मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७३ वा

काशीखंड - अध्याय ७३ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी षडानना ॥ दुर्गा सुराची शक्ति अद्‍भुत जाणा ॥ जेणें इंद्रादिक घातले आंकणा ॥ तो शक्तीनें संहारिला ॥१॥
तंव स्वामी म्हणे अगस्ति ऋषी ॥ शुभा शुभ हे पूर्वार्जिताची युक्ती ॥ तंव बळें जिंकिले दिक्पती ॥ दुर्गासुरें तेणें ॥२॥
जरी अधिक पूर्वार्जिताची राशी ॥ तरी कपोत बांधी शार्दूलासी ॥ पिपीलिकेचे गृहीं मातंगासी ॥ होतसे बंदिखाना ॥३॥
मृत्युकाळ जेव्हां अंतिक ॥ त्यासी आधींचि अशुभ बोले लोक ॥ महा मृगेशासी वधी शशक ॥ ऐसा हा विनाशकाळ ॥४॥
जयाचा समीप असे अंतकाळ ॥ तैं समर्थासी गांजी दुर्बळ ॥ आतां समय आलिया होय विफळ ॥ अमृतभार तो ॥५॥
तैसा दुर्गासुराचा आला अंतसमय ॥ म्हणोनि प्राप्त होईल जय ॥ माह असुरासी क्षय ॥ करील आतां ॥६॥
दुर्गासुरें वेढिली पंचक्रोशी ॥ तंव भवानी वदली काळरात्रीसी ॥ तुवां जाऊनि दैत्यांपाशीं ॥ कथावा वृत्तांत ॥७॥
ऐसें म्हणावें त्या दुर्गासुरासी ॥ भवानीनें पाचारिलें तुम्हांसी ॥ आतां तूं शक्ति स्मरोनि युद्धासी ॥ होई कां बळवंत ॥८॥
जरी युद्धा न येसी समरांगणीं ॥ तरी राहूं नको या त्रिभुवनीं ॥ जे ब्रह्मांडीं काशी तें सोडोनी ॥ जाईं आणिक ब्रह्मांडा ॥९॥
तंववरी तूं प्राणें अससी स्वस्थ ॥ जंववरी असे तुझा अंत ॥ कीं माझा होसी शरणागत ॥ तरी भय नाहीं तुज ॥१०॥
इतुकें परसोनि काळरात्री ॥ निघाली सवें सखिया पंचवक्री ॥ तंव असुर भारीं देखिला मंत्री ॥ शुक्राचार्य दैत्यगुरू ॥११॥
विकट गौरी आणि कोटराक्षी ॥ उष्ट्रग्रीवा हयग्रीवा त्र्यक्षी ॥ अष्ट हस्तिनी हस्तकुक्षी ॥ आणिक सिंहाननी ॥१२॥
शुक्रें देखिल्या अष्टही जणी ॥ म्हणे या कवणा चिया दीर्घ यक्षिणी ॥ मस्तकीं अष्टही छत्रें नाना वर्णी ॥ रक्ताक्षी सर्वही ॥१३॥
दुर्गासुराचिया मजालसीं ॥ शुक्राचार्य बैसले दैत्येंसीं ॥ तंव काळरात्री सखियेंसीं ॥ आलीसे जवळी ॥१४॥
देखोनि कालरात्रीच्या शौर्यवीर्या ॥ तयासीं वदे शुक्राचार्या ॥ म्हणे तुम्ही कोण कवण्या कार्या ॥ आल्याति येथें ॥१५॥
तंव बोलती जाहाली काळरात्री ॥ म्हणे परिसें गा शुक्राचार्यमंत्री ॥ तुम्ही आलेति अविमुक्तिक्षेत्रीं ॥ मर्यादा नाहीं भाग्यासी ॥१६॥
येथें भवानी देतसे भुक्ती ॥ आणि विरूपाक्ष देतसे सायुज्य मुक्ती ॥ दीर्घ तुमची तप शक्ती ॥ तैं आनंदवना प्राप्ती ॥१७॥
या काशीचा महिमा सांगतां थोरी ॥ शिणल्या वेदवाचा चारी ॥ आम्ही भवानीच्या आज्ञाकारी ॥ आलों एतदर्थ ॥१८॥
तुम्हीं स्रुरेंद्रादि देवां केलें बंधन ॥ असुर भोगिते जाहाले त्रिभुवन ॥ मग त्या राज्यमदें संपूर्ण ॥ उन्मत्त बहुत जाहालां तुम्ही ॥१९॥
या स्वर्ग मृत्यु पाताळां माझारी ॥ महा पुण्या स्थळ काशी पुरी ॥ हे विध्वंसवया दुष्ट असुरीं ॥ मेळावा केला ॥२०॥
परी हे न विध्वंसे अविनाश ॥ स्मरारी येथींचा अधीश ॥ तुम्हांसी करील प्रयास ॥ साक्षात शिव गण ॥२१॥
तुम्हां असुरा कायसा उपदेश ॥ परी भवानीचा परिसा वाग्विलास ॥ तुम्ही बंधनमुक्त करा अधीश ॥ सर्व देवांचा ॥२२॥
तुम्हीं इच्छिला रे प्राणांसी क्षय ॥ तुम्हांसी न सुचे अंत समय ॥ तो मृत्युकाळ तुमच उदय ॥ पावला असे आतां ॥२३॥
त्रैलोक्य सोडोनि पळावें ॥ कीं भवानी प्रति शरण जावें ॥ इतुकें परिसोनि दुर्गासुर गर्वें ॥ बोलता जाहाला ॥२४॥
दुर्गासुर वदे ताल जंघना ॥ या दीर्घ निर्लज्ज स्त्रिया कवणा ॥ जेथें बंधन असे गीर्वाणा ॥ तेथें न्यावें यांसी ॥२५॥
यांची अधीश ते कवण भवानी ॥ तेही वेगें आणावी बांधोनी ॥ जे युद्धा ठाकली स्त्री होऊनी ॥ ऐसा केण पुरुषार्थ ॥२६॥
तंव बोलिली काळरात्री सिद्धी ॥ म्हणे परियेसीं असुरा मंद बुद्धी ॥ जंव मी नाहीं जुंझलें युद्धीं ॥ तंववरी न ये भवानी ॥२७॥
जेव्हां देखाल ते शैलबाळी ॥ तुम्हां स्मरण नाहीं अंतकाळीं ॥ जैसा पतंग कवळितां दीपमेळीं ॥ न स्मरे पंचत्व ॥२८॥
तंव दुर्गासुरें महा असुरां ॥ आज्ञा केली म्हणे धरा रे धरा ॥ तंव ते काळ रात्री महा मारा ॥ प्रवर्तती जाहाली ते काळीं ॥२९॥
उठावले दैत्य महाबळी ॥ यक्षिणी धरावया ते काळीं ॥ तंव ते महादादि आकळी ॥ धांवली त्या दैत्यांवरी ॥३०॥
शस्त्रें सुटलीं महादारुण ॥ तेणें धडमुंडे जाहालीं शतचूर्ण ॥ परी शुक्राचार्यें संजीवनीनें जाण ॥ उठविले दैत्य ॥३१॥
तेथें काळरात्रीं आणि असुर ॥ युद्ध जाहालें घोरांदर ॥ परा भविले दुर्गासुराचे भार ॥ जे जे होते महाबळी ॥३२॥
यानंतरें काळ रात्रीं स्वभारेंसीं ॥ पुनरपि आली भवानीपासीं ॥ वृत्तान्य कथूं म्हणै दैत्यासी ॥ अहंमद राजाचा ॥३३॥
तेथें युद्ध करितांचि ते मंडळी ॥ दैत्य पडिले क्षितितळीं ॥ तेथें भार्गव मंत्री जवळी ॥ तो उठवी तत्काळ ॥३४॥
यानंतरें कोपली ते गंगा ॥ कीं ते मंदाकिनी स्वर्गतरंगा ॥ ओघ अस्त्रें प्रवाहती मार्गा ॥ दोष दैत्यांचीं तैं ॥३५॥
कीं ते महा शैलेद्र वाहिनी ॥ दिर्घर दोष कष्टहारिणी ॥ कीं पंचदोषांची नाशिनी ॥ मणिकर्णिका ते ॥३६॥
भार्गवाचे रथचक्रवाटीं ॥ गंगा प्रवाहे क्षितितटीं ॥ निष्पाप करावया दोष आगटी ॥ स्वर्गपूर्व जांसी ॥३७॥
तैसें दुर्गा सुरा चिये सैन्यावरी ॥ स्वभारेंसीं आली भवानी सुंदरी ॥ तंव शुक्राचार्य प्रतिज्ञा करी ॥ दुर्ग सुरासीं पैं ॥३८॥
आले जी यक्षिणीचे महाभार ॥ संख्या लक्षकोटी अपार ॥ मेघडंबरछत्रीं ॥ दिवाकर ॥ न दिसे क्षितिमार्ग ॥३९॥
तंव दुर्गासुर म्हणे दित्य गुरू ॥ कैस या भूतावळीचा भारू ॥ शुष्क तृणें केवी गिरिवरू ॥ भेदे कैसा स्वामिया ॥४०॥
जेथें पडे गजेंद्राचा संघात ॥ तेथें कायसी पद्मिनीची मात ॥ पर्वत चूर्ण होती निमिषांत ॥ मेरुतुल्य पैं ॥४१॥
विशेष तुमचा आधार आम्हां ॥ संजीवनीनें सचेतन करितां जीवात्मा ॥ मग रणमंडळीं त्या वीरोत्तमां ॥ कायसे प्रयास ॥४२॥
मग दुर्गासुरें महादैत्यांसी ॥ आज्ञा केली म्हणे मारा यक्षिणींसी ॥ तव दैत्य उसळले आकाशीं ॥ प्रळय़ीं मेघ जैसे ॥४३॥
तेथें यक्षिणींचा सुटला मारुत ॥ जैसा अभ्रपुटें विध्वंसीत ॥ असुर भूमीवरी पडिले मूर्च्छित ॥ त्यांसी भक्षिती यक्षिणी ॥४४॥
तंव तो संजीवनी मंत्राधिक ॥ दैत्य गुरू असुर नायक ॥ दैत्य उठवावया ऐसा आणिक ॥ नाहीं त्या रण स्थळीं ॥४५॥
ऐसें देखोनि प्रेतवाहनी ॥ कोपली कोटराक्षी दीर्घनयनी ॥ जे जन्मली तृतीय लोचनीं ॥ विश्वनाथाच्या पैं ॥४६॥
ते अदभुत कोपाची महाशक्ती ॥ तिनें स्मरलिया आश्चर्ययुक्ती ॥ स्वर्ग मृत्यु पाताळांपरौती ॥ जाहाली महाविशाळ ॥४७॥
ते रुद्र कोपाची महादिव्य । वज्र दंडी दिर्घदशनी स्वयमेव ॥ काळजिव्हा लोळे अपस्वय ॥ चावीतसे दशन ॥ अधरें ॥४८॥
ते उठावली दैत्यांवरी ॥ तिनें शुक्र धरिला वामकरीं ॥ मग काय करिती जाहाली सुंदरी ॥ प्रेतवाहनी ते ॥४९॥
म्हणे सकळां बंधन ॥ देवगुरुचा हरिलासे मान ॥ तें उसनें घ्यावयाकारण ॥ शुक्रा तुजला धरिलेंसे ॥५०॥
मग काय करी ते दिव्य क्रूरी ॥ शुक्राचार्य घातला उत्पत्तिद्वारीं ॥ मग बैसली मौनकारी ॥ प्रेतयानी ते ॥५१॥
म्हणोनि शुक्र जाहालासे अपवित्रू ॥ तेणें भ्रष्ट जाहाला संजीवनीमंत्रू ॥ मग सर्व कारणीं जाहाला शत्रू ॥ सन्मुख गगनीं ॥५२॥
श्रोतयां मानसीं हे न वाटे साक्षी ॥ जे योनिद्वारीं घातला एकाक्षी ॥ तरी स्कंदपुराणीं प्रतिसाक्षी ॥ पाहिंजे श्रोतेजनीं ॥५३॥
जे वेदशास्त्रीं साक्षी प्रामाणिक ॥ तेंचि कविजनीं बोलावें सम्यक ॥ वेदाविरहित बोलणें अधिक ॥ प्रमाण नव्हे ॥५४॥
ऐसें देखूनि तो तालजंघ असुरू ॥ अपमानिला दैत्यगुरू ॥ मग उपटिला महागिरिवरू ॥ तुळित पाणीं ॥५५॥
तो देखिला वज्रदंडादेवीनें ॥ मुष्टिघातें केला शतचूर्ण ॥ वामकरें हाणीतला तालजंघन ॥ पवला क्षयातें ॥५६॥
जैसा तरू उत्पाटे समूळीं ॥ तैसा निश्चित पडला क्षितितळीं ॥ असुर निक्षेपिले तत्काळीं ॥ महादेवीनें ॥५७॥
ऐसें देखोनि कपिस्कंद ॥ त्राणें गर्जिन्नला दीर्घ शब्द ॥ दोहीं दळांच वाद्यतुरें नाद ॥ तेणें व्योम गर्जे ॥५८॥
ऐसा देखोनि कपिस्कंदाचा यावा ॥ तंव कोपली दिव्य उष्टग्रीवा ॥ दैत्यांहूनि स्मरती मावा ॥ कोटिकळीं अधिक पैं ॥५९॥
कपिस्कंद धरिला दशनीं ॥ रुधिर प्राशन करीतसे यक्षिणी ॥ कीं क्तो शाखा पत्रपुष्पीं ओसंडूनी ॥ पडिला चैत्यवृक्ष जैसा ॥६०॥
आतां असो हे द्वंद्वयुद्धवाणी ॥ उठावले शुंभ निशुंभ दोनी ॥ तंव न सांवरेचि दिव्य यक्षिणी ॥ उठावली काळरात्री ॥६१॥
हाणीतला वज्राचा प्रहर ॥ जैसा शक्रें हाणीला गिरिवर ॥ क्षितीं पडलें दोघे अस्रुर ॥ मर्दिले चरणीं ते ॥६२॥
ऐसें द्वंद्वयुद्ध असुर यक्षिणीम ॥ प्रेतमय होतसे तया रणस्थानीं ॥ चारी कोटि दैत्य मेदिनीं ॥ पाडिले देवीनीं ॥६३॥
सहस्त्र वर्षें भृगुकुमरू ॥ देवींनीम आकर्षिला दैत्य गुरू ॥ मग मृत्यु पावले असुरू ॥ संजीवनीविरहित ॥६४॥
ऐसें देखोनि दुर्गा सुरदैत्य ॥ अदुभुत कोपला रौरवसुत ॥ पृथ्वीसी होऊ पाहे उल्कापात ॥ ते समयीं परियेसा ॥६५॥
दुर्गासुर देखिला रणस्थानीं ॥ हर्षें उंचबळली भवानी ॥ मग ते आरूढली रथ स्थानीं ॥ अग्निदत्तनामें जो ॥६६॥
घेतले शंख चक्र विशाळ ॥ पिनाक वाहिलें अति विशाळ ॥ आतां प्रवर्तला अंतकाळ ॥ त्या दुर्गासुराचा ॥६७॥
दोहीं बाहीं यक्षिणींचा भार ॥ त्रिशूळपत्रें तुळी अपार ॥ प्राशावया दैत्याचें रुधिर ॥ तृषार्त जाहाली ॥६८॥
नातरी निर्मिला देवीचा भार ॥ कीं अभ्रीं उद्भवले गंधर्व शूर ॥ मध्यें सहस्त्र विद्युल्लताकार ॥ त्या रीतीं शोभे भवानी ॥६९॥
नातरी ऐसी नव्हे द्दष्टांत कुसरी ॥ तेव्हां भवानी जाहालीसे खेचरी ॥ तेथें सहस्त्र विद्युल्लताकारीं ॥ मिरवलीं शस्त्रें ॥७०॥
वाद्यें घनगर्जनेसमान ॥ भेरी मृदंगांचे शब्द दारुण ॥ मग चढविती जाहाली गुण ॥ चाप्चक्राचा पैं ॥७१॥
पिनाक झणत्कारिलें मुष्टीं ॥ अंबेनें दुर्गासुर देखिला द्दष्टीं ॥ प्रदीप्त जाहाली ह्रदयीं आगिटी ॥ अद्‍भुत कोणची ॥७२॥
दुर्गासुर देखतांचि भवानी ॥ दर्ष भंगूनि गेला अंतः करणीं ॥ कीं जैसा रोग देखोनि संजीवनी ॥ कांपतसे देहीं ॥७३॥
कीं राहुसूत्रीं जैसा शीतकर ॥ कीं ताराक्ष झड्पी जैसा कीर ॥ कीं महासतीसी कांपे भास्कर ॥ अग्निप्रवेश करितां ॥७४॥
तैसी भवानीं देखिली क्रोधायमानी ॥ मग दुर्गासुर वदला वचनीं ॥ म्हणे तुज पाठवूनि शूलपाणी ॥ रक्षीतसे आपणांसी ॥७५॥
धिक त्या पुरुषाचें संसारशौर्य ॥ वृथा बळ शक्ति ऐश्वर्य ॥ आपणां रक्षूनि रणस्थानीं ॥ समर ॥ स्त्रीसी पाठवी युद्धासी ॥७६॥
पूर्वीं ऐसी दिघली होतीस रावणासी ॥ तैं शिवें ऐसेंचि रक्षिलें आपणांसी ॥ येरवीं तो दशग्रीव कैलासीं ॥ धाड घालिता पैं ॥७७॥
आतां तूं आम्हांसी दिधली शक्ती ॥ आणि शिवें राखिलें काशी प्रती ॥ येरवीं विचारितों युक्ती ॥ काशी संहारा करावयाचा ॥७८॥
पूर्वीं दोन सहस्त्र संवत्सर ॥ भस्मा सुरभेणें पळाला शंकर ॥ आतां तया बरवा सुचला विचार ॥ जें तुज दिधलें आम्हांसी ॥७९॥
आतां तूं मज उग्र दैत्या पासून ॥ शक्ति केवीं पां जाशील विमुख होऊन ॥ शुष्क तृण जरी जाहालें तीक्ष्ण ॥ तरी तें न भेदील गिरीसी ॥८०॥
जेथें पर्जन्य वृष्टि अमोघ ॥ तेथें सरिता केवीं पृथ्वीपरिघ ॥ जंबुकमेळीं शब्द जाहाले दीर्घ ॥ सरी न येचि सिंहध्वनि ॥८१॥
सर्व देव माझ्या बंदिखानीं ॥ तूं केवीं झुंजों आलीस यक्षिणी ॥ रावणें केली होती सीता राणी ॥ तैसै करीन मी तुजलागीं ॥८२॥
ऐसें अंवेसी वदे दुर्गासुर ॥ मग भवानी वदती जाहाली प्रत्युत्तर ॥ म्हणे स्थळ बरवें रे पाताळविवर ॥ राहावया तुजलागीं ॥८३॥
जैसा हिमाद्रि शोभला कुलाचळीं ॥ तैस तूं पूर्ण अधीश दैत्यमेळीं ॥ दिक्पति सुर जिंकिले स्वदळीं ॥ ऐसी शक्ती अनिवार ॥८४॥
अमरपद केलें आपणां आधीन ॥ ऐसा तूं दैत्य सर्व त्युक्तिपूर्ण ॥ परी एकचि तुझ्या ठायीं अवगुण ॥ जे नाहीं काशीस्मर ॥८५॥
तुज दिसतसे दीर्घ लांछन ॥ पूर्वीं त्रिपुरदैत्य जाहाला दारुण ॥ तेणें काशी मध्यें शिवा पूजून ॥ लिंगें स्थापिलीं ॥८६॥
तूं उग्र असुर महा दुष्टबुद्धी ॥ तुज कायसी उपदेशसिद्धी ॥ अवचितां वधिलें म्हणसी युद्धीं ॥ शिवा चिया शक्तीनें ॥८७॥
तुझा पूर्वज प्रल्हाद ॥ त्यासी शंकरपूजनीं अति आल्हाद ॥ त्याचे वंशीं जन्मलासी तूं मैंद ॥ महातस्कर तूं ॥८८॥
तरी आतां होई रे सावधान ॥ शिर छेदूनि घेईन तुझा प्राण ॥ तृप्त करीन हुताशन ॥ तुझिया शिरकमळें ॥८९॥
मग क्रोधा चढला दुर्गासुर ॥ चाप  सज्जूनि लाविला शर ॥ मागें घालूगि असुर भार ॥ ओढिलें कोदंड ॥९०॥
सुटली धनुष्या पासाव मुष्टी ॥ शर ऊर्ध्व संचरला व्योमकुटीं ॥ असंभाव्य वन्हिज्वाळावृष्टी ॥ करीत पृथ्वीतळीं ॥९१॥
ऐसा दुर्गासुर येत ॥ कीं तो महाकाळाचा मोक्षदंत ॥ शक्ति सैन्य आला दाहीत ॥ प्रळयांगार जैसा ॥९२॥
तंव भवानीनें शर सज्जूनी ॥ चक्रबाण प्रयोजिलासे गुणीं ॥ मग महा विद्यामंत्र जपोनी ॥ ओढिलें त्र्यंबक ॥९३॥
जें नंदिकेश्वराचे श्रृंगीं जन्मलें ॥ जें सुनाभचक्रासी ओढितां पुरलें ॥ मग त्या वज्रघातें शिवें कापिलें ॥ त्रिपुरदैत्यासी ॥९४॥
त्या त्र्यंबका सज्जिला चक्रबाण ॥ ऊर्ध्व निघाला धनुष्यापासून ॥ कीं तो प्रातः कालीं सहस्त्रकिरण ॥ उदय करी पूवेसी ॥९५॥
दुर्गासुराचें संघान व्योममंडळीं ॥ तें तोडूनि पाडिलें क्षितितळीं ॥ दैत्यबाण देखिले भूमंडळीं ॥ मृत्यु उरग जैसे ॥९६॥
ऐसें देखोनियां दुर्गासुर ॥ जपतसे पन्नग अस्त्राचे भार ॥ चापीं सज्जूनि विषांगार ॥ मोकलिले व्योमीं ॥९७॥
वमिती विषचिया गरला ॥ उद्भवती वन्ही चिया ज्वाळा ॥ तेणें कल्पांत होतसे क्षितितळा ॥ वनस्पतींसी पैं ॥९८॥
तंव त्र्यंबक देखिलें दिव्यदीप्त ॥ भूभीं पडला फणी अकस्मात ॥ तंव धांविन्नली महाद्‍भुत ॥ उरगयानी दिव्या ॥९९॥
तिनें पराभविले फणिवर ॥ शरण आले ते केले कंठीं हार ॥ ऐसें देखोनि दुर्गासुर ॥ कोपारूढ जाहाला ॥१००॥
मग योजिलें समीरास्त्र तेणें ॥ चंडवात उद्भवला चहूंकडून ॥ द्रुम उत्पाटूनि पाषाण ॥ उसळती गगनीं ॥१०१॥
रथ कुजर पताका उडती ॥ त्या द्वीपांतरीं जाऊनि पडती ॥ रजें दाटिलीं दशदिशा क्षिती ॥ न दिसे चक्षु मंडळीं ॥१०२॥
ऐसें देखोनि त्रिपुर सुंदरी । पाहातसे यक्षिणीचे भारीं ॥ तिच्या आज्ञा संकेतें शुष्कोदरीं ॥ प्रवेशे मारुत ॥१०३॥
म्हणे मज व्हावया पवन आहार ॥ सहज उद्भवला हा समीर ॥ कीं कैसा कृपाळू दुर्गास्रुर ॥ आम्हां दिधलें भोज्य ॥१०४॥
ते महाविशाळ पैं मानिनी ॥ निश्चित ठाकली समीर भक्षूनी ॥ तंव प्रदीप्त जाहाला क्रोधाग्नी ॥ दुर्गा सुराचा पैं ॥१०५॥
आतां असो हा युद्ध विस्तार ॥ धर्म कथेसी होतो विलंब थोर ॥ भवनी कोपलीसे क्रूर ॥ काढिला निर्वाण शर तेव्हां ॥१०६॥
मग त्र्यंबक झणत्कारिलें गुणीं ॥ उद्भवल्या कार्मुका चिया ध्वनी ॥ तेणें बधिरत्व जाहालें श्रवणीं ॥ दिशा भद्रजातींच्या ॥१०७॥
मर्यादा सांडिली सरितानाथें ॥ प्रति शब्द न माये व्योमपथें ॥ तो बाण दिधला होता जगन्नाथें ॥ भवानी प्रती ॥१०८॥
कर्णवरी ओढी शैल बाळी ॥ वामचरण पुढें केला क्षितितळीं ॥ आकाशपर्यंत जाहाली विशाळी ॥ नभ चुबित मौळींनें ॥१०९॥
मग दुर्गासुर मंदबुद्धी ॥ भवानीनें लक्षिला सूत्र संधीं ॥ बाण कडाडला व्योमामधीं ॥ जैसा कोटि विद्युल्ल तामेळ ॥११०॥
एकचि बाण झाला त्रिविधाकार ॥ एवढा मूळमंत्राचा बडिवार ॥ अकस्मात भेदला दुर्गासुर ॥ तो कैसा आतां ॥१११॥
त्रिशूळाग्र होतें त्या बाणासी ॥ तेणें भेदिलें दोहीं दोर्दंडांसी ॥ विधि अस्त्रें मूळ मंत्रें त्रिशूळासी ॥ आव्हानिली होतीं ॥११२॥
तें तृतीयाग्र भेदलें कंठनाळीं ॥ दुर्गा सुराचें शिर तुटलें तत्काळीं ॥ बाण भेदोनि गेला महीतळीं ॥ सप्तसिंधूपर्यंत ॥११३॥
भूमीं पडलिया दोन भुजा ॥ यशस्वी जाहाली शैलजा ॥ मग संहारिती जाहाली फौजा ॥ महादैत्यां चिया ॥११४॥
चरणीं धरोनि दुंदुभिदैत्य ॥ पृथ्वीसीं ताडिला महा दूभुत ॥ शूभ निशुंभांचा केला अंत ॥ मर्दिला रक्तबीज ॥११५॥
ऐसी भवानी दुर्गा सुरासीं महा शस्त्रें ॥ झुंजिन्नली नव अहो रात्रें ॥ असंख्य भेदिलीं दैत्यांचीं वक्रें ॥ तीन कोटी शक्तीनें ॥११६॥
भूमीं पाडिले दुर्गा सुराचे कर ॥ जैसे महा गिरीचे पाठार ॥ चंद्रगिरी ऐसेम पडिलें शिर ॥ महा भयानक ॥११७॥
बाणीं जर्जर जाहालें शरीर ॥ जैसी जंत्रीं सोनार काढी तर ॥ तेथें प्रवाहों लागलें रुधिर ॥ जैसे सरिता ओघ ॥११८॥
पडिलीं दैत्यांचीं कलेवरें ॥ रणसगर पूर्ण झाला रुधिर ॥ मग तेथें मिळालीं भूतें खेचरें ॥ क्रीडावयासी ॥११९॥
एक ते काळ भैरव प्रचंड ॥ एक बह्म ग्रह पातले वितंड ॥ कंदरीं रिघोनि काळदंड ॥ करीं झेलिती पैं ॥१२०॥
ऐसीं भूतादिकें मिळालीं अपार ॥ करिती रणमंडळीं मांस आहार ॥ समस्त करिती जय जयकार ॥ स्मरती भवानीसी ॥१२१॥
जय जय मंगल मूर्ती ॥ आम्हां रण स्थानीं केली तृप्ती ॥ असुर भार मर्दू नियां क्षिती ॥ संतुष्ट केली पैं ॥१२२॥
तुझिया दोर्दडा चिया बळा ॥ घालोनि धालों जी भूतावळी सकळा ॥ आजि मुक्त केलिया बंदि शाळा ॥ इंद्रादिकांच्या ॥१२३॥
नातरी सहस्त्रकर तुझा बाण ॥ घेतला दुर्गा सुराचा प्राण ॥ बंदि शाळा तम विध्वंसून ॥ उदय झाला देवां ॥१२४॥
नातरी वज्रा समान तुझे दोर्दंड ॥ कापिलें दुर्गा सुर गिरीचें मुंड ॥ शुंभ निशुंभ केले शतखंत ॥ मर्दिला दुंदुभी ॥१२५॥
ऐशीं भवानीनें रण स्थानीं ॥ तृप्त केलीं भूतें यक्षिणी ॥ मग स्वभारेशीं रथीं बैसोनी ॥ प्रवेश केला काशी पुरीं ॥१२६॥
तंव स्वर्ग मृत्यु पाताळ भुवनीं ॥ आनंदें वाजिन्नल्या वाद्यध्वनी ॥ ऋषि देवांचीं पारणीं फिटलीं ते क्षणीं ॥ आनंदें दीर्घत्व ॥१२७॥
मग भवानी आली शिव पूजेसी ॥ गणेशें साष्टांग घातलें भवानीसी ॥ शिव म्हणे मी प्रसन्न जाहालें तुझसी ॥ वर मागें प्राणेश्वरी ॥१२८॥
तंव भवानी वदे पशुपती ॥ आणिक न भासे आमुचे चित्तीं ॥ मज बहुत तुमची भक्ती ॥ प्रिय हेंचि द्यावें शिवा ॥१२९॥
तंव बोलता जाहाला गजांबरी ॥ तुज वर नाठवे प्राणेश्वरी ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ विवरीं ॥ तुज पूजा समर्पिली ॥१३०॥
आश्विन शुद्ध प्रतिप देपा सुनी ॥ नव अहो रात्र त्या रण स्थानीं ॥ दैत्य परा भविले समरांगणीं ॥ झालीस तूं विजयी ॥१३१॥
त्या दुर्गा सुराची नाम धारण ॥ ते तुज म्यां प्राप्त केली सत्य जाणा ॥ तुझें नांव दुर्गा देवी अन्नपूर्णा ॥ त्रैलोक्य मंडळामाजीं ॥१३२॥
नव अहोरात्र तुझें व्रत ॥ जे तुज पूजिती विधि युक्त ॥ तूं करिसी त्यांचे पूर्ण मनोरथ ॥ हे माझी आज्ञा ॥१३३॥
अष्ट अहोरात्र उपास पारणीं ॥ यज्ञ आरंभिजे नवमदिनीं ॥ यागीं तृप्त कीजे देवी यक्षिणी ॥ मद्य मांस क्षिप्रा समर्पिजें ॥१३४॥
महाविद्या मंत्र पूजा विधी ॥ अवदानें सप्तशती मंत्र सिद्धी ॥ मग तूं प्राप्त करिसी सर्व सिद्धी ॥ जे कामना कल्पित ॥१३५॥
सर्व भूतावळीसी तुझा अधिकार ॥ मंत्रीं यंत्रीं पूजितां साध्याकार ॥ तो तूं करिसी तुझा कुमर ॥ जैसा साक्षी विनायक ॥१३६॥
त्यासी महा विद्येचा मंत्र विधी ॥ प्राप्त करिसी कल्पिली सिद्धी ॥ तो वंद्य होय त्रैलोक्यामधीं ॥ वाचा सिद्धी चतुरर्थी ॥१३७॥
ऐसा वर देतां पंचाननें ॥ तितुकें अंगीकारिलें भवानीनें ॥ मग तेचि पद्धति झाली स्वइच्छेपासून ॥ दुर्गा भवानीचे ॥१३८॥
मग तो दक्षिण मानसीं शूळपाणी ॥ स्वइच्छें स्थापी दुर्गा भवानी ॥ तंव देव मुक्त झाले बंधनीं ॥ दुर्गा सुराचे ॥१३९॥
सर्वही देवेंसीं वज्रधर ॥ भवानीसी करावया नमस्कार ॥ दिक‍पती आले यम वरुण कुबेर ॥ सोम सूर्य कृशानू ॥१४०॥
मग खांडव वनीं चिया सुगंध जाती ॥ भूतां करवीं आणवी पशुपती ॥ सुवर्ण कमळें दिव्यदीप्ती ॥ नानाजातींचीं ॥१४१॥
मग गंधर्वेश्वरासी आज्ञा करी ॥ पुष्पवृष्टी कीजे भवानीशिरीं ॥ भृत तो वरुण गगनोदरीं ॥ वृष्टी करिता झाला पैं ॥१४२॥
पुष्पवृष्टी करितां भवानी ॥ शुद्ध सुगंध कमळें नानावर्णीं ॥ जैसीं नक्षत्रें रिचवती ॥ अंतरिक्षाहुनी ॥ भूमंडळासी पैं ॥१४३॥
मग तो सहस्त्राक्ष बद्धांजळीं ॥ स्तविता झाला शैलबाळी ॥ म्हणे जय जय मूर्ति मंगळी ॥ शिव प्रिये तूं ॥१४४॥
तूं परम सुखाची अत्यंत गोडी ॥ तुवां फेडिलीं प्रथमांचीं सांकडीं ॥ देवांची मुक्त केली बांदोडी ॥ दुर्गासुर वधोनिया ॥१४५॥
ये सृष्टीचें मूळ तुजपासुनी ॥ तूं परात्पार विषयाची गवसणी ॥ चतुर्वेदांची जे जननी ॥ ते तूंचि भवानीये ॥१४६॥
सृष्टिमूळ तुजपासूनि अंकुर ॥ तूं साक्षात त्रिपदा ॐ कार ॥ अक्षर तें क्षर विश्व तदाकार ॥ तूंचि महदादि ॥१४७॥
जरी तूं परम पुरुष निर्गुण ॥ तरी तुवां द्दश्य केलें सगूण ॥ षड्‍दर्शनें तुजवांचून ॥ अगम्य जाणावीं ॥१४८॥
या आनंदवनाची महिमता ॥ जे तूं तेथें भुक्तिमुक्तींची दात्री तत्त्वतां ॥ तुझें गुण गौख सुंदरता ॥ मी अशक्त वर्णावया ॥१४९॥
ऐसे वज्रधराचें स्तवन ॥ घातलें बंदिवानीं लोटांगण ॥ मग पुढें झाले अंगिरानंदन ॥ देवगुरु बृहस्पती ॥१५०॥
संपुटाकार जोडिले पाणितळ ॥ क्षितीं स्पर्शोनि साष्टांग मौळ ॥ मग स्तविते झाले देव सकळ ॥ देखतांचि पैं ॥१५१॥
जय जय वो विश्वबीजे भवानी ॥ महादैत्यांसी तूं पूर्ण दहनी ॥ महाकिल्बिषदोष नाशिनी ॥ मंडळ दिव्य ॥१५२॥
जय जय त्रिपुरे विकटाननी ॥ हिमाद्रिजे सिते दाक्षायणी ॥ महीतळीं वाराही भामिनी ॥ नारसिंहिका दिव्या ॥१५३॥
काल रात्री कंकाळा भद्रकाळी ॥ महाशक्ति अस्त्रघातें दैत्यदळीं ॥ प्रसन्न विजया त्रिपदा काळी ॥ कामना देवी ॥१५४॥
स्वामीसी प्रार्थी अगस्ती ॥ बृहस्पतीनें स्तविली शक्ती ॥ ते चहूं खाणीं मध्यें कोण जाती ॥ तें निरूपावें मज ॥१५५॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ परम पुरुष देखिला चहूं खाणीं ॥ तेचि हे महदादि साकारूनी ॥ द्दश्य झाली ॥१५६॥
बृहस्पति वदे भवानीये ॥ परम पुरुष निरामये ॥ परी तुज अंगें देखें साकारकार्यें ॥ स्थूळ दिव्य तूं ॥१५७॥
परमेश्वर बीज तूं बीजांकुर ॥ परमेश्वर हिरण्य तूं अलंकार ॥ ईश्वर सुगंध तरी तूं अंकुर ॥ कमलकलिका ॥१५८॥
ईश्वर जरी झाला नवनीत ॥ तरी तूं भवानीये पयोमृत ॥ परमा ईश्वरातीत महाद्‍भुत ॥ स्थुळमाया दिव्या ॥१५९॥
नातरी शिव जरी योगाकाश ॥ तरी तूं ग्रह नक्षत्र साभास ॥ तुजविरहित तो आदिपुरुष ॥ द्वैत नोहे कोणे काळी ॥१६०॥
तूं जरी पृथ्वीचा आकारू ॥ तरी बोलिजे तो दिव्य मेरू ॥ तो जरी आपरूप निर्धारू ॥ तरंग देवी तूंचि पैं ॥१६१॥
तो तेज तूं ज्योति पूर्ण ॥ तो शशी तूं कुमुदिनी जाण ॥ तूं चित्तवृत्ति तो चितन्यघन ॥ व्यापक शरीरीं ॥१६२॥
तो मार्तंड तूं रविकरज्योती ॥ तो वसंत तूं वनस्पती ॥ तो पंचम तूं सुंदरर श्रुती ॥ कोकिळारूप ॥१६३॥
तूं घट तो घटाकाश ॥ तूं जरी मठ तो मठाकाश ॥ तूं जरी दर्पण तो प्रकाश ॥ रूप तेथींचें ॥१६४॥
असो आतां वर्णावर्ण साक्षी ॥ गुरू वदे रुद्रादिदेव साक्षी ॥ चामुंडेश्वरी चामुंडा विशालाक्षी ॥ भगवती भवानी ॥१६५॥
जे भवानी सहस्रनामावळी ॥ ते गुरुनें वंदिली बद्धांजुळी ॥ मग साष्टांग घातलें दिक्पाळीं ॥ शितितळीं मौळीं स्पर्शोनी ॥१६६॥
मग जें भवानीचें व्रत पवित्र ॥ तें अंगीकारिते जाहाले नवरात्र ॥ तें सविस्तर परिसा जी श्रोते पवित्र ॥ अनुवादलों संकलित ॥१६७॥
मग देव गर्जिन्नले जय जय कारीं ॥ तुझीं व्रतें चाल विती हो पृथ्वीवरी ॥ जें अनुवादला स्मरारी ॥ तें नव्हे विपरीत ॥१६८॥
ऐसी ते दुर्गा भवानी वाराणसीं ॥ शिवें स्थापिलीं दक्षिण मानसीं ॥ तेथेंचि भवानीतीर्थापासीं ॥ साक्षीविनायक ॥१६९॥
या अध्यायाची सांगतां फलश्रुती ॥ आणि हे पूजितां मंगलमूर्ती ॥ नवरात्रीं विधियुक्त पूजिती ॥ त्यांसी व्र प्राप्त कैसा ॥१७०॥
समर्पिलें पृथ्वीचें नृपत्व ॥ मोक्षलक्ष्मी आणाय सिद्धत्व ॥ स्मरलिया होय द्दश्य एवढें साक्षित्व ॥ मग वर तो किमर्थ ॥१७१॥
भवानीचें पूजाविधिदर्शन ॥ हा अध्याय करितां श्रवण पठन ॥ त्याचे गृहीं शुभ दशा संपूर्ण ॥ आणि मंगळें होती ॥१७२॥
स्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ ऐसी ते काशीमध्यें दुर्गाभवानी ॥ तिची पूजा होतसे शुक्ल आश्चिनीं ॥ नव अहोरात्रें ॥१७३॥
शिव दास गोमा वदे जी श्रोतां ॥ आतां अगस्ति स्वामीसी जाहाला प्रश्चिता ॥ ते कथा परिस जी अपूर्वता ॥ कल्मषवना कुठार ॥१७४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दुर्गासुरवध दुर्गादेवीमाहात्म्यवर्णनं नाम त्रिसप्ततितमाध्यायः ॥७३॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति त्रिसप्ततितमाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP