मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २२ वा

काशी खंड - अध्याय २२ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
ऋषि बोलते जाहाले ध्रुरुवासी ॥ बहुकाळ जोडल्या पुण्यराशी ॥ तपें व्रतें तीर्थ काशी ॥ सेविजेती निरंतर ॥१॥
ऐसीं बहुत जन्मांची सुकृतें ॥ असती पूर्वार्जित संचितें ॥ तरी तयासी लक्ष्मीकांतें ॥ भाव देखोनि भेटिजे ॥२॥
मृत्यु-उत्पत्तीचिया वाटा ॥ जीवासी विश्रांति नाहीं चोखटा ॥ गर्भवासाचिया संकटा ॥ भोगिताती अखंड ॥३॥
अवघ्या जन्मांचा कळस ऐसा ॥ हा मनुष्यदेहाचा ठसा ॥ यामाजीं नेणे जरी शुद्ध व्यवसा ॥ तरी न चुके यमपंथ ॥४॥
तरी दिव्य देह पावन ॥ न होय तपसाधनावांचून ॥ किंवा पूर्वभाग्येंकरून ॥ प्रसन्न होतां त्रिपुरांतक ॥५॥
ध्रुव वदे जी महाऋषी ॥ तपसंकल्प माझिया मानसीं ॥ शरीर वेंचीन अहर्निशीं ॥ हरिकाजीं स्वामिया ॥६॥
मज द्यावा जी मंत्रागम ॥ तेणें होईन मी महाउत्तम ॥ मग तुमचिया कृषें मेघश्यामा ॥ स्मरेन जी अहर्निशीं ॥७॥
तरी हाचि माझा निर्धार ॥ ध्यानीं लक्षीन शार्ङ्गधर ॥ सुनीति मातेसी अव्हेर ॥ करूनि आलों मी येथें ॥८॥
ऋषि बोलती एकमेकां ॥ म्हणती पहा या क्षत्रियाच्या बालका ॥ राज्य प्रहरूनि निका ॥ केला संकल्प तपाचा ॥९॥
हा सप्तद्वीपवतीचा नरेंद्र ॥ छत्रसिंहासनीं उपेंद्र ॥ अमरपुरासमान राज्यभद्र ॥ मंडपस्थान जयाचें ॥१०॥
बृहस्पतिपुरीचा राज्यधर ॥ हा उत्तानचरणाचा कुमर ॥ तपकाजीं वेंचू पाहे शरीर ॥ हा संकल्प जी याचा ॥११॥
तंव बोलिला अरुंधतीवर ॥ जो वसिष्ठऋषि महाधीर गंभीर ॥ ध्रुरुवाचिया शब्दा प्रत्युत्तरा ॥ बोलता झाला नीतीचें ॥१२॥
तप शौर्य विद्याभ्यास ॥ औदार्य आणि महेशपूजन अहर्निश ॥ हा भाव जो धरी पुरुष ॥ तो मृगेशलांछनी बोलिजे ॥१३॥
हें इतुकें वर्ते जो नर ॥ धरोनि हाचि निर्धार ॥ तो चिंतितां पाविजे सत्वर ॥ फळदाता शिव एक ॥१४॥
मग त्या सप्तऋषींनीं ॥ ध्रुरुवासी मंत्र सांगितला श्रवणीं ॥ जेणें पूर्ण लक्षिजे ध्यानीं ॥ हरिहरस्वरूपांतें ॥१५॥
ऐसा मंत्र उपदेशिला वसिष्ठें त्यास ॥ मग सप्तऋषी झाले अद्दश्य ॥ तंव ध्रुरुवें देखिलें परिपाठास ॥ तपाचिया ॥१‍६॥
जे जे युक्तीं करी तपसाधन ॥ तैसेंचि देहीं उद्भवलें ज्ञान ॥ मन करिता झाला अनुष्ठान ॥ हरिहरांचें ॥१७॥
थोर ध्रुवाची तपयुक्ती ॥ देहीं प्रगटली ज्ञानशक्ती ॥ जें जें कार्य कल्पी चित्तीं ॥ म्हणे तें तें कर्ता श्रीहरी ॥१८॥
मंत्रदीक्षा झाली ऋषींची ॥ भ्रांति फिटली ध्रुवाची ॥ रूपें देखिलीं त्रिमूर्तींचीं ॥ देहामाजी आठवितां ॥१९॥
तमोगुणें देखिला हर ॥ रजोगुणें षाहे सावित्रीवर ॥ सात्विकभावें शार्ङ्गधर ॥ देहीं लक्षी त्रयमूर्ती ॥२०॥
प्रथम पूजिला सिद्धिबुद्धिरमण ॥ जो आधारस्थित आद्यगण ॥ चरी पाकोळिका रक्तवर्ण ॥ जपिन्नला षट्‍शतें ॥२१॥
सात पदें अक्षरें चारी ॥ पूजिला घटिका पांचांवरी ॥ मग चतुराननासी बरव्यापरी ॥ अर्चिता झाला संतोषें ॥२२॥
मग संचरला षड्‍दळस्थानीं ॥ तेथें असे तो चतुराननी ॥ सावित्री असे गृहिणी ॥ विरिंचिदेवाची ॥२३॥
तो सप्तऋषींचा पितरू ॥ सलोकतामुक्तीचा वरू ॥ तेथें जप करीतसे तो धरू ॥ षट्‍सहस्त्र ॥२४॥
तेथें ऋग्वेद बोले वैखरी ॥ मंत्र उच्चारीतसे षडक्षरी ॥ मग स्थापना केली बरव्यापारी ॥ आचारलिंगाची ॥२५॥
देखोनि सुषुम्ना ते गंगाजीवन ॥ ध्रुवें सारिलें तें पूज्यपूजन ॥ मग करिता जाहाला साधन ॥ दशदळकमळीं ॥२६॥
देखोनि ते मणिपुरीं ध्रुव आनंदला शरीरीं ॥ म्हणे मज भेटेल तो हरी ॥ कमळजेसहित ॥२७॥
तेथें होईल समीपतामुक्ती ॥ दश पांकोळियांच्या आवतीं ॥ श्वेतवर्ण महादीप्ती ॥ यजुर्वेद तो बोलिला ॥२८॥
मग तेथें सुनीतिनंदन ॥ करिता जाहाला गुरुलिंगाचें स्थापन ॥ मग पूजिला यथासांग मधुसूदन ॥ भावेंसहित ॥२९॥
द्वादशाक्षरीं मंत्र उच्चारी ॥ तेथें षट्‍सहस्त्र जप करी ॥ मग तेणें द्दढ धरिला मुरारी ॥ ह्रदयामाजी सर्वदा ॥३०॥
म्हणे हें हरीचें स्थान ॥ मज सप्तऋषी जाहाले प्रसन्न ॥ मी पावेन हरीचे चरण ॥ हा पसाद तयांचा ॥३१॥
मग ते गोल्लाटपीठस्थानीं ॥ ध्रुव बैसला अनुष्ठानीं ॥ मग स्मरता जाहाला चक्रपाणी ॥ अहोरात्र पैं ॥३२॥
ऐसा हरी लक्षिला आत्मदेहीं ॥ त्या हरीवांचूनि न स्मरे कांहीं ॥ संसार-व्यवसाय सर्वही ॥ त्यजिला तेणें सर्वथा ॥३३॥
त्यजिला आहार आणि सुषुप्ती ॥ आकर्षिली विषयवृत्ती ॥ शुभ वासना कल्पीतसे चितीं ॥ ते करी श्रीहरीसी अर्पण ॥३४॥
शीत उष्ण साहे शरीरीं ॥ अनशनवृत्ति निराहारी ॥ दर्भाग्रतोय प्राशन करी ॥ तेंही प्रत्यहीं नेमकें ॥३५॥
जे जे उद्भवे चित्तवृत्ती ॥ ते ते समर्पी लक्ष्मीपतीप्रती ॥ तरी ते कवणिये गतीं ॥ परिसा आदरें श्रोते हो ॥३६॥
ध्रुव जाय करावया स्नान ॥ म्हणे साक्षात हरी हें जीवन ॥ म्हणोनि करीतसे संचरण ॥ हरिनामांबुजामाजीं ॥३७॥
मग दर्भासनीं बैसें सुनीतिनंदन ॥ म्हणे आसनीं बैसला कमळलोचन ॥ जप करी दैत्यमर्दन ॥ ध्रुवरूपें अतिप्रीतीं ॥३८॥
जेव्हां उठे आसन सांडुनी ॥ तेव्हां म्हणे उठिला चक्रपाणी ॥ मग अवलोकी मधुवनीं ॥ तो म्हणे हरी पाहात असे ॥३९॥
गग शनैःशनैः जंव चालत ॥ येत येतां सुनीतिसुत ॥ म्हणे सिंधुजाकांत ॥ आला स्थानासी आपुल्या ॥४०॥
हस्तपादादिकें मनवक्त्रें ॥ तो म्हणे हीं हरीचीं गात्रें ॥ जो जो शब्द बोले वक्त्रें ॥ तो म्हणे श्रीहरी वदतसे ॥४१॥
जो वृक्ष देखे नभचुंबित ॥ त्यासी म्हणे हा लक्ष्मीकांत ॥ त्याचे तळवटीं पाहिलें प्रेत ॥ तेंहीं शरीर हरीचें ॥४२॥
लतापालवीं क्रीडती विहंगम ॥ त्यासी म्हणे क्रीडतो हा पुरुषोत्तम ॥ त्यावरी देखे अही परम ॥ त्यासी म्हणे हें शयन हरीचे ॥४३॥
द्दष्टीं देखे तरणी तारापती ॥ अष्ट दिशा नभ क्षिती ॥ जंतुमात्र तृणादि वनस्पती ॥ म्हणे हें सर्व हरिरूप ॥४४॥
अनेक शब्द ऐके कर्णीं ॥ म्हणे बोलतो चक्रपाणी ॥ अनेक उद्भवती नादध्वनीं ॥ तो म्हणे हरिस्वामीचे सुशब्द हे ॥४५॥
जें जें ध्रुव मानसीं कल्पीत ॥ तें तें सत्य जाण नव्हे अनुचित ॥ सर्वव्यापक लक्षीकांत ॥ हें विपरीत कवण करी ॥४६॥
ध्रुवें मांडिलें अनुष्ठान ॥ म्हणे कैसें करूं हरिपूजन ॥ हरि सर्वत्रीं व्यापून ॥ राहिला असे ॥४७॥
सरोवरीं देखे श्वेत कमळें ॥ म्हणे हीं हरीचीं चक्षुमंडळें ॥ वरी भ्रमती अलिकुळें ॥ ती बुबुळें हरीचीं ॥४८॥
देखे अष्टदिशा पृथ्वी गगन ॥ म्हणे हें हरीचें नाभिस्थान ॥ हें तंव गा जन्मभुवन ॥ विरिंचिदेवाचें ॥४९॥
हिरण्यामाजी शुभ रत्न ॥ तैसे शोभती भाललोचन ॥ अवघा भास संपूर्ण ॥ तया श्रीहरिरूप दिसतसे ॥५०॥
हरिनाम शुद्ध सुवर्ण ॥ वरी शोभलें ध्रुवाचें शब्दरत्न ॥ अवधीं लेइलीं भूष्ण ॥ हरिनामाचीं आवडीनें ॥५१॥
निशीच्या मध्यान्हअवसरीं ॥ त्या मधुवनस्थळामाझारीं ॥ चौर्‍यायशीं लक्ष शब्द वरी ॥ सूक्ष्म जीव बोलताती ॥५२॥
तयांप्रती शब्द देत अंबर ॥ जैसा वाद्यध्वनी गंभीर ॥ आणि अपार सुस्वर ॥ ऐकती श्रवणीं सर्वदा ॥५३॥
ध्रुव करी मानसी विचार ॥ कैसे हे जंतु बोलती अपार ॥ तरी यांच्या घटीं साचार ॥ हरी तूंचि एक व्यापलासी ॥५४॥
ऐसें हे हरिगुण बोलतां ॥ युगें न पुरती सांगतां ॥ परी संकलितमार्गें श्रोता ॥ वदतों किंचित परिसावें ॥५५॥
ऐसें तप करितां ध्रुव सुकुमार ॥ क्रमिले सहस्त्र एक संवत्सर ॥ मग वर्तों लागला चमत्कार ॥ तो काय कैसा पाहें आतां ॥५६॥
आलें तपाचें अवसान ॥ दिवस जाहाले संपूर्ण ॥ देव तपा करूं पाहाती विघ्न ॥ परी श्रीहरी रक्षिता तयासी ॥५७॥
देखोनि तयाची पुण्यराशी ॥ कंप सुटला वसुमतीसी ॥ त्या पंचमहाभूतांसी ॥ वर्तली चिंता थोर ते ॥५८॥
ध्रुवाचिया पादतळीं ॥ वसुमती होतसे मृदुळी ॥ पुढें चालतां नेत्रकमळीं ॥ नीच दिसे भूमिका ते ॥५९॥
तप देखोनि परम दारुण ॥ पृथ्वीनें प्रहरिलें कठिणपण ॥ पुढां उंच देखतां वाटेल शीण ॥ ध्रुवासी नेत्रीं पाहातां ॥६०॥
ऐसा तो ध्रुव तपा बैसला ॥ कीं तो शुभ गुणांचा ओतिला ॥ तो दुष्ट वासना विसरला ॥ जैसा देह टाकी जीवात्मा ॥६१॥
आणि कंप सुटला जीवना ॥ ध्रुव येतसे जेव्हां स्नाना ॥ तें अति शीतळ ना उष्ण जाणा ॥ होतसे सर्वदा ॥६२॥
आणि कंप सुटला तेजासी ॥ तें संतप्त न करी ध्रुवासी ॥ उष्णता सांडोनि तयासी ॥ मंदत्व पावलें तेधवां ॥६३॥
प्रेमें भयभीत मारुत ॥ तेणें प्रहरिला झंझावात ॥ तपाधिक देखिला सुनीतिसुत ॥ म्हणूनि पांगुळला तो ॥६४॥
ऐसें घडत असे ध्रुवातें ॥ परी तो न मानीत खेदातें ॥ लक्ष लाविलें एकचित्तें । इतर नावडे सहसाही ॥६५॥
अष्टदिशांचे दिक्पती ॥ त्यांसहित आला सुरपती ॥ म्हणे माझी घेईल अमरावती ॥ तपसामर्थेंकरूनियां ॥‌६६॥
सोम सूर्य तेज लपविती म्हणे हा घेईल आमची दीप्ती ॥ मग इंद्र बैसला एकांतीं ॥ दिक्पाळांसहित ॥६७॥
सर्व सुरमंडळीनें मांडिला विचारू ॥ कोणाचें पद घेईल धुरू ॥ मग पाचारिला देवगुरू ॥ वज्रनाथें तेधवां ॥६८॥
मग गुरूसी म्हणे वज्रधर ॥ ध्रुवें तप केलें महाक्रूर ॥ कोणाचें पद घ्यावया साचार ॥ तें सांगावें स्वामिया ॥६९॥
तंव गुरु म्हणे सहस्त्रनयना ॥ हें तुम्हीं पुसावें चतुरानना ॥ मग सर्व सुरेंसीं ब्रह्मभुवना ॥ विघाला तो अमरेश ॥७०॥
तें सप्त लक्ष विस्तीर्ण ॥ असे त्या ब्रह्मयाचें भुवन ॥ तेथें पावले सकळ सुरगण ॥ सुरेंद्रगणांसह तेधवां ॥७१॥
सत्यलोका आला सहस्त्रनयन ॥ त्यांहीं नमिला चतुरानन ॥ ब्रह्मयासी पुसाता जाहाला प्रश्न ॥ सकळ देवांसहित ॥७२॥
ध्रुवें मांडिलें अनुष्ठान ॥ आलें तपाचें अवसान ॥ कोणाचें पद घ्यावयाकारण ॥ तें सांगावें जी स्वामिया ॥७३॥
तंव विरिंची बोले यथार्था ॥ तुम्ही शंकेनें बाधलेती वृथा ॥ म्हणे परिसावें जी सुरनाथा ॥ ध्रुवतपाचिया ॥७४॥
जे हरिहरांचे भक्त ॥ नीतिमार्गें जे वर्तत ॥ त्यांचे मानसीं अनृत ॥ न वसेचि सर्वथा ॥७५॥
करिती तपाचे गिरिवर ॥ त्याचा फळदाता तो ईश्वर ॥ सृष्टि चालविता आधार ॥ ब्रह्मादिकांसी जाण पां ॥७६॥
म्हणोनि पुण्यशील तपवृत्ती ॥ समुद्र जैसे द्दढमती ॥ नाहीं जयांची चित्तवृत्ती ॥ पराभिलाषीं सर्वथा ॥७७॥
ते करिताती सत्कीर्ती ॥ उद्भवताती नव्या पद्धती ॥ मग त्यांची आर्त लक्ष्मीपती ॥ पुरवीतसे निरंतर ॥७८॥
ऐसें वदला सावित्रीवर ॥ परी मानसीं सत्य न घे वज्रधर ॥ म्हणे पद घेईल तो ध्रुव साचार ॥ माझेंचि आतां मज वाटे ॥७९॥
मग विधिआज्ञा घेऊनि सुरपती ॥ दिक्पाळेंसीं आला तो क्षिती ॥ बरवें न वाटे कांहीं चित्तीं ॥ सर्व देवांसी तेधवां ॥८०॥
मग आला तो मधुवनीं ॥ विघ्न मांडिलें ध्रुवतपसाधनीं ॥ त्यासी भेडसाविती निशीमध्यें येऊनी ॥ होऊनि पिशाच सर्वथा ॥८१॥
भर मध्यरात्रिसमयासी ॥ विघ्न मांडिलें ध्रुवासी ॥ देव झाले भूतें पिशीं ॥ भेडसावया ध्रुवातें ॥८२॥
सप्त वर्षाचें बालक ॥ तप साधिलें सहस्त्र एक ॥ तेणें केलें संसारसार्थक ॥ तेथें विघ्न काय करी ॥८३॥
नातरी केसरीचे झडपे ॥ मातंग हा आधींच कांपे ॥ तैसें ध्रुवाचे तपें साक्षेपें ॥ शंका बाधली देवांसी ॥८४॥
यम आणिक तो वरुण ॥ चंद्र कुबेर आणि पवन ॥ सूर्य सुरपती कृशान ॥ सर्व देव मिळाले ते ठायीं ॥८५॥
मग काय करी सुरेश्वर ॥ रचिलें विग्रहाचें वोडंबर ॥ तें परिसावें सविस्तर ॥ माया संपूर्ण देवांच्या ॥८६॥
कृष्णपक्षींची रजनी काळी ॥ वरी मेघपटळें घनदाटलीं ॥ त्या घनगर्जनें मही तळीं ॥ झाली कंपित तेधवां ॥८७॥
कोटी विजांच गजर ॥ तेथें उद्भवला समीर ॥ महाप्रचंड तरुवर ॥ उत्पाटिलें तेणें तेधवां ॥८८॥
झंझावात सुटला हिमकर ॥ मध्यें पर्जन्याचा सूक्ष्म तुषार ॥ तेथें लतापत्रेंसीं तरुवर ॥ ओसंडले सर्वही ॥८९॥
डाहाळिया भंगती ॥ कडकडां ॥ त्यांचा उमटतां घुमघुमाडा ॥ व्योम व्यापिलें फडफडां ॥ बोलती अशुभ वाणीतें ॥९०॥
अपार गर्जना भालूंचिया ॥ मुखीं ज्वाळा निघती अग्नीचिया ॥ आसनासमीप ध्रुवाचिया ॥ बोलती अशुभ वाणीतें ॥९१॥
ऐशा मावा करिती देवगण ॥ तंव गर्जिन्नले पंचानन ॥ जेवीं केसरीपुढें वारण ॥ पळताती मदोमन्त ॥९२॥
तेथें रुद्राक्षवृक्षाचे मूळीं ॥ दर्भासन घालोनि भूतळीं ॥ ध्रुव जपतसे त्रिकाळीं ॥ सिंधुजारमणासी ॥९३॥
तंव देव घेती मावा अनेक ॥ रूपें दाविती पिशाचकां ॥ नग्न विशाळ देती हांका ॥ तेणें व्योम गर्जतसे ॥९४॥
धांवती ब्रह्मग्रह-भूतें उदंड ॥ विशाल भैरव प्रचंड ॥ खांद्यावरी काळदंड ॥ कृतांतासमान भासती ते ॥९५॥
रूपें दाखविती विशाल ॥ खेचरें भूचरें विक्राळ ॥ बाबरझोटिंग विशाळ ॥ दशनधारी ॥९६॥
गर्जना करिती थोर घोषें ॥ भ्यासुर पसरोनियां मुखें ॥ भक्षूं धांवती तवकें ॥ त्या ध्रुवासी ॥९७॥
तंव तो ध्यानीं निश्चळ ॥ उत्तानचरणाचा बाळ ॥ ह्रदयीं स्मरतसें तमालनीळ ॥ अहर्निशीं ॥९८॥
त्रिकाळ श्रीहरीचें स्मरण ॥ तेणें ह्रदय दाटलें प्रेमरसें जाण ॥ मानिल्या वृथा तृणासमान ॥ मावा संपूर्ण देवांच्या ॥९९॥
जैसें जाणूनि अग्नीचिया वाहकां ॥ आधींचि दूर पळती पिपीलिंका ॥ तैशा ध्रुवाचे ह्रदयीं जाणोनि नामाचा धोका ॥ त्या मावा पळती ॥१००॥
तैसे पराभविले भूतादिक ॥ जैसे सिंह गर्जतां जंबुक ॥ कीं चेतला देखोनि पावक ॥ तृण न तगे जवळिकें ॥१०१॥
तैसा मावा करूनि सहस्त्रनयन ॥ ध्रुवासी दावीतसे दुरून ॥ ह्रदयीं करीतसे हरिस्मरण ॥ अचळ गिरी जैसा पैं ॥१०२॥
ध्रुव देखिला अचळ ॥ मग विचारी तो वज्रपाळ ॥ म्हणे हा ध्रुव अढळ ॥ गिरीसमान सर्वथा ॥१०३॥
म्हणे हा तंव दीर्घतपेश्वरी ॥ जिंकील वाटे अमरपुरी ॥ आणिक याचे मनाभीतरीं ॥ न भासे कांहीं सर्वथा ॥१०४॥
ऐसा चिंतातुर तो वज्रधर ॥ म्हणे आतां कवण योजावा विचार ॥ मग पाचारिला देवगुरु सत्वर ॥ वाचस्पती तो ॥१०५॥
तंव गुरूसी म्हणे वज्रपाणी ॥ ध्रुव बैसला जी द्दढासनीं ॥ देवांच्या माव जेणें नयनीं ॥ लेखिल्या तृणासमान ॥१०६॥
जैसा पौर्णिमेदिवशीं ग्रहणीं ॥ शशी काळवंडे गगनीं ॥ ते राहूसी शंका मनीं ॥ बाधतसे सर्वकाळ ॥१०७॥
तैशा शंकेनें बाधिला अमरनाथ ॥ परी ऐसा नसे ध्रुवाचा मनोरथ ॥ जैसी स्वन्पींची शंका मानिजे व्यर्थ ॥ शत्रुघाताची सर्वथा ॥१०८॥
तंव बोलतसे देवगुरू ॥ ऐका एक माझा विचारू ॥ मावेची सुनीति करूनि सत्वरू ॥ तीस छळावें ध्रुवापुढें ॥१०९॥
तियेसी भेडंसावितां मधुवनीं ॥ मग ते आक्रंदेल दीर्घध्वनीं ॥ मग तो मातृशब्द जाणूनी ॥ तप सांडील सहजचि ॥११०॥
हें मानलें जी वज्रधरा ॥ म्हणे मावेची सुनीति करा ॥ तंव कुबेर जाहाला सुंदरा ॥ प्रत्यक्ष सुनीति तो ॥१११॥
मग तियेसी झोंबती महाभूतें ॥ महाभ्यासुर कुश्चितें ॥ तंव ती बोभाटली ध्रुवातें ॥ करुणाशब्देंकरूनी ॥११२॥
मग ती म्हणतसे ध्रुवासी ॥ पुत्रा तूं मज सांडोनियां आलासी ॥ मग मी निघाले आपैसी ॥ तुझी शुद्धी पाहावया ॥११३॥
सुरुचीचें दास्यत्व करितां ॥ खेद जाहाला माझिया चित्ता ॥ मग मी निघालें तत्त्वतां ॥ शुद्धी तुझी घ्यावया ॥११४॥
अरे ध्रुवा पुत्रा तुजवीण ॥ मी झालें रे दीनवदन ॥ सहस्त्र वर्षें हें वन ॥ धुंडीत असें तुजसाठीं ॥११५॥
तरी पुत्रा तूं मज कैसा ॥ मी भोगीतसे दुर्दशा ॥ त्यजूनि माता पिता गृहव्यवसा ॥ तूं आलासी येथें तप करूं ॥११६॥
वृथा रे तुझी तपःसिद्धी ॥ तुज उद्भवली रे कुबुद्धी ॥ तप नव्हे थोर व्याधी ॥ भोगीतसें मी जननी तुझी ॥११७॥
माझी अवज्ञा करूनी ॥ तूं बैसलासी अनुष्ठानीं ॥ वथा तप तुझें मधुवनीं ॥ दुःखित जननी तुझी मी ॥११८॥
माता पिता असतां घरीं ॥ पुत्र जरी तप तीर्थें करी ॥ तैं निष्फळ जाणिजे संसारीं ॥ जन्म तयाचा ॥११९॥
ऐसें आपुलिया कार्याकारण ॥ मावा बोलती देवगण ॥ जयाचे शरीरीं हरिस्मरण ॥ त्यासी माव बाधेना ॥१२०॥
मग सुनीति म्हणे ध्रुवासी ॥ अजूनि प्रत्युत्तर कां रे न देसी ॥ मी भयभीत जाहलें मानसीं ॥ दिसतसे थोर भूतावळी ॥१२१॥
तंव धांविन्नली भूतें विक्राळ ॥ नग्न भैरव आणि वेताळ ॥ हातीं धरिले तीक्ष्ण त्रिशूळ ॥ गर्जती थोर काननीं ॥१२२॥
जैसी कुमुदिनी सरोवरीं ॥ मातंग मर्दी शुंडेवरी ॥ मग त्राहाटूनि अंगावरी ॥ चूर्ण करी तत्काळ ॥१२३॥
तैसी धरिलि सुनीति सुंदरी ॥ त्राणें त्राहाटिली क्षितीवरी ॥ मग घर्षिती भूमिवरी ॥ ध्रुवादेखतां ॥१२४॥
तैसी धरिली देखोनि सुनीती ॥ मग दीर्घस्वरें बोभाती ॥ येतसे थोर काकुळती ॥ ध्रुवातें पाहूनियां ॥१२५॥
नातरी जैसा महापूर जळीं ॥ वल्ली उत्पाटूनियां वाहे समूळीं ॥ तैसी ओढिती भूमंडळीं ॥ ध्रुवमातेतें ॥१२६॥
ते बोभातसे दीर्घध्वनीं ॥ नेलें मज एका पंचाननीं ॥ तुजसारिखा पुत्र असोनी ॥ गांजिताती दुर्जन विनादोषें ॥१२७॥
धांव धांव रे माझ्या बाळा ॥ माझी होतसे थोर अवकळा ॥ जैसी राहुमुखीं शशिकळा ॥ बीभत्स दिसे पाहातां ॥१२८॥
जैसा मातंग आसुडी कर्दळी ॥ समूळ उपडी भूमंडळीं ॥ तैसी मी पडिले कठोरमेळीं ॥ पंचाननभूतांचिया ॥१२९॥
मोडोनियां कर चरण ॥ व्याघ्र करिताती रे भक्षण ॥ जंव उरले असती प्राण ॥ तंववरी धांवें पुत्रराया ॥१३०॥
मज भक्षिताती श्वापदें ॥ भूतें झोंबती विनोदें ॥ धांवें धांवें दीर्घशब्दें ॥ आक्रंदत ते माय ॥१३१॥
म्हणे तीर्थ तपसाधन करावें कवणें ॥ जयाच्या आश्रमीं नाहींत धनें ॥ तेणें महावीतरागी होणें ॥ मग जाइजे तपासी ॥१३२॥
तेव्हां ध्रुवाचिया स्मरणीं ॥ मग तो विसर्जिला जी ध्यानीं ॥ सांचळ घेतसे जेव्हां श्रवणीं ॥ तंव ते आक्रंदे सुनीति माता ॥१३३॥
म्हणे मज अपमानिलें श्रेष्ठमातेनें ॥ म्हणोनि सेविलें मीं ब्रह्मारण्य ॥ अपमानास्तव तपसाधन ॥ मांडिलें असे या ठायीं ॥१३४॥
तरी हें सर्वथा विचारितां ॥ हे भूतावळी नव्हे माता ॥ ऐसें जाणूनि मागुता ॥ बैसला ध्रुव अनुष्ठानीं ॥१३५॥
 ऐसा ध्रुवें विचार केला ॥ मग तो मनीं स्तब्ध जाहाला ॥ दिशा अवलोकूं लागला ॥ तंव देखिल्या भयानक ॥१३६॥
व्याकुळ शब्द श्रवणीं ऐकिला ॥ मग ध्रुव काय वदता झाला ॥ म्हणे हा तरी हरि बोभाइला ॥ मजकारणें सर्वथा ॥१३७॥
कैसा सुंदर हा शार्ङ्गधर ॥ आणि आजि कां भासला भ्यासुर ॥ नाना वर्ण अपार ॥ वदतसे शब्द काननीं ॥१३८॥
तुम्हांसी प्रणमूं जी चक्रपाणी ॥ कैसा राहिलासी सर्वां घटीं व्यापूनी ॥ तरी उद्भवोत माझे ह्रदयभुवनीं ॥ तुझीं गुण-नाम-रत्नें ॥१३९॥
ऐसा तूं भूताधीश अगाध ॥ तुझें नामामृत अति शुद्ध ॥ कर्मकाळिमा फेडूनि वेध ॥ करीतसे देहधातूसी ॥१४०॥
तरी ऐसें तुझें नामामृत ॥ दश दिशा भूतप्रेतें गर्जत ॥ तयांतें प्रहरूनि निश्चित ॥ दाखवीं तुझिया रूपातें ॥१४१॥
ऐसें स्मरोनि मागुता ॥ ममता ग्रासोनियां समस्ता ॥ निश्चळ होऊनि स्मरता ॥ जाहाला पद्मनाभासी ॥१४२॥
जैसा कां चातक पक्षियांप्रती ॥ मेघगर्जनीं उल्हास चित्तीं ॥ परी तयांची चित्तवृत्ती ॥ न प्रवर्तेचि पृथ्वीजळीं ॥१४३॥
ऐसा ध्रुव बैसला अनुष्ठानीं ॥ संसार गृह-व्यवसाय त्यजोनी ॥ मग सामावलें चित्त चैतन्यीं ॥ न प्रवर्ते मायाभ्रांतीं ॥१४५॥
म्हणे मीं जाणीतलें याचें चित्त ॥ आम्हांसी मांडिलें शुत्रत्व ॥ जरी याचा शस्त्रें करावा घात ॥ तरी हा श्रेष्ठ तपस्वी ॥१४६॥
ऐसें विचारी तो अमरेश ॥ हा तंव अचळगिरी तापस ॥ मग पाचारिला जळाधीश ॥ वरुण तो ॥१४७॥
आतां सावधान जी श्रोतोत्तमा ॥ कथा परिसावी अनुपमा ॥ बद्धकरें प्रार्थी शिवदास गोमा ॥ दीन वदन करूनियां ॥१४८॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ध्रुवलोककथने ध्रुवतपश्वर्यावर्णनं नाम द्वाविंशाध्यायः ॥    ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥     ॥ ॐ ॥
 
॥ इति द्वाविंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 28, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP