खंड ५ - अध्याय ४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । ब्रह्मा कथा पुढती सांगत । ऐसा कांहीं काळ जात । क्रोध हर्षसमन्वित । एकदा म्हणे दानवांसी ॥१॥
बलि मुख्यांस, गर्वयुक्त । दानवांनो ऐका सांप्रत । ब्रह्मांड जिंकीन त्वरित । आपुल्यासहित ही मनीषा ॥२॥
त्याचा संकल्प ऐकून । दैत्य सारे प्रमदित मन । भक्तिभावें त्यास वंदून । बली आदी विनविती ॥३॥
नाथा आपण योग्य इच्छिलें । सुराधिपांस पाहिजे जिंकिलें । तुझ्या प्रसादें दैत्येशा आलें । स्फुरण आम्हां वीरासी ॥४॥
आज्ञा आपण करावी । सर्व अवनी जिंकावी । पराक्रमासी जगीं न सुचावी । तुलना दुसरी कोणासी ॥५॥
तूं महाराजा निर्भय अससी । सर्व देवांसी लीलेनें जिंकिसी । आमुच्या या विश्वासासी । आधार आहे वरदानाचा ॥६॥
त्यांचें हें वचन ऐकत । क्रोधासुर जाहला हर्षित । शुक्रास बोलावून घेत । अनुमोदन त्यांचेही ॥७॥
नंतर दैत्यगणांसी आवाहन । करी तेव्हां तेही प्रसन्न । हर्षभरें तेथ येऊन । नराधिपा क्रोधास वंदिती ॥८॥
तदनंतर मोठया सेनेसहित । महा असुर तो लढण्या जात । हत्ती अश्वरथ पदातियुक्त । चतुरंग त्याची सेना असे ॥९॥
रथांत बैसला क्रोधासुर । दैत्येश राहती सभोंवार । सर्वप्रथम भूमंडळांवर । जाती पृथ्वी जिंकण्यासी ॥१०॥
बलिमुख्य महावीर ज्या सैन्यांत । त्या सेनेशी लढण्यास शक्त । ऐसा कोण या भूमंडळांत । भयकंपित नृप सारे ॥११॥
त्या दैत्येंद्राच्या भयें संत्रस्त । अन्य नृप शरण जात । कांहीं मेले युद्धांत । जे अहंकारें लढण्या धजले ॥१२॥
कांहीं राज्य सोडून पळाले । दारुण वनांत ते लपले । क्रोधासुरें विश्व जिंकिलें । सप्तसागर अंकित त्याच्या ॥१३॥
जे राजे शरण येत । त्यांसी कर देण्यास सांगत । जे युद्धांत दिवंगत । त्यांच्या पुत्रांस शरण देती ॥१४॥
त्या मृत नृपतींचे सुत । कर घेऊन राज्यीं स्थापित । जें पळून गेले वनांत । दैत्य स्थापिले त्यांच्या राज्यीं ॥१५॥
भूतल जिंकून पाताळांत । दैत्यश्रेष्ठ तैं जात । क्रोधासुराच्या सहित । महाबळी नागांसी जिंकावया ॥१६॥
दूत जाऊन कथन करिती । तो वृत्तान्त शेषाप्रती । तेव्हां शेषें शरणागती । उदार मनें स्वीकारिली ॥१७॥
अजिंक्यता वरें लाभली । म्हणोनि क्रोधासुरा श्रेष्ठता आली । हें जाणून घेतली । माघार नागमुख्यानें ॥१८॥
महानागांच्या समवेत । शेष जेव्हां सामोरा येत । तेव्हां क्रोधासुर प्रसन्नचित्त । आदर दाखवी तयाप्रती ॥१९॥
वार्षिक करभार ठरवून । त्या समयीं तेवढा स्वीकारून । क्रोधासुर रत्नादिक घेऊन । पाताळ सोडून स्वर्गीं गेला ॥२०॥
शेषही स्वस्थानीं परतत । शुक्रसंरक्षित क्रोध त्वरित । देवांवरी हल्ला करित । देवस्थानें उद्‍ध्वस्त केलीं ॥२१॥
स्वर्गाचा विध्वंस करून । महादैत्य पाठवी दूत तत्क्षण । तो दूत इंद्रासमीप जाऊन । क्रोधासुरकृत्यें वर्णन करी ॥२२॥
तें ऐकून बृहस्पतिसहित । इंद्र तत्क्षणीं पलायन करित । गुहांमध्यें सारे लपत । जाणून बळ क्रोधासुराचें ॥२३॥
तें जाणून दैत्यांसहित । क्रोधासुर अति हर्षित । इंद्रनगरींत प्रवेशत । आरूढला इंद्रासनीं ॥२४॥
देवस्थानें सर्व फोडून । असुरांस देई तीं दान । तेथ ते दैत्य विराजमान । नाना भोग भोगिती ॥२५॥
जीं सौख्यें पूर्वीं देवांस लाभत । तीं तीं सांप्रत दैत्य भोगित । साहसप्रिय असुर राहत । परस्परांस तोषवून ॥२६॥
गंधर्व चारणादि सेवित । अप्सरागणही समस्त । देवहीन त्या स्वर्गांत । महामुनी अतिदुःखें ॥२७॥
नंतर एकदा तो दैत्येंद्र जात । ब्रह्मलोकीं असुरांसहित । सत्यलोकीं तो वृत्तान्त । क्षणार्धांत पसरला ॥२८॥
तेव्हां ब्रह्मदेव पळून जात । क्रोध दैत्य तेथचि निवसत । सत्यलोकींचे भोग भोगित । दैत्यांसह तो महाबळी ॥२९॥
सत्यलोकीं थोडा निवास करून । क्रोध वैकुंठावरी जात चालून । तें वृत्त ऐकतां पलायन । विष्णु करी भयभीत ॥३०॥
वैकुंठ लोक जिंकत । क्रोधासुर विष्णुयोग्य भोग भोगित । आपुल्या ज्ञातिबांधवांसहित । नंतर गेला कैलासीं ॥३१॥
क्रोधासुरास पाहत । शंकर तैं कैलास त्यागित । क्रोधयुक्त तैं भय अद्‍भुत । मानसांत दाटुनी ॥३२॥
तेथ क्रोध दैत्य निवसत । मनीं बहुत आनंदित । क्रूर दैत्यांच्या संगतीत । एकदा म्हणे तयांसी ॥३३॥
बळी रावण मुख्यांनो वचन । ऐका माझे हितकर शोभन । जें अद्यापि अजिंक्य स्थान । असेल तें मज सांगा ॥३४॥
ते मीं जिंकीन त्वरित । दैत्येंद्र तेव्हां त्यास म्हणत । राजा तूं जिंकिलें समस्त । एका भानु देवावाचुनी ॥३५॥
असुरांच्या हितास्तव प्रयत्न । करावा आपण एकमन । क्रोधासुर बोले हर्षून । माझा तो इष्टदेव ॥३६॥
त्यास तुम्हीं न पीडावे । ऐसें वचन हितकर बरवें । ऐकता महासुर आघवे । क्षुब्ध झाले त्यासमयीं ॥३७॥
ते मायावश त्यास म्हणत । भेदपरायण क्रोधयुक्त । इष्टदेव असुरांचा तो असत । यात संशय कांहीं नसे ॥३८॥
त्याचें भक्तिलालस भजन । सदा करूं विनीत मन । देवांचा पक्ष सोडून । जरी पाहील हित असुरांचें ॥३९॥
तरीच अर्यमा वंद्य वाटेल । अन्यथा बळयोगें जिंकू सबळ । परपक्षाचा आश्रित असेल । झटे आमच्या विनाशार्थ ॥४०॥
आम्हीं रहस्य त्याचें जाणत । परपक्षाश्रित देवसंरक्षणीं रत । म्हणोनि राजा जिंकण्या उद्युक्त । आम्हीं सारे दैत्येंद्र ॥४१॥
दैत्येशांचें ऐकून वचन । क्रोध हर्षित चित्त महान । रावणा दूतत्वें पाठवून । करी गर्वाचें प्रदर्शन ॥४२॥
रावण दूतत्वें भानूप्रत । जाऊन कथित सर्व वृत्तान्त । तो ऐकता क्रोधयुक्त । सूर्यदेव सांगे प्रत्युत्तर ॥४३॥
देवांचा पक्ष सोडून । क्रोधाची सेवा न करीन । अरे रावणा दूता मी एकनिष्ठ मन । संशय़ अल्पही यांत नसे ॥४४॥
त्या उन्मत्ता क्रोधास । वरप्रदानें गर्वयुक्तास । सांगा जाऊन मम वचनास । राज्य सोडिलें भानूनें ॥४५॥
आपलें राज्य सोडून । सूर्य गेला वनीं निघून । आतां तूं सूर्यलोकीं महान्‍ । आधिपत्य करी सुखानें ॥४६॥
ऐसें रावणास सांगत । सर्व अनुयायांसह त्वरित । सूर्यलोक सोडून पळत । आपुलें जीवन रक्षावया ॥४७॥
तदनंतर क्रोधासुर हर्षित । दुष्ट दैत्यांसमवेत । सौरलोकीं प्रवेश करित । आनंदला बहु मानसीं ॥४८॥
आपणास कुतकृत्य मानित । दुर्मति तो असुर बळवंत । ब्रह्मांडावर विजय प्राप्त । करून भोगी भोग नाना ॥४९॥
तदनंतर दैत्येंद्रास स्थापून । देवपदीं स्वर्गीं प्रसन्न । पृथ्वीवर गेला परतून । आपुल्या प्रीति नगरींत ॥५०॥
तेथ राहून क्रोधासुर प्रतापवंत । त्रैलोक्याचें राज्य करित । सुहृदांसी आनंद देत । स्त्री मांस मदिरा भोगितसे ॥५१॥
विषयांत होऊन निमग्न । प्रमोदें करी कालक्रमण । कैसा काळ लोढला हे न कळून । सुखानें दिवस कंठितसे ॥५२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते क्रोधासुरब्रह्मांडविजयो नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP