॥८३॥
त्यजोनियां भीष्म द्रोण ॥ माझें उपेक्षूनि सदन ॥ विदुर कुटिल दासी नंदन ॥ त्याचे गृहीं जेविलासी ॥८४॥
मग बोले राजीवनेत्र ॥ विदुरा ऐसा कोण पवित्र ॥ त्रिकाल ज्ञानी पंडित चतुर ॥ तयासी शूद्र म्हणेल कोण ॥८५॥
भगवद्भक्तां अनन्य शरण ॥ तो शूद्र होत्साता परम पावन ॥ राक्षसांमाजी बिभीषण ॥ प्रर्‍हाद जाण दैत्यांत ॥८६॥
किरातांमाजी गुहक प्रसिद्ध ॥ अंत्यजांमाजी धर्मव्याध ॥ सत्यतुलनी नामें शुद्ध ॥ वणिक भक्त जाहला ॥८७॥
श्रीधर म्हणे श्रोतयांला ॥ कलियुगीं अजामेळ चोखा भोळा ॥ कबीर प्रिय हा विठ्ठलाला ॥ नाहीं जातीवरी प्रमाण ॥८८॥
मज रिघाला जो अनन्य शरण ॥ तो शूद्र हो अथवा ब्राह्मण ॥ मज मुख्य भक्ति प्रमाण ॥ नाहीं कारण ज्ञातीसी ॥८९॥
अभक्त बाह्मण कपटी दुष्ट ॥ तो अंत्यजाहूनि पापी वरिष्ठ ॥ मम द्वेषी सर्वथा भ्रष्ट ॥ विटाळ त्याचा न व्हावा ॥९०॥
विदुराचा बहुत आदर ॥ देखतां निवालें माझें अंतर ॥ भोजन गतजीर्ण साचार ॥ आदर अजरामर असे पैं ॥९१॥
मम भक्तास ठेविसी दूषण ॥ कोणाचें कुळ निर्दोष जाण ॥ तूं निजकुळ पाहें विचारून ॥ बोलतां दारूण निंदा घडे ॥९२॥
उर्वशीगर्भ संभूत ॥ वसिष्ठ ब्रह्म पुत्र विख्यात ॥ परम तपें पावला ब्रह्मत्व ॥ जाती तेथें कायसी ॥९३॥
हरिणी गर्भा पासून ॥ ऋष्य श्रृंग जाहला निर्माण ॥ जेणें दशर थाचा करूनि यज्ञ ख्याती केली त्रिभुवनीं ॥९४॥
धीवरी पासोनि जनन ॥ तो महाराज कृष्ण द्वैपायन ॥ तुझे वडील तिघे जण ॥ त्याचे नंदन विचारीं हें ॥९५॥
विदुराशीं लाविसी दोष ॥ तरी सत्वरचि पावसी नाश ॥ माझे बोल वाटती विष ॥ परी पुढें अमृता समान ॥९६॥
औषध आधीं कडवट पूर्ण ॥ परी पुढें करी रोग हरण ॥ तैसीं माझीं वचनें जाण ॥ दूःखमोचक सुयोधना ॥९७॥
जैसी नाबद साखर ॥ मुखीं घालितां घालितां खडखडे फार ॥ परी पुढें गोडी अपार ॥ वचनें साचार माझी तैसीं ॥९८॥
तुरट वाटे आमलक ॥ परी पुढें गोडी अधिक ॥ तेवीं माझीं वचनें दुःख नाशक ॥ ह्रदयीं धरीं रे आवडीनें ॥९९॥
पिता पढवी पुत्रा लागून ॥ त्यासी तें वाटे विषासमान ॥ परी पुढें गोड अमृताहून ॥ महिमा जाण वाढे तेव्हां ॥१००॥
सुपुत्रासी द्दष्टांत ॥ दीपाचा देती पंडित ॥ परी तो एक देशी निश्चित ॥ प्रकाशत्वे करू नियां ॥१०१॥
दीप क्षणोक्षणीं जाळी गुण ॥ सत्पुत्र करी सद्नुण वर्धन ॥ दीप स्नेह टाकी आटवून ॥ काळिमा लावी सर्वांसी ॥१०२॥
सुपुत्रा पासूनि निर्धारें ॥ सुटती बहुत स्नेहाचे झ्ररे ॥ दीप स्थळ एक सरें ॥ चहूंकडे काळें करी ॥१०३॥
हा बैसे जेथें तेथें सोज्ज्वळ ॥ यशा ऐसें करी उज्ज्वळ ॥ दीप लागे तेथें जाळी सकळ ॥ सुपुत्र शीतळ सर्वांसी ॥१०४॥
दीप पात्रासी करी तप्त ॥ सुपुत्र सत्पात्रासी निववीत ॥ दीप पात्रा मेणी लावीत ॥ कोणी न धरीत हातीं तें ॥१०५॥
हा आपुलें स्ववंशपात्र ॥ उजळ करी सप्तगोत्र ॥ दीपासी काजळी ये सत्वर ॥ उबारा निरंतर करीतसे ॥१०६॥
दीपाची मैत्री क्षणैक पाहतां ॥ स्नेह सरतां न राहे तत्त्वतां ॥ जीवन वरी टाकितां ॥ तडतड न सोसे ॥१०७॥
वायु लागतां किंचित ॥ डळमळोनि जाय क्षणांत ॥ सुपुत्र सर्व गुणीं भरित ॥ विपरीत नसे एकही ॥१०८॥
दीपाचे पोटीं निपजावें रत्न ॥ तेथें काजळ होय कुलक्षण ॥ परी सुपुत्रा पासून ॥ भक्त सज्ञान उपजे पैं ॥१०९॥
तरी दीपासारिखाचि दुर्जन ॥ क्षणोक्षणीं जाळीत गुण ॥ स्नेह टाकी आटवून ॥ काळिमा लावी सर्वांसी ॥११०॥
जेथें बैसे तेथें जाळीत ॥ सत्पात्रासी न करी तृप्त ॥ स्ववंशीं डाग लावीत ॥ मेणी तेचि अमंगळ ॥१११॥
अखंड काजळी पोटांत ॥ नावडे जीवनशास्त्रार्थ ॥ बैसे तेथें उबारा करीत ॥ न शके देखों कोणासी ॥११२॥
न सोसे सत्समाग मवारें ॥ डळमळितां जाय त्वरें ॥ ऐकें दुर्योधना सादरें ॥ सुपुत्राचीं लक्षणें हीं ॥११३॥
शरीर व्यर्थ प्राणा विण ॥ तारुण्याविण पंचबाण ॥ दये विण व्यर्थ ज्ञान ॥ शांती विण वैराग्य पैं ॥११४॥
संपत्ति व्यर्थ धर्मा विण ॥ पंडिता विण सभा शून्य ॥ हरिणी विण व्यर्थ ॥ कानन ॥ दीपा विण सदन जेवीं ॥११५॥
वेदांतज्ञानावांचून ॥ कोरडी व्युत्पत्ति व्यर्थ शून्य ॥ कीं सत्पात्र विण दान ॥ स्नेहा विण बंधु जैसा ॥११६॥
जळा विण वापिका ॥ नृपा विण नगर देखा ॥ नासिकावांचूनि मुखा ॥ शोभा जैसी न येचि ॥११७॥
फळा विण तरुवर ॥ नाम स्मरणा विण मंदिर ॥ तैसा सत्पुत्रा विण पवित्र ॥ वंश सर्वथा नव्हेचि ॥११८॥
परमचतुर सुंदर ॥ मदना ऐसा व्हावा पुत्र ॥ जो प्रचंड प्रतापशूर ॥ ज्यासी जगत्रय धन्य म्हणे ॥११९॥
जैसी वेदाज्ञा प्रमाण ॥ तैसे वंदी मातृपितृचरण ॥ निजांगें सेवा करी अनुदिन ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२०॥
अपूर्व जी कां वस्त ॥ मातापित्यांसी आणूनि देत ॥ जोदिलें द्र्व्य न वेंचीत ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२१॥
माझीं माता पिता वृद्ध केवळ ॥ वांचोत ऐसींच बहु काळ ॥ मानी जैसीं उमाजाश्वनीळ ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२२॥
माता पिता गुरु देव ॥ येथें ज्याचा समान भाव ॥ नित्य नूतन आवडी अभिनव ॥ तो पुत्र धन्य संसारीं ॥१२३॥
शुक्तिकेचे पोटीं मुक्ताफळ ॥ रंभागर्भीं कर्पूर निर्मळ ॥ गिर्युदरीं हिरा तेजाळ ॥ तैसा सुपुत्र संसारीं ॥१२४॥
धन्य त्या पुत्राची जननी ॥ जिची कीर्ति मिरवे त्रिभुवनीं ॥ तेचि सर्वैश्वर्य खाणी ॥ ऐसा पुत्र प्रसवे जे ॥१२५॥
इतरा शूकरी श्वानी देखा ॥ अपवित्र त्या निपुत्रिका ॥ पुढें भोगितील महानरका ॥ नाहीं सुटका तयांसी ॥१२६॥
माता पिता घाली बाहेरी ॥ श्वशुरवर्ग सांठवी घरीं ॥ जो स्त्रीलंपत ॥ दुराचारी ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१२७॥
व्यर्थ काय करावे बहु सुत ॥ जैसे एक दांचि पडती जंत ॥ जो परम अविचारी उन्मत्त ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१२८॥
दारा कुमारां सर्व देत ॥ माता पिता यांसी दरिद्र भोग वीत ॥ कुशब्द बाणें ह्रदय भेदीत ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१२९॥
आपुली वस्तु पिता मागे ॥ त्यावरी डोळे फिरवी रागें ॥ म्हणे मी काय तुमचें ऋण लागें ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३०॥
पिता सांगे हितावह बोधा ॥ म्हणे हा सन्निपात झाला वृद्धा ॥ ह्र्दय पोळे ऐशा बोले शब्दा ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३१॥
म्हणे पिता माझा शतमूर्ख ॥ त्याहूनि मी अधिक चतुर देख ॥ मातेसी म्हणे करंटी शंख ॥ त्याचे भारें दूःखी धरा ॥१३२॥
माता पिता दोघें जण ॥ मेलीं करितां अन्न अन्न ॥ मग करूं धांवे गया वर्जन ॥ याचे भारें दुःखी धरा ॥१३३॥
असतां न बोले धड वचन ॥ करविलें नाहीं उदक पान ॥ मग लोकांसी दावी करूनि तर्पण ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३४॥
पुर्वीं केला अपमान ॥ मग श्रीद्धीं शत ब्राह्मण भोजन ॥ लटकें लोकां रडोन ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३५॥
पितृवचनीं उपजे त्रास ॥ कुशब्द बोले मातेस ॥ सद्नुरूशीं करी द्वेष ॥ त्याचे भारें दुःखी धरा ॥१३६॥
पितृवचनीं मानी दुःख ॥ मातेसी म्हणे कर्कशा देख ॥ स्त्रियेसी देत अत्य़ंत सुख ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१३७॥
सत्पुरुषाची करी निंदा ॥ अपमानी जो ब्रह्म वृंदा ॥ विद्या बळें प्रवर्ते वादा ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१३८॥
भक्त देखतां करी उपहास ॥ साधूंसी लावी नसते दोष ॥ सद्नुरूहूनि म्हणे मी विशेष ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१३९॥
निंदी सदा तीर्थक्षेत्रें ॥ असत्य मानी हरिहरचरित्रें ॥ निंदी वेद पुराणें शास्त्रें ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१४०॥
कायावाचामनें ॥ परपीडा हिंसा करणें ॥ भूतद्रोह करी जारण मारणें ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१४१॥
निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥ नसते काढी कुतर्कार्थ ॥ विद्यागर्वें सदा उन्मत्त ॥ तो अल्पायुष जाणावा ॥१४२॥
माझे गुणा नुवादाचें कीर्तन ॥ अव्हेरी जो न करी श्रवण ॥ टाकी विष्णु भक्ति उच्छेदून ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४३॥
मी विष्णु भक्त मोठा ॥ म्हणेनि निंदी नीलकंठा ॥ तपखी देखोनि करी चेष्टा ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४४॥
म्हणवूनि शिव भक्त निर्मळ ॥ जो विष्णुनिंदा करी चांडाळ ॥ नसते कुमार्ग स्थापी खळ ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४५॥
होतां साधूचा अपमान ॥ संतोष वाटे मनांतून ॥ करी वृद्धांचें मान खंडन ॥ त्यासी अधःपात सुटेना ॥१४६॥
सभेमाजी दुरुक्ति बोले ॥ जेणें भल्याचें ह्रदय उले ॥ जे सदा मत्सर विष्ठेनें माखले ॥ त्यांसी अधःपात सुटेना ॥१४७॥
निर्नासिक आर शांत न पाहे ॥ तोंवरीच रूपा भिमान वाहे ॥ म्हणे माझ्या रूपासी तुलना न ये ॥ रतिवरही शोधितां ॥१४८॥
असोत आतां हे बोल ॥ जो पितृवचन न करी सफळ ॥ तो अभागी केवळ ॥ महाखळ जाणावा ॥१४९॥
ऐसीं दुर्जनांचीं लक्षणें ॥ म्हणोनि वर्जिलीं सज्जनें ॥ तयांसी रौरव वसति स्थानें ॥ निर्मिलीं असती चंद्रार्कवरी ॥१५०॥
म्हणेनि ऐकें दुर्योधन ॥ समजावीं जाऊनि पंडुनंदनां ॥ घेऊनि येईं आपुले सदना ॥ धन्य त्रिभुवना माजी म्हणती ॥१५१॥
ते तुम्ही बंधु मिळोन ॥ जिंका उर्वी हे संपूर्ण ॥ तूं कर्ण शकुनि दुःशा सन ॥ यांची बुद्धि ऐकूं नको ॥१५२॥
त्या भीमाचा पुरुषार्थ ॥ ऐकिला कीं तुवां अत्युद्भुत ॥ हिडिंब बक किर्मीर बळवंत ॥ कीचक शत मारिले ॥१५३॥
एकल्या अर्जुनें जाऊन ॥ अग्नीस दिधलें खांडव वन ॥ एकलेनें केलें गोग्रहण ॥ द्रौपदी एकलेनें जिंकिली ॥१५४॥
एकलेनें गंधर्वां पासून ॥ तुम्हां आणिलें सोडवून ॥ निवात कवच मारून ॥ शक्रादि देवां तोषविलें ॥१५५॥
ऐसें ते बल संपन्न ॥ त्यांसी तुम्हीं सख्य़ करून ॥ आणावें गृहा बोलावून ॥ एक होऊन सुख भोगा ॥१५६॥
भीष्म म्हणे सुयोधना ॥ चित्त देईं श्री कृष्ण वचना ॥ घरा आणूनि पंडूनंदनां ॥ कुंभिनी सर्व जिंकावी ॥१५७॥
बोलती शारद्वत द्रोण ॥ दुर्योधना तूं सुजाण ॥ न मोडीं भगवंताचें वचन ॥ कुलरक्षण करीं आतां ॥१५८॥
विदुर म्हणे वडिलांचे वचना ॥ चित्त देईं दुर्योधना ॥ माय बाप दोघां जणां ॥ वृद्ध पणीं दुःख नेदीं ॥१५९॥
युद्ध करूं नको यावरी ॥ दीन होतील धृतराष्ट्र गांधारी ॥ वृद्धपणीं कोणाचे द्वारीं ॥ लोळतील सांग पां ॥१६०॥
अंध पक्षी पक्षहीन ॥ तैसीं दोघें होतील दीन ॥ तों धृतराष्ट्र बोले वचन ॥ ऐकें चतुरा सुयोधना ॥१६१॥
श्रीकृष्णाची पूजा करून ॥ रिघें तयासी अनन्य शरण ॥ तुझी पाठी अर्जुनाहून ॥ रक्षील श्रीकृष्ण निर्धारें ॥१६२॥
एकाचे खांडां एक हात घालून ॥ हिंडा कौरव पंडुनंदन ॥ एकचित्त मिळोन ॥ राज्य करा दोघेही ॥१६३॥
श्रीकृष्णासी म्हणे दुर्योधन ॥ तयांनीं राज्य हारविलें खेळोन ॥ पुढें करूनि तिंहींच पण ॥ वनवासाप्रति गेले ॥१६४॥
तूं त्यांचा पाठिराखा पाहीं ॥ आम्ही कवणा सही भीत नाहीं ॥ तूं मजला ठायीं ठायीं ॥ भेडसाविसी कासया ॥१६५॥
सुईच्या अग्रीं मृत्तिका जाण ॥ तितुकी नेदीं मी युद्धा विण ॥ माझी सेना पहा दारुण ॥ क्षणांत आटीन पांडवां ॥१६६॥
पांडव अत्यंत बलहीन ॥ स्त्री गांजिली सभे आणून ॥ क्षत्रिय असते तरी रण ॥ तेचि वेळे माज विते ॥१६७॥
माझा अन्याय कांहीं ॥ मज सर्वथा वाटत नाहीं ॥ तुम्ही वृद्ध मिळूनि सर्वही ॥ मज कां देखों शकाना ॥१६८॥
ऐसें ऐकतां वनमाळी ॥ आरक्तता नयनीं उदेली ॥ दुर्योधनासी ते वेळीं ॥ बोलता जाहला श्रीवल्लभ ॥१६९॥
अरे मूढा बुद्धिहीना ॥ तुझा अन्याय तुज वाटेना ॥ सभेसी आणिली पांडवललना ॥ हा न्याय कीं अन्याय ॥१७०॥
विष घालूनि मारिला भीम सेन ॥ लक्षा गृहीं लाविला अग्न ॥ घोषयात्रेच्या मिषें करून ॥ दरोडा घालूं पातलासी ॥१७१॥
हा न्याय कीं अन्याय पाहीं ॥ साक्ष येते कीं तुझे ह्र्दयीं ॥ जेव्हां एकाएकीं पडसी पाहीं ॥ राज्य ते समयीं देसील ॥१७२॥
कपिवर ध्वज देखसी नयनीं ॥ गांडीव ओढील पाकशा सनी ॥ तेव्हां आपणचि देसील मेदिनी ॥ न मागतां पांडवांसी ॥१७३॥
गदा घेऊनि भीम सेन ॥ दुःशासनाचें ह्रदय करील चूर्ण ॥ शोषील कंठींचें रुधिर उष्ण ॥ राज्य जाण मग देसी ॥१७४॥
भीष्म पहुडेल शरपंजरीं ॥ कर्णाचें शिर उडेल अंबरीं ॥ तेव्हां देसील हे सर्व धरित्री ॥ पंडुपुत्रांतें सहजचि ॥१७५॥
दुर्यो धन आणि दशमुख ॥ देखिले अत्यंत शतमूर्ख ॥ गोग्रहण आणि वनभंग देख ॥ दखोनि सावध न होती ॥१७६॥
अनिवार अर्जुनाचे बाणीं ॥ देह ठेवाल जेव्हां धरणीं ॥ मग आठवाल माझी वाणी ॥ प्राण त्याग कराल तेव्हां ॥१७७॥
दुःशा सन म्हणे दुर्योधना देख ॥ हे सभेचे सर्व जाहले एक ॥ अंध हा आमुचा जनक ॥ तोही मिळाल कृष्णकडे ॥१७८॥
मी तूं शकुनि आणि कर्ण ॥ चौघांसी क्षणांत आकळून ॥ देतील पांडवांहातीं बांधोन ॥ हें वर्तमान दिसे पुढें ॥१७९॥
क्रोधयुक्त दुर्यो धन ॥ कालसर्पापरी क्षोभला दारुण ॥ आपुले दुर्जन संगें घेऊन ॥ सभेमधून ऊठला ॥१८०॥
गंगात्मज म्हणे हा चांडाळ ॥ कुल संहारिलें येणें सकळ ॥ श्रीकृष्ण म्हणे हा बुडेल ॥ स्वकुल राज्या समवेत ॥१८१॥
हे चौघे दुर्जन बांधोन ॥ ठेवावे पांडवांपुढें नेऊन ॥ क्षत्त्यासी म्हणे अंविकानंदन ॥ जा सौबलीस घेऊन ये ॥१८२॥
क्षण न लागतां गांधारी ॥ विदुरें आणिली सभेभीतरी ॥ दुर्योधन तिणें ते अवसरीं ॥ माघारा आणिला सभेतें ॥१८३॥
गांधारी म्हणे सुयोधना ॥ ऐकें श्रीकृष्णा चिया हितवचना ॥ स्वकुल वांचवीं सुजाणा ॥ पांडुनंदनां बोलावूनी ॥१८४॥
माझें न ऐकसी वचन ॥ तरी बंधू सहित पावसी मरण ॥ माझें अन्यथा नव्हे भाषण ॥ आठविसी प्राण त्यागितां ॥१८५॥
न मानिसी वडिलांचें वचन ॥ न रिघसी श्रीकृष्णासी शरण ॥ तरी जय आणि कल्याण ॥ प्राप्त नाहीं तुम्हांसी ॥१८६॥
अव्हेरूनि मातेचें वचन ॥ पुढती दुर्योधन जाय उठोन ॥ मिळोनि चौघे दुर्जन ॥ गुज बोलती एकांतीं ॥१८७॥
या कृष्णासीच धरून ॥ करावें एथें द्दढ बंधन ॥ मग पांडव बलक्षीण ॥ शरण येतील आम्हांतें ॥१८८॥
त्या चौघांचें अंतर्ज्ञान ॥ सात्यकीस कळलें वर्तमान ॥ जैसा तरु सुमनावरून ॥ चतुर नर ओळखिती ॥१८९॥
चंचल द्दष्टीवरून ॥ जाणिजे जारतस्करांचें चिन्ह ॥ कीं स्वाद घेतां रस पूर्ण ॥ चतुर जेवीं ओळखे ॥१९०॥
कृतवर्म्यासी सात्यकी सांगत ॥ सेना सिद्ध करीं तूं त्वरी त ॥ सभाद्वार धरूनि समस्त ॥ चौघे दुर्जन धरितों मी ॥१९१॥
धृतराष्ट्र भीष्म विदुर ॥ अवघ्यांसी कळला समाचार ॥ यावरी स्वर्धुनी पुत्र पुण्य पवित्र ॥ गर्जोनि बोले तेधवां ॥१९२॥
घुंघुर्डें कोपोनि म्हणत ॥ सगळाचि ग्रासीन आतां पर्वत ॥ वृश्चिक स्वपुच्छें त्वरित ॥ ताडीन म्हणे खदिरांगारा ॥१९३॥
हा श्रीकृष्ण तमालनील ॥ तोषलिया सर्व करी मंगल ॥ कोपल्या होय प्रलयानल ॥ भस्म करील ब्रह्मांड हें ॥१९४॥
श्रीकृष्ण चंडाशु देख ॥ त्यासी धरूं पाहे दुर्योधन मशक ॥ श्रीरंग भुजंग भयानक ॥ त्यासी हा मूषक आकळूं पाहे ॥१९५॥
श्रीकृष्ण म्हणे दुर्योधना ॥ मशका दुर्जना खळा मलिना ॥ तुज सहित तुझी पृतना ॥ एथेंचि जाळीन क्षणार्धें ॥१९६॥
खद्योत आपुल्या तेजें करूनी ॥ पाडीन म्हणे वासरमणी ॥ कीं सिंहापुढें येऊनी ॥ मार्जारें उड्डाण मांडिलें ॥१९७॥
रासभें ब्रीद बांधोन ॥ तुंबरू पुढें मांडिलें गायन ॥ तैसा तूं दुर्योधन ॥ धरूं इच्छिसी आम्हांतें ॥१९८॥
धृतराष्ट्र म्हणे विदुरा ॥ आणीं त्या दुर्योधना पामरा ॥ तेणें धांवोनि सत्वरा ॥ पित्या जवळी आणिला ॥१९९॥
धृतराष्ट्र म्हणे दुर्योधना ॥ तुवां हें कर्म आणिलें मना ॥ तूं कृष्ण महिमा नेणसी दुर्जना ॥ महामलिना निष्ठुरा ॥२००॥
जेणें बाळपणीं खेळतां खेळ ॥ दैत्य मारिले परम सबळ ॥ मुष्टिक चाणूर कंसादि शिशुपाळ ॥ संहारिले क्षणार्धें ॥२०१॥
सत्रा वेळ जेणें राज संध ॥ धरोनि बांधिला सुबद्ध ॥ भौमा सुर मर्दिला प्रसिद्ध ॥ ललना षोडश सहस्त्र वरियेल्या ॥२०२॥
स्वयंवरीं रुक्मिया विटंबून ॥ युद्धीं सोडिला जर्जर करून ॥ त्या श्रीकृष्णासीं द्वेष धरून ॥ तूं काय करिसी पामरा ॥२०३॥
श्रीरंग म्हणे दुर्योधना ॥ सहपरिवारें ऊठ मलिना ॥ एकलाचि मी एथें जाणा ॥ आटीन सर्वां क्षणार्धें ॥२०४॥
श्रीकृष्णा कडे पाहे दुर्योधन ॥ तों स्वरूप देखिलें देदीप्यमान ॥ सकल देवताचक्र मिळोन ॥ अवय वरूपें ॥२०५॥
हस्ताचे ठायीं दिसे इंद्र ॥ अंतःकरणीं उभा उपेंद्र ॥ अहंकाररूपें रुद्र ॥ देदीप्या मान देखिला ॥२०६॥
नेत्रीं दिसती द्वादश मित्र ॥ मनोरूप दिसे रोहिणीवर ॥ दंतदाढा सूर्य पुत्र ॥ सहपरिवारें दिसतसे ॥२०७॥
मुखीं भासे प्रल्याग्न ॥ जिव्हा रूप दिसे वरुण ॥ बुद्धीच्या ठायीं चतुरानन ॥ देदीप्य मान देखिला ॥२०८॥
दुर्योधन पाहे न्याहाळून ॥ तों पाठीसीं उभे पंडुनंदन ॥ गांडीव गदा घेऊन ॥ भीमार्जुन सक्रोध ॥२०९॥
छप्पन्न कोटी यादववीर ॥ साठ लक्ष कृष्ण कुमार ॥ शस्त्रें घेऊनि महाशूर ॥ पाठीसी उभे देखिले ॥२१०॥
एकादशा रुद्र द्वादश मित्र ॥ अष्टौ लोक पाल त्रिदश समग्र ॥ गंधर्वां सहित कुबेर ॥ उभे किन्नर शस्त्रांशीं ॥२११॥
श्रीकृष्णाचे नेत्रांमधून ॥ ज्वाला निघती अतिदारुण ॥ झांकले सकळांचे नयन ॥ दुर्योधन मूर्च्छना पावला ॥२१२॥
भीष्म द्रोण शारद्वत विदुर ॥ हेचि पाहती स्वरूप सादर ॥ वरकडांचे झांकले नेत्र ॥ शक्ति न होय पहावया ॥२१३॥
देव दुंदुभि वाजविती ॥ दिव्यपुष्पवर्षाव होती ॥ ऋषी कर जोडूनि उभे ठाकती ॥ स्ववन करिती वेदोक्त ॥२१४॥
विदुरमुखें वर्तमान ॥ धृतराष्ट्रें श्रवण करुन ॥ उभा ठाकोनि करीत स्तवन ॥ देईं नयन मज हरी ॥२१५॥
तुज पाहीन धणीभरी ॥ ऐसें ऐकतां कंसारी ॥ दिव्य नयन ते अवसरीं ॥ धृतराष्ट्रासी दीधले ॥२१६॥
अंधत्व जाऊनि उघडले नयन ॥ आश्चर्य करिती सभाजन ॥ धृतराष्ट्र पाहे विलोकून ॥ तेज अद्भुत मुकुंदाचें ॥२१७॥
ज्या तेजामाजी निश्चितीं ॥ चंद्र सूर्य बुचकळ्य़ा देती ॥ सहस्त्र चपलांचे भार लपती ॥ एकएका नखांकुरीं ॥२१८॥
कोटयनुकोटी मीनकेतन ॥ सांडणें होत नखांवरून ॥ मुकुट तेजें करून ॥ ब्रह्मांड हें उजळलें ॥२१९॥
ऐसें धृतराष्ट्रासी दाखवून ॥ मागुती झांकिले त्याचे नयन ॥ जैसें ज्ञान ॥ प्रकटतां मायावरण ॥ साधकांवरी बळें पडे ॥२२०॥
पूर्ववत जाहला जगन्नायक ॥ कृतवर्मा आणि सात्यकी देख ॥ त्यांचे कर धरूनि कमलोद्भव जनक ॥ तेथून उठोनि चालिला ॥२२१॥
नारदादि ऋषि जन ॥ तेथेंचि पावले अंतर्धान ॥ एकचि कोल्हाळ जाहला पूर्ण ॥ बैसे श्रीकृष्ण रथावरी ॥२२२॥
पृथेंचे गृहा जाऊन ॥ सांगितलें सर्व वर्तमान ॥ म्हणे पांडवांहातीं अंधनंदन ॥ सहारितों यापुढें ॥२२३॥
खगवरकेतन यावरी ॥ गेला हस्तिनापुरा बाहेरी ॥ दुर्योधनासी ते अवसरीं ॥ धृतराष्ट्र क्रोधें बोलत ॥२२४॥
पायीं ज्योतिर्लिंग ताडिलें ॥ कीं अमृतें संमार्जन केलें तैसें दुर्जना त्वां केलें ॥ गर्वमदेंकरूनियां ॥२२५॥
असो भीष्म द्रोण शारद्वत ॥ गेले श्रीकृष्णासी बोळवीत ॥ चौघे वेगळे करोनि समस्त ॥ श्रीरंगामागें धांवती ॥२२६॥
सकळांसी म्हणे श्रीपती ॥ देखिली कीं येथींची रीती ॥ यावरी बोल नाहीं आम्हां प्रती ॥ साक्ष समस्तीं असावें ॥२२७॥
दुर्योधनें पाठविला कर्ण ॥ नगरा बाहेर गेला कृष्ण ॥ तेथें भीष्म द्रोण अवघे मिळोन ॥ विचार करिती काय पहा ॥२२८॥
तों भीष्मद्रोणादि सर्व भूभुज ॥ यांसी निरोप देत अधोक्षज ॥ कर्णासी खुणावूनि यादवराज ॥ बैसवीत आपुले रथीं ॥२२९॥
यावरी तो रुक्मिणीपती ॥ कर्णाशीं विचार करील एकांतीं ॥ ते कथेची कौतुकरीती ॥ पुढील अध्यायीं परिसिजे ॥२३०॥
भारती कथा सुरसा बहुत ॥ पंढरीनाथ पुरविता साहित्य ॥ परिसोत ज्ञानी पंडित ॥ अत्यादरें करोनियां ॥२३१॥
पांडवप्रताप ग्रंथ प्रयाग ॥ भक्ति ज्ञान आणि वैराग्य ॥ हेचि त्रिवेणी सांग ॥ प्रवाहरूपें जातसे ॥२३२॥
प्रेममाघमासीं साचार ॥ एथें स्नानास येती सभाग्य नर ॥ स्नानदान करितां अपार ॥ भस्म होती पातकें ॥२३३॥
अठरा पर्वांत साचार ॥ उद्योगपर्व सुरस फार ॥ बोलिल सत्यवती कुमार ॥ वैशंपायनाचे मुखें ॥२३४॥
या ग्रंथाचा कर्ता निश्चित ॥ स्वयें असे पंढरीनाथ ॥ तो जे जे शब्द सांगत ॥ ते ते एथें लिहिले म्यां ॥२३५॥
तो सांगेल तेंचि करावें ॥ बोलेल तेंचि पत्रीं लिहावें ॥ तो न सांगे तरी बैसावें ॥ उगेंचि लेखनी धरोनियां ॥२३६॥
ब्रह्मानंदा पंढरीनाथा ॥ पुढें बोलवीं रसाळ कथा ॥ लोक वदती तुज तत्त्वतां ॥ श्रीधरवरद म्हणोनी ॥२३७॥
आदिमध्यावसानीं अभंग ॥ अवघा तूंचि श्रीरंग ॥ ब्रह्मानंदा अव्यंग ॥ श्रीधर बालक तुझें कीं ॥२३८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकुणचाळिसाव्यांत कथियेला ॥२३९॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि श्रीकृष्णशिष्टाईवर्णनं नाम एकोनचत्वारिंशाध्यायः ॥३९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शुभं भवतु ॥

॥ श्रीपांडवप्रताप उद्योगपर्व एकोनचत्वारिंशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP