मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय १७ वा

काशी खंड - अध्याय १७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऐसा यागमंडपीं उत्साह ॥ चंद्रासी प्रसन्न झाला महादेव ॥ नृत्यांगणीं शोभायमान ठाव ॥ कैसा केला ॥१॥
रंभा मेनिका सुकेशिया ॥ घृताची मंजुघोषा उर्वशिया ॥ सातवी ते डोळसिया ॥ तिलोत्तमा लावण्यखाणी ॥२॥
पुष्पांजली घातली रंभेनें ॥ मंजुघोषा करी मंजुळ गायनें ॥ घृताची तालबंधनें ॥ थैथैकार गर्जत ॥३॥
उर्वशियें रंगी ठाण केलें ॥ लास्य तांडव दाखविलें ॥ तेथें घृताचीनें केलें ॥ तालाचेंचि तें प्रेरण ॥४॥
लास्यवेगाची महिमता ॥ अंतरिक्ष दावी भ्रमतां ॥ अंगभंग चौसष्टी हाता ॥ दाविताती प्रकार ॥५॥
श्रृंगार बहुत अलोलिक ॥ शांत रौद्र हास्य भयानक ॥ अद्‍भुत वीर बीभत्सक ॥ दाविती तेव्हां नवरसांतें ॥६॥
मधुमाधवीं ऋतु जैसा ॥ रंगीं स्थिरावला तो कैसा ॥ कीं साखरेची करूनि यंत्रमुसा ॥ ओतिलें नादामृतातें ॥७॥
ऐसा रंगीं रंग मुराला ॥ सभेसी योग्य त्या शोभला ॥ तो आनंद देखोनि संतोषला ॥ उमाकांत तो ॥८॥
मग विश्वनाथ वदे चंद्रासी ॥ मी तोषलों तव भक्तीसी ॥ अरे हे परमनिधान काशी ॥ तुवां शृंगारिली कोणे अर्थें ॥९॥
आधींच जांबूनद चौसष्टिकें ॥ वरी जडलीं सुजाति माणिकें ॥ ते श्रृंगारिली तुवां मृगांकें ॥ अविमुक्ती हे ॥१०॥
हिरण्यासी वैडूर्य जडिजेती ॥ परी ते हिर्‍यांसीं भिन्न असती ॥ तैसी भिन्न असे हे अविमुक्ती ॥ वसुमतीसी ॥११॥
तुवां मेळविले ऋषिगण ॥ महारम्य केलें आनंदवन ॥ शतपद्में केलें अनुष्ठान ॥ महातपस्वी तूं होसी ॥१२॥
सिंधुमथनींचे हालाहल ॥ तें कंठीं धरितां होता जाळ ॥ तो अग्नि केला शांत शीतळ ॥ तुझिया भक्तिअमृतें ॥१३॥
आतां तुज वर दिधला ऐसा ॥ तुज कळा प्राप्त होतील षोडशा ॥ तुजपासाव संवत्सर-मासां ॥ संख्या थोर कल्पिती ॥१४॥
तरी परियेसीं गा निशापती ॥ तुझिया कळा त्या चिन्मययुक्ती ॥ तयां नाम धारण करी पशुपती ॥ ते कवण कैसी जाणावी ॥१५॥
शंखिनी आणि पद्मिनी ॥ लक्ष्मी आणि कामिनी ॥ पयोष्णी आणि ऐश्वर्यवर्धिनी ॥ हे सहावी बोलिजे ॥१६॥
आश्वर्यदा आणि आल्हादा ॥ व्यापिनी आणि मोदा ॥ मोहिनी आणि प्रभाप्रदा ॥ हे द्वादशाची जाण पां ॥१७॥
क्षीरवर्धिनी आणि वेगवर्धिनी ॥ विकाशनी आणि सोमिनी ॥ ऐशा षोडशजणी ॥ काळ जाण तुझिया हो ॥१८॥
ऐशा तुझ्या षोडशकळा ॥ सत्रावी बोलिजे अमृतकाळा ॥ जैसा तो तरु स्वस्थ मूळा ॥ जळाचेनि तैसा तूं इचेनी ॥१९॥
मग चंद्रासी वदे शंकर ॥ आज मी ये स्थळीं असें स्थिर ॥ तुज द्यावया पूर्ण वर ॥ निश्चित प्रकटलों ॥२०॥
तरी तूं भक्तमाजीं भक्तवरा ॥ वर मागें रे शीतकरा ॥ जो तुज प्रिय कुमारा ॥ आवडे मनीं ॥२१॥
तंव बोलिला शीतकर ॥ बहुतां पुण्यें देखिलासी साचार ॥ तरी हाचि होय प्रिय वर ॥ असावें तुजजवळी ॥२२॥
मग शंकर वदे शीतकरासी ॥ पूर्ण वर नाठवे रे तुजसी ॥ तुझ्या सामर्थ्याच्या राशी ॥ आठवल्या नाहीं तुजलागीं ॥२३॥
तुज वर देईन ये काळीं ॥ ऐसा न देखों त्रैलोक्यमंडळीं ॥ तुज रक्षीन रे आपणाजवळीं ॥ तें स्थान सांगों तुज आतां ॥२४॥
शीतकर म्हणे जी त्रिनयना ॥ हे त्रिलोकीं माझी यागदक्षिणा ॥ शिवा मी दाता झालों ब्राह्मणां ॥ पूर्ण इच्छेचा ॥२५॥
म्यां करावी पूर्ण तव भक्ती ॥ तेणें तूं प्रसन्न ॥ मजप्रती ॥ ह्या माझा संकल्पें हो तृप्ती ॥ त्रिलोकीं द्विजवरांतें ॥२६॥
दक्षिणा दिधली त्रिभुवन ॥ तेणें संतोषला पंचानन ॥ मग वर देता झाला पूर्ण ॥ पंचवक्त्र शिव तो ॥२७॥
चंद्रासी म्हणे शूलपाणी ॥ झालासीं वीर्यामृतापासूनी ॥ आणि अमृतमय म्हणोनी ॥ तेजोराशी होशील तूं ॥२८॥
शतपद्में संख्या करूनि अनुष्ठान ॥ तुवां साधिले पुरुषार्थ पुर्ण ॥ आतां तुज तो वर देईन ॥ जो त्रिलोकीं श्रेष्ठ पैं ॥२९॥
तुझ्या पुण्यासी नसे उपमा ॥ कवण वर्णूं शके तुझा महिमा ॥ चक्षूंचें वीर्य द्रव म्हणोनि चंद्रमा ॥ नाम ठेविलें तुजलागीं ॥३०॥
तूं अति प्रिय भक्त मज ॥ यागीं तृप्त केले देव द्विज ॥ म्हणोनि नाम तुज द्विजराज ॥ योजिलें आम्हीं ॥३१॥
आणिक तुज नाम इंदु शशी ॥ आतां पूर्ण वर प्राप्त करूं तुजसी ॥ जो अगोचर या त्रेलोक्यासी ॥ तो जोडला तुज आतां ॥३२॥
मग उचलिला दशकरीं ॥ ह्रदयीं आलिंगिला प्रीतिथोरीं ॥ तो राखिला तृतीयनेत्रावरी ॥ मौळीं जाण आपुलिया ॥३३॥
त्रिनेत्रींचा अग्नि मस्तकातें ॥ उष्ण करीतसे तेजें बहुतें ॥ तें तेज शांत करायातें ॥ चंद्र धरिला मस्तकीं ॥३४॥
ऐसा अगोचर वर ॥ असंख्य ब्रह्मांडांहूनि थोर ॥ मग तो गुणनामा जाहाला शंकर ॥ चंद्रमौळी ऐसा ॥३५॥
काशीमध्यें तुवां जें लिंग स्थापिलें ॥ त्यासी चंद्रेश्श्वर नाम ठेविलें ॥ आणि चंद्रकूप तुवां निर्मिलें ॥ तें महातीर्थ जाण पां ॥३६॥
चंद्रवारीं अमावास्येकारणें ॥ जे चंद्रकूपीं करिती स्नानदानें ॥ चंद्रेश्वरीं करिती पूजनें ॥ ते वसती चंद्रलोकीं ॥३७॥
पडे सोमवारीं शिवरात्री ॥ त्या दिनीं जागरण करितां अहोरात्री ॥ त्यासी विघ्न नसे संसारीं ॥ अंतीं पावे चंद्रलोकीं तो ॥३८॥
तेथें चतुर्दशीचें उपोषण कीजे ॥ चंद्रेश्वरलिंग पूजिजे ॥ तेणें सामर्थ्यें पावन होइजे ॥ चंद्रलोकीं सर्वदा ॥३९॥
ऐसा प्रसन्न झाला चंद्रमौळी ॥ चंद्रासी वर दिधला काशीस्थळीं ॥ मग द्विलक्षयोजनें नभमंडळीं ॥ शिवें स्थापिला चंद्रमा ॥४०॥
ऐसी चंद्राची समूळ कथा ॥ अतिप्रीति पावो विश्वनाथा ॥ हे परिसतां किल्बिषव्यथा ॥ हरे श्रोतयांची ॥४१॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसें सामर्थ्य जोडलें चंद्रासी ॥ मग स्वस्थाना पहुडले देव ऋषी ॥ काशीयात्रा करूनियां ॥४२॥
पुढें विमान जातसे शीघ्रगती ॥ क्रमितां लोक देखिला पुढती ॥ आवघा तेजोमय महादीप्ती ॥ तो परिसावा श्रोतेहो ॥४३॥
हेममय जैसी प्रभा ॥ कीं लक्ष लक्षितां गंधर्वगर्भा ॥ तैसी देखिली दिव्य शोभा ॥ शिवशर्म्यानें निजद्दष्टीं ॥४४॥
देखिला दिव्यमय लोक ॥ सप्तर्द्वापाचे नायक ॥ महापराक्रमी अधिक ॥ देखिले तेव्हां ते ॥४५॥
शिवशर्मा पुसे विष्णुदूतां ॥ कैसी या लोकींची महिमता ॥ ते सांगावी जी कृपावंता ॥ गणोत्तमा मजलागीं ॥४६॥
कवण या लोकींचा अधिपती ॥ आणि कैसी यासी उत्पत्ती ॥ हा विस्तारला सप्तद्वीपवती ॥ तें निरूपावें सवामिया ॥४७॥
गण म्हणती द्विजनाथा ॥ पूर्वीं तुज निरूपिली चंद्राची कथा ॥ हा तयाचा विस्तार सर्वथा ॥ परियेसीं तूं आतां एकचित्तें ॥४८॥
अत्रीचा सुत जो अमृतकर ॥ तेणें पूर्वीं प्रसन्न केला हर ॥ हा बुधराज त्याचा कुमर ॥ तो बुधलोक ऐसा बोलिजे ॥४९॥
शिवशर्मा युसे गणांसी ॥ बुध अधिपती या लोकासी ॥ त्याची मूळ कथा कैसी ॥ आम्हां करावी जी निरूपण ॥५०॥
तंव गण म्हणती गा द्विजमूर्ती ॥ परिसें बुधाची पूर्वस्थिती ॥ चंद्रें प्रसन्न केला पशुपती ॥ काशीस्थळीं अनायासें ॥५१॥
केला तपाचा गिरिवर ॥ प्रसन्न झाला त्रिशूळधर ॥ यास्तव चंद्रासी जोडला गुरुवर ॥ वाचस्पती म्हणती जो ॥५२॥
सर्व विद्याभ्यास केला त्यापासीं ॥ मग शीतकर वदे गुरूसी ॥ कांहीं मागावें जी मजसीं ॥ गुरुदक्षिणा ये वेळीं ॥५३॥
तंव गुरु म्हणे गा अत्रिसुता ॥ गृहीं असे आमुची पतिव्रता ॥ ते मागेल जें उचिता ॥ तें तुवां अनायासें ॥५४॥
मग तो गुरूचें मंदिरीं ॥ शीतकर प्रवेशला झडकरी ॥ तेथें होती त्याची सुंदरी ॥ तारानामें गुरुकांता ॥५५॥
तियेसी करूनि नमस्कार ॥ बद्धकरें ठाकला शीतकर ॥ मग वदता झाला नम्र उत्तर ॥ गुरुकांतेसी ॥५६॥
म्हणे तुमचें दास्यत्व करितां करितां ॥ सर्व विद्या प्राप्त झाल्या आतां ॥ तरी मागावी कांहीं समर्था ॥ गुरुदक्षिणा मज आतां ॥५७॥
मग बोलिली गुरुकामिनी ॥ तुज विद्या अभ्यासिल्या त्या कवणीं ॥ तें मयंका माझिये श्रवणीं ॥ श्रुत करीं सर्वही ॥५८॥
तंव चंद्र म्हणे गुरुकांतेसी ॥ म्यां विद्या अभ्यासिली ऐसी ॥ तरी ते गुरुगृहिणी परियेसीं ॥ कृष्णपक्ष शुक्लपक्ष ॥५९॥
मग तो चंद्रमा कळा ग्रासीत ॥ शंखिनीपासाव सोमिनीपर्यंत ॥ अमृतकळेमाजी सामावत ॥ हरपोनि गेला ते वेळीं ॥६०॥
मग त्या चंद्रमंडळामाजीं शशी ॥ न दिसे त्या गुरुकांतेसी ॥ तंव शुक्लपक्षीं शंखिनीसी ॥ दाविली ते प्रथमकळा ॥६१॥
मग तो शशी सोमिनीपर्यंत ॥ मागुता झाला पूर्ण भरित ॥ ऐसें देखोनि गुरुकांता भ्रमित ॥ झाली देहीं कामतुर ॥६२॥
शशी देखिला पूर्ण कळेचा ॥ ज्यासी पूर्ण वर असे शंकराचा ॥ कीं तो वीर्यामृताचा ॥ वोतिलासे तेजमूर्ती ॥६३॥
जें अत्रिऋषींचें वीर्य ॥ दश दिशांचें पूर्ण धैर्य ॥ ज्यासी हर प्रसन्न त्याचें सौंदर्य ॥ वाखाणिजे काय किती ॥६४॥
कीं तो साक्षात स्मर ॥ तपें लावण्यसुंदर ॥ म्हणोनि गुरुकांतेसी ज्वर ॥ उद्भवला कामाचा ॥६५॥
मग वदती झाली ते युवती ॥ म्हणे हेंचि मागणें असे तुजप्रती ॥ मज द्यावी तुवां रती ॥ तरीच होईन तृप्त मी ॥६६॥
हेचि मज गुरुदक्षिणा संतोष ॥ जो तुवां मज करावा अंगस्पर्श ॥ मग बोलता झाला शिष्य ॥ बृहस्पतीचा तो ॥६७॥
तूं तरी मज मातेसमान ॥ आणि हें कैसें लाविसी लांछन ॥ तुज द्दश्य केलें विद्याभूषण ॥ तें जोडलें दूषण आम्हांसी ॥६८॥
हें न भासे माझिया विचारा ॥ येणें जाइजे यमपुरा ॥ तंव ती कामज्वरें सुंदरा ॥ व्यापिलि अधिक ॥६९॥
मग ते म्हणे कामकळी ॥ तूं अससी रे शंकराजवळी ॥ तृतीय नेत्रावरी भाळी ॥ अखंड वास दिसे तुझा ॥७०॥
असे जो स्मरे विश्वनाथा ॥ तो केवीं लंघील यमपंथा ॥ शंकराजवळी कर्मकथा ॥ काय पां करितां हो ॥७१॥
तंव चंद्र म्हणतसे परमार्था ॥ परी हें न घडेनि सर्वथा ॥ तुज व्यापली कामव्यथा ॥ हें थोर लांछन ॥७२॥
मग तारा म्हणे शीतकरासी ॥ तूं तंव ऐसी विचारणा करिसी ॥ आतां जरी तूं माझा अंगिकार न करिसी ॥ तरी घे माझें शापवचन ॥७३॥
मग तो विचारी रजनीकर ॥ ही तंव महापतिव्रता निर्धार ॥ इच्या शापाचें त्रिशूलधर ॥ भय मानीतसे सर्वदा ॥७४॥
पहा अंबऋषीची पतिव्रता ॥ दुर्वासें ताडिली काष्ठें जळतां ॥ तो शरण गेला भवानीकांता ॥ तो न राखवे त्याचेनी ॥७५॥
तरी पतिव्रतेचे शापालागुनी ॥ वारूं न शके ईश्वरकरणी ॥ जरी चेते प्रळयींचा वन्ही ॥ तरी कवण शांत करूं पाहे ॥७६॥
ऐसें विचारी शीतकर ॥ मग तियेसी दिधला नाभीकार ॥ मग धरोनि तियेचा कर ॥ आलिंगिली तारा ते काळीं ॥७७॥
मग चंद्रही जाहला कामतप्त ॥ भवनांतरीं नेली त्वरित ॥ मग भोगितसे नित्य ॥ इच्छेंकरूनि आपुल्या ॥७८॥
ऐसी ते गुरुची अंगना ॥ रत जाहली अत्रिनंदना ॥ तिनें प्रहारूनि ब्राह्मणा ॥ धरिले व्यभिचारकर्मासी ॥७९॥
मग तप अनुष्ठान साधुनी ॥ गुरु आला आपुले भवनीं ॥ तंव ते न दिसे कुटुंबिनी ॥ मंदिरामाजी ॥८०॥
तंव गृहीं होते जे दूत ॥ त्यांहीं गुरूसी जाणविली मात ॥ तारा जाहाली जी कामरत ॥ शीतकरासी ॥८१॥
परिसा जी अंगिरासुता ॥ सिंधूसी मिळे जेवी सरिता ॥ तो ओघ न येचि मागुता ॥ उगमालागीं मिळावया ॥८२॥
तैसी ते कामिनी तारा ॥ पूर्ण रत जाहली अत्रिकुमारा ॥ ती आतां न ये जी मंदिरा ॥ तुमचिया गुरुस्वामी ॥८३॥
मग कोपला बृहस्पती ॥ आला त्वरित अमरावती ॥ तेणें सिंहासनीं सुरपती ॥ देखिला तेव्हां संभ्रमेंसीं ॥८४॥
गुरूसी देखोनियां भगलांछनी ॥ नमस्कारिता जाहला बद्धपाणी ॥ मग बहुतां आदरें सन्मानोनी ॥ पूजिता जाहला वज्रधर ॥८५॥
म्हणे किमर्थ येणें जाहलें ताता ॥ गुरु बोले चंद्रें नेली आमुची कांता ॥ तुम्हांसारिखे शिष्य असतां ॥ आम्हां गांजिलें शीतकरें ॥८६॥
मग सर्व देवेंसीं सहस्त्रनयन ॥ युद्धा निघाला शूर गण घेऊन ॥ ऐरावतासी पालाणून ॥ निघाला तो चंद्रावरी ॥८७॥
प्रथम पावले चंद्रलोकासी ॥ युद्धीं पाचारिलें शशीसी ॥ म्हणती भला रे अभिलाषी ॥ गुरुकांतेचा अधमा ॥८८॥
चंद्रासी वदे वज्रधर ॥ तूं कां जाहालासी  स्त्रीचोर ॥ आतां नमस्कारावया गुरूसमोर ॥ येसी कवण्या मुखें सांग पां ॥८९॥
आतां तूं जाहालासी रे लांछनी ॥ व्यभिचारी म्हणविसी त्रिभुवनीं ॥ आतां देईं गा गुरूची पत्नी ॥ कासया करिसी संग्राम ॥९०॥
मग शशी म्हणे महानिर्लज्जा ॥ तुवां अभिलाषिली ब्रह्मात्मजा ॥ आतां आम्हांवरी आणिल्या फौजा ॥ कवण मुखें देवांचिया ॥९१॥
तूं जाहालासी रे भगलांछनी ॥ गौतमें भ्रष्ट केला शापूनी ॥ आतां न लाजसी या भुवनीं ॥ नरेंद्रपणें कैसा तूं ॥९२॥
मग क्रोध चढला त्या वज्रधरा ॥ म्हणे भला रे वर्मिका गुरुस्त्रीचोरा ॥ आतां तुज मारितां आडवारा ॥ कवण राहूं शकेल ॥९३॥
तंव बोलिला प्रतीचीपती ॥ चंद्र असे जरी अगाधशक्ती । तयाहूनि काय तो सुरपती ॥ न्यून म्हणावा कैसेनि ॥९४॥
चंद्र असोनियां बलवंत ॥ गुरुअवज्ञा ऐसी करीत ॥ तरी परिसा माझा संकेत ॥ प्रमथादि सर्वं तुम्ही ॥९५॥
हा प्रिय असे विश्वनाथा ॥ तुम्हांसी न मानी सर्वथा ॥ तुम्हीं जाणोनि स्वपुरुषार्था ॥ झुंजावें यासीं अवश्य ॥९६॥
तंव चंद्रासी म्हणे सूर्यसुत ॥ जो महाउग्र कृतांत ॥ आतां गुरुकांता देतां त्वरित ॥ प्रहारूं चंद्रा ये वेळीं ॥९७॥
तूं आमचा सखा दिक्पती ॥ आतां देईं गुरुकांता निश्चितीं ॥ ऐसें नाहीं बोलिलें वेदांतीं ॥ पापाचरण सर्वथा ॥९८॥
तंव चंद्र म्हणतसे देवगणां ॥ तुम्हीं जावें आपुल्या भवना ॥ दोषावीण पतना ॥ भोगूं पाहातां वृथाचि ॥९९॥
युद्धावीण न देईं गा गुरुशक्ती ॥ भोजनावीण केवीं तृप्ती ॥ भक्तीवीण सर्व धृती ॥ नव्हे गा सर्वथा ॥१००॥
तंव कोपला सहस्त्रनयन ॥ चापीं योजिला दिब्य बाण ॥ सोडिला सक्रोध होऊन ॥ शीतकरावरी ॥॥१०१॥
शर येत जैसा अग्निज्वाळा ॥ कीं तो काळमुखींचा जिव्हाळा ॥ देखोनि अत्रिबाळ ते वेळां ॥ काय करिता जाहाला ॥१०२॥
तेणें धनुष्या लावूनि गुण ॥ मग चापीं योजिला बाण ॥ इंद्राचें संधान तोडून ॥ पाडिलें क्षिती तेधवां ॥१०३॥
दोघांची जाहाली समद्दष्टी ॥ द्दढ धरोनि धनुष्य मुष्टी ॥ मग वदते जाहाले गोष्टी ॥ एकमेकांसीं आल्हादें ॥१०४॥
इंद्र म्हणे गा निशापती ॥ तुवां राखिली गुरुची शक्ती ॥ तेणें लांछन तुजप्रती ॥ महादुर्धर लागलें ॥१०५॥
तुज मारीन मी रणांगणीं ॥ उभाचि फोडीन एके बाणीं ॥ तरीच मज जाणावें वज्रपाणीं ॥ देवाधीश सर्वत्रीं ॥१०६॥
तुज नाहीं युद्धशक्ती ॥ तरी कां खवळविला बृहस्पती ॥ आतां लावीन थोर ख्याति ॥ गर्विष्ठा तुजलागीं ॥१०७॥
तूं परम अपराधी गुरूचा ॥ अभिलाष केला गुरुकांतेचा ॥ सखा झालासी महादेवाचा ॥ तरी कां केलासी अनाचार ॥१०८॥
मग वदता जाहला चंद्र ॥ तूं आपणां म्हणविसी देवेंद्र ॥ दुष्ट करितां जाहालासी भगेंद्र ॥ विचार न पाहासी निर्लज्जा ॥१०९॥
तंव कोपला वज्रधर ॥ चंद्रासी म्हणे तूं कालचें लेंकरूं साचार ॥ तूं नेणसी क्षत्रियाचार ॥ समरंगणीं भिडतां ॥११०॥
ऐकें अत्रिसुता शक्तिमंता ॥ तुज निःशस्त्र करीन झुंजतां ॥ आतां उतरें रे रथाखालता ॥ जाईं आणीं गुरुपत्नी ॥१११॥
तंव चंद्र म्हणे रे सुरपती ॥ तुज लोळवीन आतां या रणक्षितीं ॥ तुज अप्राप्त करीने अमरावती ॥ देवेंद्रा हें सत्य जाण ॥११२॥
क्रोधें उठावला शीतकर ॥ सज्ज करूनियां रहंवर ॥ तंव इंद्रही सज्ज करूनि देवभार ॥ सिद्ध जाहाला युद्धासी ॥११३॥
धनुष्याचा करूनि टणत्कार ॥ क्रोधें चालिला वज्रधर ॥ तेणें विंधिला शीतकर ॥ असंख्य बाणीं तेधवां ॥११४॥
तेथें आदळती महाशक्ती ॥ परी तो न निवारीच निशापती ॥ इंद्रासी दावीतसे प्रतीती ॥ महापराक्रमाची ॥११५॥
मागुतें योजिलें संधान ॥ घातले दोन सहस्त्र बाण ॥ ते शीतकरें केले खंडन ॥ वरिच्यावरी ॥११६॥
मग ऊठिला तो निशापती ॥ सप्त शर योजिले शितीं ॥ रथ विंधोनि पाडिला क्षितीं ॥ सहस्त्रनयनाचा ॥११७॥
मागुती सवेंचि बाणीं आठीं ॥ शीतकरें विंधिला महा नेटीं ॥ विरथ करोनियां सृष्टीं ॥ आणिला तो वज्रधर ॥११८॥
तंव जाहाला हाहाकार ॥ मग उठावला सुरभार ॥ तेथें पातला सुरवर ॥ प्रळयमेघासारिखा ॥११९॥
मग युद्ध मांडिलें अति तुंबळ ॥ कीं आदळले मेरुमंदराचळ ॥ त्या रणभूमीं लोटला खळाळ ॥ शोणिताचा ॥१२०॥
मग काय केलें शीतकरें ॥ अस्त्रें आव्हानिलीं समग्रें ॥ तेणें प्रकटले जी कंपवारे ॥ देवगणांवरी ॥१२१॥
खटखटां वाजती दंशन ॥ बधिरत्वें दाटलें श्रवण ॥ एक पडले एक पळाले सुरगण ॥ अमरावतीसी सत्वर ॥१२२॥
मग सर्व सैन्येंसीं वज्रधर ॥ यम वरूण कुबेर ॥ ते पराभवूनि शीतकर ॥ विजयी जाहाला संग्र मीं ॥१२३॥
मग अमरावतीसी गेला सहस्त्रनयन ॥ पाचारिला अंगिरानंदन ॥ त्यासी पुसे शचीरमण ॥ विचार चंद्राचा कैसा हो ॥१२४॥
गुरूसी म्हणे अमरनाथ ॥ चंद्रासी एवढा कायसा पुरुषार्थ ॥ मग सांगता जाहला परमार्थ ॥ देवगुरु तो ॥१२५॥
अत्रिऋषीचा कुमर ॥ तया बळें जिंकूं शके कवण वीर ॥ आतां परिसा माझा विचार ॥ वज्रधरा तुम्ही एक ॥१२६॥
त्यासी प्रसन्न असे चंद्रमौळी ॥ तो झुंजतां नावरे कदाकाळीं ॥ आतां सांपडेल हो अवकाळीं ॥ कृष्णचतुर्दशीसी सत्वर ॥१२७॥
तैं अशक्त असे शीतकर ॥ दुजा नाहीं गा विचार ॥ त्रयोदशदिन वज्रधर ॥ निवांत राहिला आपुले ठायीं ॥१२८॥
मग चतुर्दशीचे दिनीं ॥ गुरु आणि वज्रपाणी ॥ आले चंद्राचिये भवनीं ॥ तंव तो दोखिला अतिकृश ॥१२९॥
चंद्रें देखिलें वज्रधरा ॥ तंव पळ सुटला शीतकरा ॥ स्थळ सांडोनि स्थळांतरा ॥ आडमार्गें गेला तो ॥१३०॥
तंव ते गुरु आणि वज्रधर ॥ दोघांचे दोन रहंवर ॥ पाठीं लागले वेगवत्तर ॥ तंव येरू कैलासा पावला ॥१३१॥
तेही पातले ते स्थळीं ॥ तों चंद्र देखिला शिवाचे भाळीं ॥ गुरु इंद्र देखतां तत्काळीं ॥ राहिले स्थिर नावेक ॥१३२॥
तंव धांविन्नला गजवदन ॥ मुद्नरें ताडिला सहस्त्रनयन ॥ जैसा पर्वतीं पडला पाषाण ॥ स्वर्गींहूनि अवचितां ॥१३३॥
तेणें चूर्ण जाहला रहंवर ॥ मग पळाले इंद्र गुरु सत्वर ॥ शिवासी केला नमस्कार ॥ लंबोदरें वोळंगोनी ॥१३४॥
मग ते गुरु इंद्र वेगेंसीं ॥ दोघे आले सत्यलोकासी ॥ तेथें नमस्कारिलें विधीसी ॥ कथिला वृत्तांत समूळ तो ॥१३५॥
मग विरिंची गेला कैलासभुवना ॥ तेणें नमिलें पंचानना ॥ मग विरिंचिनाथ विज्ञापना ॥ करिता जाहाला ॥१३६॥
विधि विज्ञापी भवानीकांता ॥ तुझ्या आज्ञें सृष्टिव्यवहार करितां ॥ न्यून होतसें महिमता ॥ देवांमाजी आमुची ॥१३७॥
तरी परिसा आतां शूलपाणी ॥ आमुचे पुत्र तपस्वी दोनी ॥ महामहत्त्वाची मेदिनी ॥ प्रतिसूर्य जैसे कां ॥१३८॥
एक तो अत्रि ऋषीश्वर ॥ दुसरिया नाम अंगिर ॥ त्या दोघांचे दोघे पुत्र ॥ चंद्र आणि ब्रहस्पती ॥१३९॥
अत्रीचा बोलिजे निशापती ॥ अंगिराचा सुत बृहस्पती ॥ त्याची स्त्री तारा गुणवती ॥ नेली जी शीतकरें ॥१४०॥
हे दोघेही आमुचे प्रिय अत्यंत ॥ परस्परें नातू विवदत ॥ तरी तूं समर्थ भवानीकांत ॥ याची करावी विचारणा ॥१४१॥
जयाची कामिनी हिरूनि नेइजे ॥ त्यासीं केवीं विवाद कीजे ॥ दुर्बळा काय नाशिजे ॥ गृहस्थाश्रमीं वर्ततां ॥१४२॥
तुमचा जरी भक्त तो समर्थ ॥ तरी कां अनाथासी कीजे अनर्थ ॥ आतां या दोघांचा परमार्थ ॥ तुम्हीच पाहा जीं शंकरा ॥१४३॥
मग विधीसी म्हणे जाश्वनीळ ॥ समुद्रमथनीं प्राशिलें हालाहल ॥ तें उष्ण करीतसे महाज्वाळ ॥ माझिया मस्तकीं सर्वदा ॥१४४॥
आणि तृणीयनेत्रींचा अंगार ॥ त्याची उष्णता परम क्रूर ॥ म्हणोनि गंगा आणि शीतकर ॥ धरिलें म्यां निजमौळीं ॥१४५॥
तेणें  शांत केलें उष्णत्व पूर्ण ॥ हा तयांचा उपकार थोर जाण ॥ म्हणोनि मी चंद्रासी प्रसन्न ॥ असें जाण सर्वदा ॥१४६॥
आतां तूं येथें आलासी जरी ॥ तरी न्यावी गुरूची सुंदरी ॥ हा शशी परम मज उपकारी ॥ यासी न म्हणावें कांहींच ॥१४७॥
मग चंद्रें नमूनि शिवासी ॥ तारा दिधली ब्रह्मयापासी ॥ तेणें दिधली बृहस्पतीसीं ॥ विरिंचिनाथें स्वहस्तें ॥१४८॥
मग बृहस्पती ती सुंदरी ॥ घेऊनि गेला आपुले मंदिरीं ॥ म्हणे भलें केलें सुंदरी ॥ भोगिलें तुवां शीतकरा ॥१४९॥
बृहस्पती जंव न्याहाळी सुंदरी ॥ तंव ते गरोदर असे मास चारी ॥ मग पुसता जाहाला ते अवसरी ॥ स्वकांतेसी आग्रहें ॥१५०॥
म्हणे प्रिये तूं सत्य सांग वाचा ॥ तव उदरीं गर्भ कवणाचा ॥ येरी म्हणे चंद्राचा ॥ सत्य जाण सर्वथा ॥१५१॥
मग शस्त्र घालोनि उदरीं ॥ गर्भ पाडिला बाहेरी ॥ निर्दोष केली सुंदरी ॥ बृहस्पतीनें तारा ते ॥१५२॥
शिवशर्मा पुसे गणांसी ॥ एवढें महत्त्व या चंद्रासी ॥ तो परमप्रिय शिवासी ॥ आणि कैसें केलें अघटित कर्म ॥१५३॥
गुरूची कांता भोगिली ॥ आणि तीही त्यासीं रत जाली ॥ ऐसी बुद्धी त्यांसी उद्भवली ॥ किंनिमित्त स्वामिया ।१५४॥
गण म्हणती गा ब्राह्मणा ॥ याची देखिली असे विचारणा ॥ विधीनें पुसिलें त्रिनयना ॥ दोषनिवृत्ति कैसी ते ॥१५५॥
मग विधीसी म्हणे शंकर ॥ हा महादोषी स्मर ॥ म्यां जाळोनि केला अंगार ॥ याचि कारणास्तव ॥१५६॥
म्यां हा जाळिला तृतीयनेत्रीं ॥ परी अमर असे महाक्षत्री ॥ युद्ध करीतसें विना शस्त्रीं ॥ महामहासबळांसीं ॥१५७॥
तें लोपामुद्रेसी सांगे अगस्ती ॥ भूत भविष्य जें होतें वेदांतीं ॥ तें निरूपण केलें परम प्रीतीं ॥ ऋषीनें स्वमुखें ते काळीं ॥१५८॥
जो परम सुंदर स्मर ॥ ब्रह्मांडव्यापक सबराभरा ॥ तेणें त्रैलोक्यामाजील नारीनर ॥ कोण वंचिले न असती ॥१५९॥
ऋषींमध्यें विभांडक महामुनी ॥ दुसरा च्यवन ब्रह्मज्ञानी ॥ त्यांनीं भोगिल्या शत कामिनी ॥ ऐसा हा प्रकार जाण पां ॥१६०॥
शतधृतिकुमारी परियेसीं ॥ तपोनिधी पराशर ऋषी ॥ तेणें स्वीकारिलें मत्स्यगंधेसी ॥ मग ते झाली सुगंधा ॥१६१॥
या मकरध्वजाचे आवर्तीं ॥ नारद होऊनि पडला युवती ॥ ते ढीवराघरीं जाहाली जनिती ॥ साठी संवत्सर एकदां ॥१६२॥
जो शेषशायी नारायण ॥ त्यासही छळिता जाहाला मदन ॥ तेणें सुंदर स्त्रीवेष घेऊन ॥ वृंदा सती भोगिली ॥१६३॥
जो ब्रह्मयाचा सुत पुलस्ती ॥ तो या पंचबाणें केला युवती ॥ तीतें भोगिते झाले सविता सुरपती ॥ झाले वाली सुग्रीव ॥१६४॥
मकरध्वजें भंगिल्या पतिव्रता ॥ जे अहल्या ब्रह्मयाची दुहिता ॥ तिचे कटाक्षबाण लागतां ॥ चळ जाहाला इंद्रादिकां ॥१६५॥
ब्रह्मांडाधिपती चंद्रचूडा ॥ गजांबरी आणि त्र्यंबकमेंढा ॥ तांडवनृत्यें भिल्लीपुढां ॥ नाचविलें मज मदनें ॥१६६॥
मग इतरांची संख्या नसे जाण ॥ या मदनें वंचिला नसे कवण ॥ जो सृष्टी उद्भविता चतुरानन ॥ तोही भुलविला कीं ॥१६७॥
या मकरध्वजाचे पवाडे सृष्टीं ॥ उद्भवला रौरव याचे पोटीं ॥ भस्मासुर लाविला पाठीं ॥ शिवाचिया मदनें ॥१६८॥
तैसेंचि हिमाद्रीपाठारीं ॥ भस्मासुर नाचविला वटेश्वरीं ॥ तैं महाविष्णु कली नोवरी ॥ या मदनेंचि ती ॥१६९॥
देखोनि लावण्य स्त्रियेचे कटाक्ष ॥ कवणासी नाहीं हो क्षुद्रलक्ष ॥ ब्रह्मचार्‍यांचें जें परमलक्ष ॥ यानें भ्रष्ट केलें संपूर्ण ॥१७०॥
राज्य प्राप्त जाहाल्यानंतरें ॥ कवणासी नाहीं लक्ष्मीचें वारें ॥ महाराज्यपदाचें आधारें ॥ कवणाचें नाहीं सर्वथा ॥१७१॥
कामें कवणा नाहीं चाळविलें ॥ दंभें कोणासी नाहीं भक्षिलें ॥ ममत्वें चित्त नाहीं झळंबलें ॥ कवणाचें या तिहीं लोकीं ॥१७२॥
ऐसें वदे व्यास पुराणांतरीं ॥ अगस्ति सांगे सुंदरीसी विस्तारीं ॥ पुढती चतुरानन पृच्छा करी ॥ विश्वनाथासी तेधवां ॥१७३॥
ऐसी हे मदनाची कथा ॥ ब्रह्मा प्रश्नीतसे अपर्णाकांता ॥ ते परिसतां हरेल मन्मथव्यथा ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१७४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे बुधलोकवर्णनं नाम सप्तदशाध्यायः ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP