मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २० वा

काशी खंड - अध्याय २० वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
शिवशर्मा पुसे विष्णुदूतां ॥ मज कोपाल जी प्रश्न करितां ॥ जेवीं बाळकाचिया लाता ॥ साहे जननी क्रूर न होय ॥१॥
चंदन घर्षितां शिळेसी ॥ तो विशेष दाखवी आमोदासी ॥ कीं मथितां क्षीरामृतासी ॥ पाविजे सार नवनीत ॥२॥
जरी वक्ता भेटला पूर्ण ॥ तरी श्रोता करी तयासी प्रश्न ॥ जरी मुका असेल पूर्ण ॥ तरी तो काय विनवी श्रोतयां ॥३॥
तुम्ही सांगा जी विष्णुदूत ॥ म्हणोनि शिवशर्मा गणांसी प्रार्थीत ॥ श्रवणीं झालों जी तृप्त ॥ तुमच्या वचनामृतें ॥४॥
विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव शनिलोक देखिला पुढारीं ॥ मग ते गण सांगते झाले विस्तरीं ॥ शिवशर्म्यासी आदरें ॥५॥
शिवशर्म्यासी सांगती विष्णुदूत ॥ हा शनैश्चर सूर्याचा सुत ॥ यासी प्रसन्न भवानीकांत ॥ हा स्थापिलासे या लोकीं ॥६॥
परियेसीं गा द्विजनाथा ॥ या शनैश्चराची मूळकथा ॥ जेणें हरे महाव्यथा ॥ ग्रहदोषांची समूळ ॥७॥
शिवशर्म्यासी म्हणती दूत ॥ प्रजापती नामें ब्रह्मयाचा सुत ॥ महा यजमान त्रैलोक्यांत ॥ द्क्षराजा तो एक ॥८॥
तयाची कन्या दिव्य स्वरूप तत्त्वतां ॥ संज्ञा नामें महापतिव्रता ॥ ते दिधली कश्यपसुता ॥ दिनकरासी ॥९॥
तें सवित्याची निजांगना ॥ प्रसवली कन्या कुमर जाणा ॥ तरी ते कोण गा ब्राह्मणा ॥ परिसावें आतां ॥१०॥
प्रथम झाला तो कृतांत ॥ जो दक्षिणाधीश विख्यात ॥ दुसरा प्रसवली सुत ॥ शनैश्वर तो पहा हो ॥११॥
मग तियेसी कन्या झाल्या ॥ तपती भद्रा आणि कालिंदिया ॥ ते कालिंदी पतिव्रता निजभार्या ॥ विष्णुनाथाची होय जे ॥१२॥
चवथी तो सावित्री कुमरी ॥ ते चतुराननाची सुंदरी ॥ तिचिया सत्त्वें विरिंची करी ॥ सृष्टिकार्य संपूर्ण ॥१३॥
भद्रा आणि यमुना ॥ अस्ताचळीं जन्म घेती जाणा ॥ तपती आणि सावित्री पूर्णा ॥ जन्मल्या उदयाचळी ॥१४॥
ऐसी ते संज्ञा सुंदरी ॥ इतक्या प्रसवली कुमरी ॥ मग कोणे एके समयीं विचार अंतरीं ॥ उद्भवला तियेसी ह्रदयांत ॥१५॥
मग ते मनीं विचारी सूर्यकांत ॥ महातेजाकृती सविता ॥ तें दिव्य तेज न साहवे आतां ॥ माझिया शरीरीं ॥१६॥
ऐसें कल्पूनियां अंतरीं ॥ आपुले छायेसी सुंदरी ॥ सवर्णा नामें दुसरी ॥ आपणांसमान केली पैं ॥१७॥
ते रविकांता आज्ञा करी तियेसी ॥ तुवां पूजावें पति सूर्यासी ॥ परी हा गुप्त विचार तयासी ॥ कळों न द्यावा सर्वथा ॥१८॥
जैसी तुझ्या मनाची वृत्ती ॥ तैसा तुवां भोगावा गभस्ती ॥ वेळ पडल्या आकांतीं ॥ स्मरण माझें करावें ॥१९॥
ऐसिया गृहकारणा ॥ स्वामिनी केली सवर्णा ॥ मग निघाली ते संज्ञा ॥ पितृसदनासी सत्वर ॥२०॥
मग तो महादानी दक्षराज ॥ जो मार्तंडकांतेचा पूर्वज ॥ बोलता जाहाला ब्रह्मात्मज ॥ प्रजापती सर्वज्ञ तो ॥२१॥
म्हणे तुम्ही आमचे मंदिरीं ॥ सर्वथा असों नये कुमारी ॥ शुभाशुभ सुंदरी ॥ पुरुषासंगें क्रमावें ॥२२॥
पितृगृहीं कन्या नसावी ऋतुमती ॥ हें बोलिलें वचन वेदांतीं ॥ मग त्या दोषाची निवृत्ती ॥ कीजे ऐसें तीर्थ नसे ॥२३॥
ऐसें ऐकोनि पितृउत्तर ॥ मग संज्ञा जाहाली चिंतातुर ॥ म्हणे दग्धो हें स्त्रियेचें शरीर ॥ जीवित्व तें व्यर्थ पैं ॥२४॥
पतिगृहींची न धरी आस्था ॥ तरी तिसी पितृगृहीं नसे मान्यता ॥ ऐसियांचा अंगीकार करी जरी माता ॥
तरी दोषिती तिसी सकळ जन ॥२५॥
जळो स्त्रियांचें जिणें ॥ सर्वदा पतीचे आज्ञेंत वर्तणें ॥ यावज्जन्म पराधीनपणें ॥ राहाणें लागे स्त्रियांसी ॥२६॥
जरी विधवा जाहाली न पुरतां हेत ॥ तरी पितपुत्रांचे आज्ञेंत असावें लागता ॥ म्हणोनि स्त्रियांचें व्यर्थ जीवित ॥ पराधीन जें कांहीं ॥२७॥
ऐसें दक्षें प्रहरिलें तियेसी ॥ मग ते सूर्य धरोनि मानसीं ॥ संज्ञा निघाली तपासी ॥ महावनांतरीं ते वेळीं ॥२८॥
मग ती वडवारूप धरूनी ॥ तप साध्य करीतसे वनीं ॥ शीत उष्ण महापर्जन्यीं ॥ राहिली निराहार ॥२९॥
गण म्हणती गा ब्राह्मणा ॥ ऐसें तप करी संज्ञा जाणा ॥ तंव गृहस्थिती चालवीतसे सवर्णा ॥ प्रसवली बाळें ऐका तीं ॥३०॥
श्राद्धदेव आणि मनु ॥ व्यतीपात महादारुणु ॥ कुलिक अर्धयाम गहनु ॥ प्रसवली योगांतें ॥३१॥
दोन कन्या जाहाल्या तियेप्रती ॥ भद्रा आणि वैधृती ॥ ऐसी चालवितां गृहस्थिती ॥ भ्रांतीं नेणे सविता तो ॥३२॥
जैसी कुमुदिनी जळतरंगें ॥ विस्तारे भिन्नत्वांगें ॥ तैसी सवर्णा सूर्यसंगें ॥ वर्ततसे निरंतर ॥३३॥
तंव कोणे एके अवसरीं ॥ शनि क्षुधातुर ॥ जाहाला भारी ॥ तो म्हणे माते झडकरी ॥ देईं भोजन मज आतां ॥३४॥
ती पुत्रासी करी बोध ॥ जंववरी नाहीं देवासी नैवेद्य ॥ तंववरी धीर धरीं निःशब्द ॥ होईं रे निश्चळ मानसीं ॥३५॥
तो न मानीं तियेचें वचन ॥ म्हणे मज देईं आधीं भोजन ॥ म्हणोनि हाणावया चरण ॥ चालिला मातेजवळिकें ॥३६॥
मग ती बोलली शापवचन ॥ म्हणे तुझें होईल रे पादभंजन ॥ जे तुज नाहीं स्मरण ॥ माता ऐसें ॥३७॥
मग तेणें भिऊनियां शापासी ॥ श्रुत केलें सूर्यासी ॥ म्हणे मातेनें शापिलें मजसी ॥ तुझें हो पादभंजन ॥३८॥
तंव विचारी तो गभस्ती ॥ म्हणे बाळकासी शापील जनिती ॥ ऐसा अधर्म या क्षितीं ॥ ऐकिला ना देखिला ॥३९॥
ज्ञानें पाहातसे तरणी ॥ तंव ते नव्हे संज्ञा कामिनी ॥ क्रोधें संतप्त होऊन ॥ वदता जाहला तिजप्रती ॥४०॥
तूं कवणाची सांग कवण ॥ हें मज निरूपीं गुप्तवचन ॥ मग ती भयभीत होऊनी ॥ वदती जाहाली तरणीसी ॥४१॥
मज निर्मिलें संज्ञया ॥ मी तिच्या तनूची असें छाया ॥ मज गृहस्थिती निरोपूनियां ॥ ती गेलीसे तपातें ॥४२॥
मज नाहीं दोषलांछन ॥ हें चालवितां गृहकारण ॥ मग बोलता जाहला सहस्त्रकिरण ॥ शनिग्रहाप्रती तेधवां ॥४३॥
ही तव मातृसमान सर्वथा ॥ इचा शाप न होय वृथा ॥ तुज बाधीना शापव्यथा ॥ परी होईल पाद वक्र ॥४४॥
ऐसें वदूनि वरदान ॥ म्हणे कामक्रोधमदेंकरून ॥ सर्वत्रीं पाहतां लांछन ॥ कवणासी म्यां दंडिलें नाहीं ॥४५॥
मग सविता पाहातसे ज्ञानीं ॥ तंव वडवा जाहालीसे दक्षनंदिनी ॥ हिमाद्रीचे पाठारवनीं ॥ करीतसे तप-साधना ॥४६॥
ह्रदयीं स्मरतसे सविता ॥ आणिकाची नेणे गंधवार्ता ॥ जैसा महाशूर युद्ध करितां ॥ नसे मानसीं दुश्चित्त ॥४७॥
जेवीं चातक कल्पी अभ्रपटळी ॥ परी तो न प्रवर्ते पृथ्वीजळीं ॥ तैसा संज्ञेच्य़ा ह्रदयकमळीं ॥ तरणीच वसे सर्वदा ॥४८॥
मग सूर्य होऊनि साक्षेप ॥ आपण जाहाला अश्वरूप ॥ संज्ञा करीतसे जेथें तप ॥ तेथेंचि वेगें पातला ॥४९॥
तंव तिनें देखिला दुरूनी ॥ मग ती विचारीतसे स्वमनीं ॥ म्हणे मज सूर्यावांचूनी ॥ न व्हावा आणिक द्दश्य ॥५०॥
तें जाणोनि जाहाली संतुष्टी ॥ मग दोघांसी जाहाली समद्दष्टी ॥ अवघ्राण केलें नासापुटीं ॥ उभयवर्गें पैं ॥५१॥
तंव ती होती सहजॠतुमती ॥ म्हणोनि द्रवला तो गभस्ती ॥ मग तें वीर्य जाहाली घेती ॥ नासिकाद्वारातें ॥५२॥
मग ते अश्विनी जाहाली गरोदर ॥ तीस नासिकाद्वारें जाहाले दोन कुमर ॥ अश्विदेव वैवस्वत दोघे सुंदर ॥ देवांसी वैद्य जे ॥५३॥
त्यांपासाव वैद्यांची उत्पत्ती ॥ मग ते प्रकट जाहाले या क्षितीं ॥ त्यांची पूर्वमाता ते सती ॥ अश्विनी नामें बोलिजे ॥५४॥
अश्विदेव वैवस्वत ॥ हे दोघेही प्रमथांत ॥ अमरभुवनीं विख्यात ॥ सुरवैद्य ते होती ॥५५॥
मग पुढें पळतसे अश्विनी ॥ पाठी लागत जातसे तरणी ॥ ऐसा नवखंड मेदिनी ॥ हिंडविला सविता तो ॥५६॥
मग उदयाचळपर्वतीं ॥ ती अश्विनी आणि गभस्ती ॥ रूपें पालटूनि पूर्वस्थितीं ॥ चालतीं जाहालीं सत्वर ॥५७॥
मग ती सूर्याची नंदिनी ॥ यमुना नामें हरिकामिनी ॥ माता पिता गेलीं जाणूनी ॥ उदयाचळासी ॥५८॥
मग ती यमुना जाहाली सरिता ॥ कल्लोळीं प्रवाहिली अमिता ॥ अस्ताचळाहोनि पूर्वपंथा ॥ क्रमिती जाहाली ॥५९॥
ते पाताळपृष्ठीं कूर्मतळीं ॥ प्रभावती नामें पूर्ण जळीं ॥ प्रवाह असे पाताळीं ॥ त्या पुण्यसरितेचा ॥६०॥
पश्चिमेच्या सप्तही सागरां ॥ भेदूनि जाय तो पाताळविवरा ॥ हें समजलें गिरिवरा ॥ कलिंदशैलाप्रती ॥६१॥
मग तियेच्या सहस्त्रभाग जळा ॥ मागुती जाहाले कलिंदशैला ॥ मग उच्छवास आले कल्लोळां ॥ कालिंदीउदकाचिया ॥६२॥
कृष्णवर्ण पर्वत तो कलिंद चांग ॥ म्हणोनि उदकासी कृष्ण रंग ॥ तेंचि गुणनाम जाहालें सांग ॥ कालिंदी ऐसें विख्यात ॥६३॥
मग पूर्व दिशा धरूनि मनीं ॥ प्रवाहें वाहे सूर्यनंदिनी ॥ पुढें सप्तसागर भेदूनी ॥ गेली असे उदयाचळासी ॥६५॥
मग तेथेंही न राहे सरिता ॥ थोर चिंतातुर जाहाला सविता ॥ मागुता जाहाला नेता ॥ अस्ताचळासी सत्वर ॥६६॥
मग ते नभमार्गें गगननोदरीं ॥ पश्चिमवाहिनी केली सुंदरी ॥ ते स्थिरावली सूर्यकुमरी ॥ अस्ताचळामाजीं पैं ॥७६॥
जैसी जलयंत्राची परी ॥ अस्ताचळातें आणिली सुंदरी ॥ अष्ट दिशा व्यापक पृथ्वीवरी ॥ यमुना हे साक्षात ॥६८॥
असो ते यमुना आतां ॥ पुढें प्रयागमाहात्म्यीं सांगों श्रोतां ॥ मागें राहिलें असे सांगतां ॥ शनैश्चरमाहात्म्य ॥६९॥
त्या संज्ञेचे कन्या कुमर ॥ यम आणि शनैश्चर ॥ सांगातें भद्रा महाक्रूर ॥ भगिनी होय यमाची ॥७०॥
तीन चरण सप्त पाणी ॥ एकचि मुख षड्‍नयनी ॥ महातामसी हलायुधिनी ॥ कंठ जाण पंचाननाचा ॥७१॥
ऐसीं त्रिवर्ग बंधुभगिनी ॥ तप करूं आलीं आनंदवनीं ॥ प्रसन्न करूनियां शूलपाणी ॥ साधावया मुक्तीतें ॥७२॥
आपला पण धरोनियां चित्तीं ॥ त्रिवर्गें लिंगस्थापना करिती ॥ भद्रेनें स्थापिला पशुपती ॥ भद्रेश्वरनामें लिंग तें ॥७३॥
यमें स्थापिला यमेश्वर ॥ शनीनें स्थापिला शनीश्वर ॥ ऐसा आराधिला त्रिशूळधर ॥ बहुतेक संवत्सर ॥७४॥
यमें आराधिला त्रिपुरारी ॥ तप केलें बरव्यापरी ॥ ते कथा असे पुढारीं ॥ सांगो श्रोतयांसी आदरें ॥७५॥
द्वादश सहस्त्र संवत्सर ॥ तप साधीतसे शनैश्चर ॥ तेथें प्रकटला शंकर ॥ उमेसहित ॥७६॥
शिव म्हणे रे सूर्यकुमरा ॥ तुज मी प्रसन्न रे ग्रहवरा ॥ आतां माग इच्छित वरा ॥ आपुलिया संतोषें ॥७७॥
मग शनि म्हणे गा नीलकंठा ॥ जयजयाजी सुरेंद्रा सुभटा ॥ वृषभवहना गंगाजूटा ॥ धन्य शिवा तूं एक ॥७८॥
तूं अससी जयापासीं ॥ संख्या नाहीं तयाचे पुण्यासी ॥ तेथें राहातसे काशी ॥ तुजसहवर्तमान ॥७९॥
विभूति जो लावी भाळी ॥ श्रवण करी तुझी नामावळी ॥ तयाहूनि त्रैलोक्यमंडळीं ॥ नाहीं श्रेष्ठ दुसरा ॥८०॥
विभूति जो लावी मंत्रून ॥ आणि प्रत्यहीं घेतसे दर्शन ॥ तरी सर्व दोषांचें दहन ॥ होत कोटी जन्मांचिया ॥८१॥
तुम्हांसी अर्चिजे पुष्पपत्रीं ॥ स्नपन करिजे शिवमंत्री ॥ तरी मातापितृगोत्री ॥ शिवासंनिध जात घेऊनी ॥८२॥
तुम्हांसी अर्चिजे रत्नमुक्तें तेजाळें ॥ हेमपुष्पें सुगंध कमळें ॥ स्वर्गसरिता मणि कर्णिकाजळें ॥ स्नपिजे तुम्हां सर्वदा ॥८३॥
तरी तूं कृपाळू शंकर ॥ रंकासी करिसी तूं राजेश्वर ॥ संतती संपत्ती भांडार ॥ देसी इतुकें सामर्थ्यें तूं ॥८४॥
तुम्हांसी अर्पिजे षड्‍रस अन्न ॥ गोक्षीरें करी जो स्नपन ॥ त्यासी तुम्हीं अमृतभोजन ॥ अक्षयी देतां कैलासीं ॥८५॥
तुमचें धरीं जो ध्यान ॥ शिवमंत्रें करी जो अनुष्ठान ॥ तुमचें रूप लक्षी ज्याचें मन ॥ तयासी कराल शिवरूप ॥८६॥
तुमची करावी जरी स्तुती ॥ तरी तुम्हांसी स्मरतसे सरस्वती ॥ तुम्ही अपरिमित पशुपती ॥ म्हणोनि घातलें लोटांगण ॥८७॥
तेणें संतोषला शंकर ॥ म्हणे तुज दिधला रे पूर्ण वर ॥ ग्रहांमाजी ग्रह थोर ॥ केला तुज आम्हीं ॥८८॥
तूं राशी भोगिसी द्वादशा ॥ त्रियाती होऊनि सूर्यअंशा तूं होसील कैसा कैसा ॥ तेंचि सागूं तुजलागीं ॥८९॥
षण्मास संवत्सर दोनी ॥ यातीचा कोळी प्रथम नयनीं ॥ उदरीं गौळी चांडाळ चरणीं ॥ या त्रिविध नियमेंसीं ॥९०॥
सप्त संवत्सर आणि षण्मासीं ॥ तुवां भोगाव्या द्वादश राशी ॥ अष्ट वर्षीं तूं वेगळा होसी ॥ राशीपासोनियां ॥९१॥
तुवां जें लिंग स्थापिलें सुंदर ॥ तया नाम ठेविलें शनीश्वर ॥ हें पूजिलिया महाउग्र क्रूर ॥ न बाधती सर्वथा ॥९२॥
जे कोणी तव लिंग पूजिती ॥ मणिकर्णिकातोयें स्नपिती ॥ तयांसी म्यां केलें ग्रहपती ॥ वेगळें शनीपासूनियां ॥९३॥
तूं उत्तम मध्यम कनिष्ठ ॥ ग्रहांमाजीं ग्रहश्रेष्ठ ॥ ऐसा प्रसन्न झाला नीलकंठ ॥ तया सूर्यकुमरासी ॥९४॥
गण म्हणती हो द्विजवरा ॥ ऐसा वर झाला शनैश्चरा ॥ मग या लोकीं सूर्यकुमरा ॥ स्थापिलें शिवें ॥९५॥
तो ग्रह क्रूर सूर्यसुत ॥ याचा तुज कथिला मूळवृत्तांत ॥ लोपामुद्रेसी असे निरूपीत ॥ अगस्तिमुनी स्वयें तो ॥९६॥
तेचि कथा सांगे कृष्णद्वैपायन ॥ प्रश्न करीतसे वैशंपायन ॥ पुढें लोक देखिला कवण ॥ तें परिसा श्रोतेजन सर्वही ॥९७॥
हे कथा करितां श्रवण ॥ होतसे मनोमळाचें क्षालन ॥ मग निर्मळ होय मन ॥ इक्षुदंडान्वयें पैं ॥९८॥
जैसा त्या इक्षुदंडाचा संहार ॥ करीतसे लाट पाथर ॥ मग निपजवीतसे अरुवार ॥ शर्करा ते उत्तम ॥९९॥
तरी घाणा कीजे श्रोतयांचे श्रवण ॥ तेथें कथा लाट घालिजे मन ॥ तेणें होईल शतचूर्ण ॥ कर्मइक्षुदंड पैं ॥१००॥
मग त्या अभेदरसधारीं ॥ पन्हाळ चालती चारी ॥ तेणें देतसे आनंदलहरी ॥ मग कुंभामाझारीं ॥१०१॥
मग काढा करूनियां शरीरा ॥ चेतवावा शिवनाम अंगारा ॥ निःशेष मनमळ जाळूनि शर्करा ॥ निपजवावी पुण्यराशी ॥१०२॥
काशीखंडकथा चौसष्टी सुवर्ण ॥ त्यावरी जडलें शिवनामरत्न ॥ तें श्रोतीं श्रवणीं घालिजे भूषण ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१०३॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे शानिलोकवर्णनं नाम विंशाध्यायः ॥२०॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

॥ इति विंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP