खंड ५ - अध्याय ३७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ऐल विचारी गार्ग्याप्रत । गृत्समद महायोगी पूजित । द्विविध प्रकारें तो भक्त । कैसें तें सविस्तर मज सांगा ॥१॥
स्वसूक्ताचा रचयिता । ऋषि गृत्समद जो वेदवेत्ता । गणेश त्यास विप्रत्व देतां । धन्य जाहला ब्राह्मणांत ॥२॥
गार्ग्य तेव्हां ऐलास सांगत । ऐक मुनींद्राचें त्या चरित । कैशा रीती गजाननास पूजित । आदरें सतत भक्तीनें तो ॥३॥
प्रातःकाळीं उठून । गुरूस करूनिया नमन । मानसपूजेनें पुजून । हृदयांत गणेश्वरासी ॥४॥
विभूति रूपधारक जे असत । गाणेश त्यांस तो स्मरत । धरणीची क्षमा मागून ठेवित । पाय नंतर तो भूवरी ॥५॥
शौचादि आचार शास्त्रसंमत । विधिपूर्वक तो करी नियत । दन्तमार्जन करून आचरित । स्नान विधि यथायोग्य ॥६॥
प्रथम अभ्यंतरस्नान करित । अज्ञानमलाचा जें नाश करित । सांगेन तें सिद्धिद तुजप्रत । सुखदायक सकलांसी ॥७॥
सहस्त्रारांत समासीन । अनामन जो गजानन । अंगुष्ठपर्वमात्र प्रमाण । चतुर्भुज त्या प्रभूस ध्यावें ॥८॥
पाश अंकुशधर पूर्ण । दंत अभय युक्तादि संपूर्ण । त्रिनेत्रयुक्त मनोहर भूषण । अनर्घ्यवस्त्रें अलंकृत ॥९॥
पादांगुष्ठाग्रावर स्थित । त्याची तीर्थमयी नदी स्मरत । पूर्णत्व जी पसरवित । आसमंतात सर्वकाळ ॥१०॥
सर्व अंतर्गत जें अज्ञान । मलरूप वसे न्यून । त्या पूर्ण नदीजलें क्षालन । करावें सदा बुद्धिमंतें ॥११॥
तीच सर्वगया मानित । ऐसें अंतरंग स्नान आचरित । तो नरोत्तम भवमलमुक्त । लाभेल परम भुक्तिमुक्ति ॥१२॥
बाह्म स्नान तदनंतर । वैदिक तांत्रिक करी विप्र । स्वशास्त्रोक्त विधानें शुभकर । वैदिक स्नान करावें ॥१३॥
तदनंतर स्वमूलमंत्रानें युक्त । तांत्रिक स्नान तो आचरित । त्यायोगें सर्वकर्महि उचित । होतसे तो देवतासम ॥१४॥
ऐसें तो गृत्समद आचरित । महामुनि तो भक्तियुक्त । गणेशप्रीति लाभ इच्छित । विधिपूर्वक वागतसे ॥१५॥
तदनंतर वैदिकी संध्या करी । शुचिर्भूत वस्त्रधारी । ती केल्यानंतर आचरी । आगमसंभूत गाणेशी ॥१६॥
तेथ आचमन तीनदा करित । वैदिक तांत्रिक पुराणोक्त । ब्याहृतीने वैदिक उक्त । मूलमंत्रें तांत्रिक ॥१७॥
पौराणिक तें चतुर्थ्यन्त । गणेशनामें संयुक्त । गणेशाय नमः हत्यादि म्हणत । पौराणिक संध्यावंदन । तें ॥१८॥
तेंच महात्तर शुचिकर । तुज सांगेन सुखसिद्धिकर । जैसें गृत्समद विप्रेंद्र । महायश तो करीतसे ॥१९॥
एकवीस नावें संध्येत । प्रथम तो जीं उच्चारित । त्यांचा क्रम तुज सांगत । ऐला ऐक सावधान ॥२०॥
गणेश ढुंढिराज होरंब नाम । वक्रतुंडक शूर्पकर्ण तें शोभन । विघ्नेश चिंतामणि गजानन । लंबोदर तैसा एकदंत ॥२१॥
ब्रह्मणस्पति विनायक । ज्येष्ठराज विकट कथित । एक धरणीधर आशापूरकख्यात । महोवर तैसा धूम्रकेतू ॥२२॥
मयूरेश स्वानंदवास कारक । तीन नामांनी आचमावें उदक । दोन नावांनी उदक । हस्तसंक्षालनार्थ सोडावें ॥२३॥
दोन नामें उच्चारून । ओठांस करावा स्पर्श पावन । एक नाम म्हणून । संपुटासी स्पर्शांवें ॥२४॥
एक नामें पाय शिर । चिबुक स्पर्शावें पवित्र । दोन नावांनीं नासिका रंध्र । उजवें डावें स्पर्शावें ॥२५॥
दोन नांवांनी नेत्रस्पर्श । स्पर्शावे कान नाभि आदिकांस । एका नामें ह्रदयास । ललाटास एकचि नामें ॥२६॥
एका नामोच्चारें बाहूंस । स्पर्श करावा सरस । ऐश्या हया सर्व विधीस । गणेशभक्तें करावें ॥२७॥
जलयुक्त नामोच्चार सहित । नर जो आचमन करित । तो या भूमिमंडळांत । साक्षात्‍ गणेश होईल ॥२८॥
तदनंतर न्यासादिक करावे । कलश स्थापन तदनंतर बरवें । पीठ पूजनोत्तर आचरावे । मंत्रन्यास सर्वही ॥२९॥
देवतुल्य असूनही करित । आगमोक्त मार्गें संपूर्ण विधिवत । गजाननासी घ्याऊन मनांत । मानसपूजा तो करी ॥३०॥
गणेशाचें विधान जाणत । स्थिरचित्तें त्यात पूजित । स्थिर चित्त हें मानसपूजेंत । प्रधान कारण ख्यात असे ॥३१॥
तेथ वर्णाश्रम भेद नसत । वर्णाश्रमयुक्त नरांस संमत । तैसीच मानसपूजा अन्यांप्रत । अवर्णाश्रमरूपी जे ॥३२॥
जो जो असेल स्थिरचित्त । त्याचा अधिकार शास्त्रसंमत । मानसी पूजा करण्यात । संधि समान सर्वांना ॥३३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गृत्समदनित्यकर्मवर्णनं नाम सप्तत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP