खंड ५ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । ब्रह्मा कथा पुढती सांगत । एका रात्रीं महा घोर होत । दारुण युद्ध त्या दोघांत । रक्ताच्या नद्या वाहती ॥१॥
देवांस जय न लाभत । असुरांसी वा त्या युद्धांत । यमसदृश त्या दैत्या मारित । इंद्र आपुल्या वज्रानें ॥२॥
तेव्हां जभासुर रागावत । वत गदाघातें देवांस मारित । युद्ध करी तो बलवंत । इंद्रासवे धैर्यानें ॥३॥
गदेचा प्रहार करित । देवराजावरी तो अवचित । देवेंद्र तो पडला मूर्च्छित । हाहाकार देव करिती ॥४॥
देवसेना पळू लागत । परी इंद्रास जाग येत । तो पुन्हां युद्ध करित । जृंभास लोळवी वज्रानें ॥५॥
जृंभ पडला भूमीवरी । रावणास त्रिशूलें शंकर मारी । तोही मूर्च्छित देवारी । दानवसेना भयकंपित ॥६॥
विष्णूनें गदाघात करून । बलिदानवा जिंकून । तया रणभूवरी पाठवून । संज्ञारहित झणी केलें ॥७॥
कुंभकर्णास करी मूर्च्छित । चंद्र द्वंद्वयुद्धांत । सूर्याच्या प्रखर तेजें होत । राहु मूर्च्छित युद्धस्थळीं ॥८॥
जे जे असुरवीर लढती । द्वंद्वयुद्ध देवासंगें ते हरती । पराजित होऊनि पळती । युद्ध सोडून प्राणभयें ॥९॥
भक्तवात्सल्यें न ठार मारित । आपुल्या भक्तां देव समस्त । संकर रावणास रक्षित । विष्णु रक्षी बळीसी ॥१०॥
तदनंतर अति संतप्त । देवेंद्र असुरांसी मारित । शस्त्रवृष्टि अखंडित । करिती सर्वत्र त्वेषानें ॥११॥
दैत्यांस वाटे प्रलयकाल पातला । जीविताचा अन्त आला । म्हणोनि कांहीं देवगणाला । शरण गेले प्राणाशेनें ॥१२॥
स्तोत्र गाती गणेशाचे । संरक्षणा धावे जीविताचे । जयजय लंबोदरा विघ्नेशा आमुचें । हेरंबा वक्रतुंडा रक्षण करी ॥१३॥
दैत्यांचें तें कंदन पाहून । क्रोध झाला विस्मित उन्मन । निःश्वास टाकी उदासीन । काय पुढें होणार म्हणे ॥१४॥
आपुल्या पित्याचा खेद जाणून । हर्ष शोक सुतद्वय शोभन । लढण्या जाती निश्चिय करून । ढगासम शस्त्रवृष्टी करिती ॥१५॥
त्यांच्या अमोघ शस्त्रांनी विद्ध । देव छिन्नांग झाले विशद । दैत्यांच्या भयें पळती दुःखद । घटना ऐसी ती होती ॥१६॥
शोकदानव जो क्रोधसुत । तो इंद्रावरी चालून जात । गदाप्रहार करून मूर्च्छित । पाडिलें त्यानें देवेंद्रासी ॥१७॥
शुक्रानें दैत्येंद्राची ग्लानी । दूर केली स्वबलें करोनी । तेव्हां बळि मुख्य चैतन्य लाभूनी । पुनरपि गेले लढावया ॥१८॥
क्रोधासुराचा दुसरा सुत । चक्राघातें चंद्रात मूर्च्छित । करी तेव्हां कोपयुक्त । शंकर लढण्या पुढे आले ॥१९॥
त्रिशूळानें महादैत्या मारित । हर्षासुर त्यांचें बळ पाहत । तेव्हां त्यास आव्हान देत । लढण्यासी आपुल्यासवें ॥२०॥
तो तेजस्वी तैं लढत । महाघोर युद्ध चालत । हर्ष शंकर जयोद्यत । परस्परांसी मारिती ॥२१॥
त्रिशूलाचा करून आघात । शंकरें केलें हर्षास मूर्च्छित । दैत्य सैन्य पलायन करित । पहून तें कृत्य अघटित ॥२२॥
दैत्य पडले रणभूमीवरी । तें पाहून दानव कैवारी । शुक्राचार्य तेथ येई सत्वरी । हर्षांस झणीं सावध करी ॥२३॥
ऐसें त्या काव्याचे तेज । अतुल पराक्रम तैसें ओज । दैत्येंद्र सावध होऊन सुखज । मारिती हांका मोठयानें ॥२४॥
एकवटून ते लढती । पाहून त्यांची बळसंपत्ती । विष्णुदेव चक्र सोडिती । दारूण अत्यंत धार ज्याची ॥२५॥
त्या चक्राव्या तीक्ष्ण धारेनें आहत । दैत्य सैरावैरा पळत । कोणी छिन्न विकलांग पडत । रणांगणीं गणेशभक्त ॥२६॥
नंतर शोक नामक पुत्र येत । तो तेजयुक्त त्रिशूल सोडित । दैत्य मनीं आनंदभरित । विष्णु हृदयीं आघात झाला ॥२७॥
जनार्दन आघातें मूर्च्छित । तिथेच शुद्ध जाऊन पडत । दैत्य आनंदोत्सव मानित । प्रचंड आरोळया मारिती ते ॥२८॥
हर्षासुर तदनंतर । क्रोधावेशें गदाघातें भयंकर । विद्ध करी शंकरास असुर । मूर्च्छित पडले महादेवही ॥२९॥
तें पाहून हाहारव करित । देव झाले भयभीत । होऊनिया पराजित । पळाले युद्धभूमीतुनी ॥३०॥
तें परम आश्चर्य पाहत । लंबोदर तैं प्रतापवंत । होऊनिया क्रोधसंतप्त । अंकुश सोडी दैत्यांवरी ॥३१॥
तेजस्वी हे महा अस्त्र पाहती । दैत्य तेव्हां विस्मित होती । निमिषार्धांत विद्ध होती । हर्ष आणिक शोकासुर ॥३२॥
ते दोघेही दिवंगत । झाले तेव्हां गणनाथ नेत । आपुल्या मायेनें गुहेंत । शुक्राचार्यास त्या वेळीं ॥३३॥
तेथ शुक्रास बंदिस्त । ठेविता राहुमुख्य असुर पळत । ती वार्ता ऐकतां क्रोधसंयुक्त । क्रोधासुर स्वयं आला ॥३४॥
पुत्रशोकाचें दुःख गिळून । लढूं लागला संतप्तमन । बाणवृष्टि करी महान । देवसेनेवरी तत्क्षणीं ॥३५॥
त्या प्रखर बाणांनी विद्ध होत । देव तैसे मुनिगन समस्त । छिन्नभिन्न विकल अंगें होत । त्या समस्त वीरांचीं ॥३६॥
ते हाहाकार करून पळत । प्राणभयें दशदिशांत त्वरित । देवांस लंबोदर धीर देत । रणभूमीवर त्या वेळीं ॥३७॥
पाश हातांत धरून । खड्‍ग तैसें उगारून । असुरा मारण्या आवेशें करून । लंबोदर धावला तैं ॥३८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते क्रोधासुरसमागमो नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP