अप्रसिद्ध अभंग - अभंग १०२१ ते १०३०
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
१०२१
नित्य धर्म नामपाठ ।
तेचि वैकुंठींची वाट ।
गुरूभजनी जो विनट ।
तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥
धन्य धन्य त्याचा वंश ।
धन्य तो आला जन्मास ।
तयाजवळी हृषीकेश ।
सर्वकाळ नांदतु असे ॥२॥
रामकृष्णस्मरण जप ।
तेंची तयाचें अमूप तप ।
तो वास करील कोटी कल्प ।
वैकुंठपीठ नगरीशी ॥३॥
ज्ञानदेवीं जप केला ।
हरि समाधीसी साधिला ।
हरिमंत्रे प्रोक्षिला ।
सर्व संसार निर्धारें ॥४॥
अर्थ:-
नित्य नेमाने जो नामस्मरण करतो त्याला वैकुंठप्राप्ती होते. कारण नामस्मरण ही वैकुंठाला जाण्याची वाट आहे. जो सद्गुरूंची सेवा करतो त्यास हरिभक्त म्हणतात. ज्याच्या मुखांत नेहमी हरिनाम आहे.तो स्वतः जन्मास येऊन धन्य झाला आहे तसेच त्याचे कुळही धन्य होय कारण त्याचे जवळ हषिकेश सतत नांदत असतो. रामकृष्ण नामाचा जप करणे हेच मोठे तप होय तो वैकुंठभुवनांत कोटी कल्प राहिल. मी या हरिनाम स्मरणाच्या जपाने समाधी साध्य केली. तसेच हरिमंत्राचे संसारावर प्रोक्षण करून अशुद्ध जो संसार तो शुद्ध करून टाकला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२२
उपजोनी नरदेहीं ।
जयाशी हरिभक्ति नाही ।
तोचि भूमिभारू पाहीं ।
व्यर्थ जन्म त्याचा गेला ॥१॥
पशुप्राणी तया जोडी ।
नेघेचि हरिनाम कावडी ।
तो कैसेंनि परथडी ।
नामेवीण पावेल ॥२॥
जिव्हा बेडुकी चावट ।
विसरली हरिनाम पाठ ।
ते चुकले चुकले वाट ।
वैकुंठीची जाण रया ॥३॥
बाप रखुमादेवि निर्धार ।
नामे तरले सचराचर ।
जो रामकृष्णीं निरंतर ।
जीवें जप करील रया ॥४॥
अर्थ:-
नरदेहांत जन्माला येऊन जो हरि भक्ति करीत नाही. तो भूमिभार असून त्याचा जन्म व्यर्थ होय. तो पशुतुल्य होय, जो हरिनाम उच्चारणार नाही. तो संसार समुद्राच्या पैलतीराला कसा जाईल? हरीनामावांचून इतर भाषण हे बेडूकाच्या ओरडण्यासारखे आहे. हरिनामपाठ जे विसरले ते वैकुंठाचा रस्ता चुकले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल व रामकृष्ण नामाचा श्रध्देने नेहमी जप करतात ते निःसंशय तरुन जातात कारण रामनाममंत्राने संजीव निर्जीवांचा उध्दार झाला. असे माऊली सांगतात.
१०२३
रामकृष्ण जप सोपा ।
येणें हरती जन्मखेपा ।
संसारू तुटेल महापापा ।
धन्य भक्त तो घरातळीं ॥१॥
जया हरीची जपमाळी ।
तोचि पडिला सर्व सुकाळीं ।
तया भय नाहीं कदाकाळी ।
ऐसें ब्रह्मा बोलियेला ॥२॥
बापरखुमादेवी हरि ।
नामे भक्तासी अंगिकारी ।
नित्य सेवन श्रीहरि ।
तोचि हरीचा भक्त जाणावा ॥३॥
अर्थ:-
साधनामध्ये रामकृष्ण नामाचा जप करणे हे सुलभ आहे. व तो जो करील त्याच्या जन्ममरणाच्या येरझारा नाहीशा होऊन तसेच त्याची मोठी पातके नाहीशी होतात. असे भक्त भूतलावर मोठे धन्य आहेत. हरिनामाचा जप करणाऱ्याला केंव्हाही दुष्काळ नाही. तसेच कोणत्याही काळी त्याला भय नाही. या प्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितले आहे.माझे पिता रखुमादेवीचे पती बाप जे श्रीविठ्ठल ते आपल्या भक्तांचा अंगीकार करतात. जे सतत हरीनामाचे चिंतन करतात तेच खरे हरीचे भक्त समजावे. असे माऊली सांगतात.
१०२४
निमिष नलगे मन वेधिता ।
येवढी तुझी स्वरूपता ॥१॥
विठोबा नेणों कैसी भेटी ।
उरणें नाहीं जीवेसाठी ॥२॥
उरलें उपाधी कारणे ।
तें त्वां नेमिलें दरूशनें ॥३॥
निवृत्तिदासा वेगळें ।
सांगावया नाही उरलें ॥४॥
अर्थ:-
हे श्रीकृष्णा, तुला पाहिल्यावर एका क्षणाचाही विलंब न होता तुझ्या स्वरूपाचा आमच्या मनाला वेध लागून जातो. एवढी तुझ्या स्वरूपाची योग्यता आहे.तुझ्या भेटीचे आश्चर्य हे आहे की तुझ्या भेटीला येणाऱ्याचा जीवभाव तूं उरू देत नाहीस. जो वेगळेपणा दिसतो तो फक्त अविद्या उपाधिमुळेच दिसतो. अशा तऱ्हेचे तुझ्या दर्शनाचे शास्त्र तूं निश्चित करून ठेवले आहेस. वरील बोध सांगण्यालादेखील मला त्या पांडुरंगरायांनी वेगळे ठेवले नाही. असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२५
सांग सखिये बाई मज हे नकळे ।
कैसा हा अकळे समतेजें ॥१॥
भावदृढ धरी चित्ताची लहरी ।
प्रकृती कामारी सत्रावीची ॥२॥
येरी म्हणे वांजट झाली वो पुराणें ।
समरस जाणे कोणे घरीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे आदिमध्य समता ।
सुखें पहातां चढे हातां ॥४॥
अर्थ:-
एक सखी आपल्या मैत्रिणीस विचारते की एकरूप होऊन हा श्रीहरि आपल्या ताब्यांत कसा येईल हे मला कळत नाही. मैत्रिण उत्तर देते. श्रीहरिच्या प्राप्तीचा उपाय प्रथम दृढभाव असू दे. श्रीहरिच्या ‘कामारी’ म्हणजे आधीन असणारी जाति तिचे कार्य जे काम क्रोधांदिक ते ब्रह्मप्राप्ताच्या आड येतील. पुन्हा सखी प्रश्न करते. या गोष्टी सांगून सांगून पुराणे थकली. पण अशी एकरूपता कोणाला अनुभवावयास मिळाली आहे काय? तेव्हा दुसरी सखी उत्तर देते. ज्या सखीने जगत कोणापासून उत्पन्न झाले, कोणावर राहिले, व कोणाच्या ठिकाणी लय झाले. याचा स्वस्थचित्ताने विचार केला असेल तर तिला ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता साधते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२६
सखीप्रती सखी आदरें करी प्रश्न ।
जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥
सखी सांगे मात उभयता ब्रह्म ।
नाहीं हो विषम हरीवीण ॥२॥
सूर्यप्रकाश मही घटमठी समता ।
तैसा हा उभयतां बिंब एका ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल जीवाचा ।
व्यापक शिवाचा शिवपणे ॥४॥
अर्थ:-
एक सखी, आपल्या मैत्रिणीस आदराने विचारते. कां ग जीव, पूर्ण शिव म्हणजे परमात्मा कसा दिसावा? मैत्रिण उत्तर देते की त्या दोन्ही दशा ब्रह्मरूपच आहेत हरिवांचून त्यामध्ये दुसरी विषमता काहीच नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीवर घटांवर प्रकाश पाडणारा एकच सूर्य आहे. त्याप्रमाणे या देहामध्ये आत्मा एकच आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जीवपणाने जीवांत व शिवपणाने शिवांत व्यापक आहते असे माऊली सांगतात.
१०२७
सहा चार अठरा धांडोळिती ज्यांतें ।
परी नेणवे सखा तो जवळी असतां ॥१॥
सखा निजसुखाचा जवळी असतां ।
पुढे पाहतां जाले वेडे चौघेजण ॥२॥
बोलों तरी आतां मौन्य पडिलें माये ।
शब्द हा न साहे सांगों कैसें ॥३॥
चिद्रूपाचा प्रकाश तोची आनंदाचा साभास ।
गुणागुणी नाश नातळेची ॥४॥
तें गिळुनीयां द्वंद्वासहित प्रपंचभास ।
तेथ स्थुळादि ब्रह्मांडास गिळुनी ठेले ॥५॥
ऐसिया सुख वस्ती आत्मप्रभा संविती ।
प्रकाशी प्रकाश स्थिति पूर्ण ठेली ॥६॥
तेथ बिंब प्रतिबिंब भान सरलें ज्ञानविज्ञान ।
हाचि नवलाव जाण तये ठायीं ॥७॥
निवृत्तिदास म्हणे ज्याचें तो जाणे ।
आतां जें बोलणें तोचि शीण ॥८॥
अर्थ:-
सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे ज्याचा शोध करीत आहेत तो परमात्माजवळच असूनही त्यांना सापडत नाही. परमात्मा जवळ असतांना चारी वेद त्याला पुढे करून पाहू गेले. तो वेडे झाले.त्याच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयल करावा तर त्याचे स्वरूप शब्दांनी वर्णन करण्यासारखे नसल्यामुळे मौनच स्विकारावे लागते. कारण शब्दाने त्याचे काहीच वर्णन करता येत नाही. त्याच्या ठिकाणच्या ज्ञानाचा प्रकाश तो आनंदाचा उदय होय. त्याच्या ठिकाणी गुण लागत नसल्यामुळे त्याला गुणीपणा येत नाही. म्हणून गुणी विशेषण त्याला लागू शकत नाही. त्याचे अव्यक्तस्वरूप टांकून व्यक्त स्वरूपांकडे नजर दिली तर सुखदुःखादि द्वंद्वे ज्यांत आहेत असा प्रपंच त्याचे स्वरूपांत लय पावतो.अशारितीने जगतांत असलेले ज्ञान, तेज, आनंद ही सर्व त्याच्याच ठिकाणी स्वतःसिद्ध आहेत.आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हेच मोठे आश्चर्य आहे की त्याच्या स्वरूपात बिंब प्रतिबिंब, ज्ञान, विज्ञान वगैरे सर्व भाव मावळूनजातात. हा अनुभव ज्याचा त्याने घ्यावयाचा आहे याहून आणिक कांही बोलणे हा शीणच होय असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२८
अवघाची शृंगारू डोईजे दुरडी ।
डोळेची मुरडी परतोनियां ॥१॥
देखिलें स्वरूप विठ्ठल नामरूप ।
पारूषेना चित्त त्याचे चरणाहुनी ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल सुखनिधी ।
अवघीची उपाधी तुटली माझी ॥३॥
अर्थ:-
दूध विकावयास जाणाऱ्या गौळणी कितीही शृंगार अंगावर घातला तरी ती इकडे तिकडे पाहात जरी चालली तरी तिचे लक्ष डोक्यावरच्या दुरडीवरच असते. त्याप्रमाणे बाहा व्यवहार करणाऱ्या पुरूषांने श्रीविठ्ठलाचे नामरूप एकदा जरी पाहीले. व ब्रह्मसुख प्रगट झाले तर त्याचे चित्त चरणाहून दुसरीकडे जाणार नाही. आनंदसागर जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना मी पाहिल्याबरोबर माझी देहादि सर्व उपाधि तुटून गेली. असे माऊली सांगतात.
१०२९
ऐशिया माजीं तो निज एकांती राहिला ।
विठ्ठल अनुसरला भावें एके ॥१॥
नित्य प्रळय निद्रिस्त नित्य प्रळय मृत्यु ।
कल्पांती जीव जात मायाही नाही तेथ ॥२॥
तेंचि तूं होउनी राहें विश्वाशी ।
ठायींच्या ठायीं निवसी अरे जना ॥३॥
तेथें नाहीं दुःख नाहीं तहान भूक ।
विवेकाविवेक नाहीं तेथें ॥४॥
ऐसें तें पाहोनी तये तृप्ती राहोनी ।
तेंची तूं जाणोनी होई बापा ॥५॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलुगे माये ।
स्वस्वरूपी राहे तये कृपा ॥६॥
अर्थ:-
जे प्रेमाने श्रीविठ्ठलाला शरण जातात अशा पुरूषांच्या अंत करणांत परमात्मा प्रगट असतो. मृत्यूचे म्हणजे प्रलयाचे तीन प्रकार आहेत. निद्रा ही नित्यप्रलय आहे. तसे मृत्यू हा एक प्रलय आहे व कल्पांत हा एक प्रलय आहे. आणि चवथा प्रलय म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माया व मायाकार्य पदार्थाचा अत्यंत अभावाचा निक्षय होणे हा आहे. या प्रलयामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरे कांहीच राहात नाही.स्वस्वरुपस्थिति श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेऊन परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन त्याचे स्वरूपच होऊन राहा म्हणजे असलेल्या च स्थितीमध्ये तूं समाधानाला प्राप्त होशील. त्या स्थितिमध्ये दुःख नाही. तहान भूक नाही. विवेकाविवेकही नाही. अशा स्थितीचे ज्ञान प्राप्त करून घेऊन तूं कृतार्थ होऊन राहा. कारण तें ब्रह्म तूं जाणल्यामुळे तेच तूं होऊन जाशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची कृपा संपादन करून तूं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहा असे माऊली सांगतात.
१०३०
नाहीं जातिकूळ तुझें म्यां पुशिलें ।
परी मन मावळलें देखोनियां ॥१॥
तुझेंची कुवाडे सांगेन तुजपुढे ।
तेणें मुक्तीची कवाडे उघडती ॥२॥
दुजापाशी सांगतां वाटे लाजिरवाणें ।
हांसतील पिसुणे प्रपंचाची ॥३॥
आतां उगवितांची भलें नुगवितां सांपडलें ।
ज्ञानदेव बोले निवृत्तीशीं ॥४॥
अर्थ:-
सगुण साकार परमेश्वरांचे दर्शन झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा, तुझी जात कुळ वगैरे मी काही विचारले नाही. तुला पाहून माझे मन विरघळून गेले. आतां तुझ्यापुढे तुझ्याच गोष्टी सांगेन व या कीर्तनरूप भक्तीने आमच्याकरिता मोक्षांची द्वारे सहज उघडली जातील इतर अनधिकारी माणसापुढे ही स्थिति सांगण्याची लाज वाटते. बरे त्यांना या स्थितीचे वर्णन करू गेले तर त्यांना त्याचे कांहीच महत्त्व वाटणार नाही. उलट ते ऐकून हासावयास लागतील कारण ते प्रपंच विषयकच वेडी झालेली असतात. हे निवृत्तीराया माझे पूर्वपाप फळाला न येता केवल पुण्य फलोन्मुख झाल्यामुळेच मला हे स्वरूप दिसले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2026

TOP