खंड ५ - अध्याय ३९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ऐल म्हणे गार्ग्याप्रत । गृप्समद जो बाहय पूजा करित । त्याची सांगावी मज पद्धत । त्यामार्गें मी भजेन ॥१॥
गार्ग्य म्हणे तयाप्रत । उत्ताम विचारणा ही तुझी वाटत । मानसीपूजा करून विधिवत । गृत्समद करी बाह्म पूजा ॥२॥
हृदयांत व्याऊन । गजानन । परिवारादि सहित प्रसन्न । नासिका रंध्रमार्गें प्राणायाम करून । बाहयांग पूजा तो आरंभितसे ॥३॥
आधीं गणानां त्वा आदि वैदिक मंत्र । पठन करून तो पवित्र । विघ्नपासी पूजी सर्वत्र । समबुद्धी ठेवून ॥४॥
गृत्समद करी गणेशस्तवन । म्हणे चतुर्बाहुधराचें चिंतन । त्रिनेत्रधर गजास्य रक्तवर्ण प्रसन्न । मायायुक्त मीं चिंतीतसे ॥५॥
पाशांकुशादि संयुक्त । ऐसा जो ब्रह्मनाथ सुरासुर अर्चित । सिद्धिबुद्धयादि संयुक्त । भक्तिग्रहण लालस येथ येवो ॥६॥
प्रभो तुझें आगमन । होतां झालों मीं कृतार्थ प्रसन्न । विघ्नेशाचा अनुग्रह लाभून । सफल माझा जन्म होवो ॥७॥
गणनायका रत्नसिंहासन । स्वामी स्वीकारावें आनंदून । तेथ विघ्नेशा बसून । रक्षन करी स्वभक्तांचें ॥८॥
शीतोष्ण सुवासित जल । त्यानें पादप्रक्षालन करी मीं विमल । हें पाद्य उत्तम अमल । गणनायका स्वीकारी ॥९॥
सर्व तीर्थांचें सुवासित नीर । आचमनार्थ अर्पिलें तुज मीं सुखकर । त्यानें हेरंबा आचमन कर । तदनंतर अर्घ्य स्वीकारी ॥१०॥
रत्न प्रवाळ मुक्तादींनी संस्कृत । अर्घ्य देई देवा तुजप्रत । त्याचा स्वीकार करी भावयुक्त । मधुपर्क त्यानंतर घ्यावा ॥११॥
दही मध तूपयुक्त । दूध साखर ज्यांत अर्पित । ऐसा मधुपर्क भावदत्त । स्वीकारी तुज नमन असो ॥१२॥
पाद्य मधुपर्क स्नान । वस्त्रोपधारण यज्ञोपवीतप्रदान । भोजनांती आचमन । पुनरपि करी गजानना ॥१३॥
चंपकादि पुष्पांनी सुवासित । तेल तुज मीं गणाध्यक्षा अर्पित । अभ्यंगपूजा तुजप्रत । लंबोदरा मीं समर्पिली ॥१४॥
यक्षकर्दभांनी उद्वर्तन । भक्तवत्सला सुगंधयुक्त प्रदान । तदनंतर नाना तीर्थजलांनी स्नान । कमंडलूगतांनी करावें ॥१५॥
सुखउष्ण भावयुक्त । ऐसें जल स्नानार्थ देत । तदनंतर कामधेनु समुद्‍भूत । पावन दुग्धें स्नान करी ॥१६॥
पंचामृत स्नानामध्यें जलस्नान । पुनः करी तूं पावन । ब्रह्मकमंडलूतून उत्पन्न । सर्व तीर्थजलें स्वीकारी ॥१७॥
गायीच्या दुधापासून । जें दही विरजलें मलापहरण । तें स्नानार्थ दयाघना स्वीकारून । कृपा करी विनायका ॥१८॥
तैसेंचि संतोषकारक घृत । गायीच्या दुधाचें अपिंत । महामल धुण्यास तुजप्रत । त्यानें स्नान करीं तूं ॥१९॥
तैसाचि शुद्ध मध मधुर । स्नानार्थ अर्पिला सुंदर । विनायका तो स्वीकार । माझ्या या पूजाविधींत ॥२०॥
उसाच्या रसापासून । साखर जी बनविली शूभ्रवर्ण । ती मलनाशिनि लावू । स्नान करी दयाळा ॥२१॥
यक्षकर्दमकादी सुंगंधी द्रव्ययुक्त । स्नान करी तूं पुनीत । आंत्या मलहर तें शुद्ध सतत । तदनंतर अर्पीत गंधाक्षता ॥२२॥
दूर्वांकुर तुज समर्मित । स्वल्प परि तव प्रिय जे असत । द्विरदानना आचमत सांप्रत । सुगांधि तीर्थांनी करावें ॥२३॥
वस्त्रद्वय स्वीकारावें । रक्तवर्नबहुमोल जें बरवें । लोकलज्जा दूर करण्या स्वीकारावें । विघ्नराजा नमोस्तु ते ॥२४॥
जैसें तारांकित आकाश । तैसें रंगीत उत्तारीय विशेष । स्वीकारून तूं सर्वसिद्धीश । कृपा करी माझेवरी ॥२५॥
यज्ञोपवीत गणाध्यक्षा अर्पित । त्रिगुणरूप प्रणवग्रंथियुक्त । तें स्वीकारावें देवा मीं भक्त । तुज विनवी प्रेमानें ॥२६॥
तदनंतर गणनायका शेंदूर । अंगलेपनार्थ रुचिर । सदा आनंदवर्धनकर । स्वीकारी तूं विघ्नराजा ॥२७॥
विचित्रवर्ण भूषणेंअ अर्पित । सुवर्णरत्नांनीं जी युक्त । तीं स्वीकारी भावयुक्त । एकदन्ता गजानना ॥२८॥
अष्टगंध समायुक्त । गजानना गंध जें आरक्त । तुझ्या द्वादश अंगावर लावित । शोभासुंदर विसावया ॥२९॥
रक्तचंदनानें युक्त । अथवा कुंकुमानें रंगित । ऐशा अक्षता तुज अर्पित । भालमंडलाची शोमा ॥३०॥
कल्हार चंपक रक्तकुसुमयुक्त । फुलें अर्पितो मीं विधिवत । शमी मंदार दूर्वा वाहत । त्यांचा स्वीकार करावा ॥३१॥
दशांग गुग्गुल सर्व सौरभकर । धूप तैसाचि सौख्यकर । महोदरा विनायका तूं स्वीकार । भक्तिपूर्वक जो मी दिला ॥३२॥
नाना जातिभव दीप अर्पित । अज्ञानदोष जो दूर करित । ज्योति जी आत्मरूप असत । गणनायका स्वीकारी ॥३३॥
चतुर्विवध अन्न मधुर । लाडू आदिक रुचकर । नैवेद्य दाखविला रसपर । भोजन त्याचें करावें ॥३४॥
जेवणमध्यांत करावें पान । तीर्थ जलाचें पावन । सुवासित । जें स्वच्छ पूर्ण । देवदेवेशा स्नेहानें ॥३५॥
भोजनांतीं करोद्वर्तन । कापून अगुर कस्तुरी चंदन मिश्र करून । प्यावें सुगंधी जल शोभन । गणाध्याक्षा भक्तीनें ॥३६॥
खजूर डाळिंब द्राक्षा फल । केळीं आदिक फळें अमल । स्वीकारी देवदेवेशा या वेळ । प्रीतिपूर्वक दयाळा ॥३७॥
अष्टांग तांबूल मुखवासन । घेई पुनः पुनः मागून । विघ्नराजा मजकडून । तदनंतर स्वीकारी दक्षिणा ॥३८॥
कांचनयुक्त नाना धातुमय । रत्नादियुक्त सुदेय । ढुंढे स्वीकारी तूं सकलप्रिय । पूजा सफल माझी करी ॥३९॥
राजोपचार गणनायक । दानें विचित्र सुखदायक । विघ्नपा तूं बुद्धिप्रेरक । पूजन हें स्वीकारी ॥४०॥
तदनंतर आवरण पूजन । करीन पाळून सर्व विधान । उपचार विविध अर्पून । त्यानें संतुष्ट तूं होई ॥४१॥
नंतर एकवीस दूर्वांकुर । वाहीन तुज मीं भावपर । न्यून तें व्हावें पूर्ण रुचिर । भक्तवात्सल्य कारणें ॥४२॥
नानादीप समायुक्त । नीरांजन तुज ओवाळित । सर्व अज्ञानाविनाशक पुनीत । स्वीकारी हो आरती ॥४३॥
गणानां त्वा मंत्राचा जप करित । सहस्त्राहून अधिक सतत । सर्वसिद्धिप्रदा तुज अर्पित । त्याचा स्वीकार तूं करावा ॥४४॥
पायांसी चार नाभींसी दोन नीरांजन । वदनाभोवती एक नीरांजन । सर्वांगी सात वेळ ओवाळीन । विघ्नराजा तुझ्या मीं ॥४५॥
चार वेदांचे मंत्र जपून । गाणपत्यपर जे प्रसन्न । त्यांनीं पुष्णमंत्रें मंत्रून । वहातों तुजला विघ्नपा ॥४६॥
गाणपत्य स्तोत्रांनी पंचविध । स्तवन करितों मीं निवेंध । भक्तिप्रदायक सद्‍बोध । देई मजला तूं संतुष्ट ॥४७॥
एकवीस वेळा वा वेळा तीन । प्रदक्षिणा मी घालीन । त्या ब्रह्मेश भावें घे मानून । स्वीकार करुनी तयांचा ॥४८॥
हेरंबा सर्वपूज्या तुज घालित । एकवीस साष्टांग नमस्कार विनत । तें तुज पावीत भावयुक्त । अंतीं वाहतों दूर्वांकुर ॥४९॥
न्य़ून तें संपूर्ण व्हावें म्हणून । दूर्वांकुरांचें समर्पण । त्यानें पूजेची सांगता होऊन । कृपा प्रसाद तुझा मिळावा ॥५०॥
तूं दिला निर्माल्य मजप्रत । ऐसें मानून तो मस्तकीं धरित । सर्वप्रद तो सदा होत । गणनायका क्षमा करी ॥५१॥
असंख्य अपराध मीं करित । ते क्षम्य मानून मज करी भक्त । ढुंढे तुझ्या पायांचा दास विनत । तूंच माझे मातापिता ॥५२॥
तूंच मित्र तूं संबंधी । तूंच कुलदेव सर्वादी । यांत संशय नसे सुबुद्धि । ऐसी मजला सदा देई ॥५३॥
जागृति स्वप्न सुषुप्तींत । काया वाचा मनें घडत । सांसर्गिक कर्म जें तें अर्पित । गणेशास मी भक्तीनें ॥५४॥
गणेशपादतीर्थास वंदन । जेव्हां करी मस्तक लवून । तेव्हां नानाविध पापें लय पावून । विशुद्ध मी होतसे ॥५५॥
गणेशाचें पादोदक पीत । जो नर श्रद्धायुक्त । त्याचें सर्व पाप अंतर्गत । नष्ट होई तत्क्षण ॥५६॥
गणेशाचें उच्छिष्ट गंध लावित । जो द्वादश अंगीं भावयुत । गणेशतुल्य रूप तो होत । त्याच्या दर्शनें पापें जळती ॥५७॥
गणेशपूजनाच्या प्रारंभांत । गंध पुष्पादिक लावावें पुनीत । गणेशाचें उच्छिष्ट गंध न मिळत । तरी शास्त्रोक्तविधि आचरावा ॥५८॥
विघ्नेश नाममंत्रें द्वादस अंगावर । जो लावी गंध नर । तो गणेशाच्या सम ईश्वर । होतो या भूतलावरी ॥५९॥
गणेश्वरास स्मरून डोक्यावरी । विघ्ननायक स्मरणें ललाटावरी । वक्रतुंडा स्मरूनी उजव्या कानावरी । गंध साधकें लावावें ॥६०॥
नाककर्णमूलावरी गंध लावित । एकदंता तेव्हां स्मरत । कंठावरी गंध लावित । तेव्हां आठवी लंबोदरा ॥६१॥
हृदयावरी लावितां स्मरत । चितामणीस गणेशभक्त । उजव्या डाव्या बाहूवरी गंध लावित । तेव्हां स्मरे हेरंबासी ॥६२॥
वेंबीवर गंध लावित । तैं विकटा विनायकास स्मरत । दक्षिण कुक्षीवर तें लावित । तैं मयूरेश अर्चावा ॥६३॥
वामकुक्षीवरी गंध लावित । तेव्हां गजास्यास आठवित । पाठीवरी जेव्हां तें लावित । तेव्हां स्मरे स्वानंदवासीसी ॥६४॥
अष्टगंधानें सर्वांगाचें लेपन । गणेशासी प्रसन्न पावन । सर्व भद्र तें आहे म्हणून । ऐसें शास्त्र सांगतसे ॥६५॥
गणेशाचा भुक्त शेष नैवेद्य । भुक्तिमुक्तिप्रद आद्य । नानापापविनाशक हृद्य । भक्षण करी मी आदरानें ॥६६॥
गणेशाचें स्मरण चित्तांत । कालक्रमणा मीं करित । गाणपत्यांचा सहवास साधित । सदा करी गजानन स्मरणासी ॥६७॥
गार्ग्य सांगे ऐलाप्रत । गृत्समद ऐसें बाहय पूजन करित । महायोगी भक्तिसमन्वित । त्रिकाल प्रतिदिनीं भक्तीनें ॥६८॥
जैसें गृत्समदें केलें । तैसें जर तूं व्रत आचरिलें । तरी तुजही लाभेल भलें । गृत्समदासम अपूर्व मान ॥६९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गृत्समदप्रोक्तबाहयपूजावर्णनं नामैकोनचत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP