खंड ५ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल दक्षास म्हणती । शेषपुत्राचें माहात्म्य तुजप्रती । सांगेन तुज मीं संप्रती । ते ऐक प्रजानाथा ॥१॥
योग शांतिप्रद असत । हें उत्तमोत्तम चरित । एकदा सत्यलोकांत । ब्रह्मदेव बसले ध्यानस्थ ॥२॥
सर्व प्राण्यांच्या हितास्तव मोहित । बह्मदेव स्वयं होत । माझ्यापासून अखंड जन्मत । सदा सृष्टी ही कैसी ॥३॥
ऐसा विचार करून सोडित । ब्रह्मा जैं निश्वास प्रसन्नचित्त । तोच पुरुष एक संभवत । त्याच्या निःश्वासापासून ॥४॥
तो पुरुष विधीस नमित । विविध स्तोत्रांनी स्तवित । तेव्हां ब्रह्मा त्यास म्हणत । काय वांछिसी तें सत्वर सांग ॥५॥
ब्रह्मयाचे ऐकून । तो पुरुष हर्षयुक्त मन । प्रजानाथा विधीस भक्तिपूर्ण मन । मान वाकवून म्हणतसे ॥६॥
तुझ्या निःश्वासांतून उत्पन्न । तुझा सुत मी माझे करी पालन । नांव ठेवून सांग स्थान । भक्ष्यही नानाविध या जगतीं ॥७॥
दुसरें सुखकर सर्व मजप्रत । देईअ नाथा तुज नमित । तूच गति सर्व भूतांप्रत । सांप्रत माझी विशेषें ॥८॥
त्याचें हें वचन ऐकून । ब्रह्मदेव स्नेंहयुक्त मन । त्यास देई आलिंगन । चुंबन घेई पुत्रवत्सल तैं ॥९॥
ब्रह्मा म्हणे तयाप्रत । मायादर्शनमात्रें तुज वृद्धी प्राप्त । म्हणोनि मायाकर नामें विख्यात । होशील तूं मम पुत्र ॥१०॥
जें जें तूं इच्छिसी । तें तें लाभेल तुजसी । त्रैलोक्यांत वसतीसी । करशील तूं अव्याहत ॥११॥
चतुःपदार्थापासून संभूत । तें तें तुझें वश्य जगांत । जें जें चारविधमय असत । त्याच्यापासून मरण न तुजला ॥१२॥
युद्धांत जें चार प्रकारें उत्पन्न । त्या सर्वां जिंकशील महान । सदा आरोग्यादींनी संपन्न । होशील तूं मम सुता ॥१३॥
ब्रह्मयाचें वरदान ऐकून । तो पुरुष झाला प्रसन्न । मायाकर तैं त्यास नमून । गेला स्वच्छंदे संचारासी ॥१४॥
तदनंतर दानवांचा मुख्य विप्रचित्ती । करी प्रतापी त्यास प्रणती । पाहून त्याचें बळ शक्ति । प्रणाम करी तयासी ॥१५॥
मायाकराचा जाणून वृत्तान्त । त्यास विप्रचित्ति म्हणत । मायाकरा महाभागा ऐक सांप्रत । वचन माझें हितकर तें ॥१६॥
तुज सर्व दुर्लभ वर लाभले । यात संशया स्थान न उरलें । त्यांचा भोग भोगावा हें भलें । महामते नित्य तुजला ॥१७॥
तेव्हांच तुझी शोभा वाढेल । अन्यथा वरांसी न मोल । जैसी रूपवती नारी शोभेल । स्वपतीयुक्त प्रतिदिनीं ॥१८॥
जरी पति नित्य भोगित । तरी कामिनी सदैव तुष्ट वाटत । तैसे विविध वर जरी भोगत । सार्थक त्याच्याचि वरांचें ॥१९॥
जरी वरांसी बाजूस टाकित । तरी ते शापिती पुरुषाप्रत । म्हणोनी साध त्या वरांचें ईप्सित । अन्यथा ते तुज शापतील ॥२०॥
आम्हीं दानवमुख्य तुझ्या अधीन । अत्यंत जे बलवान । त्यांच्यायोगें भोग भोगून । सुखवी जीवन महाबळ ॥२१॥
दानव बलसंयुक्त । अजेय सर्वभावें असत । राहतील तुझ्या आज्ञेंत । यांत संशय कांहीं नसे ॥२२॥
मायाकरासी ऐसें सांगत । तो दुष्ट स्वयं शरण घेत । त्याच्यासंगें रसातलीं जात । भेटला दानव मुख्यांसी ॥२३॥
यमराजासम जे भयंकर । ऐसे ते दानववीर । त्याचा करिती सत्कार । विधिपुत्रासी ते स्तविती ॥२४॥
मायाकर तैं संतोषत । नंतर शुक्रास बोलावित । दानव समस्त होत प्रणत । अभिषेक करविती आदरें ॥२५॥
असुरांचा महाराज झाला ब्रह्मदेवाचा पुत्र त्या वेळां । अत्यंत सुंदर शोभला । भयदायक सर्वांसी ॥२६॥
नाना भोग भोगित । बळानें होत गर्वित । आपणास कृतकृत्य मानित । असुराधीश त्या समयीं ॥२७॥
दानवमुख्यां हस्ते जिंकित । सागरांसह पृथ्वी समस्त । देवगणांस जिंकून बसत । इंद्रासनीं आपण ॥२८॥
तदनंतर सर्व दानव शिवासेविती । स्वर्गभोग ते भोगिती । दर्शनाजवळी जाऊन देती । युद्धार्थ आव्हान तयासी ॥२९॥
तैं कैलास सोडून । शंकर गेले पळून । वैकुंठीं तदनंतर जाऊन । विष्णूसही आव्हान देती ॥३०॥
विष्णूही वैकुंठ त्यागित । भीतीनें जात । त्यानंतर दानव सांगत । आता जिंकी ब्रह्मयासी ॥३१॥
सत्यलोकीं तो देवनायक । देवांसी सर्वदाता असुरमारक । त्याचा आश्रय घेऊन निःशंक । राहिले असती शिवादी ॥३२॥
ते कालाप्रत जाऊन । मारतील आम्हांस फसवून । तूं जिंकिलें राज्य महान । तथापि पहा हें नवल आतां ॥३३॥
ब्रह्मदेवें दूत पाठवून । केला का तुमचा सन्मान । त्याचें तें वचन सत्य मानून । मायाकर संतापला ॥३४॥
ब्रह्मदेवा जिंकण्या उद्यत । सत्यलोकावरी चाल करित । तें पाहून शोक संतप्त । पळाला पितामह ब्रह्मदेव ॥३५॥
देवसंघांसह दूर जात । सत्यलोक दानव जिंकित । मायाकर राज्य करित । त्याही लोकावरी प्रभू ॥३६॥
दानवांचा सन्मात करित । त्यां सवें बहु सुख भोगित । तदनंतर सत्यलोकांत । कैलासीं तैसे बैकुंठलोकीं ॥३७॥
सौर लोकांत शक्ति लोकांत । देवांच्या जागीं तो नेमित । सर्वत्र आपुले दानव त्वरित । परतला नंतर भूंईवरी ॥३८॥
प्रपंच नामक नगरांत । आपुल्या तो जैं येत । दैत्यगण त्याचा जयजयकार करित । म्हणती जिंकूया पाताळ ॥३९॥
दानवमुख्य तदनंतर । पाताळ जिंकण्या उत्सुक फार । निघाले घेऊन दळभार । सर्वही ते बळवंत ॥४०॥
सर्व राजांस ते जिंकित । शेष त्यांसी शरण येत । करभार तो स्वीकारित । नागवीरांसमवेत ॥४१॥
तथापि दानव तेथ निवसत । नागांसी ते पीडा देत । यमकालासम वाटत । भयदायक अत्यंत ॥४२॥
तैं शेष अतिदुःखित । गणनायकासी स्मरत । निर्विघ्नता व्हावी प्राप्त । म्हणोनि पुत्रभावें जन्मावें ॥४३॥
करूनिया अंतर्ध्यान । विघ्नेशा तोषविलें विनीत होऊन । एक वर्ष उलटता पूर्ण । प्रकटले स्वयं गजानन ॥४४॥
त्या शेषाच्या ह्रदयांतून । बाहेर पडले गजानन । म्हणती महाभागा शेषा महान । पाताळलोकीं तूं शोभसी ॥४५॥
पहा झालों मी तुझा सुत । ध्यानज पुत्र जाण मनांत । हा वृत्तान्त ऐकूत विचारित । दक्ष तेव्हां मुद्‍गलासी ॥४६॥
स्वल्प आयासें हेरंब । पुत्र झाला अविलंब । तरी महायोग्या हें विस्तारें दुर्लभ । चरित शेषाचें सांगावें ॥४७॥
ओमिति श्रींमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते शेषातिदुःखवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः  
| श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP