मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४३ वा

काशीखंड - अध्याय ४३ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ आतां सावधान जी सभाधीशा ॥ शिवासी काशीवियोग कैसा ॥ ते कथा निरोपूं महाराष्टभाषा ॥ जनउद्धारिणी जे ॥१॥
शिव भवानीसंवादनिर्मित ॥ तरी ते संस्कृत ऋषिभाषित ॥ आतां जाणा परोपकारासी प्राकृत ॥ सांगों वहिलें ॥२॥
अगस्ति वदे शिवतरंगा ॥ हें सर्व जनां आणिलें उपयोगा ॥ जैसा मळ घेऊनि गंगा ॥ सिंधूसी मिळे ॥३॥
तरी हे कथा त्रिभुवनतारक ॥ तुम्हां सुचेल परोपकारक ॥ मंदराचलासी असतां त्र्यंबक ॥ कैसा वियोग जाहाला ॥४॥
हें अगस्ति प्रश्नी षडाननासी ॥ शंकर राहिला मंदराचलासी ॥ ब्रह्मा विष्णु आदि सव देवांसी ॥ कैसा राहिला ॥५॥
मग काशीमध्यें दिवोदास राजा ॥ पुण्यप्रवर्तक पाळी प्रजा ॥ घरोघरीं उभविल्या ध्वजा ॥ पुण्यप्रतापाच्या ॥६॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ तो धर्मराज करीतसे मेदिनी ॥ आपणचि वरुण होऊनी ॥ पृथ्वी केली पूर्ण जळें ॥७॥
राज्यामध्यें नाहीं दोषांकुर ॥ अवघे एकपत्नीव्रती नर ॥ पतिव्रता सुंदरी निरंतर ॥ स्वामिभक्तिणी ॥८॥
सर्व जनांसी त्रिकाळ स्नान ॥ अविमुक्तेश्वरीं स्नपन ध्यान ॥ मग दिवोदासाचें दर्शन ॥ घेती सर्व जन ते ॥९॥
सर्व जन येती राया नमस्कारा ॥ मग प्रवर्तती गृहव्यापारा ॥ भक्तिदानेंविण दिनकरा ॥ जाऊं न देती अस्तासी ॥१०॥
थोर संतोष जाहाला पृथ्वीजनांसी ॥ दरिद्रव्यथा नाहीं कोणासी ॥ चतुर्वर्ण आपुले नीतीसी ॥ नेणती आन मार्ग ॥११॥
त्यांसी पापाची नसे भयशंका ॥ अवघें पुण्याचें सामर्थ्य लोकां ॥ घरोघरी महावेदध्वनिका ॥ षट्‌कर्मी ब्राह्मण ॥१२॥
स्वर्गी एकचि कुबेर भांडारी ॥ या राज्यांत कुबेर घरोघरीं ॥ स्वर्गी एकचि अमरपुरी ॥ मोपितं असे ॥१३॥
तेथें एकचि इंद्र वज्रधारी ॥ या राज्यामध्यें इंद्र घरोघरीं ॥ अवघीं नगरें जीं पृथ्वीवरी ॥ तीं अमरपुरीसमान ॥१४।
स्वर्गीचिया देवांगना मोपिता ॥ या राज्यामध्यें अवघ्या पतिव्रता ॥ महादेवांगना पुण्यलता ॥ गृहीं गृहीं ॥१५॥
स्वर्गी एकचि हरिकांता लक्ष्मी ॥ या राज्यामध्यें लक्ष्मी धामीं धामीं ॥ एकचि चंद्र होता व्योमीं ॥ येथें ग्रामोग्रामीं चंद्र ॥१६॥
स्वर्गी जो इंद्राचा ऐरावत ॥ तो मोपितां एक चतुर्दंत ॥ या राज्यांत महाद्भुत ॥ ऐरावर घरोघरीं ॥१७॥
सप्तमुखी उच्चैःश्रवा तुरंगं ॥ जो अवघा श्वेतवर्ण श्याम ॥ ऐसियां नाहीं संख्यानें ॥ दिवोदासराज्यामध्यें ॥१८॥
स्वर्गी एकचि विधांता ॥ तो चतुरानन सृष्टिकर्ता ॥ दिवोदासाचे राष्ट्री पाहातां ॥ अवघें ब्रह्मे सृष्टिकरे ॥१९॥
स्वर्गी अमरावतीवांचूनी ॥ कल्पतरु नाहीं आणिक भुवनीं ॥ दिवोदासराज्याचे मेदिनी ॥ संख्या नाहीं कल्पद्रुमां ॥२०॥
स्वामी म्हणे गा ऋषि कुंभजा ॥ ऐसा तो रिपुंजय पृथ्वीचा राजा ॥ सुखेंचि पाळी पुत्रवत प्रजा ॥ एकवीस विश्वे धर्म ॥२१॥
परी देव ते विपत्तीनें पीडिले ॥ काशीविरहित थोर आंदोळले ॥ मग अमरनाथ काय केलें ॥ गुरुदेवासी बोलत ॥२२॥
सहस्त्राक्ष वदे जी बृहस्पती ॥ रिपुंजयासी देखिजे पूर्ण विपत्ती ॥ ऐसी कीजे उपाययुक्ती ॥ गुरुदेवा तुम्हीं ॥२३॥
गुरु म्हणे जी देवाधीसा ॥ राजा विपत्ति पावे कैसा ॥ जो सर्व जनांचे इच्छेऐसा ॥ होऊनि वर्ते ॥२४॥
गुरु म्हणे सहस्त्राक्षा अवधारीं ॥ ब्रह्मचर्ये वर्तती ब्रह्मचारी ॥ ब्राह्मण वेदध्वनी घरोघरीं ॥ महापंडित पैं ॥२५॥
क्षत्रिय तरी शक्तिपौढिवतं ॥ कोणीचि नसती अशक्त ॥ त्याचिया राष्ट्री पितृभक्त ॥ पुत्र बहुत असती ॥२६॥
स्त्रिया तरी स्वामीभक्तिणी ॥ अहोरात्र तत्पर स्वामिचरणीं ॥ दाते विमुख नाहीं गा दानीं ॥ पृथ्वीमंडळीं ॥२७॥
राजा लोकपाळ शुद्ध मंत्री ॥ वैश्य तरी पूर्ण अग्निहोत्री ॥ शूद्र तरी भजती सत्पात्रीं ॥ वैश्वदेवउपासनीं ॥२८॥
राजा तरी वर्ते सर्वजनविचारें ॥ उंच मिरवत गृहमंडिरें ॥ तेथें वापी कूप तडागनीरें ॥ बहुसाल पृथ्वीवरी ॥२९॥
गर्वे गजती महासरिता । यौवनगर्वित पतिव्रता ॥ मंदे तरी भद्रजाती गर्जतां ॥ क्रमिताति सर्व काळ ॥३०॥
तेथें थोर संग्रह होतां पुण्याचा ॥ देशीं दुष्काळ दरिद्र-पापांचा ॥ सद्‌बुद्धिशास्त्रश्रवणाचा ॥ बहु साक्षेप पैं ॥३१॥
सर्व जन वर्तती निर्वैरी ॥ कलह नाहीं कवणा घरीं ॥ त्याच्यां राज्यांत यमपुरीं ॥ उद्वस जाहाली ॥३२॥
काशीपुरीं तरी पूर्ण धर्म ॥ राजदास्य करीतसे यम ॥ त्यासी न सुचे मृत्युजन्म ॥ काशीजंतूंचा पैं ॥३३॥
पृथ्वीजंतू जाहाले यमा अगोचर ॥ मग कैंचा काशीजंतूंचा स्मर ॥ तेथींचें भूतवाक्य निरंतर ॥ एकै शिव जाणे ॥३४॥
एकावांचूनि त्रिपुरारी ॥ कवण नेणवे हे काशीपुरी ॥ जैसें पद्मिनीपत्र जळावरी ॥ तैसी अलिप्त हे पृथ्वीसी ॥३५॥
म्हणोनि यम तो पृथ्वीचेंचि जाणे ॥ काशीजंतूंचे भविष्य नेणे ॥ विशेष दिवोदासाचें करणें ॥ धर्मराज्य तेथें ॥३६॥
अष्टोत्तरशत व्याधि अपारा ॥ त्या गेलिया क्षीरसागरा ॥ सप्तद्वीपवतीमध्यें थारा ॥ नाहीं कोठें तयांसी ॥३७॥
ज्याचा अधीश अधर्म अनाचार ॥ त्याचा दिवोदासें केला प्रहार ॥ जैसा स्वामी पीडिलिया किंकर ॥ पावे उत्तरदशा ॥३८॥
म्हणोनि या शत्रूतें आरोग्यता । त्याचीचि प्रवृत्ति पृथ्वी पाहातां ॥ म्हणोनि विपत्ती न चल आतां ॥ अमराधीशा ॥३९॥
ऐसीं बहस्पतीचीं प्रत्युत्तरें ॥ परिसिलीं त्या अमरेश्वरें ॥ मग विचारिलें वर्जधरें ॥ कृशानूसी काय ॥४०॥
अमरेश म्हणे गा हुताशना ॥ रिपुंजये प्रहारिलें देवगणां ॥ तरी तुझी मूर्ति महायज्ञा ॥ कां ठेवली पृथ्वीमध्यें ॥४१॥
तरी परियेसीं गा महाहुता ॥ येणें परभविलें देवां समस्तां ॥ आतां तुज राहावया स्वतां ॥ काय कारण ॥४२॥
तरी तुझी मूर्ति आणीं ग वेगेंसीं ॥ ऐसें अमरेश वदे वन्हीसी ॥ मग जाणवे रिपुंजयासी ॥ चालविता राज्य ॥४३॥
मग दिवोदासाचे राज्याहून ॥ पृथ्वीव्यापक होता यज्ञ ॥ मग तो केला आकर्षण ॥ गेला अमरलोकासी ॥४४॥
जैसी जळयंत्राची माळा ॥ घटिका पर्जन्य होती सकळा ॥ मग ते समस्तांची जे कळा ॥ आकर्षी सूत्रधारी ॥४५॥
कीं जैसीं त्या पाणियंत्राचीं द्वारें ॥ वरील निरोधितां न गळती येरें ॥ तैसी कळा निरोधोनि वैश्वानरें ॥ नेला वन्ही ॥४६॥
मग अग्नीविण पृथ्वीचे लोक ॥ राहिले सर्व जनांचे पाक ॥ ग्रामोग्रामीं जे यज्ञकारक ॥ मंद झाले हवितां ॥४७॥
राहिलें वैश्वदेवउपासून ॥ धूपदीपादे जें पूजन ॥ ऐसे अग्निविरहित जाण ॥ पीडले बहुप्रकारें ॥४८॥
तंव रायाचे अधिकारी पाकशाळीं ॥ ते प्रार्थूं गेले रायाजवळी ॥ म्हणती राया गृहमंडळी ॥ जाहाला असे चमत्कार ॥४९॥
राया कृशानु जाहाला अदृष्ट ॥ आतां अन्नपाकाचे बहु कष्ट ॥ आतां अग्निहोत्रियां बहु कष्ट ॥ राहिलीं यज्ञकायें ॥५०॥
तैं वैश्वदेव पूजिल्याविण ॥ सर्वथा न स्वीकारिती अन्न ॥ इतुके समयीं पृथ्वीजन ॥ आले रायापाशीं ॥५१॥
मग त्या सर्व लोकीं राज वंदिला ॥ म्हणती कृशानु अदृश्य झाला ॥ नेणों तुमचिया प्रतापासी भ्याला ॥ मार्ग क्रमिला तेणें ॥५२॥
मग तो सर्व जनांचा संवाद ॥ परिसोनि राजा वदता झाला शब्द ॥ हुताशनाविरहित खेद ॥ झाला तुम्हांसी ॥५३॥
तुम्ही सर्व जन माझे आभारी ॥ तुम्हांसी विपत्ति होय राष्ट्रीं ॥ तरी मी राजा पृथ्वीवरी ॥ धिक्‍ जीवित्व माझें ॥५४॥
माझिया राष्ट्रीं भृत्यंजन ॥ ते केवी होती आणिकाआधीन ॥ मजवांचोनि आणिक देवस्मरण ॥ तरी मी राजा धिक्‍ ॥५५॥
जोंपर्यंत माझें राज्य मेदिनीं ॥ तंव सर्व लोक माझेचि उपासनीं ॥ आणिक देव स्मरती मजवांचूनीं ॥ तरी वृथा राज्य ॥५६॥
सर्व जनांचे जे मनोरथ ॥ ते सफळ करावया मी समर्थ ॥ यांचा थोर स्वामी यथार्थ ॥ तो मीचि जाण पां ॥५७॥
मज सांडोनि माझिया प्रजा ॥ करिती आणिक देवांची पूजा ॥ तरी मी कायसा त्यांचा राजा ॥ न पुरवीं मनोरथ त्यांचे ॥५८॥
मज राज्य दिधलें विरिंचीनें ॥ माझे आभारी सर्व जण ॥ तरी मी राज्य कवणाच्या आश्रयानें ॥ अंगीकारिलें नाहीं ॥५९॥
मी सप्तद्वीपवतीचा अधिकारी ॥ कवण नसावा दुजा पृथ्वीवरी ॥ त्या वैश्वानरें क्रमिलें तरी ॥ कवणाचें काय गेलें ॥६०॥
राहिलीं जीं यागहवनें ॥ धूप दीप वैश्वदेव देवतार्चन ॥ आतां क्षुधेनें पीडितील देवगणें ॥ यागभागेंविण ॥६१॥
तिंही आपणां आपण केली गा व्यथा ॥ विपत्ति प्रार्थिली गा सर्वथा ॥ हें स्मरेचि अमरनाथा ॥ जे पीडा कवणासी ॥६२॥
षण्मुख म्हणे गा कुंभजा ॥ मग छत्रात्रळीं उभा राहिला राजा ॥ स्वभावें प्रबोधिता झाला प्रजा ॥ लोकपाळ तो ॥६३॥
तुम्ही पहुडा रे आपुले स्थानीं ॥ दृढव्रत असावें अंतःकरणीं ॥ जंव गृहासी जाल तंव वन्ही ॥ प्रकट करीन तुम्हांसी ॥६४॥
मग रायें पृथ्वीजन पहुडविले ॥ राजा मंत्रियांसी काय बोले ॥ जे कवण देव राहिले ॥ त्यांसी आज्ञा कीजे वेगीं ॥६५॥
अमरलोकासी गेला वन्ही ॥ तरी येथें न राहिजे कोणीं ॥ कवणाचे प्रतापें मेदिनी ॥ अंगीकारिली नाहीं ॥६६॥
माझिया राज्यामध्यें शीतकर ॥ प्रकाश करी हा अत्रिकुमर ॥ तरी त्याजविण आमुचा राज्यव्यवहार ॥ राहिला नाही ॥६७॥
सर्व देव गेले स्वर्गासी ॥ आणि येथें राहिला कां हा शशी ॥ त्यासी माझी आज्ञा कीजे वेगेंसी ॥ जावें राज्याबाहेरी ॥६८॥
आणिक त कश्यपाचा कुमर ॥ वृथाचि कां राहिला समीर ॥ जैसा अदृश्य जाहाला वैश्वानर ॥ तैंसेचि क्रीमजे येणें ॥६९॥
आणिक तो कर्दमाचा नंदन ॥ कासया वृष्टि करितो वरुण ॥ याविरहित काय पृथ्वीचे जन ॥ पीडले माझे ॥७०॥
यांचें आम्हांसी नाहीं गा कारण ॥ जैसा गेला तो हुताशन ॥ त्याचिपरी जाइजे आपण ॥ न कीजे विलंब ॥७१॥
आणिक हा आमुचा पूर्वज ॥ जो सहस्त्रकिरण दिव्यतेज ॥ तो आम्हां श्रेष्ठ कश्यपात्मज ॥ सविता प्रसिद्ध जो ॥७२॥
तो असो नसो पृथ्वीसी ॥ हा द्वैतभाव नाहीं मानसीं ॥ हा गेला तरी जाणवेल निशी ॥ विध्वसावया ॥७३॥
ऐसा तो अनंगमोहितीकांत ॥ दिवोदास मंत्रियांसी वदत ॥ यांहीं न राहिजे राज्यांत ॥ ऐसी माझी आज्ञा असे ॥७४॥
मग शशी आणि समीर ॥ वरुण आणि तो वैश्वानर ॥ त्यांही क्रमिला गिरिवर ॥ मंदराचळ तो ॥७५॥
मग तो राजा पृथ्वीजनांसी ॥ आपणचि अग्नि जाहाला देशोदेशीं ॥ आपणचि वरुन सर्व जनांसी ॥ करीतसे वृष्टी ॥ ७६॥
मग आपणचि पवन जाहाला राजा ॥ जे जे मनोरथ इच्छी प्रजा ॥ तैसेचि सर्व जनांचिया काजा ॥ करिता करिता जाहाला दिवोदास ॥७७॥
जेव्हां लोक इच्छिती पवन ॥ ते समयीं प्रकट होय आपण ॥ इच्छेसारिसाचि ओळंघोन ॥ पृथ्वी करीतसे संतुष्ट ॥७८॥
ऐसा तो रिपुंजय चक्रवर्ती ॥ सुखें प्रजा पाळीतसें क्षितीं ॥ पराभविले अष्टही दिक्पती ॥ आपणचि सर्व होय ॥७९॥
ऐसा देखोनि तयाचा उत्कर्ष ॥ दिक्पतींसी न वाटे संतोष ॥ अति खेदातें पावला अमरेश ॥ बरवें कांहीं न वाटे ॥८०॥
मग देवगुरुसी विचारिती ॥ आतां कैसे कीजें वाचस्पती ॥ सर्व देवांची हरिली क्षिती शक्ती ॥ एकलेनि दिवोदासें ॥८१॥
मग बृहस्पती म्हणे वज्रधरासी ॥ आतां तुम्हीं पाचारावें यमासी ॥ चतुर्दशकोटि दळ तयासी ॥ तो भविष्य जाणें पृथ्वीचें ॥८२॥
त्यासी आहे शिवाचा वरदहस्त ॥ मृत्युलोकीं व्यापक असती त्याचे दूत ॥ म्हणोनि तो चहूं खाणींचे जंत ॥ जाणत असे पापपुण्य ॥८३॥
हें मानलें जी वज्रधरा ॥ मग पाचारिलें सूर्यकुमरा ॥ तो चतुर्दशकोटिपरिवारा ॥ सहवर्तमान पातला ॥८४॥
मग त्यासी प्रश्नी अमरेश ॥ मृत्युलोकीं राजा दिवोदास ॥ तो सप्तद्वीपवतीचा अधीश ॥ सूर्यवंशींचा राजा ॥८५॥
तुम्ही जाणतसां शुभाशुभ कर्म ॥ जो मृत्युलोकींचा दुरित अधर्म ॥ तरी एकादें पाहावें छिद्रवर्म ॥ दिवोदासाचें ॥८६॥
धर्म म्हणे जी सहस्त्रनयना ॥ आमुचे हेर गेले होते मृत्युभुवना ॥ हे तुम्हां न पुसतां विचारणा ॥ देखिली होती आम्हीं ॥८७॥
मग अमरेशादेखतचि कृतांत ॥ पुसे भृत्यजनांसी वृत्तांत ॥ जे मृत्युलोकींची व्यवस्था मात ॥ कैसी देखिली तुम्ही ॥८८॥
यानंतर अधर्म अनाचार बोलती ॥ तो महापौढिवंत भूपती ॥ भरोनि उरली त्याची शक्ती ॥ पृथ्वामंडळीं ॥८९॥
जो शुभाशुब वृत्तांत पृथ्वीसी ॥ तो निरुपिला असे चित्रगुप्तासी ॥ आम्ही बद्ध झालों जी वाचेसी ॥ दिवोदासआचरणें ॥९०॥
चित्रगुप्त म्हणे वज्रधरा ॥ तो सूर्यवंशीं राजा महाशूर खरा ॥ त्यानें आपुलें शक्तीं वसुंधरां ॥ राखिली असे ॥९१॥
तेणें सद्‌बुद्धीनें केला मारु ॥ पराभविला अनाचारु ॥ अधर्मासी भेदिला महाशरु ॥ पतिव्रतपणाचा ॥९२॥
तंव गर्व म्हणे जी वज्रपाळा ॥ आम्ही गेलों होतों क्षितितळा ॥ तेथें युद्ध केलें पतिव्रतावळा ॥ भंजविलें त्यांचेनि ॥९३॥
दृढव्रतें दवडिला अभिलाष ॥ मग सहस्त्रहानींसी कैंचा प्रवेश ॥ काम-दंभांसी केला थोर नाश ॥ ब्रह्मचार्‍यांहीं ॥९४॥
गृहीं गृहीं मोक्षलक्ष्मीच रहिवास ॥ तेथें केवीं रहिवास दुर्दशेस ॥ अग्निहोत्रियानें केला वळंघास ॥ महापापांसी ॥९५॥
गृहीं गृहीं असती कुबेर ॥ तेथें कैंचें दरिद्राचें घर ॥ महादानें केला जी संहार ॥ सर्व व्याधींचा ॥९६॥
तेथें शांति क्षमा प्रतापपर्वत ॥ त्यांही तृष्णाकल्पनेसी केला घात ॥ सर्व ज्वरांसी केला निःपात ॥ जप-तप-अनुष्ठानें ॥९७॥
ज्ञानें पळविली आशा मनीषा ॥ शास्त्रश्रवणीं पूर्ण भरंवसा ॥ तेणें परभविलें दहावळसा ॥ यमदूतांते ॥९८॥
ऐसा सर्वा घटीं व्यापक राजा ॥ सुखें पाळीतसे सकळ प्रजा ॥ षण्मुख म्हणे या कुंभजा ॥ देवांसी उद्वेग थोर झाला ॥९९॥
ऐसी जे जे व्यवस्था वसुमतीसी ॥ चित्रगुप्तीं निरुपिली सहस्त्राक्षासी ॥ तेथें अधर्मछिद्रे कवणासी ॥ न दिसे अमरेशा ॥१००॥
तंव अगस्ती वदे जी शिवदासा ॥ तूं मज अनाथाचिया पूर्ण ईशा ॥ जेणें पराभवे जन्मांतरदुर्दशा ॥ ते कथा निरुपा मज ॥१०१॥
येथोनि पूर्वार्धाचि योग्यता ॥ संपूर्ण जाहाली जी श्रोता ॥ आतां जे पुराणरसबीज तत्त्वतां ॥ ते कथा परिसावी ॥१०२॥
पूर्वार्ध जैसा पूर्णिमेचा शशी ॥ पश्चिमे अस्त होय पूर्णपीयूषीं ॥ सवेंचि उदय पूर्वेसी ॥ प्रसिद्धमूर्ति तो ॥१०३॥
पूर्वार्धकथा चौसष्टी सुवर्णे ॥ वरी जडिलीं तीं उत्तरार्धकथारत्नें ॥ नानाजातीं मिरवली अलंकारभूषणें ॥ श्रोतयां श्रवणीं ॥१०४॥
कीं मिष्टान्न भक्षितां पयपाका ॥ त्यावरी घृत शर्करा पत्रशाका ॥ तैसा पूर्वार्ध परिसोनि परीक्षका ॥ कीजे उत्तरार्धश्रवण ॥१०५॥
तरी श्रोतां व्यासवाणे जे शब्द ॥ ते उघड निरोपूं महाराष्ट्र शब्द ॥ जेणें सर्व जन परिसिती संवाद ॥ परोपकाराचा ॥ १०६॥
शिवदास गोमा म्हणे श्रोतां ॥ महागुणग्राहिक पूर्णभरिता ॥ शास्त्रश्रवणार्थी चित्ता ॥ अर्पिजे श्रवण ॥१०७॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते इंद्रपरितापवर्णननाम त्रिचत्वारिंशाध्यायः ॥४३॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ इति पूर्वार्धं समात्पम ॥
॥ इति त्रिचत्वारिंशत्तमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP