मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४ था

काशी खंड - अध्याय ४ था

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
आतां समस्त देव आले आनंदवना ॥ देखिली वाराणसीची महारचना ॥ तेणें दीर्घानंद झाला मना ॥ प्रमथादिकांचिया ॥१॥
दिसे कांचनमय सर्व क्षिती ॥ अवघ्या हेममय भिंती ॥ वरी प्रकाशाची दीप्ति ॥ कोटि सूर्यांची सर्वदा ॥२॥
तेथें वैदूर्यांचे स्तंभ केले ॥ त्यांवरी रत्नमणी जडिले ॥ मोहटिया मंडलसा मिरवले ॥ प्रासादासी शिवाचे ॥३॥
हिरे गोमेद जडिले भिंती ॥ त्यांमाजी रविशशी बिंबती ॥ कां हिर्‍यांची जाहली मंद दीप्ती ॥ म्हणोनि आले प्रकाशावया ॥४॥
असंख्य प्रासाद शिवभुवनीं ॥ प्रासादाग्रें चुंबिती गननीं ॥ कीं स्वयंभ उद्भवले मेदिनी ॥ नभस्तंभ ज्यापरी ॥५॥
वातस्तर्शे पताका डोलती ॥ कीं त्या मार्गस्थांतें पाचारिती ॥ भार्वे पूजावया पशुपती ॥ काशीश्वर तो एक ॥६॥
आतां जरी वर्णवी काशीपुरी ॥ तरी कुबेर तयाचा भांडारी ॥ स्वर्गमृत्युपाताळविवरीं ॥ नाहीं ऐसी प्रसिद्ध ॥७॥
ते विश्वनाथाची राजधानी ॥ जे पंचक्रोशी आनंदवनीं ॥ तेथें असे स्वर्गतरंगिणी ॥ मंदाकिनी साक्षात ॥८॥
ऐसी देखिले ते अविमुक्ती ॥ मग आनंदले ते सुरपती ॥ काशीपुरीतें नमस्कारिती ॥ क्षितीं मस्तक ठेवोनियां ॥९॥
मग सर्वांसह सहस्त्रनयन ॥ तया गंगेसी करावया स्नान ॥ देवीं स्थिर केलें विमान ॥ तया गंगातटाकीं ॥१०॥
मग प्रमथादिकी गंगेसी ॥ स्नानें केलीं संभ्रमेंसी ॥ मग संध्याविधि वेगेंसीं ॥ करिते जाहले आदरें ॥११॥
मग स्नानें केलीं मणिकर्णिकेसी ॥ अग्रपूजा केली देहली विनायकासी ॥ मग काळभैरव पूजावयासी ॥ आले वेगें ते ॥१२॥
मग पूजिला तो दंडपाणी ॥ पूजा केली नंदीची वृषणीं ॥ मग जयजयकारें दीर्घध्वनी ॥ स्तविती विश्वेश्वरातें ॥१३॥
प्रेमें देव करिती स्तुति ॥ म्हणती जयजयाजे उमापति ॥ जयजय तूं लिंगाकृति ॥ म्हणोनि घातलें लोटांगण ॥१४॥
मग पूजा घेऊनि करकमळीं ॥ म्हणती जयजयाजी चंद्रमौळी ॥ तुझी कीर्ति ऐकों सर्वकाळी ॥ तोचि तूं उमापति ॥१५॥
जयजया तूं सुनाभा ॥ जयजया तूं अक्षरा स्वयंभा ॥ जयजया तूं त्रिबुवनस्तंभा ॥ विश्वंभरा स्वामिया ॥१६॥
जयालागीं कीजे व्रत तप ॥ आणि देहदमनाचा साक्षेप ॥ तोचि तूं निर्गुणस्वरुप ॥ विरुपाक्षा स्वामिया ॥१७॥
तुज स्मरलिया उमापती ॥ उद्धरिसी भक्तांसी त्वरितीं । तुझ्या दर्शनमात्रें दग्ध होती ॥ दोष अपार जन्मांतरीचें ॥१८॥
कोटि जन्मांचे जे दोष उत्तम ॥ पराभवी एक तुझें नाम ॥ जेवीं निशानाशासी उत्तम ॥ दिवाकरउदयो ॥१९॥
कोटि यागांचिय सामर्थ्या ॥ तुम्हां देखिजे दीननाथा ॥ अभय वर विश्वनाथा ॥ देसी तरावया दासांतें ॥२०॥
ऐसा नाना वचनीं देवगुरु ॥ तेणें स्तविला तो शंकरु ॥ शंकरु ॥ मग बद्धकर वज्रधरु ॥ रिघतां झाला लोटांगणीं ॥२१॥
म्हणे संसाराचिया सार्थका ॥ पावलों तुम्हां देखोनि त्र्यंबका ॥ जयजयाजी काशीनिवाप्तका ॥ त्रिलोचनातू एक ॥२२॥
जी तूं अंगोचर शूलपाणी ॥ ब्रह्मादि सकळ लक्षिती ध्यानीं ॥ महायोगीश्वर जे परमज्ञानी ॥ त्यांसी अगोचर तूंचि पैं ॥२३॥
तुझें रुपलक्षण नीराब्धी ॥ माझा मनोमीन असो त्यामधीं ॥ ऐसा स्तवी तो देवादि ॥ सहस्त्रनयन साक्षात ॥२४॥
मग कृशानु करिता जाहला स्तुति ॥ जयजयाजी दाक्षायणीपति ॥ जे माझी अति तेजदीप्ती ॥ तो तुझाचि होय प्रसाद ॥२५॥
जयजयाजी जाश्वनीळा ॥ तुमचिया नैत्रींचिया ज्वाळा ॥ ते मज प्राप्त केली जी कळा ॥ ज्वालिनी नामें पवित्र ॥२६॥
अनंत ब्रह्मांडें करिसी संहार ॥ व्यक्ताव्यक्त तूं सबराभर ॥ ऐसा तो स्तविला काशीश्वर ॥ गार्हपत्यानें तेधवां ॥२७॥
मग यम स्तवीत शंकरा ॥ जयजयाजी त्रिशूलधरा ॥ जयजयाची अगभ्य अगोचरा ॥ सर्व देवदानवाम होसी समर्थ ॥२८॥
तुमची कृपा जयावरी पूर्ण ॥ तयासी कल्पांती न बाधे विघ्न ॥ तुझ्या इच्छापरत्वें हें त्रिभुवन ॥ सहज खेळ तुझा हा ॥२९॥
त्रैलोक्याची तूं इच्छा करिसी पूर्ण ॥ जी तूं स्थापिता महायज्ञ ॥ तूचि समर्पिता भागदान ॥ प्रमथादिकांसी ॥३०॥
ऐसा तूं समर्थ विश्वेश्वर ॥ ब्रह्मांडरचनेचा स्तंभ थोर ॥ जी तूं सृष्टीचा करिसी संहार ॥ प्रलयाअंतीं सर्वथा ॥३१॥
मग नैऋत्य स्तवी त्रिनयना ॥ म्हणे जयजयाची जगज्जीवना ॥ जयजाची गजचर्मपरिधाना ॥ व्याघ्रचर्मांवरा भस्मोद्धूलिता ॥३२॥
जयजयाची फणिवरभूषणिया ॥ हे काशीपुरी तुझी निजप्रिया ॥ अनंत ब्रह्मांडे जाती विलया ॥ परी अगम्य इच्छा तुझी ते ॥३३॥
मग वरुण घाली लोटांगणा ॥ जयजयाची तूं पंचानना ॥ तूं अकथ्य अगम्य त्रिभुवना ॥ सबराभरित स्वामिया ॥३४॥
जयजयाजी सर्वभूतेशा ॥ तूं सर्वां घटीं परमहंसा ॥ हरि विरिचसि दिधला व्यवसा ॥ त्रैलोक्यसृष्टीचा ॥३५॥
तूं अकथ्य अगम्य निरामय ॥ तूं एक निःसंग नित्यान्वय ॥ तुझिया स्वरुपाचें धैर्य ॥ कवण लक्षी शिवा सर्वज्ञा ॥३७॥
हें त्रैलोक्य तुमचें लीलायंत्र ॥ जे महायागादि दिव्यमंत्र ॥ ते तूं स्थापिता स्वतत्रं ॥ अन्य न देखों तुम्हांविण ॥३८॥
पद्मपत्र जैसें जळावरीं ॥ तैसें त्रिभुवन तुझ्या आधारीं ॥ तें शादूर्लर्माचियपेरी ॥ अंबर तुमचें ॥३९॥
ऐसा वर तूं हैमवतीचा ॥ प्रलय करिसी पंचमहाभूतांचा ॥ वृत्तिचाळक समस्तांचा ॥ तूंचि शिवा जाण पां ॥४०॥
जी तूं तत्त्वस्वरुप अनुपम्य ॥ जी तूं वेदां अगोचर अगम्य ॥ परी विधिप्रसादें गम्य ॥ झालासी आम्हां ॥४१॥
मग सोम स्तवीत शंकरा ॥ जयजयाजी अवधूता दिगंबरा ॥ जटाजूटपिंगटा भस्मधरा ॥ विरुपाक्ष तूं होसी ॥४२॥
जयजयाजी भस्मोद्धूलितगात्री ॥ त्रिशूलडमरुसुनाभशस्त्रा ॥ वासुकिहारा सुहास्तवक्रा ॥ मिरवती कंठीं रुंडमाळा ॥४३॥
तूं शशिपन्नगभूषणिया ॥ तूं काशीकैलासनिवासिया ॥ पंचवक्रा दशभुजिया ॥ पिंगाक्षा तूं एक ॥४४॥
जयजयाजी दैत्यांतक भैरवा ॥ जयजयाजी हस्तकपाला ॥ उमासहिता सदाशिवा ॥ विश्वंभरिता तूंचि पैं ॥४५॥
जयजयाजी त्रिभुवनकंदा ॥ हरि विरिंची स्थापिले परमपदा ॥ माझें हृदयमंदिरीं सर्वदा ॥ असावें तुवां सदाशिवाः ॥४६॥
ऐसी त्या शीतंकराची स्तुति ॥ झाल्यावरी अलकापति ॥ करकमळ ठेवूनियां क्षितीं ॥ स्तविता झाला कुबेर ॥४७॥
जयजयाजी काशिकाधीशा ॥ महावज्रदंष्ट्रां गिरीशा ॥ कर्मकाष्ठासी दाहकसा ॥ वैश्वानर तूं एक ॥४८॥
आकाशाहूनि भूमंडळी ॥ मेघ वृष्टि करी पूर्णजळीं ॥ ते गणवेल चंद्रमौळी ॥ परी तुझें स्वरुप न वर्णवे ॥४९॥
मग लोटांगणीं निघे तरणी ॥ तुम्हां शरण जी शूलपाणी ॥ तूं एक समर्थ त्रिभुवनीं ॥ विश्वरुपा स्वामिया ॥५०॥
तूं ब्रह्मस्वरूप जी निर्गुण ॥ तूं एक उद्भविता वर्णावर्ण ॥ प्राणिमात्रांच्या घटीं चलनवलन ॥ तूंचि शिवा अससी कीं ॥५१॥
तुझिया परमसुखाची गोडी गोडी ॥ योगीश्वरें घेतली आवडी ॥ तुझ्या ध्यानसागरीं देती बुडी ॥ ते न भंगती सर्वथा ॥५२॥
ऐसा स्तविला शूलपाणी ॥ तंव झाली प्रसादवाणी ॥ ते कैलासगर्भीं दीर्घ ध्वनी ॥ उद्भवली भासे ॥५३॥
कीं तो वदला विश्वनाथ ॥ पूर्ण होईल तुमचा मनोरथ ॥ मग आनंदला सुरनाथ ॥ देवांसहवर्तमान तेधवां ॥५४॥
मग सुरेंद्र गुरु देवगण ॥ साष्टांग करिती तैं नमन ॥ मग आरंभिलें स्तवन ॥ त्रिपुंरांतकाचें ॥५५॥
दिव्य कुमुदिनींचीं कमळें ॥ आणि स्वर्गसरितेचीं निर्मळ जळें । विरूपाक्ष पूजिला दिक्पोळें ॥ सुरेंद्रादिकीं साक्षेपें ॥५६॥
अगरुचंदनें मृगमदमिश्रितें ॥ सुवर्णकमळें अर्विध मुक्तें ॥ नानारत्नें ज्योतिकरें बहुतें ॥ पूजिला झाले शिवासी ॥५७॥
ऐसा पूजिला शूलपाणी ॥ मग पूजिली ते भवानी ॥ ते भुक्तिमुक्तीची खाणी ॥ अविमुक्त हे होय ॥५८॥
भवानी देतसे भूक्ति ॥ विश्वनाथ देतसे मुक्ति ॥ तेचि गुणनाम अविमुक्ति ॥ काशीपुरी विख्यात ॥५९॥
ऐसीं सारिलीं पूजनें ॥ मग आरंभिलीं यागहवनें ॥ कीं तीं प्रज्वाळिलीं महादीपनें ॥ दोषाहुतींचीं एकदां ॥६०॥
मग नाना दानें आरंभिलीं ॥ ब्रह्मवृंदें पाचारिलीं ॥ जीं सत्पात्रें ऐसीं बोलिलीं ॥ स्कंदपुराणीं साक्षेपें ॥६१॥
त्यांसी दिधल्या कामधेनु ॥ नाना रत्नें मुक्तें शृंगारूनु ॥ दानें देतसे सहस्त्रनयनू ॥ अमरेश तो स्वकरेंसीं ॥६२॥
देता झाला वर्षासनें ॥ आणिक दिधलीं शास्त्रें पुराणें ॥ एकेका दिधलीं दिव्याभरणें ॥ एका भारंभार सुवर्ण तें ॥६३॥
बैसवूनियां ऋषि समस्त ॥ त्यांसी द्रव्य दिधलें बहुत ॥ तुम्ही सर्वकाळ असावें पढत ॥ काशीखंड भक्तियुक्त ॥६४॥
दिधले मठ मंडपछाया ॥ त्यांमाजी डोल्हारे बांधोनियां ॥ अनेक छत्रें वरी सुपेतिया ॥ महामृदु शोभिवंत ॥६५॥
दिधलीं अश्वरथगजदानें ॥ दिव्याबरें आणि धोत्रें सुवर्णें ॥ तेथें सत्पात्रेंवीण आनें ॥ न घेती प्रतिग्रहासी ॥६६॥
दिधलीं सुवर्णाचीं नाना पाव्रें ॥ यज्ञोपवीतें आणि धंवित्रें ॥ ऐसी दानें अग्निदत्तपुत्रें ॥ कुबेरें केलीं बहुसाल ॥६७॥
जे देवलोकींचे रत्नमणीं ॥ महातेजस्वी दीप्त त्रिभुवनीं । ते सत्पात्रीं दिधले दानीं ॥ कर्दमसुतें वरुणें ॥६८॥
नाना मुक्तें जीं अविंधें ॥ तेजें तरणिसम शुद्धें ॥ जीं त्रिलोकीं महाअगाधें ॥ तीं दिधलीं दानें सर्वही ॥६९॥
देवलोकींच्या सुगंध जाती ॥ ज्या देवांसी प्रिय आवडती ॥ त्या दिधल्या सत्पात्रीं ॥ कश्यपसुतें समीरें ॥७०॥
उष्णकाळीं दान नीर ॥ पर्जन्यकाळीं दिव्यांबंर ॥ ऐशीं दानें सूर्यकुमर ॥ यमधर्मराय तेधवां ॥७१॥
नाना विद्या शास्त्रें बहुत ॥ होमयागादि महामत ॥ तीं दानें देत अंगिरासुत ॥ गुरुबृहस्पती ॥७२॥
महायागीं जीं हव्यें ॥ अवदानीं दिधलीं स्वयें ॥ जीं दानें देवांसी होती प्रियें ॥ अत्रिसुतें चंद्रें केलीं तीं ॥७३॥
सर्व सामग्रीसीं निजधामें ॥ सप्तखणी बरवीं उत्तमें ॥ तीं प्रमथीं दिधलीं विधिनेमें ॥ सत्पात्र द्विजोत्तमां ॥७४॥
आणिक दिधल्या रुद्राक्षमाळा ॥ मैलागिरी चंदनाचा टिळा ॥ आणि देत उपानह सकळां ॥ चरणरक्षणाकारणें ॥७५॥
दंडकमंदलूंचीं केलीं दानें ॥ ब्रह्मचारियां दिधलीं मृगाजिनें ॥ पालखिया सुखानें ॥ दिधलीं दानें सत्पात्रीं ॥७६॥
ऐसिया दानें तोषविलिं पात्रें मुक्तिमंडपीं बैसोनि विधियुक्तमंत्रें ॥ श्रवण केलीं सर्व शास्त्रें ॥ काशीखंड पुराणादि ॥७७॥
झाली पंचक्रोशीप्रदक्षिणा ॥ मग केल्या तिंहीं लिंगस्थापना ॥ प्रासादांचिया रचना ॥ नभपर्यंत जाण पां ॥७८॥
त्या प्रासादीं ठेविले जे ब्राह्मण ॥ त्यांसी दिधलें दिव्य कांचन ॥ मग सर्वदेवेंसीं सहस्त्रनयन ॥ निघे अगस्ती भेटावया ॥७९॥
जातां अगस्तीचे भवनीं ॥ मार्गीं आश्चर्य देखिलें सुरगणीं ॥ नाना श्वापदें आनंदवनीं ॥ अगस्तिआश्रमाभोंवतीं ॥८०॥
मैत्रावरुणीची तपशक्ती ॥ तेणें श्वापदें निर्वैर असती ॥ तें मागीं देखिलें समम्तीं ॥ इंद्रादिक देवगणीं ॥८१॥
एकएकावरी माना घालुनी ॥ पंचानन बैसले गोठणीं । चितळे आणि कुरंगिणी ॥ क्रीडती एकमेकांशीं ॥८२॥
काग घारी आणि बहिरी । निर्वैर बैसलीं वृक्षावरी ॥ तें देखोनियां सुरवरीं ॥ मानिलें आश्चर्य सकळिकीं ॥८३॥
धामणी आणि दंर्दुर ॥ एकाच ठायीं करिती बिढार ॥ ऐसें देखोनि निर्वैर ॥ परमाश्चर्य मानिती ॥८४॥
ऐसें देखोनियां सुरगण ॥ म्हणती धन्य हें आनंदवन ॥ क्रोध आणि अभिमान ॥ त्यजूनि सर्वही निर्वैर ॥८५॥
ऐसा जो सात्त्विकभाव ॥ तयांस उपजे गा स्वयमेव ॥ अहो हा अगस्तिऋषीचा ठाव ॥ परमसुखी सर्वदा ॥८६॥
श्वापदें नव्हती हे ब्रह्मज्ञानी ॥ योगाभ्यास साधिती आनंदवनीं ॥ हे विश्वानाथाची राजधानी ॥ काशीपुरी प्रत्यक्ष ॥८७॥
काशीचा रंक तो स्वर्गींचा राव ॥ काशीचा मत्स्य तो स्वर्गींचा देव ॥ वृथा आम्ही प्रमथदेव ॥ न सांडूं विषय सर्वथा ॥८८॥
येथें असे हो पंचवक्त्री ॥ स्वर्गतरंगिणी याचे अंतरीं ॥ सर्व श्वापदादि भूतमात्रीं ॥ हाच व्यापक निर्वैर ॥८९॥
ऐसा आनंदवनाचा प्रभाव जाण ॥ अवघें आनंदाचें वर्तमान ॥ शुभाशुभ जंतु ग्राम्य अरण्य ॥ भ्रमती निर्वैर सर्वथा ॥९०॥
ऐशिया जंतूंचें निर्वैर । वृथा आमुचें ब्रह्मशरीर ॥ कामक्रोधादि अहंकार ॥ पीडित असती सर्वकाळ ॥९१॥
पाहातां या पशुपक्ष्यांचें गांभीर्य ॥ सात्त्विक संचरले सोमसूर्य । धेनु व्याघ्रा कुरवाळी हें आश्वर्य ॥ देखिलें नाहीं कोठेंही ॥९२॥
सहस्त्र वर्षें कीजे धूम्रपान ॥ आणि शत एक कीजे महायज्ञ ॥ योगाभ्यास समाधिसाधन ॥ ऐसें न घडे सामर्थ्येंसीं ॥९३॥
ऐसें पुण्य आचरतां अगाघ ॥ तुळितां काशीचा महिमा प्रसिद्ध ॥ जरी पढिन्नले असती चारी वेद ॥ परी तेही न्यूनचि कीं ॥९४॥
या काशीचिया पशुवां जंतां ॥ तुळितां योगेश्वरांसी न्यूनता ॥ अरे या जळजंतूंची समता ॥ न तुळे ब्रह्मादिकांसी ॥९५॥
महाप्रळयीं नाश होय आपणांसी ॥ विश्वनाथ रक्षी या जीवजंतूंसी ॥ हे सर्वकाळ असती शिवापासीं ॥ म्हणोनि हे समर्थ जाणावे ॥९६॥
कीं नभपाताळपुटें या शुक्ती ॥ यांचे गभीं असे हे अविमुक्ती ॥ हे आपुले इच्छेपासाव पुशुपती ॥ निर्माण करी राहावया ॥९७॥
ऐसें हें आनंदवन जाण ॥ तेथें सर्व जंतूंस निर्वाण ॥ म्हणोनि राहिले त्रिनयन ॥ या स्थळीं परियेसा ॥९८॥
जे जंतु राहिले काशीनिवासीं ॥ मुक्ति व्हावी तयांसी ॥ म्हणोनियां अविमुक्ति ऐसी ॥ निर्मिंली असे सदाशिवें ॥९९॥
ऐसा एक समागमाचा गुण ॥ परीस धातूचें करी सुवर्ण ॥ परी न वेधेचि पाषाण ॥ अवधातु म्हणोनियां ॥१००॥
ऐसा नव्हे काशीचा प्रकाश ॥ तेथें पाषाण तोही होय परीस ॥ या स्थळीं राहातांचि महेश ॥ होऊनि ठाके सर्वदा ॥१०१॥
जैसा चंदनतरुवर सांगातें ॥ आपणासारिखें करी वृक्षांतें ॥ तैसेचि सर्व जीवजंतु येथें ॥ होती शिवासमान ॥१०२॥
ऐसी हे काशी प्रकाशी ॥ येथें ह्या मांनल्या वरुणा-असी ॥ म्हणोनि गुणनाम वाराणसी ॥ योजिलें शिवें साक्षेपें ॥१०३॥
ऐसी हे वाराणसी महापुरी ॥ कामना न रुचे दोशियां शरीरीं ॥ सांपडतां नवनीत केवीं प्रहंरी ॥ ग्रामश्वान तो ॥१०४॥
नातरी जयासी सांपडे द्रव्यराशी ॥ तो केवीं अव्हेर करी त्यासी ॥ तैसीच हे अविमुक्ति काशी ॥ प्रहरी ऐसा कवण ॥१०५॥
ऐसी वाराणसीची महत्ता ॥ अगोचर दिसे देवां समम्तां ॥ मग समीप मार्ग क्रमितां ॥ देखिली गुंफा अगस्तीची ॥१०६॥
तेथें बहुत छाया सघन तरु ॥ रविकिरण न शकती संचरूं ॥ तेथें मंजुळ शीतळ समीरू ॥ तेणें डोलती द्रमलता ॥१०७॥
वात स्पर्शतां डोलती ॥ कीं त्या प्रमथांसी पाचारिती ॥ तेथें राहात असे अगस्ती ॥ महातपस्वी तो ॥१०८॥
तेथें द्राक्षमंडप भरले फळानें ॥ सरोवर आथिलें पूर्ण जळानें ॥ कनककमळें विचित्र घनें ॥ क्रीडा करिती हंसादि ॥१०९॥
कमळीं अलिकुलांचे गंजार ॥ शब्द करिती चकोर ॥ आणिक पक्षिकुलांचे शब्द अपार ॥ नाना जीवजंतूंचे ॥११०॥
पर्जन्याची होय वृष्टी ॥ चातक पाहाती व्योमकुटीं ॥ किंवा वरुण येतसे भेटी ॥ अगस्तिऋषीचिया ॥१११॥
पंचमस्वराचिया ध्वनी ॥ कोकिळा बोलती तया वनीं ॥ कीं अमराधीश वज्रपाणी ॥ येतसे ऋषिभेटीकारणें ॥११२॥
तेथें बहुत वृक्षांची दाटणी ॥ द्रुमलतांची झालीसे रजनी ॥ ते विध्वंसावया येतसे तरणी ॥ अगस्तीचे भेटीतें ॥११३॥
उद्भवल्या चकोरांचिया ध्वनी ॥ सरोवरीं विकासल्या कुमुदिनीं ॥ कीं शीतकर येतसे म्हणोनी ॥ अगस्तीच्या दर्शना ॥११४॥
आतां असो बहु विस्तार ॥ दिक्पती आणि वज्रधर ॥ ते देखते झाले मुनीश्वर ॥ मैत्रावरुणीतें ॥११५॥
दिसे केवळ तेजकल्लोळी ॥ कीं मार्तंड प्रकाशे उदयाचळीं ॥ ऐसा देखिला दिक्पाळीं ॥ कुंभोद्भव तो ॥११६॥
जोइल्वल-वातापींचा अंतक ॥ क्रोधें तरी प्रळयींचा पावक ॥ क्षमेचा परोपकारक ॥ दिनालागी जाहाला ॥११७॥
हृदयाच करूनियां तंतु ॥ मणि ओंविला भवानीकांतु ॥ तो ध्यानींजी लक्षितु ॥ सर्वकाळ त्रिपुरारी ॥११८॥
देखिला जैसा तेजकल्लोळ ॥ मृगाजिनासनीं असे निश्चळ ॥ कीं तो साक्षात कर्ता भूगोळ ॥ पितामह द्वितीय़ तो ॥११९॥
त्रिकाळजपे पद्मासनीं । द्वादश रुद्राक्षांची स्मरणी ॥ सर्वांगी विभूति चर्चूनी ॥ शिवमंत्र जप करीत ॥१२०॥
जपें जिंकूं म्हणे त्रिभुवन ॥ अंबुनिधि ज्याचें आचमन ॥ तयाचे द्वारीं अमरगण ॥ बद्धांजली ठाकले ॥१२१॥
तयासी देखोनि मौन धरिलें ॥ तंव मैत्रावरुणीनें ध्यान विसर्जिलें ॥ मग चक्षूनें अवलोकिलें ॥ सुरेश्वरासी तेघवां ॥१२२॥
यावरी द्दष्टि पडतां ऋषीची ॥ मौनमुद्रा फिटली देवांची ॥ तेथें अभिवंदनें प्रमथांचीं ॥ देखे अगस्ति साष्टांग ॥१२३॥
मग स्मरणी घालोनि श्रवण बिळीं ॥ पाचारिले देव सकळीं ॥ दक्षिणपार्श्वीं आपणाजवळी ॥ बैसा म्हणे देवांसी ॥१२४॥
किमर्थ येणें केलें आश्रमा ॥ अगस्ति पुसतसे क्षेमा ॥ मगत्या अमरनार्थं उत्तमा ॥ गुरूकडे पाहिलें ॥१२५॥
अगस्तीचिया वचन ॥ प्रत्युत्तरीं तुळिजे कवणा ॥ मग देवीं अंगिरानंदना ॥ पुढारी केलें बृहस्पतीतें ॥१२६॥
गुरु वदे मित्रावरुणसुता ॥ समर्थांचिया वोळगें जातां ॥ शिवालयीं स्मरारि पूजितां ॥ विशेष लाभ जाणिजे ॥१२७॥
मुनिमध्यें मुनिवर ॥ तपियांमध्यें तपस्वी थोर ॥ मनेंचि कराल सृष्टिसंहार ॥ महायोगियांत श्रेष्ठ तुम्ही ॥१२८॥
महाज्ञानी या त्रैलोक्यमंडळीं ॥ प्रतापार्क दिसे महीतळीं ॥ जैसे तुम्ही तैसीच तुम्हांजवळी ॥ लोपामुद्रा प्रिया तुमची ॥१२९॥
कुशनाभाचिया वंशीं जन्मली ॥ तुम्हीं तपःसामग्रीनें साधिली ॥ कीं तुमची मूर्तिमंत वहिली । तपश्वर्या हे होय ॥१३०॥
कीं त्या शिवाची अगाधशक्ती ॥ तुम्ही नादबिंदु हे कलाज्योती ॥ तुम्ही चित्त तुमची हे चित्तवृत्ती ॥ लोपामुद्रा तपस्विनी ॥१३१॥
तुमचे शरीरींची तपश्वर्या ॥ दिसे जैसी सुर्योदया ॥ म्हणोनि हे तनुछाया ॥ लोपामुद्रा असे पैं ॥१३२॥
पतिव्रतालक्षणें कैसी ॥ शंकरें निरूपिली भवानीसी ॥ सहज आठवलीं वैखरीसी ॥ लोपामुद्रा देखोनियां ॥१३३॥
स्वामिसेवेसी तारुण्य ॥ स्वामिशब्दासी निश्वळ मौन ॥ आपुले स्वामीचा मान ॥ पुढिलां सांगे गुणज्ञ ते ॥१३४॥
सरलें गृहींचें भक्ष्य भोजन ॥ हें वचन अपवित्रेचें लक्षणे ॥ वाढिलें हेंभद्र वचन ॥ पतिव्रतेचें दिसों येतें ॥१३५॥
शंखचक्रांचिया आकृती ॥ जिये सामुद्रिकीं दिसती ॥ ते पुत्रमाता सौभाग्यवती ॥ लक्ष्मीसमान अक्षयी ॥१३६॥
जे अगुण सदा शुचि दिसे ॥ जे कोमलांगी वदनीं सुहास्य ॥ शब्द बोले परम  सुरस ॥ जेणें पतिमानस संतोषे ॥१३७॥
सौभाग्यभूषणें अखंड लेतसे । अंगीं पुण्यगंध प्रकाशे ॥ असत्या वाचेसी कांहीं न वसे ॥ ते सत्य पतिव्रता पैं ॥१३८॥
ते ऋतुमती जाहलियावरी ॥ तीन अहोरात्री निघे बाहेरी ॥ मग स्नान केलियावरी ॥ सारिजे भोजनविधीसी ॥१३९॥
स्वामीसी घालोनियां स्नान ॥ मग आरंभिजे मिष्टान्न ॥ मह कीजे निशीं शयन ॥ प्रथम प्रहरीं ॥१४०॥
मग दंपतिये एकाग्रचित्त ॥ मेळविजे शुक्र शोणित ॥ दक्षिणांगी स्त्रियेसी निश्चित ॥ कीजे शयन साक्षेपें ॥१४१॥
मग प्रवर्तलिया प्रातःकाळ ॥ पाहावें स्वामीचें वदनकमळ ॥ आणिकाचें पाहातां तें फळ ॥ होय त्यासारिखें ॥१४२॥
ते अवलोकी जरी परपुरुषवदन ॥ मग पतिव्रतेसी लागे दूषण ॥ ऐसे पतिव्रताधर्म निरूपण ॥ करी बृहस्पती तेधवां ॥१४३॥
ऐसी स्वामीची भक्ति करितां ॥ स्वामी जरी मृत्युपंथा ॥ तरी आपणही पतिव्रता ॥ धर्म रक्षी आपुला ॥१४४॥
ती प्रवेश करितां अग्नीं ॥ त्या पतिव्रतेसी कांपे तरणी ॥ ती द्विपक्ष सहवर्तमानी ॥ नेत वैकुंठीं जाण पां ॥१४५॥
हाचि धर्म पतिव्रतेचा ॥ अग्निप्रवेश मनोभावें नव्हे तियेचा ॥ तरी स्वघर्म वैधव्याचा ॥ कैसा काय आतां ॥१४६॥
नित्य नित्य शुचि स्नानें ॥ आणि दिनत्रयीं क्षौर करणें ॥ पक्षव्रतें मासउपोषणें ॥ कीजे चांद्रायणें हो ॥१४७॥
आसनीं शयनीं इच्छा मानसीं ॥ तरी ते द्यावी सत्पात्रासी ॥ प्रीति पावो मम स्वामीसी ॥ ऐसा संकल्प करावा ॥१४८॥
कीजे अल्प निद्रा अल्प भोजन ॥ अहोरात्रीं स्वामीचें स्मरण ॥ नाना फळें आणि मिष्टान्न ॥ द्विजांसी देऊनि भक्षावें ॥१४९॥
ऐसी जे जे इच्छा मानसीं ॥ तें तें दीजे सत्पात्रांसी ॥ हे प्रीति पावो माझिया स्वामीसी ॥ मग स्वीकारावें स्वदेहीं ॥१५०॥
ऐसे नाना व्रत नेम ॥ कीजे पक्षचांद्रायणें उत्तम ॥ ऐसा स्कंदपुराणीं धर्म ॥ बोलिला जाण विधवांसी ॥१५१॥
पतिवंचिका ज्या तत्त्वता ॥ त्या मातापितरांच्या अहिता ॥ स्वामी सांडोनि सुरता ॥ परपुरुषीं वांछिती ॥१५२॥
ते असे लावण्याची राशी ॥ स्वपुरुष नावडे तियेसी ॥ ते अवलक्षण परासीं ॥ रति इच्छी अहोरात्र ॥१५३॥
आपुले स्वामीचा देखोनियां मान ॥ त्यास चिंतीतसे अपमान ॥ म्हणोनि उर्ध्वपाद अधोवदन ॥ ओळंघे ती वृक्षडाहाळीं ॥१५४॥
ऐसे शभाशुभ धर्म सांगतां ॥ स्कंदपुराणीं असे विस्तीर्णता ॥ मी संकलित श्रोतां ॥ करीतसें निरूपण ॥१५५॥
ऐसे धर्म निरूपी देवगुरु ॥ परिसतसे कुंभज मुनिवरू ॥ आणिक वदे तो देवगुरु ॥ बृहस्पती अगस्तीसी ॥१५६॥
गुरु बदे हे महातपेश्वरी । लोपामुदा तुमची सुंदरी ॥ इचे गुण त्रैलोक्यामाझारी ॥ अनुपम सर्वासी ॥१५७॥
परी आतां त्रैलोक्यभुवनीं ॥ द्वादश पतिव्रता कामिनी ॥ त्यांचेनि सत्त्वें मेदिनी ॥ असे जाण कूर्मपृष्ठीं ॥१५८॥
पतिव्रतेची मात वदनीं वदती ॥ स्वर्गी देव अनुवादती ॥ आधीं श्रेष्ठ ते अरुंधती ॥ वसिष्ठऋषीची विख्यात ॥१५९॥
चतुराननाची सावित्री प्रिया ॥ आणि अत्रीची ते अनसूया ॥ शांडिल्याची सती जाया ॥ लक्ष्मी महाविष्णूची ॥१६०॥
शतरूपा स्वायंभु मनूची सुंदरी ॥ हिमाद्रीची मेनका मेरुकुमरी ॥ आणि उत्तानपादाची सुमती नारी ॥ ध्रुवमाता ते जाणावी ॥१६१॥
संज्ञा पतिव्रता मातडाची ॥ स्वाहा सीमंतिनी अग्नीची ॥ तैसीच सती भार्या शिवाची ॥ दक्षकन्या प्रसिद्ध ॥१६२॥
यांशीं तुल्य प्रौढी जियेची ॥ ते हे लोपामुद्रा कुंभोद्भवाची ॥ आणिक प्रत्युत्तरें देवगुरूचीं ॥ परिसतसे अगस्ती तो ॥१६३॥
शत यज्ञ केले काशीपुरीं ॥ पक्ष छेदोनि भूमीं पाडिले गिरी ॥ तो अमरनाथ तुमचे द्वारीं ॥ उभा तिष्ठत सेवेसी ॥१६४॥
नवनिधी भांडार जयापाशीं ॥ धन देऊनि व्यापी त्रैलोक्यासी ॥ तो कुबेर तुमचिया सेवेसी ॥ उभा असे बद्धकरें ॥१६५॥
विश्वनाथाचा तृतीय लोचन ॥ ब्रह्मांड दग्ध करील न लगतां क्षण ॥ तो वैश्वानर महाकृशान ॥ उभा असे जवळिकें ॥१६६॥
गिरिवर उपटी समूळीं ॥ महाप्रळयाचें तेज मावळी ॥ तो महामारुत बद्धाजळी ॥ उभा सेवेसी तुमचिया ॥१६७॥
प्रळयीं संवत्सर शत भरी ॥ मुसळधारीं वृष्टि करी ॥ तो कर्दमसुत तुमचे द्वारीं ॥ उभा राहिला श्रद्धेनें ॥१६८॥
जे या त्रैलोक्यामाझारी ॥ भ्रमती मेरूचे पाठारीं ॥ ते सोम-सूर्य तुमचे द्वारीं ॥ उभे तिष्ठती सेवेसी ॥१६९।
त्रैलोक्यावरी दंड फिरत ॥ चारी खाणी जो संहारीत ॥ तो यमरावो सूर्यसुत ॥ उभा तुमचे सेवेसी ॥१७०॥
ऐसीं देवगुरूचीं उत्तरें ॥ स्वधर्मरक्षकें शुचिकरें ॥ तीं परिसिलीं मुनीश्वरें ॥ अगस्तिऋषीनें ॥१७१॥
मग बोलिला तो महासिद्ध ॥ जो तपियांमाजी अगाध ॥ परोपकाराचा सागरचि शुद्ध ॥ अगस्तिमुनी जाण पां ॥१७२॥
म्हणे गा अंगिरानंदना ॥ देवाधीशा सहस्त्रनयना ॥ तुम्ही आलेति ज्या कारणा ॥ तें श्रुत करावें मज ॥१७३॥
मग वदला तो देवगुरु ॥ मधुर वाणी धीर गंभीरू ॥ जैसा उदधीमाजी सागरू ॥ क्षीराब्धी तो एक ॥१७४॥
म्हणे देवांसी करावी क्षमा ॥ परोपकारा परम उत्तमा ॥ जें कार्य निरूपावें तुम्हां ॥ तें आधींच व्यक्त असे कीं ॥१७५॥
तुम्ही समर्थ ऋषिकुळभूषणा ॥ करावी सुरगणांची करुणा ॥ निर्विघ्न करूनि त्रिभुवना ॥ कीर्ति उरवावी भुवनत्रयीं ॥१७६॥
जैसें तरुमूळीं घालितां नीर ॥ तें सर्व लतांसी करी विस्तार ॥ तैसे तुमचे मनअंकुर ॥ व्यापक असती सर्वभूतीं ॥१७७॥
परी पुशिलें तें करावें श्रुत ॥ तुम्हांपुढें कथावें किंचित ॥ प्रमथांसी झाला जो युगान्त ॥ तो परिसावा स्वामिया ॥१७८॥
जो सर्व शैलांत श्रेष्ठ ॥ विंघ्याद्रि झालासे गर्विष्ठ ॥ तेणें व्योममार्गीं केलें संकट ॥ रविशशिदिक्पाळां ॥१७९॥
तेणें दिक्पती रोधिले मार्गीं ॥ यजमान मंद झाले यागीं ॥ तरी त्या प्रमथांचे भागीं ॥ व्हावें जी उपकारी ॥१८०॥
हेंचि यावया कारण ॥ वृद्धी पाववीं याग हवन ॥ तेणें तृप्त होती देवगण ॥ हाचि तुम्हां परोपकार ॥१८१॥
ऐसें वदे देवगुरु बृहस्पती ॥ मग प्रत्युत्तर वदे अगस्ती ॥ जी असेल तुमची मनोवृत्ती ॥ तें कार्य करूं तुमचें ॥१८२॥
परोपकाराचें कारण ॥ हें पूर्ण होणें जयाचेन ॥ तें न करी तरी होय हान ॥ यशाची तयाच्या ॥१८३॥
तरी आज्ञा प्रमाण तुमची ॥ ऐसी बोली परिसोनि अगस्तीची ॥ तेणें अंतःकरणें प्रमथांची ॥ उचंबळती सागराऐसीं ॥१८०॥
हेंचि यावया कारण ॥ वृद्धी पाववीं याग हवन ॥ तेणें तृप्त होती देवगण ॥ हाचि तुम्हा परोपकार ॥ १८१॥
ऐसें वदे देवगुरु बृहस्पती ॥ मग प्रत्युत्तर वदे अगस्ती ॥ जी असेल तुमची मनोवृत्ती ॥ तें कार्य करूं तुमचें ॥१८२॥
परोपकाराचें कारण ॥ हें पूर्ण होणें होणें जयाचेन ॥ तें न करी तरी होय हान ॥ यशाची तयाच्या ॥१८३॥
तरी आज्ञा प्रमाण तुमची ॥ ऐसी बोली परिसोनि अगस्तीची ॥ तेणें अंतःकरणें प्रमथांची ॥ उचंबळती सागराऐसीं ॥१८४॥
ऐसी अगस्तीची वाणी ॥ मस्तकीं वंदिली देवगणीं ॥ मग मौनेंचि बैसोनि विमानीं ॥ निघते झाले सर्व देव ॥१८५॥
ऐसे पहुडले सुरेश्वर ॥ आतां अगस्ति होईल चिंतातुर ॥ ते कथा परिसा जी सविस्तर ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१८६॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे अगस्तिदर्शनं नाम चतुर्थाध्यायः ॥४॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥    

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP