खंड ५ - अध्याय ५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । ब्रह्मा कथा पुढती सांगत । क्रोधासुर अति मदानें युक्त । दैत्यांस क्रूर हृदयां आज्ञा देत । कर्मांचें खंडन त्वरित करा ॥१॥
त्याची आज्ञा मिळता जात । महीतळावरी दैत्य उन्मत्त । ब्राह्मणांसी तें ताडित । वर्णाश्रम प्रवर्तक जे ॥२॥
तैसेंच अन्य वर्णीयांस पकडून । करिती तयांसी कर्महीन । कोठेंही ना स्वधा ना वषट्‍कार पावन । ऐसी झाली दुरवस्था ॥३॥
तदनंतर विप्रांस म्हणत । क्रोधासुर तो प्रतापवंत ॥ माझें नाव जोडून जगांत । सर्व कर्में करा द्विजहो ॥४॥
मीच जगताचा ईश पुनीत । महाभागांनो संशय न यांत । माझे पाय पूजितां तुम्हांप्रत । दुर्लक्ष कांहीं न होईल ॥५॥
तें ऐकून तपोनिष्ठ द्विज वनांत । सुखद निवास सोडून जात । सिंहव्याघ्रादींनी युक्त । ऐशा घोर एकांती ॥६॥
परी क्रोधासुराची आज्ञा न पाळित । जे होते स्वाभिमानयुक्त । परी भ्रष्ट द्विज आज्ञा पाळित । क्रोधासुराची विशेषत्वें ॥७॥
वर्णाश्रम धर्मविहीन । झाले भूतळीं समस्त जन । सर्वत्र क्रोधाच्या प्रतिमा महान । स्थापिती असुर अधिकारी ॥८॥
घरोघरीं त्याचेंच पूजन । करिती सक्तीनें असुरजन । ऐसा हाहाकार माजून ॥ देव झाले भयोद्विग्न ॥९॥
यज्ञयागादींचें खंडन । होतां देवांसी उपोषण । हविर्भाग त्यास न मिळावा म्हणून । यत्न करिती असुरेंद्र ॥१०॥
क्रोधासुराचें करावया शमन । उपाय चिंतिती यत्नें करून । परी कांहींच न सुचून । खेद बहुत त्यास झाला ॥११॥
ऐसे देव समस्त । जाहले अत्यंत चिंताग्रस्त । त्या समयीं योगिश्रेष्ठ वसिष्ठ येत । दैवयोगें त्या स्थळीं ॥१२॥
ते निःश्वास टाकून म्हणत । त्या सुरेशवृंदांप्रत । आपण उत्पत्ति स्थिति विनाशयुक्त । हयात संशय मुळीं नसे ॥१३॥
म्हणोनि आमुच्या हातून । त्या क्रोधासुराचें न होय हनन । त्यास लाभलें वरदान । अद्‍भुत ऐसें अपूर्व ॥१४॥
तरी स्वानंदवासी गणेशास । ब्रह्मनायका पूजावें अहनिश । जन्म स्थिति संहार न यास । तीनही तया न बाधत ॥१५॥
हया तीनही अवस्थांच्या अतीत । वेद वयासी वर्णित । त्याचें सेवन करा निष्ठायुत । तो रक्षील तुम्हांतें ॥१६॥
क्रोधासुरास मारून । देईल तुम्हां स्वपदें प्रसन्न । यांत संदेह न धरा माझें वचन । सुरेंद्रांनो आचरावें ॥१७॥
वसिष्ठाचें ऐसें वचन । ऐकून सुरर्षि मुदितमन । वाहवा हें वचन शोभन । ज्ञाननिधी वसिष्ठांचें ॥१८॥
तदनंतर सारे देव जपती । लंबोदराचा मंत्रराज चित्तीं । भक्तियुक्त तप करिती । ध्यान सदा त्या गणेशाचें ॥१९॥
नाना अनुष्ठानें करिती । गजाननासी तोषविती । उपोषणें विविध आचरती । महामुनि तत्प्रीत्यर्थ ॥२०॥
ऐसीं सहस्त्र वर्षे जाती । देवर्षि लंबोदरासी भजती । प्रसन्नात्मा तेव्हा प्रकटती । वरदायक गजानन ॥२१॥
गणेशाचें होतां दर्शन । देवमुनि अति हर्षित मन । आदरें वरती उठून । प्रणाम करिती साष्टांग ॥२२॥
नाना उपचारें त्यास पूजित । पुनः पुन्हा वंदन करित । हात जोडून स्तवित । भक्तिभावें तयासी ॥२३॥
नमस्कार गणनाथासी । लंबोदरासी गजवक्स्त्रासी । सर्व पूज्यासी स्वानंदपतीसी । सर्वस्वानंददात्या नमन ॥२४॥
अनाथासी सर्वनायकासी । विघ्नेश्वरासी विघ्नहर्त्यासी । अभक्तां विघ्नकर्त्यासी । अनादि परेशा तुज नमन ॥२५॥
उत्पत्ति स्थिति संहार । त्यांच्या अतीत जो उदार । विश्वांत श्रेष्ठ महोदर । अनादीस त्या वंदन असो ॥२६॥
मायिका मोहकर्त्यासी । मायावीसी परात्म्यासी । सर्वसिद्धिप्रदासी । नाना विद्यायुक्ता नमन ॥२७॥
नाना कलांनीं युक्तासी । अपार आननरूपासी । अपार हस्तपाद ज्यासी । गुणेशासी त्या नमन ॥२८॥
गुणचालकासी अनाकारासी । आकारयुक्तासी ज्येष्ठराजासी । आदिमध्यांत रूपासी । आदिमघ्यांत स्वरूपा नमन ॥२९॥
ज्येष्ठपतीसी सर्वदात्यासी । आदिपूज्यासी अंतसंस्थितासी । नानाविध हें जग धरिसी । आपुल्या उदरीं लंबोदरा तूं ॥३०॥
नानाविध ब्रह्में जन्म पावत । लंबोदरा तुझ्या उदरांत । तूं न जन्मसी उदरांत । कोणाच्याही जगतांत ॥३१॥
म्हणोनि लंबोदरा तुज म्हणती । सर्वाच्या उदरांचा पार जाणसी निश्चिती । तव उदराची परिमिती । ज्ञात नसे कोणासही ॥३२॥
ऐसा आनंदाचा हा आनंददायक । आमुच्या पुढें प्रकटला पावक । धन्य धन्य आम्हीं निःशंक । आश्चर्य हें पाहिलें ॥३३॥
मनोवाणी विहीन । मनवाणीयुक्त महान । ऐसा लंबोदर पुढें पाहून । धन्य आमुचें जीवन ॥३४॥
वेदादीही असमर्थ ठरले । तुझी स्तुति करितां तिमाले । तेथ माझें बुद्धिबल कोठलें । काय स्तुती करावी ॥३५॥
आतां आम्हीं धरितों मौन । जगदीशा तूं होई प्रसन्न । ऐसें बोलून करिती नर्तन । देव मुनिजन त्या समयीं ॥३६॥
ऐसें स्तुति-स्तोत्र ऐकून । गणेश बोले मेघगंभीर वचन । निःशंक वर मागा देवेंद्रांनो पावन । मुनींद्रांनो या वेळीं ॥३७॥
तुमच्या तपें भक्तीनें संतुष्ट । देईन तुम्हांसी सारे अभीष्ट । तुम्हीं रचिलेलें हें स्तोत्र विशिष्ट । इह परस्त्र ॥३८॥
वाचका श्रोत्यासी सौख्यप्रद । जें जें इच्छिती मनीं विशद । तें तें देइन सिद्धिप्रद । भवित विवर्धन हें स्तोत्र ॥३९॥
ब्रह्मा म्हणे हें ऐकून । लंबोदराचें मुदित वचन । देवर्षी करिती स्तवन । प्रणाम करिती विनम्रभावें ॥४०॥
सर्वेशा भक्तपालका स्तविती । गजानना जरी तूं प्रसन्न चित्तीं । वर देण्या आम्हां संप्रती । तरी मारावें क्रोधासुरा ॥४१॥
त्या क्रोधासुरें आमुचें स्थान । घेतलें असे हिरावून । स्वधा स्वाहादि विहीन । उपोषण आम्हां घडे ॥४२॥
तुझ्या उदरांतून जन्मले । ऋषिजन देववृन्द जे भले । त्या सर्वांसी पाहिजे रक्षिलें । त्या एक असुरा मारूनियां ॥४३॥
देई तुझी दृढ भक्ति । सर्व क्रोध निवारूनी जगतीं । तेणें शांति उपजून चित्तीं । भजन करू सतत तुझें ॥४४॥
तुझीभक्ति जैं प्राप्त हो । शुभस्वरूप जी पुनीत । तेव्हां ब्रह्मपद भोगित । ऐसी ख्याति ज्ञात तुझी ॥४५॥
मुनिदेवांचें तें वचन । लंबोदर म्हणे ऐकून । भक्तियंत्रित तो प्रभू पावन । तथाऽस्तु ऐसें प्रेमानें ॥४६॥
तदनंतर तो अंतर्धान । पावला तेथ गजानन । देव मुनि भयोनिद्विग्न । प्रतीक्षा करिती क्रोधमृत्यूची ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते देवर्षिवरप्रदानं नाम पंचमोऽध्यायः समाप्तः
। श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP