खंड ५ - अध्याय ३८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । गृत्समद मानसपूजा करित । ती सांगतों आता विस्तूत । प्रातःकाळीं तो गजाननास प्रार्थित । भूपाळीसम श्लोक गाई ॥१॥
विघ्नेशा तुझे पराक्रम अद‍भुत । गाती मागध बन्दिजन एकचित्त । ऐकून यशोगान सांप्रत । ऊठ आता गजानना ॥२॥
या ब्राह्म मुहूर्ती झोपेतून । जागा होई तूं प्रसन्न । जगताचें मंगल शूभचिंतन । करी आता दयाळा ॥३॥
गृत्समद म्हणे मीं ऐसें प्रार्थित । तैं विघ्नराज चित्तें उठत । बाहेर पडून दर्शन देत । त्यास नमिती शंभू देवादी ॥४॥
योगिप्रमुख त्यास वंदित । तैसाच मीही प्रणाम करित । तदनंतर मीं त्या देवा सांगत । शौचादिक सर्व खरी आतां ॥५॥
कल्पनेनें तें मानित । हेरंबास दंतधावनार्थ जल देत । वस्त्रानें त्याचें मुखकमल पुशिल । नंतर सभेंत बसवीतसें ॥६॥
द्विजादि सर्वांनीं अभिवंदित । शुकादींनी मोदकप्रसादें पूजित । संभाषण करून निरोप घेत । तैं मंडप एक कल्पितसे ॥७॥
सुदिप्त रत्नांनी प्रतिबिंबित । मनानें विनायकास पाहत । आसन रत्न सुवर्णयुक्त कल्पित । देवास तेथ बसवितसे ॥८॥
देवा तूं सिद्धिबुद्धिसहित । विघ्नराजा तुझे मी पाय धूत । प्रेमभरें मी सुगंधित । जल वापरिलें तें स्वीकारी ॥९॥
सुखकर ऊन पाणी देत । मनानें मी तें स्वीकारी सांप्रत । शुद्ध वस्त्रानें पुशित । गणेशा पाय तुझे मीं ॥१०॥
तदनंतर दूर्वादिकांनी अर्चन । करीतसे चित्तानें कल्पून । भावप्रिया दीनबंधो विलीन । करी मन माझें तव पदाब्जीं ॥११॥
कापूर वेलची घालून । सुवासित उदक कल्पून । देई तुजसी आचमन । स्वीकारून कृपाकटाक्ष टाकी ॥१२॥
त्वरित करी अवलोकन । कृपापूर्ण असोत तव नयन । प्रवाल मुक्ताफल हारांनी शोभन । अंतर्भावें सजवीन तुला ॥१३॥
बहुमोल अर्घ्य तुज देत । तो ढुंढे स्वीकारावा प्रेमयुक्त । शुद्ध त्रियुक्त मधुपर्क संकल्पित । भावयुत तो स्वीकारी ॥१४॥
परिकल्पित तोयानें आचमन । विनायका तूं करून । भक्तेशा रक्षी भक्तजन । त्वरित येथ स्नेहानें ॥१५॥
चंपाक जाई आदींनी युक्त । सुगंधी तेल मी कल्पिलें असत । ढुंढे तें स्वीकारी त्वरित । तुझें सर्वांग चेपीन नंतर मीं ॥१६॥
आनंददा तदनंतर । सुखोष्ण जलानें सुखकर । सर्वतीर्थांचें ओतून नीर । मनानें स्नान घालतो तुला ॥१७॥
त्या शुद्ध स्नानाचा करी स्वीकार । तदनंतर दुधाचें स्नान रुचिर । अचिंत्यभावा तुज घालणार । पुनरपि स्नान शुद्ध जलें ॥१८॥
त्यानंतर घालीन दहयाचें स्नान । आरोग्यपूर्णा तुज कल्पून । पुनरपि शुद्ध जलाचें स्नान । तदनंतर तुपाचें स्नान घालूं ॥१९॥
अपारवंद्या सुतीर्थज घृतस्नान । विघ्नहरा स्वीकारून । तदनंतर शुद्ध पाण्यानें स्नान । स्वीकारून प्रसन्न होई ॥२०॥
तदनंतर मधाचें स्नान । पुनरपि स्वीकारी जलस्नान । साखरेचें तेंही स्नान । मीं कल्पिलेलें स्वीकारावें ॥२१॥
पापहारका गणेशा स्वीकारी । पुनरपि स्नानार्थ शुद्ध वारी । मायाभ्रमातें दूर करी । सत्वर देवा गजानना ॥२२॥
सुयषपंकस्थ स्नान । स्वीकारी परेशाधिपते प्रसन्न । कमंडलूतल्या जलानें स्नान । विशुद्ध तुजला कल्पिलें मीं ॥२३॥
दुधानेम तैसें तीर्थजलानें । दुर्वादिक अल्पभावें पूजिणें । ब्राह्मणस्पति सूक्त अगणित जपणें । अभिषेक विधींत देवा तुझ्या ॥२४॥
तदनंतर अंग पुसण्यास । देतसें मी शोभन वस्त्रास । तें स्वीकारी मम मानस । कल्पून तुज हें सर्व देई ॥२५॥
तदनंतर विशुद्ध जलानें आचमन । करावें विघ्नराजा तूं मुदितमन । अग्नीत जीं झालीं पावन । ऐसी बह्ममोल उत्तरीयें ॥२६॥
स्वीकारी भक्तीनेम कल्पित । नभ जैसें तारकांनी अंकित । त्रिगुण स्वरूप यज्ञोपवीत । सुवर्णाचें तुज सर्प राजाचें ॥२७॥
उद्‍धृत्तिकारणार्थ हें सूत्र । गणनाथा स्वीकारी वेदोक्त । तदनंतर आचमन करी पवित्र । मी कल्पिल्या तीर्थजलानें ॥२८॥
ढुंढे कमंडलूतील भावजल । त्यानें विश्व रक्षी जो तुझा खेळ । तैसाचि शेंदूर स्वीकार अमल । उगवत्या सूर्यासम रंगीत ॥२९॥
त्यानें सर्वांगाचें लेपन । हेरंबा करी परिपूर्ण । सहस्त्रशीर्ष मनानें जपीन । तोच सुवर्ण किरीट तुझा ॥३०॥
अनंत रत्नांनी  तो जडित । मस्तकाची शोभा वाढवित । ऐसा हा मनाने कल्पित । मुकुट देवा स्वीकारी ॥३१॥
विचित्र रत्नांनी युक्त । सुवर्णाचां जी केलीं असत । ऐशीं नाना पदकुंडलें कल्पित । शूर्पश्रुति भूषणा स्वीकारी ॥३२॥
तुझी सोंड सजविण्यास । सुवर्ण कंचुक रत्नखचित सरस । देतों तें स्वीकारी भक्तीसस । मानसिक या मान्य करी ॥३३॥
सुवर्णरत्नयुक्तें आभरणें । कल्पिलीं मीं तुजकारणें । ढुंढे एकदंता ती स्वीकारणें । दन्तशोभा वाढविण्यास ॥३४॥
परेशा तुझ्या चार बाहूंवर । विघ्नहर्त्या घातली सुंदर । रत्न सुवर्णमय कडीं चार । मानस संकल्पानें या ॥३५॥
विचित्र रत्नखचित सुवर्णाची आंगठी । ती घाल करांगुलीत जगजेठी । रत्नखचित केयूरें दंडावरतीं । मी कल्पिलेलीं घाल देवा ॥३६॥
प्रवाळ मोतीं रत्नांच्या माळा । सोन्याच्या दोर्‍यांत गुंफिल्या गळां । चित्तें परिकल्पित त्या कृपाळा । स्वीकारी तूं विघ्नराजा ॥३७॥
वृद्धिक्षयविहीन जो असत । ऐसा पूर्ण चंद्र ललाटीं विराजत । गणनाथा शोभवी त्यानें देहकान्त । भक्तिप्रियत्न प्रकट करी ॥३८॥
चिंतामणि जो  देई चिंतित । परेशा हृदयावर विलसत । सदानंद सुखप्रद निःशेष वर्तत । दीननाथा धारण करी ॥३९॥
नाभीवरी फणींद्र संवेष्टन । गणाधिनाथा सहस्त्रसीर्षी लेवून । भक्तांस भूषची वर देऊन । परेशा फलप्रद कृपाप्रसादें ॥४०॥
कटिप्रदेशीं रत्नसुवर्णयुक्त । कांची घालितों मी सुचित्त । विघ्नेशा ती ज्योतिर्गण दीपिनी असत । मज भक्तासी रक्षावें ॥४१॥
दयाब्धे गणेशा तुजप्रत । रत्नसुवर्णयुक्त मंजीर नूपुर वाहत । किंकणींचा नाद शोभन वाटत । दोन्हीं पायावरी तुझ्या ॥४२॥
सुबुद्धिपूर्वक हें सर्व दिलें । मानसानें जें कल्पिलेलें । नाना विभूषणादिक पाहिजे स्वीकारलें । भक्तेच्छेला मान देऊन ॥४३॥
तुझ्या अंगावरी घालित । ढुंढे भूषेस्तव रत्नादि धातुयुक्त । अलंकार विविध शोभायुक्त । आतां चंदन लावितों तुला ॥४४॥
रक्तचंदन अमोघ वीर्ययुत । उगाळलें मीं अष्टगंधयुक्त । एकदंता तें अंग विलेपन अर्पित । स्वीकार करी तयाचा ॥४५॥
अष्टगंधांनीं तव अंगें लिप्त । करून भालावर काढित । रक्त वर्तुळ चित्त कल्पित । विनायका मज संरक्षी ॥४६॥
कुंकुमरक्त अक्षता कल्पित । तुपांत माखून तव भाळीं लावित । गणाध्यक्षा स्वीकारी सांप्रत । दीनबंधो भक्तास रक्षावें ॥४७॥
चांफा मालती स्थल कमलें । मल्लिका तैसीं जलकमलें । वाहिलीं मी रक्तकमलें । गणेशा तीं स्वींकारावीं ॥४८॥
मनानें हीं फुलें वाहून । त्यावरी मंदारशमी दलांचें भूषण । असंख्य तुज मनानें वाहून । प्रणवाकृते तुज पूजितसे ॥४९॥
पांच अथवा तीन पानांनी युक्त । श्वेत दूर्वांकुर मनःकल्पित । विश्वेश्वरा तुज असंख्य वाहत । सर्वांवरी त्या स्वीकारी ॥५०॥
गणराजा तुझ्या प्रीतीस्तव । दशांगभूत धूप अभिनव । अर्पिला मीं अग्नींत सौरभकर । सिद्धिबुद्धिसहिता स्वीकारी ॥५१॥
परेशा दीप उत्तम वात घालून । लाविला कापूर जाळून । तेल तुपादिक घालून । अमोघदृष्टे तो स्वीकारावा ॥५२॥
भोज्य लेहय पेय चोष्य । षड्रस अन्न तुज जें प्रिय । नानाविध गणराजा स्वीकार्य । हेरंबा नैवेद्य स्वीकारी ॥५३॥
पुष्टिपते तदनंतर भोजनमध्यांत । सुवासिक जल तुज अर्पित । विश्वादिक तृप्तिकरा तुजप्रत । सदा आत्मतीर्थरूप स्वीकारी ॥५४॥
तदनंतर देत करोद्वर्तन । हातास सुगंगी द्रव्य लावून । सुवासित तीर्थजलें मुखमार्जन । कल्पिलें ढुंढे भक्तीने ॥५५॥
आचमन करून तीर्थ जलपान । करी जें कल्पिलें प्रसन्न । तदनंतर हात आणि मुख प्रक्षालन । करावें देवा विघ्नेशा ॥५६॥
भोजनानंतर स्वीकारी फलाहार । द्राक्षें केळीं आंबे खजूर । डालिंबें नारिंगे अतिमधुर । स्वादयुक्त ढुंढे कल्पिला मीं ॥५७॥
पुनरपि जलादिकानें प्रक्षालन । तुझ्या हातांचें करून । देतों तुज सुवासित जलपान । स्वीकारी तें परेशा ॥५८॥
गणनाथा विडा अष्टांगयुक्त । देतों नंतर तुज कल्पित । मुखशोधनार्थ नाथा भक्तदत्त । स्वीकारी तो विघ्नेश्वरा ॥५९॥
तदनंतर कल्पिलें महा आसन । रत्न सुवर्णयुक्त छान । शमी कापसाच्या वस्त्रें आच्छादन । त्याचा स्वीकार करावा ॥६०॥
परेशा तुझ्या अंगावर आवरण । नाना उपचारें कल्पून । परमप्रयि तुज अर्पून । अनाथबंधो तुज पूजितसें ॥६१॥
अमित दक्षिणा मनें कल्पित । सुवर्णरत्नादींनी युक्त । प्रभो तुज मी अर्पित । हया सर्व जगातें संरक्षी ॥६२॥
राजोपचार विविध अर्पित । छत्र घोडे हत्ती आदिक रूपांत । स्थिर जंगम सारे चित्तदत्त । गणनाथा तें स्वीकारी ॥६३॥
गोदानभूदान स्थिर जंगम दान । नानाविश्वरूप वायूंचें प्रदान । मनानें मी दिलें तुज एकमन । हेरंबा मोहापासून रक्षी ॥६४॥
मंदारपुष्पें शमीदलें दूर्वांकुर । मनें वहिलें तुज समग्र । दीनपाल हेरंब तूं लंबोदर । त्यांचा स्वीकार करावा ॥६५॥
मज तुझा भक्त करावा । हळद अबिर गुलाल शेंदूर स्वीकारावा । सुवासित वस्तूंचा घ्यावा । उपहार ब्रह्मेश्वरा शोभेसाठीं ॥६६॥
तदनंतर शुकादि शिव विष्णुदेव । शेषादि तैसे अन्यही अमर । मुनींद्र सेवाभावपर । सभासनस्थ ढुंढीस प्रणास करिती ॥६७॥
गणेशाच्या डाव्या बाजूस स्थित । सिद्धि जी नाना शक्तियुक्त । मायास्वरूपा परमार्थभूत । भक्तिभावें सेवा करीतसे ॥६८॥
उजव्या बाजूस उभी राहून । बुद्धि सुबोध कलायुक्त एकमन । विद्यांनी भजते परेशा प्रसन्न । माया सुसांख्य़प्रद चित्तरूप ॥६९॥
गणेश्वराच्या मागें उभे राहत । प्रमोद मुख्य भावयुत । मुद्‍गल शंभु मुख्य भक्तेश्वर भजत । पुढें उभे राहून ॥७०॥
गंधर्वमुख्य करिती मधुर गायन । विश्वेशगीत अति प्रसन्न । अप्सर पुढयांत नृत्यगान । करिती विविध कलायुक्त ॥७१॥
ऐशा नानाविध भावें युक्त । सेवून विघ्नपतीस मीं भजत । चित्तपूर्वंक ध्याऊन ओवाळित । नीरांजनें नानादीप युक्त ॥७२॥
तो गणेश चतुर्भुज पाशधर । अंकुशधारी एकदन्त त्रिनेत्रधर । अभयमुद्राधर महोदर । एकरद गजानन ॥७३॥
सर्पाचें यज्ञोपवीत । गजकर्णधर विभूतियुक्त । ज्याचे पादपद्‍म शवितगण सेवित । ऐश्या परेशास मीं ध्यातसे ॥७४॥
शक्तियुक्त तो संपूजित । विविध प्रकारें भक्तियुक्त । तदनंतर स्वमूळ मंत्राचा करित । मनानें जप मीं असंख्यात ॥७५॥
तो गणराजाच्या हातांत । मीं भक्तिभावें समर्पित । तदनंतर कापूर पारदयुक्त । दीप ओवाळून आरती करी ॥७६॥
निज भक्तांचें अज्ञानपातक । जो हरण करी सुखकारक । ऐशा लंबोदरा मी विनयपूर्वक । प्रार्थितसें भावभक्तीनें ॥७७॥
विघ्नेश्वराचे मंत्र जपून । मंत्रिलीं पुष्पदळें घेऊन । मंत्रपुष्प अपार आवृत्त्या म्हणून । अर्पिला मीं तो स्वीकारी ॥७८॥
श्रुतिस्मृति पुराणोक्त । स्तुति विघ्नेशा तुझा गात । एकदंता आवर्तनें असंख्यात । मनानें मीं करीतसे ॥७९॥
परेशाधिपते प्रदक्षिणा घालित । मनानें मी असंख्यात । लंबोदर मी भावयुक्त । स्वीकार करी तयांचा ॥८०॥
दासांचें सदा करी रक्षण । स्नेहानें संसार सागरांतून । तदनंतर माझें साष्टांग नमन । विविध परीचें स्वीकारी ॥८१॥
विघ्नपते असंख्य नमस्कार । मनानें मी करित एकाग्र । सिद्धिबुद्धियुक्ता रक्षण कर । मानस पूजा स्वीकारी ॥८२॥
जें कांहीं न्य़ूनातिरिक्त । राहिलें असेल पूजेंत । तें घेई मानून कृपायुक्त । दूर्वांकुर तुज अर्पितसें ॥८३॥
त्या दूर्वाकुरानें माझें पूजन । विघ्नेश्वरा होवो संपूर्ण । माझे विविध अपराध क्षम्य करून । भक्ति माझी सफल करी ॥८४॥
मी मनानें तुज पूजित । माझे अपराध असंख्यात । क्षमा करी देवा मजप्रत । तुझा प्रसाद मज लाभला ॥८५॥
मजवरी होऊन प्रसन्न । प्रसाद देई जो गजानन । तो शिरोधार्थ मानून । विघ्नेश्वरापुढें मीं विनत ॥८६॥
तदनंतर गणेस वरती उठत । सभा सोडून तैं जात । अंतर्धान शक्तीनें अन्तर्गृहांत । शिवादिक त्यास प्रणास करिती ॥८७॥
तदनंतर सर्व जाती निघून । त्या सर्वांचें मी करी चिंतन । सर्वांस नमस्कार करून । गणाधिपाचें भजन करी ॥८८॥
पुनरपि स्वस्थानीं येऊन । गणेश भक्तांसवें खेळतसे प्रसन्न । ऐसें त्रिकाळ करी पूजन । प्रातःकार्ळी माध्यान्हीं सायंकाळीं ॥८९॥
गणाधिपास मीं नित्य भजत । भक्तिभाव तो देवो मजप्रत । तुष्ट होऊन सतत । ऐसें चित्तीं वांछितसे ॥९०॥
विघ्नेशाच्या चरणांचें तीर्थपान । त्याच्या राहिल्या गंधानें अनुलेपन । निर्माल्य शिरीं करि धारण । लंबोदरा भुक्तशेष प्रसाद घेई ॥९१॥
जें जें मी कर्म करित । ती ती दीक्षा गणेश्वराची जगांत । मी ब्रह्मपते तुझा पदनत । रक्षी दयाळा मज भक्ता ॥९२॥
मंदार कार्पासयुक्त शय्या कल्पित । तुजसाठी मीं बहुमोल सांप्रत । नाना पुष्पांनी अर्पित । विघ्नेशा आतां निद्रा करी ॥९३॥
गणेश सिद्धिबुद्धिसहित । जेव्हां निद्राधीन होत । तैं तें पाहून मीं जात । आपुल्या निवासीं परतून ॥९४॥
ब्रह्मपतीचें ह्रदयांत ध्यान । चिरकाळ मीं करी एकमन । तदनंतर । करीतसे शयन । निद्रासुख उपभोगण्या ॥९५॥
अमोघशक्ते ईशा मजप्रत । ऐसें मानसपूजेचें सौख्य जगांत । देवा गणेशा देई सतत । तेणें रसलालस कृतार्थ मीं ॥९६॥
गार्ग्य म्हणे ऐलाप्रत । ऐसा तो गृत्समद नित्य पूजित । मानसपूजा योगींद्रा भावयुत । हें सारें तुज सांगितलें ॥९७॥
जो नरोत्तम ही मानसपूजा करित । भक्तिभावें वा वाचित । तो गाणपत्य होईल नि़श्चित । पुण्यवंत भक्तियुक्त ॥९८॥
जो हें लोकांस वांचून दाखवित । तैसेंच जो हें ऐकत । तो क्रमानें ब्रह्मभूत । होईल नृपा निःशंशय ॥९९॥
जें जें इच्छी तें तें सफल होत । अंतीं स्वानंदलोकीं जात । योगिवंद्य होऊन प्रख्यात । म्हणोनि नित्य ग्रंथ वाचावा ॥१००॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते गृत्समदप्रोक्तमानसपूजाकथनं नामाष्टत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP