मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय २९ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय २९ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय २९ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ वनपर्व विशाल गहन ॥ बोलिला सत्यती ह्रदयरत्न ॥ त्याचिये ॥ ज्याचिये मतीशीं मेदिनीवसन ॥ उपमा देतां तुळेना ॥१॥हरीचे गुण हें चिदाकाश ॥ त्याचा अंत पहावया विशेष ॥ मराळ होऊनि वेदव्यास ॥ भेदीत गेला निजबळें ॥२॥तोही श्रमला बहुत ॥ नेणेचि गुण गगनाचा अंत ॥ तरी मानवशलभां प्रांत ॥ कैसा पावेल सांग पां ॥३॥वरुणालयाचें जल अमूप ॥ टिटवा करूं शके केवीं माप ॥ उर्वीवजन होथ सुखरूप ॥ ऐसें करपाळें नसेचि ॥४॥उचलावया गगनस्वयंभ ॥ ऐसा कोठूनि योजावा स्तंभ ॥ केवढें आहे सूर्यबिंब ॥ तें मशक केवीं पाहोन ये ॥५॥श्रीमद्भीमातट विहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा रुक्मिणीवरा ॥ या भारता चिया परपारा ॥ माझेनें कदा न जाववे ॥६॥मी तुझें नाम जपेन अद्भुत ॥ माझेनें न वर्णवे भारत ॥ किती लिहूं न लागे अंत ॥ म्हणोनि ग्रंथ राहविला ॥७॥सोडूनि दिधेलें लेखन ॥ पांडुरंगनगरीं स्वेच्छेन ॥ तेथें केलें सुखें शयन ॥ तों नवल पूर्ण जाहलें ॥८॥स्वयें येऊनि पंढरीनाथ ॥ जवळी बैसोनि थापटीत ॥ श्रीधरा सखया ऊठ त्वरित ॥ लिहीं भारत पुढें तूं ॥९॥आपुले हातें लेखनी करून ॥ मषीपात्र पुढें आणून ॥ पुस्तक ठेविलें सोडून ॥ करीं धरून ऊठवी ॥१०॥वदन कुरवाळूनि हातें ॥ हनुवटी धरिली पंढरीनाथें ॥ हातीं देऊनि लेखनीतें ॥ म्हणे पुरतें करीं भारत हें ॥११॥म्हणे तूम जे जे बोलसी बोल ॥ तेथें रस मी पुरवीन सबल ॥ हा ग्रंथ ह्रदयीं धरितील सकल ॥ भक्त संत पंडित जे ॥१२॥तो दक्षिणद्वारकानगरविहारी ॥ सच्चिदानंदतनु सूत्रधारी ॥ ऐसें लाघव दावूनि झडकरी ॥ विटेवरी उभा ठेला ॥१३॥मी सावध होऊनि पाहें ॥ तों लेखनी नीट करूनि स्वयें ॥ मषीपात्र ग्रंथ ठेविला आहे ॥ सोडोनि श्रीविठ्ठलें ॥१४॥पाठिराखा रुक्पिणीवर ॥ ब्रह्मानंदें जाणोनि श्रीधर ॥ करूनियां जयजयकार ॥ पुढें ग्रंथ चालविला ॥१५॥अष्टाविंशति अध्याय सुरस ॥ तेथें बहु सांगितला इतिहास ॥ वैशंपायन जनमेजयास ॥ निरोपीत अत्यादरें ॥१६॥काननपर्व हें विशेष ॥ गोड गहन परम सुरस ॥ जेथें स्वामी वेदव्यास ॥ तीर्थीं अपार बोलिला ॥१७॥कोणे तीर्थीं कैसें माहात्म्य ॥ तेथींचा यथार्थ ॥ श्रीधर कर जोडूनि विनवीत ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१९॥तीर्थमाला करितां श्रवण ॥ होय महापापक्षालन ॥ नित्य करितां पठण श्रवण ॥ अपार महिमा नेणवे ॥२०॥काशी विश्वेश्वर निर्मळ ॥ त्र्यंबक उज्जनी महाकाळ ॥ ओंकार अमलेश्वर जाश्वनीळ ॥ बदरिकेदार घृष्णेश्वर पैं ॥२१॥नागनाथ वैजनाथ थोर ॥ मल्लिकार्जुन भीमाशंकर ॥ सोमनाथ आणि रामेश्वर ॥ ज्योतिर्लिंगें द्वादश हीं ॥२२॥अयोध्या मथुरा हरिद्वार ॥ काशी कांची अवंनीनगर ॥ द्वारावती गोमतीतीर ॥ सप्तपुर्या अनुक्रमें ॥२३॥तीर्थराज मुख्य त्रिवेणी ॥ पंचप्रयाग पुण्यखाणी ॥ ब्रह्मप्रयाग कर्णप्रयाग अघहरणी ॥ गुप्तयाग समर्थ तो ॥२४॥देवप्रयाग शिवप्रयाग पापहरण ॥ नैमिषारण्य धर्मारण्य ॥ पंचकारण्य ब्रह्मारण्य़ वेदारण्य़ ॥ बदरिकाश्रम पावन तो ॥२५॥यमुना सरस्वती भागीरथी ॥ गौतमी गोमती कृष्णा भीमरथी ॥ तापी नर्मदा भोगावती ॥ प्रवरा पुण्यवती मंदाकिनी ॥२६॥आनंदवर्धिनी पयोष्णी ॥ पिनाकी तुंगा कल्मषनाशिनी ॥ कृतमाला कावेरी पयस्विनी ॥ सुवर्ण मुखरी शिशुमालिनी ॥२७॥कपिला ताम्रपर्णी शरावती ॥ तुंगभद्रा आणि सोमवती ॥ सावित्री रेवा ककुद्मती ॥ वेगवती मलापहारिणी ॥२८॥घटप्रभा हरिदिनी मालिनी ॥ गंडकी शरय़ू वैतरणी ॥ स्वामिकार्तिकी पंचघृता पृथ्वीवरी ॥ विख्यात प्रवाह जयांचे ॥३०॥जटाकलिका श्रमहारिणी ॥ महेंद्रकाली त्रिशूली मंत्रर्धिनी ॥ नीरा सुरनदी शंखोद्धारिणी ॥ जयंती आणि अहिर्णवी ॥३१॥नाटका आनी अलकनंदा ॥ फल्गु सर्वांतका त्रिपदा ॥ शांता बाणनदी सुखदा ॥ मणिकर्णिका नद्या सर्व ॥३२॥शेषाद्रि आणि ब्रह्माद्रि ॥ मूळपीठ पर्वत सह्याद्रि ॥ विंध्याद्रि आणि हिमाद्रि ॥ मानससरोवरीं स्नानदान ॥३३॥अरुणाचल आनंदवर्धन ॥ कमलालय चिदंबर पूर्ण ॥ अगस्त्याश्रम पावन ॥ श्रीरंगपट्टण शोभिवंत ॥३४॥जनार्दन कन्याकुमारी ॥ शिवकांची विष्णुकांची सुंदरी ॥ मत्स्यतीर्थ पक्षितीर्थ उर्वीवरी ॥ शंखोद्धार वेदोद्धार पैं ॥३५॥हिरण्यनदी संध्यावट ॥ ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुभत ॥ ब्रह्मयोनि पृथोदक वरिष्ठ ॥ कुरुक्षेत्र बिंदुतीर्थ पैं ॥३६॥धर्मालय कलापग्राम ॥ गंगासागर सिंधुसंगम ॥ कौंडिण्यपुर अंबिका परम ॥ प्रेमपुर मार्तंड पैं ॥३७॥बाळा कल्होळ कल्हेश्वरी ॥ विराटस्वरूपिणी रक्तांबरी ॥ भ्रमरांबा ज्वालामुखी सुंदरी ॥ पीतांबरी महाशक्ति ॥३८॥जोगळादेवी भैरवी ॥ करवीरवासिनी शांभवी ॥ सप्तश्रृंगी महादेवी रौद्रवी ॥ हिंगुळजा आणि कमळजा ॥३९॥नागदेव आणि मोरेश्वर ॥ गुप्तकेदार वटेश्वर ॥ चक्रपाणी कुंदभुलेश्वर ॥ त्रिकूटाचल सुंदर पैं ॥४०॥हरिहरेश्वर नरसिंहपुर ॥ अक्षय्यवट त्रिकूटाचल पवित्र ॥ मूळमाधन विज्ञानेश्वर ॥ जुनाट नागेंद्र गौतमेश्वर ॥४१॥सप्तयोजन ॥ कोटेश्वर ॥ दक्षिणप्रयाग माधवेश्वर ॥ सिद्धवट धूतपाप सिद्धेश्वर ॥ पूर्वसागर तीर्थराज ॥४२॥वैराट पुष्कराज महाबळेश्वर ॥ धूळखेटकशंकर नारायण थोर ॥ मल्लहर सर्वेश्वर पांचालेश्वर ॥ सत्यनाथ पर्णालय ॥४३॥सिंधुपुर महामुरडेश्वर ॥ आदित्रिमल्ल त्रिसप्तकोटेश्वर ॥ करपात्र ब्रह्मकपालेश्वर ॥ भीमचंडी पुण्यालया ॥४४॥शिवक्रांती ॥ गोरक्षमठ आश्रम काळहस्ती ॥ वेदपुर गया अरुणावती ॥ उडपी शेषशायी सर्वेश ॥४५॥त्रिपत्ति अहोबळ स्त्रामितीर्थ ॥ सुबह्मण्य किष्किंधा मातंगपर्वत ॥ हंपीविरूपाक्ष मूर्तिमंत ॥ पंपासरोवर निर्मळ तें ॥४६॥चित्रकूट रुक्मकूट लोण्हार ॥ अंबुज अयोध्या महंकाऊन ॥ कालचंद्रिका अर्धोदय पवित्र ॥ गोकर्ण कृष्णसागर पैं ॥४७॥हरिहरतीर्थ जंबुकेश्वर ॥ अनंशायी विमलेश्वर ॥ मंथरा विकर्ण प्रभाकर ॥ विश्रांतिवन तपोवन ॥४८॥कुंभकोण वृंदारण्य मंजरथ ॥ मातुलिंग धूलिखेटक त्रिविक्रमतीर्थ ॥ मुद्नलमांधाता ओढयाजगन्नाथ ॥ पंढरीक्षेत्र चंद्राभागा ॥४९॥त्रिकोण आणि कर्ममूळ ॥ नागर गौररंगजळ ॥ असिपुरी नेपाळ आदित्रिमळ ॥ मंथनकाळेश्वर कुशतर्पण ॥५०॥मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर ॥ सिता असिता चिदंबरेश्वर ॥ ब्रह्मकटाह हरिद्वार ॥ आदित्य वैश्वानर महातीर्थ ॥५१॥ ब्रह्यानंदें म्हणे श्रीधर ॥ इतुकीं तीर्थें करूनि युधिष्ठिर ॥ गंधमादनपर्वतीं पंडुकुमार ॥ द्रौपदीसहित राहिला ॥५२॥इतुकिया तीर्थांचीं माहात्म्यें विशेष ॥ धर्मासी ऋषि सांगे लोमश ॥ त्यांतील तीर्थें सुरस ॥ ब्रह्मानंदें वर्णिलीं ॥५३॥अमरावतीस असतां अर्जुन ॥ सकळ विद्या आकळिल्या पूर्ण ॥ तों समुद्रामाजी दोघे जन ॥ निवातकवच दैत्य वसती ॥५४॥ते माजले बहुत असुर ॥ समरीं पराभविला सुरेश्वर ॥ देवीं युद्ध केलें अपार ॥ परी ते सहसाही नाटोपती ॥५५॥चिंताक्रांत पुरंदर ॥ देखोनि बोले पंडुकुमार ॥ आज्ञा मज द्या सत्वर ॥ निवातकवच वधावया ॥५६॥ऐसें ऐकतां पाकशासन ॥ ह्रदयीं धरिला प्रेमें अर्जुन ॥ सबीज मंत्र शस्त्रें देऊनि ॥ धर्मानुज धाडिला ॥५७॥इंद्रस्यंदनारूढ पंडुनंदन ॥ मातिलि सारथी कुशल पूर्ण ॥ मनोगतीं रथ चालवून ॥ मेदिनीवसनतीरा आले ॥५८॥लेकेऐसें त्यांचें नगर ॥ बळें पराक्रमें अतिथोर ॥ त्रिभुवनपीडक असुर ॥ शचीवर धाक वाहे ॥५९॥देवदत्त कुंतीकुमार ॥ वाजवितां दणाणलें नगर ॥ भयें गडबडला सागर ॥ निवातकवच हडबडिले ॥६०॥निवातकवच घेऊनि वाहिनी ॥ बाहेर आले तये क्षणीं ॥ तों अर्जुनें व्यापिलें बाणीं ॥ गगनीं वासरमणि दिसेना ॥६१॥जैसे रावण कुंभकर्ण ॥ रामें मारिले पराक्रमेंकरून ॥ तैसा सप्तदिवस अर्जुन ॥ युद्ध निर्वाण करिता जाहला ॥६२॥वृक्ष शिळा पर्वत ॥ पार्थावरी टाकिती अपरिमित ॥ परी सुघड धनुर्धर सुभद्राकांत ॥ आपणावरी पडों नेदी ॥६३॥नाना प्रकारचीं अस्त्रें ॥ संख्येरहित वर्षती शस्त्रें ॥ विमानीं बैसोनि दशशतनेत्रें ॥ पाहिलें युद्ध तयांचें ॥६४॥युद्ध करितां अद्भुत ॥ निवातकवच होती गुप्त ॥ नाना मायावी रूपें धरीत ॥ तरी पार्थ नाटोपे ॥६५॥शेवटीं ब्रह्मास्त्र घालून ॥ पार्थें एकाचि शरेंकरून ॥ दोघांचीं शिरें छेदून ॥ इंद्रापाशीं पाठविलीं ॥६६॥जाहला एकचि जयजयकार ॥ आनंदाश्रु टाकी सहस्त्रनेत्र ॥ निजहस्तें पुष्पसंभार ॥ पार्थमस्तकीं ओपीत ॥६७॥वाजती दुंदुभी एके घाईं ॥ नाद न माये भुवनत्रयीं ॥ पार्थें शत्रुनगरीं ते समयीं ॥ ठानें बसविलें देवांचें ॥६८॥विजयी होऊनि अर्जुन ॥ येत अमरावतीस परतोन ॥ देवभारांशीं सहस्त्रनयन ॥ सामोरा येऊन आलिंगी ॥६९॥दिव्य वस्त्रादि भूषणीं ॥ आत्मज गौरविला ते क्षणीं ॥ यावरी शक्राची आज्ञा घेऊनी ॥ पार्थ खालीं उतरला ॥७०॥बैसोनियां दिव्य रथीं ॥ पुढें धुरे मातलि सारथी ॥ गंधमादनपर्वतीं ॥ अकस्मात उतरला ॥७१॥मूर्तिमंत सूर्यचि उतरला ॥ तैसा विजय धम देखिला ॥ चौघे बंधु ते वेळां ॥ पुढें धांवती भेटावया ॥७२॥पांच संवत्सरपर्यंत ॥ अंतरला होता वीर पार्थ ॥ धर्में देखतां अकस्मात ॥ आनंदाश्रु लोटले ॥७३॥कनकदंड पडे धरणीवरी ॥ तैसा पार्थ धर्मासी नमस्कारी ॥ दोन्ही भुजा पसरोनि झडकरी ॥ युधिष्ठिर आलिंगी ॥७४॥रामें ह्रदयीं धरिला भरत ॥ कीं संजीवनी साधिल्या यथार्थ ॥ कचासी आलिंगी अमरनाथ ॥ तेवीं पार्थ युधिष्ठिरें ॥७५॥रेवतीरमर्णें रुक्मिणीजीवन ॥ धरिजे ह्रदयी प्रीतीकरून ॥ तैसा वृकोदरें अर्जुन ॥ ह्रदयीं द्दढ आलिंगिला ॥७६॥षडास्य आणि गजास्य ॥ ह्रदयीं धरी ब्योमकेश ॥ तैसा नकुलसहदेवांस ॥ सुभद्राकांत भेटला ॥७७॥धौम्यचरणांवरी माथा ॥ ठेवी तेव्हां अभिमन्युपिता ॥ लोमशादिऋषिसमस्तां ॥ अनुक्रमें वंदिलें ॥७८॥सुहास्यवदनी पद्मलोचनी ॥ जे कृष्णा श्रीरंगभगिनी ॥ ते अर्जुनाचे चरणीं ॥ मस्तक ठेवी आदरें ॥७९॥रथासहित मातलि पूजिला ॥ शक्रापाशीं पाठविला ॥ मग स्वर्गींच्या कथा सकल ॥ पार्थ सांगे सविस्तर ॥८०॥उत्तम वस्त्रें अलंकार ॥ अमूल्य वस्तूंचे संभार ॥ इंद्रें दिधले सकल उपचार ॥ ते धर्मापुढे समर्पी ॥८१॥तों सकल देवांसहित ॥ विमानीं बैसोनि अमरनाथ ॥ गंधमादन पर्वत ॥ लक्षूनि खालीं उतरला ॥८२॥सामोरे धांवूनि पांडव ॥ सप्रेम वंदिला वासव ॥ पांचांसी भेटूनि गौरव ॥ इंद्रें बहुत दिधला पैं ॥८३॥पांडवीं तेव्हां सप्रेम रीतीं ॥ आदरें पूजिला अमरपती ॥ कर जोडूनि पुढें तिष्ठती ॥ तंव बोले पाकशासन ॥८४॥अल्पकालेंकरून ॥ शत्रु जातील संहारून ॥ द्विरदपुरीचें छत्र सिंहासन ॥ प्राप्त होईल तुम्हांसी ॥८५॥ऐसें सांगोनि सहस्त्रनेत्र ॥ स्वपदासी गेला सत्वर ॥ इकडे पांचालीसह पंडुकुमार ॥ द्वैतवनाप्रति जाती ॥८६॥मार्गीं जातां पंडुनंदन ॥ वृषपर्व्याचें देखिलें वन ॥ तेथें प्रवेशला भीमसेन ॥ करी गर्जन अट्टहास्यें ॥८७॥भीमाची गर्जना ऐकोन ॥ भयें वनचरांचे गेले प्राण ॥ तों महाअजगरें धांवोन ॥ भीमसेन धरियेला ॥८८॥नवनागसहस्त्रबळी पूर्ण ॥ तो अजगरें केला क्षीण ॥ सर्वांगासी वेढे घालून ॥ वृकोदर आकळिला ॥८९॥कां न येचि अजूनि भीम ॥ मग पाहों पातला धर्म ॥ तों अजगरें वेष्टिला परम ॥ बलक्षीण जाहला ॥९०॥धर्म म्हणे हे अजगरा ॥ तुज देतों बहुत आहारा ॥ सोडीं माझिया वृकोदरा ॥ यावरी अजगर काय अबोले ॥९१॥या भीमासी मी भक्षीन ॥ तुजलाही सवेंचि गिळीन ॥ धर्म म्हणे तूं कोण ॥ पूर्व स्मरोन सांग पां ॥९२॥अहि म्हणे मी राव नहुष ॥ पुण्यक्रिया केली विशेष ॥ याग केले निर्दोष ॥ मिति दानां नसेचि ॥९३॥धरोनियाम सहस्त्र ब्राह्मण ॥ त्यांचे स्कंधीं शिबिका देऊन ॥ मी तीमाजीं बैसोन ॥ अमरावतीये चालिलों ॥९४॥अन्याय देखोनि अमूप ॥ कुंभोद्भवें दिधला शाप ॥ या सर्पयोनीं पापरूप ॥ बहुकाळ राहिलों ॥९५॥तरी मी पुसतों जे प्रश्न ॥ ते सांगें आधीं मजलागून ॥ मग सोडीन भीमसेन ॥ सत्य जाण धर्मराया ॥९६॥शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ॥ सांग यांचें काय लक्षण ॥ अजातशत्रु धर्म पूर्ण ॥ विप्रमहिमा वर्णीत ॥९७॥शम दम शौच तप जाण ॥ संतोष क्षमा आर्जव पूर्ण ॥ भगवद्धक्ति दया सत्य संपूर्ण ॥द आस लक्षणें ब्राह्मणांचीं ॥९८॥तेज बळ धृति शौर्य ॥ तितिक्षा प्रजापलन औदार्य ॥ स्थिरबुद्धि ब्राह्मणभक्ति ऐश्वर्य ॥ दश लक्षणें क्षत्रियांचीं ॥९९॥आस्तिक्यबुद्धि विप्रसेवन ॥ ब्रह्मनिष्ठता अदंभभजन ॥ निर्मत्सर हे पांच गुण ॥ वैश्याचे अंगीं जाण पां ॥१००॥गायीद्विजांचें पालन ॥ भग्वद्धक्ति भूमिसेवन ॥ पांचवें लक्षण दान ॥ शूद्रचिन्हें जाण हीं ॥१०१॥जैसा मुकुटावैरि हिरा पूर्ण ॥ तैसा श्रेष्ठा ब्राह्मण जाण ॥ ज्याचें पद रुक्मिणीरमण ॥ ह्रदयीं मिरवी तत्त्वतां ॥१०२॥दशावतारांची घरटी ॥ गोब्राह्मणपालनासाठीं ॥ स्वयें घेत जगजेठी ॥ धन्य सृष्टीं ब्राह्मण ॥१०३॥तीन सप्तकें मही ॥ निर्वीर केली सर्वही ॥ विप्रांसी दिधली पाहीं ॥ भार्गवरामें जाण पां ॥१०४॥ब्राह्मण रंकाचा करिती इंद्रा ॥ ब्राह्मणें प्राशिला समुद्रा ॥ कोपोनि क्षयरोगी केला चंद्रा ॥ सहस्त्रभगें शचीवरा ॥१०५॥ब्राह्मणशाप दारुण ॥ जाहलें शिवाचेम लिंगपतन ॥ सागरीं स्वर्गसंपत्ति संपूर्ण ॥ ब्राह्मणशापें पडियेली ॥१०६॥म्हणूनि सर्वभावेंकरून ॥ प्रसन्न करावे ब्राह्मण ॥ ऐसें अजगरें ऐकोन ॥ भीमसेन सोडिला ॥१०७॥दिव्यदेह पावोनि विशेष ॥ विमानीं बैसोनि गेला नहुष ॥ मग द्वैतवनाप्रति निःशेष ॥ पांडव आले पूर्वस्थळीं ॥१०८॥जो ब्रह्मांडनायक परमात्मा ॥ संगें घेऊनि सत्यभामा ॥ जाणोनि पांडवांच्या प्रेमा ॥ भेटला तेव्हां येऊनि ॥१०९॥पंडुकुमार पांचही जण ॥ द्दढ धरिती कृष्णचरण ॥ ब्रह्मानंदें उचंबळून ॥ द्रौपदी वंदी जगदीश्वरा ॥११०॥धर्मराज म्हणे यादवेंद्रा ॥ सुखी कीं अभिमन्यु सुभद्रा ॥ आनकदुंदुभि देवकी गुणसमुद्रा ॥ बलभद्र सुखी असे कीं ॥१११॥मग म्हणे मीनध्वजतात ॥ सुखरूप आहेत समस्त ॥ परी तुमचा समस्तांसी हेत ॥ निशिदिवस लागला ॥११२॥शर्म म्हणे अरविंदनेत्रा ॥ अभिनवजलधरकोमलगात्रा ॥ तारकारिजनकप्राण मित्रा ॥ जगदीशा जनार्दना ॥११३॥ऐशियावरी जगज्जीवन ॥ द्वारके गेला आज्ञा घेऊन ॥ त्यावरी मार्कंडेय येऊन ॥ पांडवांसी भेटला ॥११४॥पांडवीं तयासी नमूनी ॥ परमादरें पूजिला मुनी ॥ मार्कंडेय म्हणे धर्मा येथूनी ॥ कलियुग जवळी असे पैं ॥११५॥तुम्हांसारिखे धर्मपरायण ॥ कलियुगीं न होती सज्जन ॥ धृतराष्ट्राऐसे दुर्जन ॥ बहुसाल जन्मतील ॥११६॥कलि प्रवर्तेल दारूण ॥ एकरूपी होतील चार्ही वर्ण ॥ कोणी कोणाचा विटाळ न मानून ॥ यथासुखें वर्तती ॥११७॥विप्र वेदमंत्र त्यजून ॥ करितील शूद्राचें आचरण ॥ स्त्रिया पुरुषांसी छळून ॥ जारकर्मीं रत होती ॥११८॥बुडेल वेदशास्त्रपुराण ॥ नाना कुतर्क उठतील पूर्ण ॥ टाकूनि शिवविष्णुपूजन ॥ कुमार्गा जन आचरती ॥११९॥ब्राह्मणकर्म गायत्रीजप ॥ शूद्र आवरतील पापरूप ॥ स्वधर्म सांडोनि विप्र अमूप ॥ शूद्रकर्में आचरती ॥१२०॥गायी म्हशी न दुभती ॥ अवि अजा लोक पाळिती ॥ मद्यमांसरत जन होती ॥ मत्स्य भक्षिती मुख्य वर्ण ॥१२१॥देव नवसा न पावती ॥ पाषाणप्रतिमा केवळ उरती ॥ तेथें कोणी न भजती ॥ यवन टाकिती फोडूनि ॥१२२॥मातापितरांची निंदा ॥ पुत्र करितील बहु आपदा ॥ शिष्य न धरिती गुरुमर्यादा ॥ आज्ञा कदा न पाळिती ॥१२३॥देवनिंदा करिती अपार ॥ तेणें येईल दरिद्र ॥ विधवांचीं धनें समग्र ॥ नेतील नूप हिरोनि ॥१२४॥विप्र घेतील दुषदान ॥ राजे होतील कोशहीन ॥ पापद्र्व्य मेळवून ॥ धर्मवाटा पाडिती ॥१२५॥क्षात्रधर्म सोडून ॥ समर सांडूनि घेतील रान ॥ कन्या उगाचि उचलून ॥ नेती एकएकांच्या ॥१२६॥शाखाभेदक गोत्रें सकळ ॥ बुडोनि होती म्लेच्छ केवळ ॥ चार्ही वर्णांत होईल ऐकमेळ ॥ वाढेल कुमार्ग पैं ॥१२७॥आगम राहील एकीकडे ॥ भ्रष्ट होतील रोकडे ॥ वृद्धांच्या बुद्धीं चोहींकडे ॥ बालवत होतील पैं ॥१२८॥स्वेच्छाचारें स्त्रिया पुरुष ॥ दाता नाहींच निःशेष ॥ विप्र विकिती नानार्स ॥ ध्यान स्त्रियांचें परपुरुषीं ॥१२९॥लोपेल वैराग्य भक्ति ज्ञान ॥ वाढेल कापटय जारण मारण ॥ नाना उपाय करून ॥ द्रव्या हरिती परस्परें ॥१३०॥टाकिती उद्यानें मोडून ॥ तीर्थयात्रा जाती लोपोन ॥ शूद्र विप्रांचा करितील अपमान ॥ द्रव्य हरून नेतील ॥१३१॥विप्र गिरिकंदरें सेवितीं ॥ तस्कर चहूंकडे प्रकटती ॥ शूद्र गुरुत्व भोगिती ॥ शिष्य होती विप्र त्यांचे ॥१३२॥शूद्रमुखें पुराण ॥ ऐकों लागतील ब्राह्मण ॥ होतील हिंसापरायण ॥ क्षेत्रमहिमा लोपेल ॥१३३॥बीजें सकळ जाती जळोन ॥ मंत्रीं सत्त्वा न राहे संपूर्ण ॥ आपणा आवडे तोचि जाण ॥ मान्य करितील आचार ॥१३४॥गुरुत्व जाईल बुडोन ॥ अकालीं वर्षेल घन ॥ करितील मातापितागुरुहनन ॥ विष घालोन परस्परें ॥१३५॥सूर्य तपेल फार ॥ वायूचा उत्कर्ष अपार ॥ अनावृष्टि अतिवृष्टि क्षोभेल वैश्वानर ॥ गंगा ग्राम बुडविती ॥१३६॥पौर्णिमा कुहू सांडून ॥ आडतिथीस लागेल ग्रहण ॥ पुत्राश्रय संपादून ॥ स्त्रिया मारिती भ्रतारा ॥१३७॥कोणी कोणाचा स्त्रेह न धरी ॥ द्र्व्यलोभी जन अहोरात्रीं ॥ प्राणान्त जाहलिया निर्धारीं ॥ ठेवणें आपुलें न सांगती ॥१३८॥संत ब्राह्मण राव दाता ॥ कलियुगीं विरळा चारी वस्ता ॥ पुत्र सेवक बंधु शिष्य तत्त्वतां ॥ श्री नाहीं कलियुगीं ॥१३९॥अधर्मरत सर्व जन ॥ द्र्व्यालागीं वेंचिती प्राण ॥ असत्यक्रिया करून ॥ भाषनेम मोडिती ॥१४०॥परधन परदारा ॥ यालागीं अनर्थ होतील राजेंद्रा ॥ ज्याचें ऋण घ्यावें त्या सत्वरा ॥ विष घालूनि मारिती ॥१४१॥माता आणि पितर ॥ यांसी पुत्र घालिती बाहेर ॥ बालविधवा करोनि भ्रतार ॥ करिती संसार अन्यदेशीं ॥१४२॥वेदविक्रय करितील ब्राह्मण ॥ कन्यागोरसविक्रय करितील पूर्ण ॥ वृक्ष निष्फल धेनु न दुभती जाण ॥ समयीम घन वर्षेना ॥१४३॥माता पिता आणि सुत ॥ द्र्व्यसंबंधें यांत अनर्थ ॥ माता करितील पुत्रघात ॥ मागें पुढें न पाहती ॥१४४॥पुत्र क्मारिळ पित्यातें ॥ सुत मरेल पितृहस्तें ॥ भ्रताराचे प्राणातें ॥ स्त्री घेईल धनलोभें ॥१४५॥बंधूंचा घेती प्राण ॥ गुरुशिष्यांत विकल्प पूर्ण ॥ संन्यासी दिगंबर धन ॥ सांचवून ठेविती ॥१४६॥साधु राजद्वारा धांवती ॥ धनाढयाप्रति ज्ञान बोधिती ॥ भक्ति वैराग्य ज्ञान शांती ॥ यांसी न देती ठाव कोणी ॥१४७॥चोरी हिंसा अनृत दंभ भेद ॥ काम क्रोध वैर मद ॥ अविश्वास कपटवाद ॥ वर्धमान होती पैं ॥१४८॥कलियुग घोर बहुत ॥ सर्वधर्मविवर्जित ॥ पापाचे होतील पर्वत ॥ पुण्य सर्षपप्रमाण ॥१४९॥सरिता तीर्थें जाती आटून ॥ न दिसे भागीरथीचें जीवन ॥ शिश्रोदरपरायण ॥ लोक होतील सर्वही ॥१५०॥करितील स्त्रियांची भक्ती ॥ हेमकिंकर सर्व होती ॥ सर्व ब्रह्म वाचे वदती ॥ समस्त टाकिती सत्कर्में ॥१५१॥परस्त्रियेप्रति मानस आसक्त ॥ वादप्रतिवादा सदा उदित ॥ नास्तिक्य पशुबुद्धि समस्त ॥ विद्या किंचित मद बहु ॥१५२॥गुरूचा करिती अपमान ॥ रात्रंदिवस पाहती न्य़ून ॥ म्हणती याचा नाहीं बरा गुण ॥ जाती शरण आणिका ॥१५३॥गुरु त्यागितां निश्चयेंशीं ॥ पाणी होती अल्पायुषी ॥ दरिद्री होऊनि नरकासी ॥ जाती अंतीं नेमेंशीं ॥१५४॥शूद्राचें इच्छी मन ॥ कीं करावें शालिग्रामपूजन ॥ करिती गायत्रीपुरश्चरण ॥ अल्पायुषी नरक पुढें ॥१५५॥स्वधर्मकर्म निंदिती ॥ द्विजस्त्रियांचे पुनर्विवाह होती ॥ महापाणी स्नुषा निश्चिती ॥ घालिती विष वृद्धांतें ॥१५६॥जारकर्मीं स्त्रिया रत ॥ लेखिती भ्रतारासी भृतारासी भृत्यवत ॥ धर्म बुडेल समस्त ॥ शौर्यभ्रष्ट क्षत्रिय होती ॥१५७॥अग्निहोत्रें होतील विच्छिन्न ॥ गुरुभक्ति जाईल उडोन ॥ शतमूर्ख गुरुत्व धरून ॥ भ्रष्टमार्ग आचरती ॥१५८॥आठ दहा वर्षात ॥ स्त्रिया होतील प्रसूत ॥ एका पुरुषा बहुत ॥ स्त्रिया धांवती जारिणी ॥१५९॥क्षीरावरी नवनीत ॥ मथितां न निघे किंचित ॥ वृद्धपण षोडश वर्षांत ॥ होईल प्राप्त पुरुषांतें ॥१६०॥पुरुषांचें भ्रष्टेल पुरुषल ॥ स्त्रियांसी काम अद्भुत ॥ यवनाचा उत्कर्ष बहुत ॥ कलीमाजी राज्य त्यांचें ॥१६१॥होतां पांच सहस्त्र संवत्सर ॥ भौमदैवतें जातील समग्र ॥ दहा सहस्त्र वर्षें हरिहर ॥ पृथ्वीवरी न वागती ॥१६२॥येथें तरतील कोण ॥ ऐकें धर्मा त्यांचें लक्षण ॥ परधन परदारा टाकून ॥ हरिस्मरणीं रत जे कां ॥१६३॥क्कचित उरतील भक्त ॥ तेचि तरतील कलियुगांत ॥ ब्राह्मण्य द्रविडदेशांत ॥ उरेल किंचित शेवटीं ॥१६४॥कावेरी आणि ताम्रपर्णी ॥ कृष्णामाल अपयस्विनी ॥ या नद्यांचे उदकस्थानीं ॥ ब्राह्मण्य कांहीं उरेल ॥१६५॥चंद्र सूर्य बृहस्पती ॥ एके राशीस जैं येती ॥ तैं पुण्यक्रिया मागुती ॥ लोक आचरती पूर्ववत ॥१६६॥मार्कंडेय म्हणे धर्मा ॥ पूर्वीं जैसा शिबिराज धर्मात्मा ॥ युधिष्ठिरा तेवीं तुझा महिमा ॥ एकवदनें न वर्णवे ॥१६७॥धर्म म्हणे महाऋषी ॥ सांगें शिबिराजाची कथा कैसी ॥ मार्कंडेय म्हणे परियेसीं ॥ सादर चित्त करूनियां ॥१६८॥सूर्यवंशीं चक्रवर्ति ॥ शिबिराजा उर्वीपति ॥ पुण्यपरायण यशकीर्ति ॥ ज्याची ब्रह्मांडांत न माये ॥१६९॥तो अयोध्येचा नायक ॥ विधिपूर्वक करितां शतमख ॥ अपार ऋषी मिळाले देख ॥ नामें सांगतां न सरती ॥१७०॥नव्याण्णव याग संपूर्ण ॥ शिबीनें केले कृष्णार्पण ॥ शेवटींचा क्रतु जाण ॥ आरंभिला आनंदें ॥१७१॥तों नारद आला अकस्मात ॥ देखोनि परम आश्चर्य करीत ॥ म्हणे धन्य शिबिराय अद्भुत ॥ महिमा याचा न वर्णवे ॥१७२॥मग इंद्रापाशीं जाऊन ॥ नारद सांगे वर्तमान ॥ म्हणे धन्य शिबिराज सज्जन ॥ शतमख जाण करीतसे ॥१७३॥शेवटींचा याग आरंभिला ॥ ऐकतां शचीवर चचकला ॥ सांगातें द्विमूर्धा घेतला ॥ येता जाहला अयोध्ये ॥१७४॥अग्नि होऊनि कपोत ॥ राजसदनांत जात पळत ॥ श्येनपक्षी अमरनाथ ॥ होऊनि धांवे त्यापाठीं ॥१७५॥लक्षानुलक्ष महाऋषी ॥ बैसले असतां यागासी ॥ तों कपोत येऊनि रायापाशीं ॥ रक्षीं रक्षीं म्हणतसे ॥१७६॥कपोत भयभीत होऊन ॥ मांडीवरी बैसला दीनवदन ॥ तों ससाना धांवोन ॥ सभारंगणीं बैसला ॥१७७॥कपोत म्हणे रायासी ॥ शरणागता घालीं पाठीशीं ॥ नृपश्रेष्ठा पुण्यराशी ॥ सर्व जाणसी शास्त्रार्थ ॥१७८॥ससाण बोले सत्वर ॥ राया माझा देईं आहार ॥ ज्याचें त्यासी द्यावया विचार ॥ कासया करिसी सांग पां ॥१७९॥माझा ग्रास घेसी जरी ठेवून ॥ तरी निष्फळ सर्व तुझा यज्ञ ॥ मी प्राणत्याग करीन ॥ आतांचि एथें पृपवर्या ॥१८०॥राजयाचे पोटांत ॥ भयेंकरूनि कपोत दडत ॥ म्हणे मी पाठीं रिघालों सत्य ॥ नुपेक्षीं तूं स्त्रेहाळा ॥१८१॥चार सहा अष्टादश बोलत ॥ नुपेक्षावे शरणागत ॥ तरी आपुलें सुकृत ॥ रक्षीं त्वरित पृथ्वीशा ॥१८२॥ससाणा म्हणे तीन दिवस ॥ पडले निर्वाण उपवास ॥ वनीं कष्टलों बहुवस ॥ देईं ग्रास माझा तूं ॥१८३॥बैसले तुझे सभेंत पंडित ॥ त्यांसी पुसें हा शास्त्रार्थ ॥ ज्याचें त्यासी देतां निश्चित ॥ यश अद्भुत जोडेल ॥१८४॥पाहोनि रायाचें वदन ॥ कपोत रडे स्फुंदस्फुंदोन ॥ बाळें माझीं तान्हीं दीन ॥ अशक्त जाण स्त्री माझी ॥१८५॥अवचित सांपडलों या व्यसनांत ॥ रक्षीं माझा होतो कुटुंबघात ॥ बैसले ऋषिसभे संत ॥ त्यांसी वृत्तान्त पुसें हा ॥१८६॥ससाणा म्हणे नृपवर्या ॥ घरीं गर्भिण माझी जाया ॥ तुज कैसी नुपजे माया ॥ पडेल काया आतां हे ॥१८७॥रायासी थोर संकट पडलें ॥ मग सुबुद्धिप्रधान ॥ सुपुत्र बोले ॥ म्हणे जया पाठीसीं घातलें ॥ तयासी देऊं नये तूं ॥१८८॥ससाणा दवडावा येथून ॥ जीवघातकी परम दुर्जन ॥ ऐसें ऐकतां श्येन ॥ क्रोधानळें खवळला ॥१८९॥म्हणे सुबुद्धि आणि धर्म ॥ कासया ठेविलें तुझें नाम ॥ नामासारिखी उत्तम ॥ करणी नाहीं तुजपाशीं ॥१९०॥जंबुक द्दष्टीं देखतां पळे ॥ त्यासी केसरी नाम ठेविलें ॥ दोन्ही नेत्रांसी वडस वाढले ॥ कमलनयन नाम तया ॥१९१॥कोरान्न मागतां न मिळे अन्न ॥ नाम ठेविलें शचीरमण ॥ क्षीरसिंधूचा जातां प्राण ॥ तक्र कोणी नेदीच ॥१९२॥नाम जयाचें उदारकर्णं ॥ अडका वेंचितां जाय प्राण ॥ बृहस्पति नाम जयालागून ॥ धड वचन बोलतां न ये ॥१९३॥निर्नासिका नाम मदन सत्य ॥ परद्वारिया नाम हनुमंत ॥ ज्याचें नाम भास्कर विख्यात ॥ तो अंधारीं पडियेला ॥१९४॥अजारक्षका नाम पंडित ॥ काष्ठवाहका नाम नृपनाथ ॥ कीं दरिद्रियासी नाम प्राप्त ॥ कुबेर ऐसें जाहलें ॥१९५॥जैसे अजागलस्तन ॥ कीं मुखमंडन बधिरकर्ण ॥ कीं जन्मांधाचे विशाल नयन ॥ तैसेंचि जाण नाम तुझें ॥१९६॥रासभासी सिंहासन ॥ श्वानासी अग्रपूजा जाण ॥ दिव्यांबर परिधान ॥ उष्ट्रासी काय व्यर्थचि ॥१९७॥कनकवृक्ष धोत्र्यासी म्हणती ॥ चर्मकगृहींचा लोहहस्ती ॥ पक्ष्या नाम भारद्वाज म्हणती ॥ तैसेंचि नाम तुमचें पैं ॥१९८॥ऐसें ससाणा बोलोन ॥ तेथें पडे मूर्च्छा येऊन ॥ तंद्री लागली प्राण ॥ सांडूं पाहे तेधवां ॥१९९॥राव धांवोनि जवळी येत ॥ उदक शिंपूजि सावध करीत ॥ आहार देतों घे घे म्हणत ॥ किंचित उघडी नेत्र तेव्हां ॥२००॥चंचू पसरी मिचकावी नेत्र ॥ म्हणे कपोत मुखीं घालीं सत्वर ॥ राव म्हणे ससाण्या विचार ॥ एक आतां परिस तूं ॥२०१॥कपोताचे भारंभार ॥ मांस घेईं करीम आहार ॥ येरू म्हणे नरमांस सत्वर ॥ देईं मज आणोनि ॥२०२॥चोरहेरांचें घेसी विकत ॥ तें मी नेघें निश्चित ॥ तों सत्यवती येऊनि बोलत ॥ राजपत्नी तेधवां ॥२०३॥माझें मांस देतें पाहीं ॥ येरू म्हणे न घडे सहसाही ॥ शिबिराज म्हणे माझें घेईं ॥ मान्य करीं पक्षिया ॥२०४॥अवश्य ससाणा म्हणत ॥ रायें तुळा आणविली तेथ ॥ एके भागीं कपोत ॥ बैसवूनि शस्त्र घेतलें ॥२०५॥ससाणा म्हणे तये क्षणीं ॥ येथें हाहाकार ॥ करितां कोणी ॥ कीं अश्रुपात ढाळितां नयनीं ॥ जाईन उठोनि राजेंद्रा ॥२०६॥सत्याचा सागर सत्वधीर ॥ रायें करीं घेतलीं शस्त्रा॥ निजमांस छेदूनि सत्वर ॥ तुळेमाजी घालीतसे ॥२०७॥रायाचें सत्त्व पाहात ॥ हळूहळू कपोत जड होत ॥ तीन टांक उणें येत ॥ मागुता ओपी चक्रवर्ती ॥२०८॥विमानीं दाटलें अंबर ॥ करिती आश्चर्य सुरवर ॥ मृत्युलोकीं नारी नर ॥ अत्यद्भुत पाहती ॥२०९॥वरिचेवरी मांस घाली नृपनायक ॥ मागुती उणें होय तीन टांक ॥ सरलें मांस सकळिक ॥ अस्थि उघडया जाहल्या ॥२१०॥अस्थि प्राण आणि शिर ॥ उरलीं तेव्हां साचार ॥ माथा डोलविती ऋषीश्वर ॥ सव्यतर्जनी उचलोनि ॥२११॥तें देखोनि नारदमुनी ॥ गेला विकुंठासी धांवोनी ॥ दीनदयाळा अजूनी ॥ सत्त्व किती पाहसी ॥२१२॥सर्वांगाचें काढोनि मांस ॥ शिबिरायें दिलें निःशेष ॥ ऐसें ऐकतां सर्वेश ॥ न सांवरत ऊठिला ॥२१३॥लगबग जाहली बहुत ॥ कौस्तुभमाळा न सांवरत ॥ पीतांबर भूमीस रुळत ॥ सुमनें संडत त्वरें जातां ॥२१४॥सद्नद होऊनि जगजेठी ॥ रायाचे गळां घातली मिठी ॥ दिव्य शरीर जाहलें द्दष्टीं ॥ लोक सर्व पाहती ॥२१५॥जाहला एकचि जयजयकार ॥ सुर वर्षती सुमनसंभार ॥ अयोध्येसह नृपवर ॥ दिव्यविमानीं बैसविला ॥२१६॥चतुर्भुज नृपासी करून ॥ निजपदीं स्थापिला नेऊन ॥ धर्माप्रति कथा गहन ॥ मार्कंडेय मुनि सांगे हे ॥२१७॥मुनि म्हणे धर्मराया ॥ शिबीऐसी तुझी चर्या ॥ ऐसी कथा सांगोनियां ॥ ऋषी पावले अंतर्धान ॥२१८॥किरीटीस म्हणे युधिष्ठिर ॥ तूं शक्रपुरीं होतासी पांच संवत्सर ॥ ईश्वर आणि न निर्जरेंद्र ॥ विद्या शिकलासी त्यांपाशीं ॥२१९॥चौदा विद्या चौसष्टि कला ॥ अनुच्छिष्ट मंत्रास्त्रमाला ज्यांचा प्रताप आगळा ॥ या त्रिभुवनामाझारीं ॥२२०॥तरी तीं क्षणभरी सोडोनियां ॥ प्रताप मज दावीं बा धनंजया ॥ येरू म्हणे महाप्रलया ॥ भावितील कीं जन सर्व ॥२२१॥अस्त्रें सोडितां कुंभिनी ॥ सनग गजबजेल ये क्षणीं ॥ तरी शतांशेंकरूनी ॥ दावीन क्षणैक पहावें ॥२२२॥नाना अस्त्रांचें प्रेरण ॥ करिता जाहला सुभद्रारमण ॥ विध्यंड डळमळलें तेणेंकरून ॥ अद्भुत तेज प्रकटलें ॥२२३॥हेलावले सप्तपाताळ ॥ गडबडले देव सकळ ॥ वारणपुरींत हलकल्लोळ ॥ कौरव थरथरां कांपती ॥२२४॥शारद्वत द्रोण स्वर्धुनीसुत ॥ म्हणती काय मांडिला अंत ॥ द्रोण ज्ञानें विचारीत ॥ पार्थ विद्या दावितो ॥२२५॥इकडे धर्म म्हणे पार्था ॥ प्राणसखया गुणभरिता ॥ अपुलीं अस्त्रें आवरीं आतां ॥ महाप्रलय वर्तला ॥२२६॥जैसा सर्प गारुडया आधीन ॥ पेटारां घालिती मागुतेन ॥ तैसा अस्त्रें आवरी कृष्ण ॥ चमत्कार दावोनियां ॥२२७॥ऋषी आश्चर्य करिती संपूर्ण ॥ धन्य महावीर अर्जुन ॥ अस्त्रप्रेरण आकर्षण ॥ रणपंडित सर्व जाणे ॥२२८॥धर्मरायासी नमून ॥ स्वस्थ बैसला सुभद्रारमण ॥ पुढें कथा संपूर्ण ॥ सुधारसाहून गोड असे ॥२२९॥बोले लोमशऋषीश्वर ॥ युधिष्ठिर कथा ऐकें सुंदर ॥ पूर्वीं राजा हरिश्चंद्र ॥ सत्त्वशील तुज ऐसा ॥२३०॥धर्म चरणीं लागूनी ॥ म्हणे ते कथा सांगा लोमशमुनी ॥ जे ऐकतां श्रवणीं ॥ पाप ताप न उरेचि ॥३३१॥जनमेजयासी म्हणे वैशंपायन ॥ लोमशें कथाअ कथिली संपूर्ण ॥ तुम्ही होऊनि सावधान ॥ एकचित्तें ऐका पां ॥३३२॥पांडवप्रताप ग्रंथ गहन ॥ वनपर्व हें सुरस पूर्व ॥ बोलिला सत्यवतीनंदन ॥ वैशंपायन निजमुखें ॥३३३॥तेचि कथा रसाळ फार ॥ ब्रह्मानंदें वर्णील श्रीधर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ सर्व कार्य टाकूनियां ॥३३४॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकोणतिसाव्यांत कथियेला ॥३३५॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि एकोनत्रिंशाध्यायः ॥२९॥ श्री कृष्णार्पणमस्मु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP