मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय २३ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय २३ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय २३ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ भव पंकजोद्भव पाकशासन ॥ सदा वंदिती ज्याचे चरण ॥ चार सहा अष्टादश गुण ॥ ज्याचे वर्णिती सर्वदा ॥१॥जो यदुकुलतिलकावतंस ॥ आनकदुंदुभिमान सहंस ॥ लीलाविग्रही आदि पुरुष ॥ देवकी तनय जगदात्मा ॥२॥नंद ह्रदया रविंद मिलेंद ॥ निज भक्त चित्तचात कजलद ॥ भैमीनयनाब्जा नंद ॥ प्रकाशक मित्र जो ॥३॥भवगजविदारक कंठीरव ॥ मुचुकुंदोद्धारक रमाधव ॥ कंसचाणूर मर्दक करुणार्णव ॥ अभिनव जलद वर्ण जो ॥४॥उग्र सेन मानस विषाद हरण ॥ शिशुपा लांतक वृष्णिकुल भूषण ॥ अनंतकल्याण दायक पीतवसन ॥ शरणागत कुलिशपंजर जो ॥५॥जननमरण विपिन कृशान ॥ दानन्वकुलरा शिनिकृंतन ॥ नखमुकुरीं ज्याचे मीन केतन ॥ कोटयनुकोटी बिंबले ॥६॥माया चक्र चालक पुराण पुरुष ॥ लावण्यामृत सागर ॥ मनोहरवेष ॥ सच्चिदानंद पंढरीश ॥ मधुमुरनरक भंजन जो ॥७॥जो दशावतार चरित्र चालक ॥ तो हा पांडुरंग पांडवपालक ॥ पंडुस्त्रुषालज्जारक्षक ॥ लीलाकौतुक दावीतसे ॥८॥भूवैकुंठ पांडुरंगनगर ॥ चंद्रभाग मानससरोवर ॥ राजहंस तूं श्रीधर ॥ अत्युदार जगदात्मा ॥९॥जो सत्यवती ह्रदय रत्न ॥ वेदाब्जविकासक चंडकिरण ॥ साठ लक्ष श्लोक जाण ॥ जेणें निर्मिले अवलीलें ॥१०॥जेथें लेखक परम चतुर ॥ जाहला महाराज नरकुंजर ॥ तेथील साहित्यरस अपार ॥ मानव केवीं वर्णूं शके ॥११॥व्यासमति महारजत पर्वत ॥ वैशंपायना लाधला किंचित ॥ त्यांतील सारांश साहित्य ॥ अलंकार प्राकृत हें ॥१२॥आदिपर्व सभापर्व पुर्ण ॥ श्रीधरमुख निमित्त करून ॥ पांडुरंग रुक्मिणी जीवन ॥ ब्रह्या नंदें वदला हो ॥१३॥मागें सभापर्व ॥ पुढें वनपर्व आरंभिलें ॥ महापापें क्षुद्र सकळें ॥ श्रवण मात्रें दग्ध होती ॥१४॥कीं हें वनपर्व वसंतवन ॥ सप्रेम श्रोते वृक्ष सघन ॥ नवपल्लवीं विराजमान ॥ नवविध भजनें सुफलित ॥१५॥सभापर्व संपतां ॥ शेवटीं वर्णिली सुरस कथा ॥ द्रौपदी सभेसी विटंबितां ॥ जगन्निवास पावला ॥१६॥पुढें अन्योन्य द्यूत खेळोन ॥ वना निघाले पृथानंदन ॥ विदुर कुंतीसी घेऊन ॥ जगपुरा प्रति पावला ॥१७॥यावरी कैसी कथेची रचना ॥ परीक्षितिसुत पुसे वैशंपायना ॥ माझे पूर्वज गेले वना ॥ ज्ञानसंपन्ना सांग कैसे ॥१८॥वैशंपायन म्हणे कुंभिनी नायका ॥ अष्टादशपर्वांची हे नौका ॥ व्यासवंशाची सुरेखा ॥ सर्वजनां आश्रय ॥१९॥हे यष्टि धरोनि हातीं ॥ सर्वदा जे मुक्त विचरती ॥ ते अडखळोनि न पडती ॥ भवगर्तेंत तत्त्वतां ॥२०॥दोषपशु श्रृंगें उभारून ॥ सर्वथा न येती चवताळोन ॥ अज्ञातरजनींत रक्षी जाण ॥ अष्टादशपर्वयष्टि हे ॥२१॥असो वना निघाले पंडुनंदन ॥ सवें कृष्ण भगिनी गण निधान ॥ मागूनि आला इंद्रसेन ॥ रथ घेऊन पांचही ॥२२॥इंद्रसेनासमवेत पूर्ण ॥ सेवक आले चौदा जण ॥ स्यदनीं आरूढले पंडुनंदन ॥ तों प्रजा येती धांवोनियां ॥२३॥गजपुरांतूनि प्रजांचे भार ॥ निघाले तेव्हां अपार ॥ कीं प्रजासरितांचे पूर ॥ धर्मसमुद्रा प्रति पावती ॥२४॥विचार करिती प्रजा समस्त ॥ कदा न राहावें गजपुरांत ॥ अरे हे भीष्म द्रोण वृद्ध बहुत ॥ अधर्मरत सर्वही ॥२५॥कपट द्यूत निर्मून ॥ लटिकेचि जिंकिले पंडुनंदन ॥ दुर्योधन दुर्जन अग्न ॥ वंशकानन जाळील ॥२६॥शकुनि दुःशासन कर्ण ॥ दुर्योधनाचे दुष्ट प्रधान ॥ त्यासी दुष्टबुद्धि शिकवून ॥ अधिकाधिक खवळविती ॥२७॥धर्मसमागमें करून ॥ सुखें सेवूं आम्ही कानन ॥ ऐसें बोलत प्रजाजन ॥ धर्माकडे धांवती ॥२८॥चार्ही वर्णांच्या प्रजा ॥ येऊनि नमिती धर्मराजा ॥ आम्ही तुजसवें पंडुतनुजा ॥ वनवासालागीं येऊं ॥२९॥शिल्पशास्त्रीं जे परम सुजाण ॥ सूत्रधार लोहकर्मीं लोहकर्मीं निपुण ॥ कनकालंकारीं निःसीम सुज्ञान ॥ ऐसे अपार पातले ॥३०॥ताम्र घडणार चतुर ॥ पाषाणमूर्ति कोरणार ॥ रत्न परीक्षा करणार ॥ आले सत्वर धर्मा पाशीं ॥३१॥वणिज नाना वस्तुरक्षक ॥ कुंभकर्ते तैलकारक ॥ रजक रंगारी गौळी सकळिक ॥ धर्मदर्शन पातले ॥३२॥साळी माळी सोनी चतुर ॥ दुसीभुसी नापिक अपार ॥ सुगंध तैल मृगमद केशर ॥ विक्रयकार धांवती ॥३३॥व्यापारी धनधान्यरक्षक ॥ तडिदंबरें विणिते परीक्षक ॥ किरात गुरव चिकित्सक ॥ धनिक व्यवहारी धांवती ॥३४॥कृषिकारक खनक चित्रकार ॥ मातंग चर्मक अतिशूद्र ॥ धर्मदर्शनीं प्रेमा अपार ॥ धरूनि त्वरें धांवती ॥३५॥असो सर्व मिळोन ॥ धर्मापुढें करिती रोदन ॥ गजपुरीं राजा दुर्योधन ॥ वास आमुचेनि न करवे ॥३६॥तैसे पांडव निघतां वनांतरीं ॥ प्रजा बुडाल्या शोकसागरीं ॥ म्हणती धर्मात्मजा अवधारीं ॥ आम्ही गजपुरीं न राहों ॥३८॥राजा केवळ रजनीचर ॥ प्रधान ते प्रत्यक्ष व्याघ्र ॥ ग्रामसिंह सेवक समग्र ॥ तरी प्रजा केवीं नांदती ॥३९॥प्रजा रंजावी निरंतर ॥ तोचि म्हणावा राजेश्वर ॥ अनीतिदासीचा पदर ॥ ज्यासी न लागे कालत्रयीं ॥४०॥सत्कीर्तिधर्मपत्नीशीं रत ॥ निजप्राण ऐशा प्रजा पाळीत ॥ अधर्मपंकें ज्याचें चित्त ॥ न मळे निर्दोष सर्वदा ॥४१॥सुह्रद प्रजा आणि भूसुर ॥ ज्याचें कल्याण चिंतिती अहोरात्र ॥ उभारिला यशध्वज जेवीं चंद्र ॥ शरत्कालींचा निर्मल पैं ॥४२॥जो निश्चयांबरींचा ध्रुव पूर्ण ॥ अचल न चळे सत्यवचन ॥ जेणें स्वसत्तापट्टकूल नेसवून ॥ श्रृंगारिली कुंभिनी हे ॥४३॥साधुसंग्रह दुष्टनिग्रह साचार ॥ शरणागतां कुलिशपंजर ॥ दानशस्त्रें दुःखदरिद्रा ॥ निवटी सर्व याचकांचें ॥४४॥दान धर्माचीं ओझीं फार ॥ नेतां कंटाळती याचक विप्र ॥ दानमेघवृष्टीनें निर्धार ॥ याचकधूली आर्द्र झाली ॥४५॥हर्षाकुरें पिकली ॥ प्रजेचा आनंद न माये गगनीं ॥ राजघनवाणी ऐकतां श्रवणीं ॥ मन मयूर नाचतसे ॥४६॥या लक्षणीं मंडित तूं पंडूनंदन ॥ आम्हांसी चिंतार्णवीं लोटून ॥ त्वां सेवूं आदरिलें तपोवन ॥ आम्ही तुजविण दीण दिसों ॥४७॥कपट द्यूत मेघें थोर ॥ तूं द्दष्टी न पडसी धर्म चंद्र ॥ आम्ही प्रजा आर्त चकोर ॥ चिंताग्नींत पडियेलों ॥४८॥निष्कलंक तूं शशांकशीतल ॥ वियोगराहूमध्यें सबळ ॥ त्रयोदशवर्षीं शुद्ध मंडल ॥ वदनेंदु कधीं विलोकूं ॥४९॥कपट द्य्त केतूनें पूर्ण ॥ धर्म झांकला चंडकिरण ॥ तेरावे वर्षीं मुक्तिस्त्रान ॥ तोंवरी उपोषण पडियेलें ॥५०॥त्रयोदश वर्षें क्रमोनि रजनी ॥ कईं उगवेल धर्म दिन मणी ॥ पौर जन वदन कम लिनी ॥ विकासती एकदांचि ॥५१॥मेघ ओळले पंडुनंदन ॥ कपट द्यूत हा प्रभंजन ॥ दूरी नेलें झडपोन ॥ जीवनेंविण सुकलों आम्ही ॥५२॥पांचही पांडव राजहंस ॥ सांडवूनि गजपुर सरोवर मानस ॥ पाठविले कंटकवनास ॥ द्रौपदी सहित दुष्टांनीं ॥५३॥असो ऐसा प्रजांचा प्रेमा ॥ ऐकतां स्त्रेह दाटला धर्मा ॥ म्हणे घोर विपिना जाणें आम्हां ॥ येणें तुम्हां नव्हे तेथें ॥५४॥भीष्म द्रोण विदुर ॥ वडील प्रज्ञाचक्षु राजेंद्र ॥ ग्रामांत असतां साचार ॥ तुम्हां दुःख नव्हेचि ॥५५॥मजवरी कृपा करूनी ॥ सुखें नांदा निजसदनीं ॥ त्रयोदश वर्षें क्रमोनी ॥ तुम्हां पाशीं मी येतों ॥५६॥भीड धर्माची गहन ॥ प्रजा न देती प्रतिवचन ॥ धर्माचे धरूनियां चरण ॥ अधोवदन स्फुंदती ॥५७॥दीनवदन अत्यंत ॥ प्रजा प्रवेशल्या गजपुरांत ॥ शक्रप्रस्थींचे जन समस्त ॥ शोक करीत परतले ॥५८॥इकडे भीष्मजननीवें तीर ॥ पांडव पावले सत्वर ॥ विशाल न्यग्रोधतरुवर ॥ तयातळीं रजनी क्रमियेली ॥५९॥साही जणीं जलाहार ॥ ते दिवशीं केला निर्धार ॥ भूमीवरी शयन सामार ॥ वरी अंबर पांघरावया ॥६०॥उदयासी आलें रविचक्र ॥ तों शक्रपस्थ आणि वारणापुर ॥ तेथींचे आले भूसुर ॥ धर्माजवळी सर्वही ॥६१॥अग्निहोत्री याज्ञिक ॥ चहूं वेदांचे पाठक ॥ षट्शास्त्रवेत्ते देख ॥ मुखोद्नत पुराणें ॥६२॥पुरश्चरणी अधिक ॥ सामर्थ्यें खोळंबवितील अर्क ॥ शापानुग्रह समर्थ देख ॥ असंख्यात मिळाले ॥६३॥सुर आणि भूसुर ॥ यांशीं भेद नाहीं अणुमात्र ॥ धर्मासी विनविती विप्र ॥ आम्ही येऊं तुजसमागमें ॥६४॥तुझे संगतीं कंठूं काळ ॥ धर्मा तूं पुण्यशीळ ॥ तुजवरी भार न घालूं सकळ ॥ अन्न आच्छादन न मागों ॥६५॥कंदमूलें भक्षून ॥ करूं सर्वदा अनुष्ठान ॥ चिंतूं तुझें कल्याण ॥ नाहीं कारण दुसरें पैं ॥६६॥वेद शास्त्र पुराण ॥ नाना इतिहास पुण्य पावन ॥ धर्मा तुज करवूं श्रवण ॥ जय कल्याण प्राप्तीसी ॥७६॥धर्म म्हणे घोर वनवास ॥ ब्राह्मण हो तुम्ही पावाल क्लेश ॥ तें मज न पाहवे निःशेष ॥ निर्दोष यश न जोडे ॥६८॥त्यां माजी शौनकनामा विप्र ॥ म्हणे युधिष्ठिरा ऐक साचार ॥ तुवां पूर्वीं पूजिले धरामर ॥ तेणें निर्भर जाहलों आम्ही ॥६९॥धर्मा तूं न करीं शोक ॥ सर्व पुरवील जगन्नायक ॥ तूं गोब्राह्मणप्रतिपालक ॥ अजातशत्रु धर्मात्मा ॥७०॥धन धान्य असोनि गांठीं ॥ जो कृपणता धरी पोटीं ॥ ही नव्हे अवंचक हातवटी ॥ महाकपटी तो जाण ॥७१॥जयापाशीं नाहीं धन ॥ तरी तया इतुकेंचि भजन ॥ द्यावें ब्राह्मणांसी अभ्युत्यान ॥ स्थूलासन आदरें ॥७२॥उदकदान प्रिय भाषण ॥ नमन आणि विप्रस्तवन ॥ इतुकेनें होय सर्व कल्याण ॥ सकल पूजन पावलें ॥७३॥मग धौम्य बोले वचन ॥ धर्मा तूं करीं पुरश्चरण ॥ प्रत्यक्षदैवत सूर्य नारायण ॥ अमित अन्न पुरवील ॥७४॥विप्रपालना यथार्थ ॥ हाचि उपाय जाण सत्य ॥ ऐकतां आनंदला कुंतीसुत ॥ तप अद्भुत मांडिलें ॥७५॥जितेंद्रिय निराहार ॥ साधूनि सप्तमी रविवार ॥ प्राणायाम करूनि युधिष्ठिर ॥ पूजा प्रकार समर्पी ॥७६॥नाभिपद्म पर्यंत ॥ सलिलीं धर्म उभा राहात ॥ त्रिपाद ऋचा मंत्र जपत ॥ न्यासयुक्त यथाविधि ॥७७॥एक मंडल पर्यंत ॥ धर्मराव तप करीत ॥ स्तवन मांडिलें अद्भुत ॥ ऊर्ध्व वदनें ते काळीं ॥७८॥सूर्य भजन सूर्य स्तवन ॥ पांचाली करी प्रीती करून ॥ जेणें प्रसन्न होय नारायण ॥ सहस्त्रकिरण तमांतक ॥७९॥जय तमनाशका सहस्त्रकिरण ॥ अंबरचूडामणे सूर्य नारायण ॥ जीवमिलिंदबंधच्छेदना ॥ ह्रदय कमल विकासका ॥८०॥सर्व मंगल कल्याण कारणा ॥ रोग प्रशमना आयुर्वर्धना ॥ नमो मार्तंडा दुष्टदमना ॥ हाटकवर्णा वासरमणे ॥८१॥मित्र रवि सूर्य भानु दिवाकर ॥ खग पूष हिरण्यगर्भा तमोहरा ॥ मरीच्यादित्य सवित्रर्क भास्करा ॥ अमिततेजा नमो तुज ॥८२॥आदि पुरुषा निर्विकारा ॥ हरिहरविरिंचिस्वरूपधरा ॥ काश्यपेया सहस्त्रकरा ॥ वसुधामरां प्रिय तूंचि ॥८३॥जन्म मृत्यु जराव्याधिहरणा ॥ भयदरिद्र्दुःखविध्वंसना ॥ कालात्मया सर्वकारणा ॥ विश्वनयन प्रकाशका ॥८४॥एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख हय वेग बहुत ॥ निमिषार्धामध्यें अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥८५॥मुख दैवत सूर्य नारायण ॥ सुर्यो नुष्ठानें श्रेष्ठ ब्राह्मण ॥ वरकड दैवतें कल्पित पूर्ण ॥ चंडकिरण प्रत्यक्ष ॥८६॥सूर्य मंडल विलोकून ॥ नित्य जो कां न करी नमन ॥ तो अभाग्य परम अज्ञान ॥ अल्पायुषी जाणावा ॥८७॥व्यास वाल्मीक सुर भूपाल ॥ वर्णिती अद्भुत सूर्य पासक सदा शुशील ॥ यम काल वंदी तया ॥८८॥देखोनि धर्माचें तप तीव्र ॥ मूर्ति मंत उतरला दिनकर ॥ कर्णजनक तो सत्वर ॥ थाली देत धर्मा प्रती ॥८९॥द्वादश वर्षें पर्यंत ॥ उत्तमान्न जें जें इच्छीत ॥ षड्रस चतुर्विध रसभरित ॥ उत्पन्न होईल यांतूनि ॥९०॥कोटयवधि जेवितां ब्राह्मण ॥ परी न सरे कदा अन्न ॥ शेवटीं तुम्ही द्रौपदी जेवनून ॥ मग धुवून ठेविजे हे ॥९१॥पांचाली जेविलिया जाण ॥ मग ते दिवशीं न निघे अन्न ॥ माझें उदयीक करूनि स्मरण ॥ करा पूजन थालीचें ॥९२॥सृष्टीचा उद्भव होय किती ॥ हे नव्हे कदा गणती ॥ तैसी थालीच्या अन्नाची मिती ॥ सहस्त्राक्षा न करवे ॥९३॥ऐसें बोलोनि पद्मिनीनाथ ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥ पुढें काम्यकवनीं प्रवेशत ॥ पांडव विप्रांसमवेत पैं ॥९४॥नित्य पांडव पार्थ उठोन ॥ करिताती तमांतकाचें स्तवन ॥ थाली प्रसवे इच्छित अन्न ॥ अपार ब्राह्मण जेविती ॥९५॥विप्रभोजन पंचमहायज्ञ ॥ तेणें कौंतेय आनंद घन ॥ रात्रं दिवस पुराण श्रवण ॥ वेदाध्ययन शास्त्रचर्चा ॥९६॥न्याय मीमांसा सांख्य अद्भुत ॥ पातंजल व्याकर वेदान्त ॥ पंडित मुखेम पंडुसुत ॥ श्रवण मनन करी सदा ॥९७॥महाद्भाग्य हेंचि उत्तम ॥ अखंड ज्यासी सत्यमागम ॥ तीर्थाटन व्रतें तप परम ॥ मग कासया करावें ॥९८॥सत्यमागम ज्यास ॥ त्यासी नित्य वैकुंठवास ॥ तरी पांडव भाग्य विशेष ॥ वनीं समागम संतांचा ॥९९॥अद्भुत पुण्य़ ज्याचे पदरीं ॥ त्याचीं चिन्हें ऐक चारी ॥ उदार सत्पात्रीं दान करी ॥ कदाकाळीं विटेना ॥१००॥सर्वदा बोले मधुर ॥ न वदे कदा वचन निष्ठुर ॥ श्री कृष्णीं बहुत आदर ॥ कायावाचा मानसें ॥१०१॥परमादरें ब्राह्मण पूजन ॥ देत धन धान्य आसन वसन ॥ या चहूं चिन्हीं मंडित पूर्ण ॥ तोचि अंश श्रीहरीचा ॥१०२॥म्हणोनि धन्य पंडुनंदन ॥ सर्वलक्षणीं मंडित पूर्ण ॥ यावरी गजपुरींचें वर्तमान ॥ सावधान ऐकें राया ॥१०३॥प्रज्ञाचक्षु म्हणे क्षत्त्या ॥ तुझे ठायीं असे ममता ॥ तरी मज कांहीं सांगें हिता ॥ कैसें आतां करावें ॥१०४॥चिंतेचिया कूपांत ॥ पाडिलों सर्वज्ञा देईं हात ॥ आधि हा वणवा जाळीत ॥ विवेकमेघ वर्षें तूं ॥१०५॥ह्रदयकुंडीं क्रोधाग्न ॥ प्रदीप्त करूनि पंडुनंदन ॥ वना गेले प्रतिज्ञा करून ॥ जी अलोट हरिहरां ॥१०६॥त्यांच्या दुःखें प्रजा लोक ॥ अहोरात्र करिती शोक ॥ दारुण त्यांचा शापपावक ॥ कौरववंशकानन जाळील ॥१०७॥तरी प्रजा भजती प्रेमें करून ॥ पांडवस्त्रेह होय वर्धमान ॥ विदुरा ऐसें बोलें वचन ॥ तूं सर्वज्ञ सर्व विषयीं ॥१०८॥विदुर म्हणे पुढत पुढती ॥ किती सांगों आतां तुज नीती ॥ आपुले कुमार धरूनि हाती ॥ धर्मचरणांवरी घालीं पैं ॥१०९॥करुणा भाकोनि क्षमा मागावी ॥ तुम्हीं मागें निंदा केली आघवी ॥ आतां स्तुति करूनि बरवी ॥ ते विरवावी शुद्धमनें ॥११०॥दुर्योधन दुःशासन शकुनि कर्ण ॥ यांसी धर्माचे करीं देऊन ॥ पदर पसरूनि प्राणदान ॥ घ्यावें मागोन सत्वरी ॥१११॥भीमाचे पोटांत डोई घालून ॥ देईं हातीं दुःशासन ॥ दुर्योधनाचे मस्तकीं हस्त सुखघन ॥ धर्मरायाचा ठेवीतीं ॥११२॥पार्थाचीं पदाब्नें निर्मल ॥ तेथें स्पर्शवीं कर्णाचें भाल ॥ शकुनि हा कुटिल खल ॥ सहदेवचरणांवरी घालीं गा ॥११३॥तूं आपुल्या नेत्रोदकें देख ॥ धर्मासी करीं अभिषेक ॥ ऐसें करितां अक्षय्य सुख ॥ ब्रह्मांडभरि तुज होय ॥११४॥तुझें न ऐकती पुत्र वचन ॥ तरी गारुडी सर्पासी करी दीन ॥ तेवीं भीष्मद्रोणांसी सांगोन ॥ आकळोन घालीं बंदींत ॥११५॥नासिकद्वारें गुण ओवून ॥ महावृषभ करिती दीन ॥ कीं मत्त द्विरद आकळोन ॥ आकर्षून ठेविती ॥११६॥कुपुत्र पोटांतील रोग ॥ छेदोनि काढावा सवेग ॥ हनन रक्षण त्याग ॥ यांतील एक करीं वेगें ॥११७॥ऐसीं वचनें ऐकोन ॥ क्रोधें संतप्त अंबिकानंदन ॥ म्हणे तुझें समता ज्ञान ॥ सर्वही मज समजलें ॥११८॥पांडववांचें करितां स्तवन ॥ कधींच न धाये तुझें मन ॥ जेव्हां तुज पुसावें जाण ॥ वारंवार हेंचि वदसी ॥११९॥तिहीं हरवूनियां पण ॥ कानना गेले उठोन ॥ आम्हीच शत मूर्ख पूर्ण ॥ तुज पुसतसों विचार ॥१२०॥तूं हितशूत्र पाहतां ॥ तुजपाशीं नाहीं आप्तता ॥ आमुचें अनहित तत्त्वतां ॥ पुनःपुन्हां तेंचि कथिसी ॥१२१॥दुर्योधनासी धरूनि आधीं ॥ घालिसी पांडवांचियें बंदीं ॥ कळों आली तुझी बुद्धी ॥ घात त्रिशुद्धी करणार ॥१२२॥तुझें पांडवांकडे मन ॥ मत्पुत्रांचें पाहसी न्यून ॥ तूं नलगेसी मज लागून ॥ जाईं येथून आतांचि ॥१२३॥अवश्य म्हणोनि विदुर ॥ रथारूढ जाहला सत्वर ॥ काम्यकवना प्रति चतुर ॥ परमवेगें पातला ॥१२४॥दूरी देखोनि विदुर ॥ बंधूंसी बोले युधिष्ठिर ॥ क्षत्ता कां येतो सत्वर ॥ काय विचार कल्पूनि ॥१२५॥कीं शकुनि आणि सुयोधन ॥ तिहीं दिधला पाठवून ॥ कपट द्यूत दुसरेन ॥ खेळावयालागीं पैं ॥१२६॥तरी मी यावरी अवधारा ॥ नच जाईं कौरवांचे मंदिरा ॥ क्षत्ता समीप देखतां त्वरा ॥ पांचही पांडव ऊठिले ॥१२७॥सर्वही विदुरासी नमून ॥ आदरें देती आलिंगन ॥ मग बैसवूनि वर्तमान ॥ क्षत्ता सांगे गजपुरींचें ॥१२८॥म्यां बहुत प्रकारें अत्यंत ॥ अंधासी सांगितलें स्वहित ॥ परी तो मनीं न धरी यथार्थ ॥ नानापरी बोधितां ॥१२९॥शुद्धमार्ग टाकून ॥ आडमार्गें जो करी गमन ॥ त्यासी अपाय येतील दारुण ॥ नेघें म्हणतां न चुकती ॥१३०॥सर्वांशीं द्वेष करीत ॥ आपुलें क्षेम कल्याण चिंतीत ॥ तरी त्यासी अनर्थ येती शोधीत ॥ नेघें म्हणतां न चुकती ॥१३१॥महासतीचा अभिलाष धरीत ॥ बळेंचि क्षोभवीत संतभक्त ॥ बलवंतताशीं वैर लावीत ॥ येतील अनर्थ न प्रार्थितां ॥१३३॥उसां धुसधुसीत उरग ॥ सुखें निद्रा केवीं ये मग ॥ शूलावरी बळेंचि टाकी अंग ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥१३४॥परवित्ताचा अभिलाष धरीत ॥ परकांतेशीं इच्छी सुरत ॥ छत्रपतीशीं द्वेष धरीत ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥१३५॥समर्थाचीं वर्में देख ॥ लोकांत बोले जो शत मूर्ख ॥ तपस्वियांसी छळूनि पाहे कौतुक ॥ येती अनर्थ न प्रार्थितां ॥१३६॥सद्विवेक मित्र करून ॥ विहितपंथें करावें गमन ॥ सुधार साहूनि गहन ॥ संतांचीं वचनें मानावीं ॥१३७॥परयोषिता परवित्त ॥ तृणाहूनि नीच मानीत ॥ चतुराशीं वाढवी मित्रत्व ॥ शास्त्र म्हणत धन्य त्यासी ॥१३८॥असो विदुरावांचूनि तत्काल ॥ धृतराष्ट्र जाहला व्याकुल ॥ म्हणे मज न गमे वेळ ॥ तयावीण क्षणभरी ॥१३९॥मी अंध नेत्रांविण ॥ अंतरीं अंध बुद्धिहीन ॥ विदुराविण समजवी कोण ॥ आश्रय आहे पाहतां ॥१४०॥संजयासी म्हणे प्रज्ञा नयन ॥ काम्यकवना प्रति जाऊन ॥ विदुरासी येईं घेऊन ॥ समजावून आतांचि ॥१४१॥संजय तत्काल निघाला ॥ काम्यकवना प्रति पावला ॥ तों धर्म ताप सवेष देखिला ॥ विद्वज्जनवेष्टित ॥१४२॥वल्कलें अजिनें शोभत ॥ भस्म सर्वांगीं विराजत ॥ जैसा व्योमकेश मिरवत ॥ तपस मंडळी माझारी ॥१४३॥देवीं वेष्टिला सहस्त्रनेत्र ॥ कीं किरण चक्रांत विराजे मित्र ॥ कीं दिव्यरत्ना भोंवते अपार ॥ जोहरी जैसे मिळती पैं ॥१४४॥तैसा शोभला पंडुनंदन ॥ तों संजय उभा ठाकला येऊन ॥ पांडव नमिती धांवोन ॥ क्षेमालिंगन देती प्रेमें ॥१४५॥संजय म्हणे विदुरा लागून ॥ कंठीं धरिला रायें प्राण ॥ जीवनाविण जैसा मीन ॥ तेवीं तुजवांचून ॥ व्याकुल ॥१४६॥विदुरासी समजावून ॥ तत्कालचि गेला घेऊन ॥ प्रज्ञाचक्षु भेटला उठोन ॥ समाधान ॥ करी बहुत तेव्हां ॥१४७॥विदुर गेला रुसोन ॥ माघारां आणिला समजावून ॥ हें ऐकोनि दुर्योधन ॥ परम क्षोभ पावला ॥१४८॥आमुचा घातकर्ता क्षत्ता ॥ कां वृद्धें आणिला मागुता ॥ तो नाना उपाय करूनि आतां ॥ पांडव येथें आणील ॥१४९॥मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ किंवा करीन महा विषपान ॥ शकुनि मी त्यागीन प्राण ॥ पांडव द्दष्टीं देखतां ॥१५०॥ऐसा उपाय करा उठाउठीं ॥ पांडव पुनः न पडती द्दष्टीं ॥ कर्ण शकुनि म्हणे कष्टी ॥ होऊं नको दुर्योधना ॥१५१॥जरी येथें आले पांडुनंदन ॥ पुनः कपट द्यूत खेळोन ॥ तत्काल टाकूं जिंकून ॥ एक क्षण न लागतां ॥१५२॥शकुनि म्हणे असा सावधान ॥ दूरी आहेत जों पांचाल श्रीकृष्ण ॥ तों त्वरित घाला घालावा जाऊन ॥ टाकावे वधून पांचही ॥१५३॥सिद्ध केलें सकल सैन्य ॥ तों एकांतीं सत्यवती नंदन ॥ अंधा सांगे येऊन ॥ अनर्थ पूर्ण पुढें दिसे ॥१५४॥घाला घालूं इच्छीत ॥ तरी हे पडती अनर्थांत ॥ पांडवांसी श्रीरंग रक्षीत ॥ अंतर्बाह्य सर्वदा ॥१५५॥अंध पाय शिवे हातें ॥ म्यां प्रेरिलें नाहीं त्यांतें ॥ ते जाती घाला घालावयातें ॥ तरी मी प्राण देईन ॥१५६॥हेरमुखें वार्ता ऐकोन ॥ मग उगेचि राहिले दुर्जन ॥ म्हणती विसर पाडून ॥ गुप्तरूपें पुढें जाऊं ॥१५७॥असो धृतराष्ट्र बोले वचन ॥ स्वामी तूंचि बोधीं दुर्योधन ॥ व्यास म्हणे मैत्रेय जाण ॥ येईल येथें शीघ्रचि ॥१५८॥तो बोधील तुझिया सुता ॥ परी हा नायकेचि शिकवितां ॥ तो शाप शस्त्रें तत्त्वतां ॥ ताडील यासी क्षणार्धें ॥१५९॥ऐसें बोलोनि पराशरसुत ॥ अंतर्धान पावला त्वरित ॥ दुर्योधन पित्या जवळी येत ॥ तों मैत्रेय पातला ॥१६०॥देदीप्यमान भानु मूर्तिमंत ॥ तैसा देखिला अकस्मात ॥ सुतां सहित अंबिकासुत ॥ सन्मानीत तयासी ॥१६१॥सुयोधन पुसे वर्तमान ॥ कोठोनि जाहलें आगमन ॥ मैत्रेय म्हणे तीर्थें संपूर्ण ॥ करीत आलों काम्यकवना ॥१६२॥तों पांडव देखिले अकस्मात ॥ जटाधर वल्कलवेष्टित ॥ तृणशेजेवरी निजत ॥ उष्ण वात बहु तेथें ॥१६३॥परम सुकुमार पांचाली ॥ चंपककलिका श्रृंगारशाली ॥ वातोष्णें कोमाइली ॥ आपाद देखिली समग्र म्यां ॥१६४॥कपट द्यूत खेळोन ॥ बाहेर घातले पंडुनंदन ॥ अद्यापि तरी ऐकें वचन ॥ आणीं बोलावून जाऊनि तूं ॥१६५॥महासाधु विदुर भक्त ॥ विख्यात वीर बलवंत ॥ हिडिंब किर्मीर अद्भुत ॥ राक्षस मारिले भीम सेनें ॥१६६॥खांडववन देऊनि वैश्वानरा ॥ जर्जर केलें निर्जरेश्वरा ॥ अरे त्या कपिवरध्वज महाविरा ॥ समरीं कोण जिंकील ॥१६७॥सोमवंश विजयध्वज ॥ सर्वलक्षण युक्त धर्मराज ॥ तरी त्यासी देईं राज्य ॥ यथाविभग समत्वें ॥१६८॥दोह सांडीं सुयोधन ॥ वांचविणें आहे आपुल्या प्राणा ॥ तरी तूं जाऊनि काम्यकवना ॥ पृथानंदनां आणीं वेगीं ॥१६९॥ऐसें ऐकतां दुर्योधन ॥ परम क्षोभला जैसा कृशान ॥ श्मश्रु हातें पिळून ॥ अंक हातें थापटीत ॥१७०॥सव्यपद घांसी मेदिनीं ॥ गर्वें न बोलेचि पापखाणी ॥ सक्रोधें हुंकार देऊनी ॥ अधर दशनें रगडीत ॥१७१॥ऐसें देखतांचि जाण ॥ प्रलयीं क्षोभे मृडानीरमण ॥ तैसा शाप वदे मैत्रेय दारूण ॥ जो कां अलोट हरिहरां ॥१७२॥म्हणे चांडाळ तूं दुर्योधन ॥ द्वेषी हिंसक कुटिल पूर्ण ॥ करिसी तपस्वियांचा अपमान ॥ गर्वें करून बोलसी ॥१७३॥न धरिसी ब्राह्मणांची मर्यादा ॥ दुष्टा मलिना मतिमंदा ॥ तुझे अंकीम भीमाची गदा ॥ विद्युल्लतेऐशी पडेल ॥१७४॥तैणेंचि अंक चूर्ण होऊन ॥ तळमळूनि सोडिसील प्राण ॥ माझें असत्य शापवचन ॥ जलजा सनाचेन पैं नोहे ॥१७५॥मदें माजला जेवीं बस्त ॥ कीं पिसाळलें श्वान यथार्थ ॥ कीं डुकर माजलें बनांत ॥ हाणी दांत भलत्यासी ॥१७६॥तैसा तूं माजलासी पूर्ण ॥ पक्क फणस जेवीं होय चूर्ण ॥ तेवीं भीमगदेंकरून ॥ छिन्नभिन्न अंक होय कां ॥१७७॥ऐसें मैत्रेय बोलोन ॥ सवेंचि पावला अंतर्धान ॥ जैसा कायेंतूनि जाय प्राण ॥ तो नेणवे कोणासी ॥१७८॥भयभीत दुर्योधन ॥ चिंतार्णवीं गेला बुडोन ॥ शोकें तळमळे अंबिकानंदन ॥ म्हणे वर्तमान बरें न दिसे ॥१७९॥यावरी विदुरासी बोलावून ॥ धृतराष्ट्र पुसे परम उद्विग्न ॥ तुवां देखिलें काम्यकवन ॥ तरी वर्तमान एक सांगें ॥१८०॥भीमें मारिला किर्मीर ॥ ते कथा मज सांगें समग्र ॥ मग बोले चतुर विदुर ॥ ऋषि मुखें ऐकिले म्यां ॥१८१॥गजपुरांतूनि निघाले पंडुनंदन ॥ तीन दिवसां पावले काम्यकवन ॥ रजनींत जातां मार्ग क्रमून ॥ तों किर्मीर राक्षस धांवला ॥१८२॥महाविशाल रजनीचर ॥ कज्जलवर्ण पर्वताकार ॥ भाळीं चर्चिला सिंदूर ॥ दाढा शूभ्र भयानक ॥१८३॥त्याच्या भयेंकरूनी तेथें न वसे प्राणी ॥ तो पांडवांसी आडवा येऊनी ॥ कवण म्हणोनि पुसतसे ॥१८४॥ त्यासी देखोनि द्रौपदी भयभीत ॥ नेत्र झांकी होय कंपित ॥ अर्जुन तियेसी सांवरीत ॥ म्हणे कांहीं मनांत भिऊं नको ॥१८५॥राक्षसासी पंडुनंदन ॥ पुसती तूं आहेस कोण ॥ येरू म्हणे मी किर्मीर जाण ॥ बकासुराचा बंधु पैं ॥१८६॥पुरुषमात्र धरून ॥ मी भक्षितों न लागतां क्षण ॥ तुम्ही पांच जण आहां कोण ॥ नेतां कामिनी कोणाची ॥१८७॥धर्म म्हणे आम्ही पंदुकुमार ॥ हस्तिनापुरींचे राज्यधर ॥ मग बोले किर्मीर ॥ दावा वृकोदर कोणता तो ॥१८८॥त्या भीमाच्या रक्तेकरून ॥ करीन बकासुराचें तर्पण ॥ मग त्यासी सगळाचि ग्रासीन ॥ करीन चूर्ण दंतांखालीं ॥१८९॥माझा बकासुर बलगहन ॥ तेणें मारिला कपटे करून ॥ बहुत दिवस भीमा लागून ॥ शोधितां आजि सांपडला ॥१९०॥ऐसें बोलतां किर्मीर ॥ हांक फोडी वृकोदर ॥ पर्वताकार तरुवर ॥ उपडून हातीं घेतला ॥१९१॥अर्जुनें न लागतां क्षण ॥ गांडीवासी चढविला गुण ॥ तों किर्मीर वृक्ष घेऊन ॥ भीमावरी धांवला ॥१९२॥भीम म्हणे रे कीटका ॥ बकदर्शना तुज मशका ॥ पाठवितों यमलोका ॥ अर्ध क्षण न लागतां ॥१९३॥एक काल एक कृतान्त ॥ एक अखया एक हनुमंत ॥ एक एकाचे पृष्ठीवरी मोडीत ॥ झाडें सर्व उपडोनि ॥१९४॥द्वादश योजनें पर्यंत ॥ महीवृक्ष भंगले समस्त ॥ मग शिला आणि पर्वत ॥ परस्परें टाकिती ॥१९५॥मल्लयुद्ध अद्भुत ॥ जाहले घटिका चारपर्यंत ॥ मग भीमें अलातचक्रवत ॥ चरणीं धरूनि भोंवंडिला ॥१९६॥तैसाचि आपटिला झडकरी ॥ मग पाय देऊनि पृष्ठीवरी ॥ धरूनि शिर पादाग्रीं ॥ मध्यभागीं मोडिला ॥१९७॥दुंदुभी फुटतां ध्वनि उमटत ॥ तैसा राक्षस देहांतीं आरडत ॥ कुंजरासी होय पर्वतपात ॥ भूमीवरी तेवीं पडियेला ॥१९८॥ऐसा युरुषार्थ करूनि पंडुनंदन ॥ गेले द्वैतवना लागून ॥ द्रौपदी परम आनंदोन ॥ म्हणे धन्य वृकोदरा ॥१९९॥ऐसी कथा सांगतां विदुर ॥ श्वासोच्छवास टाकी धृतराष्ट्र ॥ म्हणे मैत्रयाचा शाप क्रूर ॥ कालत्रयीं टळेना ॥२००॥असो यावरी कष्टी वनवासी पांडव ॥ भेटावयासी आले राजे सर्व ॥ छप्पन्न कोटि यादव ॥ यादवेंद्रासमवेत पैं ॥२०१॥वसुदेव आणि उद्धव अक्रूर ॥ उग्रसेन रेवतीवर ॥ दळासहित सत्वर ॥ द्वैतवना पातले ॥२०२॥शिखंडी आणि धृष्टद्युन्म ॥ आले द्रौपदीचे बंधु धांवोन ॥ कौरवांसी निंदिती पूर्ण ॥ क्रोधेकरून सर्वही ॥२०३॥श्रीरंगासी देखोन ॥ पांडव घालिती लोटांगण ॥ द्रौपदी धांवूनि धरी चरण ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥२०४॥द्रौपदीसी म्हणे यादवेंद्र ॥ माये तुवां कष्ट देखिले अपार ॥ तरी कौरवरक्तें समग्र ॥ धरातल भिजवीन ॥२०५॥देखोनि अंतकाळ ॥ त्यांच्या स्त्रिया रडतील सकल ॥ तो तूम देखसी कोल्हाळ ॥ अल्पकाळेंचि यावरी ॥२०६॥उतरूनि पृथ्वीचा भार ॥ धर्मावरी धरीन छत्र ॥ यावरी त्रयोदश वर्षांनंतर ॥ सोहळा देखसी कृष्णे तूं ॥२०७॥वस्त्रहरणाचे दुःख अद्भुत ॥ आठवूनि कृष्णा शोक करीत ॥ म्हणे पांचही पति बलवंत ॥ उगेचि होते तये वेळीं ॥२०८॥कैवारिया भक्तवत्सला ॥ वस्त्रें पुरविलीं ते वेळां ॥ करुणाकरा दयाळा ॥ लाज माझी रक्षिली ॥२०९॥धर्म म्हणे उपकार ॥ किती आठवावे अपार ॥ कुंभिनीचें करूनि पत्र ॥ लिहितां चरित्र सरेना ॥२१०॥पांचालीचे पंच पुत्र ॥ महायोद्धे वयकिशोर ॥ द्रौपदीपांडवांसी सत्वर ॥ धृष्टद्युन्में भेटविले ॥२११॥प्रतिविंध्य श्रुतसोम शतानीक ॥ श्रुतसेन श्रुतकर्मा देख ॥ पितयांतुल्या ते बालक ॥ परम पुरुषार्थी पांचही ॥२१२॥सुभद्रा आणि अभिमन्य ॥ कृष्णासंगें आले द्वारकेहून ॥ सौभद्रें पांडवांसी वंदून ॥ केलें नम द्रौपदीसी ॥२१३॥यावरी देशोदेशींचे राव ॥ स्तविती द्वादश जातींचे यादव ॥ वसुदेव बलभद्र उद्धव ॥ समयोचित बोलती ॥२१४॥धृष्टद्युन्म प्रतिज्ञा करीत ॥ द्रोणासी मारीन क्षणांत ॥ शिखंडी म्हणे मी करीन अंत ॥ वृद्ध भीष्माचा यावरी ॥२१५॥सुयोधन दुःशासन ॥ भीमहस्तें सोडितील प्राण ॥ कर्णाचा काळ अर्जुन ॥ शल्यासी मरण धर्महस्तें ॥२१६॥माद्रीनंदन प्राण ॥ शकुनीचा घेतील न लागतां क्षण ॥ असो सर्वही कौरव सैन्य ॥ पांचही मिळोन आटितील ॥२१७॥यावरी यादवां सहित यादवेंद्र ॥ सुभद्र आणि सौभद्र ॥ द्वारकेसी गेले सत्वर ॥ आज्ञा घेऊनि पांडवांची ॥२१८॥घेऊनि द्रौपदीचे नंदन ॥ पांचालपुरा गेला धृष्टद्युन्म ॥ सकल राजे प्रजाजन ॥ निजदेशा प्रति जाती ॥२१९॥यावरी द्वैतवनीं पंडुकुमार ॥ राहिले घेऊनि अपार विप्र ॥ तेथें द्वादश संवत्सर ॥ क्रमिते जाहले सत्समागमें ॥२२०॥नित्य नैमित्तिक कर्म ॥ व्रतें हवनें पितृश्राद्धें उत्तम ॥ अग्निसेवा त्रिकाल होम ॥ देत धर्म आदरेंशीं ॥२२१॥पक्षेष्टि मासेष्टी ॥ नक्षत्रेष्टि प्रियपरमेष्टी ॥ चातुर्मास्य पर्वें पोटीं ॥ आचरतां आनंद धर्मातें ॥२२२॥याग सदनीं वेदघोष ॥ ओंकारवषट्कारध्वनि सुरस ॥ ते ते महा ऋषी निर्दोष ॥ येचि रीतीं आचरती ॥२२३॥यथा सुखें राहिले ब्राह्मण ॥ कुंडवेदिका शास्त्र प्रमाण ॥ सायंकालीं देदीप्यमान ॥ तिन्ही अग्नि शोभती ॥२२४॥चहूं वेदांचें अध्ययन ॥ शास्त्रचर्चा पुराण श्रवण ॥ पांडवांजवळी हरिकीर्तन ॥ रात्रीं करिती कित्येक ॥२२५॥मार्कंडेय महाऋषी ॥ येऊनि भेटला पांडवांसी ॥ म्हणे धर्मा तूं वनवासी ॥ सुखी आहेसी वाटतें ॥२२६॥प्रत्यक्ष परब्रह्म राम चंद्र ॥ चौदा वर्षें सेविलें तेणें वन घोर ॥ मग रामकथा समग्र ॥ धर्मराया सांगितली ॥२२७॥ते रामकथा वर्वावी समस्त ॥ तरी समुद्रा ऐसा वाढेल ग्रंथ ॥ वाल्मीकिकृत्य सत्य यथार्थ ॥ सप्तही कांडें कथियेलीं ॥२२८॥पांडुरंगकृपें यथार्थ ॥ चाळीस अध्याय राम विजय ग्रंथ ॥ ती कथा श्रोतीं पहावी तेथ ॥ अत्यादरें करू नियां ॥२२९॥द्वैतवन परम सुंदर ॥ नाना जातींचे तरुवर ॥ भेदीत गेले अंबर ॥ मनोहर सदाफल जे ॥२३०॥छाया शीतल सघन ॥ माजी न दिसे सूर्य किरण ॥ नारळी केळी पोफळी रातांजन ॥ सुवासचंदन मलयागर ॥२३१॥अशोक वृक्ष उतोतिया ॥ राय आंवळे आंबे खिरणिया ॥ निंबें कवट वाढोनियां ॥ सुंदर डाहळिया डोलती ॥२३२॥दाळिंबी रायकेळी मंदरा ॥ चंदन वृक्ष मोहो अंजीर ॥ चंपक जाई जुई परिकर ॥ बकुल मोगरी सेवंतिया ॥२३३॥शतपत्र जपा वृक्ष परिकर ॥ तुलसी करवीर कोविदार ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पवळवेली आरक्त ॥२३४॥मयूरें चातकें बदकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडालकें ॥ राजहंस नकुलें चक्रवाकें ॥ कोकिला कौतुकें बाहती ॥२३५॥धन्य धन्य धर्म राज नृपती ॥ श्वापदें निर्वैर विचरती ॥ योग साधनें ऋषी आचरतीं ॥ गायक गर्जती आलापें ॥२३६॥रसाळ आणि परमपावन ॥ अरण्यपर्व गोड गहन ॥ स्वधर्मनिष्ठ धर्म परायण ॥ त्यासीच जाण रुचे हें ॥२३७॥वनपर्व कमल सुरस ॥ पंडितमिलिंद घेती सुवास ॥ कुटिल निंदकदर्दुरांस ॥ कुतर्कपंक प्राप्त सदा ॥२३८॥ दर्दुरीं निंदिला कमल पराग ॥ परी सदा राहती सज्जनभृंग ॥ ज्यांचे ह्रदयीं श्री पांडुरंग ॥ सर्वकाळ वसतसे ॥२३९॥ब्रह्मा नंदा पंढरीराया ॥ श्री धर वरदा कौवारिया ॥ अभंगा निर्विकारा करुणालय ॥ ठेवीं पायां जवळचि ॥२४०॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यास भारत ॥ त्यां तील सारांश यथार्थ ॥ तेविसाव्यांत कथियेला ॥२४१॥स्वस्ति श्री पांडवप्रातप ग्रंथ ॥ अरण्यपर्वटीका श्रीधर कृत ॥ काम्यकवनांतून द्वैतवनांत ॥ पांडवगमन कथियेलें ॥२४२॥इति श्री धरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि त्रयोविंशाध्यायः ॥२३॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥॥ श्री पांडवप्रताप वनपर्व त्रयोविंशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 09, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP