खंड ५ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ऐल म्हणे गार्ग्याप्रत । जैसा अमृतपान पुनःपुनः वांछित । नर तैसा मी न पूर्ण तृप्त । गृत्समद चरित्र ऐकून ॥१॥
हा गृत्समद अनुपम वाटत । सत्संग ब्रह्मलोकांत । धन्य हा मुनिश्रेष्ठ योग्यांत । गाणपत्यांत विशेषें ॥२॥
आता गणेश लोकाचें वर्णन । करावें आपण संपूर्ण । कैसा असे हा लोक महान । गणेशाचा स्वतःचा ॥३॥
गार्ग्य सांगती या विषयांत । मुद‍गल कपिलांचा संवाद तुजप्रत । इतिहास पुरातन हा अत्यंत । ऐक ऐला एकमनें ॥४॥
एके दिनीं मुद्‍गल योगी जात । गंगातटीं कपिलाश्रमांत । गाणपत्याग्रणी तो कपिलासी वंदित । म्हणे त्यासी कर जोडून ॥५॥
आपण विष्णुरूप साक्षात । मुख्य गाणपत्यांत । सांख्यांचे परमगति जगांत । शुक्ल सर्वार्थदायक ॥६॥
आपुल्या दर्शनपुण्यें सांप्रत । कृतकृत्यता मज वाटत । धन्य कुल धन्य यश मजप्रत । वाटे धन्य माझें ज्ञान ॥७॥
ऐसें जेव्हां मुद्‍गल म्हणत । तै कपित स्वयं त्यास नमत । पूजी हर्षीत्फुल्ल चित्त । भावभावित मुद्‍गलासी ॥८॥
तदनंतर कपिल योगहित । वचन त्यास बोलत । तुझ्या दर्शने ताता पुनीत । सांप्रत मी जाहलों ॥९॥
गणेशाचा पूर्णभक्त । तूंच एक प्रख्यात । महामुने तूं साक्षात । गाणेश शस्त्रेश निःसंशय ॥१०॥
जैसा मुद्वर शस्त्रानें चूर्ण करित । कांडित अथवा पीठ करित । पदार्थ बहुविध उखळांत । संसारांत कुटुंबी ॥११॥
त्या पदार्थंस नामरूप विहीन । करीतसे मनुनंदन । तैसेचि योगसेवेनें अभिमान । कांडिला योग मुसळानें ॥१२॥
महायोग्या त्याचें चूर्ण करून । खंडिलें त्यानें मुळापासून । अनेक योगी करिती यत्न । परि तो हृदया न सोडी ॥१३॥
महाभागा अन्य योगिजन । खंडन करण्या अभिमान । उद्युक्त असती करिती नियमन । परी समूळ तो न जाई ॥१४॥
परी मुद्‍गरासम केलास खंडित । अभिमान तूं जगांत । म्हणून मुद्‍गल नामें ख्यात । जगीं एकमेव विनिश्चित ॥१५॥
मीं एक मार्गाचा आश्रय घेतला । त्यासम योग मज न साघला । तुझ्या योगप्रद अंगिरस पुराणाला । सर्वमान्यता लाभेल ॥१६॥
पुराणें तैसीं शास्त्रें असत । अभिमानयुक्त जगांत । यांत संदेह कांहीं नसत । याचें कारण ऐक मुद्‍गला ॥१७॥
गुह्य जरी झालें ज्ञात । तरी तें लपवून स्वमत । विशेष त्वरेनें स्थापित । गूढ तत्थ्य सांगती तीं ॥१८॥
गणेशभक्त तूं असत । तथापि विशेष अर्थ रहस्ययुक्त । गणनायकाविषयीं तूं न करित । तुझें वचन सर्व मान्य ॥१९॥
तुझें वचन श्रेष्ठ वाटत । कारण तें अभिमानरहित । वेद गुह्याचें प्रकाशन करित । तुझें पुराण शेवटचें ॥२०॥
मुद्‍गलपुराण आंत्य महान । पुराणांत श्रेष्ठ पावन । मूद्‍गलाकृति तें शोभन । ऐसी ख्याति होईल ॥२१॥
वेदशास्त्र पुराणाचा ग्रंथ महान । तूं रचिलेला ग्रंथ नूतन । निरभिमानतेनें सर्वमान्य पावन । सत्यार्थे जगीं जगीं होईल ॥२२॥
मुद्‍गलासम योगी नसत । मुद्‍गला सम अन्य कोणी नसत । गाणपत्य सर्वश्रेष्ठ तोच असत । महायोगी त्रिकालांत ॥२३॥
तुझें करितों मीं स्वागत । राही माझ्या सान्निध्यांत । तुझ्या दर्शनें मीं संतोषित । जाहलों असे गणपप्रिया ॥२४॥
ऐश्या प्रकारें सत्कारित । महायोगी मुद्‍गलाप्रत । कपिलाच्या सन्निध राहून म्हणत । भावयुक्त मुद्‍गल तैं ॥२५॥
एकदा सुखासीन असत । कपिल योगिश्रेष्ठ आश्रमांत । तेव्हां मुद्‍गल विनयनम्र विचारित । हर्षभरें तयासी ॥२६॥
स्वामी तुमच्या घरांत । चिंतामणि पुत्रभावें येत । ब्रह्मनायक तो साक्षात । ऐसें लोकीं ख्यात असे ॥२७॥
तुम्हीं त्यास भावयुक्त । आराधिलें निरंतर स्वगृहांत । याचें गुह्म तुम्हीच जाणत । यांत संशय मुळीं नसे ॥२८॥
तुमच्यासारखा महासिद्ध नसत । विष्णु तुम्ही साक्षात । गाणपत्य स्वयंयोगी आहात । गणेशाचे वंद्य जनक ॥२९॥
म्हणून महाप्रभो मजप्रत । सांगावें रहस्य साक्षात । आपणासम जन वसत । जगतासी तारावया ॥३०॥
स्वानंद लोक कैसा असत । तेथ कोणतें सुख लाभत । किती विस्तार त्याचा ख्यात । कोणत्या योगें लाभतो तो ॥३१॥
आपुल्याविणा अन्य कोणी । न जाणी त्याचें रहस्य प्राणी । त्या गाणपत्य लोकाचें रहस्य झणीं । सविस्तर मज सांगावें ॥३२॥
गार्ग्य म्हणती ऐलाप्रत । ऐसा मुद्‍गला प्रश्न करित । तैं त्यास प्रशंसून सांगत । हास्य करित तो महासिद्ध ॥३३॥
गाणपत्याग्रणी कपिल म्हणत । हर्ष वाटून चित्तांत । मुद्‍गला तें माहात्म्य अनंत । संक्षेपें तुज सांगतो ॥३४॥
स्वानंद लोकाचें पूर्णसार । सर्वंसंमत जें सुखकर । परम दुर्जय गणासुर । वधिला गणाध्यक्षानें ॥३५॥
तदनंतर निजलोकीं जाण्या उद्युक्त । जिव्हां होता समुद्यत । तेव्हां गणनायका मी स्तवित प्रार्थित । अति भक्तीनें विनम्रपणें ॥३६॥
माझ्या स्तुतीनें प्रसन्न । म्हणे योग्या माग वरदान । देईन मीं झालों प्रसन्न । तेव्हां मी बोललों दुःखपूर्ण ॥३७॥
चिंतामणीस प्रणास करून । म्हणोलो ज्ञानांत माझ्या एक न्यून । स्वानंद लोकांचें महिमान । न जाणें मीं चितामणे ॥३८॥
गणनायका नाना लोकज्ञान । परी स्वानंद लोकाचें जनां अज्ञान । गजानना जेथ तूं करिसी वसन । नित्य स्वामी आनंदें ॥३९॥
चिंतामणि तैं मज सांगत । वेदांत जो स्वानंद ब्रह्म वर्णित । तेंच मायेनें युक्त । पूर्वीं होतें महानगर ॥४०॥
त्या स्वानंदनगरांत । स्वसंवेद्य योगप्रभावें जात । अन्यथा दुजा मार्ग नसत । व्रतादींनी माझी उपासना ॥४१॥
न जपानें तपानें वा दानानें । न नाना कर्मपरायणें । निजलोक तो प्राप्त होणें । मुनिसत्तमा हें वैशिष्टय ॥४२॥
तेथ विष्णु शंशु शुक अन्य योगिजन । मार्गभिन्नत्वें जेथ न जाती जाण । अगम्य तो स्वानंद लोक महान । ऐसें रहस्य जाणावें ॥४३॥
चतुर्विधमय भावें तो न लाभत । दशसहस्त्र योजनें तो विस्तृत । त्याच्या वरील आसमंतात । तेंच प्रमाण जाणावें ॥४४॥
वर्तुळाकार तो सर्वत्र । स्वस्थ आधारें समग्र । सदा तो ज्योतिर्मय शुभ्र । ज्योतींची ज्योति साक्षात्‍ ॥४५॥
न तेथ सगुण वा निर्गुण । न पुरुष स्त्री नपुंसक जाण । मुनिसत्तमा चतुर्विध भूतमात्रांत राहून । स्वस्वंवेद्य तो निजात्मस्थ ॥४६॥
माझ्या संन्निध नाना भावांत । मायायुक्त तो वसत । प्राणिज उद्‍भज स्वेदज अंडजांत । स्वरूप भ्रांत त्याचें असतें ॥४७॥
त्यांच्यांत मोहविहीन । साक्षिरूप सदा नूतन । स्वभावें निर्गुण जाण । सदा परम खंडमय ॥४८॥
त्यांच्या संयोगें निजानंद । ढुंढि लोक गती सुखद । तेथ माझ्या भक्तीनें पुण्यप्रद । माझ्या सन्निध भक्त रहाती ॥४९॥
माझ्या त्या स्वानंद लोकांत । क्षुधा तृषादिक न बाधत । सदा स्वानंद भोग स्थित । राहती माझे सेवक ॥५०॥
तेथ कृत्रिम सुख नसत । अकृत्रिमही न वर्तत । सर्वही सुखातीत । स्वानंदांत निमग्न तेथें ॥५१॥
सगुण तैसें निर्गुण । एकाच वेळीं सुखभोग महान । स्वानंद संभव उभय म्हणून । महामते तू जाणावें ॥५२॥
येथ जें नाना भेदमय असत । तेच ज्योतीरूप मम लोकांत । येथ जें नसे स्थित । निर्गुण जाण तें त्या । लोकीं ॥५३॥
मायेनें माझ्या या लोकांत । आश्चर्यमय सदा विलसत । सगुण सगुण न राहत । निर्गुण तोही न निर्गुण ॥५४॥
सगुण निर्गुणांनी हीन । तेथ स्थिति उन्मन । ऐसा आश्चर्ययुक्त महान । माझा लोक विशेषें ॥५५॥
तेथ न अहं स्वभाव । न अहंभाव वर्जन तथैव । माझ्या लोकांत सदैव । माझे प्रिय भक्त राहती ॥५६॥
सगुणामृत रूप जें भोगद । मृत तुल्यक मोहप्रद । निर्गुणामृत रूप जें विशद । अमृत भोगकारक ॥५७॥
त्यांच्या संयोगे अमृत । असे स्वस्वरूपयुक्त । तन्मय सागर तेथ वर्तत । स्वस्थाघारे जाणावें ॥५८॥
त्यापासून नंतर निःसृत । नानाविध सगुण जगांत । निर्गुणात्मक त्यांत ख्यात । इक्षुसागर नांवानें ॥५९॥
स्वस्वरूपात्मक असत । तेथ पाणी रक्तवर्णयुक्त । त्याच्या पानें होत । नैर्गुण्य गुणात्मक ॥६०॥
त्यांतून जी धारा अद्‍भुत । मधुधारा नामें ती ख्यात । तिच्या योगें तृप्ति संयुत । सगुण तैसे निर्गुण ॥६१॥
तेथ मीं सिद्धिबुद्धिसहित । क्रीडा करितों आनंदांत । ब्रह्मप्रियादि गुण राहत । मानद माझे त्या स्थानी ॥६२॥
शुंडादंडादि चिन्हें युक्त । मीं सदा तेथ वसत । माझें अन्यगण तैसे भक्त । स्वेच्छारूप तेथ राहती ॥६३॥
ऐसें तुज कथिलें समस्त । माझ्या लोकींचें सुख उदात्त । मानयुक्त मानहीन असत । स्वहृदयांत पाहे मला मुने ॥६४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते स्वानंदलोकवर्णनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP