खंड ५ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


ब्रह्मा कथा पुढती सांगता । प्रमुख स्तोत्रांनीं गणेशा स्तवित । भक्तवत्सला त्या सिद्धिदा स्मरत । विष्टरश्रवा आनंदें ॥१॥
नंतर मोहिनीरूप सोडण्या उद्यत । त्या क्षणीं सर्वदेव शिवास प्रार्थित । भस्मासुर जाहला मृत । हें ऐकून शिव तोषला ॥२॥
भक्तिभावें तैं नाचत । जय विघ्नेश जय गजानन म्हणत । सर्व देवगणांसहित । मुकुंदकपुरास गेला ॥३॥
तेथ नारी रूपांत जो वर्तत । ऐशा त्य विष्णूस शिव अवचित । विष्णूचें मोहक रूप पाहत । विस्मय त्यांस बहु झाला ॥४॥
मोहिनीस पाहून । कामविव्हाल झाला त्रिनयन । मनोविकार त्याचा जाणून । मोहिनीरूप विष्णु पळाले ॥५॥
त्या स्त्रीरूपधरा पाहुन । धावे शिवशंकर काममग्न । विष्णु तत्क्षणीं स्त्रीरूप त्यागून । मूळ रूप आपुलें घेई ॥६॥
शिव विष्णु समीप जात । तैं कळला सत्य वृत्तान्त । कामप्रभावें वीर्य स्खलित । विव्हलचित्तें तेथ बसला ॥७॥
सर्व देव स्वस्थानीं परतत । महाभागा विष्णूस स्तवित । शिवही त्याचें स्तवन करित । आपुल्या स्थानीं परतला ॥८॥
शिवाच्या वीर्यापासून । असुर जन्मला एक महान । श्यामल वर्ण ताम्र नयन । प्रतापवंत बलशाली ॥९॥
तो शुक्राजवळीं जात । त्यास प्रणास करी विनयान्वित । म्हणे मज शिष्या रक्षावें तात । शरण आलों मीं तुजला ॥१०॥
तेव्हां ध्यानानें सर्व जाणून । शुक म्हणे तया वचन । अरे असुरा तुझें नाम । क्रोध ऐसें ख्यात होय ॥११॥
पूर्वीं मोहिनीरूप विष्णूस पाहत । शंकर तैं कामपीडित । रूप मोहक शोभिवंत । चित्तांत दाटला क्रोध ॥१२॥
त्याच्या शिव विचार करी स्वचित्तांत । माझें मन चंचल असत । त्याचा निग्रह करीन त्वरित । क्रोध येई तैं उसळून ॥१३॥
त्याच क्षणीं वीर्य गळत । त्यांतून तुझा जन्म होत । म्हणून तूं क्रोधनामें जगांत । प्रसिद्ध होशील या पुढें ॥१४॥
तदनंतर दानंतर दानवमुख्यांकडून । करविलें क्रोधाचें मौंजीबंधन । अन्य संस्कारही पावन । यथाविधि शास्त्रोक्त ॥१५॥
वेदादिक सारे अभ्यासित । क्रोध गुरुच्या सान्निध्यांत । शंबरासुरसुतेशी करित । शास्त्रानुसार विवाह तैं ॥१६॥
त्याच्या कान्तेचें नांव प्रीती । सर्वावयशालिनी ती । रूपलावण्य युक्त होती । मोहक विषयप्रवर्तक ॥१७॥
शुक्राचार्या भेटून । विनयें त्यांस प्रणास करून । हातांची ओंजळ जोडून । महातेजस्वी तैं म्हणे ॥१८॥
हे स्वामी मी करीन । ब्रह्मांडविजय तुमची आज्ञा लाभून । तदर्य मंत्र द्यावा महान । सर्व यशवर्धक जो ॥१९॥
ब्रह्मा कथा पुढती सांगत । त्याचें तैं वचन असुर ऐकत । शुक्र सर्वज्ञ त्यांस देत । मंत्र एक दैत्यहितार्थ ॥२०॥
सूर्याचा मंत्र विधियुक्त । जेव्हां क्रोधासुरास शुक्र देत । तेव्हां जाऊन घोर वनांत । तपश्चर्या तो करूं लागला ॥२१॥
व्याघ्रादिक त्या वनांत । दिवसाही संचार करित । परी क्रोधासुर अविचलित । जप सातत्यें करीतसे ॥२२॥
एका पायावर उभा राहत । उत्तम मंत्र जपे अविरत । ऊर्ध्व दृष्टि तो सूर्यास पाहत । चित्तीं ध्यान त्याचेंची ॥२३॥
त्या देवेंशा निराहारें तोषवित । थंडी उन्हाचें भय न मानित । कष्ठासम अविकार राहत । ऐशीं दिव्य सहस्त्र वर्षें गेलीं ॥२४॥
तेव्हां भानुदेव प्रसन्न । होऊन आले मुदितमन । वर देण्या त्या क्रोधासुरासी वचन । घन गंभीर बोलले ॥२५॥
अरे क्रोधासुरा माग वर । देईन ते मीं तुज सुखकर । महाभागा तप उग्र । तूं केलेंस आजवरी ॥२६॥
त्या तपानें मी प्रसन्न । महामते देईन इष्ट वरदान । ऐसें ऐकून रवीचें वचन । क्रोधासुर प्रणास करी ॥२७॥
महाभक्तीनें त्यास पूजित । प्रकटला जैं तेजोनिधि पुढयांत । करांची ओंजळ जोडून स्तवित । सौर सूक्तें देवेशासी ॥२८॥
पुनः पुन्हा वंदन करित । तेव्हां सूर्य देव त्यासी सांगत । अरे असुरा वर माग इच्छित । जें जें मागसी तें देईन ॥२९॥
क्रोधासुर विनवी तैं विनीत । उत्पत्ती स्थिति संहारयुक्त । जे देवनायक जगतांत । त्यांपासून मज मरण नसो ॥३०॥
ब्रह्मांड विजयार्थ समर्थ करावें । चराचराचें राज्य द्यावें । आरोग्यादि मज लाभावें । जें जैं चिंतिलें मानसीं ॥३१॥
माझ्या सम कोणी नसावा । ऐसा अदितिनंदना वर द्यावा । दिवस्पते हा पुरवावा । मनोरथ माझा सत्वरीं ॥३२॥
त्याचें ऐकून हें वचन । सर्व देवमुनींसी भयकारक दारुण । विस्मित मानसी होऊन । भानु म्हणे तयासी ॥३३॥
क्रोधा तूं जें जें मागितलें । तें तें मी तुज दिधलें । तुझ्या तपानें तोषलें । माझें चित्त पूर्णांशें ॥३४॥
ऐसें बोलून सूर्य जात । आपुल्या लोकीं परत ॥ दुःखित झाला अंतरांत । परी हर्ष जाहला क्रोधातें ॥३५॥
तो आनंदानें स्वगृहीं जाऊन । सांगें सुह्रदांसी वर्तमान । ते करिती अभिनंदन । त्या क्रोधासुराचें ॥३६॥
शुक्राचार्यासी प्रणास करून । स्वस्थानीं जाहला विराजमान । प्रीतीपासून जाहले सुत दोन । हर्ष शोक हे तयासी ॥३७॥
नाना भोग तो भोगित । वरदानकारणें अति गर्वित । शुक्रास पूजून विचारित । नगर रचण्या सूचना त्याची ॥३८॥
त्याचीं अनुमति लाभत । तैं आवेश नाम नगर स्थापित । अति रम्य सर्व शोभायुक्त । दैत्य दानव जमले तेथें ॥३९॥
चातुर्वण्याचे लोक नांदत । हर्षभरें त्या नगरांत । शूक्राचार्य अभिषेक करित । असुरराज्यावरी क्रोधासी ॥४०॥
क्रोधासुरें नेमिले पांच प्रधान । अति दारुण जें महान । सर्व नीतिज्ञ महामायावी सधन । महा बलवंत सर्वही जे ॥४१॥
बली कुंभ राहू रावण । माल्यवान पाचवा ख्यातनाम । ऐशा पांचांचा प्रभु सुदारुण । क्रोधासुर तैं शोभला ॥४२॥
अन्य राक्षय प्रहस्तमुख्य सेवित । दानवही सारे भावयुक्त । महाक्रोधासी ते सतत । एकनिष्ठ बलशाली ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते क्रोधासुरराज्यप्राप्तिवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणसस्तु

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP