खंड ५ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणे सूताप्रत । लंबोदर माहत्म्य तुज ज्ञात । सुखप्रद ते शांतिप्रद अमुत । मुखकमळातून स्त्रवतें तुझ्या ॥१॥
लंबोदराचें महिमान । ऐकिलें आम्हीं क्रोधनाशक परम । ऐकण्या समुत्सक असे मन । भावबळें अधिकची ॥२॥
म्हणोनि हे महाभागा सांप्रत । विघ्नेशाची सत्कथा आम्हांप्रत । दक्षें जी ऐकिली पुण्ययुक्त । उद्योगसागर मुद्‍लमुखें ॥३॥
सूत ही प्रार्थना ऐकून । म्हणती शौनका तूं महान । ऐक कथामुत पावन । द्क्ष मुद्‍गल संवादरूप ॥४॥
लंबोदराची कथा ऐकत । प्रजापति तैं रोमांचित । मुद्‍गलासी प्रणाम करून विनवीत । हितकारक वचनानें ॥५॥
मुद्‍गला तूं धन्य अससी । योगिवंद्या मज सांगसी । कल्याणदायिनी कथांसी । हर्षवर्धक निःसंशय ॥६॥
हया अमृतासम कथा ऐकून । माझी तृप्ति न होय अजून । म्हणोनि गणपतीचें चरित्र महान । योगींद्रा मज पुढती सांगा ॥७॥
लंबोदर शक्ति रूप कैसा होत । त्याचा सांगावा वृत्तान्त । मुख्य चरित्र जें सर्वार्थ देत । ऐकतां भावपूर्ण श्रोत्यांसी ॥८॥
शक्तीनें हयास आराधिलें । महिषासुर वधसमयीं स्तविले । तेव्हां लंबोदर प्रकट झालें । कैसे तें मज सांगावें ॥९॥
गणनायक शेषाचा पुत्र झाला । मायाकराचा नाश करण्याला । मूषकावरी आरूढ झाला । केव्हां तें सर्व मज सांगा ॥१०॥
सावर्णि मनू आराधित । केव्हां या देवास भावयुक्त । शक्ति गणेश अवतार होत । कोणत्या काळीं कां तें सांगा ॥११॥
करुणानिधे हें समस्त । विस्तारें सांगा मजप्रत । लंबोदराचे अवतार असंख्यात । ऐकतां सुख वाटे प्रभो ॥१२॥
योगींद्रा गाणपत्या स्वरूप । तैसेंचि कैसा असे हा गणप । दीक्षा युक्त विशेषरूप । कैसा तेंही सांगावें ॥१३॥
पूजा त्याची कैशी करिती । गणपति मंत्र कैसा घेती । गुरुमुखांतून ती रीती । विधियुक्त गाणपत्य मार्ग सांगा ॥१४॥
हें सर्व विस्तारें ऐकून । दीक्षा स्वयं घेऊत । गाणपत्य मी होईन । जाणीन गाणपत्य श्रेष्ठांसी ॥१५॥
म्हणोनि विप्रर्षे तूं मजप्रत । सर्वज्ञा हें सर्व सांग सांप्रत । महाभाग्यानें लाभलें सर्व संतोषप्रद अवचित । दर्शन तुझ्या पादकमलांचे ॥१६॥
सूत शौनकासी सांगत । दक्ष जेव्हां ऐसें विनवित । तेव्हां तो महायोगी सांगत । भावतुष्ट गणपप्रिय ॥१७॥
धन्य तूं दक्षा असती । म्हणोनि गणेशकथांचें श्रवण इच्छिसी । गणपतीवरी अद्‍भुत ऐसी । प्रीती तुझी जडली असे ॥१८॥
तुझी भक्ति पाहून संतोषित । पावनी कथा सांगेन तुजप्रत । जी श्रोत्यास वक्त्यास सुखवित । गणेशपूजाच जी वाटे ॥१९॥
आदि ब्रह्म जें उक्त । तेंच ब्रह्मांत झालें स्थित । स्वेच्छा त्याच्या चित्तांत । स्फुरोनि माया जन्मली ॥२०॥
ते ब्रह्म द्विविध होत । स्वतः उत्थान एक असत । परत उत्थान अन्य असत । सुयोगदाते तें ऐक ॥२१॥
सदा नाना माया विवर्जित । स्वसुनिष्ठेनें परत उत्थान उक्त । माया खेळकर स्वेच्छामय वर्तत । स्वतः पासून उत्थित तें ॥२२॥
वेदांत ऐसें असे वर्णित । स्वयं उत्थानक विकल्प ख्यात । त्या विकल्पापासून दोन होत । एक तैसें अनेक ॥२३॥
एक तें आत्मरूप । बहु तें शरीर स्वरूप । त्यापासून चतुर्विध दुराप । चराचर जग निर्माण ॥२४॥
हे एकदां ब्रह्मगण समस्त । सामर्थ्यहीन आपापल्या कर्मांत । म्हणोनि ते तप आचरित । मनोभावें त्या वेळीं ते ॥२५॥
जें जें ज्यांचें स्वरूप असत । त्या त्या स्वरूपा नमन करित । मंत्र तद्वाचक जपत । परेश्वर ते सारे ॥२६॥
दिव्य सहस्त्र वर्षें तप ते करिती । तेव्हां गणनायक प्रसन्न होती । नरकुंजर रूपें प्रकटती । ह्रदयांत गजवदन ॥२७॥
त्यास पाहून ज्ञानसंपन्न । त्वरित झाले ब्रह्मगण । तदनंतर लावून ध्यान । हृदयांत त्यास पूजिती ते ॥२८॥
त्यांच्या पुढे प्रकट जाहला । साक्षात्‍ शक्तिरूप घेऊन त्या वेळी । वरदायक प्रसन्न भला । अन्य स्वरूप दावी त्यासी ॥२९॥
चार बाहुयुक्त देवीरूपांत । दर्शन देई सर्व अवयवयुक्त । स्तनभारें जी वाकली बहुत । परमात्मिका शोभिवंत ॥३०॥
तिजला पाहून सारे विस्मित । आपुल्या हितामाजीं जे रत । कोण तूं कां येथें येत । ऐसे तेव्हां विचारिती ॥३१॥
श्रीदेवी तैं त्यास म्हणत । मी गणेश असे निश्चित । महाभागांनों ज्याचें मनांत । ध्यान करितां तपें करुनी ॥३२॥
तुमच्या तपप्रभावें तोषून । आलों मीच वरदाता गजानन । ऐसें सांगून ती शक्ति महान । गजवक्त्ररूप धरितसे ॥३३॥
जेव्हां लंबोदरासी पाहती । सर्वही विस्मित झाले चित्तीं । ते स्तोत्र पाठ प्रारंभ करिती । तत्क्षणीं स्त्रीरूप घेई पुनः ॥३४॥
त्या स्त्रीरूपासी पाहून । ब्रह्मगण समस्त विस्मितमन । गणेशकृपेनें ज्ञान लाभून । जाणती त्याचें कर्तृत्व ॥३५॥
लंबोदर स्वर्य शक्तितरूपें प्रकटत । जी शक्ति तो गणेश वर्तन । लंबोदरात्मिका ती असत । सर्व जनांची परम जननी ॥३६॥
तदनंतर तिज प्रणास करून । करिती हात जोडून स्तवन । प्रजानाथ तैसे ब्रह्मगण । रोमांचित झाले विशेषें ॥३७॥
ब्रह्मगण स्तवन करिती । शक्तिरूप देवीस प्रणती । सर्वांच्या क्रियात्मरूप विनीतमती । नमन जगदंबे तुला ॥३८॥
सर्वसत्ता प्रदात्रीस । अपरेस तैसें सर्वदेस । भक्तीनें स्वाधीन रूपा देवीस । महामाये तुज नमन ॥३९॥
सदा स्वानंद संस्थेस । जगब्रह्म प्रचालिकेस । नानाभेदधारिकेस । विघ्नेशे तुज नमो नमः ॥४०॥
अमेयेसी कर्त्रीसी । पालन कर्तीसी भक्तरक्षणपरेसी । संहारकर्तीसी गणेशेसी । नमन आमुचें पुनःपुनः ॥४१॥
तुझ्या उदरांतून उत्पन्न । जगद्‍ब्रह्म जाहलें पावन । तेच तुझें सृष्टिरूप उदर महान । मनस्कार तुज वारंवार ॥४२॥
तूं स्तनपानानें पोषण करिसी । स्थितिरूपा तूच अससी । अंतीं प्रलयकाल जाणसी । संहारक मुख तुझेची ॥४३॥
तूंच मनोवाणी विहीन । तूंच भक्तवत्सल परम महान । स्वयं देह धारण करून । भक्तेशे तुज नमन असो ॥४४॥
किती करावी स्तुती । महामाये तूंच शक्ती । सर्वत्र शक्तिभावें स्थित अससी । नमन तुजला पुनः पुन्हा ॥४५॥
वेदांची योगांची जी शक्ती । ती तुझीच देवी जगतीं । तुज स्तविण्या समर्थ अवनीवरती । कोण असे नमन तुला ॥४६॥
ऐसी स्तुति करिती । ब्रह्मगण तैं जगन्माता चित्तीं । संतोष पावून म्हणे तयांप्रती । भक्तिभावें प्रसन्न ॥४७॥
अरे ब्रह्रगणांनो वर । मागा जो जो मी उदार । देईन तो तो सत्वर । तुमच्या स्तोत्रें संतुष्ट मी ॥४८॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र । सर्वार्थद होईल पवित्र । सर्वसामर्थ्यदायक सर्वत्र । महाभागहो भक्तिप्रद हें ॥४९॥
हें स्तोत्र जोवाचील । त्यास इच्छित सारें लाभेल । भुक्तिमुक्तिप्रद होईल । स्तोत्र हें यांत न संशय ॥५०॥
ऐसें शक्तींचें वचन । ऐकुन ब्रह्में करिती वंदन । म्हणती संतुष्ट होऊन । त्या परम मातेसी ॥५१॥
वर देण्या तूं इच्छिसी । तरी उत्तम भक्ती तुझी आम्हांसी । देई शक्तिदेवि जेणें मोहासी । अवकाश ना मिळेल ॥५२॥
जें आमुचें कर्तव्य वर्तत । त्यांत उत्तम सामर्थ्य दे सांप्रत । तुझें प्रिय तें करूं जगांत । तेव्हां शक्ति त्यांस म्हणे ॥५३॥
तुमचें पूर्ण होईल इच्छित । ऐसें सर्वरात्री ती सांगत । तदनंतर अंतर्धान पावत । ब्रह्में सारीं सृष्टी निर्मिली ॥५४॥
शक्तिवरदानें निर्मिती । चराचर विश्व भावभक्ती । आपापल्या भोगांची प्राप्ती । करून त्यांत करिती क्रीडा ॥५५॥
विश्वें पाळिती संहारिती । आपापल्या महिम्यांत त्यांची स्थिती । यांत संशय नसे जगतीं । ऐसा हा अवतार पुरातन ॥५६॥
दक्षा शक्तिरूप तुज सांगितला । लंबोदर स्वयं शक्ति झाला जो हें आख्यान ऐके त्या नराला । लाभेल सर्व भुक्तिमुक्ति ॥५७॥
सर्वार्थ त्यास लाभून । ब्रह्मभूत तो होईल महान । मुद्‍गलासी म्हणे वचन । दक्ष प्रजापती पुनरपी ॥५८॥
सूत कथा शौनकासी सांगत । मुद्‍गलाचें वचन ऐकत । तो दक्ष हृष्टचितें म्हणत । उपकृत केलें मुद्‍गला मज ॥५९॥
शक्तिसंभव महिमान । ऐकिलें मीं पावन । परी संशय एक राहून । मन माझें भ्रान्त झालें ॥६०॥
तो संशय दूर करावा । सत्य वृत्तान्त मज सांगावा । ब्रह्में जरी देह्हीन तरी व्हावा । तपादिक यत्न शक्य कैसा ॥६१॥
जरी तीं देहिहीन । तरी कैसें करिती स्तुति पूजन । नयनांत अश्रू दाटून । रोमांचित तीं होतात कशीं ॥६२॥
त्याचें तें ऐकून वचन । महामुनि सांगे प्रसन्न । सर्वज्ञांचा शिरोमणी शोभन । प्रजानाथा दक्षासी ॥६३॥
ब्रह्में ब्रह्मभूत असती । त्यांना देहदेहीमय भाव नसती । ऐसें श्रुति वचनें सांगती । सत्य सत्य त्रिवाचा ॥६४॥
तीं परी सर्व सवें घेती । देह विचारहीन असती । देहिरूपें सर्वत्र वर्तती । त्यांची शक्ति अगम्य ॥६५॥
सर्व संभवें त्या ब्रह्मांत । त्यांचें भाव वर्णनातीत । भोगादिक तप आदि सांगत । देहयुक्त म्हणोनी ॥६६॥
हें शिष्याच्या बोधार्थ सांगत । यांत न धरावा संशय मनांत । ही सारी ब्रह्मशक्ती वर्तत । जी देहदेहीहीन असे ॥६७॥
परी देहधारी वाटत । बोध करण्या शिष्याप्रत । मुद्‍गल वचन ऐकतां होत । दक्षही संशयातीत तैं ॥६८॥
लंबोदराचें माहात्म्य सांप्रत । सांगे सर्वज्ञा मजप्रत । मीं जें प्रार्थिलें तें तें भावयुक्त । निःसंशय पूर्ण करी ॥६९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते शक्तिरूपावतारवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP