खंड ५ - अध्याय ३६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । गृत्समद स्तुतिस्तोत्र गाऊं लागला । विघ्नराज तैं तोषला । नमन ब्रह्मरूपी देवाला नाथा ब्रह्मणस्पते तुला ॥१॥
गणेशासी ज्येष्ठराजासी । ज्येष्ठपद-प्रदात्यासी । ज्येष्ठांतील ज्येष्ठरूपासी । सर्व पूज्यास तुज नमन ॥२॥
कर्त्यांच्या कर्त्यांच्या कर्तृरूपासी । कवीसी  कविनायकासी । कर्यांसी कर्तूदात्यासी । कविराजास तुज नमन ॥३॥
जगांत अथवा ब्रह्मांत । नाना भोगकराप्रत । प्राज्ञा ब्रह्मभोक्त्या तुजप्रत । नमन असो पुनः पुनः ॥४॥
सदा मोहयुता मोहकर्त्यासी । जीवासी बृहन्नाथासी । बृहस्पतीसी ब्रह्मसुखस्थासी । परमात्मस्वरूपा तुज नमन ॥५॥
गृहाहितासी । सांख्यासी । बृहस्पतिमित्रा तुजसी । स्वसंवेद्यमयासी स्वानंदासी । योगधारका तुज नमन ॥६॥
जीवब्रह्मांच्या संयोगासी । सत्यासी अयोगरूपासी । मनोवाणीविवर्जितासी । भद्रांच्या भद्रांच्या भद्रकासी नमन ॥७॥
सत्यसत्यासी सर्वपोषकासी । सोमासी अमृतरूपीसी । सोमास सोमदात्यासी । पुष्टिनाथा तुज नमन ॥८॥
सृष्टिकर्त्यासी पालकासी । हरासी त्रयीमयासी । तूर्यासी तूर्यासी तूर्यातीतासी । इंद्रादिदेवसाहय्यकरा नमन ॥९॥
धर्मपालकभावासी । धर्मांधीशासी राज्यराजासी । सर्वांस राज्यदात्यासी । परेशासी तुज नमन ॥१०॥
अराज्यासी संसारार्णव तारकासी । योगदात्यासी योगयोगासी । शांतिदासी सदा शांतिस्थासी । तत्पतीस नमन असो ॥११॥
ऐसें भेद बहुत वेदांत । ब्रह्मयाचें असती ख्यात । त्या सर्वांच्या स्वामिरूपा तुजप्रत । ब्रहयासी माझें नमन असो ॥१२॥
ब्रह्मणस्पते तुझी स्तुति । गणनाथा करण्या मन्मति । असमर्थ असे म्हणोनि मजवरती । कृपा करी प्रसन्न हो ॥१३॥
ऐशी स्तुति करून नाचत । गृत्समद प्रेमविव्हल मंदिरात । हर्षोत्फुल्ल नयन तो भक्त । त्यास पाहून गणराज म्हणती ॥१४॥
घनगंभीर स्वरें ते म्हणत । तुझ्या या स्तोत्रानें मी तोषित । आतां वर माग इच्छित । देईन मीं तो तुज निश्चयें ॥१५॥
तूं रचिलेलें स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद इहपरत्र । होईल यांत संवेह नसत । भक्तिवर्धक हें स्तोत्र ॥१६॥
सर्वदा शांतिमय होऊन । तू भजशील मातें प्रसन्न । या स्तोत्र रचनेनें सुमन । ब्रह्म भूत तूं होशील ॥१७॥
पुत्रपौत्रादिक धनधान्यादी । पठनें वाचनें सुहृतादी । सर्व लाभून शांतियोगादी । धन्य होईल तव जीवन ॥१८॥
गणराजाचें हें वचन ऐकून । गृत्समद झाला सावधान । हर्ष उत्कट आवरून । प्रणाम करी गजाननासी ॥१९॥
अडखळत बोले वचन । गणेशासी भक्तिनम्र होऊन । भक्त राजेश्वर तो प्रसन्न । धन्य माझे मातापिता ॥२०॥
धन्य माझें तपजम्न । विद्या व्रतादिक अनुपम । तुझ्या अंघ्रयुगाचें दर्शन । मनोरम जाहले आज बहुपुण्यें ॥२१॥
अहो गणेशान साक्षात । ब्रह्मेंद्र आज दृष्टिपथांत । मनोवाणीविहीन असत । परी प्रकटला मद्‍भाग्यें ॥२२॥
ऐशा तुज गणेशास पाहत । अन्य काय इच्छा मन उरेल चित्तांत । तथापि तुलाच मी वांछित । तुझ्या आज्ञेचें पालन करण्या ॥२३॥
ब्राह्मणांस म्हणती ब्रह्मभूत । म्हणोनि मज ब्राह्मण करी जगांत । योगींद्रा वंदनीय जनांत । ब्रह्मांचा नाथ तूं अससी ॥२४॥
तैसा मी ब्रह्मभूतांचा नाथ व्हावें । विघ्नेशा गुरूंचा गुरू भावें । योगींद्राच्या शिरीं विलसावें । ऐसें करी दयाघना ॥२५॥
तुझ्या पादपद्यावरी । माझी दृढ भक्ति स्थापन करी । गाणपत्यांचा संग भूवरी । देई मज सर्वदा ॥२६॥
गाणपत्यांत विख्यात । करी मजला तूं बळवंत । गृत्समदासम गाणपत्य जगांत । कोणी नसे ऐसें करी ॥२७॥
ऐसें प्रार्थून गणेशास नमित । महामुनि तो विनययुक्त । त्यास गणेश सांगत । महान भक्ति पाहून त्याची ॥२८॥
गणानां त्वा य मंत्राचा जप केलास । सूक्तही तूं म्हटलेश । म्हणून प्रमुख पदास । त्या संबंधी तूं मिळवशील ॥२९॥
गणानांत्वा या मंत्राचा द्रष्टा । ब्रह्मणस्पति सूक्ताचा कर्ता । ब्राह्मणेंद्र तूं वेदवेत्ता । होशील विशेषें गृत्समदा ॥३०॥
यज्ञांतील ऋषि स्मरणांत । अग्रणी तूं होशील मान्यवंत । तदनंतर मम देवतेचा मुख्य अधिकृत । होशील तुजसम न कोणी ॥३१॥
माझ्या भक्तांत तुझ्यासम । कोणी नसे अनुपम । अत्रि मुख्यादि विप्र मनोरम । करतील सन्मान तुझा विप्रा ॥३२॥
गणानां त्वा या मंत्राचा जप करिती । परी तुझें जर स्मरण न ठेविती । तर त्यांचा जप फलहीन जगतीं । होईल हे सुनिश्चित ॥३३॥
शिव विष्णु आदिदेवांसी । ब्राह्मण नर शेषादि असुरांसी । वंदनीय तूं सदा होसी ऐसा । वर मी देत असे ॥३४॥
तुझी अवज्ञा जरी होईल । तरी क्रुद्ध होऊन धरातल । चराचर मी जाळीन चंचल । तुझिया ह्रदयीं राहीन ॥३५॥
भक्तिलोलुप नित्य राहीन । तुझें चित्त माझें निवासस्थान । तूं जेथें तप केले महान । तें क्षेत्र प्रख्यात होईल ॥३६॥
तें मज पुष्पकासमान । भुक्तिमुक्तिप्रद पावन । भक्ति वाढवील प्रसन्न । पुष्पक नाम म्हणोनि त्याचें ॥३७॥
जें जें प्राज्ञा वांछिशी । तें तें लाभेल तुजसी । स्मरणमात्रें महाकार्यांत तुजसी । प्रत्यक्ष होऊन साहाय्य करीन ॥३८॥
ऐसें बोलून अंतर्धान । ब्रह्मणस्पति पावला हृष्टमन । गुत्समद तैं खिन्नमन । तेथेंचि राहिला भक्तिभावें ॥३९॥
त्यानें ब्राह्मणाच्या साहाय्यें स्थापिलें । ब्रह्मणस्पति नामक क्षेत्रभलें । गृत्समदाचें नाव सर्वमान्य झालें । ब्राह्मण महायोगी म्हणूनी ॥४०॥
ब्रह्मणस्पतीचा तो भक्त । जाहला सर्वत्र प्रख्यात । ब्राह्मणवर्य त्यास पूजित । गणेशाच्या कृपाप्रसादें ॥४१॥
जैसे गजाननें सांगितेलें । तैसें च सारें जाहलें । मुनीनें नित्य व्रत पाळिलें । विनायकाच्या पूजेचें ॥४२॥
नियमित बाह्मपूजा करित ।  मानस पूजाही न विस्मरत । गुत्समद गणेशाचा श्रेष्ठ भक्त । ऐसी ख्याति सर्वत्र ॥४३॥
ऐसें हें गृत्समदाचें आख्यान । कथिलें तुज सर्वसिद्धि पावन । सर्वपापहारक पुण्यकर प्रसन्न । वाचकां श्रोत्यां जनांसी ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गुत्समदवरप्रदानं नाम षट्‍त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP