मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३७ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३७ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३७ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ प्रज्ञाचक्षु राजेश्वर ॥ विदुर त्यासी सांगे नीतिविचार ॥ ऐकतां साधक ज्ञानी समग्र ॥ सुख अपार पावती ॥१॥विदुर म्हणे कुरुनृपती ॥ शास्त्रज्ञ त्यासी चतुर म्हणती ॥ जो सावधान ॥ प्रंपचपर मार्थीं ॥ न सोडी नीति श्रेष्ठांची ॥२॥इंद्रियां सहित मन ॥ जिंकूनि केलें आपणाधीन ॥ दुरुत्तरीं गांजितां दुर्जन ॥ अंतःकरण दुखवेना ॥३॥प्रारब्धभोगें ऐश्वर्य भोगीत ॥ परी सर्व भोगीं अति विरक्त ॥ क्षमेचा केवळ मलय पर्वत ॥ शांत दान्त सर्वदाही ॥४॥दयेचा तो भांडार केवळ ॥ निर्भय निःशंक निर्मळ ॥ ज्याचें दातृत्व देखोनि विकल ॥ अमरतरु होय पैं ॥५॥या चिन्हें जो मंडित ॥ तोचि म्हणावा राया पंडित ॥ सर्व जाणोनि नेणीव घेत ॥ देखे भगवंत सर्व भूतीं ॥६॥परिस राया सावधान ॥ मृत्यु लोका जो आला स्वर्गाहून ॥ कर्म भूमीस पावला जनन ॥ ऐक लोक्षणें तयाचीं ॥७॥सात्विक ज्ञानीं अत्यंत निर्भर ॥ सुधार साहूनि वाचा मधुर ॥ जो वैष्णवी दीक्षा मनोहर ॥ कायावाचामनें धरी ॥८॥आवडती पंचप्रणाहून ॥ जीवें भावें ज्यासी ब्राह्मण ॥ माता पिता गुरु देव जाण ॥ यांचें भजन करी सदा ॥९॥पारधियें वनीं धरिलें पाडस ॥ तें जननी चिंती रात्रं दिवस ॥ तैसें जयाचें मानस ॥ गुरुमाउलीस आठवी ॥१०॥तृषा लागली महावनीं ॥ उष्णकाळीं धुंडी पाणी ॥ तैसी आवडी संत भजनीं ॥ दिवस रजनीं जयाची ॥११॥एक नरकींहूनि आला संसारा ॥ त्याचीं चिन्हें ऐक राजेश्वरा ॥ परम कृपण कद्रूच खरा ॥ कवडी वेंचितां प्राण देत ॥१२॥देवद्विज गुरुनिंदा ॥ जो दुष्टात्मा करी सदा ॥ सांडूइ वेदमर्यादा ॥ वर्ते भलतेंचि दुष्ट तो ॥१३॥सदाकाळ त्याचें मन ॥ जेथें तेथें इच्छीत धन ॥ आपुला धर्म दानानुष्ठान ॥ सांगे सत्कारून सर्वदा ॥१४॥घातलें विद्येचें दुकान ॥ वरिवरी दाखवी आचार ॥ पूर्ण ॥ धनवंत द्दष्टीं देखोन ॥ भाटचि होय तयाचा ॥१५॥जैसा वर्मीं रुपे बाण ॥ तैसा सहज बोले तीक्ष्ण ॥ हिंसा करावया मन ॥ अति उल्हास पावत ॥१६॥आपुली स्तुति करितां कोणी ॥ मग बोले आनंदें करूनी ॥ कोणी निंदितां तेचि क्षणीं ॥ जाय सुकोनि फुला ऐसा ॥१७॥सज्जनांची निंदा ऐके ॥ प्रत्युत्तर देत परम सुखें ॥ यासी साधु म्हणती मूर्खें ॥ आम्ही न म्हणों कदाही ॥१८॥वरिवरी सुंदर वृंदावन ॥ जों जों पिके तों तों कडू पूर्ण ॥ जैसा वृद्ध वयें करून ॥ कुबुद्धि जाण ॥ विशेष ॥१९॥गुरुचें नाम सांगतां ॥ लाज वाटे ज्याचिया चित्ता ॥ लाजे भगवंताचें नाम घेतां ॥ तरी अन्यवीर्यें उपजला तो ॥२०॥गुरुलोपकाचें देखतां वदन ॥ तत्काल करावें सचैल स्त्रान ॥ अनामिकाहूनि विशेष जाण ॥ विटाळ त्याचा मानावा ॥२१॥कीं गंगेंत स्नान करूनियां ॥ जाय मळमूत्र शोधा वया ॥ तैसा आचार दाखवूनियां ॥ असत्य कर्मीं रत होय ॥२२॥पाकशाळेंत रिघे श्वान ॥ सर्व पात्रांत घाली वदन ॥ तैसी त्याची बुद्धि संपूर्ण ॥ स्पर्शावया धांवतसे ॥२३॥तीर्थें क्षेत्रें देव संत ॥ म्हणे सर्वही असंमत ॥ यांसी भजोनियां व्यर्थ ॥ धन कां हो नासावें ॥२४॥मातला जैसा बस्त ॥ तो भलत्यासी थडक देत ॥ तैसा वादविवादीं उदित ॥ धुधुः कारे सर्प जैसा ॥२५॥वादीं जरी केला निरुत्तर ॥ तरी म्ग कोपें अनिवार ॥ वर्में बोलूनि अपवित्र ॥ करी छळण तयाचें ॥२६॥शंख करावयाची हौस फार ॥ त्यांत पातला फाल्गुन सत्वर ॥ आधींच अपवित्र जार ॥ तो स्त्रीराज्यीं प्रवेशला ॥२७॥आधींच मद्यपी उन्मत्त ॥ त्याहीवरी शिंदीवन देखत ॥ कीं तस्करासी नृपनाथ ॥ अभय देत चोरावया ॥२८॥ मर्कटासी मद्य पाजिलें ॥ त्याहीवरी वृश्चिकें दंशिलें ॥ त्यांतही भूत संचरलें ॥ मग अन्याथा जेवीं तें वर्तें ॥२९॥तैसा अकर्मी आधींच बहुत ॥ त्यावरी भ्रष्ट शास्त्रें विलोकीत ॥ नाना मतें नसते ग्रंथ ॥ मग तें दावीत वचन लोकां ॥३०॥नसतें जोडी व्यसन ॥ न मिळे तरी वेंची प्राण ॥ स्त्री आणि धन ॥ करी उपासन दोहींची ॥३१॥चाले उताणा चवडयावरी ॥ भावी भाग्य आपुल्या घरीं ॥ वाचस्पति न पावे सरी ॥ बोल केपणा ज्याचिया ॥३२॥दुसर्याची सद्विद्या देखोनी ॥ अंतरीं मानी परम हानी ॥ कोकिळेचा स्वर ऐकोनी ॥ काक जैसा संतापे ॥३३॥दीपापोटीं निपजावे रत्न ॥ तेथें काजळ जाहलें कुलक्षण ॥ तैसा पवित्र कुळीं उपजोन ॥ डाग लाविला वंशातें ॥३४॥उभा केला पाषाण ॥ तो कदा न लवेचि जाण ॥ तैसा देखतां देव ब्राह्मण ॥ कदा नमन करीना ॥३५॥कुंभीपाकाहूनि अधिक ॥ जन्मकाळींचें महादुःख ॥ मरण काळीं निःशंक ॥ सहस्त्र वृश्चिक वेदना ॥३६॥ऐसीं दुःखें विशेष देख ॥ आठवीना तो महामूर्ख ॥ त्यासी वाटे बहुतेक ॥ चिरंजीव मी आहें ॥३७॥सुषुप्तींत बुडे जो नर ॥ तो नेणे नागाविती तस्कर ॥ तैसा देह क्षण भंगुर ॥ नेणती पामर दोघेही ॥३८॥जैसा न लागतां एक क्षण ॥ चपला पळे रूप दावून ॥ तैसेंचि तें तारुण्य ॥ मावळोनि जाय पैं ॥३९॥गंगेचा ओहटतां पूर ॥ मागें दरडी उरे अपार ॥ तैसें वृद्धत्व साचार ॥ जवळी आलें न कळे त्या ॥४०॥मर्कट नाचवी बाजेगार ॥ तैसे स्त्रीपुढें दावी विकार ॥ माता पिता वंचूनि समग्र ॥ द्रव्य वेंची स्त्रियेसी ॥४१॥ऐकें राया सावधान ॥ त्या अपवित्राचें कुलक्षण ॥ हें ॥ सज्जनीं करूनि श्रवण ॥ असत्य गुण त्यागावे ॥४२॥देवधर्मांचा द्नव्यार्थ ॥ सदा वेंची तो अनृत ॥ सद्नुरूसी सदा चाळवीत ॥ मिथ्या बोल बोलूनी ॥४३॥अल्पही नसे वेदाचें ज्ञान ॥ परी उताणा चाले गर्वेंकरून ॥ मी आहें अत्यंत प्रवीण ॥ आपुलें ठायीं भावी तो ॥४४॥गारुडियासी विद्या किंचित ॥ परी सर्वांगीं ब्रीदें बहुत ॥ विष थोडें परी ऊर्ध्व वाह्त ॥ वृश्चिककंटक जैसा कां ॥४५॥आपण विधिविधान नेणे ॥ भल्यासी न पुसे अभिमानें ॥ मनासी आलें ऐसेंचि करणें ॥ याग तप जप जें कां ॥४६॥कोरफड जों जों वाढत ॥ तों तों कडवटपण चढत ॥ तैसा जों जों जाणता होत ॥ करी उन्मत्त क्रिया पैं ॥४७॥साधूचें पाहे दोष गुण ॥ जरी तो निर्दोष असला पूर्ण ॥ तरी त्यावरी असदारोपण ॥ बळेंचि करी दुष्टात्मा ॥४८॥ऐकोनियां हरिकीर्तन ॥ बोटें घालूनि बुजवी कान ॥ म्हणे याचें न पाहावें वदन ॥ ऐसा दुर्जन अपवित्र तो ॥४९॥ब्रह्मचारी यतीश्वर ॥ तापसी विरक्त उदास थोर ॥ यांसी देखोनि म्हणे साचार ॥ हे दंडिले पूर्वदोषें ॥५०॥सोडूनि पुत्र दारा धन ॥ उगेचि हिंडती रानोरान ॥ भरलिया ठायावरून ॥ यांसी उठविलें ईश्वरें ॥५१॥दानवपुरोहितें निर्मिलीं शास्त्रें ॥ जीं अभिचारिकें अति अपवित्रें ॥ तेथींचीं वचनें सर्वत्रें ॥ दावी लोकांसी काढून ॥५२॥भोंवते मिळवूनि अज्ञानी जन ॥ त्यांसी दाखवी योग्यपण ॥ आपुल्या सौदर्यसी मदन ॥ उणा भावी निर्धारें ॥५३॥कीं विबुधाचार्याहून ॥ दावी व्युत्पत्तीचें थोरपण ॥ आपुल्या पुरुषार्थाशीं सहस्त्रनयन ॥ उणा म्हणोन बोलत ॥५४॥श्वान जैसें पिसाळलें ॥ किंवा डुकर वनीं माजलें ॥ किंवा हत्तेरूं आंधळें ॥ सव्यापसव्या धांवत ॥५५॥बिडालकाचे गेले नयन ॥ परी पूषकाची सांचळ ऐकोन ॥ तळमळी धरावया मन ॥ वैराग्य पूर्ण तेवीं त्याचें ॥५६॥जैसें अंधारीं दिवाभीत ॥ डोळसपणें मिरवत ॥ कीं स्फटिकाचें माणिक सत्य ॥ रंग देऊनि पैं केलें ॥५७॥तैसें त्याचें थोरपण ॥ द्दष्टीस नाणी त्रिभुवन ॥ विलोकिताम कमलासन ॥ कुलालपण त्यास स्थापी ॥५८॥ब्रह्मा निजकन्या अभिलाषी ॥ विष्णु भुलला वृंदेसी ॥ लिंगपतन शंकरासी ॥ त्यांसी देव न म्हणों आम्ही ॥५९॥सहस्त्र भगांकित इंद्र ॥ गुरुदारागमनी चंद्र ॥ तमांतप अत्यंत तीव्र ॥ ऋषी समग्र क्रोधी बहु ॥६०॥व्यासादिक महर्षी ॥ दूषण अत्यंत ठेवी त्यांसी ॥ एवं सर्वांसी उपहासी ॥ पापराशी चांडाळ ॥६१॥त्रैलोक्यींचा मद मत्सर ॥ सर्वही करूनि एकत्र ॥ धृतराष्ट्रा तुझा पुत्र ॥ दुर्योंधन घडिलासे ॥६२॥आपादमस्तक पर्यंत ॥ दुर्जनमय समस्त ॥ त्याची करणी जिकडे जात ॥ तिकडे अनर्थ धांवती ॥६३॥जीवंतचि पांच जण ॥ मेले ते राया ऐक कोण ॥ दरिद्री व्याधीनें घेतला कवळून ॥ मूर्ख जाण अविवेकी ॥६४॥प्रवासी नित्य सेवक जाण ॥ हे जीवंतचि पावले मरण ॥ यांहीपेक्षां तो दुर्जन ॥ अपवित्र जाणावा ॥६५॥पडिला आहे काळ कोण ॥ मज मित्र तरी किती जण ॥ कोण देश काय वर्तमान ॥ नेणे तो मूर्ख जाणावा ॥६६॥अपार असोनि गांठीं धन ॥ जो मूर्ख न करी धर्म दान ॥ त्याचिया गळां पाषाण बांधोन ॥ समुद्रांत बुडवावा ॥६७॥दरिद्री न करी जपानुष्ठान ॥ अथवा न करी तीर्थाटन ॥ त्या चिया गळ्यांत पाषाण बांधोन ॥ समुद्रांत बुडवावा ॥६८॥ज्याचें मन नसे धर्मास ॥ जो अतिमलिन अविश्वस्त ॥ त्याचा कोंडे श्वासोच्छवास ॥ अधर्मीं रत परम जो ॥६९॥अपात्रीं करितां दान ॥ त्यासी दरिद्र न सोडी कदा जाण ॥ दरिद्रें करी पापाचरण ॥ नरक दारुण भोगी पुढें ॥७०॥आणिकही उपजे दरिद्री होऊन ॥ मागुती करी पापाचरण ॥ राया सत्पात्रीं देतां दान ॥ ऐक होय कैसें तें ॥७१॥सत्पात्रीं दान कृष्णार्पण ॥ जैसें वटबीज वर्धमान ॥ मग लक्ष्मी अचल येऊन ॥ राहे गृहीं त्या चिया ॥७२॥पुण्य वाढे जों जों विशेष ॥ सहज यश पावे निर्दोष ॥ षड्वैरी अष्टपाश ॥ यांहूनि वेगळा तो जाहला ॥७३॥थोर हेंचि जाण साधन ॥ परललना परधन ॥ येथें ज्याचें उदास मन ॥ तोचि धन्य शास्त्र म्हणे ॥७४॥आपणाहूनि हीन पुरुष ॥ त्यासीं न बोलावें निःशेष ॥ संतांशीं मैत्री विशेष ॥ दिवसें दिवस वाढवावी ॥७५॥विद्यावंत ज्ञानी पंडित ॥ ते संग्रहावे देऊनि धन अमित ॥ गृहच्छिद्र आयुष्य वित्त ॥ सहसा बाहेर न सांगावें ॥७६॥मंत्र औषध मैथुन ॥ दान मान अपमान ॥ सुकृत आणि तीर्थाटन ॥ कादाकाळीं न बोलावें ॥७७॥जाणीव न धरावी कदा ॥ कोणाचीही न करावी निंदा ॥ नुल्लंघावी वेदमर्यादा ॥ निष्ठुर वाक्य न बोलावें ॥७८॥आपण न करावें पापाचरण ॥ दुसर्याचे दोष टाकावे आच्छादून ॥ हें सज्जनांचें लक्षण ॥ बहु भाषण कासया ॥७९॥अपत्यहीन ॥ जे भगिनी ॥ ते माते ऐसी पाळावीं सदनीं ॥ माता पिता गुरु वृद्धपणीं ॥ बहुतचि सांभाळिजे ॥८०॥गुह्य गोष्टी वर्मवाणी ॥ न घालावी स्त्रियेचे कर्णीं ॥ लेखन पठन शास्त्राध्ययनीं ॥ आळस कदा न कीजे ॥८१॥सत्कर्म दाना घ्यायन ॥ येथें आळस न करावा एक क्षण ॥ स्त्रीभोग निद्रा बहु भोजन ॥ येथें उदास असावें ॥८२॥गोरक्षक ग्रामकामकरी ॥ कृषिरक्षकासी निद्रा भारी ॥ असावधान भांडारी ॥ तरी अनर्थ होय तेथ ॥८३॥भार्या दुष्ट शठ मित्र ॥ अज्ञान गुरु पुत्र निष्ठुर ॥ प्रधान कुबुद्धि राव अविचार ॥ व्यर्थ भूभार कासया ॥८४॥सुह्रदाशीं निष्ठुर देख ॥ जानावा तो आत्मघातक ॥ श्वशुरगृहीं राहे तो शत मूर्ख ॥ आपुला पुरुषार्थ वर्णी मुखें ॥८५॥विष भक्षूनि प्रचीत पहावया ॥ उरेल कोण सांग राया ॥ आत्महत्या केली शस्त्र खोंचोनियां ॥ त्याचें प्रायश्चित्त कोणीं घ्यावें ॥८६॥वारितां सर्पावरी निजला ॥ तो जागा पुनः कोणीं देखिला ॥ ब्राह्मणद्वेषें परत्र गेला ॥ देखिला नाहीं कोठेंही ॥८७॥मातृपितृद्वेषी जो सदा ॥ तो कधीं पावला भगवत्पदा ॥ मद्यपानी पाळी वेदमर्यादा ॥ कालत्रयीं न घडेचि ॥८८॥मैत्री इच्छिजे जरी विपुल ॥ तरी वाग्वाद न करावा समूळ ॥ अर्थ संबंध करितां केवळ ॥ कलह होय मित्रत्वीं ॥८९॥मित्र समीप नसतां जाण ॥ त्याचे स्त्रियेशीं एकांतीं भाषण ॥ हे त्यागितां तीन्ही गुण ॥ मित्रत्व चाले बहुकाळ ॥९०॥भलते गोष्टीं आतुर ॥ दीर्घरोगी वादक थोर ॥ पाखंड पक्ष वाढवी अपार ॥ संग त्याचा न धरावा ॥९१॥वेदपरायण शास्त्रीं ज्ञान ॥ बहुश्रुतेंचि समाधान ॥ धन ज्यासी तृणासमान ॥ संग त्याचा धरावा ॥९२॥सुंदर सधन परनारी ॥ एकान्त पाहोनि प्रार्थना करी ॥ काम विकार न उठे अणुभरी ॥ तरी तो ईश्वर म्हणावा ॥९३॥द्रव्याचा घट निर्जनीं ॥ अवचित देखिला नयनीं ॥ आस्था न धरी जाय ओसंडूनी ॥ तरी तो ईश्वर म्हणावा ॥९४॥निंदक सोडिती वाग्बाण ॥ पुढें केलें क्षमा ओढण ॥ खेद कदा न उठे मनांतून ॥ तरी तो ईश्वर मानाव ॥९५॥आपण आचरे सत्कर्मराहटी ॥ दुसर्याचे गुण दोष नाणी द्दष्टीं ॥ आत्मरूप पाहे सर्व सृष्टी ॥ तरी ईश्वर म्हणावा ॥९६॥आपुलें महत्कार्य सोडून ॥ परोपकारीं घाली मन ॥ परपीडा नावडे चित्तांतून ॥ तरी तो ईश्वर म्हणावा ॥९७॥गुरुद्वेष करी जो चांडाळ ॥ त्याची विद्या तत्काळ निष्फळ ॥ तो अपयश पावे कुटिल ॥ विजय न होय कोठेंही ॥९८॥मातृद्वेष करी त्रिशुद्धी ॥ भार्या असती भरे व्याधी ॥ पितृद्वेषें कुबुद्धी ॥ पिशाच होऊनि हिंडे तो ॥९९॥बंधुद्वेष करितां साचार ॥ होय धनाचा संहार ॥ भार्या पतिव्रता निर्धार ॥ अर्धांग जाय तिच्या द्वेषें ॥१००॥सुमन सुवास घेत भ्रमर ॥ परी त्यासी धक्का न लावी अणुमात्र ॥ तैसा प्रजा पाळी जो नृपवर ॥ न्यायें धन घेऊ नियां ॥१०१॥घ्यावें वृक्षाचें सुमन ॥ परी वृक्ष न उपडावा मुळींहून ॥ नख आगळें काढावें छेदून ॥ परी तें बोट रक्षावें ॥१०२॥केश विहिता विहित जाणोन ॥ करावें प्रजेचें पालन ॥ गोत्रजांशीं विरोध जाण ॥ प्राणांतींही न करावा ॥१०४॥जाणे सारासारनीती ॥ वृद्ध म्हणावें त्याज प्रती ॥ स्वर्ग तोचि सत्संगती ॥ सच्छास्त्र श्रवण सर्वदा ॥१०५॥दुर्जनसंग तोचि नरक जाण ॥ प्रति पाळावें गुरु वचन ॥ करावें वृद्धांचे सेवन ॥ अकार्य पूर्ण त्यागावें ॥१०६॥तत्त्ववेत्ता दयाळु उदास जाण ॥ तोचि गुरु आधीं जावें शरण ॥ गुरुवचनीं अवज्ञा पूर्ण ॥ विष दारुण मारक तें ॥१०७॥दिवसा ऐसें वर्तावें पाहें ॥ जेणें रात्र सुखरूप जाये ॥ संसारीं ऐसें वर्तावें स्वयें ॥ जेणें इह परत्र सुखरूप ॥१०८॥कार्य त्वरित हेंचि करणें ॥ जन्ममरणांचें मूळ छेदणें ॥ क्रियेसमवेत ज्ञान बोलणें ॥ मोक्षतरूचें बीज हेंचि ॥१०९॥धर्म तोचि शुद्ध पंथ ॥ मन शुद्ध तो शुचिष्मंत ॥ विवेकी तोचि पंडित ॥ सर्व भूतीं समदर्शन ॥११०॥पुत्रस्नेह जाण निश्चित ॥ मदिरा न घेतां भुलवीत ॥ तस्कर ते पंच विषय सत्य ॥ एके क्षणांत नागविती ॥१११॥ज्याची तृष्णा निमाली ॥ तेणें समूळ उपडिली भववल्ली ॥ विषयीं सदा वृत्ति वेधली ॥ अंतर्बाह्य अंध तो ॥११२॥सुटती ललनांचे नयनशर ॥ व्यथित न होय तो मुख्य शूर ॥ प्राणिमात्र सर्व मित्र ॥ तोचि थोर शास्त्र म्हणे ॥११३॥स्त्रीचरित्रें खंडिला नच जाय ॥ तोचि चतुर हा निश्चय ॥ सदा हळहळ ज्यासी होय ॥ दरिद्री पाहें तोचि एक ॥११४॥तृणापरीस नीचपण ॥ परयाञ्चा जया लागून ॥ विचार रहित न करी कारण ॥ जागा जाण तोचि सदा ॥११५॥ऐसा नीतीचा मेघडंबर ॥ वर्षला महाराज विदुर ॥ आनंदोनि धुतराष्ट्र ॥ बोलता जाहला तेधवां ॥११६॥म्हणे विदुरा पूर्ण ज्ञान ॥ तें मज सांग करीन श्रवण ॥ यावरी तो सज्ञान ॥ बोलिला काय तें ऐका ॥११७॥म्हणे येथें सनत्सुजात ॥ येईल आतां ब्रह्म सुत ॥ तो ज्ञान उपदेशील अद्भुत ॥ श्रवण करीं राया तें ॥११८॥धृतराष्ट्र म्हणे तूं सांग सत्वर ॥ येरू म्हणे मज नाहीं अधिकार ॥ सर्व वर्णांसी गुरु विप्र ॥ ज्ञान अन्यां सांगती ॥११९॥वर्णानां बाह्मणो गुरुः’ ॥ हा मुख्य शास्त्र विचारु ॥ येथें आग्रह करिती जे साचारु ॥ पाखंडी ते शतमूर्ख ॥१२०॥आचारहीन मलिन जरी ॥ परी गायत्री मंत्राचा अधिकारी ॥ मुखा पासूनि जन्मले निर्धारीं ॥ आदिपुरुषाचे विप्र हे ॥१२१॥ब्राह्मणांचें उत्तमाचरण ॥ गायत्री मंत्र वेदाध्ययन ॥ तें जरी करिती इतर वर्ण ॥ तरी दारूण नरक भोगिती ॥१२२॥खरचर्मीं भरलें गोक्षीर ॥ तें प्राशन ॥ न करिती जैसें पवित्र ॥ तैसें इतरां मुखींचें वेदशास्त्र ॥ श्रवण सहसा न करावें ॥१२३॥ऐसें बोलतां विदुर ॥ तों निशा जाहली दोन प्रहर ॥ यावरी श्री कृष्ण कृपापात्र ॥ सनत्सुजात चिंतीत ॥१२४॥सूर्य उतरे आका शाहूनी ॥ तेवीं सनत्सुजात उभा ठाकला येऊनी ॥ विदुर धृतराष्ट्र उठोनी ॥ पाय वंदिती सप्रेम ॥१२५॥षोडशोपचारें पूजून ॥ तोषविलें सनत्सु जाताचें मन ॥ यावरी करिता जाहला प्रश्न ॥ सावधान ऐका तें ॥१२६॥म्हणे महाराज तूं ईश्वर ॥ तरी बोलें सच्छास्त्र ॥ आणि मृत्यु हा परम घोर ॥ याचें स्वरूप कैसें असे ॥१२७॥मृत्यूचें भय कोणास नाहीं ॥ तें सुजाणा आतां सांग सर्वही ॥ यावरी सनत्सु जात ते समयीं ॥ अगाध ज्ञान वर्षला ॥१२८॥प्रमाद जो कां अनर्थ ॥ भ्रमें करूनि भुलोन जात ॥ तेथेंचि जाण असे मृत्य ॥ पूर्ण गुह्यार्थ राजेंद्रा ॥१२९॥मृत्यु रहित स्वर्गीं शूर ॥ अप्रमाद करिती साचार ॥ म्हणोनि जाहले जिर्जर ॥ सत्कर्म धर्म आचरोनी ॥१३०॥यांसही आंगीं चढतां भ्रम ॥ पावती कल्पांतीं विराम ॥ सदा सावधान निःसीम ॥ जन्म मरणातीत ॥ ते ॥१३१॥जैसें एकचि उदक ॥ विषांत जाऊनि होय मारक ॥ अमृता माजी तारक ॥ तेंचि सहज जाहलें पैं ॥१३२॥ज्या ज्या रंगांत नीर जाय ॥ तदनुसार स्वरूप होय ॥ तैसी वस्तु सर्वांत समाय ॥ परी अनन्य होय कर्तृत्वें ॥१३३॥दैत्य मद्य प्राशक समस्त ॥ भ्रमें करूनि पावती मृत्य ॥ भ्रम रहित तेंचि अमृत ॥ घेऊनि देव तृप्त सर्वदा ॥१३४॥अंतर्बाह्य जो भ्रमला ॥ तो मृत्यूनें सर्वदा गिळिला ॥ ब्रह्मांडगोळ सगळा ॥ भ्रमें भरला ओत प्रोत ॥१३५॥जन वन सर्व आप्त ॥ भ्रमरूपचि सर्व दिसत ॥ म्हणे ईश्वर कैंचा येथ ॥ भ्रमभूत सर्वही ॥१३६॥पिंड ब्रह्मांड भ्रमभूत ॥ वेदशास्त्र भ्रमरूप भासत ॥ त्यासी मृत्यूनें ग्रासिलें यथार्थ ॥ न सुटे सत्य कल्पांतीं ॥१३७॥गेला विषय ध्यानें भुलुनियां ॥ सत्य मानी गृह सुत जाया ॥ कैंचा ईश्वर मिथ्या माया ॥ भजोनियां व्यर्थचि ॥१३८॥ऐसे सर्वदा जे भ्रमरूप ॥ ते फेरे घेती कोटिकल्प ॥ अंधतम नरक पापरूप ॥ भोगिती गणित नव्हे तें ॥१३९॥किती वेळां तरी मरावें ॥ अहा कितीदां उपजावें ॥ चौर्यायशों लक्ष योनी फिरावें ॥ किती भोगावें दुःख तें ॥१४०॥ऐसे जे गा नृपनाथा ॥ त्यांसी मृत्यूनें गांगिलें पाहतां ॥ आतां मृत्यू वेगळे तत्त्वतां ॥ त्यांची कथा ऐक पां ॥१४१॥भक्तिज्ञान वैराग्यबळें ॥ सत्समागमें सदा बोधले ॥ सच्छास्त्रें श्रवण भेदले ॥ जिंहीं जिंकिले षड्वैरी ॥१४२॥जे गुरुकृपाजीवनींचे मीन ॥ तळपती स्वानंद सुखें करून ॥ जन्म मरणांचें बीज भाजून ॥ सनातन अक्षय ते ॥१४३॥जे जीवतत्त्व मारूनि जाहले ॥ ते मृत्यूसही वाटूनि प्याले ॥ जन्ममरणांची मुळें ॥ जाळिलीं त्यांहीं समस्त ॥१४४॥जे मृत्युरहित अक्षय पूर्ण ॥ ऐक तयांचें सांगतों चिन्ह ॥ जीं चिन्हें ऐकतां जन्ममरण ॥ रहित होती साधक ॥१४५॥आपुलें सुकृत जो पाहीं ॥ स्वमुखें न बोले कालत्रयीं ॥ आपुले विद्येची नवाई ॥ लोकां माजी दावीना ॥१४६॥न करी दांभिक भजन ॥ न बोले कोणाचें निंदा स्तवन ॥ चराचर जीव संपूर्ण ॥ आत्मरूप पाहे पैं ॥१४७॥जेणें ह्रदय होय शीतळ ॥ तैसा शब्द बोले कोमळ ॥ अर्हिंसा दया निर्मळ ॥ ह्रदय कोशीं विराज्ती ॥१४८॥कोणी लोक स्तवन करितां ॥ म्हणे मज गर्व चढेल आतां ॥ यालागीं गजबज चित्ता ॥ वाटे तयाचे ते काळीं ॥१४९॥अंतर्बाह्य मिर्मळ ॥ जैसें केवळ गंगा जळ ॥ चंद्राहूनि शीतळ ॥ मानस तयाचें जाणावें ॥१५०॥गगनाहूनि मृदु पूर्ण ॥ त्या पुरुषाचें अंतःकरण ॥ निजबोधें संपूर्ण ॥ बुद्धि त्याची बोधली ॥१५१॥स्नेहद्दष्टी करूनि सबळ ॥ कूर्मिणी पाहे जैसें बाळ ॥ तैसें हे विश्व सकळ ॥ विलोकीत कृपेनें ॥१५२॥सकर्दम सरोवर देखोन ॥ मराळ जाय ओसंडून ॥ तैसीं असत्कर्में सोडून ॥ उत्तम पंथें जाय तो ॥१५३॥दग्धवनीं शुष्ककांतारीं ॥ कोकिळा न बैसे क्षणभरी ॥ तैसे हे जीव दुराचारी ॥ संगति न धरीं तयांची ॥१५४॥विश्व हें आहे किंवा नाहीं ॥ हें स्मरणचि नसे पाहीं ॥ आणणाशीं तो विदेही ॥ खेळ खेळे एकत्वें ॥१५५॥जैसे चंदनाचे संगतीं ॥ इतर वृक्ष सुवासिक होती ॥ तैसी त्याची पाहतां रीती ॥ बहुत तरती मुमुक्षू ॥१५६॥अनुभवकमळीं मकरंद ॥ सेवणार होती मुक्तमिलिंद ॥ कीं तो आनंदवनींचा प्रसिद्ध ॥ मृगेंद्रचि वसतसे ॥१५७॥तो वैराग्यकैलासींचा शिव ॥ स्वानंदवैकुंठींचा माधव ॥ तो सत्यपदींचा कमलोद्भव ॥ अवतरला स्वलीलें ॥१५८॥कीं सद्विवेक अमरपुर ॥ तेथींचा राहणार सहस्त्रनेत्र ॥ कीं दयाऽऽकाशींचा सहस्त्रकर ॥ प्रकाशक सर्वांसी ॥१५९॥द्दश्य समद्राचें आचमन ॥ करितां तो अगस्त्य संपूर्ण ॥ कीं सारासार विचार प्रवीण ॥ सत्यवती कुमार तो ॥१६०॥किती वर्णावे त्याचे गुण ॥ वर्णितां भागला सहस्त्रवदन ॥ विश्वात्मा तो जगज्जीवन ॥ त्याचा प्राण झाला तो ॥१६१॥ तो मुखीं घालितां ग्रास ॥ तेणें तृप्त होय यज्ञपुरुष ॥ त्याचे उदकपानें सावकाश ॥ रसनायक आनंदे ॥१६२॥तो हिंडे निर्विकल्प स्थितीं ॥ तेणें पावन जाहल्यें म्हणे क्षिती ॥ त्याच्या पाहण्या माजी दिनपती ॥ सुख प्राप्ती भावीत ॥१६३॥त्याचे निद्रेंत उन्मनी ॥ विश्रांति घेत येऊनी ॥ समाधि विलसे चरणीं ॥ कर जोडूनि सर्वदा ॥१६४॥चंद्र उगवतां सोमकांत ॥ पाझरोनि सरोवरें भरीत ॥ तैसा अनुभवीं तो विरत ॥ विश्वा सहित आपण ॥१६५॥तो भोगी जरी भोग ॥ परी तो विदेही निःसंग ॥ जैसा सतीचे चित्तीं विराग ॥ देहभेद नाठवे ॥१६६॥सतीचा होत बहु सोहळा ॥ परी ती कांहीं न देखे डोळां ॥ तैसा तेणें भोग भोगिला ॥ न कळे कांहीं त्याला तें ॥१६७॥चित्रीं पाणी आणि अग्न ॥ दोन्ही दाविलीं रेखून ॥ तरी चित्रपट न भिजे न जळे पूर्ण ॥ मुक्तही जाण तैसा तो ॥१६८॥कर्ता कार्य कारण ॥ तिघांशीं स्वरूपीं जाहला लीन ॥ विधिनिषेध गिळून ॥ तृप्त जाहला सर्वदा ॥१६९॥वेडियासी न कळे जाण ॥ मी झांकलों कीं आहें नग्न ॥ तैसा तो प्राप्त ज्ञान ॥ विधि निषेध नेणेचि ॥१७०॥न्याय कीं अन्याय होत ॥ झें बाळ कासी न कळे किंचित ॥ तैसा तो वृत्तिरहित ॥ स्मरण कांहीं नसेचि ॥१७१॥चांदणें आणि अंधार ॥ सूर्योदयीं दोहींचा विसर ॥ तैशा प्रवृत्ति निवृत्ति समग्र ॥ नुरतीच स्वरूपोदयीं ॥१७२॥निर्विकल्पस माधींत मग्न ॥ चहूं देहांचें नाहीं स्मरण ॥ त्याचें कर्म राहिलें पूर्ण ॥ म्हणेल कोण तयासी ॥१७३॥राहिले प्रवृत्तीचे भाव ॥ ओलांडिली निवृत्तीची सींव ॥ ब्रह्मसाम्राज्य राणीव ॥ प्राप्त जाहली तयातें ॥१७४॥हार किंवा विखार ॥ जन अनुमानिती समग्र ॥ परी निद्रित जो साचार ॥ दोन्ही त्यासी नेणवती ॥१७५॥स्थाणू किंवा चोर भासत ॥ शुक्ति किंवा हें रजत ॥ मृगजल कीं जल सत्य ॥ हें कांहींच नेणे तो ॥१७६॥तैसें साकार कीं निराकार ॥ भ्यासुर किंवा मनोहर ॥ निःशब्द किंवा गजर ॥ नेणे कांहीं मुक्त तो ॥१७७॥जैशा कल्पांतीं नीरीं ॥ लपाल्या आड गंगा विहिरी ॥ वणवा पेटतां कांतारीं ॥ भास मावळे वनस्पतींचा ॥१७८॥यात्रा सरल्या सहज ॥ निवान्त राहे गजबज ॥ तैसा तो पावतां स्वरूपतेज ॥ द्दश्य जाळ मावळे ॥१७९॥तो निर्विषय सर्वकाळ ॥ पंव विषय जड केवळ ॥ शब्द विषय प्रसवे निराळ ॥ मुक्त वेगळा दोहींतें ॥१८०॥स्पर्शासी प्रसर्व पवन ॥ योगी तयासीं जाहला भिन्न ॥ रूप आणि तेज गाळून ॥ निरंजन जाहला तो ॥१८१॥जीवन आणि रस ॥ दोहींवेगळा तो निर्दोष ॥ पृथ्वी आणि गंध विषयांस ॥ नातळेचि सोंवळा तो ॥१८२॥भिंतीवरील चित्रें ॥ चिखलें बुजवितां गेलीं समग्रें ॥ भेदाभेद एकसरें ॥ आत्मतत्त्वीं विराले ॥१८३॥मठ मोडिले घट फोडिले ॥ आकाश न फुटे सगळें ॥ तैसें द्दश्यत्व हारपलें ॥ आहे संचलें स्वरूप ॥१८४॥कीं अलंकारांच्या आकृती ॥ मुसेंत विरती एकवृत्तीं ॥ तैसें जग हारपोनि निश्चितीं ॥ जगदीश्वर उरलासे ॥१८५॥ना तरी जो जागा जाहला ॥ त्यासी स्वन्पाभास हारपला ॥ परी आपणचि उरला ॥ अखंडित अद्वय ॥१८६॥तो निरपेक्ष विचरत ॥ स्वर्गदि सुखें समस्त ॥ तृणाहूनि नीच मानीत ॥ आशारहित मानसीं ॥१८७॥विषय त्यागूनि गेला सवेग ॥ देवांसी मोक्ष मागे मग ॥ तरी तो निरपेक्ष नव्हे सांग ॥ मोक्षकाम धरिला तेणें ॥१८८॥तैसा नव्हे तो ज्ञानी ॥ मोक्षासही न धरी मनीं ॥ मोक्षचि येऊनि चरणीं ॥ लागे तयाच्या निर्धारें ॥१८९॥जो जन्म मृत्यूंची कथा विसरे ॥ शुभाशुभ मावळलें एकसरें ॥ जेवीं दीप आणि अंधारें ॥ सूर्योदयीं मावळती ॥१९०॥विश्वस्थित नानाकार ॥ हे अवघेचि त्याचे अवतार ॥ आपुलें स्वरूपें पाहूनि समग्र ॥ आपणचि डोलतसे ॥१९१॥जीव भुलोनि गेले अपार ॥ त्यांसी सोडवावया ईश्वर ॥ परम दयाळु करुणाकर ॥ त्याचि रूपें अवतरला ॥१९२॥उदयास्तीं तीव्रता टाकून ॥ सोज्ज्वळ जैसा सूर्य नारायण ॥ तैसा तो स्वप्रकाश पूर्ण ॥ ब्रह्मानंद एकचि ॥१९३॥जगा चिया नयनद्वारें ॥ आपुलीं स्वरूपें पाहे साचारें ॥ दुजेपणाचें वारें ॥ अणुमात्र स्पर्शेना ॥१९४॥निष्कलंक क्षयरहित ॥ शीतलत्व टाकूनि समस्त ॥ उदयास्त नाहीं तेथ ॥ आल्हाद कारक चंद्र तो ॥१९५॥तो होऊनि सकळांचें मन ॥ साक्षी वेगळा चैतन्य घन ॥ कीं तो होऊनि सहस्त्रनयन ॥ हस्तक्रिया सकळ करवी ॥१९६॥कीं तो स्वयें होऊन विधी ॥ चाळी सकल जनांच्या बुद्धी ॥ तो सकल साकारांचे आदी ॥ निरवधी निर्द्वद्व ॥१९७॥तो विष्णुरूपें करून ॥ होय सकळांचें अंतःकरण ॥ असो विश्व संपूर्ण ॥ तोचि जाहला निजांगें ॥१९८॥तेणें धुतलें अवघें गगन ॥ तेणें मोडिले वायूचे चरण ॥ तेणें तेजही जाळून ॥ दाहकत्व दूर केलें ॥१९९॥तेणें आर्द्रत्व हिरोन ॥ ओपवूनि शुद्ध केलें जीवन ॥ अवनीचें कठिणपण ॥ हिरोनियां घेतलें ॥२००॥तेणें मनासी केला मार ॥ तोडिलें वासनेचें मंदिर ॥ भूतदयेचें अंबर ॥ नेसोनियां मिरवत ॥२०१॥बोधवनांत त्रिशुद्धी ॥ तेणें मोकळी सोडिली बुद्धी ॥ चैतन्य सागरीं आधीं ॥ चित्त तेणें बुडविलें ॥२०२॥स्वरूपांबरीं वृत्ती ॥ आनंद मय त्याच्या क्रीडती ॥ कीं तो ब्रह्मारण्यींचा भद्रजाती ॥ निरंकुश क्रीडत ॥२०३॥तो आप आपणाशीं बोलत ॥ आत्मस्थितीं पाऊल टाकीत ॥ आहेत तितुकीं कर्में करीत ॥ निराकार सर्वदा तो ॥२०४॥कीं वैरागरींचा मणि निर्मळ ॥ माणिक करी भेटतां हरळ ॥ तैसे त्याचे द्दष्टीनें सकळ ॥ जीव पावती निजपदा ॥२०५॥तो आपण तरूनि साचार ॥ बहुतांचा करी उद्धार ॥ तो न दंडी स्वशरीर ॥ व्रतोपवासें करू नियां ॥२०६॥तो श्रृंगारिक न बोले कधीं ॥ तो भवद्भक्ति प्रतिपादी ॥ तो निजबोधें उद्वोधी ॥ साधकां आणि मुकुक्षां ॥२०७॥लोकीं स्तुति करितां न फुगे ॥ निंदा करितां न विरागे ॥ तो आनंद सदनीं वागे ॥ द्वैत मागें घालूनी ॥२०८॥तो वाग्वाद सोडूनि सकळ ॥ बोलणें बोले रसाळ ॥ जेणें सर्वांचें ह्रदय शीतळ ॥ होऊ नियां आनंदे ॥२०९॥तो ज्ञान मद न धरी अंगीं ॥ तो अहंपण न मिरवी जगीं ॥ तो यथाविधि भोग ॥ हठयोगी नव्हेचि तो ॥२१०॥तो आम्ही तरलों म्हणोनी ॥ सहसा न बोलेचि जनीं ॥ शिष्य करावे हें मनीं ॥ नावडेचि सर्वथा ॥२११॥तेणें लौकिकाची सोडिली लाज ॥ तणें जन्ममरणाचें भाजलें बीज ॥ तेणें द्दश्य सांडोनि शेज ॥ निरालंबीं पैं केली ॥२१२॥साखर पेरिलिया जाण ॥ इक्षुदंड नव्हेचि उत्पन्न ॥ कर्पूर होतां दहन ॥ रक्षा मग नुरेचि ॥२१३॥त्याचें सकळ कार्य सिद्धीस गेलें ॥ नामरूपांचें ठाण पुशिलें ॥ करणें न करणें उरलें ॥ कांहींच नाहीं तयासी ॥२१४॥तो ब्रह्मचारी हो गृहस्थ ॥ भिक्षुक अथवा वान प्रस्थ ॥ शरीरप्राक्तनें हो नृपनाथ ॥ अथवा विरक्त नग्न हिंडो ॥२१५॥तो संसारीं दिसे गुंतला ॥ जैसा सूर्य थिल्लरीं बिंबला ॥ तैसा अलिप्त तो सकळा ॥ क्रिया करूनि सर्वदाही ॥२१६॥गळोनि गेली सर्व ममता ॥ अंगीं विराजे शांति समता ॥ देहीं असतां विदेहता ॥ न मोडेचि सहसाही ॥२१७॥सारूनियां त्रिविध भेद ॥ त्रिगुणातीत जो जाहला शुद्ध ॥ त्र्यवस्थातीत निजबोध ॥ रूप जाहला निश्चयें ॥२१८॥त्रिताप समूळ जाळून ॥ त्रिपुटया सकल गाळून ॥ देहत्रय संहारून ॥ निरंकुश विराजे तो ॥२१९॥तो देहत्रयाचा नियंता ॥ तो भुवनत्रयाचा प्रतिपाळिता ॥ दोषत्रय तत्त्वतां ॥ द्दष्टीनें त्याच्या वितळती ॥२२०॥तो भवरोगवैद्य साचार ॥ जीवांच्या डोळ्यांचें पडळ काढणार ॥ कीं तो ज्योतिषी मुहूर्त देणार ॥ अक्षय्य पद पावावया ॥२२१॥त्याचेनि सकळ तीर्थें पावन ॥ त्याचेनि व्रतें धन्य धन्य ॥ तो सोंवळाचि निर्वाण ॥ द्दश्य़ ओंवळें आतळेना ॥२२२॥तेणें दुर्वासनेचें वसन फेडिलें ॥ तेणें त्रिगुणांचें जानवें तोडिलें ॥ मन दंडूनि निजबळें ॥ तोचि दंड घेतला ॥२२३॥द्ददय कमंडलूंतूनि पूर्ण ॥ न पाझरेचि ज्ञान जीवन ॥ आनंद करपात्रीं भोजन ॥ अतींद्रियपण तयाचें ॥२२४॥सहजीं सहज निश्चित ॥ प्रणवजप तयाचा होत ॥ तो जाहला क्षराक्षरातीत ॥ प्रणवाचाही निजसाक्षी ॥२२५॥ऐसा न करितां सायास ॥ सहज तेणें घेतला संन्यास ॥ सर्वपदार्थीं उदास ॥ वायु जैसा निरंतर ॥२२६॥तो निरालंबमंदिरीं ॥ निजला स्वानंदडोल्हारियावरी ॥ जागा होऊनि क्षणभरी ॥ प्रवृत्तीकडे न पाहे ॥२२७॥तो शेजे पहुडतां सहज मतें ॥ हरपूनि गेलीं पंच भूतें ॥ वेद निःशब्द होऊनि तेथें ॥ उगाचि तटस्थ राहिला ॥२२८॥समाधि आणि उन्मनी ॥ विलसती त्याचे चरणीं ॥ करणांसीही चोरूनी ॥ अंतःसनीं पहूडला ॥२२९॥तो ऐक्यवर दिगंबर ॥ शांतिविभूति ॥ चर्चिली सुंदर ॥ शाब्दिक घालूनि बाहेर ॥ मौन निरंतर सेविलें ॥२३०॥मी करितों सत्कर्माचरण ॥ हा त्यासी न उरे अभिमान ॥ हिंडतां फिरतां पूर्ण ॥ समाधि त्याची मोडेना ॥२३१॥जो शिबिकेंत जाहला निद्रित ॥ वहनवाहक सुपंथें जात ॥ भूमंडल क्रमितां बहुत ॥ परी त्याची निद्रा न मोडे ॥२३२॥तैसीं जीवन्मुक्ताचीं करणें ॥ आचरती सत्कर्माचरणें ॥ परी मी करितों ऐसें न म्हणे ॥ समाधिसुखें डोले तो ॥२३३॥तो अद्वयपदींचा नृप जाण ॥ सद्विवेकाचें उद्यान ॥ कीं कृपेचें पांघरूण ॥ विश्वावरी कर्ता तो ॥२३४॥कीं तो विदंबरींचा चंद्र ॥ कीं तो आत्मसुखाचा समुद्र ॥ कीं तो आनंदाचें अंबर ॥ उभारलें तेणें रूपें ॥२३५॥सर्वत्र करी तो गमन ॥ परी न चळे कदा आसन ॥ करूं बैसे जेव्हां भोजन ॥ ग्रासी गगन ॥ शब्दा सहित ॥२३६॥जगद्भान समूळीं उपटोनी ॥ भोजनीं बैसला गिळूनी ॥ रसना बाहेर घालूनी ॥ सर्व रस चाखीत ॥२३७॥सर्वांहूनि मृदु गगन ॥ परी तो योगी सुकुमार पूर्ण ॥ निद्रेसमयीं तें कठिण ॥ अंगीं रुपत तयाच्या ॥२३८॥सेजे न लावितां अंग ॥ निद्रा मोडे त्याची अभंग ॥ मागें लोटूनि द्दश्य भाग ॥ पहुडे स्वसुखीं सर्वदा ॥२३९॥तो ऐके तेंचि श्रवण ॥ तो बोले तेंचि कीर्तन ॥ आपुल्या स्वसुखीं समाधान ॥ तेंचि स्मरण तयाचें ॥२४०॥करी गुरुचरणो पासन ॥ परोपकारी सदा मन ॥ तेंचि तयाचें अर्चन ॥ समाधान ॥ सर्व भूतीं ॥२४१॥सर्व भूतीं तयाचें वंदन ॥ सर्वांहूनि म्हणे मी सान ॥ हेंचि दास्य संपूर्ण ॥ निरहंकारकृति करी तो ॥२४२॥सर्वभूतें पाहे आत्मवत ॥ हेंचि सख्य त्याचें निश्चित ॥ स्वस्वरूपीं समरस पाहात ॥ हेंचि आत्मनिवेदन पैं ॥२४३॥तो निजला परी जागृत ॥ जागा परी समाधिस्थ ॥ समाधीपासूनि समस्त ॥ निजसुखें डुले तो ॥२४४॥बोल तोही विसरोन ॥ धरिलें असे सदा मौन ॥ मौन न मोडतां जाण ॥ बोल बोले रसाळ ॥२४५॥रसनेसहित रस ॥ गिळूनि तृप्त सावकाश ॥ सावकाशपणें अवकाश ॥ विश्वालागीं जाहला तो ॥२४६॥विश्व गिळूनि सकळ ॥ स्वच्छंदेंचि खेळे खेळ ॥ खेळ खेळूनि अचंचळ ॥ निजमूळ सोडीना ॥२४७॥मूळ न सोडितां साचार ॥ आपणचि जाहला विश्वाकार ॥ विश्व हें कधीं रचलें साचार ॥ हें तो नेणे सर्वथा ॥२४८॥तेथें कैंचें नेणतेपण ॥ तो तरी अक्षय ज्ञानघन ॥ ज्ञानाभिमान मुळींहून ॥ नाहीं किंचित तयातें ॥२४९॥तेव्हां धृति समूळ विराली ॥ शांति शांतपणांत मुराली ॥ दिवस रात्रि सामावली ॥ स्वप्रकाशीं तयाच्या ॥२५०॥देहींचा विराला काम ॥ लाजलें सकळ निजकर्म ॥ संगें आला निजधर्म ॥ नाम अनामातीत जो ॥२५१॥तेथें मोक्ष मुक्त जाहला पूर्ण ॥ साधनाचें केलें उद्यापन ॥ अहिंसा क्षमा निशिदिन ॥ ह्रदय सदनीं खेळती ॥२५२॥जागृति स्वन्प सुषुप्ती ॥ ह्या समाधींत विश्रांति पावती ॥ तुर्या उन्मनी निश्चितीं ॥ स्वानंदीं होती लीन पैं ॥२५३॥तेथें शोक द्वेष मावळती ॥ कामना कल्पना दग्ध होती ॥ ध्याता ध्यान ध्येय हारपती ॥ वचनें खुंटती सर्वही ॥२५४॥दाख विण्यासीं देखणें विरे ॥ भज्य भजक भजनही विसरे ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान सरे ॥ ग्रीष्मकाळीं तोय जैसें ॥२५५॥हरपली सकळ मती ॥ गलित झाल्या सर्व वृत्ती ॥ गमनागमन गती ॥ सहजचि खुंटली ॥२५६॥तेथें अभ्यास सर्वही मुरे ॥ विस्मय आणि अनुभव भरे ॥ बोध आनंद गजरें ॥ जयवाद्यें वाजविती ॥२५७॥सनत्सुजात बोले गर्जोन ॥ इंहीं लक्षणीं जे मंडित पूर्ण ॥ ते जन्म मृत्यूंसी गिळून ॥ पूर्णत्वासी पावले ॥२५८॥तों उगवला आदित्या ॥ अंतर्धान पावला सनत्सुजात ॥ प्रज्ञाचक्षु आणि विदुर भक्त ॥ वारंवार स्तविती त्यातें ॥२५९॥म्हणे केवढें अद्भुत ज्ञान ॥ महाराज वर्षला निर्वाण घन ॥ रत्नांची खाणी पुण्यें करून ॥ उघडिलीसे सभाग्यें त्या ॥२६०॥जान्हवी पावन सर्वत्र ॥ परी प्रयागीं महिमा अपार ॥ तैसा सदतिसावा अध्याय परिकर ॥ तीर्थराज प्रत्यक्ष जो ॥२६१॥पांडवप्रताप दिव्य ग्रंथ ॥ त्यामाजी अध्याय हा सनत्सुजात ॥ ज्ञानवैरागरींचा यथार्थ ॥ दिव्य हिरा प्रकटला ॥२६२॥सदतिसावा अध्याय महामणी ॥ ह्रदय पंकजीं जडिला संतसज्जनीं ॥ भक्तपंडितीं दिवसरजनीं ॥ बारंवार विलोकिजे ॥२६३॥सनत्सुजात पाहतां ॥ न पडे ज्ञानाची कदा चिंता ॥ प्रिय ठेवणें तत्त्वतां ॥ संतांचा हाचि अध्याय ॥२६४॥पांडवपालका अब्यंगा ॥ ब्रह्मानंदा पांडुरंग ॥ पुंडलीक ह्रदया रविंदा ॥ श्रीधरवरदा अविनाशा ॥२६५॥पुढें कथा सुरसा पूर्ण ॥ कौरव बैसतील सभा करून ॥ संजयासी पुसतील वर्तमान ॥ ह्रद्नत काय पांडवांचें ॥२६६॥यावरी क्षीराब्धीचा जांवई ॥ तेथें करूं येईल शिष्टाई ॥ सुधार साहूनि गोड पाहीं ॥ रसिक कथा पुढें असे ॥२६७॥ते कथा सुरस गहन ॥ श्रीधरमुखद्वारें करून ॥ ब्रह्मानंद रुक्मिणीरमण ॥ बोलेल तेचि ऐका हो ॥२६८॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सदतिसाव्यांत कथियेला ॥२६९॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे उद्योगपर्वणि विदुरसनत्सुजातनीतिकथनं नाम सप्तत्रिंशाध्यायः ॥३७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP