मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ३३ वा

काशी खंड - अध्याय ३३ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
तंव अगस्ती म्हणे शिवसुता ॥ तूं वियोगक्षुधेचा दाता ॥ तरी प्रश्न असे जी कृपावंता । करणें तुम्हांसी ॥१॥
काशीमध्यें सर्व जीवजंतु ॥ कैसे असावे कवणे स्थितु ॥ देहान्त झालिया मुक्तु ॥ कैसी असे सर्व जीवां ॥२॥
आणि कैसा काशीचा वास ॥ आणि कैसा तेथींचा प्रकाश ॥ कवण उदीम कवण हव्यास ॥ आणि तेथें कैसा करावा ॥३॥
कवण व्यापार कोणें जीवें कीजे ॥ कोणें कवण लाभ पाविजे ॥ काशीमध्यें चतुर्वर्ण असिजे ॥ ते कोणें कैसें आचरिजे कर्म ॥४॥
कैसें काशीचें महिमान ॥ कोण प्रादुर्भाव कोण दान ॥ कवण अतीत कोणाकारण ॥ पूजिजे यथोक्त प्रकारें ॥५॥
स्वामी म्हणे हो अगस्तिमुनी ॥ काशीविश्वेश्वराची निजधामिनी ॥ तेथींचें अतिरम्य तुझे श्रवणीं ॥ करुं निरुपण अत्यंत ॥६॥
तरी अगस्ति हें पंचक्रोशीस्थान ॥ शिवार्चनावीण नव्हे गा पावन ॥ आणि पूर्वभाग्य संपूर्ण ॥ असेल अर्जिलें जयानें ॥७॥
तेथें शिवाचे आज्ञेविरहित ॥ नाहीं कोणीचि अन्य जंत ॥ वल्लीवृक्षतृणादि समस्त ॥ शिवआज्ञेनें वर्तती ॥८॥
तरी ते काशीपुरीमाजी असतां ॥ करुं नये ग उदरचिंता ॥ तो सर्व जीवांचा दाता ॥ भवानीशंकर असे ॥९॥
मनीं संकल्पूं नये कांहीं ॥ क्रूरता भय त्यजूनि सर्वही ॥ तो सर्व जीवांचा प्रतिग्रही ॥ शिवचि असे एक ॥१०॥
पुत्र-कलत्रांचे पालिग्रहण ॥ उदीम व्यवसाय यज्ञ दान । मी करितों हें वचन ॥ काशीस्थळीं न बोलावें ॥११॥
देह असावा बहुकालवरी ॥ कीं मृत्यु यावा झडकरी ॥ ही काशीमध्यें वैखरी ॥ अनुवादूं नये सर्वथा ॥१२॥
शिवइच्छता ते काशी ॥ पुण्यातें करी पापातें नाशी ॥ सर्व जंतूंते मोक्ष प्रकाशी ॥ म्हणोनि अविमुक्ति नाम पैं ॥१३॥
आणिक वाराणशी म्हणती ॥ आणि नाम तें अविमुक्ती ॥ हीं गुणनामें तूं अगस्ती ॥ परिसावी जाण काशीचीं ॥१४॥
तेथें पुण्यसरिता सीतेऐसी ॥ नातरी ती खङ्ग दोषांसी ॥ छेदीतसे महापापासी ॥ येऊं नेदी जवळिकें ॥१५॥
आणिक वरुणा नामें सरिता ॥ या दोघींचा जाहाली एकत्र मिश्रता ॥ पूजावया भवानीकांतां ॥ येत्या जाहाल्या आनंदवनासी ॥१६॥
संगम जाहाला वरुणेसी ॥ तेंचि गुणनाम जाहालें वाराणसी ॥ मुक्ति देतसे जीवजंतूंसी ॥ म्हणोनि नामें अविमुक्ति हे ॥१७॥
काशीमध्यें जे असतां जंत ॥ त्यांचें निर्वाण नेणें कृतांत ॥ काशीच्या दोषियांसी सूर्यसूत ॥ नेऊं न शके सर्वथा ॥१८॥
काशीस्थळीं जो करी परद्वार ॥ आणि अनेक वस्तूंचा जो तस्कर ॥ तो तीस सहस्त्र संवत्सर ॥ होय महा पिशाच ॥१९॥
देहान्त जाहालिया त्यासी ॥ परी तोही अगम्य यमासी ॥ पापभोग सरल्या काशी ॥ मागुती धडे तयातें ॥२०॥
ऐसा जो महादोषाचारी ॥ घालितां पंचक्रोशीबाहेरी ॥ राहों न देती काशीपुरीं ॥ दूत त्र्यंबकाचे ॥२१॥
निस्पृह होइंजे दग्धकामी ॥ चित्त ठेविजें आपुले कुलधर्मी ॥ एकचि स्मरावा शूलपाणी ॥ ऐसें असावें काशीस्थळीं ॥२२॥
शिवापरता देव म्हणतां॥ वरपडा होय कृतांता ॥ तो जातसे अधःपाता ॥ चंद्रार्कवरी निश्चयेंसीं ॥२३॥
क्षत्रियें रक्षावा क्षात्रधर्म ॥ ब्राह्मर्णी कीजेति षट्‌कर्म ॥ वैश्यें वैश्यकर्म उतमोत्तम ॥ शूद्रें शूद्राचार करावा ॥२४॥
न कल्पिजे पुत्र कलत्र ॥ इच्छा असावी परम पवित्र ॥ तेथें चालतसे शिवसूत्र ॥ त्यावांचूनि आन नसेचि ॥२५॥
व्यापारीं न कल्पिजे बहु हिरण्य ॥ थोर उदीम तो गंगास्नान ॥ थोर लाभ तो शिवदर्शन ॥ अन्य लाभ नसेचि ॥२६॥
आणिका तीर्थी शतवरुषीं ॥ राहिला असतां नेमेंसीं ॥ तरी काशीच्या एक दिवशीं ॥ शतगुणें विशेष तो होय ॥२७॥
आणिक स्थळीं निमाला दोषी ॥ तो भोगी लक्षचौर्‍यायशीं ॥ देहान्त झालिया पुण्यशीलासी ॥ मागुता मनुष्यजन्म ॥२८॥
आपुल्या पूर्व सुकृता । तो भोगीत मागुता ॥ पातकी जाय अधःपाता ॥ परी न सुटे त्यासी गर्भवास ॥२९॥
म्हणोनि थोर काशीचा वास ॥ आणिक तीर्थी नाहीं ब्रह्मप्रकाश ॥ येथें ब्रह्मतारक उपदेश ॥ होतसे शिवमुखीं ॥३०॥
जो दग्ध आणिका स्मशानीं ॥ तो जन्म पावे भलत्या योनी ॥ पावे शुभाशुभकर्मापासूनी ॥ दोषें दंडन गुणें पूजा ॥३१॥
म्हणोनि काशी महास्मशान ॥ ते स्थळी देहचि ठेवणें जाण ॥ मग करोत कां भक्षण ॥ श्वान किंव वायस ॥३२॥
आणिका स्थळीं पापपुण्यभोगण ॥ तैसें नव्हें आनंदवन ॥ तेथें एकचि मार्ग निर्वाण ॥ सर्व जीवां मोक्ष होय ॥३३॥
आणिक तीर्थीचा योगीश्वर ॥ आणि काशीचा तस्कर जार ॥ अधिकत्व पाहतां निर्धार ॥ कोटिगुणें विशेष तो ॥३४॥
जन्मवरी कथिजे आत्मज्ञान ॥ योगाभ्यास ब्रह्मज्ञान ॥ तेणें होइजें पावन ॥ काशीदर्शन व्हावया ॥३५॥
शत वर्षे कीजे महायज्ञ ॥ देवांसी अर्पिजे भागदान ॥ तेणें होइजें कां पावन ॥ काशी दृश्य व्हावया ॥३६॥
काशीमध्यें दीजे अन्नग्रास ॥ बिल्वपत्रें पूजिजे महेश ॥ तरी तेणें केला तुळापुरुष ॥ भारंभार सुवर्ण ॥३७॥
काशीमध्यें दीजे मुष्टिधान्य ॥ तरी कोण लक्षी त्याचें पुण्य ॥ शतयाग सुकृतासमान ॥ धडे सामर्थ्य जयासी ॥३८॥
षडंग योगसाधनी ॥ शत संवत्सर बैसे मृगाजिनीं ॥ तरी सहज बैसला काशीचें दुकानीं ॥ तो अधिक होय शतगुणे ॥३९॥
मंत्र घ्यावया तारक ॥ इच्छिताती हरि ब्रह्मादिक ॥ ते असती सृष्टिकर्माधिक ॥ म्हणोनि साध्य तयां नसे ॥४०॥
अमरेशादिक सुरगण ॥ इच्छिताती आनंदवन ॥ तेथें असे तो पंचानने ॥ प्रकट साक्षात ॥४१॥
ऐसी ते अविमुक्ति काशी ॥ कां न रुचे कोणासी मानसी ॥ दोष-गोटा ठेवूनि पुण्य-परिसांसी ॥ कवण पां न घे सर्वथा ॥४२॥
मग यथेच्छ पूजिजे त्रिनयन ॥ यथेच्छा कीजे स्नान दान ॥ इतुकें नव्हे तरी काशीस्थान ॥ अव्हेरुं नये सर्वथा ॥४३॥
मंत्र उपदेशी गुरु समर्थ ॥ तो मंत्र जाणावा सर्वहितार्थ ॥ गुरुविणे जेणें कळे सकळ चतुरर्थ ॥ तो मंत्र परिसा आतां ॥४४॥
न करणे षट्‌कर्म नित्याचारी ॥ न लागे गुरुआज्ञा शरीरीं ॥ परी तो महामंत्र द्विअक्षरी ॥ जपावा नाम काशी काशी ॥४५॥
वृथा मंत्रांचें ॥ परी काशीमंत्र हाचि फळ ॥ पूर्वज उद्धरती सकळ ॥ पावती मोक्षपदातें ॥४६॥
वृथा बालाबगला सर्वही ॥ बुडों नका या अज्ञानडोहीं ॥ शरीर स्वस्थ तंववरी या देहीं ॥ काशी स्मरा निरंतर ॥४७॥
अरे जेथें तारक ब्रह्म उपदेश ॥ देत साक्षात महेश ॥ ऐसें जाणोनि न करिती सायास ॥ ते पशुवत जाणावे ॥४८॥
प्रहरुनियां नेत्राचें देखण ॥ आरसां केवीं पाहाणें कंकण ॥ करीं दीप आणि चक्षु असून ॥ पडसी कां कूपामाजी ॥४९॥
महारम्य स्थळ हे काशी ॥ प्राप्त करी स्वर्गमोक्षासी ॥ अन्यत्र स्थळीं वृथा भ्रमसी ॥ मोक्षास्तव ॥५०॥
ब्रह्महत्या आणि गोहनन ॥ गोत्रवध आणि अगम्यागमन ॥ तितुकीं पातकें होतील दहन ॥ काशीनाम जप झालिया ॥५१॥
सेवावया क्षेत्र अविमुक्ती ॥ महीं सुरेंद्र जे आलेती ॥ सर्वही सुखें देववत असती ॥ तुच्छ करिती अमरादिकपदां ॥५२॥
हरि विरिंची त्रिशूळधर ॥ सहस्त्रनेत्र सविता आणि शीतकर ॥ यक्ष राक्षस ग्रह नक्षत्र फणिवर ॥ आणि महाभूतें पंचही ॥५३॥
तेथें लिंग स्थापन करुनी ॥ सर्व राहिले काशीभुवनीं ॥ तेथें मुक्ति असे म्हणोनि ॥ बोलती वेदवाक्यें ॥५४॥
अठ्यायशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ गण गंधर्व सुर नर किन्नर ॥ सर्व ग्रामजंतूंसी काशीपुर ॥ एकचि मोक्षमार्ग समस्तां ॥५५॥
वोळखावया आत्मस्वरुप ॥ ज्ञानी शोधिती अजपाजप ॥ दर्शनें भुललीं वृथाचि पाप ॥ विवादती अद्यापि ॥५६॥
षण्मुखे म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी काशीरहस्याची मुख्य स्थिती ॥ सर्व जंतूसी होतसे मुक्ती ॥ युगानुयुगीं ॥५७॥
पूर्वपुण्याची बहुत सामग्री ॥ तरीचि प्राप्त हे शिवनगरी ॥ प्रळयीं अविनाश हे त्रिशूळाग्रीं ॥ धरीतसे शिव सर्वदा ॥५८॥
काशीऐसी पुण्यपुरी । धुंडितां असाध्य त्रैलोक्यामाझारी ॥ जेथें जन्मला तो श्रीहरी ॥ शेषशायी परमात्मा ॥५९॥
हरेचे जन्मभूमीचें ॥ एवढे महिमान साचें ॥ तरी तें परम धाम शिवाचें ॥ तेथील महिमा अगाध ॥६०॥
स्वर्गी पुरिया बहुत असती ॥ सुवर्णमंडित रत्नखचिती ॥ सुरनाथाची अमरावती ॥ अलकापुरी कुबेराची ॥६१॥
गंधवतीचा अधिपती समीर ॥ शोभायमान मेरुपाठार ॥ दिक्पती तेथींचा राज्यधर ॥ शोभायमान आपुलें धामीं ॥६२॥
ऐसीं हीं स्वर्गनगरें महादीप्ती ॥ तितुके ठायीं सुरेंद्र अधिपती ॥ अमरावतीचे आधारें असती ॥ सर्व सुरनगरवासी जे ॥६३॥
आणि पाताळी असे पद्मपुरी ॥ ते भोगावती गंगेचे तीरीं ॥ महा विस्तीर्ण ते नगरी ॥ वासुकीरायाची म्हणवीतसे ॥६४॥
ऐशा पुरिया असती पवित्र ॥ आणि त्यांसी निर्माण करी विधातृसूत्र ॥ परी अविमुक्तीचें सूत्र ॥ कोणीही न तुळती ॥६५॥
आणि मृत्युलोकींचिया पुरिया ॥ कांची मथुरा द्वारावतिया अयोध्या अवंतिका आणि माया ॥ मंदाकिनी मूळीं अविमुक्ती जे ॥६६॥
षण्मुह म्हणे हो अगस्तिमुनी ॥ ऐशा या पुर्‍या त्रिभुवनीं ॥ परी अधिकारें शिवधामिनी ॥ अविमुक्ती ते जाण पां ॥६७॥
ऐसें त्रैलोक्य कोटी चार ॥ याचा पाहातां विचार ॥ स्पर्धेसी न तुळती एकचि घर ॥ काशीमाजी विश्येचें ॥६८॥
ऐसी अगाधमहिमा ते काशी ॥ धर्मभूमि अर्ध आकाशीं ॥ अलिप्त जाण ते वसुमतीसी । पद्मिनीपत्र जळीं जैसें ॥६९॥
हे निर्माण केली पंचवक्रें ॥ अगाध अनुपम स्वतंत्रें ॥ मज न सांगवे षड्‌वक्रें ॥ पांगुळे वैखरी बोलतां ॥७०॥
ऐसी हे अविनाश अविमुक्ती ॥ अभंग न भंगे प्रळ्यांतीं ॥ अरे ह्या गृहमंदिरांई केवीं शांती ॥ न करीं शिव कैसें ते ॥७१॥
जैसी गृहकरी कुळवाडी ॥ फिकाअंतीं करी सर्व मोडी ॥ परी तो गृहमंडिरें न मोडी ॥ आपुलीं जैसीं ॥७२॥
म्हणोनि पंचभूतांसी नाश ॥ प्रलयांती संहारी महेश ॥ त्याचें निजगृह तें काशी तीस ॥ केवीं शांती करील ॥७३॥
ऐसी हे काशीरहस्यकथा ॥ सांगतां विस्तर होईल ग्रंथा ॥ श्रोतीं न कोपावें वृथा ॥ पाल्हाळ विशेष म्हणोनी ॥७४॥
परी काशीमाहात्म्य हें अपार ॥ सांगूं शकेना सृष्टिकर ॥ अगस्तीसी निरुपी शिवकुमर ॥ तें संकलितमार्गेकरुनी ॥७५॥
गणित कीजे मेघधारा ॥ कवळिजे आकाशींचे समीरा ॥ परी अगम्य महिमा त्या काशीपुरा ॥ आनंदवनाचा ॥७६॥
पश्चिमे उदय करिजे रविकरीं ॥ परी न वर्णवे काशीपुरी ॥ तेथींचें सामर्थ्य तो त्रिपुरारी ॥ शिवचि एक जाणता ॥७७॥
तंव अगस्ति म्हणे शिवसुता ॥ तृप्ति न होय तव वचनामृता ॥ तरी एक प्रश्न असे जी आतां ॥ क्षमा करीं स्वामिया ॥७८॥
या काशीरहस्याची फलश्रुती ॥ ते मज निरुपा क्षमा करुनि प्रीतीं ॥ स्वामी म्हणे गा अगस्ती ॥ हें सत्य न घेती मंद मानव ॥७९॥
हें काशीकथारहस्य पुण्यपावन ॥ जयासी धडे श्रवण पठण ॥ तयासी सामर्थ्य धडे जाण ॥ कोटी गजअश्वदानाचें ॥८०॥
कुरुक्षेत्रीं रविग्रहणीं ॥ भारंभार सुवर्ण वेंचिजे दानीं ॥ स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ न बोलों हें सर्वथा ॥८१॥
हे सांगतां फलश्रुती ॥ मानसीं न होय गा तृप्ती ॥ हें सामर्थ्य तो पशुपती ॥ शंकर एक जाणता ॥८२॥
यमपुर केलें उद्वस ॥ महादोषियां प्राप्त कैलास ॥ जेथें तारक उपदेशी महेश ॥ आतां फलश्रुती कायसी ॥८३॥
ऐसी हे काशीरहस्यकथा ॥ किती सांगिजे निवारे व्यथा ॥ सहस्त्रंवदन तुकीतसे माथा ॥ कद्रुसुत जो ॥८४॥
आतां सावधान जी श्रोतां ॥ शिवदास गोमा प्रार्थी सर्वथा ॥ श्रोतीं एकाग्र होऊनि कथार्था ॥ सर्वकाळ परिसावें ॥८५॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे काशीमाहात्म्यवर्णनं नाम त्रयस्त्रिंशाध्यायः ॥३३॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयस्त्रिंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP