मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग १०११ ते १०२०

अप्रसिद्ध अभंग - अभंग १०११ ते १०२०

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


N/A१०११
सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन ।
दाविलें निधान वैकंठीचें ॥१॥
सद्गुरु माझा जीवाचा जिवलग ।
फेडियेला पांग प्रपंचाचा ॥२॥
सद्गुरु हा अनाथ माऊली ।
कृपेची साऊली केली मज ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें ।
निवृत्तीनें दिधलें निजबीज ॥४॥
अर्थ:-
सद्गुरुसारखा जीवलग, सज्जन, सोयरा नाही त्या श्रीगुरुरायांनी मला वैकुंठीचे निधान जो परमात्मा तो मला दाखविले. सदगुरु माझ्या जीवाचा जीवलग असून त्यांनी मला प्रपंचातून मुक्त केले. सद्गुरु हे अनाथ जीवाची माऊली असून, ती माऊली अनाथ जीवांवर आपल्या कृपेची सावली करीत असते. आकस्मिक गोष्ट अशी घडली की श्रीगुरु निवृत्तीरायांनी माझ्यावर कृपा करुन मला ब्रह्मस्वरुपाचे ज्ञान करुन दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०१२
ज्ञानप्राप्ती लागीं व्हावे अति नीच ।
म्हणवी जो उच्च सिद्ध नोहे ॥२॥
अहंता समुळ करावा कीं त्याग ।
काम क्रोध मांग शिवूं नये ॥२॥
सात्त्विक वैराग्य परिपूर्ण शांति ।
दैविक संपत्ति सांडी केवीं ॥३॥
व्हावे निराभास तरीच ही प्राप्ती ।
ज्ञानेश्वरा भ्रांति कीं रे नाहीं ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता सद्गुरुपदी अति नम्र व्हावे लागते. गर्वाने फुगून जाऊन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केल्यास ते सिद्धीस जात नाही. याकरिता अहंकार समूळ काढावा व काम क्रोध या मांगांना तर शिवूच नये. सात्त्विक वैराग्य पूर्ण शांति व दैवि संपत्ति टाकून कसे चालेल? जगत् मिथ्या आहे. ही भ्रांती जाऊन ज्ञानाची प्राप्ती झाली असे समजावे. आमच्या ठिकाणी जगत् सत्यत्व भ्रांती राहिली नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०१३
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥१॥
पतीतपावन मान समोहन ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन ।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥४॥
अर्थ:-
आमची उपास्य देवता जो श्रीविठ्ठल तो सगुण निर्गुणाहून विलक्षण ब्रह्म आहे. तसेच तो पतितपावन, मनाला मोहून टाकणारा विठल आहे. ध्याता, ध्यान व ध्येय याहून वेगळा तो अनादि सिध्द असा आहे. सच्चिदानंद स्वरुप अनादि सिद्ध जे ब्रह्म तोच आमचा श्री विठ्ठल आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात

१०१४
भ्रमरीच्या ध्यासें भ्रमरीच होय ।
कीटकत्व जाय पालटोनी ॥१॥
ब्रह्म ध्यासे स्वयें ब्रह्मचि होईजे ।
जीवत्व लोपिजे सहजची ॥२॥
किडाळ त्यजिले चोखाळचि नाहीं ।
आणि हे पाही अनादिची ॥३॥
जुनाटचि आहे जाणा सोयरिक ।
माया उपाधिक भ्रमलाशी ॥४॥
विचार करितां सर्व एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर सत्ययोगी ॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे भिंगोट्याच्या घरांत असलेली अळी भिंगोटा आपल्याला मारील या भीतीने ध्यास घेऊन भिंगोटाच बनते. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे असा ध्यास घेऊन ब्रह्म होऊन जा. म्हणजे सहज जीवपणा नष्ट होईल. हीणकट पणा गेला म्हणजे. उत्तम सोन्यावांचून दुसरे काहीच नसते. जीवब्रह्माची एकता अनादि आहे, पण मायेच्या उपाधीने जीव भ्रमिष्ट झाले आहेत. विचार करुन सर्व जीव ब्रह्मरुप आहेत. असे जो जाणतो. तोच खरा योगी असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

१०१५
वर्ण ना व्यक्ति अमुप निजतेज ।
संतांचे ते गूज आत्मरुप ॥१॥
मुक्ताचा सागर भरिंत दाहि दिशा ।
पाही जीवदशा बुडुनि जाय ॥२॥
ते खूण दाविली माझिया नयनीं ।
चिदरत्नाची खाणी उघडली ॥३॥
निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव लाधला ।
सुखिया हो झाला तेणें सुखें ॥४॥
अर्थ:-
आत्मस्वरुपाला वर्ण नाही, रुप नाही पण ते अत्यंत तेजोरुप आहे ही संतांची गुह्य गोष्ट होय. ज्याच्या प्राप्तीने जीवदशा नाहीशी होऊन सर्व दिशा मुक्त पुरुषाच्या बोधाने भरुन जातात. व जीवदशा नाहीशी होते.ते आत्मस्वरुप मला दाखवून ज्ञानमय रत्नांची खाण मला उघडून दिली. हे स्वरुप मला निवृत्तीरायांच्या कृपेने प्राप्त झाले व मी त्या योगाने पूर्ण सुखी झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०१६
नेणण्याचें रुप तेंचि रे अज्ञान ।
जाणते ते ज्ञान दोन्ही मिथ्या ॥१॥
पूर्णाची ओळखी मुळीं माया नाहीं ।
कोण मी हे पाहीं शोधूनियां ॥२॥
अनुभव सुख भोगितांना भोग ।
न होता अव्यंग भाररुपें ॥३॥
बद्धमुक्त शून्य होसी निराकार ।
म्हणे ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानी ॥४॥
अर्थ:-
मला काही माहीत नाही. असे म्हणणे याचे नाव अज्ञान, व मला माहित आहे असे म्हणणे म्हणजे ज्ञान पण ही दोन्ही ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने मिथ्या आहेत.ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी माया नावांची वस्तु मुळीच नाही. हे मी कोण आहे. याचा विचार करुन पहा, म्हणजे कळेल ते समजल्यावर आत्मसुखाचा भोग होईल. पण त्या आत्मसुखाच्या भोगाला भोग असे म्हणता येणार नाही. कारण आत्मा आपल्या स्वरुप ऐश्वर्याने अव्यंग आहे.तत्त्वज्ञानाचे दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी बद्ध मुक्त हे भाव जाऊन तूं निराकार आत्मरुपच राहशील. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

१०१७
तिही शून्यावरती नांदताहे देहीं ।
तोचि ब्रह्मांड गेही भरुनि ठेला ॥१॥
जयाचा तो भास बिंबाकार आहे ।
ते खूण लाहे गुरुपुत्रा ॥२॥
बिंबाचे तें अंग ब्रह्म ते निघोट ।
वस्तु ते अविट तेज:पुंज ॥३॥
चळेना ढळेना जैसें तैसें तेंचि ।
उपमा आणिकाची केवीं साहे ॥४॥
बहुजन्मा शेवटी फळ हे पुण्याचें ।
अभाग्याशी कैचें प्राप्त होय ॥५॥
अपार अधिष्ठानी सत्य ही अभंगी ।
जाणूनियां वेगीं जीवीं धरा ॥६॥
ज्ञानदेव म्हणे यापरता नाहीं ।
उपदेश कांही बोलावया ॥७॥
अर्थ:-
हे गुरुपुत्रा सत्त्व, रज, तम, या त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडचा परमात्मा देहामध्ये नांदत आहे. व तोच परमात्मा सर्व ब्रह्मांडांमध्ये ओतप्रोत भरला आहे. हे ब्रह्मांड म्हणजे त्याचा भास आहे, हे गुरुपुत्रा ही खूण तूं जाणुन घे. बिंबरुप जे ब्रह्म, ते एकरस, अविट, तेजःपुंज असे आहे. ते व्यापक असल्यामुळे चळत नाही, व ढळत नाही. असे ते एकरुप आहे. त्याला कशाचीही उपमा नाही. त्याची प्राप्ती होणे. हे अनेक जन्माच्या पुण्याईचे फळ आहे. त्याची प्राप्ती दुर्देवी माणसाला होत नाही. अशा त-हेच्या अपार अधिष्ठानरुप परमात्मा जाणून त्याला चित्तामध्ये कायमचा धरुन ठेवा. याच्या पलीकडे तुम्हाला उपदेश करण्याचे काही शिल्लक राहिले नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०१८
दृष्टिमाजी रुप लखलखीत देखलें ।
अव्यक्त ओळखिलें तेजाकार ॥१॥
सांवळे सुंदर रुप बिंदुलें ।
मन हे मुरालें तयामाजी ॥२॥
अणुरेणु ऐसें बोलती संतजन ।
ब्रह्मांड संपूर्ण तया पोटीं ॥३॥
निवृत्तीची खूण ज्ञानदेव पावला ।
सोयरा लाधला निवृत्तिकृपें ॥४॥
अर्थ:-
तेजोमय परमेश्वरांचे जे अव्यक्त रुप ते माझ्या डोळ्यांनी मला स्पष्ट दिसले.ते अल्प बिंदरुप सुंदर स्वरुप पाहुन माझे मन तद्रप झाले. या परमेश्वराला संत अणुरेणु इतका संकोचित समजतात. पण त्यांत सर्व ब्रह्मांड सामावले आहे येवढा मोठाही समजतात. निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ही ज्ञानाची खूण कळली. व त्यामुळे पांडुरंगराया मला सोयरा लाभला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

१०१९
सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं ।
तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
आतां मी न करी भ्रांतीचे भ्रमण ।
वृत्तीसी मार्जन केलें असे ॥२॥
एकार्णव झाला तरंगु बुडाला ।
तैसा देह झाला एकरूप ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें नवल केलें ।
तारूं हरविले मृगजळी ॥४॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मना, ब्रह्मरूप जे निवृत्तिनाथ त्यांच्यापायी सर्व तीर्थ असल्यामुळे तुही तेथे स्थिर हो. गुरूकृपेने वृत्ति निर्मळ होऊन आतां मी देह आहे ही भ्रांती नष्ट झाली. म्हणून सुखाकरीता इकडे तिकडे तिर्थयात्रेकरिता भटकण्याची जरूरी नाही. ज्या प्रमाणे समुद्रावरच्या लाटेला मानलेला भित्रपणा नाहीसा होऊन ती जसी समुद्ररूप होते त्याप्रमाणे या देहाचा मिथ्यात्व निश्चय होऊन मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान मला झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल, त्यानी एक असा चमत्कार करून दाखविला की मृगजळांत मिथ्या नाव नाहीसी व्हावी याप्रमाणे माझा देहात्मभाव नाहीसा केला. असे माऊली सांगतात.

१०२०
गुरूज्ञान नाहीं ज्यासी ।
तरुणोपाय नाहीं त्याशी ।
तो नावडे ऋषीकेशी ।
व्यर्थ जन्मासी तो आला ॥१॥
देव धर्म नेणे कांहीं ।
धरी प्रपंचाची सोई ।
त्या कोठेही थार नाहीं ।
हे वेद बोलिलासे ॥२॥
कृष्णकथा जो नायके ।
रामनाम न म्हणें मुखें ।
तया सोसकोटी दुःखें ।
जन्म योनी भोगू लागेल ॥३॥
ज्ञानदेवी अभ्यास केला ।
सर्व संसार हा तारिला ।
रामकृष्णे भवपाश तोडिला ।
सर्व पितरांसहित ॥४॥
अर्थ:-
ज्या पुरूषाला गुरूंचा अधिकार कळत नाही. त्याला संसार समुद्रातून तरून जाता येणार नाही. इतकेच काय पण तो देवाला देखील आवडत नाही. त्याचा जन्म निष्फळ आहे. ज्याला देवधर्म आवडत नाहीत व प्रपंचाची कास धरून चालला आहे. त्याला ऐहिक अगर पारलौकिक कुठेही सुख मिळणार नाही.हे वेदानीच सांगितले आहे. जो कृष्णकथा ऐकत नाही मुखाने राम राम म्हणत नाही त्या पुरूषाला कोट्यवधी जन्म घेऊन नरकयोनीत दुःख भोगावे लागतील. मी श्रीगुरूचे सहाय्य घेऊन अनेक जन्मामध्ये भगवन्नामस्मरणादि अभ्यास केला म्हणून हा संसारसमुद्र तरून गेलो. मी स्वतःच तरून गेलो असे नाही तर माझ्या सर्व पूर्वजांचा संसार पाश तोडून मी त्यांना मुक्त केले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP