खंड ५ - अध्याय ४४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल सांगती दक्ष ऐकत । ऐसा तो ऐल एकनिष्ठ पूजित । राजर्षि नित्य गणेशभजनरत । गृत्समदासम तो जगतीं ॥१॥
गजाननास ऐकांतांत । ध्याऊत तो होत तद्‍गत । राज्यभोगीं निःस्पृह होत । एकनिप्ठ मानस्स तो राजर्षि ॥२॥
पुत्रावरी राज्य सोपवून । सवा गणेशाचें करी पूजन । स्वभावें ध्यानयुक्त मन । नित्य निमग्न गणेशभक्तींत ॥३॥
दक्ष म्हणे मुद्‍गलासी । ऐलें ज्या केलें ध्यानासी । त्या ध्यानाचें वर्णन सांग मजसी । तैसेंचि मी करीन ॥४॥
मुद्‍गल तेव्हां सांगत । जैसें जाणून गणेश्वर तत्त्व सुख्यक्त । गार्ग्यापासून नंतर ध्यान करित । कैसें तें ऐक आता ॥५॥
ऐलें केलें गणेशस्तवन । तेंचि मीं तुज सांगेन । ऐक तूं एकचित्त होऊन । गणेश भक्तिवर्धक तें ॥६॥
विघ्नेश्वराचें पादपंकज नमित । निजात्म्यासी अखिलप्रद जें सुचिन्हयुक्त । कमल अभयमुद्रा वज्रलांछित । ध्वज ज्याचा त्यासी मीं ॥७॥
परशु ज्याच्या हातांत । परी जो परम कोमल चित्तांत । सुरक्तवर्ण पादांगुली असत । सुकोमल नखप्रभा युत ॥८॥
त्यांचा ताम्रवर्ण शोभत । गुल्फ उत्तम मृदुमांसल वर्तत । अंधःकार हृदयस्थित । मोह जो दूर करीतसे ॥९॥
त्याच्या रक्त जंघांचे ध्यान । सुकोमल मांसलाचें विनीतमन । करीतसे मी निरभिमान । जानूंचें त्याच्या स्मरण ध्यान ॥१०॥
जानूवरी त्याच्या विराजत । कोमल रोमराजी शोभिवंत । मांडया केळीच्या सम विराजत । आरक्त वर्ण त्या असती ॥११॥
त्यांच्या चिंतनमात्रें भक्तिप्रद । विघ्नहराच्या त्या सुखप्रद । मांडयांचें चिंतन अभयद । कटिभाग त्याचा मांसरक्त ॥१२॥
वर्तुळाकार मध्यम भाग संश्रित । गणेश्वर कटीचें चिंतन करित । सदा सुखकर तें होत । तदनंतर ध्यान वस्त्राचें ॥१३॥
कटिभागावर जें स्थित । रक्तवर्ण नाभि आवरण शोभत । परमश्रीयुत शेषसंवाकर चिंतित । भक्तिभावें मी सर्वदा ॥१४॥
महोदर जो मांसल भावयुक्त । प्रभेंनें आपुल्या विराजत । सकल प्रकाशक परम अव्यय वर्तत । त्रयी मूळ जो श्रेष्ठ ॥१५॥
श्रीवक्रतुंडाचें वक्ष विशाल । रक्तमय सुमांसल । स्तनभागीं रक्त हृदय विमल । चिंतामणीचें त्या चिंतन करी ॥१६॥
कंठ तीन रेषांकित । मांसल रक्तवर्ण तेजयुक्त । स्कंध वृषासम असत । सुकोमलांचें त्या ध्यान करी ॥१७॥
स्वानंदनाथाचे बाहू अतिसौख्यद । मांसल भासमय विशेषप्रद । हस्त रक्ततेने युत बलप्रद । हृदयांत उभय चिंतीत ॥१८॥
करांगुली वीस आकारें गोल । लाल नखें शोभती विमल । त्यांचें चिंतन करी अमल । स्वभक्तरक्षक सुभूषित जीं ॥१९॥
मुख त्या गणेशाचें शुंडायुक्त । मनीं चिंतितों त्रिनेत्रयुक्त । परम प्रकाशक सदा जो एकदंत । तीक्ष्ण दाढा जयाच्या ॥२०॥
प्रेमरसयुक्त सुखप्रद । कान त्याचे विशाल विशद । भक्तांसी निष्काम सुकामद । ह्रदयांत मीं चिंतितसे ॥२१॥
सुपासारखे कान । चंचल भाव करिती धारण । विश्वेश्वराचे जे शोभन । वेदरूप प्रख्यात ॥२२॥
त्याचे कपोल मदयुक्त । भृंगरूप मुनीश्वरांनी सुसंवृत । ब्रह्म पदार्थ जे उत्कंठित । नादयुक्त निरंतर ॥२३॥
त्याचें करी मनीं चिंतन । भाल त्याचें तेजयुक्त पावन । ढुंढिराजाचें मनों स्मरून । पूजा त्याची करीतसें ॥२४॥
भालीं चंद्रा विराजत । रक्त अष्टगंधानें ते सुचित्रित । बिंदुयुक्त तांदुळांसहित । त्यांचें चिंतन करितो मीं ॥२५॥
त्याच्या मस्तकावरी केशसंबार । विघ्ननाशक जो शूर । ब्रह्मांडमूळीं । प्रभु मस्तकाधार । कुंभस्थल ब्रह्मवराचे ॥२६॥
ऐशा गणेशदेहाचें चिंतन । भूषित जो अतिशोभन । बहुमोल भूषणें वस्त्रादि करून । ब्रह्मश्रेष्ठाचें सर्वदा ॥२७॥
सुवासिक गंधानें अनुलिप्त । भक्तवर योगिजनहस्तें सतत । निजभक्ति लालसास मी स्मरत । सदा स्थित जो मम हृदयीं ॥२८॥
पाशांकुशादींनी सुस्तुत । प्रमोदावि गणांनि नित्य सेवित । देववरांनीं सुपूजित । उंदिर वाहनाचें त्या चिंतन करी ॥२९॥
वेदपुराण स्मृतिशास्त्र स्तुत । देहधर स्तोत्रें जो शोभित । ब्रह्मप्रियादि अंसंख्य गणसेवित । त्यास चिंती मीं हृदयांत ॥३०॥
मुद्‍गलमुख्य ज्यास भजती । शोभन ज्याची रूपकांति । सिद्धिसहित गणेशास चित्तीं । हृदयांत मीं चिंतितसे ॥३१॥
सिद्धिबुद्धि आदि शाक्ति सेवित । आपल्या मायेनें जो युक्त । विविध कला विद्यांनी युक्त । गणनायका त्या स्मरतसे ॥३२॥
सर्वांग संशोभन स्वमायेनें युत । दक्षिणभागीं जी विलसत । लक्ष लाभ सेवित । त्या विघ्नवराचें मीं चिंतन करी ॥३३॥
सर्वदा ब्रह्मेश्वर भक्तजन स्तुत । स्वधामाश्रित मंत्रपूजित । ज्याचें स्वरूप वर्णनातीस । ध्यानलोलुपा त्या स्मरतसें ॥३४॥
जो सदैव ह्रदयांत स्थित । गणेश्वर ब्रह्ममाया श्रेष्ठ जगांत । ऐशा त्याचें मीं चिंतन करित । सदैव भक्तिभावानें ॥३५॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐसा ऐल तो गणेशभजनरत । ध्यान करित बैसत । आसंतोष गणेशाचें ॥३६॥
प्रातःकाळीं उठून स्त्रीसहित । धर्मयुक्त नित्य कर्म आचरित । तदनंतर गणेश्वरास पूजित । भक्तियुक्त गार्ग्यवचनानुसार ॥३७॥
शमीमंदार दूर्वांनी पूजित । पत्रांकुर फुलें अर्पित । प्रार्थना करून तोषवित । ऐसा क्रम ऐलाचा ॥३८॥
दक्ष विचारी मुद्‍गलाप्रत । शमीमंदार दूर्वा पूजन विधियुक्त । कैसें करती तें मजप्रत । सांगा आता कृपाळा ॥३९॥
कोणत्या मंत्रांच्या आधारें वाहत । शमीमंदारादी गणेशाप्रत । परेशास त्या कैसें स्तवित । तें सर्वही मज सांगा ॥४०॥
शमीमंदार दूर्वा प्रार्थना । पूजनास दयाधना । सिद्धिबुद्धि लक्ष लाभ पूजना । कोणती रीती ती सांगावी ॥४१॥
मुद्‍गल तेव्हां त्यास सांगत । महाप्राज्ञा दक्षा सांप्रत । गाणपत्यपरायणा वृत्त । ऐक मी संतुष्ट तव प्रश्नानें ॥४२॥
गणेशाच्याच मंत्रानें पूजन । शमी मंदारादारिदींचें स्तवन । गाणपत्य वस्तू अर्पून । तोषवावें हया सर्वांसी ॥४३॥
स्त्रीपुरुष भावात्मक नसत । भेद तेथ दक्षा चित्तांत । गकार सिद्धिरूप असत । णकारा बुद्धी म्हणतात ॥४४॥
त्यांचा स्वामी तो गणेश । तो त्रेधारूपधर विशेष । गणांची पूजा त्याच्या क्षितीश । करिती गाणपत्य मंत्रांनीं ॥४५॥
गकारापासून पत्र निर्माण बिंदुभाव नामक सुजाण । गकार रूपापासून । लाभ जन्मे उभय तन्मयरूप ॥४६॥
वर लाभून शमी मंदार । विशेषें जाहले गणेशाकार । त्या दोन्हीं वृक्षांचा आदर । करावा यांत संशय नसे ॥४७॥
दूर्वापूजन देवीमंत्रें । अथवा करावें गणेशमंत्रें । अन्यथा तें वैदिकमंत्रें । कांडादींचें पूजन ॥४८॥
शूद्रें नाममंत्रें पूजन । या सर्वांचें करावें शोभन । हें सर्व रह्स्य संपूर्ण । सरळ तुजला सांगितलें ॥४९॥
आतं प्रार्थनापद्धति सांगत । स्नान करोनि जावें वनांत । अथवा स्वमंदिरांत । जेथ दूर्वा मंदार असती ॥५०॥
तेथ जाऊन प्रथम वंदन करावें । तदनंतर भक्तियुक्त प्रार्थावें ॥ दूर्वे अन्नब्रह्मरूपे शंताकुरे म्हणावें । अमृतरूपे तोडितों तुला ॥५१॥
गणेशाप्रतीत्यर्थ तुज जमवित । म्हणोनि क्षमावा अपराध माझा सांप्रत । ऐसें म्हणून भक्तियुक्त । दूर्वेस वंदन करावें ॥५२॥
आता शमीची प्रार्थना । कैसी करावी उपासना । तें ऐक तूं कामना । तेंणें तुझ्या पुरतील ॥५३॥
शमी सर्वप्रदे देवी वंदन । गणेशरूपधरे करितों पूजत । तदनंतर गणेश प्रीतीस्तव संचय उत्तम । करितों येथ मीं तुझा ॥५४॥
मंदाराचा प्रार्थनामंत्र तुजप्रत । आता सांगतों विधियुक्त । मंदारा वांछित दात्या मी नमित । विघ्नेशरूपा नम्रपणें ॥५५॥
क्षमा करी मीं तुज तोडित । गणेशाच्या प्रीतीस्तव भक्त । ऐसी प्रार्थना करून पूजेत । वाहावे शमीमंदार दूर्वादिक ॥५६॥
हया गणेश प्रिय वस्तु अर्पण । सहस्त्र नाममंत्रें जपून । अष्टोत्तर शतनामें उच्चारून । अथवा एकवीस नाममंत्रें ॥५७॥
अथवा मूलमंत्रानें पूजावें । विविध गणेशमंत्रें स्वबानें । हया वस्तूंचें समर्पण करावें । दक्ष प्रजापते ऐसी रीती ॥५८॥
ऐसें हें पावन । रहस्य कथिलें तुज शोभन । गाणपत्यप्रद पूर्ण । आणखी कोणती श्रवणलालसा ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते ध्यानदूर्वादिपूजाविधिवर्णनं नाम चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP