खंड ५ - अध्याय २६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । तदनंतर शौनक जात धौम्याश्रमांत । तयास सांगे सर्व वृत्तान्त । तोहि हर्षित तैं झाला ॥१॥
धन्य धन्य माझा सुत । मंदारवृक्षरूपें जगांत । साक्षात्‍ गणेशरूप वर्तत । सर्वांसी जो वंदनीय ॥२॥
सर्व सिद्धिप्रद तो असत । पावन झालें कुल समस्त । तदनंतर और्व तप करित । शमी वृक्षा समीप ॥३॥
शमीचा संयोग व्हावा म्हणून । उग्र तप करी तो महान । मरणांती शमीच्या उदरीं जन्मून । और्वाग्नी नामें ख्यात झाला ॥४॥
गाणपत्य तो महायश ख्यात । कल्पांतीं योग समन्वित । गणनाथाप्रत जात । शौनकही पूजी ढुंढीसी ॥५॥
मंदारमुळीं मूर्ति स्थापित । त्या मूर्तीची पूजा करित । शमीमंदार दूर्वांनी तोषवित । विघ्नराजासी शौनक ॥६॥
शमी मंदारा मालांनी । भूषित । ब्राह्मण तो गाणपत्य ख्यात । धौम्यही गण्पतीच्या उपासनेंत । भक्तिभावें मग्न झाला ॥७॥
भ्रुशुंडी तें ऐकता वृत्त । जाहला हर्षसमन्वित । जाऊन आपल्या आश्रमांत । नमिले त्यानें शमी-मंदारा ॥८॥
तदनंतर नित्य पूजन । शमी-मंदाराचें भावमग्न । गणेश पूजन भ्रुशुंडी एकमन । शमीमंदार दूर्वांनी ॥९॥
शमी-मंदार मालांनीं भूषित । शोभला मुनिसत्तम जगांत । गाणपत्यांत सर्व ख्यात । गणराज जणूं दूसरा तो ॥१०॥
ऐशा रीती जे स्थित । दक्षा गाणपत्य जगांत । ते ते सर्व शमी-मंदार पूजारत । प्रसिद्ध असती विशेषें ॥११॥
ऐसें हें शमी-मंदार महिमान । कथिलें तुज पापहर चिर नूतन । अन्यही एक वृत्तान्त पावन । सांगतों तुजला सांप्रत ॥१२॥
द्राविड देशीं शूद्र कुळींचा नर । पाप करी अपार । वनीं जाऊन पांथस्था निरुदार । द्रव्यलोभें तो मारी ॥१३॥
तो दुरात्मा वनांत । एकदां वाघाच्या पंजांत । सांपडून पडला त्याच्या मुखांत । भक्षिला त्याला त्या व्याघ्रानें ॥१४॥
तेथ वार्‍यासंगें उडत । एक आलें शमीपत्र पुनीत । त्याचा स्पर्श त्या पाप्यास होत । दैवयोगें प्रजापते ॥१५॥
यमदूत त्यास नेण्या येत । महाबल तैं तेथ त्वरित । गणेशाचे दूतही येत । त्यास नेण्या गणेशलोकीं ॥१६॥
यमदूतांस तिरस्कारिती । त्यांना मुसलाघातें ताडिती । तेव्हां यमदूत पडती । भूतलावरी त्या समयीं ॥१७॥
गणेशदूत त्यास घेऊन । करिती ब्रह्मरूप पावन । यमदूत यमासमीप जाऊन । शोक दुःखग्रस्त कथिती ॥१८॥
क्रोधयुक्त ते कथित । घडला सारा वृत्तान्त । म्हणती स्वामी भूमंडळांत । असती कांहीं शास्त्रकतें ॥१९॥
तुमच्या आज्ञांकित सर्व वर्तत । हा नियम आतां लुप्त । आपण धर्मराज साक्षात । वेदार्थवेत्ते जगत्प्रभू ॥२०॥
शंभु विष्णु प्रमुख देव वर्तत । धर्माच्या आधारें विश्वांत । धर्मयुक्त स्वाभावें ते राहत । यांत संशय कांहीं नसे ॥२१॥
महापापी विशालाक्ष शूद्र । मरता त्यास आणण्या पाशधर । आपले दूत आम्हीं शूर । गेलें तेथे या दिनीं ॥२२॥
अकस्मात तेथ येत । शुंडादंडधारी पुरुष अद्‍भुत । चार बाहु त्यास असत । आमुचा तिरस्कार ते करिती ॥२३॥
त्या शूद्रास पकडून । सूर्यपुत्र निघाले म्हणून । त्यांना विरोध करण्या मन । आमुचें तैं प्रवृत्त झालें ॥२४॥
परी आम्हां मुसळें मारून । घेऊन गेले त्या शूद्रास तत्क्षण । कोठें असती ते सांप्रत ज्ञान । याचें आम्हां मुळीं नसे ॥२५॥
म्हणोनी यत्नें करून । करावा त्यांचा मदहरण । ऐसें विनवून । वंदन । करून उभे यमदूत ॥२६॥
मुद्‍गल कथा पुढती सांगत । दूतांचें वृत्त ऐकून ध्यानस्थित । महामति तो यम पाहत । दिव्य दृष्टीनें कारण त्याचें ॥२७॥
सर्व सत्य वृत्तान्त जाणत । भयाकुल त्याचें चित्त । ध्याऊन गजानना होत । हृष्टरोम तो आनंदित ॥२८॥
मनोमन प्रणाम करित । विघ्नेशास तैं निवेदित । माझ्या किंकरीं अपराध अनुचित । केला असे महाराजा ॥२९॥
स्वामी तू दयासिंधू ख्यात । माझे दूत अज्ञानयुक्त । म्हणोनि क्षमा करावी त्यांप्रत । प्रभू आपण जगताचे ॥३०॥
गाणपत्य ते महाभाग असत । त्यांसवे विवाद न शोभत । भाग्यहीनतेनें तोच प्राप्त । आज माझ्या दूतांना ॥३१॥
ऐसें विज्ञापन करित । मनांत प्रकटल्या विघ्नेंशाप्रत । भानुपुत्र बोलावून दूतांप्रत । हितकारक वचन बोले ॥३२॥
मंदार माला शमीची माला । असेला ज्याच्या देहावरी गळा । मंडारपुष्प शमीपत्रें शोभला ॥ त्यास सोडून दूर पळा ॥३३॥
दूर्वानी पूजन जे करिती । विघ्नहराची स्तुतिगाथा गाती । पूजादिक गणनायकाची आचरती । त्यास पाहून दूर पळा ॥३४॥
त्यांचेपासून भयभीत । तुम्ही पळावें दूर त्वरित । महेशसुत गजदैत्यारी म्हणत । वरेण्यपुत्र त्रिनेत्रहर ॥३६॥
विकट परेश धरणीधर । एकदंत प्रमोद नरांतकर । मोद षडूर्मिनाशकर । गजकर्ण ढुंढि ऐसा जप करिती ॥३७॥
द्वंद्वारि सिंधूंत स्थिरभावकर । ऐसा जे करित जयजयकार । त्यांस भिऊन सत्वर । पळ दूतांनो काढावा ॥३८॥
विनायका ज्ञानविघातशत्रूस । परशरसुता विष्णुपुत्रास । अनादिपूज्या आखुगास । भजती जे जयजयकारें जन ॥३९॥
विधिसुत लंबोदर धूम्रवर्ण । मयूरपाल मयूरवाहन । सुरासुरें सेवित पादपद्म शोभन । ऐसें भजन जे करिती ॥४०॥
वरिष्ठ वरदाता शिवात्मज । शूर्पकर्ण महा आखुध्वज । सिंहस्थ अनंतवाह दितौज । विघ्नेश्वर शेषनाभि ॥४१॥
अणूहनही जो लहान । महतांत तो महान । रविसुत योगेश पावन । वरिष्ठराज मंत्रेश ॥४२॥
निधीश जो वरप्रदाता । अदितिपुत्रा पराशरास ज्ञानदाता । तारवक्त्र गुहाग्रज पावित्र्यदाता । ब्रह्मप पार्श्वपुत्र ऐसें स्तविती ॥४३॥
सिंधुशत्रु परशुधर । शमीश पुष्पप्रिय उदार । विघ्नहारी दूर्वांभरें सुंदर । अर्चित देवदेवेश जो ॥४४॥
बुद्धिप्रदाता शमीप्रिय । सुसिद्धिदाता अमेय । सुशांतिद अमितविक्रम अजेय । ऐसें जे भक्त स्तवन करिती ॥४५॥
दोन चतुर्थी प्रिय जयास । कश्यपाचा सुत तयास । धनप्रदास ज्ञानप्रदास । चिंतामणीस जे नमिती ॥४६॥
चित्तर्पकाशक चित्तविहारी । यमशत्रु जो अभियाना धरी । विधिसुत प्रहारीकपिलपुत्र दुष्टारी । विदेह स्वानंद अयोग योग ॥४७॥
गणशत्रु कमल शत्रु समस्थ । भाल चंद्र जो भावज्ञ सर्वस्थ । अनादि मध्यांतमय सर्वदा विश्वस्थ । ऐसे जे जन भजन करिती ॥४८॥
विभु जगद्‍रूप गुणेश । भूमन्‍ पुष्टिपति विशेष । आखुग जो जगदीश । कार्यपालक संहर्ता ॥४९॥
ही एकशें आठ नामें म्हणती । जे भक्त अथवा ऐकती । त्यांस भिऊन जगतीं । करा पलायन दूतांनो ॥५०॥
त्या भक्तजना पुण्यवंता सोडून । पळ काढावा रक्षण्या जीवन । त्यांना कधीं पकडून । पीडा तुम्हीं देऊ नका ॥५१॥
ढुंढीचें हें स्तोत्र जपती । भुक्तिमुक्तिप्रद जे जगतीं । धनधान्य प्रवर्धक आदरें चित्तीं । ब्रह्मभूयकर गणेशभक्त ॥५२॥
त्यांस दूतांनो सोडावें । त्यांच्या वाटेसी न जावें । जेथ जेथ गणेशचिन्ह बरवें । तेथ प्रवेश न करावा ॥५३॥
गणेशचिन्हयुक्त वीर असती । ऐसी सदनें या जगतीं । तेथ प्रवेश न करावा ही नीति । सदैव तुम्ही राखावी ॥५४॥
त्या गजाननानें स्थापिलें । स्वकार्यार्थ सेवक भले । केशी आदि विराजले । तेथ तुमची काय गणना ? ॥५५॥
ऐसें बोलून दूतांप्रत । यमधर्म मौन आचरित । यमदूत ते सर्वें करित । तदनंतर गणेशपूजन ॥५६॥
गणेशानासी भजती । ते सारे भावयुक्त मती । ऐसें हें आख्यान जगतीं । पावन सर्वत्र सर्वकाळ ॥५७॥
जो हें शमीमंदार महिमान । वाचील वा ऐकेल मन लावून । त्यास सिद्धि सार्‍या लाभून । कृतकृत्य होय जीवन ॥५८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते शमीमंदारस्पर्शमहिमावर्णनं नाम षड्‍विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP