खंड ५ - अध्याय ८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । ब्रह्मदेव कथिती वृत्तान्त । लंबोदराप्रती तैं क्रोधासुर म्हणत । अरे तूं या रणांगणांत । कां आलास महामूर्खा ॥१॥
देवांचें हित इच्छिसी । परी लंबोदरा तूं न जाणसी । आणुल्या मुकशील तूं प्राणांसी । व्यर्थचि माझ्या समोर ॥२॥
ज्यानें ब्रह्मांड जिंकिलें । देवादींस पशुतुल्य वनवासी केलें । त्या मज जिंकण्या इच्छिलें । जरीं तें व्यर्थ सारें ॥३॥
माझा क्रोध चराचरास जाळील । त्यापूढें तुझा काय पाड चालेल । परी संग्राम करण्या या वेळ । धाडस कैसें करिसी तूं ॥४॥
तूं माझें सैन्य वधिलें । सुतद्वय माझे मारिले । आतां तुझें मरण अटळ झालें । शोकसंतप्त मी या वेळीं ॥५॥
मदोन्मत्ता तुझें हनन । करीन अनायासें सूड साधून । अन्यथा शरण येई मज नमून । रक्षी आपुलें जीवित ॥६॥
जरी शरण मजला न येशील । तरी व्यर्थचि मरशील । माझ्या एका बाणानें फुटेल । लंबोदरा उदर तुझें ॥७॥
ऐशीं अनेक दुष्ट वचनें बोलत । तो असुर निर्भर्त्सना करित । तेव्हां त्या मदोन्मत्तास उत्तर देत । लंबोदर धैर्यानें ॥८॥
अरे दैत्येंद्रा कां करिसी वल्गना । महादुष्टा व्यर्थ तुझी कामना । मज मारण्यासी शक्यता असे ना । कदापि दैत्या तुझ्या हस्तें ॥९॥
मीच स्वधर्म स्थापण्या अवतार । घेतला असे फेडण्या भूभार । धर्मनाशक तूं असुर । वध तुझा मीच करीन ॥१०॥
सूर्याचा वर लाभून । दुष्टकर्मीं रत होऊन । अमित पापें करून । निष्फळ झालें सर्व पुण्य ॥११॥
उत्पत्तिनाश ज्यास असत । त्याच्या हातून तव मृत्यू नसत । मीं अजन्मा अमर असत । ब्रह्मभूत जाण मीं ॥१२॥
सदा मीं स्वानंदनिवासी । कैसा तूं जिंकिसी । मनवाणी विवर्जितासी । सांग क्रोधासुरा तूं ॥१३॥
लंबोदराचें ऐकून वचन । बुद्धिवादयुत प्रसन्न । दैत्यनायक विस्मय पावून । प्रश्न करी तयाप्रती ॥१४॥
जरी तूं न जन्मलास जगांत । देहधारी कैसा सांग सांप्रत । जरी मनोवाणी विरहित । कैसा पाहतों मी तुज ? ॥१५॥
लंबोदर हें ऐकून सांगत । ही माझ्या वामांगीं जी विलसत । ती सिद्धि भ्रांति निर्माण करित । प्राप्तिस्तव लोक उत्सुक नित्य ॥१६॥
दक्षिणांगीं बुद्धि असत । भ्रांतिकरा ती मानवांप्रत । चित्तरूप पंचधा असत । सिद्धी पंचभ्रांतियुक्त ॥१७॥
त्या उभयतांच्या मी पति । करितों नाना विश्वांची उत्पत्ती । महादैत्या नाना ब्रह्में राहतीं । माझ्या उदरीं लीलेनें ॥१८॥
तेणें मी लंबोदर नामें ख्यात । विश्वास निर्मून तें दावित । पाळित माझ्याच उदरांत । सामावून त्या खेळतसें ॥१९॥
म्हणून शरण मजला येई त्वरित । जरी जगण्याची इच्छा मनांत । शुक्राचार्य माझें रूप जाणत । त्यांचा उपदेश कां न मानिसी ?
॥२०॥
मी दैत्यवधाची कांक्षा न करित । देवांचाही वध न इच्छित । स्वधर्मीं जे जे झाले रत । त्या सर्वांचा रक्षक मी ॥२१॥
दैत्यपति ते पाताळांत । मनुष्य भूमिवरी राहत । देव निवसतो स्वर्गांत । आपापल्या आनंदें ॥२२॥
तेव्हां मी स्वानंदलोकांत । आनंदांत निमग्न असत । परी देव जेव्हां क्रोधें वधित । पाताळस्थ दैत्यांसी ॥२३॥
मी दैत्यांस तैं सिद्धि देत । ते तपश्चर्या बळें जिंकीत । महा बळवंत देवांस करित । कर्मखंडन मदोन्मत्त ॥२४॥
असुर कर्मांचा नाश करिती । तेव्हां मी सिद्धिदाता देवांप्रती । दैत्यांचें मर्म जाणून जिंकिती । असुरांसी देव तेव्हां ॥२५॥
अरे क्रोधासुरा तूं जिंकलें त्रिभुवन । देवांचें केलें निकूंतन । सर्वेंद्र तूं होशील म्हणून । धर्मनाशें तूं पापी ॥२६॥
तुज मी ठार करीन ह्यांत संशय अल्पहि न मान । ऐसें त्याचें ऐकून वचन । क्रोधासुर विचारी पुनरपी ॥२७॥
विस्मित होऊन मनांत । क्रोध म्हणे हर्षभरित । लंबोदरा मी तुज शरण सांप्रत । गणाध्यक्षा वंदन तुज ॥२८॥
तूं सुरासुरांच्या पार । आता भक्तियुक्ता मज उद्धार । शरण आलों तुज तूं उदार । पालन करी दयाळा ॥२९॥
आत्मरूप मज दाखवी । सर्व संशय घालवी । लंबोदर अर्थयुक्त पदवी । ब्रह्माकारा तुज गजानना ॥३०॥
लंबोदर तैं तें ऐकून । भक्ति त्याची जाणून । जाहला अत्यंत प्रसन्न । रूप दाखवी आपुलें ॥३१॥
त्या दैत्यास ज्ञानचक्षू देत । त्या ज्ञानचक्षूंनी जेव्हां पहात । क्रोधासुर झाला परम विस्मित । रोमांच फुलले अंगावरी ॥३२॥
ब्रह्मेशास प्रणास करित । महा असुर झाला हर्षित । लंबोदर पूर्व रूप घेत । क्रोधासुर पूजी तयासी ॥३३॥
नमन करून स्तवन करित । प्रमुदित तो प्रतापवंत । आनंदाश्रू सतत वाहत । पुनः पुन्हा स्तुती करी ॥३४॥
लंबोदरा तुज नमन । शांतियोग स्वरूपा वंदन । सर्व शांतिदात्यास अभिवादन । विध्नेशा तुज पुनःपुन्हां ॥३५॥
असंप्रज्ञातरूप ही तुझी सोंड । संप्रज्ञातमय हा देह अजोड । देहधारका द्वार उघड । स्वानंदाचें मजप्रती ॥३६॥
ब्रह्मनायका स्वानंदांत । योगिजन तुज नित्य पाहत । म्हणोनि स्वानंदवासी ख्यात । संयोगधारका नमन तुला ॥३७॥
नानाविध जगें उत्पन्न । झालीं तुझ्या उदरांतून । तूं ब्रह्म तें परम पावन । लंबोदरा यात संदेह नसे ॥३८॥
तुझ्या कृपेनें मज ज्ञात । महोदरा तुझें स्वरूप अज्ञात । तुझ्याहून श्रेष्ठ कोणी नसत । पुनः पुन्हा तुज नमन ॥३९॥
हेरंबासी विघ्नहर्त्यासी । कृपालवासी तन्मयासी । आदि मध्यांतहीनासी । नमो नमः भक्तिभावें ॥४०॥
सिद्धिबुद्धि विहारज्ञासी । सिद्धिबुद्धिपतीसी । सिद्धिबुद्धि प्रदात्यासी । वक्रतुंडा तुज नमन ॥४१॥
सर्वांत्मकासी सर्वादिपूज्यासी । सर्वपूज्यासी भक्त संरक्षकासी । लंबोदरा मी तुजसी । नित्य करितसे नमन ॥४२॥
मी तुझा दास असत । प्रसन्न होई मजप्रत । किती वर्णन करावें मी विनत । अवर्णनीय रूप तुझें ॥४३॥
स्वतःपासून उत्थान । पावून ब्रह्मधारक तूं महान । सर्व भुवनें तव उदरांतून । उत्पन्न झालीं परात्परा ॥४४॥
ऐसी स्तुति करून । महादैत्य करी नमन । गणाध्यक्ष त्यास म्हणे वचन । भक्तजनप्रिय प्रेमानें ॥४५॥
क्रोधासुरा माग वरदान । मनीं इच्छित निःसंकोच मन । या स्तोत्रें मीं संतुष्ट प्रसन्न । देईन जें जें मागशील ॥४६॥
तूं रचिलेलें हों स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद होईल पवित्र । जो वाचील तया सर्वत्र । क्रोधापासून भय नसे ॥४७॥
अथवा जो हें स्तोत्र ऐकेल । त्यासही ऐसें फल लाभेल । जें जें इच्छिलें तें तें मिळेल । स्तोत्रपाठका सर्वदा ॥४८॥
क्रोधासुर हें ऐकून । विनीत भावें बोलें वचन । लंबोदरा जर तूं प्रसन्न । वर देण्या मज समुत्सुक ॥४९॥
तरी तुझ्या पदकमलावरी । भक्ति जडावी दृढ ऐसें करीं । तुझी सेवा सांगून उद्धरी । स्थान वृत्ति सांग सांप्रत ॥५०॥
मी कोठें वास करावा । उपजीविकेचा मार्ग बरवा । देहपोषणार्थ सांगावा । लंबोदरा तू मज लागीं ॥५१॥
ब्रह्मदेव म्हणे हें वचन । ऐकून झाला देव प्रसन्न । त्या दैत्यनायकास आनंदून । वर त्या वेळीं दिला त्यानें ॥५२॥
माझी दृढ भक्ति उपजेल । तुझ्या चित्तांत निर्मळ । अनघा राही सबळ । ऐसें स्थान तुज सांगतों ॥५३॥
जेथ कार्यारंभीं मज न स्मरती । तेथ करी तूं वसती । महादैत्या त्यांचें पुण्योद्‍भव कर्म जगतीं । भक्षण करी ममाज्ञेनें ॥५४॥
त्यांचें ज्ञानादि सफल । तुझ्या अधीन विकल । परी माझे जे भक्त विमल । त्यांस रक्षी कटाक्षें तूं ॥५५॥
गाणपत्यप्रिय तूं होशील । यांत संशय नसेल । ऐकतां हें वरदान अमल । परम आनंद क्रोधासुरासी ॥५६॥
तो लंबोदरास प्रणास करून । गेला स्वस्थानीं परतून । राहुमुख्यादि दैत्यही भय सोडून । पाताळांत प्रवेशले ॥५७॥
शुक्राचार्य झाला मुदित । क्रोधासुर झाला शांत । गणनायकाचा हा प्रताप असत । गणेश भक्तींत क्रोध रमला ॥५८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते क्रोधासुरशांतिवर्णनं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः  
। श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP