खंड ५ - अध्याय ३४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष तेव्हां मुद्‍गला प्रार्थित । गणेशाची पूजा विस्तारसहित । विधिपूर्वक सांगा समस्त । मानस तैसी बाहयपूजा ॥१॥
सर्व सिद्धिप्रदायक पूजन । विधिपूर्वक मज सांगून । गणेशलोकाचें माहात्म्य शोभन । तेही मजसी सांगावें ॥२॥
कैसा हा गणेशलोक असत । कोणास तो लाभत । हे प्रश्न ऐकून म्हणत । मुद्‍गल तेव्हां दक्षासी ॥३॥
येथ इतिहास पुरातन । ऐक महाभागा सिद्धिप्रद महान । पूर्वी तुज केलें असे कथन । माहात्म्य गणेशस्थानाचें ॥४॥
कार्तिकेयास वर लाभत । त्यायोगें लक्ष। विनायक क्षेत्र निर्मित । तेथ राजा ऐल असत । सर्व शास्त्रांत दिशारद ॥५॥
तो धर्मशील सत्यवचन । सदा करी गणेशपूजन । विघ्नेश्वरभक्त महान । सार्वभौम सुविख्यात ॥६॥
गाणपत्यप्रिय तो असत । एकदा गार्ग्य त्यास भेटण्या येत । सर्वार्थकोविद तो वंदित । पूजन करून विचारीतसे ॥७॥
ऐल म्हणे गार्ग्याप्रत । स्वामी आपण गणराजाचे भक्त । तैसाच योगेश्वर साक्षात । गणपति आपण निःसंशय ॥८॥
मयूरेश अवतारांत । आपण मयूरेश समन्वित । तेथ राहून निरीक्षण समस्त । मयूरेशाचें केलें असे ॥९॥
धन्य आपण योगिजनांत । प्रत्यक्ष गणनायक वाटक । माझी मैत्री जोडून आलात । आनंदानें हे विशेष वाटे ॥१०॥
मयूरेशाच्या आज्ञेनें केलेत । योगिश्रेष्ठा गणेशगीतेवर भाष्य उदात्त । शांतिप्रद जें परम पुनीत । सांप्रदाय वर्धनकर ॥११॥
त्या आपुल्या भाष्यानें होत । ब्राह्मणादी गाणपत्य जगांत । ते आपुले शिष्य प्रख्यात । सर्वज्ञात महामुने ॥१२॥
जैसें गणनाथानें सांगितलें । तैसें आपण जाणिलें । यांत संदेह नसे हें जाणलें । तो नर धन्य जगांत ॥१३॥
गणेशगीता गणेश वरेण्यक । आपण तिसरे पावक । पूर्णंयोग युक्त शास्त्रांत । संमत असे हा विचार ॥१४॥
धन्य मी तुमचे पादपंकज पाहिलें । धन्य तेणें विद्याव्रतादि झाले । तप दानकुळही शोभलें । मातापिता धन्य माझे ॥१५॥
आपुल्या चरणाचें झालें दर्शन । धन्य माझें यश राज्य सन्मान । अल्प पुण्य असतां दर्शन । योगिश्रेष्ठांचें होत नसे ॥१६॥
आतां गाणपत्य संप्रदायांत । आंतर्बाहय पूजाविधि मजप्रत । सांगून करावें उपकृत । महायोगी गार्ग्य तैं म्हणे ॥१७॥
येथ इतिहास पुरातन । गृत्समदाचें चरित्र प्रसन्न । वाचक्नव नाम तपोधन । मुनि होता परमार्थ वेता ॥१८॥
त्याची पत्नी मुकुंदा रूपसंपन्न । यौवनशालिनी आकर्षक भावन । वनांत राहती पतीपत्नी एकमन । पुढें एकदा काय घडलें ॥१९॥
रुक्मांगद नृप मृगयासक्त । आला त्यांच्या आश्रमांत । वाचक्न व त्याचा सत्कार करित । धर्मकार्यार्थ नंतर दूर गेला ॥२०॥
क्षुधा तृषार्त रुक्मांगद प्रवेशत । वाचक्नवाच्या उटजांत । त्याचा सारथी वनांत । चुकामूक होऊन हरवला ॥२१॥
म्हणोनि एकाकी नृपति । घरांत मुनिपत्नी ती होती । मुनि दूर जाता म्हणे मजप्रति । पाणी देई प्यावया ॥२२॥
माते मुकुंदे माध्यान्हीं श्रांत । मी जाहलीं बहु तृषार्त । त्याचें वचन ऐकून येत । मुकुंदा उटजाबाहेर ॥२३॥
नृपवरासी ती पहात । प्रथमदर्शनीं काममोहित । कामबाणें ती संपीडित । विव्हल फार जाहली ॥२४॥
मुकुंदा म्हणे रुक्मांगदाप्रत । तुजसम पुरुष जगांत । पाहिला नाहीं मीं त्रैलौक्यांत । वाटसी सुंदर सर्वोंत्कृष्ट ॥२५॥
तरी आता करी स्वीकार । माझा हे विजन कांतार । पति गेला असे दूर । चिंता कसली करूं नको ॥२६॥
आपण उभयता रममाण । होऊया मी तुझी तहान । भागवीन न केवळ जळ देऊन ॥ रतिसुखही घे माझें ॥२७॥
जरी माझा स्वीकार । तूं न करशील सत्वर । प्राण माझे सोडून शरीर । कामबाणार्त जातील ॥२८॥
ऐसें बोलून अकस्मात । त्याच्या ओठांचें चुंबन घेत । तो प्रकार अनपेक्षित । बलात्कार तो नृपावरी ॥२९॥
त्यायोगें तो अतिशय संतप्त । मुकुंदेला दूर लोटित । व्यभिचारोत्सुक्त । बोलला हितकर वचन ऐसें ॥३०॥
सर्वांचे गुरु ब्राह्मण असती । देवि यांत संशय ना चित्तीं । आम्ही पुत्रतुल्या समस्त तुम्हांप्रती । पाप ऐसें चिन्तूं नको ॥३१॥
जे विघ्नेश्वराचे भक्त । त्याच्या पूजनीं आसक्त । ते परस्त्रीस पाहून कामार्त । कधी न होती जगांत ॥३२॥
त्यांचें मन न चळत । परस्त्रीस माता ते मानित । तेव्हां आवरी आपुलें चित्त । ऐसी निर्भर्त्सना केली ॥३३॥
तदनंतर शोकसंतप्त । राजा तेथून निघून जात । तेव्हां मुकंदा कामार्त । त्यास शाप देती झाली ॥३४॥
अरे नृपा तूं सौंदर्यमत्त । कुष्ठी होशील त्वरित । महादुष्टा मी काममोहित । त्यागूनी कैसा जातोसी ॥३५॥
मी तुझ्यावर भाळलें । दुर्मती तूं मज ज्यागिलें । ऐसें तूं कठिण कर्म केलें । भोग आता त्याचें फळ ॥३६॥
तिच्या शापानें जाहला । श्वेतकुष्ठी नृप त्या वेळां । वनांत जाऊन स्मरूं लागला । द्विरदानन गजाननासी ॥३७॥
तदनंतर महायोगी नारद येत । रात्रीं त्या जागीं वनांत । त्यास पाहून प्रणास करित । रुक्मांगद विनयानें ॥३८॥
गाणपत्यप्रिया मजप्रत । कुष्ठनाशकर तीर्थ सांगा त्वरित । अनेक औषधी गुणयुक्त । सर्वधर्मज्ञा तें सांगावें ॥३९॥
नारद म्हणे तयाप्रत । इंद्रें तपाचरणें देव एकदन्त । पूजिला होता पूर्वीं एकचित्त । सहस्त्र भगांच्या नाशार्थ ॥४०॥
त्यास वरदान लाभत । तो सहस्त्रनयन होत । तेजःपुंज पुनः होत । गणेशयोग साधिला त्यानें ॥४१॥
जेथ इंद्रें साधन केलें । मनोभावें तप आचरिलें । तें क्षेत्र ख्यात झालें । चिंतामणि गणेशाचें ॥४२॥
गणेशपदानें लांछित । तें क्षेत्र उत्तम पुनीत । तेथ जें तीर्थ असत । त्यांत स्नान करावें तूं ॥४३॥
स्नान करितां क्षणांत । कुष्ठहीन होशीन निश्चित । सुवर्णासम कांति तेजयुक्त । पुनपरपि तुझी होईल ॥४४॥
नृपा तेथ तीर्थर्पभावानें होत । लोक कुष्ठरोगमुक्त । स्वानंदलोकाप्रत जात । यांत संशय कांहीं नसे ॥४५॥
ऐसें सांगून नृपाप्रत । नारद तेथून निघून जात । महायोगी तो घोष करित । जय गजानन श्री गजानन ॥४६॥
नंतर तो नृपति होत । हर्षयुक्त स्वचित्तांत । प्रातःकाळीं त्यास भेटत । सेना त्या थोर राजास ॥४७॥
सेना घेऊन तेथून जात । नृप त्या विदर्भांतील क्षेत्रांत । चिंतामणिभव जें पुनीत । स्नान करी नृप तयांत ॥४८॥
तेव्हां झाला कुष्ठहीन । सर्वांचें आनंदलें मन । पूजिला चिंतामणि प्रसन्न । विधियुक्त तैं सर्वांनी ॥४९॥
यथान्याय पूजून । बहु दिलें याचकांसी दान । बैसला होता सुखासीन । राजा तेथील मंडपांत ॥५०॥
गणेशाच्या भक्तींत निमग्न । तैं अवचित एक विमान । उतरलें तेथ आकाशांतून । गणेशदूत बाहेर आले ॥५१॥
ते नृपासमीप जाती । तयासी आदरानें म्हणती । सैन्यासहित मुदितमति । विमानांत चढावें नृपाळा ॥५२॥
स्वानंदलोकांत चलावें । गणेशाचें वचन मानावें । तीर्थस्नान प्रभावें । हा बहुमान आपणां लाभला ॥५३॥
तेव्हां होऊन अति हर्षित । रुक्मांगद त्या दूतांस वंदित । पूजन करून त्यांस म्हणत । गाणपत्य तो राजकुमार ॥५४॥
मी रुक्मांगद नृपकुमार । भीम माझा जनक स्नेहपर । चारुहासिनी माता उदार । त्यांस सोडून कैसा येऊं ॥५५॥
इतुक्या त्वरेनें विघ्नेशाप्रत । कैसा येऊं मी अवचित । तैं गणेशदूत सांगत । त्यांनाही आणा या क्षेत्रीं ॥५६॥
ती तुझी मातापिता । या तीर्थांत स्नान करितां । होतील अधिकारी तत्त्वतां । तुझ्यासह तेथ येण्यास ॥५७॥
तरी त्यांनाही नेऊं विमानांत । चिंता करू नको मनांत । स्नानमात्रें येथ लाभत । स्वानंदलोकप्राप्ति जगीं ॥५८॥
राजा तैं मनीं आनंदून । करी एक उपाय शोभन । दोन दर्भ हातीं धरून । मातापित्यांचें स्मरण करी ॥५९॥
त्यांचा नामोच्चार करून । गाठी घातिल्या स्मरून । तदनंतर करी स्नान । यथाविधि त्या तीर्थांत ॥६०॥
तदनंतर एक आश्चयं घडत । त्याचे मातापिता तेथ येत । दिव्य महिमा तीर्थजलांत । सर्व नगरलोकही स्नान करिती ॥६१॥
तदनंतर ते विमानांत । बैसून कौंडिण्यापुरीं जात । तेथ पुण्य देऊन सर्वांप्रत । स्वानंदलोकीं नृप गेला ॥६२॥
ऐशापरी तीर्थप्रभावें नगर जन । विघ्नेश्वराचें होऊन दर्शन । ब्रह्मभूत झाले मुदितमन । धर्मयुक्त तो रुक्मांगद ॥६३॥
ऐशापरी तो रुक्मांगद । निर्विघ्न झाला तीर्थ सुखद । जरी फसला होता दुःखद । मुनिपत्नीच्या शापांत ॥६४॥
जे नराधम छळती । गणेशभक्तांसी दुष्टमती । ते दारुण दुःख भोगती । मुकुंदेचें वृत्त ऐका ॥६५॥
पुढें तिची काय झाली गति । तें ऐक आतां तुजप्रती । सांगेन मी स्मरून चित्तीं । सावधान गणेशासी ॥६६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते रुक्मांगदचरितं नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP