मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३२ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३२ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३२ वा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः॥ जो जगद्भुरु आदिपुरुष ॥ आदिमायेचा भर्ता ईश ॥ ब्रह्मा विष्णु महेश ॥ बाळकें पोटीं निर्मिलीं ॥१॥सात्त्विक राजस तामस ॥ सृष्टिरचना करविली विशेष ॥ चौर्यायशीं लक्ष योनी बहुवस ॥ जीव भोगिती निजकर्मे ॥२॥पडला अज्ञानांधकार बहुत ॥ न दिसे कांहीं वस्तुजात ॥ अडखळोनि क्षणक्षणां पडत ॥ गर्भगर्तेत जीव हे ॥३॥काम क्रोध मद मत्सर ॥ हे थोर हिंडती तस्कर ॥ पुण्यधन सर्वत्र ॥ हिरोनि नेती क्षणार्धे ॥४॥ऐसें निविड तम जाणोन ॥ तो सत्यवतीहृदयरत्न ॥ उगवला सूर्यनारायण ॥ वेदव्यास महाराज ॥५॥निगमकमला जाहला विकास ॥ प्राणे प्रवर्तले सत्कर्मास ॥ सत्क्रियाराहटी निर्दोष ॥ आचरोनि यश पावती ॥६॥कृपाळु तो वेदव्यास ॥ तारावया ॥ जडजीवांस ॥ भारत निर्मिलें सप्तम रस ॥ कीं पंचम वेद सुरस हा ॥७॥व्यासशिष्य वैशंपायन ॥जैसा देवगुरु परम निपुण ॥ विराटपर्व दिव्य निरुपण ॥ जनमे जयाप्रति सांगे ॥८॥मागें संपलें अरण्यपर्व ॥ येथींच्या रचना सुरस अपूर्व ॥ येथूनि आतां विराटपर्व ॥ यशदायक परिसिजे ॥९॥जनमेजय म्हणे वैशंपायना ॥ चातुर्यसिंधो गुणसंपन्ना ॥ विराटनगरीं पंडुनंदनां ॥ वास जाहला कोणेपरी ॥१०॥दुर्योधन दुर्जन बहुवस ॥ कैसा केला अज्ञातवास ॥ द्रौपदी सती निर्दोष ॥ गुप्त कैसी राहिली ॥११॥वैशंपायन म्हणे नृपती ॥ तुझा पिता परीक्षिती ॥ त्याचा पितामह निश्चिती ॥ पंडुपुत्र महाराज ॥१२॥अरण्यपर्व संपलें विशेष ॥ तेथें कथा कथिली सुरस ॥ यमें धरुनि मृगवेष ॥ अरणीपात्रें पळविलीं ॥१३॥पुढें वटवृक्षीं राहून ॥ पांडवांसी जाहला प्रसन्न ॥ अरणीपात्रें देऊन ॥ वरप्रदान दीधलें ॥१४॥तयावरी पांचही जण ॥ आश्रमा आले पंडुनंदन ॥ जाहलें जें वर्तमान ॥ सकल ब्राह्मणां निवेदिलें ॥१५॥अजातशत्रु धर्मनृपती ॥ बोलता जाहला बंधूंप्रती ॥ अरण्यवास सत्संगती ॥ द्वादश वर्षे जाहलीं ॥१६॥आतां अज्ञातवास पूर्ण ॥ त्रयोदश वर्ष परम कठीण ॥ नाम रुप पालटून ॥ कोठें क्रमावें सांगा पां ॥१७॥बहुत देश निगूढ स्थानें ॥ गुप्त विवरें रमणीय वनें ॥ कीं पांचालविराटादि सदनें ॥ गुप्तरुपें सेवावीं ॥१८॥मग म्हणे वीर पार्थ ॥ देश राजे आहेत बहुत ॥ परी अज्ञातवासा प्रस्तुत ॥ विराटगृहीं जाइंजे ॥१९॥नामें रुपें पालटून ॥ परगृहीं राहणें कठिण ॥ धर्मात्मा तूं धर्मपरायण ॥ कोणें रीतीं राहसी ॥२०॥धर्म म्हणे पार्था ऐक ॥ मी आत्मनाम ठेवीन कंक ॥ अक्षकर्मीं निपुण देख ॥ सभासद होईन मी ॥२१॥द्यूतकर्मीं परम निपुण ॥ दंतपाश करीं धरुन ॥ स्वगुणें विराट मोहीन ॥ नानायुक्ती खेळोनियां ॥२२॥यावरी भीम बोले अपूर्व ॥ मी म्हणवीन तेथें बल्लव ॥ सूपशास्त्रीं प्रवीण सर्व ॥ षड्रसान्नें निर्मीन मी ॥२३॥चतुर्विधान्नें निर्मीन ॥ ज्यांचे ज्यांचे सुवासें संपूर्ण ॥ लाळ घोंटिती देवगण ॥ वसंत भुलोन जातसे ॥२४॥गज वृषभ मल्ल दारुण ॥ यांशीं बळें झोंबी घेईन ॥ विराटाप्रति संतोषवीन ॥ स्वगुणेंकरुन धर्मराया ॥२५॥यावरी बोले पार्थ वीर ॥ शक्रगृहीं होतों पांच संवत्सर ॥ तेथे उर्वशी परम चतुर ॥ भोगकामा पातली ॥२६॥तीस भोग नेदीं म्हणोन ॥ वदली ते शापवचन ॥ एक संवत्सर संपूर्ण ॥ नपुंसकत्व पावसी ॥२७॥तरी मी बृहन्नटा नाम धरुन ॥ अंतःपुरामाजी राहीन ॥ स्त्रीवेष अवलंबून ॥ मोहीन जाण सुदेष्णा ॥२८॥नृत्यगीतभेद शिकवून ॥ सकल स्त्रिया करीन प्रवीण ॥ आपुलें स्वरुप नाम खूण ॥ अनुमात्र न कथीं मी ॥२९॥यावरी नकुल बोले कौतुक ॥ नाम सांगेन मी ग्रंथिक ॥ अश्वपरीक्षा शिक्षा अनेक ॥ करुनि नृप तोषवीन ॥३०॥अश्वव्यथा अंतर्लक्षणें ॥ सर्व चातुर्य मी जाणें ॥ सहदेव यावरी म्हणे ॥ ततिपाल नाम माझें ॥३१॥गायी वृषभ महिषी ॥ यांची परीक्षा मी जाणें कैसी ॥ वर्षती जेणें दुग्धराशी ॥ ते मजपाशीं विद्या असे ॥३२॥द्रौपदी म्हणे मी पुरंध्री ॥ नाम सांगेन सैरंध्री ॥ सुदेष्णेपाशीं अहोरात्रीं ॥ सेवा करीन आदरें ॥३३॥धर्म म्हणे मी तेथ ॥ म्हणवीन पांडवांचा सभासद ॥ कौतेय जाहले गुप्त ॥ म्हणोनि आलों तुजपाशीं ॥३४॥मग बोले भीमसेन ॥ धर्माचा स्वयंपाकी म्हणवीन ॥ अर्जुन म्हणे स्त्रीवेष धरुन ॥ सखी म्हणवीन द्रौपदीची ॥३५॥नकुल म्हणे ते वेळां ॥ धर्मरायाच्या अश्वशाळा ॥ त्यांवरी होतों नृपाळा ॥ आलों असें तुजपाशीं ॥३६॥सहदेव म्हणे जाण ॥ विराटाशी बोलेन वचन ॥ मी पांडवखिल्लारी पूर्ण ॥ सेवा करीन तुजपाशीं ॥३७॥द्रौपदी म्हणे सुदेष्णेपाशीं ॥ म्हणवीन द्रौपदीची दासी ॥ गुप्त जाहले पांडव वनवासी ॥ जाहली गति ऐसी आम्हां ॥३८॥ऐसा करुनि विचार ॥ धौम्यासी म्हणे युधिष्ठिर ॥ अरणीपात्रें अग्निहोत्र ॥ घेऊनि जावें तुम्हीं आतां ॥३९॥पांचालपुरा जाऊन ॥ रहावें अग्निशश्रूषा करुन ॥ द्वारकेसी इंद्रसेन ॥ रथ आमुचे नेईल ॥४०॥सर्वही बोला वचन ॥ पांडव गेले आम्हां टाकून ॥ कोणे स्थळीं राहिले जाऊन ॥ हें न कळे सर्वथा ॥४१॥यावरी महाराज धौम्य ॥ धर्मासी बोले सप्रेम ॥ नित्य प्रवासकष्ट परम ॥ त्याहूनि श्रम परगृहीं ॥४२॥राजगृहीं राहणें कठिण ॥ बहुत न करावें संघट्टण ॥ जैसी अग्निसेवा दुरुन ॥ याजक करिती सप्रेम ॥४३॥पांच जण मिळून ॥ द्रौपदीस करा जतन ॥ समयोचित बोला वचन ॥ जेणें समाधान रायाचें ॥४४॥वेदांचें अंतर पाहतां सम्यक ॥ फुटती जैसे शास्त्रांचे तर्क ॥ तेवीं रायाचें चित्त पाहोनि देख ॥ कार्यभात्ग करावा ॥४५॥न बैसावें रायासन्मुख ॥ पाठीं न बैसावें देख ॥ बहुतांसमीप निःशंक ॥ न बैसावें संघट्टणीं ॥४६॥बहुत दूर जाऊनी ॥ न बैसावें रायापासूनी ॥ क्षणक्षणां न लागावें कानीं ॥ मंत्री मनीं विटतील ॥४७॥वाम अथवा सव्य पाहूनी ॥ अंतरें बैसावें जाऊनी ॥ राजा वश म्हणोनी ॥ भलती गोष्ट न सांगावी ॥४८॥नृप सर्प कृशान ॥ हे मित्र म्हणों नये जाण ॥ राव जाहला जरी प्रसन्न ॥ तेंही सुख न मानावें ॥४९॥रायें दिधलीं वस्त्रें भूषणें ॥ तींच रायादेखतां लेणें ॥ आणिकाचीं न मिरवणें ॥ स्तुति न करणें इतरांची ॥५०॥तांबूलचर्वण बहुभाषण ॥ क्षणक्षणां न थुंकावे उठोन ॥ मर्यादेनें बैसावें आटोपून ॥वीरासन न घालावें ॥५१॥बहुत न घ्यावा आहार ॥ वायु आकर्षावा समग्र ॥ राजगृहीं निरंतर ॥ कदा वास न करावा ॥५२॥राजपर्यंक राजासन ॥ गज तुरंग सुखासन ॥ तेथें न करावें आरोहण ॥ मर्यादा पूर्ण धरावी ॥५३॥अंतःपुरीं एकांतीं ॥ बैसले असतां नृपती ॥ आपण प्रियकर निश्चितीं ॥ म्हणोनि तेथें न रिघावें ॥५४॥रायासी न होतां श्रवण ॥ राजस्त्रियेचें आज्ञावचन ॥ कदा न मानावें जाण ॥ युक्त बोलोन सारावें ॥५५॥राजस्त्रियेशीं मैत्री ॥ कदा न करावी चतुरीं ॥ स्त्रियांचे एकांतविचारी ॥ सर्वथाही न बैसावें ॥५६॥मी विद्यावंत चतुर ॥ ऐसें न बोलावें वारंवार ॥ प्रत्युत्तर देऊनि न्याहार ॥ राजवस्तु न पहावी ॥५७॥बहु भाषण बहु हास्य ॥ कदा न करावें विशेष ॥ ग्रामनिंदा परदोष ॥ राजश्रवणीं न घालावे ॥५८॥राव वस्त्रें भूषणें लेत ॥ तीं आपण न लेइजे निश्चित ॥ राजा असे व्यथा भूत ॥ आपण औषध न द्यावें ॥५९॥रायासमोर करिती स्तुती ॥ इतर स्थलीं निंदा वदती ॥ तें तत्काळ कळे नृपती ॥ मग पावती अपमान ॥६०॥एवं सर्वार्थीं सुजाण ॥ पांडव तुम्ही पांचही निपुण ॥ अज्ञातवास करुन ॥ मग सवेंचि प्रकटावें ॥६१॥हें धौम्य बोलोनि सत्वरा ॥ तो गेला पांचालनगरा ॥ इंद्रसेन रथ घेऊनि सत्वरा ॥ द्वारकेप्रति पावला ॥६२॥आश्रमीं होतें जें समस्त ॥ तें ब्राह्मणां वांटिती पंडुसुत ॥ रात्रीं विप्र जाहले निद्रित ॥ सहाही जाती ते वेळां ॥६३॥निघोनि जाती पंचप्राण ॥ कदा नव्हती दृश्यमान ॥ तैसे पांडव निघाले तेथून ॥ कोणासही न कळतां ॥६४॥धनुष्य घेऊनि महामती ॥ तूणीर पृष्ठासी आकर्षिती ॥ गोधांगुळें घालिती हस्तीं ॥ अंगत्राणें बांधिलीं ॥६५॥कालिंदी ओलांदूनि त्वरें ॥ निघते जाहले दक्षिणतीरें ॥ आडवाटे गिरिकंदरें ॥ ओलांडीत रात्रींत ॥६६॥चरणचालींत त्वरें जाती ॥ आपुलें राष्ट्र चुकविती ॥ पांचालदेश निश्चिती ॥ वामहस्तीं टाकिला ॥६७॥दशार्णदेश टाकून ॥ शूरसेनदेश चुकवून ॥ दक्षिणदिशे पाहोन ॥ अपार मार्ग क्रमियेला ॥६८॥दिसती पांचहे विवर्ण ॥ रुपें गेलीं पालटून ॥ जैसे शशिचंडकिरण ॥ अभ्रपटलें झांकले ॥६९॥चिखल माखला अनर्घ्यरत्नीं ॥ कीं मराळ घोळले धुळींनीं ॥ तेवीं तीं सहाही निघोनी ॥ जाती त्वरेनें रजनींत ॥७०॥जिच्या स्वरुपावरुनी ॥ सुरललना टाकिजे ओंवाळूनी ॥ ते द्रुपदराजनंदिनी ॥ चरणचालीं श्रमली हो ॥७१॥म्हणे पांचही तुम्ही सुकुमार ॥ चरणीं चालतां श्रमलां फार ॥ माझेनें न चालवे पदमात्र ॥ प्राणसंकट जाहलें ॥७२॥जेवीं शुंडादंडेंकरुन ॥ कमल उचली वारण ॥ तैसें द्रौपदीस स्कंधीं घेऊन ॥ भीम वीर चालिला ॥७३॥विराटनगराजवळी ॥ पांडव आले ते वेळीं ॥ विशाल शमीवृक्षातळीं ॥ स्थिरावले नावेक ॥७४॥शमीस प्रदक्षिणा करुन ॥ करिते जाहले तिचें स्तवन ॥ तुज वंदूनि रघुनंदन ॥ गेला रावण वधावया ॥७५॥म्हणती शस्त्रें घेऊनि करीं ॥ कैसें प्रवेशावें नगरीं ॥ लोक तर्क करितील परोपरी ॥ मात देशांतरा जाईल ॥७६॥गांडीव चाप विशाळ ॥ कल्पांतविजेहूनि तेजाळ ॥ कीं उगवलें सूर्यमंडळ । तैसी प्रभा तयाची ॥७७॥मग पांच चापें पंच तूणीर ॥ तृणपणीं गुंडूनि सत्वर ॥ शमीवरी नकुल वीर ॥ ठेवी दृढ आकर्षूनि ॥७८॥वर्षतांही फार घन ॥ न भिजे अणुप्रमाण ॥ त्याभोंवतें श्मशान ॥ भयंकर पहा हो ॥७९॥पडिलें होतें स्त्रियेचें प्रेत ॥ तें पांडव वृक्षासी बांधीत ॥ भयानक फार दिसत ॥ न ये तेथें अन्य कोणी ॥८०॥तों उगवला प्रभाकर ॥ गोरक्षक विलोकिती दूर ॥ जे रक्षणार गायींचे भार ॥ कौतुक पाहती दुरुनी ॥८१॥पांडव चालिले तेथून ॥ पुसती गोरक्षक त्यांलागून ॥ प्रेत कां बांधिलें नेऊन ॥ भीम वचन बोलत ॥८२॥आमुचा कुलधर्म दुर्धर ॥ वृक्षीं बांधावें कलेवर ॥ तेथें कोणी जातां सत्वर ॥ जळोनि मरेल क्षणार्धे ॥८३॥असो पांडव चालिले तेथून ॥ ओळखावी अंतर्खूण ॥ नामें ठेविलीं पालटून ॥ नूतनचि दूसरीं ॥८४॥जय जयंत विजय ॥ जयत्सेन जयद्वल पाहें ॥ मालिनी हें नाम निश्चयें ॥ द्रौपदीस ठेविलें ॥८५॥नगरांत प्रवेशले पंडुनंदन ॥ तों देखिलें दुर्गास्थान ॥ धर्मराज करी स्तवन ॥ जगदंबेचें तधवां ॥८६॥जय जय दुर्गे भुवनेश्वरी ॥ यशोदागर्भसंभवकुमारी ॥ इंदिरारमणसहोदरी ॥ नारायणि चंडिकेंबिके ॥८७॥जय जय जगदंबे विश्वकुटुंबिनी ॥ मूलस्फूर्ति प्रणवरुपिणी ॥ ब्रह्मानंदपददायिनी ॥ चिद्विलासिनी अंबिके तूं ॥८८॥जय जय धराधरकुमारी ॥ सौभाग्यगंगे त्रिपुरसुंदरी ॥ हेरंबजननी अंतरीं ॥ प्रवेशें तूं आमुचे ॥८९॥भक्तहृदयारविंदभ्रमरी ॥ तुझे कृपाबळें निर्धारीं । अतिमूढ निगमार्थ विवरी ॥ काव्यरचना करी अद्भुत ॥९०॥तुझिये कृपावलोकनेंकरुन ॥ गर्भांधासी येतील नयन ॥ पांगुळ करील गमन ॥ दूर पथें जाऊनी ॥९१॥जन्मादारभ्य जो मुका ॥ होय वाचस्पतिसमान बोलका ॥ तूं स्वानंदसरोवरमराळिका ॥ होसी भाविकां सुप्रसन्न ॥९२॥ब्रह्मानंदे आदिजननी । तव कृपेची नौका करुनी ॥ दुस्तर भवसिंधु उल्लंघूनी ॥ निवृत्तितटा जाइजे ॥९३॥जय जय आदिकुमारिके ॥ जय जय मूलपीठनायिके ॥ सकलसौभाग्यदायिके ॥ जगदंबिके मूलप्रकृतिये ॥९४॥जय जय भार्गवप्रिये भवानी ॥ भयनाशके भक्तवरदायिनी ॥ सुभद्राकरिके हिमनगनंदिनी ॥ त्रिपुरसुंदरी महामाये ॥९५॥जय जय आनंदकासारमराळिके ॥ पद्मनयन दुरितवनपावके ॥ त्रिविधतापभवमोचके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥९६॥शिवमानसकनकलतिके ॥ जय चातुर्यचंपककलिके ॥ शुंभनिशुंभदैत्यांतके ॥ निजजनपालके अपर्णे ॥९७॥तव मुखकमलशोभा देखोनी ॥ इंदुबिंब गेलें विरोनी ॥ ब्रह्मादिदेव बाळें तान्हीं ॥ स्वानंदसदनीं निजविसी ॥९८॥जीव शिव दोन्ही बाळकें ॥ अंबे त्वां निर्मिलीं कौतुकें ॥ स्वरुप तुझें जीव नोळखे ॥ म्हणोनि पडला आवर्तीं ॥९९॥शिव तुझे स्मरणीं सावचित्त ॥ म्हणोनि तो नित्यमुक्त ॥ स्वानंदपद हाता येत ॥ तुझे कृपेनें जननिये ॥१००॥मेळवूनि पंचभूतांचा मेळ ॥ त्वां रचिला ब्रह्मांडगोळ ॥ इच्छा परततां तत्काळ ॥ क्षणें निर्मूल करिसी तूं ॥१०१॥अनंत बालादित्यश्रेणी ॥ तव प्रभेमाजी गेल्या लपोनी ॥ सकलसौभाग्यशुभकल्याणी ॥ रमारमण वरप्रदे ॥१०२॥जय शंबररिपुहरवल्लभे ॥ त्रैलोक्यनगरारंभस्तंभे ॥ आदिमाये आत्मप्रभे ॥ सकलारंभे मूलप्रकृती ॥१०३॥जय करुणा मृतसरिते ॥ भक्तपालके गुणभरिते ॥ अनंतब्रह्मांडफलांकिते ॥ आदिमाये अन्नपूर्णे ॥१०४॥तूं सच्चिदानंदप्रणवरुपिणी ॥ सकलचराचरव्यापिनी ॥ सर्गस्थित्यंतकारिणी ॥ भवमोचनी ब्रह्मानंदे ॥१०५॥ऐकूनि धर्माचें स्तवन ॥ दुर्गा जाहली प्रसन्न ॥ म्हणे तुमचे शत्रु संहारीन ॥ राज्यीं स्थापीन धर्मातें ॥१०६॥तुम्ही वास करा येथ ॥ प्रकटों नेदीं जनांत ॥ शत्रु क्षय पावती समस्त ॥ सुख अद्भुत तुम्हां होय ॥१०७॥त्वां जें स्तोत्र केलें पूर्ण ॥ तें जे त्रिकाल करिती पठन ॥ त्यांचे सर्व काम पुरवीन ॥ सदा रक्षीन अंतर्बाह्य ॥१०८॥मग त्यांतूनि युधिष्ठिर एकला ॥ विराटसभेप्रति चालिला ॥ वस्त्रांत गुंडाळूनि ते वेळां ॥ अक्ष घेतले कक्षेसी ॥१०९॥अक्ष वैडूर्यसदृश तेजाळ ॥ वरी सुवर्णबिंदु सुढाळ ॥ कुरुवंशज नृपाळ ॥ विप्रवेषें चालिला ॥११०॥विराटें देखिलें दुरुन ॥ जेवीं मूर्तिमंत चंडकिरण ॥ शीतळ जैसा रोहिणीरमण ॥ कीं शचीवर उतरला ॥१११॥सकल पृथ्वीचा करभार ॥ घेणार वाटे राजेश्वर ॥ तंव तो येऊनि सभेसमोर ॥ आशीर्वाद देत रायातें ॥११२॥विराट बोले स्वस्तिवचन ॥ भस्में आच्छादिला हुताशन ॥ तैसा विप्रवेष घेऊन ॥ केवीं येथें आलासी ॥११३॥धर्म म्हणे आम्ही ब्राह्मण ॥ स्वेच्छें करुं पृथ्वीभ्रमण ॥ अक्षज्ञानीं मी निपुण ॥ सभासद धर्माचा ॥११४॥पांडवी केला वनवास ॥ नेणों कोठें जाहले अदृश्य ॥ ठाव नाहीं आम्हांस ॥ म्हणोनि आलों तुजपाशीं ॥११५॥माझें नांव कंक जाण ॥ पीडलों दरिद्रेंकरुन ॥ धर्मे आमुचें पालन ॥ केलें बहुत राजेंद्रा ॥११६॥विराट म्हणे मी तूतें प्रसन्न ॥ सर्व राज्य तुजआधीन ॥ तूं सांगसी तें ऐकेन ॥ मजलागीं माग कांहीं ॥११७॥धर्म म्हणे ते पणाचें द्रव मज द्यावें ॥ विराट म्हणे अवश्य घ्यावें ॥ भाक दिधली निर्धारीं ॥ मजपाशीं न मागावें ॥११८॥म्यां जिंकिले स्वभावें ॥ तरी पणाचें द्रव्य मज द्यावें ॥ विराट म्हणे अवश्य घ्यावें ॥ भाक दिधली तैसीज ॥११९॥राव म्हणे कंकाप्रती ॥ जे तुझे आज्ञेंत न वर्तती ॥ त्यांसी दंड करीन निश्चितीं ॥ सत्य वचन जाण हें ॥१२०॥तुझे आज्ञेंत न वर्तती जे ब्राह्मण ॥ त्यांसी बाहेर घालवीन ॥ उरले क्षत्रिय वैश्य जाण ॥ जरी तुझें वचन मोडिती ॥१२१॥तत्काल त्यांसी वधीन ॥ तुझें स्वरुप मजसमान ॥ मग वस्त्रें भूषणें देऊन ॥ रायें जवळी बैसविला ॥१२२॥यावरी दुर्गेसी नमून ॥ भीम चालिला वेष पालटून ॥ विराटें दूर देखोन ॥ तटस्थ जाहला पाहतां ॥१२३॥दिसे पुरुषार्थी बलवंत ॥ भुजाबळें लोटील पर्वत ॥ सिंह शार्दूल धरुनि जित ॥ एके दाविणीं बांधील ॥१२४॥आजानुबाहु अतिविशाळ ॥ वृषभाक्ष आरक्त तेजाळ ॥ हांकें गाजवी ब्रह्मांडगोळ ॥ तैसा सबळ दिसतसे ॥१२५॥भीम हनुमंत रेवतीरमण ॥ तैसा दिसे बलसंपन्न ॥ पृथ्वीच्या रायां आकर्षण ॥ क्षणमात्रें करील वाटतें ॥१२६॥लाटणी आणि दर्वीपाक ॥ हातीं धरिले सरळ सुरेख ॥ कृष्णवसनवेष्टित देख ॥ येतां सन्मुख देखिला ॥१२७॥सेवकां सांगे नृपवर ॥ कोण कोठील घ्या समाचार ॥ दूत धांवती सत्वर ॥ पुसती वृत्तान्त तयासी ॥१२८॥तो म्हणे मी सूपशास्त्रीं निपुण ॥ बल्लव नामाभिधान ॥ सेवक सांगती विराटा येऊन ॥ तों तोही समीप पातला ॥१२९॥राव पुसे त्यालागून ॥ दिससी जेवीं विधूमाग्न ॥ उर्वीचें राज्य संपूर्ण ॥ भोगावया योग्य दिससी तूं ॥१३०॥तों बोले वृकोदर ॥ मी धर्मरायाचा किंकर ॥ स्वयंपाकी परम चतुर ॥ शाका उत्तम करुं जाणें ॥१३१॥माझ्या हातींचे भोजन ॥ राजा धर्म करी जाण ॥ पांडवीं सेविलें कानन ॥ आलों शरण तुजलागीं ॥१३२॥आणीक ऐक नृपती ॥ सिंह शार्दूल मत्तहस्ती ॥ महामल्ल भद्रजाती ॥ त्यांशीं झोंबी घेईन मी ॥१३३॥जो कोणासी अनिवार ॥ त्यासी क्षणांत करीन जर्जर ॥ संतोषोनि नृपवर ॥ वस्त्राभरणें गौरवी ॥१३४॥स्वयंपाकी जे सर्व ॥ त्यांत श्रेष्ठ केला बल्लव ॥ यावरी वेष पालटूनि अपूर्व ॥ सैरंध्री वेगें पातली ॥१३५॥जी सकल स्त्रियांची स्वामिनी ॥ नीलपयोधरतनूची भगिनी ॥ ती केश मोकळे करुनी ॥ सव्यहस्तें आवरीत ॥१३६॥एक वस्त्र नेसली मलिन ॥ चालली राजगृहालागून ॥ धांवती नागरिक जन ॥ स्वरुप तिचें पहावया ॥१३७॥सभोंवता चार कोश ॥ फांके अंगींचा सुवास ॥ इंद्रनीलकुलप्रभेस ॥ उणें आणी निजवर्णे ॥१३८॥जिचें वदन पाहतां सुंदर ॥ नृत्य करी पुढें पंचशर ॥ ती नेसली मलिन वस्त्र ॥ सैरंध्रीवेष धरियेला ॥१३९॥जेथें सुदेष्णा पट्टराणी ॥ तिकडे जात याज्ञसेनी ॥ मागें धांवती जनश्रेणी ॥ धणी न पुरे पाहतां ॥१४०॥गोपुरावरी राजपत्नी ॥ क्षुद्रद्वारें पाहे नयनीं ॥ तों हातीं धरुनि फणी ॥ लावण्यखाणी येतसे ॥१४१॥पुढें दासी पाठवून ॥ जवळी आणिली बोलावून ॥ सकल पृथ्वीची स्वामीण ॥ तीस कोण म्हणून पुसतसे ॥१४२॥ती म्हणे मी सैरंध्री ॥ पांडवांची जे पुरंध्री ॥ द्रुपदराजकुमारे ॥ तिची सखी जवळील मी ॥१४३॥कमलोद्भवतात परमात्मा ॥ त्याची ललना जे सत्यभामा ॥ तिचा स्त्रेह बहुत आम्हां ॥ वरी होता जाण पां ॥१४४॥तीस मी वारंवार ॥ देत असें बहुत श्रूंगार ॥ तें देखोनि यादवेंद्र ॥ तिशीं बहु प्रीति करी ॥१४५॥सुमनांचे अलंकार ॥ पुष्पवस्त्रें सुकुमार ॥ चंदन लेववूं जाणें विचित्र ॥ अंजनप्रकार नेत्रींचा ॥१४६॥मज मागूनि सत्यभामेपाशीं ॥ पांचाली ठेवी आपणापाशी ॥ तीस श्रूंगारीं अहर्निशीं ॥ तेथें विवशी आड आली ॥१४७॥द्यूतीं हारवूनि पण ॥ पांडवीं सेविलें कानन ॥ या संवत्सरांत गुप्त होऊन ॥ कोठें गेलें कळेना ॥१४८॥मी होऊनि अनाथ ॥ तुझे पायांपाशीं आलें त्वरित ॥ मग सुदेष्णा बोलत ॥ एवढें स्वरुप अद्भुत तुझें ॥१४९॥मज वाटे मानसीं ॥ देवांगना तुझ्या दासी ॥ समुद्रवलयांकित पृथ्वीसी ॥ स्वामीण मज वाटतसे ॥१५०॥तूं सहज बोलतां वदनीं ॥ द्विज झळकती महामणी ॥ तुज मी ठेवितें सदनीं ॥ परी मनीं भीतसें ॥१५१॥विराट जाईल भुलोन ॥ तूं घालिसी त्याजवरी मन ॥ मग मीं द्यावा प्राण ॥ न चले अन्य उपाय ॥१५२॥याविषयीं देशील भाष ॥ तरी तुज पाळीन अवश्य ॥ सैरंध्री म्हणे परिस ॥ वृत्तान्त माझा तूं माये ॥१५३॥पांच गंधर्व माझे पती ॥ ते अंतरिक्षीं विचरती ॥ मज कोणी अभिलाषी पापमती ॥ त्यासी मारितील क्षणार्धे ॥१५४॥मज पाहे जो विषम ॥ तो तत्काळ होईल भस्म ॥ दीपकलिकेप्रति क्षेम ॥ पतंग देऊं शकेना ॥१५५॥मी गेलिया प्राण ॥ न करीं कोणाचें चरणक्षालन ॥ अंगमर्दन उच्छिष्टभोजन ॥ सर्वथाही घडेना ॥१५६॥सहवासें बहुत ॥ कळेल माझा वृत्तान्त ॥ पंच गंधर्व समस्त ॥ राहती माझे अंतरिक्षीं ॥१५७॥गंधर्व पांच वेगळे करुन ॥ पुरुष मज पित्यासमान ॥ तरुण ते बंधूसमान ॥ बाळकें जाण धाकुटे ॥१५८॥सुदेष्णा म्हणे यावरी ॥ अवश्य राहीं माझे मंदिरीं ॥ इकडे देवीस नमूनि झडकरी ॥ वेष पालटी अर्जुन ॥१५९॥षंढपण अवलंबूनी ॥ स्त्रीवेष धरी ते क्षणीं ॥ केश आकर्षूनि वेणी ॥ लघु कर्णीं कुंडलें ॥१६०॥तों अकस्मात सभेसमोर ॥ देखे विराट नृपवर ॥ म्हणे स्त्रीवेष धरुनि इंद्र ॥ वाटे मज उतरला ॥१६१॥रमावर कीं उमावर ॥ तेणें स्त्रीवेष धरिला सुंदर ॥ सन्मुख देखे नृपवर ॥ विचारीत तयातें ॥१६२॥नांव काय तूं कोण ॥ सांगें सर्व वर्तमान ॥ श्रीकृष्णसखा तो कृष्ण ॥ म्हणे नाम बृहन्नटा ॥१६३॥धर्मरायाचे घरीं ॥ मी होतें अंतःपुरीं ॥ नृत्य गायन कलाकुसरी ॥ शिकवीं नारींस सर्वही ॥१६४॥पांडव गुप्त जाहले वनांतरीं ॥ राहों इच्छीं तुमचे घरीं ॥ विराट म्हणे उत्तरा कुमारी ॥ आणिक नारी असती पैं ॥१६५॥गायन नृत्य कलाकुसरी ॥ शिकवीं राहें अंतःपुरीं ॥ गौरवूनि ते अवसरीं ॥ निजमंदिरीं ठेविलें ॥१६६॥सहदेव देवीस नमून ॥ निघे वेष पालटून ॥ विराटें सन्मुख देखोन ॥ तन्मय होऊन पुसतसे ॥१६७॥जैसा सुधापानीं निर्जर ॥ तैसें तुझें स्वरुप सुंदर ॥ नाम सांगें पवित्र ॥ होतास कोठें आजवरी ॥१६८॥तो बोले ते अवसरीं ॥ मी धर्माचा खिल्लारी ॥ गोवृषभपरीक्षा करीं ॥ नाम तरी तंतिपाल ॥१६९॥दुग्धें स्त्रवती गायी महिषी ॥ ही विद्या असे मजपाशीं ॥ शिक्षा लावीन वृषभांसी ॥ रथालागीं जुंपावया ॥१७०॥खडाण गायी दुभवीन ॥ वांझेसी वत्सें करवीन ॥ अंतर्व्यथा औषध पूर्ण ॥ सर्व जाणें पशूंचें ॥१७१॥पूर्वसमुद्रापासूनि थोर ॥ मर्यादा पश्चिमसागर ॥ एवढें थोर खिल्लार ॥ धर्मात्मया धर्माचें ॥१७२॥द्यूतें हारविला पण ॥ कौरवीं घेतलें हिरोन ॥ गुप्त जाहले पंडुनंदन ॥ म्हणोनि आलों तुजपाशीं ॥१७३॥मग वेतन करुनि पुष्कळ ॥ खिल्लारी ठेविला तंतिपाळ ॥ मग वेष पालटूनि नकुळ ॥ देवीस नमूनि निघाला ॥१७४॥विराटसभेसमोर येत ॥ अश्वशाला विलोकीत ॥ विराटें देखिला अकस्मात ॥ म्हणे हा येथें कोण आला ॥१७५॥त्यासी पाचारी राव ॥ पुसता जाहला नांव ॥ म्हणे तूं नव्हेसी मानव ॥ प्रत्यक्ष देव भाससी ॥१७६॥तो म्हणे राया परियेसीं ॥ होतों धर्माचे अश्वशाळेसी ॥ ग्रंथिक नाम निश्चयेंशीं ॥ जाण राया सुजाणा ॥१७७॥घोडा तो श्यामकर्ण ॥ पुच्छ पिवळें अंग शुभ्रवर्ण ॥ प्रवालमणिसमान ॥ चार्ही खुर जयाचे ॥१७८॥आरक्तरेखानयन ॥ श्यामवर्ण श्यमाकर्ण ॥ दांडी अयाळ जैसें सुवर्ण ॥ गति ज्याची तिहीं लोकीं ॥१७९॥क्षीरसागराहूनि निघाले ॥ कीं चंद्रकिरणें घडिले ॥ सूर्यलोकाहूनि उतरले ॥कीं धुतले जान्हवींत ॥१८०॥शुद्ध रजताचे धवल ॥ कीं नवनीताचे गोल ॥ ते श्यामकर्ण बहुसाल ॥ पाळिले म्यां धर्माचे ॥१८१॥सप्तद्वीपींचे तुरंग भले ॥ नवखंडींचे तेजागळे ॥ छप्पन देशींचे वेगळे ॥ लक्षणें मी सर्व जाणें ॥१८२॥बहात्तर खोडी तत्त्वतां ॥ जाणें तुरंगांच्या सर्व व्यथा ॥ औषधप्रकार नृपनाथा ॥ सर्व ठाउके मजलागीं ॥१८३॥संतोषोनि नृपनाथ ॥ वेतन केलें बहुत ॥ अश्वशाळे ठेवीत ॥ ग्रंथिक परम निपुण तो ॥१८४॥पणाचें द्रव्य अपार ॥ कंकासी देत नृपवर ॥ चौघां बंधूंतें युधिष्ठिर ॥ वांटूनि देत गुप्तरुपें ॥१८५॥भक्ष्य भोज्य षड्रसान्नें ॥ भीम देत चौघांकारणें ॥ अंतरीं वर्तती एकपणें ॥ बाहेरी ओळख न देती ॥१८६॥ऐसे लोटले चार मास ॥ विराटघरीं बहु संतोष ॥ एकदां मल्ल बहुवस ॥ देशोदेशींचे पातले ॥१८७॥त्यांत मुख्य जीमूतमल्ल ॥ तेणें झोंबी घेऊनि सकळ ॥ सहस्त्र एक सबळ ॥ मल्ल जिंकिले विराटसभे ॥१८८॥जीमूतें मर्दिलें सकळ मल्लां ॥ रायें बल्लव बोलाविला ॥ तो क्षण न लागतां आला ॥ हांकें भरिला मंडप ॥१८९॥देखोनि जीमूतवारण॥ बल्लव धांवे पंचानन ॥ हस्तें हस्त धरुन ॥ झडती घेती परस्परें ॥१९०॥वर्मकळा दडपिती सकळ ॥ हांकें गाजविती ब्रह्मांडगोळ ॥ चार घटिका तुंबळ ॥ मल्लयुद्ध जाहलें ॥१९१॥भीमें जीमूत चरणीं धरिला ॥ शतवेळां भोंवंडिला ॥ आपटूनि मारिला ॥ प्राणा मुकला तत्काळ ॥१९२॥संतोषोनि विराटराव ॥ बल्लवासी देत बहुत गौरव ॥ स्त्रिया विलोकिती सर्व ॥ बल अद्भुत तयाचें ॥१९३॥सिंह व्याघ्र भद्रजाती ॥ आणूनि बल्लवाशीं भिडविती ॥ त्यांसी आपटूनि क्षितीं ॥ मारुनि टाकी क्षणमात्रें ॥१९४॥यावरी एकांतीं राव बैसत ॥ नारींचे नृत्य गायन समस्त ॥ बृहन्नटा कौशल्य दावीत ॥ विद्या कैसी शिकविली ते ॥१९५॥लास्य आणि तांडव ॥ दाविती नृत्याचे भाव ॥ भावगायन ऐकतां अपूर्व ॥ शक्र तटस्थ होय पैं ॥१९६॥राग उपराग भार्यांसहित ॥ मूर्छनांहीं शरीर कंपित ॥ जें गायन ऐकतां तटस्थ ॥ शेष आणि शशिमृग ॥१९७॥राव ऐकतां तोषला फार ॥ बृहन्नटा गौरविली अपार ॥ वस्त्रें आणि अलंकार ॥ अमोलिक दिधलीं पैं ॥१९८॥यावरी अश्व आणूनि समस्त ॥ ग्रंथिक परीक्षा दावीत ॥ पाहतां तुरंगमाचें नृत्य ॥ लोक तटस्थ जाहले ॥१९९॥पवन सांडूनि मार्गे ॥ तुरंग पळवी वेगें ॥ चक्राकार वामसव्यभागें ॥ फेरितां दृष्टि ठरेना ॥२००॥संतोषोनि भूपालक ॥ गौरविला तो ग्रंथिक ॥ खिल्लारांचें कौतुक ॥ तंतिपाळें दाखविलें ॥२०१॥म्हैसे वृषभ समस्त ॥ रायापुढें झुंजवीत ॥ वस्त्रें भूषणें बहुत ॥ राव देत तंतिपाळा ॥२०२॥पांचालीस तें देखोनि समस्त ॥ मनांत वाटे खेद बहुत ॥ हा हा कर्म कैसें पंडुसुत ॥ सेवा करिती परगृहीं ॥२०३॥पृथ्वीचे राजे शरण ॥ ज्यांपुढें उभे कर जोडून ॥ ते येथें सेवक होऊन ॥ नीच कर्म आरंभिती ॥२०४॥ऐसें क्रमितां पूर्ण झाले दहा मास ॥ द्रौपदी निशिदिवस ॥ सुदेष्णेतें श्रृंगारी ॥२०५॥सुदेष्णेचा बंधु कीचक ॥ महाचांडाल हिंसक ॥ तो सेनापति देख ॥ विराटें करुनि ठेविला ॥२०६॥सुदेष्णेच्या गृहांत ॥ कीचक आला अकस्मात ॥ पांचालीस पाहूनि काममोहित ॥ भगिनीतें विचारी ॥२०७॥कोण हे सुंदर नारी ॥ मज वाटे प्रमदांत ईश्वरी ॥ लक्ष्मी किंवा गौरी ॥ कीं शारदेची उपमा जे ॥२०८॥सुदेष्णेसी म्हणे ते क्षणीं ॥ हे करीं माझी राणी ॥ इच्या स्वरुपावरुनी ॥ ओंवाळीन प्राण हे ॥२०९॥सेवेयोग्य सुंदरी ॥ हे नव्हे निर्धारीं ॥ पांचालराजकुमारी ॥ गेली झडकरी स्वस्थाना ॥२१०॥मग द्रौपदीचे मंदिरांत ॥ कीचक येऊनि बोलत ॥ हें वैभव तुझें समस्त ॥ मी दास तुझा होईन ॥२११॥तूं इंदिरेची प्रतिमा ॥ रंभा उर्वशी तिलोत्तमा ॥ तुझ्या दासी आम्हां ॥ ऐसें वाटे अंतरीं ॥२१२॥कामानळें तापलों थोर ॥ तव समागमें सुरतसागर ॥ मेघ वर्षे शिरीं धार ॥ मी शीतळ होईन ॥२१३॥मृगाकवदने कुरंगनेत्री ॥ तुज न विसंबें अहोरात्रीं ॥ सकल स्त्रिया निर्धारीं ॥ तुझ्या दासी म्हणवीन ॥२१४॥माझ्या स्त्रिया तुझ्या दासी ॥ करीन जाण लावण्यराशी ॥ जिंकूनि सकल रायांसी ॥ पुढें उभे करीन ॥२१५॥तूं सौंदर्यजाळें पसरुन ॥ माझा धरिला मानसमीन ॥ तुझे मुखकमलीं माझें मन ॥ मिलिंद होऊन गुंजत ॥२१६॥तूं चातुर्यसरोवरमराळिका ॥ कीं लावण्यचंपककलिका ॥ सकलकामिनींची नायिका ॥ अभय देईं मजलागीं ॥२१७॥यावरी पंडुराजस्त्रुषा ॥ तीक्ष्ण गोष्टी बोलेल कैशा ॥ स्वस्थ करुनि मानसा ॥ पंडितीं श्रवण करावें ॥२१८॥पांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व परमाद्बुत ॥ ग्रंथकर्ता सत्यवतीसुत ॥ लेखक जाहला गजानन ॥२१९॥पुढिले अध्यायीं सुंदर ॥ रस उचंबळेल अपार ॥ श्रीधरमुखें रुक्मिणीवर ॥ ब्रह्मानंदें बोलवील ॥२२०॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ बत्तिसाव्यांत कथियेला ॥२२१॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ विराटपर्वटीका श्रीधरकृत ॥ पांडव विराटगृहीं जात ॥ कीचकभाषण द्रौपदीशीं ॥२२२॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे विराटपर्वणि द्वात्रिंशाध्यायः ॥३२॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥॥ श्रीपांडवप्रताप-विराटपर्व-द्वात्रिंशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP