मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय १५ वा

काशी खंड - अध्याय १५ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
ह्रदयीं बैसतांचि शरघात ॥ तेणें गुणनिधि पावला मृत्य ॥ तंव आले जी यमदूत ॥ तयाकारणें न्यावया ॥१॥
यमदूतीं बांधिला गुणनिधी ॥ म्हणती धरा तोडा रे हा दुर्बुद्धी ॥ यानें मातापितृवचन कधीं ॥ पाळिलें नाहीं सर्वथा ॥२॥
मग तो आकळिला यमदूतीं ॥ पाशें बांधिला मागिले हस्तीं ॥ ऐसा दोषी न देखों क्षितीं ॥ जो हरी शिवनैवेद्य ॥३॥
येणें चोरिला शिवाचा उपाहार ॥ म्हणोनि बांधिती यमकिंकर ॥ तेथें वर्तलें जें अगोचर ॥ तें परिसा श्रोते हो ॥४॥
तंव कैलासींच्या वाटा ॥ वाजिन्नल्या दिव्या घंटा ॥ विमान उतरलें क्षितितळवटा ॥ अकस्मात ते ठायीं ॥५॥
विमानीं बैसले शिवगण ॥ माजी देवांगना करिती गायन ॥ करीं कनकदंड संपूर्ण ॥ गोदंड दिव्यमय ॥६॥
जैसा उअद्याचळीं प्रकाशे सहस्त्रकिरण ॥ कीं अभ्रीं विद्युल्लता संपूर्ण ॥ तैसें व्योममार्गींहूनि विमान ॥ उतरलें भूमंडळीं ॥७॥
तेथें देखोनि त्रिपुरहंत्याचे दूत ॥ यमकिंकर झाले भयभीत ॥ गुणनिधीसी सोडूनि निवांत ॥ उभे ठाकले ते ठायीं ॥८॥
देखोनि गोकर्ण शैलादिगण ॥ यमदूत घेती लोटांगण ॥ मग करसंपुट जोडून ॥ करिते झाले प्रार्थना ॥९॥
यमदूत प्रार्थिती शिवगणांसी ॥ स्वामी क्षमा कीजे आम्हांसी ॥ आम्हीं जाणोनि पूर्णदोषी ॥ यासी केलें बंधन ॥१०॥
मग शिवदूत म्हणती रे तुम्हां ॥ आम्हीं केली पूर्ण क्षमा ॥ परी हा दोषी कैसा तो आम्हां ॥ सांगावा जी सत्वर ॥११॥
तंव यमदूत म्हणती शिवगणां ॥ हा विप्र पूर्ण दोषी जाणा ॥ मातापितरांच्या वचना ॥ अवज्ञा करी बहुसाल ॥१२॥
हा सप्तव्यसनी दुराचारी ॥ मद्यपानी मत्स्यआहारी ॥ द्यूतकर्मी परद्वारी ॥ ब्रह्मघातकी हा पूर्ण ॥१३॥
हा थोर अपराधी निंदक ॥ शास्त्रज्ञांचा नेणे विचार विवेक ॥ परस्त्रिया देखोनि नपुंसक ॥ जाहाला नाहीं सर्वथा ॥१४॥
येणें पूजिलें नाहीं शिवा ॥ सत्पात्रीं नसे केली सेवा ॥ येणें पूर्ण केला जी ठेवा ॥ निरयमार्गाचा ॥१५॥
येणें तीर्थ नाहीं केली काशी ॥ व्रत नाहीं केलें एकादशी ॥ द्वादशलिंगांमध्यें यासी ॥ नाहीं घडलें एकही ॥१६॥
यमदूत म्हणती शिवगणां ॥ परिसा महादोषियांच्या खुणा ॥ त्या वेदशास्त्रीं जाणा ॥ प्रसिद्ध असती ॥१७॥
या त्रैलोक्यामाझारी ॥ महादोष असती चारी ॥ त्या दोषें वर्तती जे दुराचारी ॥ ते होती पिशाचकुळीं ॥१८॥
मात्रागमन सुरापान ॥ ब्रह्महत्या आणि गोहनन ॥ हे चारी दोष घडले यापासून ॥ सत्य जाणा गणोत्तमा ॥१९॥
या चहूंमाजी घडे एक जरी ॥ तरी जाणावे घडले चारी ॥ ऐसा हा महादुराचारी ॥ जाणितला आम्हीं ॥२०॥
हा महादोषी नव्हे भला ॥ आम्हीं यासी पूर्ण ओळखिला ॥ याहूनि दोषी नाहीं बोलिला ॥ दुसरा वेदशास्त्रांत ॥२१॥
हा तस्कर शिवचंडांशाचा ॥ तो अपराधी त्रैलोक्याचा ॥ तुम्ही काय भाव देखिला याचा ॥ जें आणिलें विमान ॥२२॥
ऐसें याचें कवण सुकृत ॥ जें या दोषिया विमान प्राप्त ॥ इतुकें वदले यमदूत ॥ शिवगणांप्रती ॥२३॥
शिवगण म्हणती यमदूतांसी ॥ याचें सूक्ष्म पुण्य द्दश्य नाहीं तुम्हांसी ॥ तुम्ही पापरूपी म्हणतां यासी ॥ परी हा सखा शिवाचा ॥२४॥
याचें पुण्य पाहतां त्रैलोक्यामाझारीं ॥ ऐसा कोण रे त्याची संख्या करी ॥ त्याचें श्रेय त्रिपुरारी ॥ जाणे तोचि एक ॥२५॥
हा पंचरात्रीं उपवासी ॥ शिवरात्र घडली यासी ॥ यागरण झालें शिवापासीं ॥ कपिलेश्वर लिंगाजवळिकें ॥२६॥
शिवभक्तीं केलें स्तवन ॥ तैं शिवनाम जाहालें यासी श्रवण ॥ यापरतें थोर पुण्य ॥ कवण असे त्रिलोकीं ॥२७॥
जे शिवकथा श्रवण करिती ॥ शिवरात्रीसी लिंग पूजिती ॥ जे शिवव्रत नेमें चालविती ॥ तेचि वसती कैलासीं ॥२८॥
कृतांतदूत हो परिसा आणिकही ॥ याच्या सामर्थ्यासी पार नाहीं ॥ ऐसें कोणासी घडलें नाहीं ॥ या त्रैलोक्यमंडळीं ॥२९॥
शिवभक्तीं पूजिला चंद्रमौळी ॥ दीपक मंद जाहाला देउळीं ॥ यानें वस्त्र फाडोनि ते वेळीं ॥ उजळिला दीप ते ठायीं ॥३०॥
शिवमस्तकींचें फेडिलें तम ॥ ऐसा हा भक्त उत्तम ॥ शिवें याचे नाशिले श्रम ॥ त्रिजन्मांचे ॥३१॥
यमदूत म्हणती शिवगणांसी ॥ हें पुण्य ठाउकें नसे आम्हांसी ॥ म्हणोनि आम्हीं बांधिला पाशीं ॥ झालें पुण्य न कळतां ॥३२॥
तरी जो चंडांशनैवेद्य ॥ तो शिवें दिधला यासी प्रसाद ॥ आम्हां घडला थोर अपराध ॥ यासी बंधन केलियाचा ॥३३॥
तरी हे गुणनिधी भक्तउत्तमा ॥ आम्हांसी क्षमा कीजे अनुपमा ॥ शिवगणीं आज्ञा केली त्या याम्यां ॥ नाभीकार देऊनियां ॥३४॥
गुणनिधी घातला विमानीं ॥ उपचार जाणविले  दिव्यांगनीं ॥ मग नेला कैलासभुवनीं ॥ शिवसभेसी सत्वर ॥३५॥
मग शिव म्हणे भक्तवरा ॥ मज तोषविलें द्विजकुमरा ॥ तुवां विध्वंसिलें अन्धकारा ॥ माझिया मस्तकींच्या ॥३६॥
तुझीया भक्तीचें अधिकत्व ॥ यास्तव जन्मांतरीं पावसी नृपत्व ॥ ऐसें गणांसी पुरस्कारूनि उमाधन ॥ वदलासे स्ववदनीं ॥३७॥
लवणसागराचे दक्षिणपारीं ॥ तेथें त्रिकूटनामें पुण्यनगरी ॥ त्या कलिंगदेशामाझारी ॥ यासी जन्म दिसतसे ॥३८॥
जो पुलस्तीचा कुमर ॥ तो कलिंगदेशींचा राज्यधर ॥ विश्रवानामें नृपवर ॥ त्रिकूटपुरीचा ॥३९॥
प्रतिग्रामीं तो अग्निहोत्री ॥ शैलसुताधीशा महायात्री ॥ ऐसा तो ब्राह्मण जगत्रीं ॥ श्रेष्ठ असे पैं ॥४०॥
त्याचे वंशीं गुणनिधीसी ॥ जन्मा घातला परियेसी ॥ मग तो राज्य मेदिनीसी ॥ करूं लागला धर्मन्यायें ॥४१॥
म्हणे एका दीपासाठीं ॥ राज्यलक्ष्मी कोटयनुकोटी ॥ म्हणोनि पूजीतसे धूर्जटी ॥ सर्व राज्य समर्पूनियां ॥४२॥
प्रतिदेवालयीं अहोरात्रीं ॥ दीपमाळा लावी शिवमंदिरीं ॥ द्रव्यें वेंचूनि त्रिनेत्री ॥ पूजीतसे आत्मभावें ॥४३॥
ऐसा तो गुणनिघी जन्मपर्यंत ॥ पूजीतसे भवानीकांत ॥ मग जाहाला तयाचा देहान्त ॥ पुनरपि जन्म पावला तो ॥४४॥
मग त्या कर्दमऋषीच्या वंशीं ॥ जन्म दिधला कलिंगपतीसी ॥ मग तो निघाला तपासी ॥ आनंदवना सत्वर ॥४५॥
त्या आनंदवनामाझारीं ॥ मणिकर्णिकेचिया तीरीं ॥ शिवलिंग स्थापन करी ॥ कर्दमसुत तो ॥४६॥
तपा बैसला तो आनंदवनी ॥ तेणें विश्वनाथ धरिला ध्यानीं ॥ मग मानसपूजें शूलपाणी ॥ पूजिलासे साक्षेपें ॥४७॥
तरी ते मानसपूजा कैसी ॥ आणि कैसें पूजिलें शिवासी ॥ हे कथा परिसतां पुण्यासी ॥ मर्यादा नाहीं सर्वथा ॥४८॥
तो कर्दमऋषीचा नंदन ॥ मणिकर्णिकेचे तीरीं घाली आसन ॥ मग साधिता झाला अनुष्ठान ॥ तें केउतें अवधारा ॥४९॥
त्या संसार आनंदवनासी ॥ पंचभूतात्मक पंचक्रोशी ॥ इडापिंगलानामें वरुणा असी ॥ सुषुम्ना सूक्षम गांगा ते ॥५०॥
तये सूक्ष्मगंगेचे तटीं ॥ सहस्त्रदल शिवालयमठीं ॥ परमात्मा तो धूर्जगी ॥ लक्षिला तेणें स्वद्दष्टीं ॥५१॥
इडा पिंगला सुषुम्नेसी ॥ तेणें स्नान केलें त्रिवेणीसी ॥ मग शुद्ध मनें विश्वनाथासी ॥ केले धारास्नपन ॥५२॥
शुद्धभावचि करूनि बिल्वपत्रीं ॥ ते अर्पिली सोहंमंत्रीं ॥ ज्ञानदीपकें त्रिनेत्री ॥ ओंवाळिला सत्वर ॥५३॥
देहीं उठे जे जे वृत्ती ॥ ते ते अर्पी तो पशुपती ॥ मग अहोरात्र उन्मती ज्योती ॥ उजळिला दीपक ॥५४॥
ऐसे झाले शतसंवत्सर ॥ मानसपूजें अर्चिला हर ॥ मग तो अनाथांचा दातार ॥ प्रकटला शिव साक्षात ॥५५॥
शिव म्हणे ऊठ कलिंगपती ॥ त्रिजन्मीं आराधिलें मजप्रती ॥ तुज उचित द्यावया चित्तीं ॥ पूर्वींच म्यां विचारिलें ॥५६॥
मग विसर्जिलें त्याचें ध्यान ॥ शिवें उठविला करीं धरून ॥ म्हणे माग रे तुज प्रसन्न ॥ मी झालों या वेळीं ॥५७॥
मग म्हणे तो द्दढमती ॥ जयजयाजी उमापती ॥ परीस जेवीं रंकाचे हातीं ॥ तेवीं तूं सांपडलासी मज ॥५९॥
क्षुधार्थियासी मिळे आहार ॥ कीं सागरीं बुडतां तारूं प्राप्त होय सत्वर ॥ तैसा तूं सदाशिवा ॥ पावलासी मज ॥६१॥
अवर्षण पडतां दारूण ॥ रंकाचे शेतीं वृष्टी करी धन ॥ कीं दुर्बळासी जोडे कामधेनु जाण ॥ तैसा शिवा मज वाटसी ॥६२॥
जयावरी लोभ तुमचा ॥ तोचि नर परमदैवाचा ॥ सर्व भाग त्रिभुवनीचा ॥ न तुळे त्याच्या नखाग्रीं ॥६३॥
तुझिया कृपेचेनि बळें ॥ पांगार्‍यासी लागती द्राक्षफळें ॥ कृष्णतम तत्काळ उजळे ॥ तुझिया कृपेचे उजियेडें ॥६४॥
शुष्क तृणें उडे वन्ही ॥ कीं समुद्रा आच्छादील मेदिनी ॥ तरी हे सर्वकर्त्या तूं शूलपाणी ॥ लक्षा येशील ॥६५॥
सप्तपाताळपर्यंत ॥ एकवीस स्वर्ग आणि मृत्य ॥ हा तुझा खेळ अकल्पित ॥ सहज असे सर्वदा ॥६६॥
तुमची जरी बोलावी व्याख्या ॥ तरी वैखरीसी न होय संख्या ॥ जेथें वेद झाला मुका ॥ म्हणोनि अकथ्य तूं ॥६७॥
ऐसी तो द्दढमती करी स्तुती ॥ थोर संतोषला पशुपती ॥ म्हणे पुरे आतां तुझी भक्ती ॥ पावली मज सर्वही ॥६८॥
मग साक्षात प्रसन्न झाला शूलपाणी ॥ वामांगीं देखिली भवानी ॥ जैसे तेजें प्रकाशले तरणी ॥ कोटी एक प्रभातीं ॥६९॥
शिवांगीं देखोनि पार्वती ॥ मग आश्वर्य करी द्दढमती ॥ तिची देखोनियां तेजदीप्ती ॥ मग पाहातसे ऊर्ध्वचक्षू ॥७०॥
तेज लक्षवेना चक्षूंनीं ॥ द्दढमती मंद झाला नयनीं ॥ मग सूक्ष्म द्दष्टी करूनी ॥ पाहातसे वामनेत्रें ॥७१॥
तंव उमा म्हणे नीलकंठा ॥ हा पाहातसे द्दष्टी व्यंकटा ॥ तुझा वाम नेत्र फुटेल रे पापिष्ठा ॥ अभिलाषितां मजलागीं ॥७२॥
तेव्हां भंगला त्याचा वाम नेत्र ॥ भवानीसी म्हणे पंचवक्र ॥ हा सत्यचि माझा धर्मपुत्र ॥ केवीं अभिलाषी तुजलागीं ॥७३॥
आणिक उमेसी म्हणे पशुपती ॥ कांते तुझी देखोनि तेजदीप्ती ॥ तें तेज लक्षवेना द्दढमती ॥ म्हणोनि पाहातसे व्यंकटा ॥७४॥
त्यासी आश्चर्य वाटलें भारी ॥ म्हणे ऐसी हे कोण सुंदरी ॥ इचें लावण्य त्रैलोक्यामाझारी ॥ सर्वांहूनी विशेष ॥७५॥
ऐसें कल्पीतसे याचें मन ॥ आणि तुवां शापिलें दोषाविण ॥ म्यां यासी दिधलें वरदान ॥ वरदपुत्र माझा हा ॥७६॥
ऐसें शंकर वदे भवानीसी ॥ तुवाही प्रसन्न व्हावें यासी ॥ हें परिसोनि भवानीसी ॥ कृपा उपजली ह्रदयांत ॥७७॥
मग शिवासी म्हणे हैमवती ॥ तुमचा वरदपुत्र द्दढमती ॥ तरी शिवा नाम ठेवावें याप्रती ॥ कुबेर ऐसें प्रसिद्ध ॥७८॥
मग प्रसन्न झाली भवानी ॥ म्हणे तूं होसी रे पिंगनयनी ॥ जैसा माझा पुत्र परशुपाणी ॥ तैसाचि होसी ॥ तूं ॥७९॥
आणखी शिवाप्रती वदे गौरी ॥ हा आपुला वरदपुत्र जरी ॥ तरी शिवा करीं हा भांडारी ॥ नवनिधी अष्टमहासिद्धींचा ॥८०॥
आणिक वदतसे शैलबाळी ॥ हा रक्षावा आपणांजवळी ॥ सर्वकाळ चंद्रमौळी ॥ प्रिय होय आपणांसी हा ॥८१॥
ऐसा उमेनें दिधला पूर्ण वर ॥ तेणें थोर संतोषला हर ॥ मग उठविला कुबेर ॥ करीं धरूनि शिवानें ॥८२॥
मग पंचानन वदे भवानीसी ॥ तुवां वर दिधला जरी यासी  ॥ तरी हा म्यां केला निवासी ॥ अलकापुरीचा ॥८३॥
शिव म्हणे हो कुबेरा ॥ तूं आमुच्या वरदकुमरा ॥ थोर संतोषविलें भक्तवरा ॥ बहुतां पदाथीं ॥८४॥
जैसा माझा पुत्र कार्तिक ॥ आणि वीरमद्र विनायक ॥ कार्तिकाहूनि तूं अधिक ॥ प्रिय मज होसी ॥८५॥
शैलादि आणि गोकर्ण ॥ नंदी भृंगी घंटाकर्ण तूं मज प्रिय त्यांहून ॥ अलकानिवासिया ॥८६॥
हरभवानींचे वर लाधला ॥ दिव्य देह कुबेर पावला ॥ आधिपत्य पावता झाला ॥ अष्टमहासिद्धी नवनिधींचें ॥८७॥
शिव म्हणे वरदनंदना ॥ तुवां जे केली लिंगस्थापना ॥ त्यासी नाम ठेविलें जाणा ॥ कुबेरेश्वर ऐसें ॥८८॥
हें लिंग होतें येथेंचि अगाध ॥ परी कोणासी नाहीं प्रसिद्ध ॥ हें तुझिया भक्तीस्तव साध्य ॥ जाहलें तुजलागीं ॥८९॥
जे कुबेरेश्वरलिंग पूजिती ॥ त्यांचे वंशीं लक्ष्मीची होय प्राप्ती ॥ ते पूर्वजांसहित वसती ॥ अलकापुरीं ॥ सर्वदा ॥९०॥
या कुबेरेश्वरलिंगाजवळी ॥ मी प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ सहवर्तमान शैलबाळी ॥ वसतसें साक्षात ॥९१॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसा वर झाला कुबेरासी ॥ तो हाचि अलकापुरनिवासी ॥ समूळ निरूपिला अवधारा ॥९२॥
विमान जातसे सत्वर गती ॥ लोपामुद्रेसी सांगे अगस्ती ॥ कवण लोक देखिला पुढती ॥ तें परिसें आतां प्राणवल्लभे ॥९३॥
श्रोतेहो हे कथा नव्हे व्यर्थ ॥ महाश्रेयस्कर यथार्थ ॥ श्रवण करितां घडे स्वार्थ ॥ म्हणे शिवदास गोमा ॥९४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे कुबेरलोकवर्णनं नाम पंचदशाध्यायः ॥१५॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ ॐ ॥ ॐ ॥
॥ इति पंचदशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP