खंड ५ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढें सांगती । असिताची ऐकून उक्ति । नैध्रुवाच्या मनीं अती । विस्मयभाव दाटला ॥१॥
त्या असित महाभागास नमन । करून म्हणे विनम्र वचन । स्वामी सांगा महायोगाचें साधन । त्यास्तव भक्ति करूं कशी ? ॥२॥
कोणाची करावी भक्ति । योगिसत्तमा सांगा मजप्रति । असित म्हणे ऐक पुत्रा पुजप्रती । सांगतों लंबोदराची कथा ॥३॥
ती ऐकतां महायोग तुज लाभेल । कथा ही अती निर्मळ । योगज्ञान तुज अमल । प्राप्त होय निःसंशय ॥४॥
एकदां मी आणि तुझा तात । झालों तप प्रभावें शुद्धचित्त । नंतर योगप्राप्त्यर्थ करित । सुसंस्थित प्रयत्न दोघेही ॥५॥
अंतर्ज्ञानें तें युक्त । जडोन्मत्तादि प्रिय असत । एकाग्रता साधून राहत । निरोधें सहजावस्थेंत ॥६॥
सुखयुक्त आम्हीं व्हावें । ऐसें सामर्थ्य लाभावें । तेथ मोहहीनत्व पाहून स्वभावें । परम विस्मित तैं झालों ॥७॥
शांतिहीन तेव्हां होऊन । ब्रह्मदेवाजवळीं जाऊन । जेव्हां सांगण्या तें वृत्त उन्मन । तों तेथ आले दोन मुनी ॥८॥
विश्वामित्र वसिष्ठ येत । स्पर्धात्मक भावें उभयही युक्त । ब्रह्मदेवा प्रणाम करून थांबत । मदान्वित ते दोघेही ॥९॥
ते क्रोधयुक्त विचारित । तप योग यांत श्रेष्ठ काय असत । तें सांगावें आम्हांप्रत । तेव्हां बोले विधाता ॥१०॥
सर्वांचा पितामह त्यांस सांगत । जेणें क्रोध जिंकिला या जगांत । तो अधिकतर विशेषयुत । जाणावा हो मुनियोग्यांनी ॥११॥
तुम्ही उभयतां क्रोधयुक्त । म्हणोनि तप सारें नष्ट होत । सर्वत्र शांतिप्रद योग जाणत । तोचि विजय लाभतसे ॥१२॥
तेव्हां विश्वेशास प्रणाम करित । उभय तपोधन विनययुक्त । तपश्चर्यापरायण विचारित । कैसा असे हा क्रोध ॥१३॥
प्रजानाथा जो सर्व भयंकर । कुठे असे क्रोध तो थोर । देवेशा कोणतें रूपधर । कैसा स्वभाव त्याचा असे ॥१४॥
त्या दुष्टासी जिंकित । कोणत्या योगें नर जगांत । तें सर्व मजला सांगा निश्चित । आम्हीं जिंकू त्या क्रोधासी ॥१५॥
ब्रह्मा सांगे तयांप्रत । इतिहास सर्व सिद्धिप्रद पुनीत । जो जाणतां समर्थ होत । जिंकण्या कम क्रोध गर्व ॥१६॥
शकुनीचा पुत्र भस्मासुर । शुक्रगुरूचा घेई आधार । पंचाक्षरी विद्या समग्र । शिकून घेई भक्तिभावें ॥१७॥
दीक्षा घेऊन तोषवित । विधिपूर्वक उपासनारत । सर्वांग भस्में लिंपून राहत । ऐसें तप करी सहस्त्र वर्षें ॥१८॥
तदनंतर शंकर प्रसन्न होत । वरदानार्थ तेथ येत । सर्व देवांसमवेत । भस्मासुर उठे परमादरे ॥१९॥
शंकरास प्रणास करित । शैवस्तोत्रें तोषवित । तो महा असुर बळवंत । महादेव तैं त्यास म्हणती ॥२०॥
वर माग असुरा मी प्रसन्न । तुझ्या तपें भक्तीनें आल्हादित मन । भस्मासुर मागे वरदान । अपूर्व अद्‍भुत त्या वेळीं ॥२१॥
ज्याच्या मस्तकावरी हात । ठेवीन शंभो तो तत्क्षणीं मृत । व्हावा हें वरदान मजप्रत । द्यावें आता शिवशंकरा ॥२२॥
अन्य भूतांपासून अभय । सर्वदा सर्वत्र मीं व्हावें निर्भय । माझी शक्ति सर्वश्रेष्ठ अजेय । महेश्वरा करावी ॥२३॥
तें ऐकून शंभु विस्मित । त्या महा असुरासी म्हणत । जें जें वांछिसी तें तें तुजप्रत । मिळेल माझ्या वरदानें ॥२४॥
ज्याच्या शिरीं तुझा दक्षिण हस्त । पडेल तो होईल भस्मसात । यात संशय अल्पही नसत । माझी आज्ञा ऐसी असे ॥२५॥
तदनंतर शिव कैलासीं परतत । एकदा बैसला गणसंवृत । दैत्य तेथ विचार करित । पाहून पार्वतीस त्या समयीं ॥२६॥
अहो शिवाच्या वामांगीं स्थित । जगदंबिका ही रूप लावण्ययुत । स्त्रीरत्न ही अति सुंदरी दिसत । हिच्यासम अन्य कोण जगीं ॥२७॥
ऐसी सुरूपिणी कुठे मिळेल । हा नग्न शंभू अयोग्य अबल । हिच्या रतिसुखास सबल । माझ्यासमचि वीर हवा ॥२८॥
म्हणोनि प्रयत्नें करून । वरदान शिवाचेंच योजून । शंभूसचि भस्मसात करीन । पार्वतीस पकडून नेइन मी ॥२९॥
ऐसा विचार दैत्येंद्र करित । शंकरासन्निध जात त्वरित । गिरिश्रेष्ठ कैलासावरी काममोहित । दारुण असुर तो वायुवेगे ॥३०॥
आपुला उजवा हात उचलून । गेला शंकराजवळी धावून । तें पाहतां पलायन । गिरिजापतीनें केलें ॥३१॥
नमस्कारादिक न करित । आदरभाव न दाखवित । ऐशा या असुरा समीपगत । पाहून भयभीत शंकर ॥३२॥
तेव्हां तो महादैत्य क्रोधयुक्त । शंकरांचा पाठलाग करित । तें जाणून शंकर धावत । वेग वाढवून भयंकर ॥३३॥
त्याच्या मागून भस्मासुर । धावूं लागला अधीर । कमलापति विष्णु तत्पर । पाहतसे पलायन शंकराचें ॥३४॥
गणपतीचें स्मरण ह्रदयांत । करून विष्णु चिन्ताग्रस्त । काय होणार या संशयें विव्हल होत । विघ्ननायकासी स्तवीतसे ॥३५॥
अथर्वशीर्षें स्तुति करीत । विष्णुदेव परम शोकार्त । महादेवा कारणें कष्टत । शिवही स्तवी गणेशासी ॥३६॥
शरणागतवत्सलाचें स्तवन । महासंकटाचें व्हावें निरसन । एतदर्थ तत्क्षणीं तत्क्षणीं कथन । भयसंयुक्त शिव म्हणे ॥३७॥
नाथा विनायका कां पाहसी अन्त । दैत्यानें या मज पीडिलें बहुत । आपुला उजवा हात माझ्या शिरी ठेवित । तरी मज भस्म करील हा ॥३८॥
नाना जन तुझें पादपद्म सेविती । हें भय भंग करा तरी विस्मृती । चिंतामणे तुज माझी चित्तीं । चित्तनिवासकरा कां झालीं ? ॥३९॥
हे दयाघना विघ्नेशा रक्षण । करी माझें मी तुज शरण । तुझ्या विना अन्य समर्थ कोण । गजानना सांग संरक्षणीं ॥४०॥
हे हेरंबा महानुभावा । लंबोदरा महोदरा देवा । स्वानंदवासी तूं करावा । प्रतिपाल माझा संकटांतून ॥४१॥
तुझें चिंतन सदैव सफल होत । रक्षी मजला मी मृत्युवशगत । तुझ्या पायांशी एकनिष्ठ असत । भयभंजन करी झणीं ॥४२॥
कीं सिद्धिबुद्धिसहित । सक्त झालास विहारांत । विनायका तूझी वेदांत । ख्याति भक्तानुकंपी ऐसी ॥४३॥
लक्ष लाभांच्या प्रभवार्थ संसक्त । मज विसरलास सांप्रत । मज रक्षावें अन्यथा जगांत । वेदांचे यश व्यर्थ होय ॥४४॥
परात्म्या जैसा दिनकर । प्रकाशदाता नित्य सर्वत्र । तैसा तूं भक्तजना क्षमा कर । रक्षण करण्या चुकूं नको ॥४५॥
हे महेशपुत्रा हेरंबा विनायका । विघ्नेशा मज मरण्याची शंका । भयभीत जेणें तरी पावका । योगातिरूप निलंबें रक्षी मज ॥४६॥
ऐसी स्तुती शंभु करित । तै गजानन विष्णु हृदयी प्रवेशत । भक्तवत्सल बुद्धी देत । सुचली युक्ति विष्णुसी ॥४७॥
विष्णु स्त्रीवेष घेत । मोहिनिरूपें जात असुराप्रत । भस्मासुर त्यास पाहत । तत्क्षणीं तो मोहित झाला ॥४८॥
त्या मोहिनोसमीप जात । तिज विचारी मोहयुक्त । दैत्येंद्र अतिमृदु शब्दांत । कोठें चाललीस सुश्रोणी तूं ॥४९॥
काय तुझें काम असत । तें सांग मज करीन त्यरित । तुझा दास मी निःसंशय वर्तत । सर्वेश्वर मीं मज सम मीं ॥५०॥
मजसम बलवंत अन्य नसत । भज तूं मजला भावसंयुक्त । मी दास तवाधीत कामपीडित । होईन सदा वरांगने ॥५१॥
त्याचें तें ऐकून वचन । सांगे परिचय स्मित करून । मी मोहिनी मोहप्रदा प्रसन्न । तुजकारणें येथ आल्यें ॥५२॥
माझ्या आज्ञेंत सतत । राहशील तूं दैत्य एकचित्त । तरीच मी तुझ्या घरांत । येऊन राहीन निःसंशय ॥५३॥
तो दैत्यराज वचन देत । म्हणे मी वागेन तुझ्या आज्ञेंत । तेव्हां ती मोहिनी म्हणत । माझ्या पुढें नृत्य करी ॥५४॥
मी जैसी नाचेन । तैसेंचि तूं दाखवी नर्तन । तैसेंच मी करीन । मोहभ्रभें तो मान्य करी ॥५५॥
तदनंतर ती सुंदरी नाचत । दैत्याधिप नाचे तिजसम पुढयांत । जेव्हां जाहला पूर्ण कामरत । तैं युक्ति योजिली विष्णूनें ॥५६॥
नृत्याच्या आवेशांत । मोहिनी दक्षिणकर स्वशिरीं ठेवित । भस्मासुरही तैसेंचि करत । भ्रम होऊन मायेनें ॥५७॥
स्वशिरीं असुरें ठेविताच हस्त । भस्मासुरवधो तत्क्षणीं होत । तेव्हां ती मोहिनी विस्मित । गणनायकाची करी स्तुति ॥५८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते भस्मासुरवधो नाम द्वितोयोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP