खंड ५ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ गार्ग्यमुनि सांगती नृपाप्रत । मुकुंदेचा पुढील वृत्तान्त । ती पडली होती कामार्त । आश्रमांत भूमीवरी ॥१॥
तिज कांहीं सुखद न वाटत । रुक्मांगद आठवे सतत । त्याचें रूप मनीं स्मरत । अति शोकसंयुक्त जाहली ॥२॥
तैशा त्यावस्थेंत । निद्रा आली मुकुंदेप्रत । इंद्र रुक्मांगद रूप घेत । त्वरित तेथें जाता झाला ॥३॥
तिची कामशांति करण्यास । देवनायक उत्सुक खास । उठवून तियेस । म्हणे प्रिये मी परतून आलो ॥४॥
मी तुझा अव्हेर केला । त्याचा पश्चात्ताप झाला । आतां पुरवीन मनोरथाला । संपूर्ण तुझिया मुकुंदे ॥५॥
तूं कामार्त कामिनी । मागसी रतिसुख म्हणोनी । यांत दोष न मानुनी । विचार करूनी परतलों मीं ॥६॥
तरी आतां जागी होऊन । वस्त्र टाकी सोडून । पुरव आपुले मनोरथ प्रसन्न । करून घे कामपूर्ती ॥७॥
मुकुंदा तें ऐकत । तैं जाहली आश्चर्यचकित । वेळ न घालवी हर्षित । दिलें निर्भर आलिंगन ॥८॥
रुक्मांगद रूपी इंद्र भोगित । मुकुंदेसी मनसोक्त । त्या संभोगानें होऊन तृप्त । गर्भंधारणा जाहली ॥९॥
ती परतली स्वगृहांत । इंद्रही गेला स्वर्गांत । मुकुंदेचें रतिसुख निवांत । उपभोगून चातुर्ये ॥१०॥
तदनंतर वाचक्नवि मुनि प्रतत । नित्याक्रिया आटपून आश्रमांत । मुकुंदेचा व्यभिचार न जाणत । तपश्चर्यामग्न तो ॥११॥
तदनंतर बहुत दिवस जात । पूर्ण भरतां दिवस जन्म देत । मुकुंदा एका सुतास पुनीत । वाचक्नवि तैं आनंदला ॥१२॥
जातकर्मादिक समस्त । संस्कार पुत्राचे करित । गुत्समद ऐसें नांव ठेवित । सुखप्रद तयासी ॥१३॥
पांच वर्षांचा बाळ होत । तैं व्रतबंध त्याचा करित । वाचक्नवि हर्षयुक्त । पुत्रप्राप्तीनें सुखावला ॥१४॥
मुकुंदेस वाटे हा नृपसुत । तिज नव्हतें सत्य ज्ञात । रुक्मांगदातें ति स्मरत । गृत्समदासी पाहतां ॥१५॥
वाचक्नवि शिकवी वेदाभ्यास । पुढें आपुल्या पुत्रास । गणानां त्वा हा मंत्र देत । ऋग्वेदांतील थोर तया ॥१६॥
त्या मंत्रोच्चारें ध्यात । गृत्समद विघ्नेशास सतत । जप करी तो नियमित । भावभक्तीनें तोषवी तया ॥१७॥
एकदा मगध राजा बोलावित । आपुल्या पित्याच्या श्रीद्धांत । वशिष्ठमुख्यादि मुनि येत । य्होगपारंगत त्या जागीं ॥१८॥
ते येतां सभेंत । त्यांसी पूजी नृप गणेशभक्त । गृत्समद तेव्हां शास्त्रार्थ करित । अयोगी असून योगज्ञानी ॥१९॥
तो ऐकून अत्रि ऋषि म्हण्त । तूं अयोगी योग्यांत । रुक्मांगदराजाचा सुत । पंक्तिपावन कैसा तूं ? ॥२०॥
आतां वादविवाद न घालतां । आपुल्या आश्रमीं जाई पतिता । तें ऐकतां कोप चित्ता । आला अनावर गृत्समदाच्या ॥२१॥
तो जाणण्या सत्य वृत्तान्त । आपुल्या आश्रमीं परतला त्वरित । आरक्तनयन । जननीप्रत । क्रोधें विचारता झाला तैं ॥२२॥
सांग माते कोण माझा तात । समस्त सत्य जन्म वृत्तान्त । निर्लज्जे कामुके त्वरित । रुक्मांगदसुत मीं असे का ? ॥२३॥
वाचक्नवि माझा तात । ऐसें मी आजवरी होतों समजत । परी अत्रि ऋषि म्हणाले सभेंत । रुक्मांगद पिता माझा ॥२४॥
सांग सत्य तूं मजप्रती । अन्यथा शापीन सांप्रति । शापभयें मुकुंदा तयाप्रती । थराथरा कांपत सांगतसे ॥२५॥
बाळा अत्री म्हणती तें सत्यवचन । पूर्वी मोहयुक्त होऊन । रुक्मांगदाशीं मीं मदनमग्न । विहार केला कामार्तपणें ॥२६॥
त्या संभोगानेम तूं जन्मलास । परी न कळले तुझ्या पित्यास । मीही धरिलें होते मौन खास । अपकीर्ति तुझी वाचविण्यां ॥२७॥
तो ऐकून सर्व वृत्तान्त । मातेसी सुत शाप देत । काटेरी बोरवृक्ष होऊन जगांत । भोग पापफळ तूं दुष्टे ॥२८॥
तुझी अति तुरट पळें न कातील । कोणी मानव जगांतील । अरण्यांत तुज निंदतील । पूर्वपापाचें फळ भोग ॥२९॥
तेव्हां ती मुकुंदा क्रोधें संतप्त । शाप देई स्वपुत्रा त्वरित । तुझा पुत्र होईल महादैत्य जगांत । अति दारुण रे कुपुत्रा ॥३०॥
तदनंतर झाला मुकुंदेचा देहान्त । काटेरी वृक्ष ती होत । श्याम नामक बोरीण ख्यात । पापकर्मपरायणा ॥३१॥
गणेशभक्तांस पीडा दिली । तेणें पापिणी ती झाली । त्या पापें तिज लाभली । शापदग्ध विकलावस्था ॥३२॥
प्रत्येक कल्पांत शापें जन्मत । ती सदैव वृक्षयोनींत । गणेशभक्तास विघ्न करित । त्याचें फळ महाभयंकर ॥३३॥
गृत्समद स्वतःस क्षत्रियसुत । मानून देहत्यागार्थ उद्युक्त । तेव्हां आकाशवाणी होत । अति अद्‍भुत ती घटना ॥३४॥
गृत्समदा करूं नको प्राणत्याग । जीवनाचा धरूं नको उबग । इंद्रानें रुक्मांगद होऊन सुभग । जननी तुझी उपभोगिली ॥३५॥
त्या समयीं इंद्रविर्यें राह्त । गर्भ जो तव मातेच्या उदरांत । त्या गर्भांतून जन्मत । तोअ पुत्र तूं गृत्समदा ॥३६॥
आतां तूं न करी चिन्ता । लंभोदरा भजतां तव चित्ता । सौख्यप्राप्ति होईल तत्त्वतां । देववाणी ही असे ॥३७॥
ती आकाशवाणी ऐकून । गृत्समद करी तप महान । निराहार उपवास करून । गणेशभजनीं मग्न झाला ॥३८॥
ब्रह्मणस्पतिसूक्ताने स्तवित । ब्राह्मणत्व लाभण्य़ा पुनीत । जप केला त्यानें अविरत । ऐल विचारी तदनंतर ॥३९॥
ब्रह्मणस्पतिसूक्ताचें मंडळ । कैसे असे त्याचें फळ । तें विधानपूर्वक निर्मल । दयानिधे सर्वज्ञा मज सांगा ॥४०॥
ज्या सूक्तांनी विघ्नेश्वर । सर्वार्थदायक उदार । प्रसन्न होवोनि देतो वर । त्या सूक्त पठनांचा विधि सांगा ॥४१॥
गार्ग्य सांगती ऐलाप्रत । ऐक महामते परंपरागत । ब्रह्मणस्पति सूक्त विधि पुनीत । गृत्समदा जेणें सिद्धि लाभे ॥४२॥
गणानां त्वा या मंत्रानें करिती । न्यास सोळा अंगावरी जगतीं । पूजन करून भावभक्ति । अभिषेक नंतर करावा ॥४३॥
एकवीस वेळा सूक्त म्हणतां । एक आवृत्ति होत तत्त्वतां । ऐश्या एकवीस वेळां जपतां । एक मंडल होत असे ॥४४॥
एकवीस मंडलें म्हणत । तैं महामंडळ एक होत । अभिषेक विधींत प्रशंसित । सर्व सिद्धिप्रद राजसत्तमा ॥४५॥
धर्मा अर्थ काम मोक्ष लाभ होत । जो हे जपे ब्रह्मणस्पतिसूक्त । गणेश प्रीतिकर  पुनीत । ब्रह्मभूतकर भक्तासी ॥४६॥
गृत्समदें ब्राह्मणत्व होण्या प्राप्त । जपलें महामंडळ प्रमाणयुक्त । त्यायोगें तो ईप्सित लाभत । ऐसें हें गृत्समदकथानक सूक्त ॥४७॥
हें कथानक दुरितापह । गृत्समदाचें सुखावह । गणानां त्वा मंत्रें प्रत्यह । पूजिलें गृत्समदें विनायकासी ॥४८॥
एकवीस वेळां सूक्त पठन । नित्य करी तो एकमन । अभिषेकार्थ प्रसन्न । तदनंतर जप करीतसे ॥४९॥
एकवीस शत जप करित । गणानां त्वा मंत्राचा एकचित्त । प्रतिदिनीं गृत्समद तो भक्त । विधिपूर्वक भावबळें ॥५०॥
नासाग्रीं दृष्टि लावून । सदा करी तो ध्यान । महा उग्र तप आचरून । तोषविलें त्यानें विघ्नपासी ॥५१॥
ऐसी सहस्त्र दिव्य वर्षें उपासना करित । तेव्हां विघ्नेश्वर प्रसन्न होत भक्तवात्सल्यें प्रकटत । ध्यानस्थित त्या गृत्समदापुढे ॥५२॥
गृत्समदास त्या म्हणत । मुनि शार्दूला पहा पुढयांत । ब्रह्मणस्पति मी साक्षात । आलों असे वर द्यावया ॥५३॥
वर माग मनोवांछित । देईन मी ते तुजप्रत । तें वचन ऐकून हर्षित । गृत्समदें डोळे उघडिले ॥५४॥
निकट होता ढुंढि स्थित । त्यास प्रणाम करून पूजित । भक्तीनें त्याची स्तुति करित । लोचनीं दाटले आनंदाश्रू ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गृत्समदगणेशसमागमो नाम पंचवित्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP