खंड ५ - अध्याय २४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । आता क्षत्रिय दीक्षा वांच्छित । त्यांची सांगतो रीती तुजप्रत । गणेश सांप्रदायिक ऐकावी ॥१॥
ब्राह्मणाच्या हस्तें करवावा । होमादि यज्ञयाग आघवा । स्वयें क्षत्रियें मंत्रमात्र जपावा । ऐसें शास्त्र सांगतें ॥२॥
शस्त्रविद्या त्यागून । दंडादिक सोडून । क्षत्रियही तैं पावन । गाणपत्य होय निःसंशय ॥३॥
वैश्यही क्रयविक्रय सोडित । तरी गणेश दौक्षाप्राप्त होत । शूद्रांसी नाममंत्र देत । ब्राह्मण गुरु सर्वदा ॥४॥
हिंसादिक कर्म त्यागून । शूद्र होय योग्य जाण । गणेशदीक्षा लाभून । नाममंत्रें उद्धरावें ॥५॥
गणेश्वराचें पूजन । स्वयं न करावें शूद्रें जाणून । श्लोकादींचें पठन । करू नये तयानें ॥६॥
होमादि कर्म करित । तरी घ्यावें प्रायश्चित्त । दीक्षा घेऊन विधियुक्त । गाणपत्य तो शूद्र होय ॥७॥
परी गणेशदीक्षा घेऊन । जरी करी दुराचरण । तरी गणेश कोपून । विघ्न निर्मी मार्गांत ॥८॥
आतां गणेशदीक्षायुक्त । कैसा जाणावा जगांत । त्याची खूण तुज सांगत । ऐक दक्षा सांप्रत ॥९॥
प्रातःकाळीं उठून । जो करी स्नान संध्या उपासना । आगमोक्त वेदोक्त पूजन । द्वादशांगीं अर्चन करी ॥१०॥
मंत्रपूर्वक भस्मलेपन । मंत्रपूर्वक करी जो जन । त्या लेपनविधीचे मंत्र पावन । सांगतों आता तुजप्रत ॥११॥
गणेशायचें उच्छिष्ट गंध घेऊन । स्वानंदवासीसी आठवून । करून तयासी नमन । डोक्यावर गंध लावावें ॥१२॥
गणनाथास करून नमन । ललाटावरी गंध लेपन । गजकर्णास वंदून । चंदन लावावें उजव्याअ कानासी ॥१३॥
शूर्पकर्णांस नमून । डाव्या कानास लावावें चंदन । विघ्नेशासी वंदून । कंठास गंध लावावें ॥१४॥
हेरंबास नमस्कार करून । उजव्या बाहुस चंदनलेपन । सिद्धिनाथा नमून । गंध लावा वामबाहूसी ॥१५॥
बुद्धीशासी वंदून । ह्रदयास लावावें चंदन । लंबोदरास अभिवादून । नाभीस गंध लावावें ॥१६॥
वक्रतुंडस्मरणें उजव्या कुशीस । चिंतामणि वंदनें डाव्यास । गंध लावावें पृष्ठ देहास । ढुंढीस वंदन करून ॥१७॥
ऐसे हे बारा मंत्र तुजप्रत । दक्ष प्रजापते शास्त्रोक्त । सांगितले ते जो ध्यात । तो पावन भक्त होय ॥१८॥
सर्वभद्र विधानें अर्जन । ललाटाचें करावें पावन । बेंबीच्यावर अंगीं लेपन । करावें गणेशभक्तानें ॥१९॥
रक्तचंदन संयुक्त । असावें गंध शास्त्रोक्त । तेणें सर्वांग लेपन प्रशस्त । गणेशभक्त करिताती ॥२०॥
शमीची अथवा मंदाराची । माळ प्रशस्त करावी नियमेची । आपुल्या गळयांत बाहुवरी धारकाची । सर्व कार्यें सिद्ध होत ॥२१॥
हीं दोन गणेशप्रिय काष्ठें असत । अन्यकाष्ठभव माळ वर्तित । जैसी वैष्णवासी प्रिय होत । केवळ तुळसी काष्ठमाळ ॥२२॥
शमी मंदार संभूत । माळ प्रमाण गाणपत्याप्रत । तैसी न मिळतां घालित । पोवळयाची माळ भक्त ॥२३॥
अथवा अक्षमयी माळ घालित । सदा शुचि स्वभाव युक्त । मित्रशत्रूवर्जित । द्वंद्वभानविनिर्मुक्त ॥२४॥
गाणपत्य ऐसा वर्तत । शुक्त कृष्ण चतुर्थीचें ब्रत । गाणपत्य व्रतें करित । सर्वही ती श्रद्धेनें ॥२५॥
अन्यदेव प्रिय व्रत । तीर्थयात्रादि आचरित । तोही होत शक्तियुक्त । सर्वत्र सुप्रतिष्ठित ॥२६॥
गाणपत्य क्षेत्रांस जात । नियमें करून भक्तियुक्त । अन्यही क्षेत्रीं जात ॥ प्राचीन मुनीं जीं प्रशंसिती ॥२७॥
ऐसा गणेश्वर देव असत । सर्वांत आदिपूज्य विश्वांत । अन्य देवांच्या भक्तां वाटत । आपापलें ब्रत श्रेष्ठ ॥२८॥
तैसा गणेशपंथीयांप्रत । गणेश्वर एक श्रेष्ठ वाटत । त्याचेच व्रतादिक आचरित । नित्य नेमें गणेशभक्त ॥२९॥
सदैव गणेशनामाचें कीर्तन । गाणपत्य करिती आनंदून । कथा नानाविध रम्य सांगून । कालक्रमणा ते करिती ॥३०॥
गणेशाची चरित्रें अद्‍भुत । गायन त्यांचें हर्षभरित । करावें गणेशभक्तें सतत । सुपात्र जनांत बोध द्यावा ॥३१॥
येथ मी तुजसी सांगेन । नारद इंद्राचा संवाद परम । एके दिनीं नारद मुदितमन । महेंद्रासी भेटले ॥३२॥
इंद्रानें त्यासी पूजिलें । नारदेंहीं गणेशगायन केलें । महेंद्रानें त्यास वंदिलें । कर जोडून प्रार्थी तें ॥३३॥
गाणपत्यांचीं चिन्हें मजप्रत । महाभागा सांगा सांप्रत । कैसें त्याचें स्वरूप असत । कोणता आचार तयांचा ॥३४॥
नारद सांगती इंद्राप्रत । सर्वांनीं रक्तचंदन लेप असत । शमी मंदारांच्या माळा असत । गळयांत तैशा करीं त्यांच्या ॥३५॥
सर्वदा गणेशनाम श्रवणांत । तत्पर ते वर्तत । कीर्तनी भावसंयुक्त । गाणपत्य हे पांडित ॥३६॥
त्यांच्या ह्रदयीं द्वंद्वभाव नसत । निःस्पृह योगधर ते प्रशांत । सुनिर्मल वंदनयोग्य उदात्त । नित्य स्वधर्म आचरती ॥३७॥
गणराजाच्या भक्तिमार्गांत । असती ते सदैव रत । स्थान गृहादिकावरी न विसंबत । चिंतामणीवर पूर्ण श्रद्धा ॥३८॥
श्रौतस्मार्त कर्मांत । असती जे सदैव संसक्त । गणराजसिद्धीस्तव करित । सर्व कर्में ते गाणपत्य ॥३९॥
निंदा स्तुति द्वंद्वातीत । कांता सुवर्णादि विषयांत । जे असती भावहीन पुनीत । ऐसे जाणा गाणपत्य ॥४०॥
विघ्नेश्वराच्या भक्तिकार्यांत । सदैव जे तीर्थें हिंडत । अन्यभावें न आच्छादित । दोषविहीन गाणपत्य ॥४१॥
जे कैलास वैकुंठ न वांछिती । ब्रह्मादींची न आसक्ति । गणेशाची सदा भक्ति । ते गाणपत्य जाणावें ॥४२॥
मुद्‍गल म्हणती दक्षाप्रत । ऐसें सांगून इंद्रासी त्वरित । स्वेच्छेनें नारद जात । विघ्नेश्वराचें गायन मुखीं ॥४३॥
ऐसें हें गाणपत्याचें स्वरूप । सांगितलें तुज विगतपाय । हें ऐकतां अज्ञानज पाप । संपूर्ण नाश पावेल ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते गाणपत्यस्वरूपपवर्णनं नाम चतुर्विशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP