मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ९९१ ते १०००

अप्रसिद्ध अभंग - अभंग ९९१ ते १०००

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


९९१
लक्ष चौऱ्यांशी येऊनियां प्रती ।
कोटीफेरे होती कोटी जीवा ॥१॥
परी ही मनुष्य देहत्वप्राप्ती ।
लाभ नाहीं हातीं अवचिता ॥२॥
नवमास मायेनें वाहिले उदरीं ।
तिजप्रती सोयरी आणिक नाहीं ॥३॥
कामधेनु म्हैशी आणिक दासदासी ।
धन बहु सायासीं मिळविलें ॥४॥
तुझिया धनासी नाहीं रे बाळका ।
अंतकाळी देखा एकलाची ॥५॥
हातींच्या पवित्रा कानाचिया नगा ।
धावोनियां वेगा हिरोनी घेती ॥६॥
स्तनपान देउनी मोहे प्रतिपाळी ।
तेही अंतकाळी दूरी ठेली ॥७॥
आंगीची लुगडी काढा फेडा म्हणती ।
बांधोनियां देती यमा हातीं ॥८॥
ऐसा हा संसार मायेनें वेष्टीला ।
म्हणूनि दुरावला योगेश्वरा ॥९॥
ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई ।
दाखविली सोयी साची असे ॥१०॥
अर्थ:-
चौऱ्यांशी लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनीत कोटी कोटी वेळेला जन्माला यावे लागते या योनीमध्ये जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरणारे कोट्यवधी जीव आहेत असे फेरे फिरत असतां मोठ्या भाग्याने अवचित जीवाला मनुष्य जन्माची प्राप्तो होते.या संसार फेऱ्यातून सोडविणारा दुसरा कोणीही नाही, जन्मदात्या आईने ९ महिने पोटांत वागविले व तिचे प्रेम तुझ्यावर होते. तरी तो जन्म देण्यापुरतीच उपयोगी पडणारी आहे. गायी म्हशी, नोकरचाकर धन जरी मोठ्या प्रयत्नाने मिळविले तरी ते शेवटी उपयोगी पडणारे नाही. उलट अंतकालच्या वेळी ‘तुझ्या हातातील पवित्रक, कानातील दागिने काढून घेतील. जिने तुला पाजवून लहानाचे मोठे केले तीही अंतःकाळी दूरच राहीली. अंगावरची चांगली वस्त्रे काढून घेऊन तुला यमाच्या स्वाधीन करतात. अशा हा मायिक संसारामध्ये तू गढून गेल्यामुळे तुला योगेश्वर परमात्मा दूर राहीला. त्याची तुला प्राप्ती करून घेता आली नाही. हे मुक्ताबाई त् धन्य आहे तूच आम्हाला खरी सोय दाखविली. तात्पर्य, माझ्या मुक्ताबाईला खरी सोय कळतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९९२
मृतिकेची खंती काय करतोसी ।
कोण मी नेणशी काय आहे ॥१॥
काय तुज जालें नाथिला संसार ।
कासयासी भार वाहतोसी ॥२॥
शुद्धबुद्धरूप तूंचि परिपूर्ण ।
जन्म आणि मरण तुज नाहीं ॥३॥
अविद्येच्या योगें तुज जाण भुली ।
अनुभवूनी किल्ली छेदी आतां ॥४॥
श्रीगुरूच्या कृपें म्हणे ज्ञानेश्वर ।
तरसी संसार निश्चयेंसी ॥५॥
अर्थ:-
या जड देहाविषयी खेद काय करीत बसला आहेस? मी कोण आहे? काय आहे, हे तुला कळत नाही. तुला काय अडचण वाटते? नसलेल्या संसाराची काळजी कशाला करतोस.तूं शुद्ध ज्ञानस्वरूप असून तुला जन्म मरण नाही असे तुझे पूर्ण सत्यस्वरूप आहे. पण अज्ञानाच्या योगाने तुला कशी भुल पडली आता श्रीगुरूकडून मुक्त होण्याची किल्ली म्हणजे वर्म समजून घे व संसाराचा छेद करून टाक. सदगुरूंच्या कृपेने तू संसारातून तरून जाशील.हे मी तुला खात्रीने सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९९३
मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी ।
येऊनियां पाठी थापटिती ॥१॥
शुद्ध ब्रह्मीं कैशी कल्पना आरोपी ।
तोचि एक पापी जगीं होय ॥२॥
नाथिलें अज्ञान करून अनंता ।
केवीं मोक्षपंथा जाईलजे पां ॥३॥
ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन ।
सद्गुरूची आण स्वयंब्रह्म ॥४॥
अर्थ:-
मी देह आहे असे म्हटले असता लागलीच कोट्यवधी ब्रह्महत्त्या येऊन तुला शाबासकी देतील. अरे वेड्या, शुद्ध ब्रह्माच्याठिकाणी देह काय, पाप काय,इत्यादिकांचा कसला आरोप करतोस. असा आरोप करणारा तो जगात एक पापी आहे असे समज. परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान नसताना त्या परमात्म्याच्या ठिकाणी जो अज्ञान मानतो तो मोक्षमार्गाला प्राप्त कसा होईल. या सत्यगोष्टीच्या खात्री करता मी वाटेल ते दिव्य करण्यास तयार आहे. श्रीगुरूची शपथ वाहून सांगतो की जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९९४
मोक्ष मेल्या पाठी आम्हांसी होईल ।
ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।
झाका झाकी त्यास कासयाची ॥२॥
जंववरी देह आहे तंववरी साधन ।
करूनियां ज्ञान सिद्ध करा ॥३॥
गृह दग्ध न होतां शिंपीजे उदकशेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥
आहे मी हा कोण करावा विचार ।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥
अर्थ:-
मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार आहे. असे मानणारे महामुर्ख आहेत. जसे दिवा मालवल्या वर प्रकाश कसा राहील व मग घरांतील झाकाझाक कशी करणार जोपर्यंत देहांत जीव आहे. तोपर्यंत प्रयत्न करून ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे घर जळून खाक झाले नाही. तो पर्यंतच विझवण्याची खटपट केली जाहिजे ते जळून गेल्यावर पाणी मारण्याचा काय उपयोग होणार. मी कोण आहे याचा अगोदर विचार करा. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. असे निवृत्तीनाथांचे शिष्य माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

९९५
मरण न येतां सावधान व्हा रे ।
शोधूनी पावा रे निजवस्तू ॥१॥
अंतकाळी जरी करावें साधन ।
म्हणतां नागवण आली तुम्हां ॥२॥
नाशिवंत देह मानाल शाश्वत ।
तरी यमदूत ताडितील ॥३॥
काळाचे खाजुके जाणिजे कीं काया ।
धरूं नको माया सर्वथैव ॥४॥
अमोलिक प्राप्ती होत आहे तुज ।
धरूनियां लाज हित करीं ॥५॥
मागुती न मिळे जोडलें अवचट ।
सायुज्याचा पाट बांधुनी घेईं ॥६॥
ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण ।
नातरी पाषाण होउनि राहा ॥७॥
अर्थ:-
मरण येण्यापूर्वीच सावध व्हा व आत्म स्वरूपाचा शोध करून ती वस्तू मिळवा. मरणाच्या वेळी आत्मप्राप्तीचे साधन करू असे म्हणाल तर यातच तुमची नागवण झाली आहे. हा क्षणभंगूर देह कायम टिकणारा असे मानून विसंबाल तर यमदुत केंव्हा मारतील याचा नेम नाही. हा देह म्हणजे यमाचा खाऊ आहे म्हणून त्याचा लोभ धरू नका. तुला बहुमोल वस्तु प्राप्त होणार आहे. ती प्राप्त करून, न घेतल्यास मूर्ख ठरशील याची लाज धरून हित करून घे. हा मानव देह पुन्हा सहज मिळणार नाही, मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे. तो पर्यंत सायुज्यमुक्तिरूप पाठ बघून घे. मी कोण याचा विचार करा नाहीतर दगडा सारखे खुशाल राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९९६
संसारचि नाहीं येथें या कारणे ।
नाहींच जन्मणें मरणें कैचें ॥१॥
भास तोही नासताहे कैचें निराकाश ।
सर्वी समरस परब्रह्म ॥२॥
जागृति या स्वप्न तेचि तें आलें ।
अंतरी बिंबले निश्चयेंसी ॥३॥
शार्वरी प्रकाश कांहीच नाठवे ।
अदृश्य सुईजे दृश्य जालें ॥४॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तन्मय ।
ब्रह्मी ब्रह्ममय दिसे त्यासी ॥५॥
अर्थ:-
येथे म्हणजे ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी या कारणे म्हणजे अज्ञान सत्य नसल्याने प्रतिती ला येणारा संसार व त्यातील जन्ममरण सत्य कसे असणार. जो आज भासत आहे हा संसार ही अधिष्ठानरूप ब्रह्मांत लय पावणारा आहे. मग परब्रह्म ही एकच वस्तु विश्वांत भरलेली आहे. म्हणून जागृतीत आगर स्वप्नांत तरी तिच्या वांचून दुसरे काय असणार अंतरमनांत तीच वस्तु (ब्रह्म) बिंबून राहिले आहे.रात्रीच्या प्रकाशात म्हणजे मायेच्या यथार्थ ज्ञानांत दृश्य अदृश्य होऊन काही दिसेनासे होते. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल म्हणतात जे ब्रह्मरूप झाले आहेत. त्यांना ब्रह्मात्म स्वरूपाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मरूपच दिसणार असे माऊली सांगतात.

९९७
गगनीं भासले अगणीत तारें ।
तेथे मन मुरे वृत्तीसहीत ॥१॥
पर्जन्याच्या धारा भूमिवीण पडे ।
जेथें बुद्धी उडे समूळची ॥२॥
मसुरे प्रमाण सावळे अनंत ।
आव्हाकार गणिती तपामाजी ॥३॥
स्वरूपाचा पूर चिदाकाशी गेला ।
देखणा राहिला सहजची ॥४॥
ज्ञानदेव म्हणे स्वसुख रोकडें ।
निवृत्तीने पुढे दाखविलें ॥५॥
अर्थ:-
आकाशातील अनंत तारे पाहिले म्हणजे ते आकांशात कसे राहिले असे मानुन आश्चर्याने वृत्तीसहीत मन विरून जाते. पर्जन्याच्या धारांना वर कशाचाही आधार नाही.हे पाहून बुद्धी कुंठीत होते.अशा रितीने सर्वव्यापी स्वरूप ज्याचे आहे तो योगीलोकांना मसुरेच्या डाळीं प्रमाणे दिसतो. सर्व दृश्य मात्र वस्तु त्या चिदाभासाने प्रकाशित होते. ही गोष्ट कळल्यावर पाहणारा साहजिकच तटस्थ होणार. निवृत्तीनाथांनी मला ही रोकडी सुखाची गोडी दाखविली.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९९८
सुवर्णाचा चुरा शुद्ध पीत दिसे ।
वस्तु हे प्रकाशे तैशापरी ॥१॥
अगणित तारे ओतिले अचळ ।
अखंड निर्मळ ब्रह्मरुप ॥२॥
निराचिया धारा अभ्रेंवीण पडे ।
देखणा हा बुडे तयामाजीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे काय सांगू सुख ।
मागें पुढे देख निवृत्तीशी ॥४॥
अर्थ:-
सोन्याचा चुरा शुद्ध पिवळा दिसला तरी तो सोन्या सारखाच शुद्ध असणार त्याप्रमाणे आत्मवस्तु भिन्न भिन्न देहाच्या ठिकाणी अधिष्ठान रूपाने दिसली तरी तिच्या मूळ स्वरूपांत कांही फरक पडत नाही.आकांशात जे अनेक अचळ तारे दिसतात ते ही ब्रह्मपदच होत. ढग न दिसता आकाशांतून पावसाच्या धारा पडतात व पाहणारा आश्चर्याने थक्क होतो. त्यातही ब्रह्मतत्त्व आहेच. त्या ब्रह्मसुखाचे वर्णन करून काय सांगावे ते मुळीच सांगता येणार नाही. पण निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने मागे पुढे जिकडे तिकड़े ते ब्रह्मसुखच भरले आहे. असे मला कळले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

९९९
ब्रह्मप्राप्ती पूर्ण झाली ज्या नराला।
अंतरबाह्य झाला प्रकाशची॥१॥
बाहेर भीतरी लावी जैसा दीप।
सबाह्य अमूप रूप फांके॥२॥
अग्निसंगे लोहतत्त्व थोर नेटे।
उभवतो दाटे हुताशन॥३॥
तैसा ब्रह्मीं लाहे हृदयी त्रिनेत्र।
बाह्य निरंजन अवघा झाला॥३॥
निवृत्तीचे पायीं ज्ञानदेव लीन।
जग जनार्दन निरंतर॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे कंदिलात दिवा लावला म्हणजे त्याच्या आंत बाहेर सर्व प्रकाश दिसतो. त्या प्रमाणे ज्या पुरूषाला ब्रह्मप्राप्ती झाली. त्याच्या आत बाहेर ज्ञानाचे तेज दिसते. लोखंड अग्नीत ठेवून तापवले म्हणजे ते जसे अग्नीमय होते. त्या प्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर ब्रह्मज्ञानी पुरूषाला तिसरा ज्ञाननेत्र प्राप्त होतो. व मायेचे आवरण नाहीसे होते. मी निवृत्तीच्या पायी लीन झाल्यामुळे सर्व जगत मला जनार्दनरुपच दिसू लागले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०००
सुखाची आवडी घे कां रे गोविंदी ।
चित्त हें आनंदी ठेऊनियां ॥१॥
मनाची मोहर लावा की रे नामी ।
मनोरथ कामी गुंतूं नका ॥२॥
अकळित काळ जंव आहे दूरी ।
तंव तूं श्रीहरि चिंत वेगीं ॥३॥
देहाचा दीपक जंव आहे देहीं ।
तंव तो निवडुन घेई निके ॥४॥
निवृत्ती सोपान ज्ञानदेव म्हणे ।
श्रीगुरू ही खुण बुझेतीना ॥५॥
अर्थ:-
तुम्हाला सुखाची इच्छा असेल तर परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेऊन गोविंदाचे नामस्मरण करा.आपले मनोरथ पूर्ण करून घेण्याची खटपट करता मनाचा ओढा भगवन्नामोच्चाराकडे वळवा. न कळत छापा घालणारा काळ जो पर्यंत दूर आहे तो पर्यंत हरीचे चिंतन करा. जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत त्या अव्यक्त परमात्म्याची ओळख करून घ्या.मला व सोपानदेवांना श्रीगुरू निवृत्तीरायांनी सांगितलेली खूण आम्ही विसरलो नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP