मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ६ वा

काशी खंड - अध्याय ६ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
ऐसा ऋषि जंव मार्ग क्रमीत ॥ तंव पुढें देखिला लिंगपर्वत ॥ मग लोपामुद्रेसी बोलत ॥ कुंभजऋषि ॥१॥
ऋषि म्हणे कांते अवधारीं ॥ हा पाहें मल्लिकार्जुनगिरी ॥ याचा महिमा पुराणांतरीं ॥ ब्रह्मादिकां अगम्य ॥२॥
चौर्‍यायशीं योजनें याची प्रदक्षिणा ॥ वेष्टिलें पाताळगंगेचे जीवना ॥ वरी मल्लिकार्जुनाचें स्थान जाणा ॥ युगानुयुगीं हेममय ॥३॥
कांते परियेसीं याचें महिमान ॥ शिखर देखिल्या चुके जन्ममरण ॥ मातृपितृपक्षी होती पावन ॥ कैलासपदा पावती ते ॥४॥
पाताळगंगेचें घडे स्नान ॥ तरी सार्थक तयाचें जनन ॥ तेथें ऋषीनें सारिलें स्नान ॥ मनीं श्रद्धा धरूनियां ॥५॥
करूनि नित्यकर्म संध्या तर्पण ॥ मल्लिकार्जुनासी घातलें स्नपन ॥ मग करूनियां सांग पूजन ॥ केलीसे प्रदक्षिणा ॥६॥
घटिका एक कीजे देवध्यान ॥ तरी पूर्वजांसी होय उद्धरण ॥ कोटि जन्में शुद्ध पुण्य ॥ केलिया ऐसें घडेना ॥७॥
अगास्ति म्हणे परियेसीं प्रिये ॥ जैसे केदारीं भक्षिजे तोये ॥ तरी अंगुष्ठप्रमाण होये ॥ ह्रदयीं लिंगाकृती ॥८॥
जैं पंचक्रोशीमध्यें घडे पचत्व ॥ तैं तत्काळ सायुज्यमुक्त ॥ ऐसें अनुवादलासे कांत ॥ हैमवतीचा ॥९॥
मल्लिकार्जुनाचें शिखर देखतां ॥ तत्काळ मुक्ति सायुज्यता ॥ ऐसी चहूं वेदांची महामान्यता ॥ या गिरीसी असे ॥१०॥
तंव लोपामुद्रा वदे अगस्ती ॥ स्वामी परिसा माझी विनंती ॥ मज असेल ज कृपेची प्राप्ती ॥ तरी प्रश्न करीन ॥११॥
तंव ऋषि वदे कांते ॥ माझिये तपशक्ति पतिव्रते ॥ तूं तपःसिद्धि आनंदकर्ते ॥ माझिये मनोवृत्ती ॥१२॥
शब्दरत्नें वदे तुझी वैखरी ॥ तीं ठेवावया स्थळ नाहीं धरित्रीं ॥ तीं माझिया मनामांदुसेमाझारी ॥ शोभती अहर्निशीं ॥१३॥
जे पतिव्रता पूर्ण गुणभरित ॥ स्वामीनें नसावें तिचे आज्ञेविरहित ॥ तुज प्रश्न करावयाचें आर्ता ॥ तरी न करीं विलंव ॥१४॥
तंव वदती झाली पतिव्रता ॥ परिसा जी ऋषि गुणवंता ॥ आपण राहावें येथेंची आतां ॥ या मल्लिकार्जुनस्थानीं ॥१५॥
शिखर देखिर देखिल्या निश्चितीं ॥ नाहीं मग पुनरावृत्ती ॥ आतां काशीवियोगें आपणांप्रती ॥ कासयासी शोक पैं ॥१६॥
मग ऋषि म्हणे कांतेसी ॥ मोक्षदायक तीर्थें बहुत ऐसीं ॥ तीं केलिया न पाविजेती ॥ सायुज्यमुक्ती ॥१७॥
मल्लिकार्जुन गमेश्वर ॥ धारातीर्थ ॐ कारेश्वर ॥ कुरुक्षेत्र त्र्यंबक ब्रह्मगिरी थोर ॥ महाकाळेश्वर तो ॥१८॥
कुशावर्त पुण्यक्षेत्र जाण ॥ आतां ज्या होती मुक्तिकारण ॥ ऐशी पुरी अतिपावन ॥ परियेसीं तूं ॥१९॥
द्वारावती मधुवन ॥ तेचि मधुपुरी जाण ॥ अयोध्यापुरी रामभवन ॥ आणि माया कांची अवंतिका ॥२०॥
यापरी शंखोद्धार अरुणा ॥ हिमाचल केदार सेतुबंध जाणा ॥ मुक्तिकारक ते वरुणा ॥ परियेसीं कांते तूं ॥२१॥
तरी यांच्या ठायीं ऐसी आहे मुक्त ॥ हीं केलिया काशी होय प्राप्त ॥ आणिक मानसतीर्थें निश्चित ॥ तींही देती मोक्षातें ॥२२॥
तीं मानसतीथें कवण कवण ॥ कायिक वाचिक मानसिक जाण ॥ सत्य सद्‍बुद्धि द्दढ ज्ञान ॥ ब्रह्मचर्य नियमव्रत ॥२३॥
या मानवी देहापासून ॥ ऐसीं मानसिक तीर्थें होऊन ॥ काशी होइजे पावन ॥ तेचि असे मुक्तिदात्री ॥२४॥
ऋषि म्हणे कांते परियेसीं ॥ हे केलिया मुक्ति जाहली कवणासी ॥ ते प्राणवल्लभे ऐक कथेसी ॥ करुं तुजप्रती निरूपण ॥२५॥
कवणएक द्विज परियेसीं ॥ कांतेसह होता मधुपुरीसी ॥ त्याची कीर्ति देवां ऋषींसी ॥ अगम्य झाली ॥२६॥
त्या द्विजाचे वंशीं पुत्र झाला ॥ महापुण्यशील ज्ञाता मला ॥ तेणें मातृपितृवंश उद्धरिला ॥ वैकुंठवासेंकरूनियां ॥२७॥
शिवशर्मा नाम त्यासी ॥ तो वेदाध्ययनी सर्व विद्याभ्यासी ॥ सर्व तीथी स्नानें घडलीं त्यासी ॥ नाना कष्टेंकरूनियां ॥२८॥
तो व्रतनेमी पूर्णज्ञान ॥ चतुर्दश विद्या अभ्यासून ॥ त्यांतील विद्या जी मोक्षसाधन ॥ ती अम्यासिली तयानें ॥२९॥
केलें चहूं वेदांचें अध्ययन ॥ षट‍शास्त्रें आणि अठरा पुराण ॥ स्तंभन मोहन उच्चाटन ॥ नाटयविद्या अभ्यासिली ॥३०॥
गारूडविद्या बहुरूपी नृत्य ॥ कोल्हाटविद्या गायन गीत ॥ पूर्ण षड्‍रागांसहित ॥ त्यांचिया भार्या छत्तीस ॥३१॥
तीन ग्राम अति सुरस ॥ वावीस श्रुति मूर्च्छना एकवीस ॥ सप्त स्वर तीन कोटि एकुणपन्नास ॥ बत्तीस उपराग अभ्यासिले ॥३२॥
वेणु सुस्वर षड्‍गुण तंत वितत ॥ रचना दोन तीव्र शांत ॥ अष्टपादांचें संगीत ॥ पंचताल छत्तीस द्दष्टी ॥३३॥
षोडश कला पूर्ण एक ज्योती ॥ तैसा तो चौसष्ट कला पूर्ण सुमती ॥ संपादिल्या सर्व नीति ॥ ऐसा सकल विद्याभ्यासी ॥३४॥
ध्यान लक्षण समाधिसाधन ॥ द्वादश मुद्रा त्रिकाळज्ञान ॥ आत्मज्ञान पिंडज्ञान ॥ पवनजया अभ्यास केला पैं ॥३५॥
चतुर पंडित परम निपुण ॥ विध्युक्ताचार परिपूर्ण ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ अतीतानागत जाणता ॥३६॥
ऐशा विद्या अभ्यासीत ॥ तंव समीप आला तयाचा अंत ॥ तो दर्पणीं जंव मुख पाहात ॥ तंव शुभ्रकेश देखिले मस्तकीं ॥३७॥
म्हणे आहा कटकटा काय जाहालें ॥ आयुष्य तंव पूर्ण भरलें ॥ मज ऐहिक ना पारत्रिक जोडलें ॥ नहीं केली शिवभक्ती ॥३८॥
शिवशर्मा निषेधी आपणातें ॥ म्हणे कांहीं प्राप्त नोहे आमुतें ॥ नाहीं केलीं तीर्थें नेम व्रतें ॥ पूजा न घडली सत्पात्रीं ॥३९॥
जन्म माझे वृथा गेलें ॥ योगाचें साधन नाहीं झालें ॥ नाहीं गायीस कुरवाळिलें ॥ गोदानही न घडलेंचि ॥४०॥
म्यां नाहीं दिधले अश्व गज ॥ महीदान न घडलें मज ॥ जन्मांतरींही न पूजिला द्विज ॥ नाहीं घडळें तपही ॥४१॥
नाहीं संकल्पिलीं जीं सुधामें ॥ नाहीं केलीं पंचयज्ञ षट्‍कर्में ॥ जीं स्थावरें आणि जंगमें ॥ नाहीं तरी पूजिलीं जन्मांतरी ॥४२॥
नाहीं काढिले मार्गींचे कंटक ॥ शिवालयीं नाहीं लाविले दीपक ॥ उष्णकाळीं शीतोदक ॥ नाहीं दिधलें मार्गस्थां ॥४३॥
सदा असत्य माझी वैखरी ॥ शांति क्षमा नाहीं तिळभरी ॥ मातेसमान परनारी ॥ नाहीं देखिली म्यां ॥४४॥
वृषभ नाही दिधला घेनूसी ॥ शर्करा न घातली पिपीलिकांसी ॥ नभदीपक कार्तिकमासीं ॥ नाहीं लाविला सर्वथा ॥४५॥
गोघृतें नाहीं तृप्त केले पितर ॥ मागी न लाविले बृक्षभार ॥ नाहीं पूजिला शंकर ॥ शिवरात्री पर्वणीसी ॥४६॥
भूमिदान नाहीं दिधलें द्विजा ॥ म्यां नाहीं दिधली दान अजा ॥ तीर्थें करूनि पूर्वजां ॥ नाहीं उद्धरिलें ॥४७॥
मुक्त नाहीं केले तीर्थमार्ग ॥ नाहीं केले म्यां कूप तडाग ॥ मज नाहीं घडला सुसंग ॥ पूर्ण गुरूचा ॥४८॥
नाहीं दिधलें उपानहदान ॥ अन्नार्थियासी मिष्टान्न ॥ पर्जन्यकाळीं गृह बांधोन ॥ नाहीं दिधलें योगीश्वरा ॥४९॥
कोणाची बंधनें नाहीं मुक्त केलीं ॥ शीतकाळीं वस्त्रें नाहीं दिधलीं ॥ भंगिलीं शिवालयें नाहीं उभविलीं ॥ नाहीं बांधिले वृक्षां पार ॥५०॥
व्रत नाहीं केलें एकादशी ॥ तीर्थ नाहीं घडले काशी ॥ मनुष्यजन्मा येऊनि गुरूसी ॥ ओळखिलें नाहीं म्यां ॥५१॥
जे अजाकंठीचे स्तन ॥ ते निष्फळ जेवीं पयाविण ॥ तैसा मी व्यर्थ जन्मोन ॥ निष्फळ झालों वाटतसे ॥५२॥
जैसें तरूपर्ण वातवक्रीं ॥ वृथाचि भ्रमें गगनांतरीं ॥ तैसा मानवीं जन्मोनि संसारी ॥ वृथा जन्म पैं माझा ॥५३॥
जैसा आचारभ्रष्ट द्विजवर ॥ आपुले कुळधर्माचा करी अव्हेर ॥ तैसा मी द्विजवंशीं अविचार ॥ जन्मलों भिक्षुक ॥५४॥
यावरी लोमामुद्रेकारण ॥ अगस्ति वदे दिव्य वचन ॥ सर्व अभ्यास केले शिवशर्म्यानें ॥ परी तो निंदी आपणासी ॥५५॥
मग क्षणएक राहूनियां स्थिर ॥ शिवशर्मा कल्पीतसे विचार ॥ म्हणे आतां स्वस्थ जंव शरीर ॥ तंव करूं तीर्थयात्रा ॥५६॥
शुभ लग्नी शुभ दिनीं ॥ करी शिवशर्मां उपास पारणीं ॥ मग ब्राह्मण भोजन करूनी ॥ निघे तीर्थयात्रेसी ॥५७॥
शिवशर्मा मार्गीं जातां ॥ उभा ठाकोनि विचारी मागुता ॥ मार्गीं थोर उद्भवली चिंता ॥ शिवशर्म्यासी ॥५८॥
म्हणे आयुष्य उरलें किंचित ॥ आणि तीर्थें असती बहुत ॥ ऐसा तो चिंतार्णवीं भ्रमत ॥ म्हणे कैसे करावें ॥५९॥
मग क्षणएक स्थिर राहोनियां ॥ म्हणे थोर थोर तीर्थें जे जे ठाया ॥ त्या त्या आतां करूं पुरिया ॥ जोंवरी शरीर स्वस्थ असे ॥६०॥
शिवशर्मा निघे झडकरी ॥ तो पावला अयोध्यापुरीं ॥ तेथें पंचरात्री सर्व विधि करी ॥ मग निघे तेथोनियां ॥६१॥
मग आला सिता-असितास्थानीं ॥ जेथें मीनल्या कालिंदी मंदाकिनी ॥ तें प्रयागतीर्थ सत्यलोकाहूनी ॥ स्थापिलें असे विधीनें ॥६२॥
तेथें करोनि माघस्नान ॥ शूळटंकेश्वरी करूनि पूजन ॥ प्रयागवटीं करूनि दर्शन ॥ मग निघे तेथोनियां ॥६३॥
पूर्वीं ब्रह्मन्यानें केला याग ॥ म्हणोनि तीर्थासी नाम प्रयाग ॥ तो शिवशर्मा काशीमार्ग ॥ क्रमिता झाला सत्वर ॥६४॥
तंव देखिलें आनंदवनस्थान ॥ तें योगीश्वरांचें निजभवन ॥ प्रासाद दिसती मार्गींहून ॥ काशीपुरीचे ॥६५॥
आला पंचक्रोशीतटाका ॥ तेथें पूजिलें देहली विनायका ॥ तंव देखिली मणिकर्णिका ॥ पापनाशिनी तीर्थ पैं ॥६६॥
तेथें शिवशर्म्यानें स्नान केलें ॥ मग संध्यावंदन संपादिलें ॥ नित्यकर्म करोनि क्रमिलें ॥ काशीचिया चोबारीं ॥६७॥
तंव चिंताग्रस्त जाहला तेथें ॥ देखों लागला दशदिशांतें ॥ असंख्य प्रासाद-दैवतें ॥ देखता झाला तो ॥६८॥
म्हणे कवणाची भक्ति करूं ॥ दंडपाणी पूजूं कीं विघ्नहरू ॥ काळभैरव कीं वीरेश्वरू ॥ कीं रत्नेश्वरू शैलेश्वरू तो ॥६९॥
किंवा पूजूं तो त्रिलोचन ॥ कीं धर्मेंश्वर पूज्य पूजन ॥ कीं अविमुक्तेश्वरा शरण ॥ जाऊं ज्योतिरूपातें ॥७०॥
ऐसा शिवशर्मा चिंतावृत ॥ म्हणे कवण पूजूं दैवत ॥ मग स्मरला तो अकस्मात ॥ ह्रदयामाजी ॥७१॥
आलों विश्वनाथ पूजावया ॥ कोटि जन्मांचे दोष विलया ॥ गेले विश्वंभर देखिलिया ॥ तत्काळ तेथेंचि ॥७२॥
मणिकर्णिकाजळें शिवासी ॥ उपचारीं पूजिलें षोडशीं ॥ साष्टांग प्रमाण शिवासी ॥ पंच रात्रीं जागरण ॥७३॥
तंव स्मरला आणिक विचारू ॥ आतां आणिक तीर्तें करूं ॥ मग करिता झाला अव्हेरू ॥ काशीपुरीचा ॥७४॥
निर्दैंवा सांपडे निधान ॥ तें कुबुद्धीस्तव जाय टाकून ॥ तैसें अप्राप्त आनंदवन ॥ झालें शिवशर्म्यासी ॥७५॥
सरोवर सांडोनि मुक्ताह री ॥ म्हणे बैसूं कूपोदकामाझारी ॥ जैसा तो सुगंधवृक्षावरी ॥ वायस वस्ती कल्पीना ॥७६॥
सांडोनि सायुज्यमुक्ती ॥ आणिक कल्पिजे ते अवगती ॥ हे पहा चिंतेची आवृत्ती ॥ उद्भवली त्यासी ॥७७॥
चिंता प्रवर्तली जयाचे मानसीं ॥ तो विसरे स्त्रीबाळकांसी ॥ हरिकांता विमुख होय त्यासी ॥ हें चिंतेचें मूळ ॥७८॥
चिंता प्रहरी सुबद्धी ॥ चिंता शुद्ध मनासी बाधी ॥ पडे व्यवसायाचे संधीं ॥ स्थिर नोहे अंतर ॥७९॥
काशीबाहेर शिवशर्मा ॥ येऊनि पाहे क्षेत्रमहिमा ॥ म्हणे हे तंव परंधामा ॥ विश्वेश्वराची ॥८०॥
स्वर्ग मृत्यु पाताळविवरीं ॥ नाहीं अविमुक्तीऐसी पुरी ॥ हे अव्हेरूनि आणिका विचारीं ॥ ऐसा कैसा मूढ मी ॥८१॥
पया अमृतातें अव्हेरी ॥ आणि हालाहलातें स्वीकारी । ऐसा कवण दुराचारी ॥ महामूर्ख असेल ॥८२॥
परीस अव्हेरूंनि घे पाषाण ॥ ऐसा कोण मतिहीन ॥ तैसें हें टाकील आनंदवन ॥ ऐसा कोण निर्दैव ॥८३॥
ऐसा शिवशर्मा विचारी अंतरीं ॥ म्हणे आतां तीर्थें करूनि झडकरी ॥ मागुता येईन काशीपुरी ॥ हा भाव मानसींचा ॥८४॥
तेथूनि वेगेंसीं विघाला ॥ पुरी अवंतीस पावला ॥ तेथें महाबळेश्वर देखिला ॥ जैसा कर्मतमास दीप ॥८५॥
तेथें करूनियां पूजन ॥ दानें तृप्त केले ब्राह्मण ॥ मग विघता झाला तेथून ॥ समुद्रतीरासी ॥८६॥
कैसी देखिली द्वारावती ॥ ध्वज पताका दामोदरें मिरवती ॥ वरी पद्मरागांची महादीप्ती ॥ शोभायमान दिसतसे ॥८७॥
वैडुर्याचे स्तंभ केले ॥ वरी चौसष्टिकें वेष्टिले ॥ त्यावरी प्रभा करूं लागले ॥ इंद्रनीळप्रकाश ॥८८॥
जांबूनदें भिंती सारविल्या ॥ विश्वकर्म्यानें निर्मिल्या ॥ बुद्धिप्रकाशें आपुल्य । स्वहस्तेंकरूनी ॥८९॥
किती वर्णावी द्वारावती ॥ जेथें श्री अनंत अधिपती ॥ तो तुळसीदळीं लक्ष्मीपती ॥ पूजिला शिवशर्म्यानें ॥९०॥
मग तो तेथूनि निघाला ॥ हरिद्वारासी पातला ॥ मायापुरी देखता झाला ॥ शिवशर्मा ते काळीं ॥९१॥
ते मायापुरी कैसी देखिली ॥ तेथें मंदाकिनी उतरली ॥ कीं ते सायुज्यता अवतरली ॥ जनांसी उद्धरावया ॥९२॥
तेथें महालिंग भद्रेश्वर ॥ केवळ मुक्तीचेंचि द्वार ॥ ऐसें जें मायापुर ॥ प्रवेशला शिवशर्मा ॥९३॥
मंदाकिनीसी करोनि स्नान । संध्याकर्म संपादिलें तर्पण ॥ तंव त्या शिवशर्म्याकारण ॥ उद्भवला शीतज्वर ॥९४॥
मग प्रवर्तली विपरीत बुद्धी ॥ विसरला सर्व साधनसिद्धी ॥ अष्टदळकमळाचे संधीं ॥ पडिलासे आत्मा ॥९५॥
म्हणे आतां काय करितील स्त्री-बाळकें ॥ तयांसी द्रव्य नाहीं ठाउकें ॥ आम्हांसी तरी वैकुंठनायकें ॥ उद्भविला शीतज्वर ॥९६॥
दिव्यांबरें कवण नेती ॥ अश्वखिल्लारें कवण गृहीं जाती ॥ महामंदिरीं राहों न देती ॥ स्त्री-बाळकांतें ॥९७॥
स्त्रियेचा कैसा असेल मनोभावो ॥ ते काय कल्पील आणिक ठावो ॥ ऐशा विचाराचा उद्भवो ॥ धरिला ज्वरें ॥९८॥
तेथें आयुष्याचा अंत पुरला ॥ विनाशकाळ तो प्रवर्तला ॥ तों अकस्मात पंचत्व पावला ॥ शिवशर्मा द्विज ॥९९॥
अगस्ति वदे लोपामुद्रेसी ॥ ऐसें झालें मायापुरीसी ॥ शिवशर्मा विदेही दशेसी ॥ पावता झाला ॥१००॥
विदेही झाला शिवशर्मा ॥ स्वरूपीं मिळाला परमात्मा ॥ तव वैकुंठींहूनि विश्वात्मा ॥ पाठवीत विमान ॥१०१॥
तरी तेम कैसें विमान ॥ सोमसूर्यवत तेजें पूर्ण ॥ वरी पद्मरागांचे किरण ॥ झळकती दशदिशा ॥१०२॥
मध्यें दिव्यांगनांचें नृत्य मंजुळ ॥ त्या अंगनारूपें परम मंगळ ॥ कीं त्या पुण्यतरूच्या लता केवळ ॥ हेलावती वातस्पर्शें ॥१०३॥
त्या विमानीं विष्णुगण उत्तम ॥ कीं ते होती जैसे पुरुषोत्तम ॥ किंवा सत्यलोकाधीश उत्तम ॥ ब्रह्मदेव जैसा ॥१०४॥
सुशील पुण्यशील नामें ज्यांसी ॥ ते विमान उतरिती मायापुरीसी ॥ वैकुंठीं न्यावया शिवशर्म्यासी ॥ आले भूमंडळा ॥१०५॥
जैसी उदयीं दिनकरप्रभा ॥ तैसी पुष्पकाची दिव्य शोभा ॥ कीं ते कोटि रविशशी नभा ॥ एककाळीं उदेले ॥१०६॥
सुशील पुण्यशील गणीं ॥ शिवशर्मा घातला विमानीं ॥ ऐसी अगस्तीची वाणी ॥ वदली लोपामुद्रेसी ॥१०७॥
सांगतसे कृष्णद्वैपायन ॥ परिसता होय वैशंपायन ॥ आतां शिवशर्म्यासी विमान ॥ प्राप्त झालें ऐशापरी ॥१०८॥
शिवशर्मा घातला विमानी ॥ नेते झाले बिष्णुभुवनीं ॥ सुशील पुण्यशील गण बैसोनी ॥ आकाशीं चालिले ॥१०९॥
स्कंदपुराणींचे श्लोकीं ॥ प्रतिभाव पाहिजे विवेकीं ॥ द्वैत सर्वथा न बोलों कीं ॥ संस्कृतावांचोनि ॥११०॥
म्हणोनि विज्ञप्ति श्रोतयां सिद्धां ॥ मज न ठेविजे कांहीं बाधा ॥ हे त्रिनयनमुखींची सुधा ॥ अमृतकथा असे कीं ॥१११॥
श्रोतयां विनवी शिवदाम गोमा ॥ मज पूर्ण असो द्यावी क्षमा ॥ पुष्णकीं घातला शिवशर्मा ॥ ते कथा परिसावी पुढें ॥११२॥
इति श्रीकाशीखंडे शिवशर्मपुष्पकारोहणं नाम षष्ठाध्यायः     ॥६॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥   ॥ ओंव्या ॥ ११२ ॥   ॥ अध्याय ॥६॥  

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP